भूतांच्या गोष्टी: चला चला बायांनो तसेच पलंग विकणे आहे
१. चला चला बायांनो
ही खूपच जुनी आठवण आहे. म्हणजे ३५ वर्षापूर्वीची असावी. त्यावेळेस मी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा गावात राहत होतो (म्हणजे माझे घर – माहेर तिथे आहे). आमच्या घरी दरवर्षी गौरीपुजा असते. इथे त्याला महालक्ष्मी पुजा म्हणतात.
त्या काळात वर्षातून दोनदा घराची संपूर्ण साफसफाई रंगरंगोटी केली जात असे. म्हणजे घरातील प्रत्येक वस्तु धुवून आणल्या जात असे. भिंती, ओसरी पांढर्या मातीने सारवली जयची. ह्या ‘मिशन स्वच्छ घर’ अभियानाचे दोन मुहूर्त म्हणजे - एक दिवाळी आणि दुसरी महालक्ष्मी पुजा.
घरातील सर्व कपडे, म्हणजे अंथरूण पांघरून, गोधळ्या, सर्वांचे कपडे घेऊन नदीवर जायचे आणि धुवून आणायचे. एवढे सगळे कपडे धुण्याचे काम अर्थात मोठे असायचे. घरातील सर्वांनी ह्यात सहभागी होने जरूरी असायचे. प्रत्येकाच्या डोक्यावर एक गाठोडे आणि उरलेली गाठोडी घरच्या सायकलवर घेऊन जावे लागे. सायकलचा प्रभारी मी असे.
हे ‘मिशन धोबीघाट’ भल्या पहाटे सुरू करावे लागे. मग सर्व कपडे ई. दिवसभर घरावर असलेल्या टिनावर (तेव्हा सीमेंटचे स्लॅब नव्हते) छान वाळवून रात्री पांघरायला घ्यायचे. अशाप्रकारे घराचे निर्जंतुकीकरण केले जायचे.
आणखी एक गोष्ट म्हणजे त्यावेळेस आमच्या घरी कुणाजवळही किंवा भिंतीवरसुद्धा घड्याळ नव्हते. चौकातल्या एका वाड्यात भिंतीवरचे घड्याळ होते. पण ते केवळ दिवसा दरवाजा उघडा असला तरच बघता येत असे.
सांगायचे असे की थोडे उजाडले की दिवस निघाला असे आईला कळत असे. नाही तर मुल्ला आरडायला लागला की उठायचे असे गणित असे. आणखी एक क्लू ती वापरीत असे ते म्हणजे शेतात जाणार्या बैलबंड्यांचे, रस्त्यावरून जाणार्या शेतमजुरांचे आवाज.
त्या ‘मिशन धोबीघाट’च्या दिवशी भल्या पहाटे आम्हाला नदीवर जायचे होते. सर्वप्रथम आईला जाग आली. नंतर तिने आम्हाला सर्वांना उठवले. ‘अरे, उठा उठा. नाहीतर आपल्याला नदीवर कपडे धुवायला चांगली जागा (खडक) मिळणार नाही!’ असे ती ओरडून सांगत होती. खरेच होते तिचे म्हणणे.
कारण दाराबाहेर रस्त्यावर ‘चला चला बायांनो’ असे आवाज एकू येत होते. म्हणजे आधीच खूप कुटुंबे धुणे घेऊन निघाली होती. आणि त्यांच्या रहदारीचा, बोलण्याचा (छोट्या गावात सर्वच जण बर्यापैकी जोरातच बोलतात) आवाज येत होता.
आम्ही सर्वांनी स्वतःची अंथरूण, पांघरून पटापट जमविली. धुवायच्या प्रत्येक कपड्याची साड्या, लुगड्यांमध्ये गाठोडी बांधली. सायकल आणि डोक्यावळ गाठोडी चढली.
