फुलपाखरांचे मराठमोळे नामकरण
कुठलेही विज्ञान मातृभाषेतून शिकविले तर ते शिकायला आनंद मिळतो आणि ते शिकायला सोपे जाते. मग आपल्या आजूबाजूला विहरणार्या बागडणार्या पक्षी – फुलपाखरांना मातृभाषेत नावे नकोत का?
महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी च्या पुढाकाराने मी २०१६ मध्ये महाराष्ट्रात आढळणार्या ५७७ पक्ष्यांच्या नावांचे प्रमाणीकरण केले. त्यावेळेस महाराष्ट्रात आढळणार्या पक्ष्यांना अनेक मराठी नावे उपलब्ध होती. त्यामुळे पक्षिमित्रांचा गोंधळ उडू नये म्हणून नावांचे प्रमाणीकरण करण्याचे ठरले होते. पहिली यादी पुणे येथील पक्षिमित्र संमेलनात जानेवारी २०१५ प्रसारित करण्यात आली होती. त्यासाठी काही नियम घालून काम करण्यात आले आणि महाराष्ट्रात आढळणार्या ५७७ प्रजातीच्या पक्ष्यांना प्रमाण नावे सुचविण्यात आली होती. त्यावर प्रतिक्रिया मागवून अंतिम यादी दुसर्या वर्षी सावंतवाडी येथील संमेलनात जानेवारी २०१६ मध्ये प्रकाशित करण्यात आली.
ह्या कार्याला मिळालेला प्रतिसाद बघून २०१८ मध्ये डॉ. विलास बर्डेकर (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ) सरांच्या डोक्यात महाराष्ट्रात आढळणार्या फुलपाखरांना सुद्धा मराठीत नावे असायला हवीत अशी कल्पना आली. सरांनी स्वतः पुढाकार घेऊन मी, डॉ. जयंत वडतकर, दिवाकर ठोंबरे व हेमंत ओगले अशी चार जणांची समिती नेमली. त्यानंतर निमंत्रित सदस्य म्हणून श्री अभय उजागरे ह्यांचा समितीत समावेश करण्यात आला.
विशेष म्हणजे केरळ राज्यात आढळणार्य फुलपाखरांना मल्याळी भाषेत नावे आधीच उपलब्ध आहेत. प्रा. संजीव नलावडे लिखित “महाराष्ट्राची प्राणिसृष्टी” ह्या पुस्तकात तसेच मी लिहीलेल्या “महाराष्ट्रातील फुलपाखरे” ह्या पुस्तकात जवळपास ८० प्रजातीच्या फुलपाखरांची मराठी नावे दिलेली आहेत.
सुरुवातीच्या सभांमध्ये महाराष्ट्रात आढळणार्या फुलपाखरांची यादी तयार करण्यात आली तसेच नावे कशी असावीत ह्याची एक नियमावली तयार करण्यात आली. सोबतच फुलपाखरांच्या सहा कुळांचे सुद्धा नामकरण करण्याचे ठरले. नियमांमध्ये नावे कशी नकोत हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा होता. उदाहरण द्यायचे म्हणजे फुलपाखरांना इतर प्राण्यांची दिली जाऊ नये. जसे ‘स्ट्राइप्ड टायगर’ला पट्टेरी वाघ अथवा ‘कॉमन लेपर्ड’ला बिबळ्या! अन्यथा ‘ब्लु टायगर’ला निळा वाघ आणि ‘प्लेन टायगर’ला बिनपट्ट्याचा वाघ म्हणायची वेळ आली असती! अर्थातच हा नियम म्हणजे नामकरणाचे काम कठीण आणि आणखी रोचक करणारा ठरला.
इतर काही नियम असे होते: नामकरण करताना फुलपाखराचा रंग, रूप, आकार, उडण्याची तर्हा, वेग, अधिवास, वर्तणूक, खाण्याच्या सवाई, खाद्य वनस्पती काही खास गुणवैशिष्ट्य ह्याचा विचार केल्या जाईल. फुलपाखरांच्या इंग्रजी तसेच शास्त्रीय नावावर आधारित नावे चालतील (पण ‘ती कशी नसावित’ मध्ये ते मोडायला नको). नावे सुटसुटीत, छोटी, ‘कॅची’, सहज लक्षात राहणारी, पटकन ओळखता येतील अशी असायला हवीत.
