मध्ये नागराजचं समग्र कॉमिक कलेक्शन पुनःपारायणाचा योग आला. त्यात विषकन्या म्हणून मस्त कॉमिक आहे. नागतांत्रिक विषंधर नागराजला मारण्यासाठी यक्षराक्षस गरलगंटची आराधना करून एक विषकन्या यज्ञातून उत्पन्न करतो आणि मग नागराज विरुद्ध ते दोघे असा सामना आहे. ते वाचताना इतर विषकन्या रेसिपी डोक्यात घोळू लागल्या. अशा वेळी सिंघासन मधली रेसिपी आठवणे आणि तो सिनेमा बघणे हे ओघाने आलेच. तरी दोन जितेंद्र एक प्राण,
दोन राज्ये कारस्थाने बेसुमार,
एक राजकन्या एक विषकन्या,
शक्ती कपूर अमजद खान आपले चन्या मन्या
आणि महत्त्वाचा भिडू कादर खान असा हा चांदोबापट आहे. जितेंद्र-कादर खान द्वयीने ८० मध्ये केलेल्या पातालभैरवीपटांपैकी एक! याचे रसग्रहण पुढीलप्रमाणे
१) गांधार राज्यात गांधारी नाही
हा सिनेमा पद्मालया स्टुडिओज् ने बनवला असल्याने यावर साऊथपटांचा जबर पगडा आहे. त्यामुळे भडक रंगाचे सेट्स, कपडे वगैरेंची रेलचेल आहे. धरम-वीर हा अॅक्चुअली फार संयत चित्रपट आहे हे सिंहासन सारखे सिनेमे बघितल्याशिवाय लक्षात येत नाही. याचा दिग्दर्शक कृष्णा हा तेलुगु इंडस्ट्रीचा मूळ क्विक गन मुरुगन. याची तेलुगु आवृत्ती सुद्धा मिळते पण जितेंद्र आणि कादर खान जी मजा आणतात ती तेलुगु मध्ये नाही.
१.१) ग्रीक लोकांचा गांधारावर प्रभाव होता
नमनाला आपल्याला जितेंद्र एका रथात येताना दिसतो. जंपिंग जॅक गांधार देशाचा महावीर सेनापती विक्रमसिंग आहे. काही कारणाने हे लोक गांधारला गांधारा म्हणतात. आपण दोन्ही नावे आलटून पालटून वापरू. विक्रमसिंग कुठलीशी लढाई जिंकून राजधानीत परतला आहे. ग्रीक शैलीचे शिरस्त्राण व चिलखत आहे. लक्षात घ्या की अलेक्झांडरचे भारतातील पहिले पाऊल हे गांधार देशात पडले होते आणि गांधार शिल्पकलेवर ग्रीकांचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे गांधार देशातील वेषभूषा ग्रीक असणे स्वाभाविक आहे. ही गोष्ट वेगळी की लवकरच हे लॉजिक धाब्यावर बसवले जाते बट दे ट्राईड. जॅकची विजययात्रा चाललेली असताना मध्ये मध्ये जयाप्रदाचे शॉट्स. सुरुवातीलाच हिरो-हिरोईन जोडी एस्टॅब्लिश करून दिग्दर्शक आपले कौशल्य सिद्ध करतो. ग्रीक प्रभाव असल्याने राजसभा उघड्यावर, सॉरी प्रशस्त पटांगणावर भरलेली आहे. गांधार नरेश दाखवला आहे भारत भूषण. याचे नाव आहे शमींद्र भूपती. तसे बघता केवळ आपला राजा भारत भूषण आहे या एका कारणासाठी लोकांनी या व्हल्नरेबल राजसभेचा फायदा घेऊन दगडांचा वर्षाव करायला हरकत नाही पण पेमेंट वेळेत होत असल्याने ही सर्व एक्स्ट्रा जनता फारच खुशीत आहे.
भाभू जॅकचे स्वागत करतो. उजव्या हाताला जयाप्रदा बसलेली आहे - ही देशाची राजकन्या अलकनंदा. डाव्या हाताला कादर खान आहे - हा महामंत्री भानू प्रताप. अशा सिनेमांत सिंहासनाच्या मंडपाच्या पायर्यांवर उभे राहायला एक पात्र लागते. इथे गुलशन ग्रोव्हरची वर्णी लागली आहे. जॅक कुठल्याशा राजपुरी पर्यंतचा इलाखा जिंकून आलेला असतो. ही राजपुरी कुठे आहे हा प्रश्न अगदी बिनमहत्त्वाचा आहे. तसेच ग्रीक प्रभावामुळे या सगळ्या अनाऊंसमेंट पब्लिक आहेत. आपल्या राज्याची खलबते, मिलिटरी स्ट्रॅटेजी, आर्थिक धोरणे सर्वकाही माहितीच्या अधिकारांतर्गत जनतेस उपलब्ध आहे. हा सिनेमा बघून डेमोस्थेनिस स्वर्गातून पुष्पवृष्टी करेल असा आमचा कयास आहे. गेला बाजार एक भाषण तर नक्कीच ठोकेल.
१.२) सामंत व्यवस्था
भाभूचे राज्य सामंत सिस्टिम फॉलो करते. पुढील सीन वरून असे दिसते की जॅकला सामंतांची बंडाळी मोडून काढायला पाठवले होते. तो सोबत बरेच सामंत घेऊन आलेला असतो. एक एक करून प्रत्येक सामंत भाभू पुढे हजेरी लावतो आणि भाभू त्याला उदार मनाने सन्मानित करतो. यात मुख्य सामंत आहेत - काल भैरव (प्रवीण कुमार, महाभारतातला भीम), दुर्गापुरचा सामंत आणि राजगडचा जहागीरदार कटारी कटैया (गुरबचन सिंग). काल भैरव आणि कटारी कटैया अशी नावे असलेली लोकं अर्थात व्हिलन पार्टीत असणार हे कोणीही सांगू शकतं. त्यामुळे त्यांचा मेकअपही तसाच आहे. आणखी एक हरेंद्र गौतम म्हणून कोणी दाखवला आहे पण तो चेहर्यावरूनच युसलेस दिसत असल्यामुळे त्याला भाभूही भाव देत नाही. इतर दोघांना मात्र स्पेशल ट्रीटमेंट आहे - काल भैरवला पहिले आसन मिळते तर कटारी कटैयाला सोबत दोन आयटम आणता येतात. मग तो एका थाळीत भाभूचे पाय घेऊन नुसतेच चोळतो (मला वाटलं दुधाने धुवेल) आणि तेच हात डोईला स्पर्शून जागेवर बसतो. चरणांची धूळ मस्तकी लावणेचे इतके शब्दशः चित्रण मी प्रथमच पाहिले. बाकी मग दहाबारा पडेल चेहर्याचे एक्स्ट्रा आहेत ते आपले असेच आहेत.
कादर खान युद्धात हरलेल्या त्या सर्वांचे सांत्वन करून त्यांना आश्वस्त करतो की तुमची वतने तशीच पुढे चालू राहतील फक्त राज्याप्रती निष्ठावंत रहा. मग भाभू जॅकचे तोंडभरून कौतुक करतो. इथे भाभूचा क्लोजअप आहे ज्यावरून कळते की हे राज्य चंद्रवंशी आहे. मग जॅकला देशरक्षक आणि परमशूरवीर अशी बिरुदे मिळतात. इंटरेस्टिंगली याच्या कंबरेला क्सिफोसच्या (ग्रीक शॉर्टस्वोर्ड) बनावटीला मिळती जुळती तलवार आहे. त्याला जयाप्रदाच्या हस्ते एक राजवंशाची तलवार भेट दिली जाते. ही मात्र ब्रॉडस्वोर्ड आहे जे फारच बुचकळ्यात टाकणारे आहे. आता एवढं सगळं झाल्यावर जयाप्रदाला पण काहीतरी द्यायला हवे. मग ती दिवास्वप्न बघू लागते आणि दोघांचे गाणे सुरु होते.
१.३) कॉस्मिक गाणे
गाण्याचे बोल आहेत "किस्मत लिखनेवाले पर जरा बस जो चले हमारा, अपने हिस्से में लिख लें हम सारा प्यार तुम्हारा". थोडक्यात पझेसिव्ह कपल आहे. या सिनेमातली गाणी गुणगुणायला म्हणून बरी आहेत. संगीत आहे बप्पीदांचे आणि गायक आहेत किशोर कुमार आणि आशा भोसले. गाण्यात काही शिकण्यासारखे नसले की प्रेक्षक नृत्यावर लक्ष केंद्रित करतो. हे नृत्य म्हणजे वैश्विक स्तरावरचे नृत्य आहे. आधी बॅकग्राऊंडसमोर उदबत्ती लावून तिचा धूर शूट केला आहे. मग वेगवेगळे जितेंद्र-जयाप्रदा शॉट्स आणि हे सर्व ग्राफिक मॅच करून एक शॉट. या सगळ्यामध्ये ग्रहगोलांची अगतिक भ्रमणे आणि अभ्राच्छादित अंतराळ आहे. अंतराळात टिकणारे हे विशेष ढग केवळ गांधार देशात मिळत असल्याने आपल्याला आज ते बघावयास मिळत नाहीत.
जितेंद्रला एक कुरळ्या केसांचा विग दिला आहे. हा सेम विग तेलुगु सिनेमात कृष्णा पण वापरतो. कृष्णाला तो विग फिट बसतो, जॅकला नाही. कधी कधी उलटी परिस्थिती सुद्धा होते. माझा अंदाज असा आहे की दोन्ही सिनेमांचे युनिट एकच असल्याने कधी जॅकचा विग कृष्णाला तर कधी कृष्णाचा विग जॅकला गेला आहे. जयाप्रदाला नागराणी छाप मुकुट का दिला असेल याचा मी अजून विचार करतो आहे. बहुतांश वेळ ते दोघे ट्रॉलीवरून इकडून तिकडे जातात आणि तिकडून इकडे येतात. पुणे ५२ ची प्रेरणा इथूनच आलेली आहे. मध्येच ते लाल सूर्यासमोर डान्स करतात आणि अचानक एक पंखवाला घोडा न जाणे कुठून येतो. कहर प्रकार म्हणजे मध्ये मध्ये एक टुंग-टुंगटुडुंग-टुंगडुंग-टुंगडुंग-टुंग-टुंगटुडुंग-टुंगडुंग-टुंगडुंग-टुंग अशी काहीतरी ट्यून वाजते जी काहीशी ऑफबीट आहे. त्यावरच्या जयाप्रदाच्या स्टेप्स पूर्णपणे ऑफबीट आहेत. "राजकन्यांनी किमान स्वतःच्या स्वप्नात तरी बीटमध्ये नाचावे" असा नियम नसल्याची खंत वाटते. आणि हे लोक नक्की किती राज्ये फिरून आले आहेत - यांच्या स्वप्नात त्यांना किल्ले, मिनार, इमारती, वाडे, महाल आणि अगणित वेगवेगळ्या स्थापत्यशैलींचे नमुने आहेत. नि:संकोचपणे खर्चा कियेला हैं.