उशीर न करता आम्ही नऊ दहा जण घोळक्याने नदीकडे निघालो. आत्ता थोड्या वेळापूर्वी आवाज करणार्या बायका पार पुढे निघून गेल्या असाव्या. आम्ही एक दीड किलोमीटरचे अंतर वस्तीतून पार करून गेलो. वस्ती संपली. पण रस्त्यावर कुणीच आडवे गेले नाही. मुल्ला पण शांत होता. गावातले लाइट संपले आणि आम्ही नदीवर पोचलो सुद्धा. आधीच आवाज करीत नदीवर आलेल्या मघाच्या बायकांपैकी कुणीही आजूबाजूला दिसत नव्हते. त्यांचे आवाजसुद्धा येत नव्हते. खरे तर अंधार एवढा होता की विशेष काही दिसत नव्हते. नदीच्या पाण्याचा आवाज सोडून इतर कुठलाच आवाज, म्हणजे किमान कपडे धुण्याचा जोराचा अपेक्षित आवाजसुद्धा येत नव्हता. पैलतीरावर असलेल्या महादेवाच्या पांढर्या शुभ्र मंदिराची आकृती तेवढी क्षितिजाला आणि आधाराला दिसत होती.
आमची चुळबुळ सुरू झाली.
‘आई बरोबर ऐकलं होतस ना? की चकवा होता?’
‘अरे पण तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं ना? आता कुठं गेल्या त्या रांडा? मगा तर लई ओरडत होत्या. अन मुल्ला बी लय झोपला आजच. बोंबलून नाई राह्यला!’
कुणीही नदीवरच्या खडकापर्यन्त जायची हिम्मत केली नाही. थोडे तरी उजाडणे जरूरी होते. पण लवकर उजाडणार होते का? बरीच चर्चा झाली. चुळबुळ झाली. शेवटी ठरले. असेच घोळका करून माघारी फिरायचे.
खरंच आम्ही घरी परत आलो. कामापुरती गाठोडी काढून झोपी गेलो. मुल्लाने बोंब मारल्यावर आईला जाग आली. परत सगळी गाठोडी बांधली. नदीवर पोहोचलो. सर्वच खडक अजूनही रिकामेच होते. आम्ही गाठोडी खडकावर धुवायला टाकेपर्यंत आजूबाजूला गर्दी व्हायला लागली. छान उजाडले होते. पूर्वेला सोनेरी रंग भरला होता. पैलतिरावरचे महादेवचे मंदिर धिरोदात्तपणे आधार देत होते.
महालक्ष्मीच्या पूजेचे दोन दिवस चकव्याच्या न घडलेल्या भेटीचे किस्से रंगवून रंगवून सांगण्यात आणि हसण्या खिदळण्यात कसे निघून गेले कळले सुद्धा नाही.
२. पलंग विकणे आहे
१९९५-९६ ची गोष्ट असेल. त्यावेळेस मी औरंगाबादला होतो. बॅचलर होतो आणि भाड्याने खोली करून एकटाच राहत असे. तसेही दिवसभर बाहेरच असायचो. खोलीवर अंथरुन पांघरून, पाण्याची सोय, आणि नोकरीच्या संबंधित सामान असायचे. मी नुकतीच एक सेकंड हँड बजाज सुपर स्कूटर विकत घेतली होती.
माझा मोहनदास नावाचा कंपनीतला सहकारी आणि मित्र मला नेहेमी मार्गदर्शन करीत असे. एखाद्या व्यक्तीने किती चांगले असावे त्याचे मोहनदास म्हणजे उत्कृष्ट उदाहरण. पैशाची बचत का करावी, पासून तर आयुष्यातील कुठल्याही विषयावर तो मला चांगल्या गोष्टी सांगत असे.
अर्थात माझे बहुतेक मोठे निर्णय त्याला विचारल्याशिवाय होत नसत. एकदा त्याने मला खोलीसाठी काही सामान हवे का म्हणून विचारले. तसे मला काही नको होते. पण त्याने
‘अरे एकदम स्वस्तात मिळेल. घेऊन टाक तुला काय पाहिजे ते’. असे म्हणून मला मोहात पाडले.
