मानसीचा चित्रकार तो

Submitted by Theurbannomad on 7 April, 2020 - 09:06

काही व्यक्तींना जन्मजात कलाकार होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची देणगी मिळालेली असते। अशा व्यक्तींना कला शिकवावी लागत नाही. दूध पित्या वयातल्या आणि बोबडे शब्द बोलायला लागलेल्या लहानशा मुलाला गाणं ऐकून तंद्री कशी लागते, याचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शोध घेणं मला तरी अशक्य वाटतं. कुठल्याशा पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधातून जन्मजात बरोबर आलेली ही शिदोरी ज्याच्याजवळ असते, ती व्यक्ती माझ्या मते विधात्याने केवळ सर्वसामान्य मनुष्यप्राण्यांच्या आयुष्यात चार आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठीच गंधर्वलोकातून खास या पृथ्वीतलावर पाठवलेली असते. कलियुगातील हे कोरडं आणि यांत्रिक जग अशा व्यक्तींच्या असण्यामुळे खऱ्या अर्थाने 'जिवंत' राहिलेलं आहे यावर माझा तरी ठाम विश्वास आहे.

ज्या शहराला भूलोकीवरच्या सर्वाधिक सुंदर आणि नीटनेटक्या शहराच्या यादीत अव्वल क्रमांक अनेक वर्ष मिळालेला आहे, अशा प्राग शहरात जायचा योग्य माझ्या आयुष्यात थोड्या उशिराने आला असला, तरी स्थापत्यशास्त्र, कला, संगीत आणि तत्सम अनेक 'जिवंत आणि रसरशीत' गोष्टींवर मनापासून प्रेम असल्यामुळे हाती आलेल्या या संधीचं सोनं करायची संधी सोडायची नाही, अशी खूणगाठ मनाशी बांधून मी जायच्या दिवसाच्या आधी अनेक दिवसांपासून प्राग मध्ये काय काय करायचा याची यादी तयार करत होतो. लग्नाच्या १०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हि सहल होणार होती. एकाच महिन्यात काही दिवसांच्या अंतराने चतुर्भुज झालेल्या माझ्या दोन भावांबरोबर ही सहल होणार होती. एकूण तीन बायका , त्यात भर म्हणून जन्माला आलेली चार आणि काही महिन्यात येण्याच्या वाटेवर असलेला एक असा ' स्वतःच्याच नाही, तर कोणाच्याच बापाला न जुमानणाऱ्या ' कार्ट्यांचा जत्था , या सगळ्यामुळे आम्हा तिन्ही पुरुष व्यक्तींना 'पुरुषसुलभ' कर्तृत्व गाजवायला फारशी संधी मिळणार नाही याची आम्हाला जाणीव होती. त्यातल्या त्यात काही सूट मिळू शकते का याची चाचपणी विमानात बसायच्या आत आम्ही आळीपाळीने करून घेतली आणि शेवटी लग्नाला १० वर्ष झाल्याच्या 'आनंदात' तिघे प्रागला ' सोवळ्यातले दशग्रंथी ' ब्राम्हण होऊन राहू अश्या आणाभाका घेऊन आम्ही नाईलाजाने आमच्या 'इतर' कार्यक्रमांना तिलांजली दिली.

या शहराला युरोपच्या सर्वोत्कृष्ट शहरांपैकी एक का म्हणतात, याची प्रचिती आम्हाला त्या शहरात पाऊल ठेवल्या ठेवल्या यायला लागली होती. ऐतिहासिक वारसा कसा जतन करावा, शहर 'एखाद्या नवपरिणीत वधूसारखं' सुरेख नटलेलं कसं ठेवावं आणि शहरातल्या गर्दीचा 'गजबजाट' कसा न होऊ द्यावा याचा आदर्श नमुना वाटेल, असं ते शहर होत. चार दिवस मनसोक्त हिंडून शहर सोडायच्या आदल्या रात्री आम्ही हॉटेल मध्ये एकत्र जमलो, तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळच्या ३-४ तासात शहराच्या त्या प्रसिद्ध 'ओल्ड टाउन' अर्थात ' स्तरे मेस्तो ' ला एकदा पुन्हा भेट द्यायचा प्रस्ताव मी सर्वांसमोर ठेवला. खरेदी करून बॅगा ओसंडून वाहात असल्यामुळे आणि हिंडून हिंडून पाय तुटायची वेळ आल्यामुळे अर्थात बाकीच्यांनी हळूच माझ्या उत्साही प्रस्तावातून अंग काढून घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी एकला जीव माझ्या काही तासांच्या भटकंतीवर निघालो.

