झाड
असतात झाडांना भावना
असतो त्यांनाही रागलोभ
लोभ मायेच्या स्पर्शाचा
सोस सुमधुर संगीताचा
असतात झाडेही लाजरी बुजरी
काही काटेरी स्वभावाची, बोचरी
काही स्वभावानेच विषारी, विखारी
तर काही रक्तबंबाळ करणारी
असतात झाडांनाही नातीगोती
असतात पाळेमुळे रुजलेली खोलवर
करीत हस्तांदोलन भूगर्भात
भुमिगत चुगल्यांची खलबत
कळवितात बातम्या आप्तांना जंगलाच्या
संकटाची चाहूल लागताच
धाडला जातो सांगावा
जंगलात होतो गवगवा
असतात शत्रू त्यांनाही
असते मित्रमंडळ त्यांचेही
पक्षी आणि फुलपाखरे
जन्मोजन्मीचे मित्र खरे
करतात मदत एकमेकांना
करतात देवाणघेवाण आपसात
गोड मधुरसाचे मानधन
न्यावे वाहून परागकण
देतात आसरा वनेचरांना
आहारही पानाफळांचा
करती परतफेड वनेचर
सुदूर करून बीजप्रसार
करतात झाडेही प्रवास लांबचा
बीजांनाही फुटतात पंख
कधी म्हातारीचा कापसी पॅराशुट
नारळाच्या गाभाऱ्यात दडून समुद्रीमार्ग
वृक्षवल्ली आम्हा आम्हा सोयरी वनचरे
सांगून गेले संत महंत
देऊया माया वृक्ष वेलींना
आपल्याला करतील उपकृत अनंत !!
डॉ. राजू कसंबे
छानेय! प्रचिसुद्धा मस्त..
छानेय! प्रचिसुद्धा मस्त..
छान.
छान.