मग मीही स्कूटर काढून सामान बघायला गेलो. त्याच्या सोसायतीत एका फ्लॅटमध्ये एक अविवाहित स्त्री एकटीच राहत होती. ती प्राध्यापिका होती. काही दिवसांपूर्वी अचानक तिचा फ्लॅटमध्येच मृत्यू झाला होता. त्यावेळेस ती पलंगावर झोपून होती. मृत्यू गूढ वगैरे होता की माहीत नाही. पण तिचा स्वभाव चांगला होता, असे मोहनदास सांगत होता.
वार्ता कळताच तिचे भाऊ आले. त्यांनी तिचे क्रियाकर्म केले. त्यांना तिच्या फ्लॅट मधील कुठल्याही वस्तूची आवश्यकता नव्हती. त्यांनी ते सगळे सामान विकायला काढले होते. कदाचित तो फ्लॅटसुद्धा ते विकायला काढणार होते. म्हणून मोहनने (मोहनदास) मला संधीचा फायदा उचलायला बोलावले होते. अरे हो, तेव्हा ‘ओएलएक्स’ चा जन्म व्हायचा होता. नाहीतर ह्या सेलची माहिती माझ्यापर्यन्त आलीच नसती.
मी फ्लॅटमध्ये गेलो तर फ्लॅट एकदम छान होता. माझ्या कामाची वस्तु म्हणजे एक सिंगल बेड होती. अर्थात तोच पलंग ज्यावर झोपेतच बाईचा मृत्यू झाला होता. त्या फ्लॅट मधील फ्रीज वगैरे सामान मला उपयोगाचे नव्हते. मी तो छान लोखंडी पलंग अगदी शंभर रुपयाला घेतला. बाहेर कदाचित दीड दोन हजाराला मिळाला असता, पण आता निश्चित भाव आठवत नाही. त्यासोबत मला गाद्या, उश्या, चादरी पण तशाच (म्हणजे मोफत) घेऊन जा म्हणायला लागले. पण माझ्याकडे हे सगळे असल्यामुळे आणि उपयोग नसल्यामुळे मी घेतल्या नाही (भीती वगैरे नाही बरे का!)! घर मालकीण मरण पावली असल्यामुळे मी तिला बघितले नव्हतेच.
तर, पूर्वी लादीवर गादी टाकून झोपणारा मी आता खोलीतल्या पलंगावर झोपायला सुरुवात केली.
काही दिवसांनंतर एका रात्री कधी तरी अचानक माझा श्वास गुदमरायला लागला. एक बाई माझ्या छातीवर बसून माझा गळा दाबत होती. मी माझ्या हाताने तिला ढकलायचा प्रयत्न केला पण तिच्यामध्ये नक्कीच जास्त ताकत होती. तिने माझा गळा एवढा दाबला की मी जोरजोरात खोकलून उठून बसला झालो. मी घामाघूम झालो होतो. मी आजूबाजूला बघितले. खोलीत कुणीच नव्हते. त्यावेळेस माझ्या खोलीत मी नेहेमी निळ्या रंगाचा झीरोचा बल्ब लावीत असे (का, मला पण आठवत नाही). तसेही माझ्या खोलीला दोन बाजूस खिडक्या होत्या. सर्व बल्ब बंद ठेवले असते तरीही रस्त्यावरच्या प्रकाशदिव्यांचा बर्यापैकी प्रकाश खोलीत पडत असे.
दुसर्या दिवशी मोहनला फोन करून सांगितले. तो म्हणाला
‘अरे राजू, हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. आपण अशी एखादी गोष्ट डोक्यात घोळत ठेवली ना, की झोपेत आणि स्वप्नात त्याच गोष्टी आपल्याला थोड्याफार फरकाने किंवा असंबध पद्धतीने दिसतात. भूत खेत, आत्मा, मृत्यू ह्या गोष्टी त्यात आल्या तर त्यासोबत आपल्या मनात उपजत म्हणजे लहानपणापासून रुजविलेली भीती असते. त्याचा आपल्या मेंदूत खेळ चालू असतो. मग असं काहीतरी घडतं (असं प्रत्येक गोष्टीचं लॉजिकल स्पष्टीकरण तो मला देत असे).
