बहूपतीत्व पाळणार्‍या कमळपक्ष्याची वीण

Submitted by Dr Raju Kasambe on 20 January, 2020 - 06:38

बहूपतीत्व पाळणार्‍या कमळपक्ष्याची वीण

बहूपतीत्व पाळणार्‍या कमळपक्ष्यांच्या (जकाना) विणीबद्दल बरेच काही वाचले होते. पण अनेक वर्षांपासून विचार करीत असूनसुद्धा त्यांचे निरीक्षण करण्याची योग्य संधी मिळत नव्हती. मुंबईत राहायला आल्यानंतर तर आता अशी संधी मिळेल अशी आशा मावळली.
महाराष्ट्रात कमळपक्ष्याच्या दोन प्रजाती आढळतात. डोंबिवली परिसरातील (जि. ठाणे) काही छोट्या तलावांवर एखाददुसरा कमळपक्षी कधीतरी दिसतो. प्रामुख्याने कांस्यपंखी कमळपक्षी (ब्राँझ-विंग्ड जकाना) तर अधूनमधून लांब शेपटीचा कमळपक्षी (फेजंट-टेल्ड जकाना) दिसून पडायचा. दोहोंचेही पाय पाणकोंबडीप्रमाणे लांब, हिरवट रंगाचे आणि पायांची बोटे मात्र एखाद्या कोळ्याप्रमाणे (स्पायडर) खूप लांब.
लांब शेपटीच्या कमळपक्षाला विणीच्या हंगामात लांब कोयत्यासारखी टोकदार शेपटी उगवते. मानेच्या मागील बाजूस सुंदर सोनेरी नेकलेस असतो. कांस्यपंखी कमळपक्ष्याचे डोके, मान व छाती काळी असून पंख व पाठ चमकदार कांस्य वर्णाची असते. शेपटी तांबूस-विटकरी व आखुड असते. दोन्ही प्रजातीच्या कमळपक्ष्यांची वीण पावसाळ्यात अर्थात जून ते सप्टेंबर ह्या कालावधीत होते. पावसाची जोरदार हजेरी लागली की कमळपक्षी प्रियाराधनास सुरुवात करतो.

1200px-Bronze-winged_Jacana_Metopidius_indicus_Adult_best_DSCN1399_(3).jpg
मुंबईचा पाऊस म्हणजे जवळपास दररोज धोपटून काढणारा. कधीही कोसळणार, कधी धोधो तर कधी नुसतीच रिपरिप. त्यात इथले आमचे जीवन धकाधकीचे, धावपळीचे. इथे आल्यापासून मीसुद्धा एक चाकरमान्या मुंबईकर झालो. घड्याळाच्या मिनिटाच्या काट्याप्रमाणे धावायचे शिकलो. ७.१४, ७.२९, ७.४३ ‘स्लो’, ‘फास्ट’ असे बोलायला लागलो. हे लोकल ट्रेनचे वेळापत्रक मुखोद्गत झाले. हे वेळेचे भान सांभाळायचे, एक गाडी चुकली तर दुसरी कशी पकडायची हा विचार सुरु होतो.

डोंबिवली जवळच असलेल्या कोपरगावाच्या गावदेवी मंदिराला लागून एक छोटा तलाव आहे (किंवा तलावाकाठी मंदिर आहे). ह्या तलावात भरपूर पाणवनस्पती वाढल्या आहेत तसेच शिंगाड्याचे वेल लावलेले आहेत. जीपच्या हवा भरलेल्या ट्यूबमध्ये बसून हिरवे शिंगाडे काढणारे मजूर तलावातील वेलींमध्ये तरंगत काम करीत असत.

मी कोपर खाडी परीसरात पक्षी निरीक्षणाला जाताना ह्या तलावातील पक्ष्यांवर एक नजर टाकून जात असे. जुलै २०१६ मध्ये मला ह्या तलावावर तीन कांस्यपंखी कमळपक्षी (ब्राँझ-विंग्ड जकाना) दिसून आले. मी त्यांच्यावर नजर ठेऊन होतो. १६ जुलै रोजी मला कमळपक्ष्यांचे खूप आवाज ऐकू आले. एक जोडी प्रियाराधन करताना दिसली व लगेच त्यांचे मिलनसुद्धा होताना दिसले. मी त्याचे व्हिडीओ घेतले. तेव्हाच माझ्या मनात विचार आला की आता कमळपक्ष्याच्या संपूर्ण वीण वर्तणूकीचे निरीक्षण करण्याची संधी मला मिळणार आहे. ह्या व्हिडीओचे निरीक्षण केल्यावर नर आकाराने छोटा व मादी मोठी असल्याचे लक्षात आले.

