निरंजन हा माझ्या अत्यंत आवडत्या शब्दापैकी एक शब्द. लहानपणी ना.सि.फडके यांची निरंजन नावाची कादंबरी वाचली होती. काय होते त्या कादंबरीत आता आठवत सुद्धा नाही. पण या शब्दाने मात्र मनावर गारूड केलं.
निरंजन या शब्दाचा अर्थ आहे अत्यंत पवित्र, निष्कपट आणि कुठलेच किल्मीष नसलेले .पण मला त्याच्या नादाची भूरळ पडली. या शब्दाचा नाद मला देवळाच्या गंभीर घंटानादा सारखा वाटायला लागला. शांत अशी आत्म्याला स्पर्श करणारी जाणीवच जणू ती. हाच शब्द माझे अवघे प्रणव झाला.
माझ्या मनाचा अध्यात्मिक ओढा मला अश्याच जागा, वस्तू, लोक, चित्रे, नैसर्गिक सौंदर्य आणि शांतीमय वातावरणाकडे कायम ओढत असतो.
आसपास छोटी मोठी मंदिर असणाऱ्या छोट्या गावाच्या जुन्या भागात सगळे बालपण गेले. त्यामुळे ती मंदिरे त्यातले अर्चा विग्रह हे माझ्या आयुष्याचा भाग होते. आपण जसे आपल्या आईवर आपली श्रद्धा किंवा अंधश्रद्धा आहे याचा विचार करत नाही. सहवासाने परमेश्वरा बाबतीत तसेच झाले होते. आयुष्याचा भाग असल्याने आणि सतत द्रुष्टी समोर असल्याने त्याच्या बद्दल प्रेमच वाटायला लागले.
तो सहवास म्हणजे सहज उपलब्ध असलेल्या मोठ्या आनंदापैकी एक होता.
हक्काचे आनंदाचे एक ठिकाण म्हणजे कृष्ण मंदिर. माझी सखी तिथे रहात असे. तासनतास या कृष्ण मंदिरात खेळण्यात जायचे. तिच्या आजोबांनी आयुष्यभर निस्वार्थपणे त्या मंदिराच्या पूजा अर्चेचा भार सांभाळला.
हे एक दोन तीनशे वर्ष जुने मंदिर होते. आमच्या वाड्या जवळ असणारा हा एक वाडा होता. एक मोठा गेरू रंगाचा दिंडी दरवाजा असलेला . ह्यात एक पोटदरवाजाही होता. हा दरवाजा आणि त्याची आगळ दोन्ही अवजड होते. बंद करायला नक्की दोन माणसे लागत असणार म्हणून की काय हा कायम उघडाच असायचा. मी पंधरा वर्षांत हा फक्त दोनदाच बंद होता हे ऐकून होते. एकदा गोदावरीला आलेल्या पुरामुळे आणि दुसर्यांदा अयोध्या राम मंदिर प्रकरणात झालेल्या धर्मिय दंगलींमुळे. मला अर्थातच दोन्ही गोष्टींचे गांभीर्य नव्हते. शाळा नसूनही जाता आले नाही यानेच उदास वाटले.
आत गेल्यावर दगडी अंगण, उजव्या कोपर्यात न्हाणीघर, त्याच्या बाजूला बुजवून टाकलेली विहीर आणि त्याच्या वर असलेले प्राजक्ताचे नाजूक झाड. त्या विहिरीत तळ्यात मळ्यात करताना भारीच गंमत वाटायची. नेहमीच त्या केशरी दांड्यांच्या पारिजातकाचा सडा पडलेला असायचा. दोन बोटांमध्ये हलकेच दाबले तर अष्टगंधा सारख्या रंगाची मेंदी उमटायची. आजही चित्रात ते फूल पाहिले तर मन काही क्षण त्या आठवणीतल्या सुगंधात रेंगाळते.
आणखी दोन पावले पुढे गेले की सखीच्या खोल्या. बाहेरच्या खोलीला दारही नव्हते. पण तिथे कुणी नाही असे देखील कधीच झाले नाही.