बरीच मेहनत घेऊन पहिली सूची तयार झाली तेव्हा काही फुलपाखरांना आमच्यापैकी कुणीही साजेसी नावं सुचवू शकले नव्हते. ही नावांची सूची सर्वांसाठी खुली करण्यात आली आणि त्यावर सूचना मागविण्यात आल्या. अनेकांनी सुंदर नावे ‘लॉजिकल’ सुचविली. काही जणांनी घरच्या सदस्यांची तसेच स्वतःच्या मित्र-मैत्रिणींच्या नावांची यादी पाठविली! अर्थात नियमात बसणारी नावेच स्वीकारण्यात आली.
काही फुलपाखरांची नावे कशी ठरली त्याची रंजक उदाहरणे देत आहे. रंगावरून सर्वात जास्त नावे ठरविली गेली. सर्व ‘ग्रास यलो’ प्रकारच्या फुलपाखरांना ‘पिलाती’ असे तर सुंदर पिवळे आणि लाल ठिपके असलेल्या ‘कॉमन जेझेबेल’ला हळदीकुंकू असे नाव ठरले. पंखांच्या खालील बाजूस चंदेरी रेषा असलेल्या ‘सिल्वरलाइन’ला रूपरेखा असे नामाभिधान ठरले. पंख बंद केल्यानंतर वाळलेल्या पानाची नक्कल करणार्या ‘ब्लु ओकलीफ’ला शुष्कपर्ण नाव लगेच ठरले. वेगात उडताना पंखांवरील निळ्या रंगाने मोहित करणार्या विशाल ‘ब्लु मोरमॉन’ला निलवंत नाव ठरले! निलवंत महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे! काळ्या पांढर्या रंगाची छोटी निळी ‘पियरो’ फुलपाखरे ‘कवडा’ झाली.
(सुंदर पिवळे आणि लाल ठिपके असलेल्या ‘कॉमन जेझेबेल’ला हळदीकुंकू असे नाव ठरले)
‘स्विफ्ट’ प्रकारातील वेगात पण वेडेवाकडे उडणार्या फुलपाखरांना तडतडया हे नाव ठरविले गेले. बाणासारखे उडणार्या ‘डार्ट’ला शर तर फुलांवर हळुवारपणे भिरभिरणार्या ‘पॅंझी’ना भिरभिरी! तरंगल्या प्रमाणे उडणार्या ‘सेलर’ला तरंग!! शंकरपटातील बैलजोडीप्रमाणे सुसाट वेगाने उडणार्या ‘अलबॅट्रोस’च्या दोन प्रजातींना ढवळ्या आणि पवळया ही नावे ठरली!
पंख नेहेमी सपाट ठेऊन बसणार्या प्रतल तर लालबुंद डोळे लाभलेल्या ‘रेडआय’ला रक्तलोचन!
स्वतःच्या सौंदर्याने मोहित करणार्या पण गुणाने विषारी असलेल्या ‘रोझ’ ह्या फुलपाखरांना मदालसा हे साजेसे नाव ठरले.
खाद्य वनस्पतीवरून दिलेल्या नावांची काही उदाहरणे.
कृष्णकमळाच्या वेलीवर अंडी घळणार्या ‘टॉनी कॉस्टर’ चे नाव कृष्णकमलिनी ठरले. दुधी वनस्पतींपैकी रुईवर (मिल्कवीड) अंडी घालणार्या ‘टायगर’ प्रजातीच्या फुलपाखरांना रुईकर तर एरंडीच्या पानांवर अंडी घालणार्या ‘कॅस्टर’ फुलपाखरांना एरंडक असे नाव देण्यात आले. अशोकाच्या कोवळ्या पानांवर अंडी घालणार्या ‘टेल्ड जे’ला अशोकासक्त, लिंबूवर्गीय वनस्पतींवर अंडी घालणार्या ‘लाईम बटरफ्लाय’ला लिंबाळी, तर पेरुच्या झाडावर अंडी घालणार्या ‘ग्वावा ब्लु’ला निलामृद असे नाव देण्यात आले.
