अनुभवालय

Submitted by कौस्तुभ_सृजन on 28 February, 2020 - 10:16

अरुणराव मागच्या वर्षीच सरकारी सेवेतून निवृत्त झाले होते. जवळपास ३० वर्षांची प्रदीर्घ सेवा केल्यानंतर अचानक मिळालेला प्रचंड मोकळा वेळ कसा घालवायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. परंतु लौकरच त्यांनी आपला मार्ग शोधला. रोज दुपारी चार वाजल्याच्या सुमारास टिळक रस्त्यापासून त्यांची सायंफेरी सुरु व्हायची आणि ती पार फर्ग्युसन विद्यालय रस्ता संपेपर्यंत चालू राहायची. तिथून मग नेहेमीची बस पकडून घरी परत यायचे. अश्याप्रकारे रोजचे सुमारे तीन ते चार तास किंवा काही जास्तीच सहज चालले जायचे.

तरुणाईच्या उत्साहाने फुलून गेलेल्या त्या रस्त्यांवरून चालताना त्यांना फार छान वाटायचे. शाळेतून परत येणारी मुले,त्यांची मस्ती, कॉलेज मधील तरुण तरुणींचे घोळके, त्यांच्या प्रफुल्लित चर्चा, हास्याची कारंजी हे सगळे बघताना ते देखील आपल्या जुन्या दिवसात जायचे आणि प्रफुल्लित होऊन जायचे.

गेले अनेक दिवस त्यांचा हा क्रम अव्याहत चालला होता. त्यादिवशी असेच ते संध्याकाळी निघाले होते. टिळक रस्त्यावरील एका बस थांब्याजवळ त्यांना एक तरुणी दिसली. कॉलेजमध्ये जाणारी, साधारण वीस ते एकवीस वर्षे वयाची. ती दिसायला सुंदर होतीच शिवाय तिची वेशभूषा देखील अत्यंत आकर्षक होती. गोरा रंग, त्याला साजेश्या रंगाचा पंजाबी कुर्ता सलवार, व्यवस्थित बनवलेली केशभूषा. एकूणच रस्त्यावरून जाणाऱ्या कोणाचीही नजर आकर्षून घेईल असे तिचे व्यक्तिमत्व होते. अरुणरावांनी देखील तिला बघितले, एक ते दोन क्षण त्यांची नजरानजर झाली. आजकालच्या मुली अतिशय नीटनेटक्या राहतात. त्यांना स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटतो. आपली मुलगी आज जर या वयाची असती तर ती देखील साधारणपणे अशीच दिसली असती असे विचार तेव्हढ्या वेळात त्यांच्या मनात तरळून गेले. ते स्वतःशीच हसले आणि पुढे निघाले.

त्यादिवशी कधी नव्हे ते त्यांनी आपला रस्ता बदलला. टिळक रस्त्यावरील एका गल्लीत ते सहज म्हणून शिरले. त्या गल्लीत कपड्यांची, खाण्याची आणि संगणकाची काही मोठी दुकाने होती. एव्हढ्यात त्यांचे लक्ष समोरील एका पाटीकडे गेले. एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक पाटी झळकत होती - "अनुभवालय". अश्या नावाची कोणतीही पाटी अथवा दुकान त्यांनी यापूर्वी कधीही बघितले नव्हते.

