सरमिसळ एक भयंकारी रोमांच।भाग 2 थोडासा दिलासा...पण तात्पुरता

Submitted by मुक्ता.... on 11 February, 2020 - 12:50

"बोल......" वत्सलआत्या म्हणाल्या....
नवीनने काही सांगायचा आठवायचा प्रयत्न केला....पण त्याला विचित्र झटके येऊ लागले.....दातखिळी बसणार इतक्यात वत्सलने त्याला शांत केले, पूर्ण माया एकवटून हलवले, जागे केले.....पहिल्यांदाच त्याला काही वेगळं घडतंय हे जाणवलं....
वत्सलने नविनच्या डोक्यावर हळुवार हात फिरवला.नवीन खूप शांत आणि रिलॅक्स झाला. वत्सल त्याला म्हणाली," माय लेकरा आर जे काय बी हुतय त्ये लय वंगाळ हाय, आता मन एकजागी बशिव, समदं इचार काढून टाक आन म्या काय बोलत्ये त्ये ऐक, तुला थोडा तरास हुईल, लै तरास काडलास, आता आणि थोडा, पण समदी धूळ झटक आन मग बग कसा शांत हुशील"
बराच वेळ नविनच शरीर वाकडं होत राहिलं, दुखत होतं, त्याची सल वत्सल आत्याला जाणवत होती पण त्याला इलाज नव्हता. या खेपेला नवीन स्वतःला सावरू शकत होता. आणि तो किंबहुना आईची माया, प्रेम विश्वास जिंकला.
वत्सल खूप आनंदीत झाली. पण..वत्सल जाणून होती हा विजय तात्पुरता आहे. पण या क्षणाला पुरेसा आहे या प्रकरणाची थोडी माहिती काढायला....वत्सलने आपले काम सुरू ठेवले....तिने हात जोडले. महामृत्युंजय म्हणून नविनच्या डोक्यावर हात ठेवला.
नविनच्या डोक्यावर हात ठेवल्या ठेवल्या तो जोरात ओरडला, कळवळला, बोटांनी काही अक्षरं ,विचित्र लिपीतली अक्षरं हवेत गिरवून त्याचा हात शिथिल झाला.एक हिरवट झोत त्याच्या शरीरातून जबरदस्तीने बाहेर ढकलला गेला . आणि डोळे मिटून नवीन नकळत बोलू लागला.....
"........"
असं आहे सगळं माय....
वत्सल पूर्ण हादरली....
हमम! पाहूया लेकरा....
विशेष म्हणजे नविनला सरळ सरळ विचारलं तर यातलं काही आठवत नसे....पूर्ण गलितगात्र अवस्था होती त्याची वत्सल येण्याआधी..
नवीन सगळं विसरला, चिरनिद्रेतून जागृत व्हावं, खडबडून उठावं तसा तो उठला आणि वत्सलला म्हणाला
"माय भूक लागलीय, खूप वर्ष झाली ग तुझ्या हातची भाकर अन झुणका खाल्ला नाही. "

वत्सलची तंद्री भंगली. इतका वेळ नवीन च्या केसातून हात फिरवत पुन्हा आईच्या ममतेची प्रचिती देताना वत्सल जुन्या आठवणीत हरवून गेली. थोडी गडबडली, मग पाणी भरल्या डोळ्यांनी नवीनकडे पाहत म्हणाली,
"व्हय लेकरा, आत्ता आनते बग. गावाकडन निगताना भाकरीचं पिट घ्यायला इसरले न्हाय म्या!! आत्ता द्येते.
येक करशील? वाईज एक पाट तेवढा द्ये म्हनजे झालं,मला खाली बसायची सवय हाय. त्येवढं बग अन जरा बेसन बग कुट हाय त्ये.लसून सोल आन कांदा आन दिसत नाय कुटं"

