©गाठी स्वर्गात जुळतात - १

Submitted by अज्ञातवासी on 15 April, 2020 - 22:04

©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे रूपांतरण किंवा पुनर्मुद्रण करताना लेखकाची परवानगी आवश्यक असेन, अन्यथा कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.

"हं, काढा बोर्ड." गौरवने आवंढा गिळला.
"रडुबाई!!!" साक्षी जरा घुश्यातच होती.
"रडुबाई काय? रक्त आटवून पाणी साठवून हा बिजनेस उभा केला होता मी."
"हॅहॅहँ," साक्षी तोंड वेन्गाडत म्हणाली. "हा बिजनेस उभा राहिला? ऑ...? माणसाने किती खोटं बोलावं. तुझा बिजनेस कधी रांगला सुद्धा नाही."
बोर्ड काढता काढता धाडकन खाली पडला. वर चढलेल्या माणसाने जीभ चावली.
साक्षीने त्याच्याकडे रागाने बघितले, आणि म्हणाली.
"तुमची काहीच चूक नाही. हा बिजनेसच पडेल होता, आणि माझा बिजनेस पार्टनरही!" तिने गौरवकडे कटाक्ष टाकला.
"तू मला पुन्हा पुन्हा ऐकवू नकोस हं..." गौरवने विरोध करण्याचा क्षीण प्रयत्न केला.
"मी ऐकवतेय? डीसगस्टिंग!!!" तिने हात उडवले, व ती तरातरा निघून गेली.
गौरवने पुन्हा आवंढा गिळला.
गौरव आणि साक्षी. सोबतच MBA झालेलं. लहानपणापासूनची मैत्री. इतकी, की साक्षीने मार्केटिंग घेतलं, म्हणून गौरवनेही घेतलं. पण हो, फक्त निखळ मैत्री बरका! गौरवला यावरून त्याचे मित्र बऱ्याचदा छेडायचे. पण त्याचं उत्तर ठरलेलं असायचं.
"ती माझ्या टाइपची नाही."
आणि साक्षीला तर कुणी विचारायची हिम्मत करू शकत नव्हतं, रस्त्यात झिंज्या उपटून वरून समोरच्याचे विचार किती खालच्या दर्जाचे असून जगण्यास तो किती नालायक आहे, याची संपूर्ण माहिती देऊन तिने बोलणाऱ्याची रवानगी घरी केली असती.
आता तुम्ही विचाराल, तू कोण? अरे मी कोण आहे, हे विचारण्यापेक्षा जे सांगतोय त्याकडे लक्ष द्या ना!
हं, तर आता यांनी MBA ला ऍडमिशन घेतलं आणि पासही झाले, तरीही कुठल्याही कंपनीने यांना घ्यायची हिम्मत केली नाही. आता का घेतलं नाही, यासाठी काही उदाहरणे देतो.

उदाहरणे!
साक्षीचा इंटरवयु
प्रश्न - तुम्ही कस्टमर रिजेक्शन कसं हँडल कराल?.
उत्तर - कुणाच्या बापात हिंमत नाही, साक्षी पवारला रिजेक्ट करायची.

प्रश्न - जर तुमच्या प्रॉडक्टचा कुणी कस्टमर गैरवापर करत असेल, तर काय कराल?
उत्तर - जागीच फोडेन, सांगून ठेवते.

प्रश्न - तुम्हाला डोर टू डोर मार्केटिंग जमेल.
उत्तर - बापाने दीड लाख भरलेत माझ्या, दारोदार भटकण्यासाठी नाही!

गौरवचा इंटरवयु
प्रश्न - तुम्ही कस्टमर रिजेक्शन कसं हँडल कराल?
उत्तर - सर, कस्टमर म्हणजे देवाच रूप, देवाने पाठ फिरवली, तर मोठमोठे रथी महारथी लयाला जातात. म्हणून मी कस्टमररुपी देवतेला प्रसन्न ठेवण्यासाठी कठोर प्रयत्न करेन, आणि जरी देवता रुष्ट झाली, तरी प्रयत्नरुपी तपस्येने त्यांना प्रसन्न करून घेईल.