अत्यंत कुतूहलाने ते त्या पाटीच्या शोधात त्या इमारतीत शिरले. उद्वाहकातून दुसऱ्या मजल्यावर ते पोचले. उद्वाहकाचे दार उघडताच त्यांना समोर एक मोठे दुकान दिसले. दुकान पूर्णपणे वातानुकूलित होते. समोर पादत्राणांसाठी फडताळ होते. त्या फडताळामध्ये काही पादत्राणांच्या जोड्या दिसल्या. त्या फडताळाच्या बाजूला काचेचे दार होते. बिचकतच त्यांनी दार उघडले. आणि ते आत शिरले. आत शिरताच त्यांना दिसले कि ते एका मोठ्या खोलीत आहेत. त्या खोलीच्या एका कोपऱ्यात एक प्रशस्त टेबलं होते ज्याच्या पलीकडे एका खुर्चीवर एक अत्यंत हसतमुख आणि उमद्या व्यक्तिमत्वाचा एक तरुण बसला होता. त्याने स्मितहास्य करत अरुणरावांचे स्वागत केले आणि त्यांना आपल्या समोरील खुर्चीवर बसण्याची विनंती केली. अरुणरावांनी मग त्या तरुणाला त्या दुकानाची माहिती विचारली.

तो तरुण म्हणाला मी विक्रांत, मी अमेरिकेतील विश्वविद्यालयातून संगणक शास्त्राची पदव्युत्तर पदवी घेतली आणि मानसशास्त्रातील संगणकाचा उपयोग यावरील प्रबंध पूर्ण केला. अमेरिकेतील वास्तव्यात मी माणसाच्या मनातील भावना टिपणारी आणि त्यांचे अनुभव संगणकावर नोंदवून ठेवणारी एक संगणकीय प्रणाली विकसित केली. ह्या प्रणाली द्वारे कोणताही मनुष्य इतर कोणत्याही मनुष्याला आलेले अनुभव स्वतः अनुभवू शकतो. त्यासाठी मी एक विशिष्ठ दृक्श्राव्य प्रणाली देखील विकसित केली आहे. ज्या मनुष्याला काही अनुभव घ्यायचा असेल त्याने आमच्या संगणक प्रणालीतील उपलब्ध असणाऱ्या सूचीमधून आपल्याला हवा तो अनुभव निवडायचा आणि मग तो अनुभवायचा. आमच्याकडील अनुभवांच्या प्रकारामध्ये प्रथमच परदेशात जाण्याचा अनुभव, रोमांचक खेळांचे अनुभव असे अनेक प्रकार आहेत. आमची संगणक प्रणाली अश्या पद्धतीने बनवली आहे कि अनुभव घेणारा तो अनुभव प्रत्यक्ष जगतो. हे सगळं ऐकून अरुणराव अत्यंत चकित झाले.

त्यांनी बघितले कि बाजूच्या खोलीत काही छोटी दालने होती. प्रत्येक दालनामध्ये एक मोठ्या खुर्चीवर एक मनुष्य बसला होता, त्याच्या डोक्यावर हेल्मेट सारखे काहीतरी घातले होते. खुर्चीच्या हातावर काही हिरव्या, लाल, पिवळ्या रंगांच्या कळा होत्या. विक्रांतने त्यांना सांगितले कि हे सर्व लोक अनुभवालयाचे सभासद आहेत आणि नियमित वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी ते येथे येतात.

अरुणरावांनी दुसऱ्याच दिवशी त्या अनुभवलायची सदस्यता घेतली आणि आपला पहिला अनुभव अनुभवण्यासाठी ते सज्ज झाले. विक्रांतने त्यांना आतील दालनात नेले. त्यांना एका संगणकासमोर एका अत्याधुनिक हलत्या खुर्चीवर बसवण्यात आले. एक हेल्मेट सारखे दिसणारे यंत्र त्यांना डोक्यावर घालण्यात आले. अरुणरावांनी एक हिरवी कळ दाबली त्याबरोबर त्यांच्या डोळ्यांसमोर तिथे उपलब्ध असलेल्या अनुभवांची सूची प्रकट झाली. त्यांनी कधीही विमान प्रवास वा परदेश प्रवास केला नव्हता म्हणून त्यांनी परदेशगमनाची सूची निवडली. त्याबरोबर त्यांच्यासमोर शेकडो अनुभवांची उपसूची प्रकटली. आता त्यांनी एक अनुभव निवडला आणि हिरवी कळ पुन्हा दाबली. पुढच्या क्षणी त्यांना जाणवले कि ते अमेरिकेला जाणाऱ्या विमानात बसलेले आहेत आणि खरोखरच ते तो अनुभव जगू लागले. तो आंतरराष्ट्रीय विमानतळ, ते अवाढव्य विमान, त्यातील हवाई सुंदऱ्या, त्यांचे आदरातिथ्य, विमान उड्डाण करतांना पोटात येणारा गोळा, कानाला बसलेले दडे, विमानातील सहप्रवासी, सुरुवातीला हवाहवासा आणि नंतर मात्र कंटाळवाणा झालेला विमानप्रवास, विमानाचे उड्डाण आणि खाली उतरणे, विमान खाली उतरल्यानंतरचे सगळे सोपस्कार हे सगळे सगळे त्यांनी खरोखर अनुभवले. अरुणराव प्रचंड रोमांचित होऊन दालनाबाहेर आले. अनुभवालय खरेच काम करत होते. त्यानंतर मात्र अरुणरावांना अनुभवलायची चटकच लागली. अनेक दिवस ते नियमित अनुभवालयात जात होते आणि नवनवे अनुभव घेत होते.