अनेक नावे सामान्य इंग्रजी नावांवरून भाषांतर घेण्यात आली. त्यामुळे सुद्धा आपल्याला ओळखण करायला सोपे जाते. उदा. ‘टॉनि राजा’ चे तपकिरी नरेश, ‘ब्लॅक राजा’चे कृष्ण नरेश, ‘कॉमन मॅप’चे नकाशक, ‘कॉमन टिंसेल’ चे तारका, ‘लाइनब्लु’चे निलरेखा, ‘मंकी पझल’चे वानरकुट, ‘पेंटेड कोर्टेसन’चे मेनका तर ‘मलबार ट्रीनिंफ’ चे तरुपरी! काही नावे तर इंग्रजी नावाच्या जवळचा मराठी शब्द पण चपखलपणे बसत असेल तर घेण्यात आले. जसे ‘यामफ्लाय’ ह्या सुंदर फुलपाखराला यामिनी!
आकारावरुन नाव ठरलेल्या फुलपाखरांमध्ये ‘क्वाकर’च्या पंखांच्या गोल आकारावरून ‘गोलू’ तसेच तलवारीप्रमाणे लांब शेपटी असलेल्या ‘स्पॉट स्वर्डटेल’ला तलवारपुच्छ!
काही नावे शास्त्रीय इंग्रजी नावांवरून सुद्धा घेण्यात आली. जसे ‘प्लेन्स क्युपीड’चे ‘चिलादेस पांडवा’ ह्या शास्त्रीय नावावरून पांडव! ‘लिफ ब्लु’चे ‘अम्ब्लिपोडीया अनिता’ ह्या शास्त्रीय नावावरून अनिता! ‘मलबार रॅवन’चे पॅपीलिओ द्रविडारम ह्या शास्त्रीय नावावरून द्रविड!
सवईवरुन देण्यात आलेल्या नावांमध्ये ‘ईविनिंग ब्राऊन’ ह्या सायंकाळी क्रियाशील असणार्या फुलपाखरांना ‘सांजपरी’ असे सुंदर नाव देण्यात आले. कुजक्या फळांवर ताव मारून झिंगणार्या ‘बॅरोनेट’ला झिंगोरी! नशेत असल्याप्रमाणे झोकांड्या खात उडणार्या ‘साईक’ला मनमौजी नाव दिले गेले.
फुलपाखरांच्या सहा कुळांचे सुद्धा त्यांच्या वैशिष्ट्यावरुन नामकरण करण्यात आले ते असे: पॅपिलीनिडीचे पुच्छ कुळ (मागील पंखाला असलेली शेपटी), पायरीडीचे पितश्वेत कुळ (पांढरी व पिवळी), निंफालीडीचे कुंचलपाद कुळ (पायाला असलेला कुंचला), लायसेनीडीचे निल कुळ (वरील बाजू निळी), हेस्परिडीचे चपळ कुळ (वेगात उडणारी) आणि रायोडिनिडीचे मुग्धपंखी कुळ (पंख अर्धवट उघडे ठेवण्याची सवय).
फुलपाखरांना मराठी नावे ठरविताना समिती सदस्यच नव्हे तर इतर फुलपाखरू अभ्यासकांनी सुद्धा मोलाची मदत केली. नवनवीन नावे सुचविली. विशेषतः आयझक कीहीमकर, डॉ. कृष्णमेघ कुंटे, डॉ. मिलिंद भाकरे, डॉ. अमोल पटवर्धन, झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, नॅशनल बटरफ्लाय क्लब, डॉ. दत्ताप्रसाद सावंत, गार्गी गीध आणि इतर अनेकांनी मदत केली. त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!!
महाराष्ट्रात आढळणार्या २७७ प्रजातीच्या फुलपाखरांची “मराठमोळी नावे” आज सर्वांसाठी उपलब्ध आहेत.
