तान्हाजी - Based on True story निरीक्षण

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 January, 2020 - 15:20

मला परीक्षण लिहिता येत नाही म्हणून मोजकी निरीक्षणे लिहितो.

1) पहिल्याच क्रमांकात अंजलीबद्दल लिहिण्याचा मोह आवरत नाही. येस्स, काजोल अगदी तशीच वाटली आहे. अजय देवगणसोबत कौटुंबिक रोमान्स करताना आत्ता बॅकग्राऊंडला "कभी खुशीss कभी गम.." वाजू लागेल असे वाटत राहते. कदाचित तिच्या दृश्यांचे चित्रिकरण करायला पाहुणा दिग्दर्शक म्हणून करण जोहारला बोलावले असावे. अर्थात ते बोअर झाले अश्यातला भाग नाही, पण आजवर भन्साली स्टाईल ऐतिहासिक रोमान्स बघितल्याने हा फरक चटकन लक्षात आला ईतकेच. बहुधा काजोल प्रत्यक्ष आयुष्यात देखील सौं देवगण असल्याने तिला चित्रपटात तानाजीची बायको दाखवली असावी जेणेकरून श्री देवगण यांना अभिनय करताना तो फील येईल. पण आपल्याला मात्र तो येत नाही.

२) लेडीज फर्स्ट नंतर आता सिंघमची बारी. चित्रपट थ्रीडी नसून फोर डी असणार याचा अंदाज ट्रेलर बघूनच आलेला. हा चौथा डी देवगणचा. तो आपल्या अपेक्षा पुर्ण करतो. सिंघमस्टाईल ॲक्शन आणि त्याचा तो आंखो आंखोसे अभिनय करणारा ईन्टेन्स लूक ! या भुमिकेत त्याच्या या दोन्ही कलागुणांना पुरेपूर वाव होता. देवगणने देखील ही संधी वाया जाऊ दिली नाही. त्याला पाहून आपण वॉव म्हणतोच.

३) पद्मावत चित्रपटात रणवीर सिंगने साकारलेला व्हिलन खिलजी भाव खाणारा होता पण शाहीदने सुखद धक्का देत तोडीस तोड टक्कर दिलेली. ईथेही अजय देवगण तानाजी झाला असताना सैफला भाव खायचा फार वाव असेल असे वाटले नव्हते. पण तो तोडीस तोडच्याही एक पाऊल पुढे गेला. मला या चित्रपटातले सर्वात जास्त आवडलेले कॅरेक्टर म्हणजे सैफने साकारलेला उदयभान. हिडीसफिडीस अंगावर येणारा अभिनय न करता तो पुरेशी क्रूरता दाखवतो. वेळप्रसंगी विनोद आणि मनोरंजनही करतो. चित्रपटात ईतर मनोरंजक मसाला फार नसल्याने याची खरेच गरज होती. शिट्ट्या आणि टाळ्या खेचायचे काम मर्द मराठा मावळ्यांकडे असले तरी पब्लिकच्या चेहरयावर हास्य छोटे नवाब सैफ अली खानच उमलवतात.

(विनोदावरून पडलेला एक प्रश्न - त्या काळात "चुतिया" हा शब्द होता का? त्यावरून चित्रपटात विनोद दाखवले आहेत)

४) कथा छोटी आहे. पण पटकथा फुलवता आली असती ते टाळले आहे. संकलन दृष्टीने म्हणाल तर ते छान आहे. पण खटकले ते शिवकालीन काळ म्हणावा तसा उभाच राहिला नाही. तो फिलच आला नाही. तेव्हाची जीवनपद्धती, संस्कृती काहीच कुठेच जाणवत नाही. तानाजीच्या वडिलांचा लढाईत हात कापला जाणे, त्यांनी मृत्युपूर्वी आपल्या हातातले कडे लहान तानाजीच्या हातात सरकावणे, पुढे मोठे होत त्याने प्रतिशोध घेत ते कर्ज फेडणे, असा ऐंशीच्या दशकातील वैयक्तिक फिल्मी अ‍ॅंगल दाखवण्यापेक्षा रयतेवरचे जुलूम खोलात दाखवून ती लढाई स्वराज्याशी आणखी जोडता आली असती. तसेच तान्हाजीचे कोंढाणा व्यतीरीक्त त्या आधीचे काही पराक्रम दाखवता आले असते. पण चित्रपटाचा पुर्ण फोकस कोंढाण्यावरच राहिला आहे.