याने पोट न भरल्याने शेवटच्या कडव्यात जयाप्रदा शब्दशः दागिन्यांनी मढून येते. आता तिच्या डोक्यावर एक मोराचा मुकुट आहे. आता मोराचा मुकुट घातलाच आहे तर मोराच्या स्टेप्स केल्या पाहिजेत म्हणून ती पिसारा फुलवल्याचे कल्पून मोरासारखी नाचू लागते. इथे दिग्दर्शक विसरतो की पिसारा हा नर मोराला असतो. मादी मोर अर्थात लांडोर पिसारा फुलवून नाचत नाही. पण बहुधा जितेंद्राने थुईथुई नाचण्यास नकार दिला असावा किंवा जयाप्रदा तशीही थुईथुई नाचते आहे तर हेही करून बघू असा विचार झाला असावा. एकदाची जयाप्रदा स्वप्न बघता बघता दमते आणि हे गाणे संपते.
२) अवंती राज्यात एकही प्रद्योत नाही
२.१) स्टॉकर महामंत्री
सीन चेंज, जयाप्रदा शयनकक्षात झोपली आहे. हिचा पलंग एकदम भारी दाखवला आहे. डोक्यापाशी पलंगाला मोराच्या आकाराचे खांब आहेत. चार चिल्लर सैनिक हातात प्रत्येकी एक सुरा घेऊन तिला मारायला येतात. ते तिला मारणार इतक्यात जॅक कुठून तरी येऊन तिला वाचवतो. तिला वाचवण्याच्या नादात तिच्या पोटावर तो रेलल्याने ही जागी होते. काय झाले हे कळण्याच्या आत ते चार चिल्लर सैनिक पळून जातात आणि रेघारेघांचे फेटे बांधलेले चार भालदार उगवतात आणि आपापले भाले जितेंद्रावर रोखतात. मग तिथे कादर खान येतो. तो जॅकवर राजकुमारीच्या हत्येच्या प्रयत्नाचा आरोप ठेवतो. आता तेच चार चिल्लर सैनिक येतात आणि जितेंद्रला पकडून नेतात. कादर खान व्हिलन असल्याचे इथे चाणाक्ष प्रेक्षक ओळखतो. जयाप्रदालाही काहीतरी काळेबेरे असल्याची शंका येते पण ती गप्प राहते.
दुसर्या दिवशी त्याला राजसभेत आणले जाते आणि फुल्ल पब्लिक डिसक्लोजरमध्ये जॅकचा खटला सुरू होतो. सुजितकुमार अधियोजक अर्थात पब्लिक प्रॉसिक्यूटर दाखवला आहे. त्याचा मुख्य साक्षीदार असतो कादर खान. कादर खान म्हणतो की रात्री मी राजकुमारीच्या खोलीकडे कोणाला तरी जाताना पाहिले आणि मी सैनिकांसोबत त्या सावलीचा पाठलाग केला. पाहतो तर काय, महावीर, परमवीर, परमशूरवीर, देशरक्षक विक्रमसिंग खंजीराने राजकुमारीची हत्या करण्याचा प्रयत्न करत होता. सुजितकुमार जरा हुशार असतो. तो म्हणतो ते सगळं ठीक आहे पण मध्यरात्री तू, महामंत्री, राजमहालात काय करत होता? यावर कादर खान म्हणतो की यू सी, अवर महाराज हॅज नो सन ओन्ली डॉटर. अॅन्ड सम पीपल आर सो डाऊनमार्केट दॅट दे डोन्ट वॉन्ट अ क्वीन अॅज देअर रुलर. म्हणून मी प्रत्येक क्षण राजकुमारीवर नजर ठेवून असतो; तिच्या सुरक्षेकरिता ऑफकोर्स. अर्थात यावर कोणाला काहीच प्रॉब्लेम नसल्याने सुजितकुमार पुढचा प्रश्न विचारतो - मॉन अमी, व्हॉट्स द मोटिफ? कादर खानचे उत्तर तयारच असते - सिंहासनाची अभिलाषा. सगळी सेना पाठीशी असल्याने हा शेफारला आहे आणि आता याला राजा बनण्याची स्वप्ने पडत आहेत. सुजितकुमार म्हणतो - पण मग राजकुमारीला मारण्याची काय गरज आहे, तिला बंदी बनवून पण काम झालं असतं की? हायला हा वकील आहे की कादर खानचा मुलाखतकार? कादर खानची क्रॉस चालू असताना त्याला स्पेक्युलेट काय करायला लावतो आहे? आणि महामंत्री कोतवालाची कामं का करत हिंडतो आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न - गुलशन ग्रोव्हर कोण आहे? त्याला नुसतंच सिंहासनासमोरच्या पायर्यांवर का उभं केलं आहे?
कादर खानच्या म्हणण्यानुसार जितेंद्रला भीति असते की राजकुमारीला बंदी बनवलं तर जनता त्याच्याविरोधात बंड करेल. या क्लेममध्ये काहीच अर्थ नाही. जर जितेंद्र राज्यातल्या सगळ्या सामंतांना एकटाच पुरून उरत असेल तर असल्या किरकोळ बंडांना तो का भीक घालेल? पण सुजितकुमार त्यावर विश्वास ठेवतो. आता जॅकचा डिफेन्स सुरू होतो. जॅकवर राज्यअपहरणाचा आरोप ठेवला जातो. आँ? याने अपहरण कोणाचं केलं? असला फडतूस प्रॉसिक्यूटर बघता आपण खटला जिंकण्याची सुतराम शक्यता नसल्याचे जॅकला कळून चुकते. तो म्हणतो की मी राजकुमारीला मारण्याचा प्रयत्न केला नाही. तुम्हाला नसेल पटत तर गेलात उडत. भाभू त्याची पूर्वीची सेवा लक्षात घेऊन त्याला फाशी देण्याऐवजी हद्दपार करतो. जितेंद्र जाता जाता त्याला सावध राहण्याचा इशारा देऊन निघून जातो.
२.२) स्नुषा संशोधनासाठी देवळात जावे
आता दुसर्या राज्यात काय चालू आहे ते बघण्याची वेळ झाली आहे. या राज्याचे नाव अवंती. अवंतीमध्ये दिसतात प्राण, अमजद खान आणि शक्ती कपूर. शक्ती कपूरचा ड्रेस आय थिंक रोमन स्टाईलचा आहे. ग्रीक-इटली शेजार म्हणून तसे ते केले असावे. याच्या कपाळावरही चंद्रकोर आहे फक्त ती तिरकी आहे. थोडक्यात दोन्ही राज्ये चंद्रवंशी असल्याने यांच्यात एक कॉमन धागा आहे. हा अवंतीचा सेनापती दाखवला आहे. पद्मालयवाल्यांना अमजदचा पातालभैरवीतला गुटगुटीत, गोंडस रोल आवडल्याने त्याची पुनरावृत्ती केली आहे. याला "बादाम खाके" म्हणण्याची सवय आहे. प्राण या सगळ्यांचा गुरु, अवंतीचा राजगुरु असल्याचे त्याच्या वेशभूषेवरून ताडता येते. याचे नाव आहे आचार्य अभंगदेव. अवंतीमध्ये आज लोकं वेड्यासारखे एका मंदिराच्या दिशेने धावत सुटले आहेत. असे का बरे बादाम खाके? शक्ती कपूर म्हणतो की हे मंदिर गांधारा आणि अवंतीच्या सीमेवर आहे आणि दरवर्षी देवीच्या दर्शनाला म्हणून दोन्ही राज्यांची प्रजा इथे येते. प्राण मग मंदिराची हिस्टरी सांगतो. तीन पिढ्यांपूर्वी दोन्ही राज्यांनी शांतिसंधी करून त्याचे प्रतीक म्हणून हे अपराजिता देवीचे मंदिर बांधले. त्यामुळे इथल्या दहा कोसांचा परिसरात कोणीही मुक्त संचार करू शकतं.
मग तिथे जयाप्रदा, कादर खान, गुलशन ग्रोव्हर प्रभूती येतात. देवीची पूजा करायला म्हणून ते आलेले आहेत. कादर खान देवीला हात जोडून म्हणतो की बाय माझे, आमच्या राजाला मुलगा नाही. क्षणभर मला वाटले हा या वयात भाभूला मुलगा होऊ दे असा आशीर्वाद मागतो की काय पण तसे होत नाही. त्याचे म्हणणे असते भावी राणी अलकनंदेला आशीर्वाद दे. मग जयाप्रदा आशीर्वाद मागते. ती राजमुकुट घेऊन आलेली असते. असे कळते की भाभू आजारी असल्याने येऊ शकलेला नाही आणि प्रॉक्सी म्हणून राजमुकुट पाठवला आहे. या सीनचा तसा काही उपयोग नाही. पूजा झाल्यावर ती बाहेर पडते तर गाभार्याबाहेर वहिदा रहमान आणि श्रीराम लागू उभे असतात. ते कोपर्यात उभे राहून जयाप्रदाला ताडतात. वहिदा अवंतीची राजमाता आहे तर श्रीराम लागू महामंत्री. वहिदा म्हणते पोरगी सुंदर आहे नै. श्री.ला. लगेच पुस्ती जोडतात की युद्धनीति आणि राजनीतिमध्ये सुद्धा निपुण आहे. इथे उच्चार शुद्ध असल्याचा फायदा होऊन भाभूच्या नावाचा जो शमींद्र, शरमेंद्र असा इतका वेळ उद्धार चालवला आहे ते नाव क्षेमेंद्र असल्याचे कळते. वहिदाची इच्छा असते की जयाप्रदा आपली सून व्हावी. यात एक प्रॉब्लेम आहे - राजकुमार आदित्य वर्धन अगदीच ऐषारामी राजपुत्र आहे.