चार पाच कुटुंबे त्या वाड्यात समाधानाने रहायची. पुढे दोन तीन दगडी पसरट पायर्या.. आणि आत दोन ऊंच ओसर्या मधले अरुंद दगडी अंगण. त्या पैकी एका ओसरी वर भाजी वाले भाज्यांची टोपली ठेवायची.. प्रखर ऊन्हापासून वाचवायला. दुसर्या ओसरीवर आम्ही पत्ते कुटायचो.
अजून काही पावले चालत गेले की मुख्य अंगण.ओट्याच्या बाजूला वडाचे झाड आणि त्याचा ऊंच पार. आणि समोर ओटा मागे गाभारा.
अपूर्व शांती असलेला सुंदर गाभारा. तिथे जाताच मन निरंजन व्हायचे. राधाकृष्णाचे साधारण दोन तीन फुटाचे काळ्या पाषाणात बनवलेले रेखीव अर्चा विग्रह आणि समोर नित्य तेवत असणाऱ्या प्रसन्न समया. अजून काय लागते मन नमन व्हायला.
. .तो कृष्ण मला आमच्यापैकीच एक वाटायला लागला. एकही खेळ नसेल जो तिथे खेळला नाही. कधीही हाकलून दिल्या शिवाय किंवा बोलावणे आल्याशिवाय घरी आलेले आठवत नाही. प्रदक्षिणेसाठी मोकळ्या सोडलेल्या अंधार्या बोळात डोकेही फोडून घेतले होते आम्ही दोघींनी .दुसर्या दिवशी टेंगळासहीत पुन्हा तिथेच खेळत होतो. तो गारवा, एकांत आणि मुग्ध शैशव. कृष्णा समोर आजोबा चंदन उगाळायचे तरी मी एकटक बघत बसायचे. त्यांनी साधेपणाने केलेली या अप्रसिद्ध अशा जुन्या मंदिरातली पूजा माझ्यासाठी रोजचा सोहळा होती. ते दिवस निरंजन झाले.
समोरच्या झाडावर एक मुंजा रहातो. तो कुणाला तरी रात्री शुक् शुक् करुन सरसर झाडावर चढत गेला अशी वदंता होती. ते ऐकल्यापासून आमच्या तिथल्या गप्पांमध्ये भूतांच्या गोष्टींची पण भर पडली. कृष्णाच्या समोर बसून आम्ही भूतांवर गप्पा मारल्या. किती हसला असेल तो.
रोज संध्याकाळी घरी आल्यावर आई विचारायची आज तरी पाया पडलीस का..मी शांतपणे हौदातले पाणी पायावर घेत नाही म्हणायचे. मग तिचे सुरु व्हायचे अग शेकडो वर्षापासूचे जागृत मंदिर आहे ते रोज कस विसरू शकतेस तू. मी काय सांगणार आणि कसे. कधीच आठवायचे नाही. समोरच्या नळावर उगाच पाय धूताना, ओट्यावर बसून पत्ते खेळताना. फूले वेचताना. गप्पा मारताना .तिथे तासनतास असून कधीच लक्षातच यायचे नाही की कृष्णाला नमस्कारही करायला हवा. काही तरी मोहिनीच जणू. आम्हीच कृष्ण व्हायचो कदाचित मग कोण कुणाला नमस्कार करणार.
सगळ्या गप्पांचा, खेळांचा, छोट्या छोट्या भांडणांचा अगदी सगळ्याचा तो सगुण साकार रुपाने साक्षी होता.कृष्णा सोबत त्याची सखी माझ्यासोबत माझी. आमच्या चौघांची ताटातूट होईल कधीच वाटले नव्हते बालमनाला . आज वीस वर्षे झाली त्या मंदिरात जाऊन. पुन्हा जावे तर भीती वाटते तिथली पडझड बघून मनातील हळवी आठवण दुखावेल.