पुणे येथे एका समारंभात महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने ही नावे श्री विकास खरगे ह्यांच्या हस्ते (भा.वि.से., प्रधान सचिव, वन विभाग, महाराष्ट्र) पुस्तकरूपाने प्रकाशित केली असून संपूर्ण पुस्तक मोफत डाउनलोड करण्यासाठी वन विभागाच्या वेबसाईट वर तसेच इतरत्र उपलब्ध आहे. ह्या पुस्तकात सर्व फुलपाखरांची मराठी नावे, इंग्रजी नावे, शास्त्रीय नावे, रंगीत छायाचित्रे, तसेच पंख विस्तार व मोजक्या खाद्य वनस्पतींची यादी दिलेली आहे. आता आपण ती नावे प्रत्यक्षात उपयोगात आणावीत ही विनंती!!
("फुलपाखरांची मराठमोळी नावे” पुस्तक मोफत उपलब्ध आहे)
पुस्तक डाउनलोड करण्यासाठी साठी लिंक:
https://www.researchgate.net/publication/338035381_Names_of_Butterflies_...
पुस्तक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे.
वाह! सुरेख लेख आहे. ही नावे
वाह! सुरेख लेख आहे. ही नावे कशी ठेवली याची मला उत्सुकता होतीच.
पक्षांच्या मराठी नावांची लिस्ट कुठे मिळेल? मला अनेकदा मराठी नाव शोधताना खुप अडचण येते.
पक्षांच्या मराठी नावांची
पक्षांच्या मराठी नावांची लिस्ट येथे आहे:
https://www.researchgate.net/publication/291945842_Standard_Marathi_name...
थँक्यू!
थँक्यू!
माझे मोठेच काम झाले या लिस्टमुळे.
दोन्ही उपक्रम मस्त. यादी बूक
दोन्ही उपक्रम मस्त. यादी बूक मार्क केली आहे.
एक शंका होती. ज्या पक्षांना
एक शंका होती. ज्या पक्षांना अगोदरच नाावे होती त्यांना नव्याने नाव का दिले गेले? म्हणजे पेंटेड स्टॉर्कसाठी चित्रबलाक हे नाव असताना 'रंगीत करकोचा' किंवा ओपन बिल्ड स्टॉर्कसाठी मुग्धबलाक हे नाव असताना 'उघड्या चोचीचा करकोचा' ही नावे का घेतली गेली?
छान
छान
एक शंका होती. ज्या पक्षांना
एक शंका होती. ज्या पक्षांना अगोदरच नाावे होती त्यांना नव्याने नाव का दिले गेले? म्हणजे पेंटेड स्टॉर्कसाठी चित्रबलाक हे नाव असताना 'रंगीत करकोचा' किंवा ओपन बिल्ड स्टॉर्कसाठी मुग्धबलाक हे नाव असताना 'उघड्या चोचीचा करकोचा' ही नावे का घेतली गेली?
हरिहर जी!
पक्ष्यांना मराठी खूपशी नावे आधीच उपलब्ध होती. जसे Stork ला बलाक, ढोक, करकोचा इत्यादी. आम्ही त्याचे प्रमाणीकरण केले. म्हणजे सर्वात जास्त सयुक्तिक आणि सोपे नाव स्वीकारून इतर नावे तयार केली.
उदा. Stork ला करकोचा (बलाक संस्कृत असल्यामुळे नाही घेतला/ ढोक केवळ काही भागात वापरल्या जातो) स्वीकारल्यावर आपसूकच सोपी व लोजिकल इतर नावे ठरतात.
White Stork - पांढरा करकोचा
Black Stork - काळा करकोचा
Openbill Stork - उघड्या चोचीचा करकोचा
White-necked Stork पांढर्या मानेचा करकोचा इ.
धन्यवाद!
धन्यवाद!
धन्यवाद!
धन्यवाद ह्या लेखाकरता आणि
त्रिवार धन्यवाद
ह्या लेखाकरता
मराठमोळ्या नावांकरता
आणि पुस्तकांच्या दुव्याकरताही!