२.३) सिंगल जितेंद्र डबल जॅक, लेट्स अनलीश द बूबा पॅक
अमजद खान, याचे नाव कुपटेश्वर, येऊन सांगतो की राजकुमार पूजेला येणार नाही. त्याच्या जागी त्याचा भाऊ उग्रराहू पूजा करेल असं प्राणने ठरवल्याचेही तो सांगतो. वहिदा मनातली खंत बोलून दाखवते - अभंगदेवच्या मार्गदर्शनाखाली आदित्य सर्व विज्ञांमध्ये पारंगत तर झाला पण ऐषारामी वृत्तीही त्याच्या हाडामासी खिळली. हा क्यू घेऊन जितेंद्र क्रमांक दोनची एंट्री. आदित्यवर्धनही जितेंद्रच दाखवला आहे. याचा विग थोडा वेगळा आहे ज्याच्या मदतीने तो ओळखू येतो. आदित्यवर्धन आपल्या महालात दारू पिऊन चार अर्धनग्न ललनांसोबत ऐष करत असतो. अशा वेळी गाणे झालेच पाहिजे.
गाण्याचे बोल आहेत बूबा बूबा मेरी बूबा...............
नो जोक्स हिअर - हे गाण्याचे अॅक्चुअल बोल आहेत. सुरुवातीला बरंच दिल मेरा डूबा, मेरी महबूबा वगैरे होतं आणि मग बूबा बूबा, बूबा बूबा, बूबा बूबा, बूबा बूबा मेरी बूबा सुरु. यातल्या सर्व बूबांना जितेंद्र आणि एक बाई आपापाल्या छात्यांचा भाता एकमेकांच्या दिशेने ओढतात. आधीच्या जितेंद्रला किशोरचा आवाज वापरल्याने या जितेंद्रला बप्पीदांनी स्वतःचा आवाज दिला आहे. बायकांसाठी आवाज आशाजींचा. आधीचा जितेंद्र तितका मनमोकळेपणाने नाचत नसल्याने हा जितेंद्र फुल ऑन नाचतो. या ललना नाचतात कमी आणि थरथरतात जास्त. तो काय टकलू हैवान आहे थरथराट व्हायला? याच्या कपाळावरही चंद्रकोर आहे आणि महालात पिसारा फुलवलेला एक भलामोठा कांशाचा मोर आहे. ही सेट डिझाईन मधली थिमॅटिक कन्सिस्टन्सी वाखाणण्याजोगी आहे. पण काही ठिकाणी हलगर्जीपणा केलेला आहे. एक बाईची मूर्ती आहे आणि तिच्या हातात चक्क शॉवरहेड दिलं आहे. आता एखादे भांडे देऊन त्यातून पाणी पडताना दाखवले असते तर ठीक होतं पण शॉवर? आणि जितेंद्र मेरी बूबा म्हणतो ते महबूबाचा शॉर्टफॉर्म म्हणून खपतं तरी; यातली मुख्य ललना फुल्ल सिडक्टिव्हली मेरा बूबा म्हणत आहेत, विथ कॅमेरा अॅट रिक्वायर्ड अँगल!!
मध्येच जितेंद्र आणि ललनांचे ब्रेकडान्स मोंटाज सुरु होते. मग जितेंद्र आणि मुख्य ललनेचा रोमान्स आणि इतर बायकांचे त्यावर कौतुकाने लारालूं, जितेंद्रचे दर दोन कट नंतर कपडे बदलणे, उड्या मारत डान्स करणे, महालाचे इंटेरिअर बदलणे इत्यादि प्रकार घडतात. एवढ्यानेही समाधान न झाल्याने या ललना ओकाशिबा आणि लालालाला करत नाचू लागतात. इथे भविष्यात करिश्मा कपूर-गोविंदाने वापरलेल्या काही स्टेप्स दिसतात. यानेही मजा न आल्याने याचा पलंग गोल गोल फिरायला लागतो आणि त्यावर बूबा बूबा होते. एवढे बूबा बूबा झाल्याने त्या ललनांच्या सिंक्रोची पार वाट लागते आणि दिग्दर्शक नाईलाजाने गाणे आवरते घेतो.
३) पहिली चकमक
३.१) ऐदी राजकुमार
आता इतर बूबा खोलीतून बाहेर गेल्या आहेत आणि जॅक क्रमांक दोन व मुख्य ललनेचा रोमान्स सुरू आहे. मुख्य ललना राजनर्तकी असून तिचे नाव आहे जसवन्ती. आपण तिला जास्वंदी म्हणूयात. जितेंद्र जास्वंदी ओठांमध्ये गुंगण्याच्या मूडमध्ये आहे पण तिला जितेंद्राच्या इभ्रतीची पडली आहे. ती म्हणते की जनतेचे काय? तिच्याप्रती असलेल्या जबाबदारीचे काय? जितेंद्र म्हणतो जनता को तो उपरवाला जनता (जन्म देतो) हैं, और जो जनता हैं वही जनता की चिंता करता हैं. हे असे कादर खान स्पेशल डायलॉग्ज या सिनेमात दर मिनिटाला सापडतात. अजूनही थोडे डायलॉक मारले जातात पण मुख्य मुद्दा असा आहे की जितेंद्रला आपल्या जबाबदारीचं फार काही पडलेलं नाही. आधी नमूद केल्याप्रमाणे तो कर्तव्यपरायण नाही. जास्वंदीने मुघल-ए-आझम पाहिला असावा कारण तिला त्या दोघांचे प्रेम बदनाम होईल अशी शंका आहे. पण जॅक-२ भलताच कूल असतो - जो प्यार बदनाम नही होता उस प्यार का कोई नाम नही होता. त्याचं म्हणणं असतं की माझ्यावतीने राजगुरु देवीची पूजा करवतील आणि मी तुझी पूजा करेन. राजघराण्यात जन्मल्याचा अर्थ असा की माझ्यासाठी डोकं कोणीतरी दुसरं चालवेल आणि युद्धात हाणामारी अजून कोणी तिसरं करेल. मी का चिंता करू? वहिदा जेव्हा याच्या नावानं बोट मोडत होती तेव्हा ती याचा ऐदीपणा अंडररेट करत असल्याचे आता प्रेक्षकाला कळून चुकते. हा दारु आणि बाई दोन्हीच्या नादी लागल्याचे आपल्याला कळून चुकते.
३.२) रॉबिनहूड सेनापती
सीन चेंज. पहाटेची वेळ. भडक निळ्या रंगाचे कपडे घातलेले पहारेकरी आणि त्यांनी संरक्षित एक छावणी. या छावणीला काही डाकूंनी घेरले आहे. सर्व पहारेकर्यांना बेशुद्ध केले जाते आणि काळाकभिन्न दिसणारा मुख्य डाकू एका तंबूत प्रवेश करतो. हा जयाप्रदाचा तंबू आहे. जयाप्रदा आणि तिच्या दासी साखरझोपेत आहेत आणि राजमुकुट निष्काळजीपणे जवळच एका मंचकावर ठेवलेला आहे. का.क. डाकू मुकुट उचलून पोबारा करतो. एका पहारेकर्याला वेळेत शुद्ध येते आणि तो झोपलेल्या सेनापतीला उठवून चोरीची बातमी देतो. मग सैनिक त्या डाकूंचा पाठलाग करू लागतात. जंगलातल्या वाटांशी परिचय नसल्याने थोड्याच वेळात ते डाकू त्यांना चकवा देण्यात यशस्वी होतात.
भाभू ही बातमी ऐकून भलताच क्रुद्ध होतो. म्हणजे असे समजण्याची अपेक्षा आहे कारण नेहमीप्रमाणेच त्याच्या चेहर्यावर काहीही भाव नाहीत आणि आवाजात काहीही चढउतार नाही. तो महामंत्री आणि सेनापतीला उगाच दोन शब्द सुनावतो पण हे आपलं नगास नग. ते गेल्यावर जयाप्रदा त्याला विचारते "तुम्ही म्हणता हा मुकुट विशेष आहे. म्हणजे नक्की काय?" भाभू म्हणतो उस मुकुट में महिमा हैं (म्हणजे परदेशी बनावट), करिश्मा हैं (खानदानी आहे), चमत्कार हैं (आर यू शुअर इथे उर्मिला हैं म्हणायचं नव्हतं आणि चित्रपटाचं नाव घ्यायचं होतं?). एनीवे, अॅपरंटली हा मुकुट कोणा योग्याने भूपती घराण्याला दिलेला असतो आणि जोपर्यंत हा मुकुट आहे तोपर्यंत या घराण्याचे राज्य कायम राहिल असा आशीर्वादही दिलेला असतो. भाभू संशय व्यक्त करतो की हे कोणाचे तरी षडयंत्र आहे.
तिकडे जितेंद्र क्रमांक १, विक्रम सिंग आता डाकू बनला आहे. याने मुकुट चोरलेला नाही, चिंता नसावी. आता रेशमी वस्त्रे व कवच कुंडले जाऊन साधा वेष, फेटा आणि केसाळ लेदर जाकिट आले आहे. याच्या गुहेत छान गारवा असावा अन्यथा त्या जाकिटाला काही अर्थ नाही. पण इतक्या मशालींमुळे पुरेशी उष्णता मिळत असावी. तरी स्वतःला त्रास करून घ्यायचा याचा हट्ट असल्याने हा तसाच जाकिट घालून हिंडत आहे. विक्रमसिंगचा अंदाज असतो की हे षडयंत्र सामंतांपैकी एकाचे आहे. त्याचा संशय काल भैरववर असतो कारण काल भैरव एक नंबरचा लोभी आहे. तसेच या सगळ्यामागे कोणी एक मुख्य व्हिलन असल्याचा संशयही तो बोलून दाखवतो. आता प्रश्न इतकाच की हा कोणी घरचा आहे की अवंतीचा? याच्याकडे सार्या गावाची बित्तंबातमी असल्याने याला हे माहित असते की गांधाराचा प्रॉब्लेम आहे की कोणीतरी राजकुमारीला मारण्याचा प्रयत्न करत आहे तर अवंतीमध्ये विविध प्रकारचे कर लादून जनतेची पिळवणूक चालली आहे. त्यामुळे यांचे कार्य ठरलेले आहे - भूपती घराण्याचे रक्षण आणि अवंतीच्या जनतेची करांच्या दुष्टचक्रातून मुक्तता. तेवढ्यात एकजण येऊन बातमी देतो की कसलातरी खजिना राजगडच्या दिशेने जातो आहे. रॉबिनहूडगिरी सुरु करण्याची वेळ झाली आहे.