कधी काळी ऑस्ट्रियाच्या पोलादी मुठीत जखडलेला हा देश पहिल्या महायुद्धात सामील झालेला होता. तेव्हाच्या 'चेकोस्लोव्हाकिया' देशाचा एक भाग असलेला आणि नंतर १९९१ साली शांततापूर्ण रीतीने स्लोवाकियापासून वेगळा झालेला हा ' चेक रिपब्लिक ' देश आणि त्याची राजधानी असलेलं हे 'प्राग' शहर माझ्या डोळ्यांसमोर झोपेतून जाग होत होतं. ओल्ड टाउन च्या भागात असलेल्या ऐतिहासिक इमारतींना मला पुन्हा एकदा डोळे भरून बघायचं होतं. इथल्या या इमारतींना इथले लोक ओल्या बाळंतिणीसारखे जपतात, हे मला पदोनपदी जाणवत होतं. त्यात त्या भव्य 'OLD TOWN SQUARE' मध्ये उभा राहिल्यावर आजूबाजूच्या इमारतींचा दृश्य बघून माझी ब्रम्हानंदी टाळी लागली होती. आजूबाजूला कोण काय करतंय, याची यत्किंचितही पर्वा न करता मी भारावल्यासारखा चालत होतो तोच एका स्टुलाला माझा पाय आपटला आणि मी भानावर आलो.

" सी झरनेनी?" असं काहीतरी कानावर पडलं. मी त्या आवाजाच्या दिशेला बघितलं तेव्हा मला दिसलेलं दृश्य इतकं अचाट होतं, की मी क्षणभर बावचळल्यासारखा त्या मनुष्याकडे एकटक बघताच राहिलो.

" ओन्ली इंग्लिश? " त्याने पुन्हा विचारलं.

" येस...." माझ्या तोंडून शब्द अक्षरशः प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून निसटले.

" OK OK....WHAT HAPPENED MY FRIEND? YOU OK ?" पुन्हा त्याने प्रश्न केला.

थोडा सावरल्यावर मला सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला. ज्या स्टुलाला मी धडकलो होतो, ते त्या माणसाचं होतं. त्याने ते स्टूल, भल्या मोठ्या आकाराचा चित्र काढायचा कॅनवास , तो कॅनवास ठेवायचा स्टॅन्ड, तीस-चाळीस रंगांच्या बाटल्या, टर्पेंटाइन ,पॅलेट, कुंचले, पेन्सिली आणि ग्रॅफाईटचे खडू असलेली लाकडी पेटी असा भला थोरला संसार त्या जमिनीवर मांडलेला होता. त्याच्या अंगावर अनेक रंगांनी माखलेला एक कोट होता ज्याच्या खिशातून अनेक कुंचले आणि पेन्सिली बाहेर डोकावत होत्या. मूळच्या गोऱ्या वर्णावर उन्हामुळे चढलेला तांबूसपणा आणि लालसर सोनेरी रंगाची खुरटी दाढी त्या अनेक रंगांमध्ये आणखी भर घालत होती. या मनुष्याचे केस इतके सरळसोट आणि लांब होते की पाठमोरा बघितल्यावर नक्की नर आहे की मादी आहे असा प्रश्न कोणालाही पडला असता. शरीरावर गुंजभरही चरबी नसल्यामुळे बाजूलाच त्याने उभी केली त्याची सायकल तो नित्यनेमाने वापरत असणार याचं अंदाज मला आला. तोंडात 'मार्लबरो' ची जळती कांडी होतीच! भेदक निळे डोळे, पावणेसहा फुटाच्या आतबाहेरची उंची, साधारण चाळीशीच्या आसपासचा वय आणि " हर फिक्र को धुएं में उडाता चला गया" ची बेफिकिरी यामुळे ही वल्ली नक्की काय आहे, कोण आहे आणि कुठून आलेली आहे हे जाणून घ्यायची माझी उत्सुकता आता चांगलीच शिगेला पोचली आणि मी त्याच्या बाजूला भर चौकात जमिनीवर बसकण मारली.