पण तू घाबरलास नाहीस ना? (म्हणजे मी नाहीच म्हणायचे!)
तुला एक गोष्ट सांगतो, ती बाई खूप चांगली होती. ती कुणाला त्रास देणार नाही!’ (मग आता रात्री बेरात्री माझ्याशी काय गुलूगुलू गप्पा करते होय?)
‘पण मोहन. माझी लई फा... म्हणजे फारच पंचाईत होते बघ. इसपे कुछ उपाय नाही क्या? बहोत, मतलब कैसातोभीच लगता है. तुला तर माहीत आहे माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही’ (उगाच बोलून गेलो. म्हणजे स्वतःची फा....फारच घाबरगुंडी उडाली असताना सुद्धा).
पुन्हा एकदोनदा असेच प्रकार घडले. आता माझ्या खोलीत हनुमान चालीसा ठेवायला लागलो (तुम्हाला म्हणून डिटेल सांगतो, उशाशीच ठेवायला लागलो). देवाचा फोटो भिंतीवर डकवला. अगरबत्ती पण लावायला सुरुवात केली. नंतर बाई काही खोलीवर आल्या नाहीत. मी बर्यापैकी धीट झालो (म्हणजे पूर्वीपासून आहे तसाच)!
माझी अमरावतीला बदली झाली. पण तिथल्या भाड्याच्या फ्लॅट मध्ये आधीच आणखी पलंग असल्यामुळे हा पलंग दुसर्या खोलीत टाकलेला असायचा. लग्न झाल्यानंतर अमरावतीला स्वतःच्या घरी लाकडी फर्निचर घेतले. पुन्हा नागपुरला बदली झाली. परत हा पलंग दुसर्या खोलीत टाकून ठेवला होता. मला कधी त्यावर झोपायचे कारण नव्हते. बायकोला मात्र ह्या पलंगाबद्दल (म्हणजे ही गोष्ट आधी तुम्हीच वाचताय) मी कधीच सांगितले नाही. ती खबरदारी मुद्दाम मी घेतली. नाहीतर उगाच बाई तिचा गळा दाबायची.
पलंग विकत घेऊन आता दहा वर्षे उलटून गेली होती. एक दिवस काहीतरी योगायोग घडला आणि मला त्या पलंगावर झोपावे लागले. आणि रात्री बाईंनी परत आगमन करून माझ्या छातीवर बसून माझा गळा दाबायचा जोरदार प्रयत्न केला. मी खडबडून जागा झालो. तसेच घामाघून झालो होतो. पण काही सांगता येत नव्हते (ह्याला बोबडी वळणे वगैरे म्हणतात पण बोबडी वळली असे मीच म्हणणार नाही). तेव्हा ‘आधीच्या दिवसभर माझी दगदग झाल्यामुळे, ब्लड प्रेशर वाढले असेल, म्हणून घाम फुटला!’ असे आमच्या सौ ने ‘निदान’ निदानतरी केले. अर्थात आता नुसताच हनुमान चालीसा नाही तर अख्खे देवघर माझ्या मदतीला धावले. ‘टेंशन घेऊ नका, मी आहे ना!’ असे तिचे हिम्मतीचे शब्द ऐकित मी ‘फरशीवर’ गादी टाकून झोपी गेलो. तिला मी ही स्टोरी सांगितली असती तर मला धीर द्यायला कदाचित कुणी उरले नसते, ह्या स्वार्थी उद्देशाने मी गुपित दडवून ठेवलेले आहे.
नंतर मी त्या पलंगावर झोपायचे टाळत राहिलो. २०१० मध्ये नोकरी बदलून चंबुगबाळे गुंडाळून मुंबईला जायचे ठरले तेव्हा हा पलंग ‘जागा अपुरी असल्यामुळे’ नागपूरलाच ठेवायचा असा मी निर्णय घेतला. फ्लॅट मध्ये असलेल्या सज्जावर आम्ही तो टाकून दिला. अजूनही हा पलंग सुस्थितीत असून आम्ही तो पलंग विकायचा निर्णय आता घेतला आहे.