सगुण साकार रुपात त्याचे नेहमीच समोर असणे मी फार ग्रुहीत धरले होते. कारण तो बालपणाच्या अस्तित्वाचा भाग होता. नंतर भौतिक अंतर वाढल्यावर लक्षात आले की तो सर्वव्यापी आहे असे नुसते माहिती असून उपयोग नाही. त्याचे तसे असणे हे जाणीवेचा भाग झाले पाहिजे. बाहेरच्या मंदिरात तो फक्त दिसतो अंतरात तो जाणवतो. त्या जाणीवेला शब्दबद्ध करणारी अवस्था हीच निरंजन. परमानंदा शिवाय काहीच न उरणे हेच निरंजन.
हीच चिरंतन निरंजन अवस्था सर्वांना मिळावी अशी त्या कृष्णाकडे प्रार्थना.
निरंजन
Submitted by अस्मिता. on 27 March, 2020 - 18:39
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
गंगा न जाऊँ जी मैं जमना न
गंगा न जाऊँ जी मैं जमना न जाऊँ जी मैं,
ना कोई तीरथ नहाऊँ जी,
पुरंदरे काका (चालेल ना) ....या वरच्या ओळीवरुन संत रोहीदास यांच्या "मन चंगा तो कठौतीमे गंगा" या गोष्टीची आठवण झाली.
ऋतुराज....खूप सुंदर आहे भजन. मला नाथ संप्रदायाचे काही तरी गूढ आकर्षण वाटते.
तन सोता ब्रह्म जागे है....खूप आवडले.
बर्याच भजनाच्या शब्दरचनेत काही तरी अद्भुत अर्थ दडलेला असतो. हे गाणे आठवले. तुझे पीया मिलेंगे. (रांझना) ते मला आतल्या ब्रह्माबद्दल वाटते. "जो देखा वही देखा तो क्या देखा है ,वो देखो जो औरोने ना कभी देखा है".
सर्व प्रतिसाद खूप आवडले.
मी दोन वर्षापासून निर्गुण निराकाराचे ध्यान करते. अर्थात साकार रुपावर देखील खूप प्रेम आहे. आपण साकार रुपात परमेश्वराला खूप मर्यादित करतो असे वाटते म्हणून ते पटत नाही कधी कधी.
सुंदर लिहिलंय..
सुंदर लिहिलंय..
सुंदर, शांत, निरंजन लेख!
सुंदर, शांत, निरंजन लेख!
खुप छान लिहिलत. मनानी तिथे
खुप छान लिहिलत. मनानी तिथे जोडल्या गेल्या आहात.
>>>आम्हीच कृष्ण व्हायचो कदाचित मग कोण कुणाला नमस्कार करणार.<<< क्या बात! असं तादात्म्य क्वचित लाभतं ___/\___
बाकी निर्गुणी भजनांवरची प्रतिसादातली चर्चा आवडली. कुमार आणि त्यांची निर्गुणी भजनं ही एक वेगळीच अनुभूती! शून्य गढ शहर माझंही पार लाडकं. चारदोन ओळी सुचलेल्या लिहिलेल्या. इथे लिहिल्यात का बघायला हवं...
शून्य गढ शहर शहर घर बस्ती,
शून्य गढ शहर शहर घर बस्ती,
कोण सूता कोण जागे है
लाल हमारे हम लालन के,
तन सोता ब्रह्म जागे है ||
जल बिच कमल, कमल बिच कलिया,
भंवर बास ना लेता है
इस नगरी के दस दरवाजे,
जोगी फेरी नीत देता है ||
तन की कुंडी मन का सोटा,
ग्यान की रगड लगाता है
पांच पचीस बसे घट भीतर,
उनकू घोट पिलाता है ||
अगन कुंडसे तपसी तापे,
तपसी तपसा करता है
पांचो चेला फिरे अकेला,
अलख अलख कर जपता है ||
एक अप्सरा सामें ऊभी जी,
दूजी सुरमा हो सारे है ||
तिसरी रंभा सेज बिछाये,
परण्या नहीं कुंवारा है ||
परण्या पहिले पुतर जाया,
मात पिता मन भाया है ||
शरण मछिंदर गोरख बोले,
एक अखंडी ध्याया है ||
__________________________________
नेटवरती 'शून्य गढ शहर शहर बस्ती ...' या निर्गुणी भजनाचा अर्थ हिंदीमध्ये सापडला. अनुवाद -
भैरवी रागातील हे भजन एका विशिष्ठ वेळेला गायले जाते. अग्नी-आप-तेज-वायु व आकाश ही पंचमहाभूते. यांपैकी वायुतत्वाचे वर्णन या भजनात येते.