गडी चांगलाच बोलका निघाला. एका प्रश्नावर जवळ जवळ पाच मिनिटांचं दीर्घ एकपात्री स्वगत उत्तर म्हणून येत होतं आणि अधाशासारखा मी सुद्धा त्याला नवे नवे प्रश्न करत होतो. दोघेही चक्रम, त्यात दोघांना अखंड बडबड करायची सवय आणि कुठेही मैफिल जमवायची हौस असं समसमासंयोग जुळून आल्यामुळे आजूबाजूला काय चाललंय, याची यत्किंचितही पर्वा न करता आमच्या गप्पा रंगात गेल्या.

" मी मूळचा बोहेमिअन स्लोवाक. आजोबा आणि पणजोबा सैन्यातले, पण वडील मात्र सैन्यापेक्षा ऑपेरा थिएटरच्या एका मोठ्या नाटक कंपनीत चेलो वादक. कदाचित आजोबांच्या नोकरीमुळे वयाची वीस वर्ष व्हिएन्ना मध्ये घालवल्याचा परिणाम असेल, पण घरच्या भिंतीवर डकवलेल्या बंदुका जाऊन तिथे ऑपेराची चित्रं लागायला लागली आणि आजोबांनी वडिलांना कलेच्या क्षेत्रात मोकाट संचार करायची मुभा दिली. माझ्या वडिलांच्या हातात चेलो,व्हायोलिन,वायोला आणि सॅक्सओफोन अशी अनेक वाद्य आली आणि कायमची स्थिरावली. वयाच्या पंधराव्या वर्षी सात वाद्यांवर, ऑपेरा पद्धतीच्या गायनावर आणि बॅले नृत्यावर प्रभुत्व असलेले माझे वडील व्हिएन्नामध्ये कलेच्या वर्तुळात चांगलेच लोकप्रिय झाले. माझी आई त्यांना ऑपेराच्या एका नाटकामध्येच काम करताना भेटली. पण ८० आणि ९० च्या दशकात इथे झालेल्या उलथापालथीनंतर आमच्या घरातल्या वैभवाला उतरती कळा लागली। चेकोस्लोव्हाकिया दुभंगल्यावर माझे आईवडील सुद्धा वेगळे झाले. मी तेव्हा शाळेत होतो. माझे वडील प्राग सोडून जायला तयार नव्हते, आणि आईला पॅरिसला जायची इच्छा होती. शेवटी दोघांनी वेगळा व्हायचा निर्णय घेतला. पण गम्मत माहित्ये? दोघांनी घटस्फोट घेतला नाही की नवा जोडीदार शोधला नाही. केवळ कुठे राहायचं यावर त्यांचा वाद आहे. आई मूळची फ्रेंच असल्यामुळे पॅरिस तिच्यासाठी स्वर्ग आहे, पण माझे वडील मात्र पक्के चेक आहेत. आईने पॅरिसच्या आणि वडिलांनी प्रागच्या दफनभूमीत आपल्या दफनाची जागा सुद्धा खरेदी करून ठेवलीय....काय सांगायचं बोल! "

युरोपातल्या लोकांचं आपल्या शहरावर असं वेडं प्रेम असतं. आयुष्य वेगवेगळ्या जागी घालवून सुद्धा आपल्या मातृभूमीत, किंबहुना मातृ-शहरात आपलं उतारवय घालवावं आणि तिथेच आपलं दफन व्हावं यावर त्यांचा इतका गाढ विश्वास असतो, की चुकून तसं न झाल्यास अशी व्यक्ती केवळ त्या कारणासाठी स्वर्गात जागा मिळत असूनसुद्धा चित्रगुप्ताला 'पटवून' आग्रहाने आपल्या त्या आवडत्या शहरात पुनर्जन्म आणि पुनर्मृत्यू मागून घेईल अशी शंका माझ्या मनाला चाटून गेली.