नवीन पाट शोधत होता. माळ्यावर कैक दिवस धूळ खात पडलेला पाट काढताना त्याला बरीच कसरत करावी लागली. लागलीच एक चौरंग दिसला तोही त्याने काढला. इतके दिवस मुश्किलीने उठू शकणारा नवीन विचित्ररीत्या एनेर्जेंटिक दिसत होता. अर्थात वत्सलआत्याना खरी परिस्थिती पूर्ण माहीत नव्हती. फक्त काही विचित्र आहे एव्हढं जाणवत होतं. इकडे नवीन माळ्यावरून पाट काढत होता आणि तिथे स्वयंपाकघरात काही वेगळंच चाललं होतं. वत्सल बारीक निरीक्षण करत होती. जुने जाणते डोळे अनुभवसिद्ध होते. वर्षानुवर्षे जरी गावरान वातावरणात राहिल्या तरी त्यांचे ज्ञान समृद्ध होते. आत्ता समोर वावरणारा नवीन हा या घरात रोज वावरणारा नाही हे त्या समजून चुकल्या होत्या. आणि आकडी सदृश अवस्था झालेली देवकी रोज अशी नसते हे देखील त्या ओळखू शकल्या होत्या. त्यांच्या उपस्थितीने नक्कीच त्या घरात एका सकारात्मक व्यक्तीचा प्रवेश झाला होता.

"ह्ये माय, ह्ये, पाट अनलाय...." श्वास खालीवर करत किंचित बदललेल्या आवाजात नवीनची हाक ऐकली
वत्सल विजेच्या वेगाने मागे वळली."नवीन, लेकरा...."
आपला धीर ढळू न देता वत्सलने आवाजही न वाढवता एका विशिष्ट लयीत पूर्ण माया एकवटून नविनला पुकारले. कारण नविनने गावच्या भाषेत अशी हाक मारणे अपेक्षित नव्हतेच. त्याने शुद्ध भाषा बोलावी म्हणून वत्सलने सतत प्रयत्न केले होते.
नविन एक सेकंदात भानावर आला. "काय झालं माय?"
वत्सल हसत म्हणाली"अरर पोरा त्यो पाट पायावर पडल आन मला त्येल लवाय बसवशील म्हनुन हटकलं, समदी शेवा आज करवनार व्हय? म्या हितं लै दिस थांबले तर न्हाय चालायचं व्हय?"
नवीन खळाळून हसला. त्याची बसलेली गालफडे बघून वत्सलच्या पोटात कालवलं. पण ती ओट्याकडे वळली आणि म्हणाली" आता तू जरा बाजाराकड जा अन कांद आन अन गूळ बी घिऊन यी,समजलं?"
आलोच! म्हणून नवीन चालू लागला. दरवाजा उघडणार इतक्यात बेल वाजली, नविनने दार उघडले. एक मुलगी समोर होती. नवीन ने विचारले, काय हवंय?
ती मुलगी त्याच्या कडे पाहत म्हणाली बाहेर जाऊ नका. बाहेर सगळं बंद आहे. तुम्ही फुकट मराल....
काय? म्म्मम्म्मम माय...त्याने अस्फुट किंकाळी सोबत वत्सलला हाक दिली. वत्सल बाहेर आली "कोन हाय रं?"
नवीन थरथरत म्हणाला "ती मुलगी...." नविनने मुठी वळल्या.इतक्यात वत्सल आली, तिच्या स्पर्शाने नवीन सावरला.वत्सलने दरवाजाकडे पाहिले