सुन घर ,शहर घर बस्ती , कुण सोव कुण जागे है ।
साध हमारे हम साधन के, तन सोवे ब्रह्म जागे है ।।
ईस्वराच्या घरी सुन्न म्हणजे सन्नाटा आहे. या शांततेची सुरुवात व अंतही शून्याच्या पलीकडे आहे. ज्याक्षणी संकल्पना आली, विचार आला त्याक्षणी ईश्वर दूर गेला. ना मंदीर ना मशीद - शून्यामध्ये घर आहे.
आता जग काय आहे. तर मायावी संसार म्हणजे जग. या जगात मन-बुद्धी- वाणी यांचा निवास असतो. साधना करत असताना, एक वेळ अशी येते की स्वप्न विरुन जाते व आपल्या लक्षात्त येते की शरीर तर केवळ एक साधन होते. मूळ शोध होता तो ब्रह्मतत्वाचा. ब्रह्म म्हणजे निरंजन फक्त जागृत आहे.
जल बीच कमल , कमल बीच कलियाँ ,
भँवर वासना लेता है ।
पांचू चेला फिरे अकेला ,
अलख अलख जोगी करता है ।।
या जळाच्या मध्ये कमळेच कमळे आहेत. पोट, नाभी, हृदय, भ्रूमध्य, सहस्रार ही चक्रे म्हणजे कमळे. आता भुंगा कोण आहे तर मन. ते ना स्थिर असते ना स्थिर राहू शकते. या कमळावरुन त्या कमळावर निरंतर जाळे विणत हा भुंगा गुंजारव करत असतो. इथे ज्ञानेश्वरांच्या 'रुणुझुणु रुणुझुणू रे भ्रमरा' ची आठवण येणे साहजिक आहे.
या भुंग्याचे पाच साथी कोण तर - काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार .................... खरं तर ष्ड्रिपु असतात मग इथे ५ च का म्हटलेले आहे ते कळले नाही. पण जोगी तर या सर्वांकडे फक्त साक्षीभावाने पहातो. 'अलख अलख' अशी धुन गात तो तर आपल्याच मस्तीत जगतो. त्याची वाणी तर मुंगीच्या पावलाहूनही लहान असते. इथे कबीरांचे सुप्रसिद्ध वचन आठवते - 'चींटीके पैर घुंगरु बाजे तो भी साहिब सुनता है|" तर हा जोगी काय गातो आहे 'अलख निरंजन' अलख म्हणजे अलक्ष्य तसेच जे लिहीता येत नाही. निरंजन म्हणजे काजळीमुक्त, निर्विकार, निर्लेप, शुद्ध.
भंवर गुफा में तपसी तापै ,
तपसी तपस्या करता है ।
अस्त्र,वस्त्र कछु नहीं रखता ,
नागा निर्भय रहता है ।
आपल्या माथ्यावरती एक गुंफा आहे जिला भंवर गुंफा म्हणतात. इथे परम पिता तपस्या करीत असतो. आनि ही तपस्या जसजशी वाढत जाते, तसतसे जीव वस्त्र, आवरण, अवडंबर, कोणतेही ढोंग, पाखंड, माळ, पूजा सर्वांतून मुक्त होत जातो. ना भेदभाव ना आपलं तुपलं, आवागम म्हणजे येणे-जाणे काहीच द्वंद्वे उरत नाहीत. फक्त एक समर्पण, निर्भय शरणागती.