३.३) कटारी कटैया
राजगडची जहागीर कटारी कटैयाची असल्याने साहजिकच याच्यामागे त्याचा हात आहे. जॅक-१ जाऊन तो खजिना अडवतो. खजिना म्हणजे एका रथात काही पेटारे घालून दोन जण नेत असतात. इतकी ढिसाळ सुरक्षाव्यवस्था क्वचितच बघावयास मिळते. त्यात हे दोघे विक्रमसिंगला मानणारे निघतात. ते त्याला कसलीही आडकाठी करत नाहीत. तो घोड्यावरून उडी मारून रथात येतो. पेटार्यांमध्ये हिरे-जवाहिर, सोने-नाणी इ. असते. तसेच रेशमी कपड्यावर एक पत्र आहे. कोणा "भविष्यवाणी" नामक इसमाने कटारी कटैयासाठी आशीर्वाद आणि हा खजिना पाठवलेला असतो. निश्चितच हा भविष्यवाणी मुख्य व्हिलन आहे. पण कोण?
आता जितेंद्र ठरवतो की मुख्य व्हिलनला नंतर बघता येईल आधी कटारी कटैयाला धडा शिकवूयात. इथे त्याचा एक आऊट ऑफ फोकस शॉट आणि शेपटी हलवत असलेल्या घोड्याच्या पार्श्वभागावर फोकस! मग जितेंद्र सगळा खजिना काढून घेऊन पेटार्यांमध्ये दगडं भरून कटैयाकडे पाठवतो. सोबत स्वतःचे एक पत्रही देतो. पत्रात कटैयाची निर्भत्सना केलेली असते. याने तो भलताच चिडतो आणि आपली भेडिया फौज जितेंद्राच्या मागावर पाठवायचा आदेश देतो. इथे अपेक्षा काय की जितेंद्रचा पाठलाग होईल, मे बी जितेंद्र याला खिंडीत गाठून आपले युद्ध कौशल्य दाखवेल, मग चार दोन डायलॉग, दोन चार खणाखणी. पण नाही. जितेंद्र ओरडतो कटैयाऽऽऽऽऽऽऽ हा प्राणी कटैयाच्या तळावर येऊन कटैया चिडण्याची वाट बघत विंगेत उभा आहे.
जॅक त्याला "घास खानेवाला खच्चर" आणि स्वतःला सिंह म्हणवून घेतो. तसे बघावे तर दोघेही गाढव आहेत पण जोपर्यंत ते एकमेकांना मनुष्य म्हणवून घेत नाहीत तोवर काही हरकत नाही. जितेंद्र त्याला म्हणतो की त्या भविष्यवाणीसोबत मिळून देशद्रोही कारवाया करणे बंद कर. कटैया त्याला म्हणतो मला उपदेश करण्याआधी तू डाकूगिरी बंद कर. हो ना करता करता मुद्दा सर काटण्यापर्यंत येतो. जॅक सुचवतो की चल द्वंद्व करून याचा निकाल लावू. कटैया म्हणतो ठीक आहे. जितेंद्र-१ इथून पुढे शक्य तितक्या उड्या मारत असल्याची नोंद घ्यावी. त्यामुळे तो घोड्यावरही उडी मारून बसतो. द्वंद्व असे असते की हे घोडेस्वार एकमेकांच्या दिशेने येणार, तलवारीने दुसर्याचे मस्तक धडावेगळे करण्याचा प्रयत्न करणार, जर दोघे फेल गेले तर रिपीट. थोडी खणाखणी झाल्यानंतर कटैया मोठ्या हुशारीने जितेंद्राच्या घोड्याच्या पायांवर वार करतो. याने जॅक आणि त्याचा घोडा दोघेही तोंडावर आपटतात. मग जॅकला घोड्याच्या टापांखाली चिरडण्याचा प्रयत्न होतो पण जॅकही कटैयाला घोड्यावरून खाली पाडतो. पुनश्च खणाखणी. जॅकला जखमही होते. पण त्याच्या उडी मारण्याच्या सुपरपॉवरपुढे लवकर कटैया निष्प्रभ ठरतो आणि चांगलाच घायाळ होतो. जितेंद्र मग कटैयाच्या नावाने एक नवीन संदेश लिहून घेतो - क्षेमेंद्र महाराजांना माझा प्रणाम. माझा या राजद्रोहाशी काही संबंध नाही, मी पूर्वीप्रमाणेच तुमच्याशी एकनिष्ठ आहे. मग तो खजिन्यासकट नवीन संदेश भाभूकडे पाठवून देतो.
इथे माझा अल्पविराम. भविष्यवाणी कोण, विषकन्या कोण, ती कशी बनवली जाते आणि अशाच इतर रोमहर्षक बाबी प्रतिसादांत कव्हर करतो.
सिंहासन नाव पाहील्यावर मराठी
सिंहासन नाव पाहील्यावर मराठी सिनेमाच आठवला.
भारी लिहीलयं
मी म्हणूनच डोकावले , हे भलतचं
मी म्हणूनच डोकावले , हे भलतचं प्रकरण निघाल.
सर्वात महत्त्वाचा प्रश्न -
सर्वात महत्त्वाचा प्रश्न - गुलशन ग्रोव्हर कोण आहे? त्याला नुसतंच सिंहासनासमोरच्या पायर्यांवर का उभं केलं आहे?
मी म्हणूनच डोकावले , हे भलतचं
मी म्हणूनच डोकावले , हे भलतचं प्रकरण निघाल.->मी पण.
वा, मजा येणार आता..
वा, मजा येणार आता..
तुम्ही जेवढं लिहीलंय तेवढं पाहून झालंय.. पु भा प्र
एवढं चमचम का केलंय सगळीकडे
एवढं चमचम का केलंय सगळीकडे कळत नाही..
आदित्य वर्धन ची पॅन्ट किती funny आहे. राजकुमार नाही जोकर वाटतोय तो
चमकीच्या फुलांची design असलेले कपडे आहेत त्याचे.
राजगुरू च्या भगव्या कपड्यानाही चमकीचे काठ आहेत.
राजकुमारी आणि त्या dancers ना संपूर्ण jewellary शॉप लुटून दागिने चढवायला सांगितले असावेत..
By the way,
कादर खानच्या गळ्यातले तन्मणी सदृश्य मोत्याचे long गळ्यातले आवडले, मला कधीपासून घ्यायचंय तसं
सोमवारची खतरनाक सुरवात..नशीब
सोमवारची खतरनाक सुरवात..नशीब wfh आहे..नाहीतर ऑफिसमधे काही खरे नव्हते..कसे सुचते हो तुम्हाला? डोळ्यातून पाणी आले हसून हसून..
भारी लिहीलयं
भारी लिहीलयं
छान,
छान,
हा त्या काळाचा मगधीरा दिसतोय
या सिनेमात जयश्री टी यांनी
या सिनेमात जयश्री टी यांनी एक्स्त्राचे काम केलेय. वय वाढल्यावर आधी अशा गाण्यांत लीड करणाऱ्या अभिनेत्रीला इथे एक्स्ट्रा म्हणून पाहून सिनेमातील भयाण वस्तुस्थितीची जाणीव झाली.
कत्तयाबरोबरच्या लढाईत जितेंद्र ती अरबी स्टाईलची तलवार कटाना सारखी वापरतो.
धमाल लिहीले आहे. मी ३.१
धमाल लिहीले आहे. मी ३.१ पर्यंत वाचले. पहिल्या "बट दे ट्राइड" लाच फुटलो. मग ते ट्रॉलीवरून इकडून तिकडे जातात वगैरेला.
तो बुबा वाला सगळा पॅराच लोल आहे.
वाचतोय पुढे.
हा प्राणी कटैयाच्या तळावर
हा प्राणी कटैयाच्या तळावर येऊन कटैया चिडण्याची वाट बघत विंगेत उभा आहे. >>> हे जबरी आहे. पूर्ण वाचले आता. आता इथपर्यंत पिक्चरही बघायला हवा. कटैय्याला रीडेम्प्शनचा मौका वगैरे आहे का? म्हणजे तो कोणत्यातरी प्रसंगात मधे घुसून मरून घेणार असे दिसते.
पुढे लिही लौकर. हे चित्रपट म्हणजे सध्याच्या माहौल मधे बघायला, लिहायला आणि वाचायला बेस्ट
माहितीच्या अधिकारात सर्व उपलब्ध असणे, डेमोस्थेनिस वगैरे सुपर लोल.
अंतराळात टिकणारे हे विशेष ढग केवळ गांधार देशात मिळत असल्याने आपल्याला आज ते बघावयास मिळत नाहीत. >>>
पायस, झकास!! सगळीकडे ह्या
पायस, झकास!! सगळीकडे ह्या कोरोना ने मरगळ पसरवली असताना, तु हे महान कार्य, अखिल मायबोलीकरांच्या उद्धारासाठीच चालवलेलं आहेस ह्यात शंकाच नाही.
ते धाग्याचे नाव बदलून सिंघासन
ते धाग्याचे नाव बदलून सिंघासन कर कारण चित्रपटाच्या सेन्सॉर सर्पतिकीटातच सिंघासन असे लिहीले आहे.
आम्ही आताच पहिल्या गाण्यापर्यंत पाहिला. त्यातल्या उल्लेखनिय २ गोष्टी -
१) कादर खान ज्या आसनावर बसलेला असतो त्यातले वेलवेट अगदीच घासलेले आहे. बहुतेक कादर खानने खुप उठ-बस केलेली
असेल असे दिसते
२) त्या गाण्यात किती ट्रॉल्या वापरल्या आहेत अरे. नुसत्या गर गर फिरवल्या आहेत. कृष्णाला वेगवेगळे अँगल्स वापरून शॉट घ्यायचा शौक असेल असे दिसते आहे.
धन्यवाद
धन्यवाद
ते धाग्याचे नाव बदलून सिंघासन कर कारण चित्रपटाच्या सेन्सॉर सर्पतिकीटातच सिंघासन असे लिहीले आहे. >> डन!
सगळीकडे ह्या कोरोना ने मरगळ पसरवली असताना, तु हे महान कार्य, अखिल मायबोलीकरांच्या उद्धारासाठीच चालवलेलं आहेस ह्यात शंकाच नाही. >> बट ऑफ कोर्स!
कटैय्याला रीडेम्प्शनचा मौका वगैरे आहे का? म्हणजे तो कोणत्यातरी प्रसंगात मधे घुसून मरून घेणार असे दिसते. >> मरतो नंतर तो आय थिंक. तसाही गुरबचन सिंग सिनेमात कधी जिवंत राहत नाही.
जितेंद्र ती अरबी स्टाईलची तलवार कटाना सारखी वापरतो. >> गुड पॉईंट. ती अॅक्चुअली सिंगल हँडेड स्वोर्ड आहे पण मध्ये मध्ये जितेंद्र ती कटाना (टू हँडेड स्वोर्ड) प्रमाणेच दोन हातांनी पण पकडतो. बॉलिवूडच्या तलवारबाजीवर एक वेगळा लेख पाडायला हवा.
