नसलेल्या देशाचा नागरिक

Submitted by Theurbannomad on 9 March, 2020 - 01:19

जगातले काही देश मुळात जन्माला येतानाच आपल्याबरोबर दुभंगाचा शाप घेऊन आलेले असतात. मोठ्या प्राण्यांच्या झटापटीत ज्याप्रमाणे छोटी छोटी झाडं झुडपं पायाखाली तुडवली जातात त्याप्रमाणे हे देश जगातल्या बलाढ्य देशांच्या पायाखाली अनेक वेळा सापडत जातात. पॅलेस्टिन हा असाच एक अभागी देश या जगाच्या नकाशावर एक भूप्रदेश म्हणून दिसत असला, तरी मागच्या अनेक वर्षांपासून तिथले चार-साडेचार कोटी नागरिक आयुष्य मुठीत धरून जगात आलेले आहेत.

एका प्रोजेक्ट च्या संदर्भात काम करताना क्लायंटच्या ऑफिस मध्ये मला ओमार पहिल्यांदा भेटला. साधारण सहा फूट उंच, अरबी वळणाचं लांब नाक, भरघोस दाढी, धार्मिकतेची ओढ दर्शवणारी कपाळावरची छोटीशी खूण, अरबी लहेजाची भाषा आणि या सगळ्यांपेक्षा पटकन लक्ष वेधून घेणारी भेदक आणि प्रथमदर्शनी संशयी वाटणारी नजर, अशा वैशिष्ट्यांमुळे या माणसाने पहिल्याच भेटीत माझ्या मनावर आपली एक छाप सोडली. माझ्या बरोबरीच्या लोकांमध्ये कॅनडा, इजिप्त, भारत आणि ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या देशाचे लोक असल्यामुळे एका अर्थाने हे प्रोजेक्ट 'multi -cultural ' वातावरणात होणार, अशी चिन्ह दिसायला लागली.

मीटिंग नंतर site visit करायचा प्रस्ताव आला आणि आम्ही सगळे आपापल्या गाडीकडे निघालो. माझ्याकडे तेव्हा गाडी नसल्यामुळे कोणत्या गाडीत जागा मिळेल याचा शोध घ्यायला लागलो तोच ओमार स्वतःहून पुढे आला आणि स्वतःच्या गाडीत त्याने मला यायला सांगितलं. प्रवास जवळ जवळ तासाभराचा असणार होता, त्यामुळे त्याच्याबरोबर जमलं तर प्रोजेक्ट संदर्भात थोडं बोलून घ्यावं असा विचार मनात आला. नक्की या माणसाचा स्वभाव कसा असेल, याचा अंदाज बांधणं मला थोडं अवघड जात होतं. सुरुवात कुठून करावी, याची जुळवाजुळव मनात करत असताना त्यानेच पहिला प्रश्न केला.

'' you from India? '' " Yes, and you my friend ? " ३ वर्ष दुबई मध्ये राहून तिथल्या उत्तरांना आणि प्रतिप्रश्नांना मी आता सरावलो होतो। " I am from Balestine " अरबी उच्चरांमध्ये 'प' चा उच्चर 'ब' असा करतात, हे एव्हाना मला कळलं होतं, त्यामुळे त्याच्या देशाचा नाव समजायला मला वेळ लागला नाही. पॅलेस्टिनच्या एका तुकड्याचा - Gaza strip या नावाने जग ज्या भागाला ओळखता, त्या भागाचा हा रहिवासी.

त्या दिवसानंतर कामामुळे आम्ही अनेक वेळा भेटलो. प्रत्येक भेटीत ओमार प्रोजेक्ट च्या व्यतिरिक्त इतर गोष्टींवर बोलायला कचरत होतं, हे जाणवत होतं. किंबहुना इतर लोकांमध्ये तो फारसा मिसळतही नव्हता. त्याच्या आजूबाजूला त्याने एक अदृश्य भिंत तयार केली होती , ज्याच्या आत यायला कोणालाही परवानगी नव्हती. इजिप्तच्या लोकांशी तर तो इतका कमी बोलायचं, की कुठेतरी त्याच्या मनात त्या देशाबद्दल काहीतरी अढी असावी अशी दाट शंका यावी. नमाज ची वेळ झाली की महत्वाच्या कामात असूनही तो चटकन उठून नमाज पढून परत यायचा. हातातली जपमाळ कधीही कुठेही ठेवायचा नाही आणि तशी गरज पडली तर आपल्या मनगटाला ती गुंडाळून ठेवायचा. शुक्रवारी त्याचा फोन दिवसभर बंद असायचा आणि त्यावर प्रश्न विचारलेला त्याला आवडायचा नाही. आजूबाजूचे अनेक अरब दिवसभर अखंड धूम्रपान करत असूनही हा कधी मला तसं काही करताना दिसला नाही. या कारणांमुळे असेल कदाचित, पण बाकी कोणापेक्षाही मला याच्याबद्दल जरा जास्त कुतूहल वाटायला लागला आणि मग जमेल तसं त्याच्याबरोबर मी वेगवेगळी निमित्त काढून बोलायचा प्रयत्न करायला लागलो.

एके दिवशी उशिरापर्यंत काम करायला ऑफिस मध्येच थांबावं लागलं आणि कर्मधर्मसंयोगाने त्या कामासाठी ओमार व्यतिरिक्त कोणाचीही मदत होऊ शकणार नसल्यामुळे तो एकटा माझ्या बरोबर थांबला होता. ऑफिसच्या सिनियर लोकांनी हळू हळू वेळ मिळेल तसा काढता पाय घेतला आणि शेवटी आम्ही दोघे काम उरकायच्या तयारीला लागलो. साधारण साडेआठ वाजलेले असल्यामुळे आम्ही एकत्र जेवायला जायचा निर्णय घेतला आणि जवळच्याच एका अरबी रेस्टॉरंट मध्ये आम्ही जायचा ठरवलं.

ओमार खूप बोलत नसल्यामुळे मी सुद्धा जेवढ्यास तेवढं बोलायचा विचार केला होता. जेवण मागवताना मी शाकाहारी असल्यामुळे त्याने स्वतःच अरबी भाषेत वेटरला त्या पद्धतीचे पदार्थ आणायला सांगितले आणि वर दोन्ही पदार्थांचे हात एकमेकांना लागू देऊ नये अशी तंबी सुद्धा दिली. माझ्यासाठी हा एक सुखद धक्का होता. एक वारंवार घुम्या आणि माणूसघाणा वाटू शकेल असा माणूस अचानक इतका चांगला कसा वागू शकतो याचा मला आश्चर्य वाटलं. त्याने बहुदा माझ्या चेहेऱ्यावरून माझ्या मनात चाललेल्या विचारांचा अंदाज बांधला असावा, कारण आपण होऊन त्याने बोलायला सुरुवात केली.

" मला माहीत आहे की तुम्ही सगळे माझ्याबद्दल असा विचार करत असाल, कि हा माणूस मुळात इतका आतल्या गाठीचा आणि सगळ्यांपासून लांब राहतोय, म्हणजे तो नक्कीच स्वतःच्या बाहेर कोणाचाही विशेष विचार करत नसणार....पण तसं नाहीये. मला माणसांची घृणा नाही तर भीती वाटते....आमचा आयुष्य तुम्ही कोणीही जगला नाहीये, म्हणून तुम्हाला सगळं सांगून काही उपयोग सुद्धा नाहीये....."

' सांग ना....मी तुला आग्रह नाही करणार, पण मी इतर कोणालाही काही सांगणार नाही इतकी खात्री मी तुला देऊ शकतो. तुझ्याबद्दल तू समजतोस तसे माझे विचार नाहीयेत....फक्त कुतूहल आहे कि हा माणूस माणसांमध्ये राहून हि एकटा का असतो! '

' काय सांगू तुला....आम्ही जे भोगलंय ते तुम्ही कधीही समजू नाही शकणार.... '

' समजू नाही शकलो तरी कमीत कमी प्रयत्न नक्कीच करू शकेन....बघ एकदा विश्वास ठेवून '

' ठीक आहे. एक विचारू? तुझी आई आणि बहीण एकाच दिवशी एकाच वेळी ते पण नमाजासाठी बाहेर पडले असताना बॉम्ब स्फोटात गेलेले तुला कळले तर तुझा काय होईल? तुझे वडील आपलं पारंपारिक दुकान आणि घर सोडून आधी जॉर्डेन आणि मग युक्रेन आणि शेवटी इराक मध्ये राहू लागले आणि इतका होऊनही तिथे त्यांना केवळ दोन वर्षात तिथे भर वस्तीत झालेल्या बॉम्बस्फोटात ते गेले तर अशा नशीबाला तू काय म्हणशील? त्यामुळे प्रयत्न करून सुद्धा तू नाही समजू शकणार माझी अवस्था! '

या गोष्टी ऐकून अंगावर काटा उभा राहिला. शांत वाटणाऱ्या आणि अंगाखांद्यावर हिरवळ मिरवणाऱ्या टेकडीतून अचानक उकळता लाव्हा धडधड करत आकाशात उडावा आणि त्यात ओलं सुकं सगळं बेचिराख व्हावा तसं काहीसं माझं झालं होतं. स्वतःच्या कुटुंबाची स्वतःच्या डोळ्यांसमोर धूळधाण उडत आहे आणि ती रोखण्यासाठी आपण असमर्थ आहोत ही भावना त्याच्या मनात सतत त्याला टोचत होती.

' ओमार, तुझ्या मनात जे आहे ते अनेक वर्ष कदाचित तू कोणाला सांगितलं नसशील.

आज इतका बोललायस तर जे आहे ते सगळं सांगून मोकळा कर...केव्हापर्यंत आतमध्ये कुढत जगणार आहेस? आणि का? एकटा राहतोस कि कोणी आहे घरी इथे? "

' एका इजिप्तच्या मुलीवर माझं मनापासून प्रेम होतं। बगदाद मध्ये दोघे एकत्र शिकत होतो, तेव्हाची गोष्ट आहे. माझ्या घरचा हे असं झाल्यामुळे माझ्या काकांनी मला शिकवलं आणि सांभाळलं. त्यांच्या उपकारांची जाणीव असल्यामुळे मी कधीही त्यांना शिक्षणाच्या बाबतीत तक्रार करायची वेळ येऊ दिली नाही . युनिव्हर्सिटीची सगळी वर्ष मी अव्वल क्रमांक कधीही सोडला नाही. शेवटी हातात डिग्री आल्यावर मी तिला पुढच्या आयुष्याबद्दल विचारलं. तिच्या घरच्या लोकांना पॅलेस्टिन सारख्या दरिद्री आणि कमनशिबी देशाचा माझ्यासारखा फाटका माणूस कुटुंबाचा भाग होणं कधी मान्य होणारंच नव्हतं. '

एखाद्या हिंदी चित्रपटात शोभेल असं त्याचं हे प्रेमप्रकरण , पण तरीही ते ऐकताना भेसूर वाटत होतं. त्या मुलीचा पुढे काय झालं, असं विचारावासा वाटत असून सुद्धा धीर होत नव्हतं, पण आज ओमार त्याच्या त्या आजूबाजूच्या भिंतीच्या आत डोकावायला मला स्वतःहून परवानगी देत होता. ने विचारताच त्याने पुढे ती कहाणी सांगितली.

' honor killings फक्त भिन्न जातीधर्मातच होतात असं नाहीये....तुला काय सांगू....त्या मुलीच्या घरच्यांनी तिला समजावलं, धमकावलं आणि शेवटी आम्ही दोघेही ऐकत नसल्याचा पाहून एके दिवशी त्यांनी तिला शेवटचा समजावायला इजिप्तच्या घरी बोलावलं. त्यानंतर ती परत आली नाही।चौकशी केल्यावर समजलं की एका अपघातात ती गेली....पण अचानक हा अपघात झाला, तिच्यासारखी अतिशय काळजी घेऊन गाडी चालवणारी मुलगी त्यात गेली आणि या सगळ्यांवर तिच्या घरचे इतके कोरडेपणाने बोलले, त्यातच मी समजायचं ते समजलो....'

शून्यात एकटक बघत ओमार बोलत होता। त्याच्या समोरचा जेवण कधीच थंड झाला होता. इतका सोसल्यामुळे कदाचित त्याचे अश्रू सुद्धा सुकून गेले असावेत, कारण माझ्या डोळ्यात पाणी येऊनही त्याचे डोळे कोरडेच होते. या मनुष्याने पदोनपदी आयुष्यात फक्त आणि फक्त सोसलंय, नियतीने या मनुष्याच्या आयुष्याची राखरांगोळी केलीय आणि इतका सगळं होऊन सुद्धा हा स्वतःच्या पायावर उभा आहे आणि मनात कोणतीही सूडभावना ना बाळगता जगापासून लांब जाऊन एकाकी आयुष्य जगतोय, हे सगळं माझ्या आता अंगावर यायला लागलं होतं.

' ओमार, मित्रा, आयुष्याची नवी सुरुवात कधीतरी करायची असते रे. जे झालं ते विसर असं नाही म्हणणार, पण ते भूतकाळात सोडून देऊन आयुष्य ' जगायला ' सुरु कर. माणसाला अंधाराची सवय झाली की प्रकाशात सुद्धा तो डोळे मिटून घ्यायला लागतो, तू तसं नको होऊ देऊस'

' आज अनेक वर्षांनी मी कोणाकडे हे सगळं बोललोय....माझी हे सगळं झाल्यामुळे पूर्ण खात्री पटलीय,की अल्लाने मला जन्माला घालतानाच अभागी म्हणून जन्माला घातलाय. माझ्याबरोबर कोणीही आला तरी त्याचं आयुष्य माझ्यामुळे बरबाद होईल मित्रा.... ज्या दिवशी माझ्या छोट्या गरजा आयुष्यभर पुरतील इतका पैसा मी कमावलेला असें त्या दिवशी मी सरळ सगळं सोडून मशिदीत अल्लाहच्या दरबारात लोकांची सेवा करत बसेन. '

स्वतःवर झालेल्या छोट्या छोट्या अन्यायांचा सूड उगवायला थेट बंदुका हातात घेऊन उच्छाद मांडणाऱ्या लोकांच्या बातम्या दररोज कुठून ना कुठून समजत असतात, परंतु इतका सगळं होऊन सुद्धा निरिच्छवादाकडे वळलेला हा माणूस अचानक मला मोठा वाटायला लागलं आणि स्वतःच्या खुजेपणाची जाणीव मला प्रकर्षाने व्हायला लागली.

जेवण झालं, मला आग्रह करून त्याने पैसे न द्यायची विनंती केली. आम्ही पुन्हा ऑफिसला आलो आणि काम संपवून आपापल्या घरी निघालो। मला तो स्वतःहून घरी सोडायला आला। मी निरोप घेऊन वळलो तोच अचानक मागून त्याचा आवाज आला। वळून पहिला, तर ओमार गाडीतून उतरून येताना दिसला.जवळ येऊन अचानक त्याने मला कडकडून मिठी मारली आणि अरबी भाषेत ' shukran ' म्हणून तो आला तसाच परत गेला. त्या दोन सेकंदात त्याच्या डोळ्यातून ओघळलेला एक अश्रू माझ्या खांद्यावर पडलेला मला जाणवला आणि मी स्तब्ध झालो.

त्यानंतर प्रोजेक्ट संपलं, आम्ही दोघेही आपापल्या कामात आणि आयुष्यात ' busy ' झालो आणि अनेक वर्ष गाठभेट झाली नाही। अनेक वर्षांनी एके दिवशी फिरताना अचानक मागून खणखणीत आवाजात स्वतःचं नाव ऐकलं आणि मी चमकून मागे पाहिलं। स्वतःच्या बायको आणि मुलीबरोबर मला चक्क ओमार येताना दिसला. घरच्यांची ओळख करून दिली आणि बायको-मुलीला समोरच्या दुकानात काहीतरी घ्यायला पाठवून मला म्हणाला,

' माझी बायको पॅलेस्टिनच्या निर्वासितांच्या छावणीतली माझ्यासारखीच अनाथ मुलगी आहे. तुला म्हणून सांगतो, नुसता मशिदीत अल्लाह ची खिदमत करण्यापेक्षा मी माझ्यासारख्या एका अभाग्याला चांगलं आयुष्य द्यायचा विचार केला. आणि अजून एक सांगू? ती मुलगी इजिप्तची आहे, आई-बाप असेच बॉम्बस्फोटात गेल्यामुळे अनाथ झालेली। आम्ही दोघांनी तिला दत्तक घेतलं....या दोघांमुळे आज मी सनाथ झालोय.....'

नक्की कोण कोणामुळे सनाथ झालं हा कदाचित वादाचा विषय असेलही, पण माझ्या डोळ्यासमोर एक बाप, एक आई आणि एक मुलगी मला दिसत होते, ज्यांचा नातं रक्ताच्या नात्यापेक्षा कित्येक पटींनी मोठ होतं. काही अनुभव कधी कधी निशब्द करतात, हेच खरं.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही छान लिहीता Happy

ओमरचे आयुष्य मार्गी लागले ह्याचा आनंद वाटला

निःशब्द..!
गाझा स्ट्रिप पुन्हा एकदा भडकली आहे. Sad

shukran