एक अप्सरा आगै ऊबी ,
दूजी सुरमो सारे है ।
तीजी सुषमण सेज बिछावे ,
परण्या अखन कंवारा है ।
आपल्या शरीरात,७२,८६४ धमन्या आहेत, शिरा, नाड्या आहेत. पैकी १० मुख्य आहेत. या सर्वांचे केंद्रस्थान आहे मणीपुर चक्र. या १० मध्येही ईडा-पिंगला व सुषुम्ना या नाड्या सर्वात प्रमुख. एक अप्सरा येते दुसरी जाते म्हणजे श्वास.
एक पिलंग पर दो नर सूत्या, कुण सोवै कुण जागै है ।
च्यारूं पाया दिवला जोया,
चोर किसी विध लागै है ।
योगी चार अवस्थांमध्येही =स्वप्न ,सुष्पति,जाग्रत आणि तुर्या जागृत असतो. पैकी तुर्यावस्था ही अंतिम. मनाचा लय झालेला असतो.
परण्या पेली पुत्र जलमिया ,
मात-पिता मन भाया है ।।
शरण मच्छेन्द्र जती गोरख बोल्या ,
एक अखंडी नै ध्याया है।
@अवल ...खुप छान लिहिलत.
@अवल ...खुप छान लिहिलत. मनानी तिथे जोडल्या गेल्या आहात.
>>>आम्हीच कृष्ण व्हायचो कदाचित मग कोण कुणाला नमस्कार करणार.<<< क्या बात! असं तादात्म्य क्वचित लाभतं >>>>धन्यवाद अवल, तुमच्या कडून अशी प्रतिक्रिया आल्याने बक्षीस मिळाल्या सारखे वाटत आहे . खरंच
चारदोन ओळी सुचलेल्या लिहिलेल्या. इथे लिहिल्यात का बघायला हवं...>>>लिहा कृपया.
@सामो...ऋतुराज यांनी लिहिले आहे हे भजन, पण तुम्हाला अर्थ सापडला. तुम्ही लेखाची शोभा वाढवत आहात. धन्यवाद, निवांतपणे वाचते.
धन्यवाद सनव आणि रायगड , पहिला प्रयत्न तुम्हाला आवडल्याने आभार.
करेक्ट ऋतुराज यांनी प्रथम
करेक्ट ऋतुराज यांनी प्रथम दिलेले आहे. मला हे भजन माहीत तरी नव्हते किंवा पार पार विस्मरणात गेलेले होते. ऋतुराज आदिश्री यांचे खूप आभार.
कुमारजींची निर्गुणी भजनं
कुमारजींची निर्गुणी भजनं म्हणजे पारलौकिक आनंद
त्यात "शून्य गढ .... " हे तर अगदी गूढ, अननुभूत, ब्रह्मानंदी टाळी लागावं असं भजन. त्याचा अर्थ देखील अद्भुत.
खरं तर मी काही फार जाणकार व अनुभवी नाही पण नाथ संप्रदाय हा एक अद्भुत, गूढ, चिरंतन विषय आहे.
अवल, सामो पुनश्च धन्यवाद
अवल यांनी लिहीलेले मला का
अवल यांनी लिहीलेले मला का दिसत नाहीये? लिंक आहे का त्यांच्या प्रतिसादात?
नाथ संप्रदाय हा एक अद्भुत,
नाथ संप्रदाय हा एक अद्भुत, गूढ, चिरंतन विषय आहे.>>> अगदी.., लहानपणी मैत्रिणीकडे त्यांचे खूप मोठे चित्र पाहिले होते, सह्याद्रीच्या (मला सह्याद्रीच वाटला) दरीतून जाणार्या (हे र् ला य जोडले की काय होते ) नदीच्या काठावर हे नवनाथ उभे आहेत. छाती व पोटावर दोरखंड गुंडाळलेल. भगवी वस्त्र, रुद्राक्षाची माळ, जटा, चेहऱ्यावर उग्र वाटावे असे तेज आणि अलिप्त भाव. कसे असतील ते आणि त्यांचे सन्यस्त जीवन !
लिंक नाही सामो, त्यांनी कधीतरी लिहिले होते असे म्हणाल्या त्या.
