रानडुकराची शिकार
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील गणेशपुर पारधी बेडा. दारव्हा तसं जुनं शहर. असं म्हणतात की येथील शेतात पूर्वी मोती पिकायचे. म्हणजे ज्वारीचे दाणे असे काही टपोरे असायचे की जणू काही मोतीच! म्हणून ह्या गावाच्या रेल्वे स्टेशनाला दारव्हा मोतीबाग असेच नाव आहे. गावाच्या उत्तरेला इंग्रजांच्या जमान्यातले ईवलेसे रेल्वे स्टेशन आहे. काल-परवापर्यंत ‘शकुंतला एक्स्प्रेस’नावाची आगगाडी कोळशावर ‘चालत’ असे. आताशा कुठे तिला डिझेल इंजिन मिळालेय. तिचे भाग्य फळफळले म्हणायचे.
तर सांगायचे असे की ह्या पिटुकल्या रेल्वे स्टेशन जवळून गणेशपुर कडे डांबरी रस्ता जातो. एक दोन मैलांवर शेख फरीद (पीर) बाबाची टेकडी पार केली की टेकडीच्या पैलकुशीत गणेशपूर पहुडलेले आहे. पारधी वस्ती आधी पडते आणि नंतर गणेशपूर खेडे. पारध्यांव्यतिरिक्त येथे येतात ते ‘देशी’ विकत घेणारे; तितर, बटेर, ससा असे रानटी पक्षी प्राण्यांच्या मांसाचे शौकीन खवय्ये, पोलिस, वा चुकून वनविभागाचे कर्मचारी आणि क्वचितच माझ्या सारखा एखादा पक्षीनिरीक्षक.
शेजारच्या शेंद्री, डोलारी, नेर आधी परिसरात काळवीटं, रानडुक्करं आणि रोह्याची संख्या चिक्कार वाढली आहे. वन विभागाने रानडुकरांना मारायची परवानगी दिली म्हणून नुकतेच पेपरात आले होते. यवतमाळ अमरावती, अकोला आणि वाशिम जिल्ह्यात तर ह्या वन्यप्राण्यांनी नुसता हैदोस घातला आहे. त्यामुळे शेतकरी पार गांगरून गेले आहेत.
विशेष करून गाजरे, रताळे, मुळा, आलू (बटाटे) असे जमिनीत कंद असणारे पीक शेतात असले तर रानडुकरे त्यांच्या सूळ्याने अक्षरशः शेत नांगरल्याप्रमाणे उकरून काढतात आणि काढायला आलेली पिकं हातातून जातात. शेत रातोरात उध्वस्त झालेले असते. शेताच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडून ठेवावा तर वन्यप्राणी सोडून भलतेच कुणी तरी माणूस बळी पडायला लागले. एकाच्या शेतात तर बिबट्याच करंट लागून मेला. वनविभागाने त्या शेतकर्याचे कुटुंब अंदर करून टाकले. आता त्या परिसरात बिबट आहे अशी पुसटशी कल्पना सुद्धा कुणाला नव्हती.
मग शेतकऱ्यांचे पाय आपसूकच पारधी वस्तीकडे वळायला लागले. समस्याही मिटते आणि वन्यप्राणी मारल्याचे खापर दारिद्री पारध्याच्या डोक्यावर फोडायला मोकळे. असेच एका शेतकर्याने गणेशपुर बेड्यावर शिकारीचे आमंत्रण पाठवले.
‘शेतातील उसात बक्कळ रानडुक्कर लपलेली आहेत. उद्या तुम्ही याच’.
दुसर्या दिवशी भल्या पहाटे बेडयावर धावपळ झाली. आठ-दहा तरुण ‘वाघरी’ (पारधी स्वतःला वाघरी म्हणतात) हातात जंबीये (भाले) घेऊन उजाडण्यापूर्वीच तिकडे रवाना झाले. सोबत रानडुकरांना पकडायचे फासे भाषेत ज्याला पारधी बोलीत ‘वाघोळ’ म्हणतात ते एका पोत्यात भरून घेतले होतेच. कलकल करीत सर्वजण शेतावर पोहोचले.
कास्तकाराच्या सालकरूने ऊस दाखविला. रानडुकरं उसाचे बेणे नेमके मुळाजवळ चावतात आणि त्यातील रस शोषून घेतात. त्यामुळे उभे बेणे कोसळते. रानडुकराचे उदरभरण म्हणजे पोटाला खाणे कमी आणि नुकसान जास्त असे असते. सर्व वाघरी कामाला लागले. वाघोळ नावाचे जे जाळे असते ते ऊस शेतीच्या एका बाजूला उभे करण्यात आले. वाघोळ म्हणजे फुटबॉलच्या गोलच्या जाळी प्रमाणे असते. पण त्यात शिकार पडताच ते कोसळते व बंद होते. कारण त्याला उभे ठेवायला साध्या काठ्या लावलेल्या असतात. दोन्ही टोके मात्र जमिनीला बऱ्यापैकी घट्ट रोवलेली असतात.