वा! हळदीकुंकू हे नाव अगदी
वा! हळदीकुंकू हे नाव अगदी समर्पक वाटतंय. त्याच्या पंखावर द्रौपदी प्रमाणे (पहा: बिगरी ते मॅट्रिक) कुंकवाचे पाच नसून सहा ठिपके आहेत, कदाचित सहावा कर्णाचा असावा
छान लेख आणि उपक्रम!
छान लेख आणि उपक्रम! पुस्तकांच्या दुव्यासाठी धन्यवाद!
उत्तम कामगिरी!!
उत्तम कामगिरी!!
उपयुक्त पुस्तक.
ती वेबसाईट GMBH म्हणजे जर्मनीची आहे का?
हेवा वाटावा असे काम आहे
हेवा वाटावा असे काम आहे
त्या पुस्तकाच्या लिंकवरून पुस्तक डाऊनलोड करून घेतले. ११७ एम्बी पीडीएफ म्हणजे अवघड दुखणं. पीडीएफ सोडून इतर कोणता फॉरमॅट आहे काय?
आपण सर्व लोकांनी हे किती
आपण सर्व लोकांनी हे किती भारी काम केलंय. अतिशय आवडलं. लिंक्स बघते.
****
पक्षी आणि फुलपाखरं दोन्ही लिंक्स उघडून पाहिल्या. नावांची नुसतीच जंत्री देण्यापेक्षा सोबत इतर माहिती, फोटो वगैरे देता आले तर उत्तम नाहीतर सामान्य लोकांना त्यात इंटरेस्ट वाटणार नाही. शिवाय ती साईट भयाण आहे. त्यात अक्षरशः शासकीय फॉरमॅटमध्ये (आणि शासकीय फाँटमध्ये) माहिती टाकलीये आणि आजूबाजूला हलत्या जाहिराती, इतर अनेक लिंक्स वगैरे आहेत.
हे नक्कीच सुधारता येईल. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील लोकांना, लहानमुलामुलींना इंटरेस्ट वाटेल अशी सुंदर, इंटरेस्टिंग साईट मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषांतून बनवायला हवी. फोटो, माहिती, प्रदेशानुसार सापडणारे प्राणी, पक्षी, फुलपाखरं, कीटक वगैरे. असा खजिना जर उपलब्ध करून दिला तर आपोआपच लहान गावाखेड्यातील लोकांकडूनही माहिती मिळत राहील. त्यांना सहजपणे तुमच्याशी संपर्क साधता येईल अशी सोयही त्या साईटवर करून द्यावी.
पुस्तक डाउनलोड केले.
पुस्तक डाउनलोड केले.
प्रत्येकास संदर्भ क्रमांक हवा.
छान लेख. नावे आवडली.
छान लेख. नावे आवडली. उपक्रमाला आणि तुम्हाला शुभेच्छा.
सुंदर लेख! असे काही उपक्रम
सुंदर लेख! असे काही उपक्रम असतात याची कित्येकांना कल्पना सुध्दा नसेल. तुमच्या पुढील उपक्रमासाठी खुप खुप शुभेच्छा.
खुप उपयुक्त माहिती इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
पुस्तक फार मस्त आहे.
पुस्तक फार मस्त आहे. लिंकसाठी धन्यवाद. हीच माहिती साईटवर शेअर करण्याच्या सुचनेचा विचार जरूर करावा.
छान लेख! फुलपाखरांची नावे
छान लेख! फुलपाखरांची नावे आवडली आणि त्या मागे तुम्हा सारख्या अनेकांचे योगदान आहे हे लेख वाचल्यावर कळले.
आपणांस पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा!
मामीफुलपाखरांच्या नावांचे
मामी
फुलपाखरांच्या नावांचे पुस्तक नुसती जंत्री नाही. त्यात खूप काही माहिती (छायाचित्रे, आकार, खाद्य वनस्पतीची माहिती) आहे.
((शिवाय ती साईट भयाण आहे. त्यात अक्षरशः शासकीय फॉरमॅटमध्ये (आणि शासकीय फाँटमध्ये) माहिती टाकलीये आणि आजूबाजूला हलत्या जाहिराती, इतर अनेक लिंक्स वगैरे आहेत.))
तुम्ही कुठली साईट बघितली ते कळत नाही.