वाऱ्याच्या वेगाने तिथून काही जाताना वत्सलला दिसले. तिने विचारले नाही काय ते पण नवीन च्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली "तू निर्धास्त जा पोरा काय बी होत नाय" आईच्या या शब्दांनी बळ मिळालेला नवीन पायात चप्पल घालून कैक महिन्यांनी बाहेर निघाला. त्याने बाहेर जाता क्षणी वत्सलने आपला मोर्चा देवकीकडे वळवला. कारण बेडरूम मध्ये वत्सलला काही हालचाल जाणवली. वत्सलला एक जाणवलं की जे काही आहे ते वत्सलला समोर सहन करत नाही. अथवा लपण्याचा प्रयत्न करते. म्हणून वत्सल बाहेर खोलीच्या बाहेर लपली. आणि कानोसा घेऊ लागली. आतमध्ये कुणीतरी चालत असल्याचे तिला समजले. पन्नाशीच्या आसपास असली तरीही कान खूप तीक्ष्ण होते. योगासनांच्या अभ्यासाने ती तेजस्वी होती. पावले स्त्रीची असावीत याचा तिने अंदाज बांधला. आणि एक नाही त्याहून जास्त व्यक्ती आहेत असेही तिला जाणवले.
एक पाच मिनीटे झाल्यानन्तर उचक्यांचा आवाज आल्याने वत्सलने त्या खोलीत प्रवेश करायचा ठरवला. अचानक प्रवेश केल्याने त्या ठिकाणी वावर असणारी व्यक्तिमत्व बावचळली. देवकी अर्धवट उठली होती. आणि हात लांब करून बोटांच्या काहीतरी हालचाली करत होती. त्या रोधाने वत्सलने भिंतीकडे पाहिले तिथे काही वेगळ्या पद्धतीची अक्षरे उमटत होती. वत्सलच्या उपस्थिती ने देवकीने ती प्रक्रिया अर्धवट थांबवली. आणि पुन्हा निपचित पडली.ती ग्लानीत उचक्या देत होती. या उचक्या साध्या नव्हत्या. सलायडिंग खिडकीची फट थोडी मोठी झाली आणि काहीतरी बाहेर पसार झाल्याचे वत्सलबाईंच्या लक्षात आले.त्या शांत राहिल्या. न घाबरता त्या देवकी जवळ गेल्या. त्यांनी देवकीच्या आज्ञा चक्राला स्पर्श केला. देवकी एकदम शांत झाली. झोपेतच काही सांगण्याचा प्रयत्न करू लागली." आई.....आई
....नवीन ,कांदे, ती ती बाई...नवीन ते कांदे घेऊ नको. पुढे जा...."
वत्सल हसली....पोरी उट आन जेऊन गे. रोज नाय वाढणार हो सासू......
प्रेमाने देवकीच्या डोक्यावर हात फिरवला. देवकी ग्लानीत हसली." मी भाईर हाय ये....सयंपाक घरात..."
त्यांनी असं म्हटलं आणि त्या स्वयंपाक घरात गेल्या.
इतक्यात बेल वाजली. वत्सलने दार उघडलं. बाहेर पुन्हा नवीन बुचकळ्यात पडलेला. एकदा आत वत्सलच्या पलीकडे पाहत होता. आणि एकदा लिफ्टकडे.
वत्सल काय ते समजली. "आर पोरा, माजी सून सुदिवर आली बर! आन त्ये कांदे हिकडं. आता म्या झुणका बनवती आन जेवाया घालती तुमा दोगांना!"मागे न पाहताच म्हणाली."तू सूनबाईजवळ बस"