तर हा लेख लिहायचे कारण असे की हा ऐतिहासिक (२४ वर्षांचा इतिहास इथे सांगितला आहेच) पलंग अगदी कमी किमतीत – भाव पाडून विकणे आहे. कुणाला घ्यायचा असल्यास लेखकाशी दिवसा संपर्क साधावा. कृपया रात्री बेरात्री फोन करू नये. अहो, मी घाबरत नाही. हे सामान्य मॅनर्सचा भाग नाही का?
(ता.क. मी पलंगाची किम्मत लिहिलेली नाही. सर्वात जास्त किम्मत देणार्याला तो विकल्या जाईल. फ्लॅटवरून स्वखर्चाने स्व-मेहनतीने सज्जावरून काढून घेऊन जायला लागेल. आणि हो, बाई येईलच ह्याची गॅरंटी नाही).
डॉ. राजू कसंबे
मुंबई
दुसरी कथा खरी आहे? असेल तर लै
दुसरी कथा खरी आहे? असेल तर लै ड्यांजर.
एकच खात्रीशीर गिऱ्हाईक ―
पलंगाला एकच खात्रीशीर गिऱ्हाईक ― बोकलत
आणि इतर कोणाला विकणार असाल तर पलंग + हनुमान चलिसा (फ्री) अशी ऑफर ठेवा
(No subject)
कुच्छ भी !
प्रतिसाद field is required.
(No subject)
अरे वा कसले मस्त आहे हे.
अरे वा कसले मस्त आहे हे. तुम्हाला सर घाबरल्यामुळे कळले नसेल तो काय प्रकार आहे. ती छाताडावर बसून गळा नसेल दाबत. ती दुसरीकडे बसली असेल. मला कळले काय प्रकार आहे. इंग्लिशमध्ये त्याला "वूमन ऑन टॉप" म्हणतात. मला देऊन टाका हा पलंग.
सर
सर
तुमच्या फोटोमध्ये तुम्ही इतके मिश्कील हसत आहात! त्यामुळे संशय येतो
भारी!
भारी!
सर
सर
आपण पक्षी तज्ञ आहात म्हणून विचारतो आहे . पक्ष्यांची पण भुते असतीलच की. त्याबद्दल काही अनुभव ?
But I am only joking बर का .रागावू नका.
तुमचा लेख मी सिरीयसली वाचायला घेतला. पण शेवटी ताक वाचल्यावर खरा कळला झटका !
मस्त खुसखुशीत लिहिलयं
मस्त खुसखुशीत लिहिलयं
माझा अंदाज - पलंगाची कथा खरी आहे पण लेखकाने मुद्दाम शेवट विनोदी केलायं
पक्ष्यांची भुते:
पक्ष्यांची भुते:
एन्ना रास्कला, रजनी च्या 2.0 मधल्या पक्षी भुतांचा काही संबंध आहे का?
पहिली कथा वाचून मला हसायलाच
पहिली कथा वाचून मला हसायलाच आले बिचाऱ्या अक्ख्या कुटुंबाला झोपेतून उठवून दिलं. काय खोडकर भूत बाया आहेत.
ज्या पलंगावर ती बाई मेली तो पलंग विकत घेणाऱ्या तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार. तिच्या नेहमीच्या उशा, चादरी का नाही आणल्या म्हणून ती रागावली असणार आणि तुम्हाला त्रास देत असणार.
(No subject)
प्रभुदेसाई
प्रभुदेसाई
पक्ष्यांची भुते असतीलही कदाचित. बघतो काही माहिती मिळते का. पण मला तरी अनुभव आलेला नाही.
पक्ष्यांच्या आत्महत्यांबद्दल लेख इथे वाचा:
https://www.odditycentral.com/news/the-mind-boggling-bird-suicide-phenom...
