दुर्मिळ पक्ष्याच्या शोधात: जेर्डन्स कोर्सर. (पूर्वार्ध).
जवळपास एक शतक अज्ञातवासात राहिलेला जेर्डन्स कोर्सर (जेर्डनचा धाविक) हा अतिदुर्मिळ पक्षी १९८६ मध्ये श्री भारतभूषण नावाच्या तरुण पक्षीनिरीक्षकाने पुन्हा शोधून काढला. हा पक्षी नामशेष झाल्याचे मानले जात होते. तर ह्या जेर्डन्स कोर्सरचे जुने संदर्भ शोधता असे लक्षात आले की हा पक्षी थॉमस जेर्डन नावाच्या इंग्रज निसर्ग अभ्यासक तसेच शल्यविशारदाने १८४८ मध्ये सर्वप्रथम शोधून काढला. हा पक्षी निशाचर असून आंध्र प्रदेशातील भद्राचलम जवळ तसेच पेन्नर नदीच्या खोऱ्यात कडप्पा व अनंतपूरचा प्रदेश आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यात महाराष्ट्रातील सिरोंचाजवळ (जि. गडचिरोली) आढळतो.
थोर पक्षीतज्ज्ञ डॉ. सालीम अली (बीएनएचएस चे पक्षीशास्त्रज्ञ) तसेच इतर अनेक नामवंत पक्षी तज्ज्ञांनी दुर्मिळ जेर्डन्स कोर्सरचा पुन्हा शोध घ्यायचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने त्यांना यश आले नाही. डॉ. सालीम अली ह्यांच्या हयातीत श्री भारतभूषण (बीएनएचएस चे पक्षीसंशोधक) यांनी जेर्डन्स कोर्सर शोधून अली साहेबांच्या हाती ठेवला (मेलेला का होईना! इ.स. १९८६).
मध्य भारत आणि पूर्वीच्या बेरार (आताचा विदर्भ) प्रांतातील पक्ष्यांचा संग्रह करणारे इंग्रज अधिकारी डी’अब्रू यांनी सुद्धा जेर्डन्स कोर्सर बघितल्याचे लिहून ठेवले आहे (इ.स. १९२२ व १९२३). इंग्रजी पक्षीतज्ज्ञ श्री ब्लॅंफोर्ड यांनी सिरोंचाच्या पूर्वेला २४ किलोमीटर अंतरावर तीन जेर्डन्स कोर्सर पक्षी बघितल्याची फार जुनी नोंद आहे (इ.स. १८६७ व १९६९). श्री भारतभूषण यांच्या शोधानंतर जेर्डन्स कोर्सरचा अभ्यास मुख्यत्वे आंध्रातील कडप्पा येथे करण्यात आला. पण त्यात विशेष यश मिळाले नाही.
पुन्हा श्री पी. जेगनाथन (बीएनएचएस चे पक्षीसंशोधक) नावाच्या संशोधकाने जेर्डन्स कोर्सरचा अभ्यास करण्याचे काम हाती घेतले. या वेळेस या दुर्मिळ पक्षाचा आवाज, त्याच्या पायाचे ठसे (अर्थात फूटप्रिंट) आणि प्रत्यक्ष बघितल्याच्या नोंदी उपयोगात आणल्या गेल्या. त्याचा आवाज रेकॉर्ड करुन पुन्हा पुन्हा त्याच्या अधिवासात वाजवायचे तंत्र वापरले गेले. त्यामुळे जेर्डन्स कोर्सर श्रीलंकामल्लेश्वरा अभयारण्यात अस्तित्व टिकवून असल्याचे आढळून आले.
या अभ्यासादरम्यान सिरोंचाच्या पूर्वेला २४ किलोमीटर अंतरावर जेर्डन्स कोर्सर आढळल्याच्या नोंदीकडे दुर्लक्ष झाले (किंवा नक्षलवाद्यांमुळे दुर्लक्ष करण्यात आले). डॉ. अनिल पिंपळापुरे, श्री गोपाळ ठोसर, आशिष भोपळे व मी असा विचार केला की हे काम आपणच का करू नये? जेर्डन्स कोर्सर निशाचर, त्यातही अतिदुर्मिळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा आणि त्याच्या पूर्वेचा प्रदेश म्हणजे नक्षलवादी कारवायांनी ग्रस्त.