" आई-वडील संगीतातले दर्दी आणि आपण चित्रकलेतले....." मी त्याला पुन्हा छेडलं.

" अरे मी काही चित्रकार नाहीये....पण मला चित्रकला येते. मी वेडा आहे. बोहेमिअन जिप्सी. तुला माहित्ये, मी घरात नाही राहात। माझं घर नाहीये. "

" म्हणजे?" मी गोंधळलो.

" अरे, मी नुसता फिरत असतो. हॉटेल किंवा हॉस्टेल मध्येच राहतो. एका शहरात राहून कंटाळा आला की दुसरीकडे बस्तान. पेशाने मी जुन्या ऐतिहासिक इमारतींच्या जतनाची, पुनर्निर्माणाची आणि डागडुजीची कामं करतो, त्यामुळे बरेच वेळा सरकारी घर मिळत राहायला. मास्टर्स केलंय मी 'CONSERVATION ARCHITECTURE ' मध्ये. युरोपमध्ये एक वेळ पंतप्रधान अथवा राष्ट्राध्यक्षांना लोक हिंग लावून विचारणार नाहीत, पण ऐतिहासिक वारशासंबंधीची काम करणाऱ्यांना ते डोक्यावर घेऊन नाचतील. पुराणवस्तू संग्रहालयाचे संचालक, माझ्यासारखे जतनतज्ञ, युरोपच्या इतिहासाचे संशोधक, पुराणवास्तूशास्त्रज्ञ अशा लोकांना इथे प्रचंड मान आहे."

आपल्याकडे युरोपच्या शंभर पटींनी जास्त आणि वैविध्यपूर्ण ऐतिहासिक वारसा असूनही त्या क्षेत्रातल्या लोकांकडे बघायचं दृष्टिकोन किती कोता आहे, याची जाणीव मला मनात टोचायला लागली। जुन्या वास्तूंच्या भिंतींवर खिळ्याने अथवा दगडाने बदाम आणि बाण कोरणारे आपले लोक युरोपच्या या इतिहासप्रेमी लोकांच्या तुलनेत किती बेफिकीर आहेत हे सत्य पचवणं मला खरोखर अवघड जात होतं.

" चित्रकला माझ्यात होतीच. लहान असताना मला बाबांनी रंग आणि कागद आणून दिले, की मी वेड लागल्यासारखा चित्रं काढत बसायचो. व्हिएन्नाला रस्त्यावर तुला असे अनेक होतकरू आणि व्यावसायिक चित्रकार पावलोपावली दिसतील. त्यातल्या अनेकांना गुरु करून घेतलं मी. एका फ्रेंच चित्रकाराकडून वॉटर कलर करायला शिकलो, एका जर्मन विद्यार्थ्याने मला 'ऍबस्ट्रॅक्ट पेन्टिंग' च्या खुब्या शिकवल्या, एका ऑस्ट्रियन माणसाने मला हे जे मी आत्ता करतोय, ते कॅनवास पेन्टिंग शिकवलं. मी तसा माझ्या महाविद्यालयाच्या आत कमीच गेलोय....हे रस्ते, या गल्ल्या आणि इथले हे कलाकार हेच माझे गुरु, माझा प्रेरणास्थान आणि माझी कर्मभूमी. इथेच मला मायकलअँजेलो भेटला, रेम्ब्रां समजला, वान गॉग सापडला आणि त्यांनी मला रंगांच्या दुनियेची ओळख करून दिली. चित्रकलेच्या 'व्याकरणाशी' माझी कधीच दोस्ती झाली नाही, पण नियमांना न जुमानणाऱ्या माझ्या मुक्त शैलीची पाळंमुळं मला इथेच गवसली."