आदिश्री कॅपिटल आर ला य जोडा.
आदिश्री कॅपिटल आर ला य जोडा. मग - दर्या लिहीता येते आहे.
__________
नवनाथ पोथीतील बरेच अध्याय वाचलेले आहेत. वीरश्रीपूर्ण म्हणजे वीर रसाने युक्त अशी पोथी आहे. जसा ज्ञानेश्वरीतील मुख्य रस शांतरस आहे तसे.
आदिश्री एकदम मस्त. या
आदिश्री एकदम मस्त. या निमित्ताने मला माझे बालपण आणि जवळचे एक मंदिर ज्याच्या वावरात आम्ही खेळत असू हे सर्व आठवले. त्यावेळी मी शाळेतच होतो आणि माझ्यासाठी देव म्हणजे घरातलं देवघर आणि संध्याकाळी स्तोत्र म्हणणे. खेळताना मंदिराच्या भिंतीला चेंडू लागायचा तेंव्हा देवाच्या मूर्तीकडे पाहून सॉरी म्हणायचो आणि खेळ सुरु ठेवायचो. या लेखामुळे मलाही माझ्या बालपणीच्या मैदानातल्या मंदिरात जावेसे वाटले
सामो छान लिहिलत.
सामो छान लिहिलत.
नाही मी लिहिलं नव्हतं इथे. कॉपे करते हं.
आदिश्री अरे बक्षिस काय, लाजवू नको ग
शून्य गढ शहर :
शून्य गढ शहर :
ह्या निर्गुणी अभंगाचे कोडं सोडवण्याचा ( भावार्थ) माझा उलुसा प्रयत्न. चू भु द्या घ्या :
नाथ संप्रदायातील शून्य तत्वज्ञानानुरुप सगळे शून्यातून निर्माण झाले आहे अन सर्व शून्यातच विलिन होणार आहे.
हे शरीर जणु एक शहर आणि त्यातील आत्मा जणु वस्ती
ही वस्ती, आत्मा कोणाचा निद्रिस्त तर कोणाचा जागृत.
देव माझा अन मी देवाचा.
जेव्हा माझे शरीर- मी पण संपते, तेव्हा माझा आत्मा -ब्रह्म जागृत होते.
जीवनाच्या जलाशयात मोहाची कितीतरी कमळे, अन त्याची कितीतरी विलोभनीय रुपं. या मोहातून फिरताना आपल्या दाही इंद्रियांवर पहारा देत योग्याला पुढे जायचे असते.
शरीररुपी खला मधे आत्मारुपी बत्याने खल करत योग्याने ज्ञानाचा शोध घेत राहिले पाहिजे. सृष्टीतील पाच तत्व आणि बुद्धीची 25 क्षेत्र यांचा वेध घ्यायचा प्रयत्न करत राहिले पाहिजे.
या साऱ्या ज्ञानसाधनेच्या अग्नीमधे तप करत पाच तत्वांशी झगडत आमि स्वत:शी सतत संवाद करत योग्याने प्रयत्न चालू ठेवला पाहिजे.
योगी तपश्चर्या करत असतो तशी माया ती मोडण्याचा प्रयत्न करत असते. एक, दोन नव्हे तर अगदी रंभे सारखी मोहमायाही समोर उभी राहते.
आणि विवाहा आधीच पुत्रप्राप्तीचा आनंद त्याला मिळाला. पण अशा सापळ्यात गोरखला अडकायचे नाही, अन म्हणून तो आपल्या गुरुंना, मच्छिंद्रनाथांना मदतीची याचना करतो आहे आणि स्वत:ला सावध राहण्याचा इशारा देतो आहे.
हे वाचताना, ऐकताना माझ्या मनात आलेले विचार:
म्हटले तर सगळेच शून्य, अन म्हटले तर सारे सार इथेच. म्हटले तर शहर, म्हटले तर गुढ गढी. एकच शरीर, एकच मन, एकच आत्मा, एकच कुंडलिनी, एकच ब्रह्म, एकच बस्ती... पण शून्य, जोवर हे सगळे जागृत होत नाही, तोवर सारे सारे शून्य.