५) जे दाखवले आहे त्यात सगळ्या फ्रेम्स सुंदर आणि भव्यदिव्य करायच्या नादात कृत्रिमता आली आहे. स्वित्झर्लंड वा गेला बाजार सिमला मनालीला जाऊन बागडणे आणि मुंबईतल्याच एखाद्या मॉलच्या स्नो वर्ल्डमध्ये जाऊन सेल्फी काढणे यातल्या आनंदात नैसर्गिक विरुद्ध कृत्रिम अनुषंगाने जो फरक जाणवतो तोच अखंड चित्रपट मला जाणवत राहीला. कदाचित मलाच जे दिसतेय ते गोड मानून घेता आले नसेल हा माझा रसग्रहणदोषही असावा.

६) संवाद ठिकठाक आहेत. मी ऐकलेले की लोकं टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात. कुठे ते याची कल्पना नाही. आमच्या शो ला काही जणांनी ओढून ताणून तो प्रयत्न केला पण मग नंतर शांतच राहिले. एखादा मुळातच हौशी ग्रूप असेल तर ते त्यांचे क्रेडीट, मात्र चित्रपट बघताना आपण कुठे उत्स्फुर्तपणे एखादी आरोळी ठोकावी असे मला तरी वाटले नाही. कुठे अंगावर शहारा आला वा डोळे पाणावलेत असेही विशेष झाले नाही.

७) थ्रीडीने मात्र मजा आणली. दोनचार तीरकमान भाले वगैरे घुसले अगदी माझ्या छातीत. एकावेळी तर मी ईतके बेसावध असताना हे झाले की मी प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून डोळ्यावरचा गॉगलच काढून ऊलटा फेकून मारणार होतो. त्यामुळे हा चित्रपट बघावा तर थ्रीडीमध्येच. अन्यथा बघूच नका, पुर्ण पैसे वाचवा. मोबाईलवर बघणार असाल तर त्यातही मजा नाही. वेळही वाचवा. फार काही विशेष ईतिहासातही भर पाडणारा नाहीये. त्यापेक्षा चार पैसे खर्चून चित्रपटगृहातच एक थ्रीडी साहसपट म्हणूनच त्याचा लुफ्त घ्या.

८) गाणी सुपर ड्युपर हिट नसतील पण त्या त्या वेळेस स्फुरण चढवणारी आणि चित्रपटाचा मूड कायम ठेवणारी आहेत. व्यावसायिक चित्रपटाची डिमांड पुर्ण करायला तानाजीला नाचवलेय पण मुळातच अजय देवगणला नाचता येत नसल्याने तानाजी फार काही कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन नाचलाय असे झाले नाही. शंकरा रे शंकरा गाण्यात तर कोरेओग्राफीही मजेशीर होती. तानाजी मिशीला पीळ देत सलमानला शोभावी अशी स्टेप मारतो आणि सैफ अली खान त्याला आनंदाने कॉपी करतो. पण सगळ्यात भारी होते ते पार्श्वसंगीत. चित्रपटाला तेच तारून नेते. चित्रपट संपल्यावरही जर काही डोक्यात घोळत राहते, म्हणजे अगदी आता हे परीक्षण, ऊप्स निरीक्षण लिहितानाही माझ्या डोक्यात वाजत आहे, तर ते.. राराराss राराह रार राss राह रारा रा रा राहss...

९) शिवाजी महाराज - शरद केळकर. छान छोटी भुमिका. संयत अभिनय. शोभून दिसला. आणि हे फार महत्वाचे होते. कारण महाराजांची आपल्या मनात जी प्रतिमा असते तिला पुर्ण न्याय आदर मानसन्मान मिळणे फार गरजेचे वाटते मला. आणि दुसरे म्हणजे महाराजच दमदारपणे उभे करणे जमले नसते तर तानाजीचीही शोभा गेली असती.