मुक्तछंदातल्या अर्थपूर्ण कवितेपुढे वृत्तांमध्ये चपखल बसवून लिहिलेली भावशून्य कृत्रिम गझल जशी फिकी पडेल, तशी त्याची कला होती. आमच्या संवादाबरोबर त्याच्या कॅनव्हासवर त्याच्या हातातली पॅलेट्स रंग भरत होती. रंगांचे सणसणीत फटकारे उमटत होते.सकाळच्या त्या कोवळ्या उन्हाची लाली त्याच्या कॅनव्हासच्या पटलावर उमटणाऱ्या रंगापेक्षा फिकी वाटत होती. त्या रंगसंगतीत आणि फाटकाऱ्यात कुठेही हातचं राखून काही होतं नव्हतं. अधून मधून रंग तयार करताना टर्पेंटाइनचा उग्र वास यायचा तेव्हा आमच्या बोलण्यात खंड पडत होता , पण दुसऱ्याच क्षणाला त्याच्या हाताचा आणि जिभेचा प्रवाह सुरु होत होता. अडथळ्याच्या शर्यतीत जसा घोडा उडी मारायला आपलं वेग किंचित कमी करतो, तसा त्याच्या बोलण्याच्या प्रवाहात 'मार्लबरो'च्या झुरक्याचा 'स्पीड ब्रेकर' येत होता. त्याच्या बॅगेतली 'मार्लबरो'ची पाकिटं बघून कदाचित मार्लबरो कंपनीच्या शंभर-एक कर्मचाऱ्यांचा पगार या महाभागाच्या खिशातून वसूल होतं असावा, असा विचार माझ्या मनाला शिवून गेला.

दीड-एक तासानंतर साहेबांना कॉफेची तलफ आली आणि त्याच्या त्या अखंड वाहणाऱ्या रसवंतीला लगाम लागला. तोपर्यंत कॅनव्हासवर समोरच्या इमारतींचं अतिशय आकर्षक रुपडं उमटलेलं होतं. इमारतींच्या मागे सकाळची उन्हं जशी मला दिसली तशीच रंगांच्या माध्यमातून अवतीर्ण झालेली होती आणि आजूबाजूला त्या दीड तासात आली-गेलेली माणसं त्यांच्या पेहेराव्यासकट छायाचित्र काढावा तशी त्या चित्रात स्थानापन्न झालेली होती. कुंचल्याने त्या इमारतींच्या नाजूक नक्षीदार भागांचं तपशीलवार चित्रण त्याने बेमालूम केलं होतं आणि त्या चित्राच्या खाली आपली लफ्फेदार सही करून, तारीख टाकून त्याखाली त्याने चक्क अर्धवट विझलेली 'मार्लबरो' चितारली होती. मी तिथेच बसून ते चित्रं डोळ्यात साठवायचा प्रयत्न करत होतो तोवर साहेब दोन हातात दोन कॉफीचे कप घेऊन आले. अर्थात दोन बोटात नवी 'मार्लबरो' सोबतीला होतीच. चेक लोकांच्या आवडीचा ब्रेडचा 'ट्रेडेलिक' त्याने माझ्यासाठी आणला होता। स्वतःला मात्र गोमांसाने ओसंडून वाहणारं सँडविच त्याने घेतलं होतं.

" कॉफी मध्ये साखर नाही घातलीस, पण डबल क्रीम मात्र घातलंस.....हे काय रे?" मी त्याला खिजवलं.

" डबल क्रीम घातलं म्हणून साखर नाही घातली....डोकं चालव ना..." त्याने माझी तिथल्या तिथे विकेट काढली.

" भारतात गेलायस का कधी?"

" नाही, पण जायचंय. ताज महाल आणि कुतुब मिनार बघायचाय पण पेन्टिंग मात्र मी काढणार सुवर्ण मंदिराचं. "

" तुला माहित आहे सुवर्ण मंदिर?"

" इथे माझे अनेक पंजाबी मित्र आहेत." खरोखर उत्तर भारतीय आणि त्यातही पंजाबी मंडळी जगभरात त्यांची रेस्टॉरंट्स थाटून ती यशस्वीरीत्या चालवतात, यात वाद नाही.प्रागला सुद्धा अनेक अशी भारतीय रेस्टॉरंट्स आहेत आणि पंजाबी मंडळींनी त्या व्यवसायाच्या जोरावर इथला पासपोर्ट सुद्धा मिळवलेला आहे हे सत्य माझ्यासाठी माझी कॉलर वर करण्यासाठी पुरेसं होतं.