माय ऐक ना....

वत्सल आत गेली. नवीन ने आणि देवकीने एकमेकांकडे पाहिले. नविनला काहीच आठवत नव्हतं इतके दिवस काय चाललंय....त्याला वाटलं खूप वर्षांनी देवकीच्या पुढे उभा आहे. आणि तिच्याशी बोलतोय...देवकी मात्र त्याच्या अवस्थेविषयी त्याच्या आजाराविषयी विसरू शकत नव्हती. पण वत्सलने दिलेल्या अनुभूतीनुसार ती काहीच बोलली नाही. तिनेही उत्साहाने नवीनची चौकशी केली. नवीन मात्र सतत देवकी कडे पाहत होता. आणि त्याला राहून राहून एकच प्रश्न पडला होता. जर ही देवकी इथे बसलीय तर मग मला त्या ट्रक पासून वाचवून आणि कांदे घेण्यापासून परावृत्त करणारी कोण? जर देवकी माझ्यानंतर खाली आली नंतर माझ्या बरोबर वर आली तर मग माझ्या आधी आत कशी आली? तिने माझ्या आईला वत्सल आत्याला का ओळखलं नाही? मी तिला फोटो दाखवले होते. आणि माय ती तरी तिला देवकी आवडली नव्हती म्हणून ती लग्नाला आली नाही आणि इथे आल्यावर देवकीला माय ने ओळखलं का नाही? तिला दार उघडणारी कोण होती?
असंख्य प्रश्न पडले होते....नविनला आणि देवकीलाही...तिला नविनने पाठवलेले फोटो वेगळे होते. प्रत्यक्षात वत्सल आत्या…वेगळ्याच आहेत. नविनने त्या कजाग असल्याचे सांगितले होते पण त्या तर नावाप्रमाणेच वात्सल्यमूर्ती आहेत आणि खूप तेजस्वी....
इतका वेळ दोघेही समोरासमोर असूनही विचारात हरवून गेले... त्यांना विचार करण्यासाठी आज ऊर्जा होती...नाहीतर इतके दिवस त्यांच्या आयुष्यावर कुणाचतरी अधिराज्य होतं.पण वत्सल च्या येण्याने दोघेही "माणसात" आले होते आणि पहिल्यांदा आपल्या बरोबर माणूसपणाच्या पलीकडे आपल्या लग्ना आधीपासून काही घडतंय याची देवकीला आणि नविनला जाणीव झाली होती. जागरूकता आलीO होती.
"या लेकरानो जेवून घ्या" त्या करुणामयीने हाक देताक्षणी
नवीन आणि देवकी भाकरी आणि झुणक्यावर तुटून पडले. वत्सल आत्या डोळे भरून दोघांना बघत होती.
दोघांचं जेवण सम्पल्यावर वत्सलने दोघांना गावच्या रातांब्याचे सरबत दिले आणि गुलाब पाण्याच्या पट्ट्या ठेवून नविनला झोपवले...देवकी मात्र वत्सलच्या आसपास घुटमळत होती. तिला बोलायचे होते.वत्सलला।नवीन च्या आजाराबद्दल सांगायचे होते.

नवीन शांत झोपला होता! त्याला डोळे भरून पाहिले दोघींच्या डोळ्यात एका वेळेला पाणी तरळले.
ये पोरी ये...बोल समदं आन मला नीट सांग सगळं...

पडत्या फळाची आज्ञा....
देवकी बोलू लागली...

गेले कित्येक दिवस तब्येत बरी नव्हती त्याची. मधेच नॉर्मल मधेच अचानक दातखिळी बसायची. डोक्यावरचे सिल्की केस काट्यासारखे कडक व्हायचे आणि हैरस्टायलिंग जेल लावल्याप्रमाणे राठ व्हायचे. सगळं शरीर ताठ व्हायचं फक्त वटारलेल्या डोळ्यातल्या नसा आणि भिरभिर फिरणारी तांबूस बुब्बुळे. गालफड आत जायचे. हाडाच्या काडामध्ये ही मूर्ती अत्यंत भयाण दिसत असे. डॉक्टर, वैद्य, तांत्रिक मांत्रिक,पूजा अर्चा, नवस सायास सगळं करून झालं पण आधी काही महिने आणि आता काही दिवस असं करत ही झटक्यांची संख्या वाढत होती.मी आता पूर्ण जेरीला आले होते आई...गेली दोन वर्षे असंच चाललंय....लग्नाला सहा वर्षे झाली....पहिली तीन वर्षे सुखाच्या दूलाईत गेली.खूप आनंदात होतो. लग्न झाल्याच्या पहिल्या वर्षी हे घर. नंतर नवीनच प्रमोशन.....मलाही माझ्या नोकरीत समाधान होतं. त्यात एकदा तुमचा फोन आला अदमासे तीन वर्षांपूर्वी आणि तिथून सगळं बदललं.
नवीन तुम्हाला भेटला की प्रत्येक भेटीनंतर वेगळा वागायला लागला. माझ्यावर हात उगारायचा प्रयत्न करायचा पण मला स्पर्श करू शकत नव्हता. गेली तीन वर्षे त्याच्या स्पर्शाला मी आसुसले आहे. काय केलंत, का केलंत? जाब विचारणार होते,म्हणून भेटलेही ती स्त्री वेगळीच होती.तुम्हाला बघितलं आणि धक्का बसला हो. मी जिला भेटले ती फार नकारात्मक होती.नऊवारी साडी आणि काळीज चिरणारी नजर...आणि त्यानंतर नविनला हे झटके सुरू झाले....आणि वाढत गेले.नंतर ती बाई अधून मधून आणि नविनला रोज झटके यायला लागल्यानंतर मधून मधून दिसायला लागली.मला इजा करू शकत नव्हती..