१०) दस बात की एक बात. चित्रपट तांत्रिक अंगाने उत्तम आहे. चित्रपटांचे चाहते असल्यास जरूर बघा. पैसा वसूल वाटेल. पण आज मी काही भारी बघितले ही फिलिंग मला तरी आली नाही. तसेच मला यात रिपीट वॅल्यु देखील दिसत नाहीये. सामान्य जनतेमध्ये मात्र या चित्रपटाला घेऊन उत्सुकता आणि क्रेझ दिसून येते. याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या मातीतल्या वीराची कहाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांच्या एका मावळ्याची कहाणी आहे. पडद्यावर जेव्हा महाराज येतात तेव्हा लोकं त्या दृश्याला कॅमेरयात कैद करून व्हॉटसपला स्टेटस ठेवत आहेत. यामागे निव्वळ फॅड नसावे, तर ते कुठूनतरी आतूनच येते. तो मोह मलाही आवरला नाही Happy

-------------------------------------------------

अवांतर निरीक्षणे

अ) पॉपकॉर्न खूपच महाग झालेत. न घ्यावेत तर बायको नाराज, घ्यावेत तर खिसा साधू महाराज.

ब) काही लोकांना थ्रीडी चित्रपट बघून झाल्यावर त्या चष्म्याचा मोह का सुटत नाही? घरी नेऊन तो काय डोरेमॉन बघायला वापरणार आहात? काय फायदा मग एखाद्या वीर पुरुषाचा चित्रपट बघून जर तुम्हाला पुढच्याच मिनिटाला क्षुल्लक स्वार्थ सोडता येत नसेल...

क) पिक्चर थ्रीडी आहे, स्पेशल ईफेक्टचा मारा आणि दमदार अ‍ॅक्शन आहे, एकंदरीत दणादण साऊंड असणार आहे.. याची कल्पना असतानाही लोकं तान्ह्या बाळांना का रडवायला पिक्चरला घेऊन येतात?

ड) लोकं शनिवारी सकाळच्या शो ला सुद्धा मोबाईल का सायलेंट ठेऊ शकत नाही? त्यांना श्री नरेंद्र मोदींचा कॉल येणे अपेक्षित असते का?

असो,

मी चित्रपट खरेच पाहिला आहे का? ईथपासून.....
चित्रपटाला खरेच मीच गेलेलो का? ईथपर्यंत.....
या अश्या शंका काही लोकांना वारंवार पडतात. तर फक्त त्यांच्यासाठी म्हणून एक आवर्जून फोटो काढला आहे तो खाली डकवतो, ईतरांनी न पाहता स्क्रॉल केले तरी हरकत नाही Happy
धन्यवाद,
ऋन्मेष

IMG_20200118_193832.jpg(तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हापासूनच या फोटोसाठी खास दाढी वाढवायला घेतलेली)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तानाजी मालुसरे शरीरयष्टीने धिप्पाड असावेत.
अजय देवगण किरकोळ वाटला शरीरयष्टीने.
त्याने वेट गेन करायला हवं होतं.
<<
अजय देवगण शरीरयष्टीने किरकोळ ? Uhoh
अजय देवगणचं फिजिक चांगलय कि , योध्दा म्हणून परफेक्ट शोभतो !
मला वाटलं होत कि पब्लिक उलट टिका करेल कि मराठे इतके उंच ब्रॉड शोल्डर शरीरयष्टीचे नव्हते वगैरे Happy

मराठा ( महाराष्ट्रात जन्मलेला) मावळा पाच साडेपाच फूट उंच असायचा, त्यामुळे अत्यंत चपळतेने डोंगर चढणे, उतरणं, घोडेस्वारी करणं यात प्रवीण असायचे. बैलगाडा शर्यती सारख्या साहसी खेळांवरुन हे लक्षात येईल. बाकी काही पैलवानांसारख्या वीरांनी शरीर कमावलेले असायचं. बहुतकरुन मावळे हे प्रमाणबद्ध शरीराचे काटक अंगकाठीचे होते.

ज्या लोकांना पानिपत आवडला त्यांना तानाजी ओव्हरहाईप आहे असे वाटते : अशी चर्चा काल आमच्या लंच टेबल वर रंगली होती आणि मजेमजेने का होईना ते ग्रुप मधल्या मेंबरांच्या नावानिशी सिद्ध पण झाले.

सूर्याजी मालुसरे झालेला देवदत्त नागे म्हणजे जय मल्हार serial चा नायक मात्र शोभला आहे रांगडा मर्द मावळा... त्याची मुलाखत कुठे बघितली तर तो खराखुरा शिवरायांचा पाईक आहे..रायगड जिल्यात जन्मलेला देवदत्तने कित्येक किल्ले बघितले आहेत नव्हे तर अंगात भिनवले आहेत.. एक योगायोग म्हणजे त्याचा जन्म त्याच तिथीला आणि 4 फेब्रुवारी ला पहाटे च झाला जेव्हा तानाजी मालुसरें नी देह ठेवला..