शेवटी वेळेचं भान आल्यामुळे मी तिथून काढता पाय घ्यायचा ठरवला. कला एक अशी गोष्ट आहे, जी माणसाला वेळ-काळ विसरून जायला भाग पाडते. त्यात अशा एका विक्षिप्त पण मनस्वी कलाकाराचा सहवास मिळत असेल, तर आजूबाजूचा जग थिजून जावं आणि फक्त आपल्या गप्पा सुरु राहाव्या यासाठी मन सतत खुणावत असतं. माझ्या आवाक्यात असतं, तर मी तो दिवसाचं काय, पण पुढचे अनेक दिवस या वल्लीबरोबर घालवले असते, पण हॉटेलमध्ये शेवटची आवराआवर होतं असेल आणि ती झाल्यावर आपण समोर दिसलो नाही तर लग्नाच्या १०व्या वाढदिवशी परदेशात आपल्या जीवाला धोका निर्माण होईल ही जाणीव झाल्यामुळे मी अजून थोडा वेळ तिथेच घुटमळायचा मोह आवरता घेतला. चुकूनही मी अजून वेळ काढला, तर तिथल्या ऐतिहासिक आणि सुंदर शिल्पांमध्ये माझा ओबडधोबड पुतळा स्थापन होईल याची मला पूर्ण खात्री होती.

मी निघायचा म्हंटल्यावर त्याने उठून मला आलिंगन दिलं. रंगकाम झालेला असल्यामुळे त्याचा तो कोट त्याच्या अंगावर नव्हता, अन्यथा माझी अवस्था काय झाली असती कुणास ठाऊक! आलिंगन देताना सुद्धा त्याच्या ओठातली 'मार्लबरो' तशीच होती. चुकून या माणसाच्या पिंडाला कावळा शिवला नाही, तर मार्लबरो पेटवून ठेवल्यावर तो नक्की येईल आणि अक्खी सिगरेट संपवून मगच पिंडाला चोच मारेल याची मला मनोमन खात्री पटली.

मी त्याचा ते चित्रं, आजूबाजूचा तो भारावून टाकणारा परिसर आणि वरचं निळंशार आकाश डोळ्यात साठवून ट्राम स्टेशन कडे जायला लागलो. अचानक आपण या महाभागाचा नावंच विचारायचं विसरलो, याची आठवण होऊन मी पुन्हा मागे वळलो आणि आपल्या सामानाच्या आवराआवरीत गुंग झालेल्या त्या कलाकाराला मी प्रश्न केला,

" मित्रा, अरे तुझा नाव?"

" शेक्सपिअरने म्हटलंय, नावात काय आहे? सोड न, नाव महत्वाचं नाहीये. इथून जाताना चांगल्या स्मृती बरोबर घेऊन जा आणि त्यात मी असलो तर माझा चेहरा एक मित्र म्हणून लक्षात ठेव. आणि एक लक्षात ठेव, २०-२५ वर्षांनी ये पुन्हा प्रागला, मी इथेच असेन. आयुष्यभर फिरलो तरी विसावणार इथेच....." आईच्या फ्रेंच वाईनपेक्षा बापाच्या चेक बियरशी याची सलगी जास्त झालेली आहे, याची जाणीव मला झाली.

थोड्या वेळापूर्वी काढलेल्या त्या पेन्टिंगच्या खाली त्याने सही केली होती हे मला एकदम आठवलं आणि मी त्याचं नाव कळेल म्हणून हळूच त्या पेन्टिंगच्या जवळ गेलो. त्याचा डोळा चुकवत मी त्याने केलेल्या सहीकडे बघितलं....

' बोहेमिअन जिप्सी ' यापेक्षा वेगळं तिथे काहीच लिहिलेलं नव्हतं!

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर, आवडलं..

कला एक अशी गोष्ट आहे, जी माणसाला वेळ-काळ विसरून जायला भाग पाडते >> +1 अगदी खरंय..