भारीच जमलय. मी एकिकडे थोडे
भारीच जमलय. मी एकिकडे थोडे थोडे वाचत एकीकडे सिनेमा पाहातोय !
स्ट्रेस बस्टर ची आवश्यकता होतीच !
जयाप्रदा त्याला मोठी तलवार
जयाप्रदा त्याला मोठी तलवार देते हे लैच चावट सिंबोलिझम झाले हो!!
भारी आहे. आज रात्री सिनेमा
भारी आहे. आज रात्री सिनेमा पाहणारच...
जयाप्रदा त्याला मोठी तलवार
जयाप्रदा त्याला मोठी तलवार देते हे लैच चावट सिंबोलिझम झाले हो!! >> कोणीतरी मुद्दा पकडला.
४) डबल रोल असेल तर दोन सेपरेट हिरविणी लागतात, त्यांचाही डबल रोल असून चालत नाही.
४.१) देशभक्ती करण्यासाठी काहीतरी कारण असावे लागते - क्षेमेंद्र भूपती, १९८६
तुनळी आवृत्तीत इथे एक सीन काटला आहे असा माझा अंदाज आहे कारण सेनापती वीरवर्मा आत येतो तेव्हा गुलशन ग्रोव्हर हातात कसले तरी भेंडोळे घेऊन बाहेर जाताना दिसतो. एनीवे, भाभू, जयाप्रदा आणि कादर खानला बातमी मिळते की महावीर विक्रमसिंगने गद्दार कटारी कटैयाचा पराभव केला असून त्याचा माफीनामा पाठवला आहे. आता गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेला कादर खान म्हणतो की विक्रमसिंगला हद्दपार केल्यानंतर सुद्धा तो देशभक्तीपर काम करतो आहे, नक्कीच कुठेतरी पाणी मुरते आहे. यावर भाभूच्या मागे मोराच्या पिसांच्या पंख्याने वारा घालणारी कन्या सूचकपणे जयाप्रदा उभी आहे त्या दिशेला कटाक्ष टाकते. यावर भाभू काहीतरी बोलायचे म्हणून बोलतो - प्रत्येक देशभक्तीच्या भावनेमागे काहीतरी कारण असते. विक्रमसिंगकडे काही कारण आहे, तुमच्याकडेही काही कारण असेल. कादर खान त्यावर नम्र अभिवादन करून निघून जातो पण भाभूच्या त्या ड्वायलॉक डिलीव्हरीवर कधीही तो छद्मी हसेल असे वाटते. भाभूला कळून चुकते की आता विक्रमसिंगच्या पराक्रमावरच त्याची भिस्त आहे. मूर्ख लेकाचा!! आधी विक्रमसिंग सेनापती असताना हे कटैया लोक बंडाळी माजवत होते मग त्याला हद्दपार केल्यानंतर याची काय अपेक्षा होती? दिग्दर्शक प्रेक्षकाला "विक्रमसिंग राजा होणे कसे महत्त्वाचे आहे" हे पटवून देण्यासाठी जीव तोडून मेहनत घेत आहे याची नोंद घ्यावी. म्हणा जयाप्रदा सेट असल्यावर तिचा नवरा, आणि पर्यायाने राजा, बनण्याशिवाय जॅक-१ कडे दुसरा काही ऑप्शन नसल्याने प्रेक्षकाला हे डेस्परेशन वाटण्याची शक्यता आहे.
तिकडे काळा कभिन्न डाकू एका काफिल्याला लुटतो. हा फारच गरीब काफिला असावा कारण त्यांच्या रक्षणाकरिता सोबत एकही हत्यारबंद मनुष्य नाही, बहुतेक सर्व बायकामुले. एवढे असूनही जेमतेम थैलीभरून पैसे आणि दागिने एवढीच लूट का.क.डाकूला मिळते. पण का.क.डाकू काल भैरवचा माणूस आणि पर्यायाने "भविष्यवाणीचा" माणूस आहे. म्हणजे त्याला ठाऊक असणार की हा गरीब काफिला आहे. तरीही त्याने लुटालूट केली. याचाच अर्थ या लुटीमागे काही निराळा उद्देश आहे. तो उद्देश आहे विक्रमसिंगला बदनाम करणे. त्यानुसार ते "विक्रमसिंग की जय" असे बोंबलत निघून जातात.
४.२) करांचा बोजा
तिकडे अवंती राज्यातही ग्रीको-रोमन संस्कृती असल्याने सर्व पब्लिकली डिसक्लोज केले जाते. अवंतीची राजसभा म्हणजे छोटेसे स्टेडियम असून मध्ये भव्य पुतळे, कमानी, तोफेच्या तोंडी द्यायची जागा असे सगळे त्यातच सामावलेले आहे. मागे दगड-धोंडे आणि डोंगरदर्या दिसत आहेत. थोडक्यात अवंती पर्वतराजींमध्ये वसलेले आहे. बहुधा ही दोन्ही राज्ये पठारी प्रदेशात असावीत. अवंती हे नाव माळव्याचे पूर्वीचे असल्यामुळे ही राज्ये छोटा नागपुर पठाराच्या पश्चिमी भागात आहेत असे मानायला हरकत नसावी. या प्रदेशातली जंगले सुद्धा तशी मॅच होत असल्याने कधी नव्हे तो भूगोल सांभाळला आहे. स्टेडियमच्या एका बाजूस मोठा चबुतरा असून तिथे राजघराण्यातल्या व्यक्तींच्या टेकण्याची सोय केली आहे. हा सेट बराचसा अमर शक्तीमधल्या प्रकुच्या ऑलिंपिक स्टेडियमशी मिळताजुळता आहे. आजची सभा प्राणने बोलावली आहे. राजगुरु या नात्याने प्राण जनरिक बडबड करतो. याच्या हातात राजदंड असल्याने अवंतीच्या प्रशासनावर याचा पगडा असल्याचे कळते. याच्या बोलण्यावरून असे कळते की तो लुटला गेलेला काफिला अवंतीच्या रहिवाशांचा होता. इथे त्या पुतळ्यांपैकी एक दिसतो. लालभडक रंगाचा राक्षस आणि त्याने हातात एक साप पकडला आहे असा पुतळा राजसभेत कोणी का बसवेल? प्राणवर फोकस असताना एक आऊट ऑफ फोकस पितळी मोरही दिसतो. हा मोर मोटिफ या सिनेमात कसोशीने सांभाळला आहे.
प्राणचे म्हणणे असते की ही लुटालूट थांबवायची असेल तर मिलिटरी फंडिंग वाढवावे लागेल. अबे, तू राजगुरु आहेस की अर्थमंत्री? आणि हे श्रीराम लागू, अर्थात महामंत्री का अनाऊंस करत नाही? तसेच या घोषणा करताना राजमाता वहिदा रहमान किंवा राजकुमार जॅक-२ राजसभेत का दिसत नाहीत? समजा जॅक-२ ऐषारामात मग्न आहे असे समजले तरी राजमातेला काय धाड भरली? आणि तिचा प्रतिनिधी म्हणून श्री.ला. असतील तर राजमाता आपला प्रतिनिधी म्हणून महामंत्री पाठवते याचा आपण काय अर्थ घ्यावा? असो, तर फंडिंगसाठी नवीन कर बसवावे लागतील. ते कर काय असतील ते ठरवण्याचा मान सेनापती उग्रराहू अर्थात शक्ती कपूरला दिला आहे. त्यानुसार शक्ती कपूर तीन नवे कर जाहीर करतो.
१) शादी कर - लग्न केले तर १००० मोहोरा
२) जन्म कर - मूल झाले तर २०० मोहोरा
३) मरण कर - नातेवाईक गचकला तर २०० मोहोरा
काही लूपहोल राहू नये म्हणून अमजद खान विचारतो की समजा कोणी नातेवाईक नसतील तर मरण कर कोण भरेल बादाम खाके? पण शक्तीने याचा विचार केलेला असतो. तो म्हणतो की ओळखी-पाळखीतले किंवा शेजारीपाजारी यांच्यापैकी कोणीतरी कर भरावा. पण कर द्यावाच लागेल. थोडक्यात मजा हे त्याला कळत नसल्याने तो आणखी एक नियम अॅडतो की कोणीही दहा बिघांपेक्षा जास्त जमिनीचा मालक असू शकत नाही. अमजद त्याच्या लक्षात आणून देतो की राज्यातली अर्धी जमीन प्राणच्या मालकीची आणि अर्धी जमीन शक्तीच्या मालकीची. या नियमाचा फटका त्यांनाच बसेल. शक्ती त्याला दामटून गप्प करतो.
४.३) भाबडी प्रजा
एक रँडम प्रजाजन ओरडतो की ही जुलुमशाही संपवण्याचा एकच मार्ग आहे - राजकुमाराचा राज्याभिषेक करा. याने यांचा प्रॉब्लेम कसा सुटेल हे एक कोडे आहे. कारण समजा जॅक-२ गादीवर बसला तरी त्याच्याकडे सगळे कर बंद करण्याचे काहीच सबळ कारण नाही. अगदी प्राण आणि शक्ती कपूर दुष्ट आहेत आणि हे सर्व कर त्यांच्या ऐषारामाकरता आहेत असे धरले तरी त्याच पैशातून जॅक-२ ची ही मजा मजा आहे. वहिदा रहमान सून शोधण्यात मग्न असल्याने ती काही हस्तक्षेप करेल असे दिसत नाही. राहता राहिले आपले डॉक्टर. ते तसेही महामंत्री कमी अवंतीचा गुलशन ग्रोव्हर जास्त दिसतात. त्यांना प्राणशेजारी उभं राहण्याखेरीज काही काम दिसत नाही. तरी प्रजेचा जॅक-२ वरचा भाबडा विश्वास बघून प्रेक्षकाचे डोळे पाणावतात. डॉक्टर तरी हिय्या करून विचारतात की राजतिलक केव्हा? प्राण मुरलेल्या राजकारण्याप्रमाणे "अजून योग्य वेळ आलेली नाही, करू लवकरच" असे उत्तर देतो.