Dj, तु म्हाला सगळं किती सोपं , सरळ आहे; नाही?>> @ भरत. अहो तसं काही नाही पण कालचा प्रसंग जसा घडला तसा तो मी इथे सांगितला इतकंच. माबोच्या चर्चा लंचग्रुप मधे घुसवल्याने भन्नाट मजा येते आणि त्यावर तिथे आलेल्या प्रतिक्रिया/निरिक्षणे इथे नोंदवल्यावर त्या मजेला पारावार उरत नाही असा माझा अनुभव Proud

सूर्याजी मालुसरे झालेला देवदत्त नागे म्हणजे जय मल्हार serial चा नायक मात्र शोभला आहे रांगडा मर्द मावळा...
>>>>
+७८६
अजून फुटेज हवे होते त्या कॅरेक्टरला..

अजून फुटेज हवे होते त्या कॅरेक्टरला..>>खरच... सगळ्यांच्या भुमिका स्थापित व्ह्यायला थोडे सुरवातीला प्रसंग हवे होते..शिवाजी महाराज आणि तानाजी लहानपणापासून एकत्र होते..थोडे तरी आधी ची उजळणी हवी होती..डायरेक्ट शिवाजी महाराज दाखवले..आधी शिवबा ते शिवाजी महाराज असे 2 3 प्रसंग दाखवायला पहिजे होते..नॉन मराठी च कशाला लहान मूलाना पण समजायला मदत झाली असती.. मला स्वताला अजय देवगण आणि काजोल पेक्षा बाकी काही charactors जास्त खरी वाटली..कदाचीत ती माणस सगळी मराठी असल्यामूळे जास्त अपील झालीत.. ओम राऊत डायरेक्टर म्हणाले होते की हा चित्रपट मराठी मध्ये केला असता तर devdatt नागे ला तानाजी केला असता.. bdw शरद केळकरने खरच खूप संयत अभिनय केला आहे..त्याचा आवाज त्या भुमिकेला एक वजन देतो..तेच त्याने बाहुबली मध्ये सिद्ध केलय..त्याच्या आवाज शिवाय..नुसता आवाजच नाही तर अभिनया सकट dubbing केलेल..नाहितर प्रभास अपील नसता झाला..शरद ला अजुन चांगल्या भुमिका मिळायला हव्यात पुढे

तान्हाजीतील पॉलिटिक्सवरून जी चर्चा सुरू आहे त्याबद्दल असं वाटतं की मुळात या पद्धतीचं प्रेझेंटेशन हे भन्साळीने सुरू केलं. 'अपनी धरती अपना राज छत्रपती शिवाजी महाराज का एक ही सपना- हिंदू स्वराज ' ही घोषणा बाजीराव मध्ये होती. खिलजीच्या अमानवी व्यक्तिरेखेपासून तसा पॅटर्न त्याने पदमावत पासून सुरू केला. पण भन्साळीने हिंदूना rattle केलंय, ब्राम्हण, राजपूत याना उचकवलंय या समजुतीने रिबरल्स इतके प्रचंड म्हणजे तुडुंब खुश झाले होते की त्यांनी दोन्ही पिचचर हिट करून टाकले.
आता कुठे काय झालं हे त्यांच्या लक्षात येतंय Lol

काजोलचा कपडेपट आणि दागिने मराठमोळे वाटतात. भन्साली स्टाईल जर्दोसी, कुंदनचे दागिने नाहीत ते आवडलं+1111
नाहीतर बाजीराव मस्तानीमध्ये प्रियांका चोप्राला व्हेलवेट ब्लॉउज, डिझाइनर नऊवारी, कुंदन जुलरी हे सगळं बघून काय बोलावे तेच कळेना...

पानिपतची ट्रेलर बघून लोकांच्या काही अपेक्षाच नसाव्यात. पण कदाचित तितका वाईट नसावा त्यामुळे आवडला असावा.
याऊलट तान्हाजीची खूपच हवा होती. मी सुद्धा आज काहीतरी भन्नाट बघायला चाललोय. आज जय भवानी जय शिवाजीच्या आरोळ्यांनी थिएटर दणाणून उठणार. शिवरायांसमोर सारे नतमस्तक होणार. मावळ्यांचा पराक्रम पाहून बाहू स्फुरण पावणार अश्या आवेशात गेलेलो. प्रत्यक्षात वीएफएक्सचा पराक्रम बघणे नशिबी आले. त्यामुळे ओवरहाईप वाटला.

