जनता curfew स्पेशल!

Submitted by चिन्नु on 22 March, 2020 - 03:39

(जनता curfew विशेष)
"हॅलो.. हं आई. हो मीच बोलतेय. एवढ्या रात्री म्हणजे काय? अगं, तुला तर माहितेय ना कोरोनाच्या सुट्ट्या सुरू आहेत ते. नाही सण नाहीये हा पण सुट्टी तर आहे बै.
आता उद्या नाही का तो जनता curfew करायचा आहे. नाही उपवास नाही गं, असता तर बरं झालं असतं खरं, पण ते कुठं नशिबी! मलाही तुझ्या जावयाने curfew म्हणजे दिवसभर काहीही न बोलता कामं करायची असं सांगितलं. पण मग कामवाल्या मावशीने सांगितले-
तर सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत घरातच राहायचंय. हो आधी मलाही tension आलेलं पण मग मैत्रीणी आहेत ना माझ्या. त्यांनी कार्यक्रमच ठरवून टाकला. आमचा गृप आहे ना - रूपा, टिना, सीमा.. ती अनुशा..आता नाहीये गृपवर. हो मागे घरी बोलावून नाही का कळकट्ट carry bagमधून भडंगाच्या नावाखाली भुसा दिला होता तीच! ती आता कुठल्या तरी संस्थेत टॅलेंट वाढविण्यासाठी लागणार्या tips देत असते. हं तर आम्ही सर्व ना मिळून एक स्पर्धा आयोजित करतोय. नाही नाही. ते घर आवराआवरी स्पर्धा मागच्या आठवड्यात झालेली. हे नेमके सिंकमधली भांडी विसरले घासायला त्यामुळे आमचा नंबर हुकला गं! खूप खूप
बरं ती नाहीये स्पर्धा. यावेळी आम्ही बर्फी बनवणार आहोत. तुला येते का म्हणजे? अगं नाही आली तरी चव कुठे कळणार? स्पर्धा online आहे ना! नाहीतर बाई मागच्या वेळी सुरळीच्या वड्यांचं पिठलं झालं होतं!
ऐक ना, मी किनै बाहुबलीमधल्या अनुष्काचा look final केलाय. अगं नाही संबंध त्याचा बर्फीशी तर काय झालं? मग काय मी तयारच व्हायला नको का? परीक्षा झाल्यावर कुठे फिरायला जावं लागलं तर असावं म्हणून मी आधीच यांच्या credit card वर खरेदी उरकून घेतली. उद्या सकाळी यांनी एकदा मला दोसे करून दिले की मी लगेच तयारीला लागणार. वेळ लागतो ना! बर्फीला काय गं पाच मिनिटं लागतात. सामान? असेलच.
नसलं तरी 7 च्या आत यांना पाठवेन दुकानात. न देऊन काय करेल दुकानदार? या दिवशी घरी राहून किती मोठी समाज सेवा करतोय ना! जर त्याने सामान नाही दिले तर तो समाज द्रोहीच नाही का ठरणार?
Result बरोब्बर 4.55 ला जाहीर करणार आहोत. म्हणजे 5 वाजता खुद्द पंतप्रधान आणि सर्व देशवासी आमच्या या उपक्रमाचं भरभरून कौतुक करणारेत टाळ्या वाजवून. आहेस कुठे!
बरं मला दागिने काढून ठेवायचे आहेत अजून. बरीच कामं आहेत. हो मी तुला सेल्फी पाठवते. हो हो बर्फी बनवण्याची स्पर्धा आहे याचं पूर्ण भान ठेवेन मग तर झालं. बरं आई, काळजी घे. ठेवते फोन."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान