डॉ. अनिल अवचटांचं मला आवडलेलं पुस्तक - मोर

Submitted by वावे on 25 February, 2020 - 04:49

एखादं सुंदर चित्र पहावं, ते आवडावं, पण थोडं जवळ जाऊन, निरखून पाहताना अवचित त्यातलं वेगळंच काहीतरी सामोरं यावं आणि मग त्यामुळे त्या संपूर्ण चित्राचा अर्थच आपल्यापुरता बदलून जावा असं होतं आयुष्यात कधीकधी.

’ मोर’ या पुस्तकातले जवळजवळ सगळेच ललितलेख या सूत्रात बांधलेले आहेत असं मला वाटतं. अनिल अवचटांची ख्याती आहे ती विषयाच्या खोलात जाऊन, तो समजून घेऊन मग त्याबद्दल लिहिण्याची. पण या लेखनाचं स्वरूप तसं नाही. यात व्यक्तींच्या, नात्यांच्या, स्थळकाळांच्या, अवचित, निर्हेतुकपणे समोर आलेल्या बाजू आहेत.

सुरुवात होते ती मोराबद्दलच्या लेखाने. चित्रकार अनिल अवचटांचा हा अत्यंत आवडता पक्षी. झपाटल्यासारखी मोराची चित्रं काढता काढता ते त्याच्या प्रेमातच पडलेले होते. पण प्रत्यक्षातला, पिंजर्‍याबाहेरचा मोर त्यांनी कधी पाहिला नव्हता. एकदा अचानकच एक पाळीव मोर त्यांच्यासमोर आला. आधी अप्रूप वाटलं, त्याच्या लखलखीत, कमनीय सौंदर्याने डोळे दिपले. पण मग एकदा भारावलेपणाचा हा पहिला बहर ओसरल्यावर मात्र त्याच्या आवाजामुळे, आक्रमकपणामुळे तो त्यांना डोळ्यांसमोरही नको वाटू लागला.

एक लेख आहे परांडा किल्ल्याबद्दलचा. तोफा, बुरुज, भुयारं यांनी सज्ज असलेला परांडा किल्ला बघून आल्यानंतर अवचटांना समजलं की या किल्ल्याला म्हणे ’ रंडका किल्ला’ असं म्हणतात. कारण इथे कधीच कुठली लढाई झाली नाही. या तोफा, ही भुयारं ज्यासाठी बांधली गेली, ती लढाई कधी लढली गेलीच नाही. म्हणूनच किल्ला बर्‍यापैकी सुस्थितीत आहे. हे ऐकल्यावर अवचटांना सिंहगड आठवला. त्याचे पडके तटबुरुज आठवले. इतके दिवस त्यांना ते दीनवाणे वाटायचे, पण आता मात्र ते कृतार्थतेने उभे आहेत असं वाटू लागलं. हीदेखील एक नवी दृष्टीच!

बालमनाला अनेक गोष्टींचं, ठिकाणांचं, व्यक्तींचं आकर्षण, अप्रूप असतं. चालत्या एस्टीत सराईतपणे उभं राहून तिकिटं फाडणारा कंडक्टर आवडतो, पत्रं आणणारा पोस्टमन आवडतो, एखाद्या पडक्या वाड्याबद्दल एकाच वेळी भीतीही वाटते आणि आकर्षणही वाटतं. आपल्या प्रत्येकाच्या मनात अशा काही खास आठवणी असतात. मोठं होत असताना, कधी आपली दृष्टी बदलली म्हणून, तर कधी ती ठिकाणं बदलली म्हणून ही आकर्षणं नाहीशी होतात. अवचटांचंही तसंच झालं. ओतूरचं पोस्ट ऑफिस, तिथली मांडवी नदी, पूर्वीच्या काळी असणार्या पेट्रोमॅक्सच्या बत्त्या, त्यांच्या लहानपणी ’अंदमान’ असणार्या ओतूरमधून पुण्यामुंबईला केलेले एस्टीचे प्रवास या सगळ्याबद्दल मनात जपून ठेवलेली एक रम्य, कधी गूढ अशी भावना काही ना कारणाने विरत गेली आणि या गोष्टींचं नवंच रूप डोळ्यासमोर आलं. या सगळ्याकडे तटस्थपणे पाहताना त्यांनी फार छान प्रकारे सविस्तर लिहिलं आहे.

ही अशी प्रतिमाभंजनं, ही disillusionment स्वतःबद्दलही होते. आपण स्वतःला भले प्रामाणिक, सचोटीने वागणारे, मानवतावादी वगैरे समजत असलो, तरी कधीतरी कुठल्यातरी प्रसंगात आरशावरचा पातळ पडदा दूर होतो आणि आपलंच, आपल्याला अनोळखी असलेलं रूप दिसतं. अनिल अवचटांच्या लेखनात सतत दिसणारा प्रांजळपणा आणि मनाचा खुलेपणा अशा अनुभवांच्या वर्णनात दिसतो. किंबहुना, मुळात मनाचा खुलेपणा असेल तरच आरशावरचा तो पातळ पडदा दूर होतो. कधी उलटंही होतं. आपल्याला वाटतं तितके काही आपण बिघडलेले, बेशिस्त, आळशी नाही, असा सुखद साक्षात्कारही कधीतरी होतो.

असे हे बदललेले दृष्टीकोन डॉ. अवचट संवेदनशील मनाने अनुभवून प्रांजळपणे आपल्यासमोर ठेवतात. ही वृत्ती कुठेही छिद्रान्वेषी, निराशावादी वाटत नाही. उलट त्यातल्या प्रामाणिकपणामुळे वाचताना मोकळं मोकळं वाटत राहतं.

अनिल अवचटांची इतरही अनेक पुस्तकं आवडती असली, तरी या पुस्तकाच्या वेगळ्या धाटणीमुळे या पुस्तकाबद्दल लिहावंसं वाटलं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविनला अनुमोदन. खरंच वाचायला हवं. बाकी पक्ष्यांचे विभ्रम टिपणाऱ्या वावे ने ह्या पुस्तकाबद्दल लिहिणं अगदी दुग्धशर्करा योग आहे.

आवडले लिखाण.
त्यांच्या ह्या मोराबद्दलच्या लेखामुळे माझ्याही मनातल्या मोराच्या प्रतिमेचे भंजन झाले. फार वाईट वाटले होते तेव्हा. Proud

बाकी पक्ष्यांचे विभ्रम टिपणाऱ्या वावे ने ह्या पुस्तकाबद्दल लिहिणं अगदी दुग्धशर्करा योग आहे>> अगदी माझ्या मनातलं !!
वावे, लेख मस्त! छान सखोल पुस्तक परिचय
आता मी पण जमेल तेव्हा हे पुस्तक घेऊन वाचेन .. किंडल वर आहे का ? Wink

सर्वांंना धन्यवाद Happy
हर्पेन, शेतात येऊन धान्य खाणाऱ्या मोरांबद्दल वाचलं होतं तेव्हाच माझ्यासाठी हे प्रतिमाभंजन झालं होतं Wink

पक्ष्यांचे विभ्रम टिपणाऱ्या>> Proud पण मोराव्यतिरिक्त या पुस्तकाचा इतर कुठल्या पक्ष्यांशी संबंध नाही.
अंजली, किंडलवर आहे की नाही ते माहिती नाही. Happy

छान लिहिलेय.. पुस्तकाचा विषयही छान वाटतोय. अवचट यांचे काही वाचले नाही. मुळातच मी वाचनशत्रू आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने काही पुस्तक ओळखी होतील..

वावे, मस्त लिहिलं आहेस. पुस्तकाचा परिचय तर आवडलाच. पण लहानपणातली/ आधीची आपल्या मनात असलेली एखाद्या व्यक्तीची/ ठिकाणाची प्रतिमा आणि मग त्याचं चांगल्या किंवा वाईट अर्थाने होणारं प्रतिमाभंजन. हा भाग फारच आवडला आणि विचारात पाडून गेला.
कित्येकदा प्रतिमाभंजनाच्या भितीने किंवा खात्रीने जुने अनुभव घेऊच नये/ जुन्या ठिकाणी जाऊच नये असं वाटतं. पण ते घेतले की एक नवी आठवण बनुन जातात, आणि ते ही आवडतं.
एलकुंचवारांचा त्यांच्या लहानपणीच्या घरात ३०-४० वर्षांनी परत भेट देण्याचा मौनराग मधला लेख आठवला.
धन्यवाद Happy

सर्वांना मनापासून धन्यवाद _/\_
अमितव,
कित्येकदा प्रतिमाभंजनाच्या भितीने किंवा खात्रीने जुने अनुभव घेऊच नये/ जुन्या ठिकाणी जाऊच नये असं वाटतं. पण ते घेतले की एक नवी आठवण बनुन जातात, आणि ते ही आवडतं. >> खरंय.
एलकुंचवारांचं मौनराग मी वाचलं नाहीये, पण तू म्हणतोयस तो भाग मी बहुतेक 'वाचू आनंदे' या संग्रहात वाचलेला आहे. दुभत्याच्या कपाटाचा सुळसुळीत ओशट स्पर्श, कस्तुरी ठेवण्याची पेटी, ताप आलेला असताना जे पदार्थ खायची इच्छा व्हायची ते वहीत लिहून ठेवणं, ' आपल्याच घरचं पाहुणेपण संपायचा दिवस आला की येणारी उदासी' हे सगळं आहे का त्यात?

हे मला वाटतं त्याचं संग्रहातील दुसऱ्या लेखात आहे.
ते विदर्भात कुठल्या लग्नाच्या निमित्ताने गेले असता पारव्याच्या घरात जाऊन येतात तो प्रसंग मी म्हणत होतो. अगदी साधासा प्रसंग पण बारकावे टिपत आणि कुणालाही रीलेट होईल अशा शैलीत लिहिल्याने आपण अगदीच त्यात हरवून जातो. आणि मनाच्या कोपऱ्यात काही तुटलेपण जाणवत रहातं. असो, इथे फार विषयांतर नको.

वावे ,
पुस्तक परिचय मस्त. खूप सुंदर लिहिलं आहे. हे पुस्तक वाचल नाही अजून पण आता नक्की वाचीन.
"माझ्या लेखनाची गोष्ट" या अवचटांच्या पुस्तकात मोर पुस्तकावर लेख आहे बहुतेक. बाकी मोर वाचून अवचटांच्या "छंदाविषयी" पुस्तकातील पानभर काढलेलं मोराचं चित्र समोर उभं राहीलं .
कित्येकदा प्रतिमाभंजनाच्या भितीने किंवा खात्रीने जुने अनुभव घेऊच नये/ जुन्या ठिकाणी जाऊच नये असं वाटतं. पण ते घेतले की एक नवी आठवण बनुन जातात, आणि ते ही आवडतं.>>>>>सहमत

मस्त वावे! मलाही हे पुस्तक आवडलं होतं. हे पुस्तक वाचण्यापूर्वी मोराबद्दल ज्या रम्य कल्पना होत्या, त्या धुळीला मिळाल्या (अनिल अवचटांप्रमाणेच). मला एकंदरितच त्यांची शैली खूप आवडते. अगदी गप्पा माराव्यात तसं ते लिहितात. "असे हे बदललेले दृष्टीकोन डॉ. अवचट संवेदनशील मनाने अनुभवून प्रांजळपणे आपल्यासमोर ठेवतात" >> हे अगदी पटलं!

खूप छान लिहिलंय.

मोर वाचल्याचं आठवत नाहीये, वाचायला हवं. माझे आवडते लेखक. इथे वेगवेगळ्या लिखाणातून बरंच वाचायचं राहिलंय त्यांचं हे जाणवतं.

Pages