तीन-चार जण दुसऱ्या बाजूने हाकारा करू लागले. जोरजोरात ओरडल्याने उसाच्या शेतातील थंडाव्यात झोपलेली रानडुक्करं इतस्ततः उधळल्या गेली. पिल्ले चीss चीss आणि मोठी रानडुकरे कर्कश आवाज करीत धावत सुटली. नेमका सर्वात धिप्पाड नर वाघोळकडे धावला आणि ते त्याच्या अंगावर गुंडाळले गेले फास्यांच्या आजुबाजूला लपून बसलेल्या इतर तरुण पारध्यांनी हातात जंबिये घेऊन एकदम धावा बोलला. क्षणार्धात सहा-सात जंबिये रानडुकराच्या शरीरातून आरपार निघाले. असे तसे नव्हते ते जंबिये. लोखंडी गजाच्या टोकाला अगदी अरुंद व धारदार पाती वेल्डिंग करून घेतलेली होती. रान डुक्कर केकाटत होते. एवढे होऊन सुद्धा ते ताबडतोब मरत नव्हते. नंतर एका गड्याने कुर्हाडीच्या लोखंडाचा दणका त्याच्या नाकाडावर हाणला तेव्हा कुठे ते शांत झाले.
शिकार उचलून सर्वजण नाल्या कडे गेले. कुऱ्हाडीने रानडुकराची पटापट खांडोळी करण्यात आली. समान हिस्से (वाटे) पाडण्यात आले. ज्याने पहिला वार केला होता त्याने पहिला वाटा उचलला. बाकीच्यांनी पटापट उरलेले वाटे उचलले. नाल्यात मांस धुऊन घेतले. आणि सर्वजण एका रांगेत धुर्याने बेड्याकडे चालू लागले. तसे रानडुकराची शिकार करायला खास हिम्मत लागते.
पण पारधी मात्र केवळ जंबियाने किंवा कुर्हाडीने सुद्धा रानडुकराची शिकार करायला सरसावतात. कधी कधी तर ओरडून रानडुकराला स्वतःच्या अंगावर धावा करायला लावले जाते. तरुण शिकारी स्वतः मोठ्या झाडाच्या बुंध्यासमोर उभा राहून ओरडतो. चिडलेले रानडुक्कर त्याचे सुळे मांडीत खूपसायच्या तयारीने हल्ला करते. अगदी शेवटच्या क्षणाला शिकारी बाजूला हटतो आणि रानडुकराचे सुळे झाडाच्या बुंध्यात खुपसतात. रानडुक्कर सावरायच्या आत तरुण शिकारी आणि त्याचे झाडावरचे मित्र धारदार जंबिये त्याच्या शरीरातून आरपार करतात. ही शिकार साधते ते केवळ एका धाडशी प्रवृत्तीने आणि स्वतःच्या अंगातील चपळाईने.
अर्थात कधीतरी चपळाईची गफलत होते. रानडुक्कर वेगवान सिद्ध होते. एकांड्या नर रानडुकराने या द्वंद्वात त्या धाडशी पारध्याच्या दोन्ही मांड्या चांगल्याच फोडून काढल्याची उदाहरणे सुद्धा आहेत.
रानडुकराचे मांस शिजायला अत्यंत जरड (चिवट) असते आणि पचायला सुद्धा कठीण असते असे म्हणतात. पण पारध्यांना ते आवडते. कारण एका शिकारीत भरपूर वाटा मिळतो आणि पैसे पण मोजायला नको!
(टिप: स्थळे, नावे, कथानक काल्पनिक आहे).
पूर्वप्रसिद्धी: दैनिक जनमाध्यम. रविवार, दिनांक: २० फेब्रुवारी २००५.
डॉ. राजू कसंबे, मुंबई
छान लेख
छान लेख
बटाट्याच्या शेतीच रानडुकरे बरच नुकसान करत, त्याच्या अनेक गोष्टी लहानपणी ऐकल्या आहेत
"रानडुकराला पटकन मागे वळता येत नाही" हे बरेचदा ऐकलंय
बाप रे! हे काही माहीत नव्हते.
बाप रे! हे काही माहीत नव्हते.