म्हटले तर कितीतरी मोह, कितीतरी प्रलोभने, कितीतरी भोग, कितीतरी तत्व, कितीतरी विचार अन कितीतरी तत्वज्ञानं अन कितीतरी ज्ञानाची द्वारे, अन अजून कितीतरी अनुभूती....
आणि तरीही सगळे पुन्हा शून्यातच विलिन होणारे. शून्यवतच सगळे...
शेवटी हा सगळा आतल्या आतला संवाद, वाद, खल, झगडा... आपला आपल्यालाच सोडवायचा. आपलाच पहारा आपल्यावरच. आपलीच मोहमाया आपणच दूर करायची. आपल्या सुखाच्या मर्यादा ओलांडायच्या आपणच, अगदी पार व्हायचे, आपले आपणच.
अधिकार नसतानाच सगळे सुख मिळवण्याची हावही आपली अन ती आवरण्याची धडपडही आपलीच. स्व निर्मितीचा आनंद, त्या निर्मितीवरचा अधिकार, हक्क हाही सगळा एका भोगाचाच भाग.... तो ही पुन्हा शून्याकडेच जाणारा.
ह्या शून्यप्राप्तीचा हा प्रवास, तो ही शून्यच... फक्त त्याची जाणीव होणं, राहणं, सतत ठेवणं हे त्या शून्याचे संपूर्णत्व. ते अंगी येणे म्हणजेच शून्यत्व...
शून्याकडून शून्याकडची वाट मात्र फार फार मोठी.... -
धन्यवाद अवल. खूप सुंदर अर्थ
धन्यवाद अवल. खूप सुंदर अर्थ आणि मुख्य म्हणजे तुम्ही स्वप्रज्ञेने लावला आहे.
___/\___
___/\___
मला वाटते की ' भवर बास ना
मला वाटते की ' भवर बास ना लेता है ' म्हणजे त्या कमलकलिकांमधे सकृतदर्शनी अडकूनही भवर तो सुगंध हुंगत नाही, त्यापासून मुक्त आहे. देहरूपी नगरीची दहा द्वारे आहेत.( सहस्रार/ ब्रह्मरंध्र हे एक द्वार मानतात) तिथे किंवा त्यांच्याकडून काही अनुचित घडू नये म्हणून जोगी दक्ष आहे, नित्य पहारा देतो आहे. पांच चेले म्हणजे पंच ज्ञानेंद्रिये. ती एकेकटी भटकली तरी साधकाला भय नाही कारण त्यांवर त्याचा ताबा आहे.
मला असेही वाटते की या भजनात साधनेच्या, तपस्येच्या पायऱ्या सांगितल्या आहेत किंवा साधनामार्गात येणारे वेगवेगळे अनुभव वर्णन केले आहेत.
इडापिंगला सुषुम्ना त्याला मोहवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण जोगी त्यांना बधत नाही, त्यांच्याशी नाते जोडत नाही, त्यांना वश होत नाही, त्यांच्यावरचे आपले नियंत्रण सोडत नाही. शिवाय, तीनही नाड्या हाती येणे ही एक मोठी अचीवमेंट आहे, संप्राप्ति आहे. ह्या पायरीवर काही सिद्धी वश होतात. साधक त्यातच रमतो. नाड्या त्याला सांगत असतात, इथेच थांब, पुढे जाऊ नकोस. पण साधक ह्या मोहावर विजय मिळवून साधनामार्गावर प्रवास चालू ठेवतो.
ह्या साधनेच्या अथवा
ह्या साधने अथवा तपस्येमुळे लग्नाआधीच पुत्रप्राप्तीचा आनंद मिळाला, शरीरसुखाची गरज उरली नाही, त्यापेक्षाही उच्च असे समाधिसुख मिळाले.
बाबुशा कोहली यांच्या एका
बाबुशा कोहली यांच्या एका कवितेतिल ओळी - (कविताकोश.ऑर्ग वरुन साभार)
फिर कृष्ण ने कहा..