तरी महामंत्री श्रीकांत (म्हणजे श्री.ला.) चे समाधान करावे म्हणून प्राण वहिदा, शक्ती, अमजद, डॉक्टर अशी मोट बांधून जॅक-२ ला बोलावून घेतो. वहिदा म्हणते "बर्याच दिवसांत तुझ्याशी मनमोकळे बोललोच नाही बघ" छाप डायलॉग मारते. त्यावरून जॅक-२ ताडतो की आज लेक्चरचा दिवस आहे. त्याचे म्हणणे असते की प्राण आणि डॉक्टर सारखे धुरंधर राजकारणी राज्यकारभार बघत आहेत, शूरवीर शक्ती कपूर सेनापती आहे (इथे कळते की हा जॅक-२ चा चुलत भाऊ आहे) असे असताना मी लक्ष घालण्याचे कारणच ते काय. प्राण आणि डॉक्टर म्हणतात की पेन्शन घेण्याचं वय झालं रे आमचं, आता तरी आम्हाला रिटायर होऊ देत. वहिदाची अपेक्षा भारतीय आईची स्टँडर्ड अपेक्षा - लग्न कर रे बाळा. जॅक-२ म्हणतो की मला हवी तशी पोरगी मिळाली की आपण लग्नाचं बघू. इथे वहिदाचा क्लोज-अप. याला हवी तशी पोरगी कशी असेल याचा विचार करून चिंताक्रांत झाल्याचे एक्सप्रेशन आणि सीन चेंज.
४.४) विषकन्या
या क्यूवर दुसरी हिरोईन इंट्रोड्युस केली जाते. ही आहे मंदाकिनी. मंदाकिनीला साजेसे कपडे घालून ती एका नदीपाशी दाखवली आहे. ही नदी खळखळ करत वाहते म्हणजे अजूनही बाल्यावस्थेत आहे. पण असे असूनही आजूबाजूला बर्फ वगैरे नाही. म्हणजे ही पश्चिमवाहिनी नदी आहे. अशा नद्या छोटा नागपुर पठारात उगम पावतात. पुन्हा भूगोल मॅच! हिने हातात एक पक्षी पकडला आहे. प्राण तिला भेटायला आला आहे. ती प्राणला आजोबा असे संबोधते पण ती प्राणची नात लागते की नातीसारखी आहे हे क्लिअर नाही. हिच्या कपाळावरही चंद्रकोर आहे. त्यानुसार ही राजघराण्यात जाणार हे फिक्स. हिचे बँग्ज बघता या जंगलात अत्याधुनिक ब्यूटी पार्लर आहे यात शंका नाही. द्राक्षाच्या घोसाच्या आकाराचे कानातले बघता त्याच दर्जाचे फॅशनचे दुकानही आसपास असावे. मंदाकिनीचे सिनेमातले नाव चंदना. ती प्राणवर खट्टू आहे कारण प्राण तिला भेटायला एका वर्षानंतर आला आहे. इथे लाँग शॉट, रम्य जंगलात नदीकाठी एक विशाल अशी कुटी बांधली आहे. तिच्यात चंदना आणि तिची काळजी घ्यायला प्राणचा एक माणूस असे दोघेच राहतात. भलती शंका घेऊ नका, का ते लवकरच स्पष्ट होईल. तो माणूस तिला प्राण महापुरुष असल्याचे सांगून तिला प्राणला नमस्कार करायला सांगतो. यावर ती शब्दशः हातातला पक्षी भिरकावून देते आणि प्राणच्या पाया पडते.
प्राण तिला तोंडभरून आशीर्वाद देतो पण तिला स्पर्श करताना तो काळजी घेतो आहे हे दिसू शकते. तिचा केअरटेकरही सुरक्षित अंतर राखूनच उभा आहे. प्राण तिला म्हणतो की तुझ्या रुपावर कोणीही भाळेल. घार्या डोळ्यांवर भाळायला सगळे नरेन सहाय नसतात बट आय डायग्रेस. तो म्हणतो की ज्या कार्यासाठी तुझा जन्म झाला ते कार्य लवकरच सिद्धिस जाणार आहे. तोवर तू इथेच मजा कर. ती मग उड्या मारत निघून जाते. ती गेल्यावर प्राण मुख्य मुद्दा काढतो. १६ वर्षांपूर्वी त्याला ही नदीकाठी सापडली. मग केअरटेकर बोलू लागतो. हा केअरटेकर "इन युअर फेस व्हिलन" आहे. म्हणजे त्याचे कपडे, केस, मेकअप, गंध हे सर्व ओरडून ओरडून सांगते आहे की हा व्हिलन साईडचा आहे. मुद्दा असा असतो की मंदाकिनी विषकन्या आहे. आता केअरटेकर विषकन्या बनवायची रेसिपी सांगतो.
विषकन्या रेसिपी (कॉपीराईट राजगुरु अभंगदेव)
साहित्यः
१ बालिका
कडुलिंबाचा रस गरजेनुसार
लसूण गरजेनुसार
रेती गरजेनुसार
ढेकळे गरजेनुसार
विविध विषारी वनस्पती, गरजेनुसार
धोत्रा, मुलगी खाऊ शकेल तितका
महानागाचे विष, झेपेल तितके
सुगंधी वनस्पतींचे विशेष चाटण (तेलुगु आवृत्ती ओन्ली)
चंदनाचा लेप (तेलुगु आवृत्ती ओन्ली)
कृती:
आधी एक बालिका घ्या. नदीकाठी सापडली असेल तर उत्तम. आधी कडुनिंबाच्या रसाने तिचे गर्भशील परिष्कृत करून घ्या. मग लसणाच्या रसात (तेलुगु आवृत्तीत कांद्याचा रस आहे) रेती, कुटलेली ढेकळे आणि विशिष्ट विषारी वनस्पती मिसळून खायला देत जा. मुलीला चावता येऊ लागले की हळू हळू धोत्रा फळाप्रमाणे फोडी करून देत जा. मुलगी प्यायच्या वयात आली की महानागाचे विष सुरु करा. बघता बघता तुमची विषकन्या तयार झालीच म्हणून समजा.
बोनसः जर मुलीच्या रंगरुपात आणि गंधात फरक पडू द्यायचा नसेल तर सुगंधी वनस्पतीचे चाटण वेळोवेळी चाटवत जा. तसेच गोरेपणाकरिता व चंदनगंधा किंवा चंदना नाव ठेवता यावे म्हणून चंदनाचा लेप वापरावा. अॅसॅसिनेशनसाठीच्या रेझ्युमेवर लिहायला उपयोगी पडेल.
आता ही विषकन्या कोणासाठी आहे हे वेगळे सांगायला नको. प्राण केअरटेकरला विचारतो की हिला माहिती आहे का ही विषकन्या आहे? तो उत्तरतो नाही. आपल्या आदेशाचे तंतोतंत पालन होत असलेले बघून सुखावलेला प्राण केअरटेकरला सांगतो की लवकरच जॅक-२ ची गाठ मंदाकिनीशी घालून देण्यात येणार आहे. तेव्हा तू किंवा इतर कोणी मध्ये तडमडता कामा नये. काम झालं की तुला तुझा मोबदला देऊन शहरात तुझे बस्तान लावून देऊ. केअरटेकर हे मान्य करतो आणि प्राण राजधानीत परत जातो.
धम्माल चालू आहे लेखन.
धम्माल चालू आहे लेखन.
बाकी मंदाकिनीचा (आदल्या वर्षीचा) पूर्वेतिहास माहिती असूनही तिला पाण्यात डुंबताना गडद रंगाचे आणि काचोळीसहित कपडे देण्याचा सभ्यपणा या पिक्चरवाल्यांनी दाखवला याबद्दल त्यांचे विशेष कौतुक
१) स्टेडियमच्या मागचे धोंडे
१) स्टेडियमच्या मागचे धोंडे बघता त्याच्या मागेच गब्बर कालियाला "कितने आदमी थे " विचारत असेल असे वाटते.
२) स्टेडियम मध्ये मोर वगैरे चिन्हे असतानाच ड्रॅगन आणि चिनी दिसणारे पुतळेही दिसतात त्यामुळे हेच स्टेडीयम मधूनच येऊन कोणी चिनी वगैरे लोक पण वापरत असतील की काय अशी शंका येते.
३) जितू (वहिदा वाला) त्यांना भेटायला येताना जो काय भरजरी पोषाख करतो की तो एल्विसच्या कॉन्सर्ट मधून उठून आलेला दिसतो. (रच्याकने त्याच्या भरजरी पोषाखामुळे तो एकदम राजबिंडा राजकुमार म्हणून नक्की शोभतो.
४) पुढे विषकन्या आणि जितूचे स्वप्नातले गाणे आहे. त्या गाण्यात एतके एडिटींग चे कट्स आहेत की बॉर्न सिरीजमधल्या एडिटर ने ते गाणे पाहिले तर तो सिंघासनच्या एडिटरला साष्टांग नमस्कार घालेल.
स्टेडियमच्या मागचे धोंडे बघता
स्टेडियमच्या मागचे धोंडे बघता त्याच्या मागेच गब्बर कालियाला "कितने आदमी थे " विचारत असेल असे वाटते. >>> पण गब्बर त्या स्टेडियममधेच असताना त्याच्या मागे जाऊन असं काही का करेल?
विक्रम त्या कटैय्याला येउन
विक्रम त्या कटैय्याला येउन चॅलेंज करतो तो सीन महाधमाल आहे. इथे पाहा बॉलीवूडचा एक जुना नियम आहे. स्क्रीनवर फ्रेममधे आपल्याला दिसते तितकेच त्या सीनमधल्या लोकांनाही तेवढेच दिसते. एक मोठे मैदान आहे. एका बाजूला कटैय्याचा डॉयलॉग चालू आहे. त्याला उत्तर द्यायला इतका वेळ विक्रमसिंग दबा धरून विंगेत बसला असेल हेच आधी वरती पायस म्हणतो तसे विनोदी आहेच. पण इथे दिसते की त्या मोकळ्या मैदानावर तो कटैय्या ते संवाद म्हणताना जिकडे बघत आहे तेथेच विक्रम उभा आहे. नुसता विक्रम नव्हे, तर त्याचा घोडा आणि इतर १०-१५ साथीदारही आहेत. पण तो कटैय्या! म्हणून जोरात ओरडत नाही तोपर्यंत कटैय्याला हे सगळे लोक दिसत नाहीत. का? तर ते तोपर्यंत फ्रेम मधे नसतात
लोकांनी आधीचा सीन कट् करून दुसरा सीन दाखवण्याचीही तसदी घेतलेली नाही. कॅमेरा १८० अंशात फिरून समोर आपल्याला विक्रम अॅण्ड को दिसतात.
तर आता त्या अंतराळातील
तर आता त्या अंतराळातील गाण्यातील खगोलशास्त्र बघू.