पूर्वतयारी करणे अत्यंत गरजेचे होते. वनविभागाकडून योग्य ती मदत मिळाली. श्री जेगनाथन यांच्याकडून जेर्डन्स कोर्सरच्या आवाजाची ध्वनिफीत मिळाली. तो आवाज ध्वनिमुद्रण स्टुडिओत नेऊन शंभर पटींनी मोठा करवून घेतला. त्याच्या दोन ध्वनिफिती तयार करवून घेतल्या. आशिष भोपळे जवळ पावरफुल सर्चलाईट होता. टिटवी, माळटिटवी आणि जेर्डन्स कोर्सर समोरासमोर असे असलेले कोलाज छायाचित्र डॉ. पिंपळापुरे यांनी तयार करून घेतले. साहित्याची जमवाजमव झाली. मनाची तयारी केली. नक्षवाद्यांसोबत गाठ पडली तर काय? या प्रश्नाचे उत्तर मात्र आमच्यापैकी कुणाजवळच नव्हते. जेर्डन्स कोर्सर शोधायचाच एवढेच आम्हाला ठाऊक होते. बाकी सब देखा जायेगा!
दिनांक ९ जून २००६ ला भल्यापहाटे मी, डॉ. अनिल पिंपळापुरे, ठोसर सर व आशिष भोपळे सिरोंचाला जायला निघालो. नागपूर, उमरेड ते भिवापूर, नागभीड, ब्रह्मपुरी, आरमोरी असा प्रवास करीत गडचिरोलीला पोहोचून चहापाणी घेतले. तेथून निघून चामोर्शी होत आयनापुर, सोमनपल्ली पार करीत कोनेसरी गाठले. कोनेसरी येथे वनविभागाचे श्री मेडपल्लीवार (वनक्षेत्र अधिकारी) भेटले. येथे सुंदर असा एक जंगलाचा तुकडा आहे. या जंगलात शेकरूची एकूण ७४ घरटी असल्याचे समजले. महाराष्ट्राचा राज्य प्राणी आणि शान असलेला शेकरू एक मोठी खार (जायंट स्क्विरल) असून सुंदर असते. शेकरू सोबतच मॉटल वूड आउल, पावश्या, स्वर्गीय नर्तक, टकाचोर, तुरेवाली आभोळी आधी कितीतरी प्रजातीचे पक्षी येथे विहरत होते. एक सुतार पक्षी कुठल्यातरी झाडाचा डिंक खाताना दिसला.
कोनेसरीपासून आष्टी, चपराळा अभयारण्यातून, आलापल्ली, मोसम, बामणी असा प्रवास करीत सायंकाळी सिरोंचा गाठले (नागपुर ते सिरोंचा अंतर ३८० किमी आहे). गडचिरोली ते सिरोंचा ह्या २१० किमीच्या प्रवासादरम्यान रस्त्यावर शुकशुकाट होता (महामार्ग असूनसुद्धा). एवढ्या लांबच्या प्रवासात केवळ एखाद दुसरे वाहन दिसले.
हा प्रवास करण्यापूर्वी काही सूचना आम्हाला देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रवासादरम्यान कारच्या काचा उघड्या ठेवायच्या व कुठलेही संगीत वाजवत ठेवायचे ह्या महत्वाच्या सूचना होत्या. त्या आम्ही पाळल्या. नक्षलवाद्यांनी आमचे वाहन भूसुरुंगाने उडवू नये म्हणून असे करायला संगितले गेले होते. आणखी एक सूचना म्हणजे पोलिस अथवा कुठल्याही सैन्य/ सुरक्षा दलासारखे कमांडो सारखा पोशाख करू नये. ही सूचना पाळणे अत्यावश्यक होते. कुठल्याही गावात पोहोचताच आपल्या येण्याचा उद्देश सर्वांना स्पष्ट शब्दात जोरजोरात सांगणे. म्हणजे गावातील खबरी ती बातमी योग्य व्यक्तीजवळ पोचवतात. एवढ्या दुर्गम भागात आपल्या येण्याबद्दल ग्रामस्थांमध्ये (आणखीही इतरांच्या मनात) कुठलाही संभ्रम राहू नये हाच उद्देश.