छान
छान
छान. वेगळ्या विषयावरचे तुमचे
छान. वेगळ्या विषयावरचे तुमचे लेख आवडतात.
ऋतुराज. तुम्ही म्हणता ते खरे
ऋतुराज. तुम्ही म्हणता ते खरे आहे. रानडूकराला सहज वळता येत नाही. पण त्याला प्रचंड वेगाने धावता येते.
सुरगाणा भागात मी होतो तेव्हा
सुरगाणा भागात मी होतो तेव्हा रानडुकराच्या शिकारीची पद्धत समजली होती. ती अशी धारदार शस्त्रे घेऊन काही जण व मजबूत काठ्या घेऊन दोन तीन जण शिकार करतात. डुक्कर चिडून धावत आले की त्याचे टार्गेट असणाऱ्या माणसाने चपळाईने काठीचे एक टोक टेकवून बांबूच्या सहाय्याने उंच उडी मारतात तशी बाजूला उडी मारायची. हे अगदी सेकंदात करायचं. डुक्कर दमत आलं की बाकीच्या लोकांनी त्याच्यावर बाजूने वार करायचे. धावताना डुकराला पटकन दिशा बदलता येत नाही. ही शिकार खेळायला खूप चपळ आणि जिगरबाज लोकच जात.
अरुणकुमार शिंदे
अरुणकुमार शिंदे
अजूनही अशाच प्रकारे शिकारी केल्या जात असाव्यात. फार रोमांचक आणि धोकादायक खेळ आहे. जखमी झालेला माणूस जखमा सेप्टिक होऊन मरतो.
छान. वेगळ्या विषयावरचे तुमचे
छान. वेगळ्या विषयावरचे तुमचे लेख आवडतात. >>> +१
नॉन माबो मै. ना तुमच्या ब-याच लेखांची लिंक पाठवलीये अन अतिशय आवडल्याचे त्यांनी कळवले आहे.
हल्ली बहुतांश मोठ्या शिकारी
हल्ली बहुतांश मोठ्या शिकारी आमिष खाद्यात स्फोटक पेरुन केल्या जातात. ह्या पद्धतीत चुकून भलते प्राणी सुद्धा मारले जातात किंवा गंभीर जख्मी होतात. कितीही नियमबाह्य असले तरी मासे मारी जिलेटिन आणि जंगलातील शिकार ह्यासाठी अशीच काही स्फोटके दुर्दैवाने वापरली जातात. कद्दू कटेगा तो सबमे बटेगा ह्या न्यायाने अधिकारी वर्ग बरोबर मैनेज केला जातो त्यामुळे कारवाई टाळली जाते.
बंदुकीच्या दारू सारखी स्फोटकं
बंदुकीच्या दारू सारखी स्फोटकं चरबीत टाकून गावठी बॉम्ब तयार करतात. रानडुक्कर बटाटे उकरत असताना हे चावलं की स्फोटानं जबडा फुटून डुक्कर मरतं. यांत लहान मुलांच्या हाती हे बॉम्ब लागल्याने प्राण गेल्याचं वाचलंय. आदिवासी भागात मासेमारीसाठी डोहात जिलेटिनचा स्फोटक टाकताना तो हातातच फुटल्यानं हात, जीव गमवावा लागल्याची उदाहरणे आहेत. तसेच इलेक्ट्रिक खांबावरून वीजप्रवाह असलेली वायर डोहात टाकताना शॉक लागून माणूस मेल्याच्या घटना घडल्या आहेत. काही बहाद्दर तर डोहात एंडोसल्फान सारखं विषारी औषध दोन तीन बुचं डोहात टाकत, पाणी विषारी झालं की सर्व मासे तडफडून वर येत. असे त्यांचे मासेमारी करण्याचे डेंजरस फंडे होते.
छान लिहिलंय..
छान लिहिलंय..
कोकणात रानडुक्कराची शिकार हा
कोकणात रानडुक्कराची शिकार हा एक सोहोळा असतो/असायचा, आता कल्पना नाहि. मी दहावीची परिक्षा देउन गांवी गेलो होतो त्यावेळेचा हा अनुभव. रितसर देवीचा कौल घेउन मंडळी शिकारीला निघतात. दोन गट केले जातात; एक हाकारे(?), हे लोक ढोल, कुकारे घालुन रान उठवतात आणि दुसरे बंदुकधारी. हे २-३ जण जंगलाचा अभ्यास करुन स्ट्रटिजिक मोक्यावर दबा देउन बसतात. रानडुक्कर मारल्यावर त्याच्या ओझ्यावरुन (वजनावरुन) शिकारीचं मोजमाप केलं जातं. पुढचा कार्यक्रम सामुदायिक जेवणाचा असल्याने संपुर्ण वाडी त्या रात्री जेवणाला एकत्र येते. रानडुक्कर कमी ओझ्याचा असला तर जोडिला मटण्/चिकन घेतात. रानडुक्कराची इनर स्किन (पाठिवरची) खरपुस भाजुन एक डेलिकसी म्हणुन खाल्ली जाते...