ही एक अफलातून जागा आहे. पायसने वरती लिहीलेच आहे की अंतराळात टिकणारे ढग इथे आहेत. पण जगातील कोणत्याही दुर्बिणीला अजून न दिसलेल्या काही गोष्टी इथे नमूद करणे आवश्यक आहे.
- हे दोघे जेथे पोजेस देत आहेत ती जागा म्हणजे स्वतः एक ग्रह आहे, की अनेक छोट्या उपग्रहांचा एक बेल्ट आहे कल्पना नाही. पण तेथे गुरूत्वाकर्षण आहे. ते शनिसारख्या एखाद्या ग्रहाच्या कड्यावर नाचत आहेत.
- काही ग्रह स्वतःभोवती फिरत आहेत पण कोणत्या एखाद्या तार्याभोवती फिरत नाहीत. स्थिर आहेत. परिवलन आहे, परिभ्रमण नाही. मग सगळा गटच एकदम फिरत असेल का? असू शकेल (इथे पुन्हा पायसची 'बट दे ट्राइड' कॉमेण्ट आठवते).
- काही ग्रह फिरून थकले की फिरायचे थांबतात असेही दिसते.
- ग्रहांपेक्षा वरचे आकाश आणखी जोरात फिरते.
- तेथे कोठेतरी टांगलेली झुंबरेही आहेत. किंवा एखाद्या ग्रहाची तार लपवायला विसरलेत.
- एक तारा त्याच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाचा प्रकाश देतो. त्याच्या केंद्रापासून त्या गोल खिडक्या समान अंतरावर असल्या तरी.
-
एका राजकन्येचा शयनकक्ष किती सुरक्षित असावा? तिला मारायला आलेले मारेकरी चार वेगवेगळ्या बाजूंनी त्या खोलीत येतात. राजकन्या सगळे दागिने वगैरे घालून झोपलेली असते. नंतर कादर खान आणखी पाचव्याच दाराने आत येतो. राजकन्येला जरा "कडी लावा आतली" कोणीतरी शिकवलेले दिसत नाही.
कादरखानचा मास्टर प्लॅन जबरी आहे. ते चार मारेकरी सिंक्रोनाइज्ड हल्ला करतील. मग विक्रम सिंग वेळेवर येउन तो हल्ला परतवेल. राजकन्या अचूक अशा वेळी जागी होईल की ते आधीचे मारेकरी तिला दिसणार नाहीत. हातात कोणतेही शस्त्र नसलेला विक्रमसिंग आपल्या अंगावर उलटा रेलून आपला खून कसा करणार होता हा प्रश्न तिला पडत नाही. विक्रमसिंगच्या हातात कोणतेही शस्त्र नव्हते हा प्रश्न इतरही कोणाला पडत नाही.
राजाला वारा घालणार्या त्या दोन बायका साधारण त्या सिंहासनाच्या आसपास कोठेही वारा लागला तरी चालेल असे ते पंखे फिरवतात हा ही एक जुना नियम आहे. नंतर तर एकदा भाभू उठून बराच पुढे येतो तेव्हा त्या रिकाम्या सिंहासनाला त्या वारा घालतात.
भारी
भारी
गाण्यातील खगोलशास्त्र मस्त फा
गाण्यातील खगोलशास्त्र मस्त फा
५) जोडी जुळवण्यासाठी जबर प्लॅनिंग करावे लागते
५.१) शिकारी
जॅक-२ चा रंगमहाल आणि त्याचा फिरता पलंग. पण आज महालात ललनांऐवजी शक्ती कपूर आणि अमजद खान आलेले आहेत. जॅक-२ मदिरापान करत बसला आहे. जॅक-२ ला इतर कोणाचीच काळजी नसल्याने तो एकटाच पलंगावर बसला आहे तर त्या पलंगाभोवती शक्ती कपूर चालत तर अमजद खान जॉगिंग करत गप्पा छाटत आहेत. शक्ती कपूर म्हणतो की तुला राजतिलक नाही करायचा, ठीक आहे. तुला लग्न नाही करायचं, ठीक आहे. पण एक छोटीशी विनंती तरी मान्य करशील का? जितेंद्र पिऊन टुन्न असल्याने यांना कटवायला म्हणून तो विचारतो की काय पाहिजे? शक्ती कपूरची इच्छा असते की याने त्यांच्यासोबत शिकारीला यावे. आज शिकारीचा प्लॅन बनवला आहे तर चल सोबत. जितेंद्र एक व्हॅलिड प्रश्न विचारतो - आज काय मुहूर्त आहे कि आजच शिकारीला जायला पाहिजे? अमजदकडे याचे उत्तर तयार असते. अॅपरंटली राज्यातले शेतकरी तक्रार घेऊन आलेले असतात की जंगली जनावरांनी उच्छाद मांडला असून ते पिकाची नासाडी करत आहेत. अशावेळी शिकार केली तर शिकार आणि परोपकार दोन्ही होतील. जितेंद्र म्हणतो की मी येतो शिकारीला पण मी मासूम जनावरांची शिकार करणार नाही.
आता - मासूम जनावरे म्हणजे इथे त्याला बहुधा हरणे, ससे असे शाकाहारी प्राणी अपेक्षित असावेत. हा वाघ, लांडगे, कोल्हे अशा प्राण्यांच्या शिकारीचा विचार करत असेल असे मानायला वाव आहे. हे सर्व काही पिकाची नासाडी करत नाहीत. त्यामुळे वाघाची शिकार करून शेतकर्यांवर परोपकार होत नाही आहेत हे त्याच्या ध्यानात आलेले नाही हे दाखवून दिग्दर्शक त्याचे झालेले नैतिक अधःपतन अधोरेखित करतो. दुसरे म्हणजे, प्राण व्हिलन असल्याचे उघड असल्याने शक्ती कपूर आणि अमजद खानही व्हिलन आहेत. तस्मात्, या शिकारीच्या प्लॅनमागे जितेंद्र-मंदाकिनी भेट घडवून आणणे हा हेतु आहे हे शेंबडे पोरही सांगेल. अशावेळी सरळ सरळ नरभक्षक वाघाने उच्छाद मांडला आहे असे खोटे बोलणे जास्त सयुक्तिक ठरते. शेतकर्यांवरील परोपकार ही देखील लोणकढी थाप असल्याचे आपण सांगू शकतो पण मग खोटे बोलायचे असेलच तर किमान जरा विचार करून खोटे बोलावे. त्याला कन्व्हिन्स करणे सोपे जाणार नाही का? तसेच वाघ सहसा जंगलात बराच आत राहतो, जंगलसीमेवर तो फारसा येत नाही. मंदाकिनीची कुटी देखील राजधानीपासून दूर अशी जंगलात लपवलेली आहे. वाघ मारायचा असेल तर मंदाकिनीच्या एरियात जावेच लागेल आणि ते नॅचरल वाटेल. अन्यथा जितेंद्रने थोडे डोके चालवले आणि शेतकर्यांना दिलासा म्हणून शिकार करायचे ठरवले तर तो जंगलाच्या आतल्या भागात न जाता शेतजमीनाच्या आसपास ठाण मांडेल. मग तो मंदाकिनीला भेटणार कसा? इथे व्हिलन लोकांचा हलगर्जीपणा दर्शवून त्यांचा पराजय होण्याचे सूतोवाच केले आहे.
५.२) शिकार
पंधरा शिपायांचे पथक घेऊन जॅक-२ आणि शक्ती शिकारीला जातात (फ्रेममध्ये सतरा लोक मोजता आले). आपला शिकारी गाढव असल्याचा आणखी एक पुरावा म्हणून दिग्दर्शकाने जॅक-२ च्या हातात फॉईल (फेन्सिंगची तलवार) दिली आहे. फॉईलच्या मदतीने हा कोणत्या खतरनाक जनावराची शिकार करणार आहे? एकही जनावर दिसत नसल्याने जितेंद्र काहीसा त्रस्त आहे. तो शक्ती कपूरला विचारतो की सगळे प्राणी कुठे गेले? शक्ती कपूर त्याला हरभराच्या झाडावर चढवत म्हणतो की सगळे तुला घाबरून डोंगरांत लपले आहेत. त्याचा सल्ला असतो की शक्ती जाऊन या बाजूच्या डोंगरात शिकार शोधेल आणि जितेंद्रने नदीच्या रस्त्याने जंगलाच्या आतल्या भागात शोध घ्यावा. आता नदीचा रस्ता कुठे जातो हे आपल्याला ठाऊक असल्याने इथे काय होणार आहे हे सांगणे न लगे. पण गंमत म्हणजे शक्ती कपूर सगळ्या सैनिकांना तिथेच थांबायला सांगतो. तेव्हा जॅक-२ च्या मनात शंकेची पाल चुकचुकू नये हे पटत नाही. कितीही शूरवीर राजा असला तरी किमान शिकार वाहून न्यायला तरी तो दोन सैनिक जवळ ठेवतोच. तसेच निसटण्यार्या जनावराला भाला मारून ठार करणारा एक पोरगा ज्याला पुढे बढती मिळून तो सरदार बनतो (चांदोबा कथांचा कॉमन प्लॉटपॉईंट) देखील असावा लागतो. असो, बापडा एकटाच जातो हे खरे.
तिकडे मंदाकिनी जलक्रीडा करत आहे. तिच्या अंगातील विविध विषारी रसायनांच्या प्रक्रियेने पाण्याचा ड्राय आईस होऊन धूरच धूर झालेला आहे. जरा विचार करूया. मंदाकिनी विषकन्या आहे. तिला अधिक काळ स्पर्श करणे धोक्याचे आहे आणि प्रणय तरी निश्चित प्राणघातक आहे. आता तिचे विष वेनम (जे चावा घेऊन किंवा दंश करून दिले जाते) नसून पॉयजन आहे (जे रोमछिद्रांतून स्त्रवते). म्हणजे ती बेडूक आहे (पॉयजन अॅरो फ्रॉग). ही बेडकी जर रोज नदीवर आंघोळ करत असेल तर एव्हाना पाण्याचा रंग बदलला पाहिजे पण तसे होत नाही. बेडकांचे विष हे लायपोफिलिक असल्याने ते पाण्यात विरघळणार नाही त्यामुळे पाण्यावर तवंग उठले पाहिजेत तेही झालेले नाही. म्हणजे ही काय केअरटेकर सांगतो तेवढी पॉवरबाज विषकन्या नसावी. एनीवे, जर ही जितेंद्राची शिकार असेल तर जितेंद्र शिकारी नसून कोळी आहे असे म्हणावे का?