आणखी एक रोचक :
https://www.quora.com/Can-birds-see-ghosts
धन्यवाद!!
Parichit
Parichit
खूपच क्रिएटिव !! भुताच्या भीतीने डोक्यात असले काही विचारच आले नाही.
सर्वांना धन्यवाद!!
अज्ञानी
अज्ञानी
धन्यवाद !!
ओके, पलंग + हनुमान चलिसा (फ्री) अशी ऑफर चालू आहे!!
दुसरा किस्सा भयानक..Daringबाज
दुसरा किस्सा भयानक..Daringबाज आहात सर..एवढे सगळे होऊन पण परत त्या पलंगावर झोपायची हिम्मत केली. _/\_
पलंगाला एकच खात्रीशीर गिऱ्हाईक ― बोकलत
आणि इतर कोणाला विकणार असाल तर पलंग + हनुमान चलिसा (फ्री) अशी ऑफर ठेवा >> +111
पलंगाला काळी बाहुली बांधली
पलंगाला काळी बाहुली बांधली असती तर मग भुताची काय टाप होती गळा दाबायची.
(त्या पलंगावर बाई मेली होती हे तुम्हाला माहीत होते. ही गोष्ट अचेतन मनात फिड झालेली होती. रात्री जेव्हा खूप लघवीला लागते, तेव्हा मेंदू स्मृतीतील भितीदायक प्रंसंगावर आधारित स्वप्न पाडतो. माणूस भितीनं दचकून उठतो व बाथरूममध्ये पळतो.)
सर
सर
मी हा प्रश्न का विचरला त्याला कारण आहे.
माझ्या ओळखीचा एक पक्षी होता. त्याचे एका पक्षिणी वर प्रेम बसले. पण त्याचा तुरा एवढा आकर्षक नव्हता. पंख इतके पावरबाज नव्हते. त्या पक्षीणीने मग दुसऱ्याशी सूत जमवले आणि ती निघून घेली.
पक्ष्यांना का हृदय नसते? त्याला का भावना नसतात ? त्याला का मन नसते? तो पक्षी निराश होऊन परदेशी आसाम मध्ये परागंदा झाला आणि तेथच त्याने आत्महत्त्या केली. त्याचा अतृप्त आत्मा भटकत भटकत पुन्हा माझ्या अंगणात आला. तेव्हा मी बघितले तर त्याचे पाय उलटे होते.
आता बोला!
आपण दिलेल्या लिंक वाचल्या, आभार . मजा आली.मला जतिंगा बद्दल आधीच माहिती होती. पण कोराची लिंक नवीन होती
पुन्हा एकदा आभार.
म्हणजे वटवाघळे पण भुतंच
म्हणजे वटवाघळे पण भुतंच म्हणायची. उलटी लटकतात झाडांना.
परशुराम परांजपे
परशुराम परांजपे
मी एका वटवटवाघुळाला ह्याबद्दल विचारले असता त्याने मला उलटे सुनावले ," आम्ही सरळच बसतो पण झाड उलटे असते त्याला आम्ही काय करणार?" पहा श्रीमद् भगवद्गीता काय सांगते .
श्री भगवानुवाच
ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्।।
तुम्हाला वटवाघळांची भाषा येते
तुम्हाला वटवाघळांची भाषा येते तर? निळावंती वाचली होती की काय?
प्रभुदेसाई
प्रभुदेसाई
श्रीमद् भगवद्गीतेतील असा उल्लेख माहिती नव्हता.
धन्यवाद!!
सर परशुराम भाउ
सर परशुराम भाउ
सोचता था कि आप कितने मासूम थे
क्या से क्या हो गए देखते देखते
मैं कब मासूम था?
मैं कब मासूम था?
छान किस्से आहेत.
छान किस्से आहेत.
खुसखुशीत भूतकथा.
खुसखुशीत भूतकथा.
युट्यूबवर भूताचे किस्से सांगण्यासाठी काही चॅनल्स आहेत. तिथे हे किस्से सांगा.