मला आठवततेय की फिर भी दिल है हिंदुस्तानी चित्रपट बंडल आहे पडला असे चित्र होते. काही अपेक्षाच नव्हत्या. तरीही अपना दिल है शाहरुखखानी म्हणून बघायला गेलेलो. चक्क आवडला.
तर तुम्ही काय अपेक्षेने जाता आणि काय पदरात पडते हे मॅटर करते

मी ज्या ठिकाणी तान्हाजी पाहिला तिथे अक्षरशः 'जय शिवाजी जय भवानी' च्या गर्जना होत होत्या त्यामुळे अंगावर रोमांच उभे रहात होते आणि बाहु फुर्फुरत होते.

असो.. तान्हाजी पहाणारे आणि पानिपत पहाणारे यांची तुलनात्मक संख्या पाहिली तर फरक समजेल अर्थात बॉक्स ऑफिस तर कधिही खोटे बोलणार नाहीच म्हणा.

आजचा आकडा -
तान्हाजी - २५० करोड च्या घरात - निर्मिती मुल्य १५० करोड (अजुनही हाउस फुल)
पानिपत - ४९ करोड - निर्मिती मुल्य १०० करोड (सर्व पडद्यांवरुन उतरला आहे - एकंदरीत इथेही पेशवाईचे पानिपत झाले आहे)

बॉक्स ऑफिस चित्रपटाचा दर्जा ठरवत नाही.>> नसेलही कदाचित पण संख्यात्मक विचार करता तान्हाजी बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचला आणि त्याची चर्चाही झाली होत आहे. मराठ्यांच्या इतिहासाची सर्वत्र चर्चा होत आहे आणि त्यावर काढलेल्या चित्रपटाने २५० करोड पेक्षाही मोठी घोडदौड सुरु ठेवली आहे हे आपल्यासाठी नक्कीच भुषणावह आहे.

बॉक्स ऑफिस चित्रपटाचा दर्जा ठरवत नाही.
>>> अगदी बरोबर ऋन्मेषदादा. कारण असे असते तर सलमान चे सगळेच चित्रपट उत्तम दर्जा म्हणावे लागले असते.

पानिपतात मराठी सैन्याचे अपरिमित नुकसान झाले त्यास कारणीभूत फक्त आणि फक्त पेशव्यांचे चुकीचे धोरण, ढिसाळ कारभार आणि अक्कलशून्य नेतृत्व. जिथं तिथं बाईलवेडापायी पेशव्यांनी बायका, आणि तीर्थाटनाच्या नावाखाली फुकटी, न लढणारी अनेक बाजारबुणगी सोबत नेली, आणि महाराष्ट्रावर संक्रांत आणली. आज जरी आपण त्या पराभवाचे अब्दाली परत आला नाही वगैरे म्हणत समर्थन करत असलो तरी, पराभव तो पराभवच. अजून एक मुद्दा म्हणजे पानिपत युद्धानंतर सदाशिवरावांचे प्रेत कधीच मिळाले नाही, पण त्यांचे तोतये मात्र महाराष्ट्रात येत राहिले याचे कारण काय असावे? याउलट महादजी शिंद्यांनी दिल्ली वर्षानुवर्षं मांडीखाली दाबून धरली होती. पेशवे पराक्रमी होते हे खरेच, पण म्हणून त्यांची पुचाट धोरणे कधीच समर्थनीय ठरू शकत नाही. मराठा सैन्याला शिवरायांनी घालून दिलेले नियम धाब्यावर बसवून पेशवाईच्या मराठा साम्राज्य धुळीला मिळवण्यास सुरुवात केली, परिणामतः इंग्रजांचा उदय झाला.

चित्रपटाबद्दल: कुबडी फेकून मारणारा तानाजी, मराठ्यांना गडाची माहिती नव्हतीच असे दाखवणे (चोरवाट शोधण्यासाठी आंधळ्या माणसाची मदत वगैरे) अतिरंजित उदयभान, विनाकारण घुसडलेले कमल राजपूत आणि ती फालतू कथा, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिवराय रडताना वगैरे दाखवणे या गोष्टी खटकल्या. अर्थात कादंबरी आणि चित्रपट म्हटल्यावर मनोरंजन मूल्ये वाढविणे वगैरे समजू शकतो, पण किमान भूगोल तरी नीट अभ्यासायला हवा होता.