५.३) बेडूक
आता मंदाकिनी आंघोळ करत आहे आणि गाणे नाही झाले ऐसा कैसे चलेगा दीदी? तर गाणे आहे वाह वाह क्या रंग हैं, वाह वाह क्या रुप हैं. तसे ध्रुवपद बरेच मोठे आहे पण शेवटी दॅट टर्न्स इंटू "धिन ताना धिन ताऽनाऽ, धिन ताना धिन ताऽनाऽ". एक मला कळले नाही. जॅक-१ आणि जयाप्रदा जोडीला किशोर कुमार-आशा भोसले जोडी आहे. जॅक-२ चे एंट्रीचे गाणे बप्पीने गायले आहे. तर हे गाणे सुद्धा बप्पीने इतर कोणाला तरी घेऊन गायला पाहिजे होते पण कन्सिस्टन्सी ब्रेक करत परत किशोर-आशाने गाण्याला आवाज दिला आहे.
हे बप्पीच्या पद्मालय स्टुडिओसोबत केलेल्या गाण्यांचे एक विशिष्ट टेम्प्लेट फॉलो करते. किशोर-आशाचा आवाज, सुरुवातीला व्यवस्थित शब्द आणि मग अचानक "धिन ताना". असेच पाताल भैरवीमध्ये "तनना तन्नाना" गाणे आहे. चालीसुद्धा साधारण सारख्याच वाटतात. हल्ली टेम्प म्युझिक हा शब्द प्रचलित झाला आहे ज्याच्यात त्याच त्याच चाली थोड्या नोट्स बदलून परत वापरल्या जातात. याने चित्रीकरण लवकर पूर्ण होण्यास मदत होते. हा व्हिडिओ रेफरन्स साठी बघा - https://www.youtube.com/watch?v=IEfQ_9DIItI. हे सर्व पद्मालय दोन दशकांपूर्वीच करत होते म्हणजे ते प्रॉडक्शन मॅनेजमेंटमध्ये किती पुढारलेले होते कल्पना करा. बप्पी लाहिरी इथे कॉन्शसली निवडला आहे हे लक्षात येते. नाहीतर त्यांना काय आर डी परवडत नव्हता अशातला भाग नाही.
गाण्याच्या सुरुवातीला मंदाकिनी तशीच ओलेत्याने उभी आहे आणि जितेंद्र तिला कुदरत की रचना वगैरे म्हणताना दिसतो. मग त्यांचे तोहफा स्टाईल कट्स. धनिची कमेंट बहुधा या गाण्यासाठी आहे कारण अक्षरशः कट्सचा वर्षाव आहे. या लेव्हलवरचे एडिटिंग फक्त आणि फक्त २००४ च्या कॅटवूमनमध्ये बघायला मिळते जिथे सेकंदाला चार कट्स वापरले आहेत. यात रफली सेकंदाला दोन-अडीच कट्स आहेत. यापेक्षा फास्ट कटिंग फक्त अॅनिमेशन पटांमध्ये असते उदा. सातोशी कॉनच्या मिलेनियम अॅक्ट्रेसमध्ये एका सीनला सेकंदाला बारा कट्स आहेत (अंदाजे, एका लिमिटनंतर हे सगळे मोजणे अशक्य आहे). नदी बाल्यवस्थेत असल्याचा पुरावा बाल्यावस्थेतील भूरुपे दिसतात जसे की धबधबे, रांजणखळगे इ. आता त्यांच्या कवायती सुरु झाल्या आहेत आणि डॅन्सवर फोकस करण्याची वेळ झाली आहे.
५.४) गॅदरिंग
जंगलात राहत असली तरी मंदाकिनीला सोन्याच्या दागिन्यांचे दुकान उपलब्ध आहे. जयाप्रदा इतके नाही तरी तीसुद्धा बरेच दागिने घालते. मग यांचे "वाह वा" सुरू होते. इथे "क्युंकी सास" च्या स्टाईलचे एक्सप्रेशन आणि एडिटिंग. मग साऊथला साजेसे नेव्हल शॉट्स. मग "धिन ताना धिन ताना वाह वा धिन ताना धिन ताना". या धिन ताना वर चुटक्या मारत नाचण्याच्या स्टेप्स. तसेच जितेंद्र मंदाकिनीला सहज टच करत असल्याने ती तितकी पॉवरबाज विषकन्या नाही या तर्कास पुष्टी मिळते. मंदाकिनीच्या चेहर्यावर एक विचित्र तोरा आहे. तो कसला हे काय माहित नाही पण बहुतेक "माझे एकटीचेच डोळे घारे" याचा वृथा अभिमान असावा. कारण अदरवाईज हिचा डॅन्स फारच नीरस आहे. नुसती कंबर हलवल्याने डॅन्समध्ये जीव ओतला जात असता तर आमच्या पिढीने जॅकी भगनानी-कृतिका कामरा जोडीला सुद्धा डोक्यावर घेतले असते. पण त्याकाळची मंदाकिनीची क्रेझ काही और असल्याचे मी समजू शकतो.
आता या सीन्समध्ये नदी संथ वाहते आहे जे मध्यावस्थेचे लक्षण आहे. अशावेळी नदी नागमोडी वळणे घेते आणि गोखूर सरोवरे तयार करते. आसपासच्या दगडांच्या आकारावरून हे ऑलमोस्ट तयार झालेले गोखूर सरोवर आहे हे प्रेक्षक सांगू शकतो. पण मंदाकिनीच्या घरापाशी धबधबे आहेत. इसका मतलब दया ये लोग नाचते नाचते घर से बहुत दूर आ चुके हैं. पण त्याच वेळी सर धबधबे सुद्धा दिसतात. त्यामुळे ही नदी गडबड असल्याचे आपण सांगू शकतो. बट दे ट्राईड! तिकडे कडवे चेंज होते आणि कपडेसुद्धा. आता एक घटमचा पीस आहे. का तर बप्पीदांना वापरायचा होता म्हणून. आता विविध शैलींचे फ्यूजन करण्यासाठी एखाद्या कार्यक्रमाचा परीक्षक असण्याची तर काही अट नाही त्यामुळे बप्पीदांनी केलाय प्रयत्न. त्यानुसार मग डफली पण वाजते. मग ढोलक पण वाजतो. मंदाकिनीकडे राजकुमारामुळे पैसा आला असून तिची ज्युअलरी आता मोत्यांची झाली आहे. आता हे लोक पुन्हा धबधब्यापाशी नाचत आहेत. म्हणजे ते पुन्हा घराच्या जवळ आले आहेत. गाणं आहे की प्रवासवर्णन?
पुढच्या कडव्यात बहुतेक जितेंद्राचे पैसे संपले आहेत कारण आता दागिन्यांच्या जागी फुले आली आहेत. या कडव्यातला डान्स अगदीचे गॅदरिंग डान्स आहे. यात जितेंद्राचे एक्सप्रेशन्स मस्त आहेत. त्यामानाने बेडकी अगदीच बथ्थड वाटते. पण या लोकांकडे जंगलात जमीनीवर कार्पेट म्हणून टाकायला झेंडूची फुले कुठून आली हे काही कळत नाही. अखेर पुन्हा "वाहवा क्या रंग हैं, वाहवा क्या रुप हैं" सुरू होते आणि ध्रुवपद ऐकायला मिळाले म्हणजे गाणे संपत आले हे बघून प्रेक्षक दम खातो. गाणे संपते आणि कळते की हे तर जितेंद्राचे स्वप्न होते. त्याचे स्वप्न संपते आणि तो बघतो की बया अजूनही ओलेत्याने आपल्याचकडे क्रीपी नजरेने बघते आहे. यावर कोणीही घाबरून पळून जाईल. पण जितेंद्रने पाठीला केप (झूल) बांधली आहे. केप असला की हिरो ऑटोमॅटिकली ताकदवान असतो त्यामुळे तो घाबरत नाही. ही ओलेत्याने बघत असताना मध्येच फ्रेममध्ये एक कावळा खालून उडत येतो आणि डावीकडे एक्झिट येतो. हे रिशूट करण्याचे कष्टही या लोकांनी घेतलेले नाहीत. तो कावळा तसाच फ्रेममध्ये आहे.
जितेंद्र तिला अॅप्रोच होऊन म्हणतो की तू मला तुझ्या नयनबाणांनी घायाळ केले आहेस. मी तुझ्या रंगरुपावर फिदा आहे. कोण आहेस तू? ती म्हणते मी माणूस आहे. तरुण प्रेक्षकांनी या सीनचा अभ्यास "रिजेक्शनसाठीची हमखास उत्तरे" या दृष्टीने केला पाहिजे. पण त्या काळात हे खपायचं बहुतेक. मग जॅक-२ तिला तू माणूस नसून देवकन्या आहेस असे म्हणतो. तो तिची बरीच स्तुती करतो. त्याला तिथे नसलेली चंदनाची झाडे पण दिसतात (बहुधा हिच्या विषाचा परिणाम, हॅल्युसिनेशन्स). तो म्हणतो की तूच माझ्या स्वप्नांतली राणी, कुठे होतीस इतके दिवस? ती म्हणते इथेच जंगलात होते. हिला प्रश्न शब्दशः घ्यायची सवय आहे. पण जितेंद्र फारच फिदा असल्याने तो दुर्लक्ष करतो. तो म्हणतो तू अमृतकन्या आहेस. ती म्हणत्ते नाही मी चंदनागंधी आहे. हा सगळा सीन सुगिता तोमोकाझूच्या हयामी साओरीच्या पॉडकास्ट एपिसोड सारखा प्ले होतो - झलक - https://www.youtube.com/watch?v=-ym1F3S3GUo अर्थात हयामिन या दगड बेडकीपेक्षा फार जास्ती एक्सप्रेशन देते. पण तो तिला इतक्या सगळ्या उपमा देत असतानाही शब्दशः अर्थ घ्यायचा धागा कॉमन आहे. तो तिला खूण म्हणून स्वतःची अंगठी देतो. ही जोडी तर जुळली.
काय अभ्यास आहे!!! दंडवत
काय अभ्यास आहे!!! दंडवत स्वीकार मालक
तुमचं लेखन म्हणजे लॉजिकल
तुमचं लेखन म्हणजे लॉजिकल कॉमिकच अत्युत्तम उदाहरण आहे.
खूप आवडलं.
मस्त.
मस्त.
विशेषत: श्रीराम लागू यांचे शुद्ध उच्चार, वाहिदावला जितेंद्र, बादाम खाके , या लेव्हल चे एडिटिंग.......
भारी....
हहपुवा
हहपुवा
Pages