एक दिवस ते नेहमीप्रमाणेच अनुभवालयात आले. त्या दिवशी मात्र त्यांनी एक वेगळीच सूची निवडली "पुरुषी नजर". त्यांनी उत्सुकतेने त्यातील मोट्ठी उपसूची उघडली आणि हिरवी कळ दाबली. पहिला अनुभव मुंबईतील एका नोकरदार महिलेचा होता. उपनगरीय रेल्वे प्रवास करताना आलेला एक अनुभव तिने नोंदवला होता. त्यापुढचा अनुभव एका मध्यमवयीन महिलेला पुण्यात पी एम टी मध्ये प्रवास करतं आलेला होता. अरुणरावांनी आज प्रथमच एका स्त्रीच्या बाजूकडून पुरुषी नजरेचा अनुभव घेतला होता. तो अनुभव स्वतः घेतल्यामुळे ते खूप अस्वस्थ झाले. आता त्यांनी पुढचा अनुभव निवडला आणि ते हा नवा अनुभव घ्यायला तयार झाले. ती साधारण वीस ते एकवीस वर्षांची तरुणी होती आणि कॉलेज आटोपून टिळक रस्त्यावरील एका बस थांब्यावर उभी होती. काही वेळ गेला आणि अचानक एक नजर, एका साठीच्या पुरुषाची नजर तिच्या अंगावरून फिरली, गिळगिळीत, ओंगळवाणी, किळसवाणी नजर. आपल्या वडिलांच्या वयाच्या माणसांचे असे अनुभव तिला याआधीही आले होते आणि हा देखील तोच अनुभव. त्यानंतर हसून तो माणूस तिथून चालला गेला परंतु त्याची ती नजर मात्र शरीरावर चिटकूनच होती.

अरुणरावांना प्रचंड धक्का बसला होता. कारण हो तेच बिलकुल तेच समोरच्या रस्त्यावरून तिच्याकडे बघत होते. त्यांचा असा अनुभव त्या तरुणीने नोंदवून ठेवला होता. आपल्याबद्दलचा अनुभव अश्या प्रकारे त्या मुलीच्या मनात अत्यंत चुकीच्या पद्धतीने नोंदवला गेल्यामुळे ते हतबुद्ध झाले आणि एक पुरुषी नजर एका स्त्रीच्या नजरेतून वाचून ते निशब्द झाले.

© या लेखातील शब्दांकन कॉपीराईट आहे (http://www.kaustubhsrujan.blogspot.com).

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आपली मुलगी आज जर या वयाची असती तर ती देखील साधारणपणे अशीच दिसली असती असे विचार तेव्हढ्या वेळात त्यांच्या मनात तरळून गेले. >> मनांत हे विचार असतांना नजर वाईट कशी असेल?
निदान मनातले विचार तरी दाखवू नका मग!