डिजे, तुम्ही ब्रिगेडी विचार सोडुन द्या. Proud मराठा तितुका मेळवावा या उक्तीचा अर्थ महाराष्ट्रात जितके लोक आहेत किंवा मराठी लोक आहेत किंवा महाराष्ट्रातले जितके जाती जमातीचे मराठी लोक आहेत त्या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याखाली एकत्र यावे आणी महाराजांनी पण त्यांना एकत्र ठेऊन मराठा धर्म वाढवावा असा अर्थ आहे. पण दुर्दैवाने मराठा तितुका मेळवावा म्हणले की मराठा जातीच्याच लोकांना हे उद्देशुन म्हणले गेले आहे असा समज दृढ होत चालला आहे. याचीच खंत आहे.

पानीपत हा सिनेमा आशुतोष गोवारीकर करतोय हे कळल्यावरच माझ्या आशा अपेक्षांचे पानीपत झाले. पानीपत कोणालाच पेलला जाणारा नाहीये. त्यातल्या त्यात भन्साळीने नीट केला असता . ( तो अवास्तव गोंधळ करतो हे मान्य आहे )

संख्यात्मक विचार करता तान्हाजी बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचला आणि त्याची चर्चाही झाली होत आहे. मराठ्यांच्या इतिहासाची सर्वत्र चर्चा होत आहे
>>>>>>

या चित्रपटाचे ऐतिहासिकसामान्यज्ञानवर्धकमूल्य शून्य आहे !

तानाजी आवडला, वरच्या दोषांसकट. Happy ते दोष कमी असते तर बरं झालं असतं.
पण पानिपत जास्त आवडला होता कारण त्यात प्रामाणिकपणा जास्त वाटला, स्टाईल मारणे कमी होते. यात जरा स्टाईल जास्त वाटली. पण तरी एकुण आवडला. शिवाजी राजांचा भुमिकेत केळकर साहेब खरंच खुप शोभलेत. राजांचे कपडे पण आवडले.

>>शिवराय रडताना वगैरे दाखवणे या गोष्टी खटकल्या<< अहो असं का म्हणता ? ते काय ढसाढसा रडताना दाखविले नाहियेत. अश्रु ढाळताना दाखविले आहेत, आणि किती ही शुर, पराक्रमी असलेत तरी ते काय इतर राजांसारखे श्रुड किंवा कपटी नव्ह्ते.. ते अत्यंत संयत तर होतेच पण भावनाप्रधान ही होतेच होते... मग काहि प्रसंगांमध्ये राजांच्या डोळ्यातुन अश्रु आलेले दाखवलेत तर काय चुकीचे आहे त्यात ?

हो अश्रू ढाळण्यात काय आहे विशेष. किंबहुना योग्यच आहे ते. फत्थरदिल कठोर महाराज असे चित्र उभे करायचे आहे का शिवरायांचे? फक्त ते दांडका फेकून मारायचे दृश्य खटकणारे आहे. ते द्रुश्य टाकायचा मोह टाळता आला असता. याऊपर महाराज आणि जिजामाता यांचा आब व्यवस्थित राखला आहे.
खरे तर महाराज नाचताना दाखवले नाहीत हे प्रेक्षक म्हणून आपले यशच आहे. अजून आपल्याला ईतकेही गृहीत धरले जात नाही.

खरे तर महाराज नाचताना दाखवले नाहीत हे प्रेक्षक म्हणून आपले यशच आहे. अजून आपल्याला ईतकेही गृहीत धरले जात नाही.>>थीएटर ला लागला तरी असता का सिनेमा?? मुळात सेन्सोर मधेच पास नसता झाला.
शरद केळकर फार छान भुमिका करतो.तान्हाजी बघावाच अस वाटत होत पण मिक्स रिव्ह्यु वाचुन नेटवर यायची वाट पाहावी झाल.

खरे तर महाराज नाचताना दाखवले नाहीत हे प्रेक्षक म्हणून आपले यशच आहे. >> महाराजांबद्दल असे काहिही बरे दाखवतील..? याउलट ज्याचा इतिहास रंगेल आणि बाईलवेडा असा नाधिन धिनना आहे त्याला नाचवले जाते हा इतिहासही फार जुना नाही..!

Pages