सिरोंचाच्या वनविश्रामगृहात पोहोचताच तेथील उत्साही वनपरिक्षेत्र अधिकारी श्री शेख यांची भेट झाली. त्यांनी गावातील पक्षांचे जाणकार असलेल्या श्री सिनु, शफी व श्री शंकर गौराआ डोंगरी यांना बोलावून घेतले. आम्ही लगेच कामाला लागलो. जेर्डन्स कोर्सरचा कॉल (म्हणजे आवाज) त्यांना ऐकवला, छायाचित्रे दाखविली.
एक जाणकार म्हणाला,
‘साब ये पिट्ट्या (तेलुगू - पक्षी) श्याम को बाहर निकलता. मैने जिसको मार के खाया. लेकिन अभी मैने शिकार करना छोडा है’.
गेल्या गेल्या घबाड हाती लागल्याप्रमाणे आमची अवस्था झाली. सालीम अलींच्या पुस्तकातील चित्रे दाखवून ह्या परिसरात आढळणाऱ्या सामान्य पक्षांची स्थानिक (तेलुगू) भाषेतील नावे मी जमवायला सुरुवात केली. असे लक्षात आले की अनेक नावांवरून त्यांच्यात एकमत नव्हते. जेर्डन्स कोर्सरसाठी तीन नावे मुख्यतः पुढे आली. ती म्हणजे कामजुलू, गबीलम, तसेच आंखदोबेरा. टिटवीला ‘कंडलेडी पिट्ट्या’ व ‘सितवा’ ही नावे मिळाली (खरे तर ‘कंडलेडी पिट्ट्या’ अर्थात गळ्यात कंठ असलेला पक्षी हे नाव जेर्डन्स कोर्सरला शोभले असते). पण ‘फॉना ऑफ ब्रिटिश इंडिया’ या संदर्भ ग्रंथात जेर्डन्स कोर्सरसाठी दिलेले नाव ‘अदावा वूट्टू टीट्टी’ याचा अर्थ मात्र कुणीच सांगू शकले नाही (त्याचा अर्थ रिकामा रान बटवा असा होतो).
सायंकाळी वनअधिकारी, स्थानिक जाणकार व आमची चमू असे सर्व जण आम्ही सिरोंचा परिसरातील झुडुपी जंगलात सर्वेक्षण केले. सर्वांनी शांतता राखून मी जेर्डन्स कोर्सरच्या आवाजाची ध्वनिफीत वाजवीत असे. त्यानंतर तीन मिनिटेपर्यंत त्याला प्रतिसाद मिळतो का ते बघायचे. प्रतिसाद मिळाला नाही तर पुढे जायचे असे हे सर्वेक्षण असते.
जेर्डन्स कोर्सर हा पक्षी डोळ्यांनी नव्हे तर कानाने शोधायचा आहे हे पहिल्या दिवशीच लक्षात आले. रात्रीच्या अंधारात टिटवी, माळटिटवी रातवे (नाइटजार), घुबड, पिंगळा, करवानक (स्टोन कर्ल्यु), पावश्या आदी सामान्य पक्षांची ‘कानभेट’ झाली.
त्यात आम्ही वाजवीत होतो तो ‘क्वीक्कू’ ‘क्वीक्कू’ हा जेर्डन्स कोर्सरचा आवाज पूर्णतः वेगळा होता. एकदा ठोसर सरांना जेर्डन्स कोर्सरचा प्रतिसाद स्पष्टपणे ऐकू आला (सरांना श्रवणयंत्र असल्यामुळे सूक्ष्म आवाज सुद्धा ऐकू येतो). पण दुर्दैवाने हा प्रतिसाद परत ऐकायला मिळाला नाही. सर्चलाईटच्या प्रकाशझोतात दूरवर जमिनीवर काहीतरी पाचुप्रमाणे चमकताना दिसले. रातव्याचे डोळे असावेत म्हणून मी व आशिष हळूहळू पुढे सरकत गेलो. शेवटपर्यंत ती वस्तू हलली नाही. जवळ जाऊन बघतो तर एक भला मोठा कोळी (स्पायडर) जमिनीवर बसला होता.
गळ्यात कॅमेरा असून सुद्धा डोक्यात केवळ जेर्डन्स कोर्सरचा विचार चालू असल्यामुळे मी या कोळ्याचा फोटो घेतला नाही. आता मात्र तो टॅरॅंटूला होता असावा असे राहून राहून वाटते. रात्री दहा वाजता विश्रामगृहावर परतलो. जेवणाची तयारी करीत असताना आमच्या खोलीत पलंगाखाली एक साप वळवळताना दिसला. मी त्याचे फोटो काढले. ते बिनविषारी वुल्फ स्नेकचे पट्टेदार पिल्लू होते.