छान लिहिलयं!
छान लिहिलयं!
राज , सहमत! लहानपणी एकदा कुणीतरी जवळच्या खेड्यातून अशा शिकारीचा वाटा पानात गुंडाळून पाठवल्याचे आठवते. बाबा आणि आमच्याकडे काम करणार्या आजींचा मुलगा अशी वेगळी पंगत बसली होती.
आमच्या गावी रानडुकराची शिकार
आमच्या गावी रानडुकराची शिकार केली जात असायची. आता शिकार खूप कमी झाली तरी अजून संपलेली नाही. शेतात रानडुकरे खूप त्रास देतात. माझया घराच्या अंगणात लावलेली भाजी ससे खातात. हे ससे पकडायचे काम कधीमधी घरचे लोक करून मटण खायचा आनंद घेतात. रानातले प्राणी मारणे मला व्यक्तिशः आवडत नसले तरी उगवून आलेली बोट दोन बोटे भाजी नाहीशी झालेली बघितली की शिकार जस्तीफाईड वाटते.
या शिकारीवर कधी बंदी लागली
या शिकारीवर कधी बंदी लागली असेल ते असेल पण काल परवा पर्यंत आमच्याकडे ही शिकार व्हायची. आता जनाावरच नाही राहीली. एखादा डुक्कर उठला तर आता कौतूकाची बाब झालीय, शिकारीची नाही.
जुने दिवस आठवले. रान उठवलं की फाळ चांगला तापवायचा आणि त्यावर थुंकी लावायची. बोट चरचरलं की शिकार होणारच होणार.
एकदा रान उठवायला गावातला चांभार आला होता. फार मोठ्या गप्पा. वय असेल ५० च्या आसपास. रान उठवलं. सगळे धावतायेत. हा देखील धावतोय. तरवडात अडकून पडला. मागे डुक्कर. त्या डुकराने ते तरवडाचे झाड नाकावर घेतले आणि मुसंडी मारली. हा त्या झुडपाबरोबर आया या ओरडत घसरला. दगडावर वाईट आपटला. रात्री सगळे जेवायला बसले तेंव्हा हा कण्हत होता. धमाल होते ते दिवस.
रान डुकराच्या शिकार
रान डुकराच्या शिकार
बघण्याचा किंवा त्या मध्ये सहभागी होण्याचा
कधी प्रसंग आला नाही .
पण त्याचे मटन खालेल आहे.
पण दुसरा एक गमतीदार प्रसंग आठवतोय.
वटवाघूळ हा पक्षी वाता वर चांगला असतो अशी लोकांची समजूत आहे.
गावच्या चावडीत मोठ पिंपळाचे झाड आहे त्या वर चार पाचशे तरी वटवाघूळ असायची.
काही जण झऱ्या चे काडतूस (ठासणीचे)वापरून , त्यांची शिकार करायचे.
पण नंतर एक नवीनच आयडिया मिळाली .
त्याच झाडावर एक आग्या मोहाच मोठ पोळ होते .
ह्या मधमाश्या आकारणी मोठ्या आणि आक्रमक असतात.
त्या मध माश्यांच्या पोळ्यावर दगड मारायचं मग त्या माश्या उठाय च्या आणि वडवघळांच्या पाठी लागायच्या आणि त्यांनी दंश केला की वडवघुळ जमिनी वर पडायचे मग त्याला पकडायचे असा प्रकार चालायचं.
आणि हे रोजच होवू लागलं नेहमी माश्या खाली यायच्या नाहीत.
एक दिवस मुलांची दुपारची शाळा सुटली होती आणि कोण्ही तरी दगड मारला पण ह्या
वेळेस माशा खाली आल्या आणि लोकांवर हल्ला चढवला.
बऱ्याच मुलांना चावल्या.
अगदी घरा पर्यंत पाढलाग करून chavalya.
सर्व सुजले होते.
त्या नंतर तो प्रकार भीती नी बंद झाला.
आमच्या गावात पण डुकरं
आमच्या गावात पण डुकरं शेतकऱ्यांना खूप त्रास देतात. त्रास जास्तच वाढला कि शेतकरी मला बोलावतात. मग मी बाहुबलीसारखी रथात बसून त्यांची शिकार करतो. रथ गावकर्यांनी सजून ठेवलेला असतो.