कि मुझसे मिलना हो तो
मेरे चमत्कारों के पार मिलना
मुझ तक पहुँचने की राहें .....सन्नाटों से रौशन हैं ।
आदिश्री एकदम मस्त. >>>धन्यवाद
आदिश्री एकदम मस्त. >>>धन्यवाद कोहंसोहं, तुमची अनुपस्थिती जाणवतच होती की तुम्ही आलात .
आणि तरीही सगळे पुन्हा
आणि तरीही सगळे पुन्हा शून्यातच विलिन होणारे. शून्यवतच सगळे...>>> या शुन्यावस्थे बद्दल स्वामी दत्तावधूत यांनी लिहिले आहे. ' विहंगम मार्ग' मध्ये बहुतेक.
शून्याकडून शून्याकडची वाट मात्र फार फार मोठी.... ->> आपणच तर केली नाही ना? एकदम मनात आले.
धन्यवाद अवल. खूप सुंदर अर्थ आणि मुख्य म्हणजे तुम्ही स्वप्रज्ञेने लावला आहे.>>>सहमत.
हो आदिश्री आठवले, ते विहंगम
हो आदिश्री आठवले, ते विहंगम मार्ग, पिप्पीलिका (मुंगी) मार्ग वगैरे मार्ग आहेत नाही? फार पूर्वी वाचले होते.
दॅट रिमाइन्डस मी - मुक्तानंद स्वामींचे चित्शक्तीविलास वाचायला घेते परत.
मला वाटते की ' भवर बास ना
मला वाटते की ' भवर बास ना लेता है ' म्हणजे त्या कमलकलिकांमधे सकृतदर्शनी अडकूनही भवर तो सुगंध हुंगत नाही, त्यापासून मुक्त आहे. >>वा, आवडले.
मला उगीच वाटते मोहाचे पोषण आपण त्या बद्दल विचार केल्याने होते. फार विचार करून झुरत बसण्यापेक्षा करून मोकळे होऊन साधनेला बसावे. सद्गुरु बघून घेतील. आपण त्यांना आठवावे, त्यांनी आपल्याला सुधारावे. किती जन्माचा प्रवास आहे हा आपल्यापेक्षा ते अधीर झाले असतील.
@ जिद्दू.. मी जालावर शोधला
@ जिद्दू.. मी जालावर शोधला जटाहस्वाही शब्दाचा अर्थ, नाही सापडला. महादेव तर नाही असे वाटते. निरंजन शब्द आदियोगी महादेवा बद्दल बोलताना वापरतात म्हणून.
स्वाहा म्हणजे मला वाटतं
स्वाहा म्हणजे मला वाटतं यज्ञात जी आहुती देतात ती देताना म्हणायचा मंत्र. तर स्वधा म्हणजे पितरांना जे पाणी अंगठ्यावरुन सोडतात ती क्रिया. पण मी चूकीची असू शकेन.
जटास्वाही - मेक्स नो सेन्स.
अप्रतिम लिहिलंय, अगदी
अप्रतिम लिहिलंय, अगदी चित्रदर्शी वर्णन, मनात खोलवर जाणारे सर्व, अहाहा अनुभुती. आता सकाळी सोसायटीतल्या प्राजक्ताची फुलं वेचताना हा लेख आठवेल. कृष्णमय सर्वच. प्राजक्ताचा फोटोपण आहाहा अगदी.
आम्हीच कृष्ण व्हायचो कदाचित मग कोण कुणाला नमस्कार करणार. >>> हे फार फार आवडलं.
प्रतिसाद वाचते सावकाश, वाचनीय दिसतायेत एकेक.
धन्यवाद अन्जू ताई, विपु बघ.
धन्यवाद अन्जू ताई, विपु बघ. .
एक निरंजन लेख . सुंदर
एक निरंजन लेख . सुंदर
छान
छान
खूप सुंदर लेखन आणि त्यावर
खूप सुंदर लेखन आणि त्यावर अजून सुंदर प्रतिसाद!
Pages