यावर इंटरवयुवर १ - केहना क्या चाहते हो?
इंटरवयुवर २ - कौन हे ये लोग, कहासे आते है ये लोग?
इंटरवयुवर ३ - उठाले रे बाबा, उठाले.

यांच्या या पराक्रमापायी दोघांनाही जॉब मिळाला नाही.
आता साक्षीला जॉब नसल्याने जगातल्या ९९ टक्के भारतीय आईबापाप्रमाणे तिच्याही आईवडिलांनी तिचं लग्न लावून देण्याचा विचार केला. तिचा स्फोट होऊ नये, म्हणून दबक्या आवाजात चर्चा, आडून 'अग तो पाटलांचा गणू यूएस मधून आलाय' असं तिच्या कानावर जाईल असं बोलणं, बाबांचे 'लागले नैन पैलतीरी' असे डायलॉग मधून मधून येणं नित्याच झालं.
गौरवच्या आईवडिलांनी तर 'गावमधार सऊ एकर जमीन शे, शेतीमधार लाग, तुले नोकरी तुण्या बापने ठीदी...' असाच लकडा लावला.
दोघेही निराश होऊन घरात बसले. दोघांनी मोठ्या नोकरीची, मोठया पदाची स्वप्ने पाहिली होती, पण आता स्वप्ने स्वप्नेच राहिलीत.
पण म्हणतात ना, तुमची नियती तुम्हाला कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही, तसाच त्यादिवशी गौरवचा मामा सहा महिन्यातून उगवला...
त्याला बघून गौरवच्या आईला, जिला प्रेमाने आक्का म्हणायचे, फार आनंद झाला, आणि गौरवचे वडील, ज्यांना आदराने अण्णा म्हणायचे, तेवढंच दुःख झालं.
"आक्का, कितनी वाळ गई है तू...?"
मालेगावात राहिल्याने अशी भाषा झाली होती मामाची... मूळची मराठी + अहिराणी, त्यात मालेगावची हिंदी आणि चवीपुरतं उर्दू यातून जो अभूतपूर्व संगम होई, तो बऱ्याच लोकांना समजत नसे.
"काय दाजी, आप तो तकल्लूफ पण करत नाही?" मामा अण्णांकडे वळला.
"काय करत नाही?" दाजी प्रश्नार्थक चेहरा करत म्हणाले.
"गवार ही रहेंगे," त्याने दाजींकडे तुच्छ कटाक्ष टाकला, आणि शोधर्थक नजरेने घरात कटाक्ष टाकला.
"काय पाहू राहिला?" अण्णांनी विचारले.
"आमचे भाचेराव..." मामा उत्तरला.
तर मंडळी, आज इथेच थांबतो. काय आहे,कथा मोठी आहे, आणि वेळही भरपूर आहे. तर मस्तपैकी रमतगमत जाऊ.
आता तुम्ही पुन्हा विचाराल तू कोण?
मी कोण आहे, हे विचारण्यापेक्षा जे सांगतोय त्याकडे लक्ष द्या...ओके?

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरवात तर भारी झाली आहे.
अज्ञातवासी, तुम्ही मालेगावच्या आसपासचे का? लहेजा सही पकडलाय.
१७ दिवसात संपवा म्हणजे झाल.

मस्तच... वाचू राहीलोय..

मामाचं कॅरेक्टर भारी आहे...

आक्का, कितनी वाळ गई है तू...?" >>>
ह्या वाक्याला खुप हसू आलं..

मस्त सुरवात..
अज्ञा, पुढचा भाग लिहिणार असशील तरच क्रमशः टाक. Wink

सर्व प्रतीसादकांचे धन्यवाद!
मी मालेगावकडचा नाही, पण ती भाषा चांगलीच माहिती आहे.
दुसरा पार्ट लिहायला घेतला, पण तरीही नाही जमलं नीट. त्यामुळे ही कथा इथेच थांबवतोय. भविष्यात जमलं तर लिहिनही...
सॉरी आणि पुन्हा एकदा धन्यवाद!

भाग 1 म्हणजे क्रमशः असणार हे कळूनही का वाचायला आले मी.
आधी तो बाहुल्यांचा खेळ पूर्ण करा हो लेखक महोदय.