माझ्या घराजवळ एक किलोमीटर
माझ्या घराजवळ एक किलोमीटर अंतरावर वडाऱ्यांची वस्ती ओढ्याकाठी आहे. गावातून डुक्कर पकडून आणतात नि शेकोटीत मस्त भाजतात ओढ्यात. तेव्हा त्यांचा उत्साह, त्यांच्या बायकांची लगबग पाहून खूप मजा वाटते. जाता येता हे दृश्य नेहमी दिसते. फक्त डुक्कर हे रानडुक्कर नसून घाणडुक्कर ( घाणीत हिंडणारं) असतं.
एखाद्या गावात डुकरं नसली की हे लोक तिकडं पिल्ले नेऊन सोडतात.
गावाला (कोकणात) रानडुक्कर
गावाला (कोकणात) रानडुक्कर खायचा योग आलाय. कारण पार्टीच होते डुक्कर मारल्यावर. सोबत रानससेही मारून खाल्ले आहेत. एकदा शिकारीला गेले असताना वाघोबांना बघायचा योग आलेला. जीपच्या टपावर बसलो असल्याने जाम टर्रकलेली.
राजेश१८८ वटवाघूळ हा पक्षी
राजेश१८८ वटवाघूळ हा पक्षी नाही.
बि च ह , वटवाघूळ पक्षी नसेल,
बि च ह , वटवाघूळ पक्षी नसेल, पण त्यांनी 'वडवघुळ' बद्दल लिहिलं आहे.
Submitted by बिपीन चन्द्र हर.
Submitted by बिपीन चन्द्र हर... on 5 February, 2020 - 13:34>>> लोल ! आता राजेश १८८ वटवाघूळ हा पक्षीच कसा हे सिद्ध करून दाखवतील बघा..
बिपिन चंद्र
बिपिन चंद्र
चूक दाखवून दिल्या बद्द्ल धन्यवाद.
वटवाघूळ हा पक्षी नसून एक सस्तन प्राणी आहे .
अजिंक्य राव
वटवाघूळ हा हवेत उडण्यास सक्षम आहे त्यामुळे खूप लोकांचा असा समज आहे की तो पक्षी आहे.
ज्याला पाठीचा कणा आहे आणि जो पिल्लांना जन्म देतो तो सस्तन प्राणी एवढा विचार करून मी न लिहल्या मुळे मी त्याचा उल्लेख पक्षी असा केला.
>>शेजारच्या शेंद्री, डोलारी,
>>शेजारच्या शेंद्री, डोलारी, नेर आधी परिसरात काळवीटं, रानडुक्करं आणि रोह्याची संख्या चिक्कार वाढली आहे.
रोहा म्हणजे काय?
मस्त लेख.
रोहा म्हणजे काय?>>> रोहा
रोहा म्हणजे काय?>>> रोहा म्हणजे नीलगाय. त्यांनी त्यांच्या दुसर्या लेखात उल्लेख केल्यामुळेच मला समजले.
रोही (मराठी) म्हणजे नीलगाय
रोही (मराठी) म्हणजे नीलगाय (हिंदी).
कोल्हाटी लोक असतात ते एकाजागी
कोल्हाटी लोक असतात ते एकाजागी राहात नाहीत. ते घाणडुकरे खातात. विशेषत: लग्नकार्यांत नराच्या गोट्या मिळवतात. डुकरास सोडून देतात.
ओके नीलगाय का. धन्यवाद.
ओके नीलगाय का. धन्यवाद.
जबरदस्त आहे लेख आणि प्रतिसाद
जबरदस्त आहे लेख आणि प्रतिसाद _/\__
खरंच वाघरी लोकं आहेत ही!
आऊटलँडरमधे स्कॉटीश गॅदरिंगच्यावेळी रानडुकराची शिकार करण्याचा प्रसंग दाखवला आहे.
बाहुबलीमधेदेखील होता हे बोकलतचा प्रतिसाद वाचून आठवले
> तर सांगायचे असे की ह्या पिटुकल्या रेल्वे स्टेशन जवळून गणेशनगर कडे डांबरी रस्ता जातो. > गणेशपूर
> एकाच्या शेतात तर बिबट्याच करंट लागून मेला. वनविभागाने त्या शेतकर्याचे कुटुंब अंदर करून टाकले. आता त्या परिसरात बिबट आहे अशी पुसटशी कल्पना सुद्धा कुणाला नव्हती. > का अंदर केले? तारेमधे वीजप्रवाह बेकायदेशीर आहे म्हणून? की बिबट्या मेला म्हणून?