दिनांक १० जून २००६ ला पहाटे चार वाजता आम्ही जागे झालो. जेर्डन्स कोर्सर हा पक्षी सूर्यास्तानंतर तीन तास आणि आणि सूर्योदयापूर्वी जास्त क्रियाशील असतो. तो दिवसा विश्रांती घेतो. त्याच्या वेळेप्रमाणे आम्ही पहाटे पाच वाजता नंदिगाव जवळच्या झुडपी जंगल व माळरानाच्या प्रदेशात दाखल झालो. येथे जेर्डन्स कोर्सरचा आवाज वाजवीत आम्ही बरीच पायपीट केली. त्यानंतर आम्ही मारीगुडम आणि तिगलगुडमच्या परिसरात प्रतिसाद मिळतो का ते बघितले. या भागात घनदाट जंगल असल्यामुळे जेर्डन्स कोर्सर हा माळरानवरचा पक्षी मिळण्याची शक्यता कमी वाटली. परतीच्या प्रवासादरम्यान राजीवनगर व आर्डा गावाजवळच्या माळरानावर आम्ही कॉल वाजवून बघितला. अर्थात प्रतिसाद मिळाला नाही.
(पूर्वार्ध).
डॉ. राजू कसंबे,
मुंबई.
पूर्वप्रसिद्धी: दैनिक तरुण भारत, आसमंत पुरवणी. दिनांक: ५ जुलै २००९.
(दुर्मिळ जेर्डन्स कोर्सरचे कॅमेरा trap द्वारे टिपलेले छायाचित्र - @ डॉ. पी. जेगनाथन).
पुभाप्र
पुभाप्र
ग्रेट! वाचत आहे.
ग्रेट!
वाचत आहे.
डीडी गुजरात चानेलवर एक फिल्म
डीडी गुजरात चानेलवर एक फिल्म पाहिल्याची आठवतेय. त्यात कच्छ भागात असा पक्षी रस्त्याने पुढे जातोय आणि जीप मागे. गाईड सांगतो की "बहु चालाक छे ए पंछी ,तमने दूर ले जाय छे। तमे एना घोसला पासे जाओ तो एवी रीते करे छे।"
याचा रंग तिथल्या मातीसारखाच असतो।
------------
बाकी हे डीडी भारती/ इंडिया चानेलवालेही चालाक असतात. कधी कोणती फिल्म दाखवणार हे सांगत नाहीत. फक्त वाईल्ड गुजरात, इंडिया असे मोघम लिहितात.
---------------
तासगाव ( जिल्हा सांगली) गावाबाहेर पूर्वेस मणेराजुरी भागात उजाड पठारे आणि खुरटी बोरीची झुडपे होती. तिथे लहानपणी हुंदडताना( '६५) असा एक पक्षी पाहिला( संध्याकाळी ५ ते ६) आणि त्याच्या मागे गेलो. तो उडाला नाही पण फक्त पुढेपुढे पळत राहिला. तर स्टोन कर्लू किंवा असे जमिनीवर अंडी घालणारे पक्षी असे करतात ना? पुढे पळताना हा वारंवार मागे पाहतो तुम्ही येताय ना मागे?
वाचतेय!
वाचतेय!
वाचतोय, पु. भा. प्र.
वाचतोय, पु. भा. प्र.
लेख आवडला.
लेख आवडला.
Srd तुमचे निरीक्षण छान आणी
Srd तुमचे निरीक्षण छान आणी अगदी बरोबर आहे. सर्वांना धन्यवाद!!
डॉ, त्याकाळी हा धावरा
डॉ, त्याकाळी हा धावरा महाराष्ट्रात होता? का त्या गणातला दुसरा कोणतातरी? टिटवीससुद्धा माणूस, कोल्हा यांना आरडाओरडा करून दुसरीकडे नेते.
Srd
Srd
इंग्रजांनी दिलेल्या नोंदींचा मी उल्लेख केला आहे. त्यांचे त्यावेळेसचे लिखाण अजूनही उपलब्ध आहे. हा पक्षी एका शतकानंतर दुर्मिळ होणार आहे ह्याची त्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे विश्वास ठेवायला हवा. धन्यवाद.
उत्कंठावर्धक शोधमोहिम!
उत्कंठावर्धक शोधमोहिम!