((हे नक्कीच सुधारता येईल. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील लोकांना, लहानमुलामुलींना इंटरेस्ट वाटेल अशी सुंदर, इंटरेस्टिंग साईट मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषांतून बनवायला हवी. फोटो, माहिती, प्रदेशानुसार सापडणारे प्राणी, पक्षी, फुलपाखरं, कीटक वगैरे. असा खजिना जर उपलब्ध करून दिला तर आपोआपच लहान गावाखेड्यातील लोकांकडूनही माहिती मिळत राहील. त्यांना सहजपणे तुमच्याशी संपर्क साधता येईल अशी सोयही त्या साईटवर करून द्यावी.))
हे सगळे करायला तंत्रज्ञ माणसे, वेळ आणि पैसे लागतात. आमचा केवळ एक भाग होता. पैसे मिळवणे कठीण असते.
Filmy
Filmy
त्याच वेबसाईट वर केवळ मराठी नावांची हलकी PDF फाइल उपलब्ध आहे. ती वापरता येईल. धन्यवाद!
Android फोनसाठी मोठी पिडीएफ
Android फोनसाठी मोठी पिडीएफ ही चिंतेची गोष्ट नसते. ओटीजी केबल वापरून पेनड्राईवमध्ये ढकलता येते. गरज पडेल तेव्हा फोनात घ्यायची.
(( आईफोनला फाइल्स क्लाउडला अपलोड करणे आणि परत डाउनलोड करणे हा पर्याय असावा. रानात जाण्याअगोदरच हे करावे लागेल.
@ मामी, - ती भयाण माहिती
@ मामी, - ती भयाण माहिती असलेली साइट कोणती ती पाहायची आहे. त्यात जर फुलपाखरांची इतर बरीच माहिती असेल तर कामाची आहे.
Android फोनसाठी मोठी पिडीएफ
Android फोनसाठी मोठी पिडीएफ ही चिंतेची गोष्ट नसते. >> अडचण ती नाहीच. अडचण एवढी मोठी फाईल उघडायला, कंटेंट दिसायला, प्रोसेस व्हायला फार वेळ घेते आणि हे सगळे सेकंदात होईल असे कुठलेही अॅप नाही. ईबुक्स ऍप तर घाबरून गर्भगळीत होऊन बसतात. ड्राईव्ह किंवा इतर ऍप वर फाईल ओपन झाली तरी स्क्रोल स्क्रोल खेळत बसायचं मग जे पेज जेव्हा ओपन होईल तेव्हा होईल. पुन्हा मागे पुढे जायचं तर सगळच सपाट.
त्यामुळे टेक च्या म्हणा किंवा इतर पण पोकळ गमजा मारण्या आधी थोडा अब्यास असेल तर बरं असतं
पोकळ गमजा मारण्याचा हेतू
पोकळ गमजा मारण्याचा हेतू नव्हता हो Filmi . मीही नवखाच आहे.
ही पिडीएफ पुस्तके खरं म्हणजे आपली सोय करतात. हे संदर्भ ग्रंथ असतात. रानात दिसले फुलपाखरू की उघड पुस्तक आणि शोध असं नसून हळूहळू माहिती करून घेण्यासाठी आहेत.
तुम्ही म्हणता ते पटलं. मोठी पिडीएफ उघडायला आणि पटकन या पानावरून त्या पानावर जायला वेळ लागतो. आपण जेव्हा इतर कादंबरी वगैरे लेखनाची पिडीएफ वाचतो तेव्हा सावकाश जातो आणि पुढचे पान लोड झालेले असते. तसे हे पाहात गेले तर दिसते. पण भराभर पुढे मागे जाता येणार नाही.
सुरेख आहे पीडीएफ पुस्तक.
सुरेख आहे पीडीएफ पुस्तक. लॅपटॉपवरुन पाहत असल्याने काहीच प्रॉब्लेम आला नाही.
फोटो सुंदरच. नावे उगाचच जड, क्लिष्ट शब्द वापरुन केली नाहीत ते आवडले.
राजू सर हे कुठलं फुलपाखरू आहे
राजू सर हे कुठलं फुलपाखरू आहे?