सवयीने आता रडायलाही येत नसे. पैसा जेव्हढा नविनने कमावला तेव्ढा आता खर्च झाला. प्रश्न होता पैसे आणायचे कुठून? ...

शिव शिव, चिंतातुर वत्सल पुटपुटली."पोरी,म्या आलेय न्हवं? मंग आता काळजी सोड आन घराकडं बग, पैंक कमाव्याकड बग,नविनला काय बी व्हत नाय....जा झोप आता....बाकी उद्या"

बरं म्हणून देवकी वळली इतक्यात....तिला एक कविता ऐकू आली....
छन छन छम
जागं आहे सारं रान...
किती वेचशील पाचोळा...
किती राहील प्रेमाचं गान....
विळखा मृत्यूचा वाटोळा....
छन छन छम

थेंब थेंब सरेल आयुष्य...
किती साचवशील अजून?
कधी न दिसेल भविष्य....
ठेव वेळ तू मोजून....
छन छन छम
काठी आपटत कुणीतरी घुंगराच्या तालावर म्हटलेल्या या ओळी ऐकल्या नऊवार साडी नेसलेल्या स्त्रीला पाहून देवकी पुन्हा दचकली, घाबरली...आई..

म्हटलं होतं ना माझा मुलगा आहे, तू डोकं घालू नकोस..पण नाही ऐकलं....पुन्हा देवकीने हाताच्या मुठी वळल्या.
वत्सल तिथूनच म्हणाली "पोरी, तिच्या डोळ्यात बग. घाबरू नग"
मन एकाग्र करून तिने त्या बाईच्या डोळ्यात बघितलं.
तसा हिरवट पिवळा प्रकाश पसरला आणि विव्हळत विव्हळत काही किचनच्या खिडकीच्या फटीतून बाहेर गेलं.
आणि वत्सलच्या पाठीमागे मांजर रडल्याचा आवाज आला
ईईईऊऊऊऊऊऊ..वत्सलने मागे वळण्याचा प्रयत्न केला त्या आधी तीला तीन वळसे घालून एक लालसर प्रकाश बाहेर गेला आणि जमिनीवर काही विचित्र अक्षरे उमटली.....

देवकी झोपायला गेली.....
वत्सलला पायाशी उष्णता जाणवली.....आणि ती अक्षरं...

काय असतील...आतापर्यंत स्थिर असलेली वत्सल पूर्ण पणे काळजीत पडली..

तिला जाणवलं की आपण पाहतोय त्यापेक्षाही हे विक्षिप्त आणि महन भयंकर आहे.

अनोळखी मुलगी,लाल प्रकाश, हिरवा प्रकाश...वत्सलला पाहून खिडकीच्या फटीतून सटकणारे काहीतरी...

पुन्हा घुंगरांचा आणि काठी अपटल्याचा आवाज
छन छन छम
जिंकलीस अस समजू नको....
प्रकाशाचा खेळ सुरूच राहील...
मोडकळीस येशील तू ही

वेटोळे आहेत नियतीला गुंडाळणारे....
कल्पनेच्या पलीकडले हे रंगीत वारे....
या मायाजालात अडकशील तू ही....
छन छन छम.....

वाराही करतो दगडाची माती....
किती कवळून धरशील नाती....
मिळतील मातीला सारे, पाहशील तू ही..
छन छन छम..

वत्सल उठली...आवाजाच्या दिशेने पाहिले रोखून तसा आवाज बंद होऊन माळ्याच्या दिशेने काही निघून गेले....या खेपेला हिरवा , लाल कोणताच प्रकाश नाही...

वत्सल ध्यान लावून बसली आणि .....आणि फ्लॅशबॅक.....

वत्सल आत्या घाबरल्या का? किती अनाकलनीय सगळं, आपला पोटचा नसला तरी नवीन त्यांना जिवापलीकडे प्रिय होता....

क्रमशः
फोटो: गुगलवरून
WhatsApp Image 2020-02-11 at 11.18.43 PM.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, मिळाला
धन्यवाद
चांगली चालली आहे कथा

Back to top