ह्या दिवसापासून जसे जमेल तसे मी आता तलावावर फेऱ्या मारू लागलो. सकाळी ऑफिसला अर्धा तास उशिरा जाऊन सायंकाळी अर्धा तास जास्त काम करू लागलो. कमळपक्षी नर-मादी पाणवनस्पतीच्या फांद्या ओढूनताणून एका विशिष्ट ठिकाणी जमवत होत्या. काही दिवसांतच शिंगाड्याच्या पसाऱ्यात एक तरंगता हिरवट उंचवटा तयार झाला. हेच कमळपक्ष्याचे घरटे. कुठल्याही बाजूने तलावाच्या काठापासून घरटे किमान १०० फुटावर होते. त्यावर मादी बसलेली दिसू लागली. नर मादीचे मिलन पुन्हा बघायला मिळाले. दरवेळी मिलनानंतर नर मादीला एक प्रदक्षिणा घालीत असे. मादी त्यावेळी मान खाली झुकवून वाकून शांत उभी राहत असे. नंतर परत उभयता घरटे बांधायला लागत.

अंडी:
Jacana eggs.jpg
(छाया: अंडी उबवणारा कमळपक्षी नर)
दिनांक २१ जुलैला घरट्यात चार अंडी दिसून आली. ती अंडी मादीने त्याआधीच्या चार दिवसात घातली असावीत असा आमचा कयास होता. अंडी चकाकदार कांस्य-तपकिरी असून त्यावर लहान मुलांनी किचाडल्या प्रमाणे पातळ तपकिरी रेषांचे जाळे होते. उबवल्यामुळे अंड्यांची चकाकी मात्र दिसून पडत नाही व ती मळकट दिसतात. अंड्यांचा आकार खेळण्याच्या भोवऱ्यासारखा एका बाजूस रूंद व दुसऱ्या बाजूस निमुळता असतो. अंडी अनेकदा कमळाच्या अथवा शिंगाड्याच्या पानावर घातली जातात. ती पाण्यात घरंगळून जाउ नयेत म्हणून हा असा आकार! आता मात्र घरट्यावर मादी नसून केवळ नर बसत होता हे माझ्या लक्षात आले. मादी दोनेकशे फुटावर त्याच तलावात विहार करताना दिसत होती. तलावाच्या त्याबाजूस आणखी दोन (म्हणजे एकूण चार) कमळपक्षी आढळून आले.

डोंबिवलीचे आमचे मित्र आणि पक्षी अभ्यासक श्री मनिष केरकर मला तलावावर भेटले आणि आम्ही असे ठरविले की ज्याला जमेल त्याने दररोज किमान पंधरा-वीस मिनिटे तरी घरट्याचे निरीक्षण करावयाचे व मोबाइल फोन मधील व्हाट्सअॅप द्वारे एकमेकांना निरीक्षणे कळवायची. साधारणतः किती दिवसांनी अंड्यातून पिल्लं निघतात हे बघणे हा मुख्य उद्देश होता.

दि. ६ ऑगस्टच्या रात्री मुंबई परिसरात मुसळधार पाऊस झाला. दुसऱ्या दिवसी सकाळी मनिष माझ्या आधी तलावावर पोहोचले होते. त्यांनी मला घरटे वाहून गेल्याचे कळवले. जड अंतःकरणाने मी तलावावर पोहोचलो. तलावाची पातळी अनेक फुटांनी वाढली होती. पाणवनस्पती व शिंगाड्यानी झाकलेल्या तलावाच्या हिरव्यागार पसाऱ्यात घरटे अदृश्य झाल्यासारखे वाटले. पण थोड्याच वेळात घरटे मूळ जागेपासून पन्नासेक फुट दूर वाहून गेले असून नर अंडी पोटाशी घेऊन उबवत असलेला दिसला. घरटे तरंगते असल्यामुळे पाण्याचे वाढलेल्या पातळीत ते बुडाले नव्हते तर केवळ वाहून गेले होते!
झकणा habitata.jpg
(छाया: तलावातील शिंगाडे काढण्यासाठी काम करणारे मजूर आणि कमळपक्षी)

अंडी उबविण्यामध्ये नराला मादीची कुठलीही मदत होत नसल्यामुळे नराला स्वतःच अंडी उबविणे तसेच स्वतःच्या पोटापाण्याची व्यवस्था बघणे क्रमप्राप्त होते. अर्थात अंडी उबविताना अधूनमधून काही मिनिटांची उसंत घेऊन तो धावतपळत आजूबाजूला जे मिळेल ते मटकाऊन परत धावतपळत घरट्यावर येऊन बसत असे. चांगलं उन्हं पडलं की मात्र नर कमळपक्षी जवळपासच मनसोक्त आंघोळ करीत असे. मग आरामात पंख साफ करून घरट्याकडे येत असे. त्याच्या अंघोळीला तो सात-आठ मिनिटे तर खानपानाच्या ‘ब्रेक’ साठी केवळ दोन-तीन मिनिटांची वेळ देत असे. पावसाची रिपरिप चालू असेल तर मात्र तो अंडी सोडून अजिबात जात नसे. अंडी पावसात भिजू नेयेत ह्याची तो काळजी घेत असावा.
घरट्याच्या जवळपास कुणीही फटकलेले त्याला आवडत नसे. एखाद दुसरा ढोकरी (पाँड हेरॉन), बगळा (इग्रेट), पाणकोंबडी (वॉटरहेन) किंवा दुसरा कमळपक्षी जवळपास आल्यास त्याला हल्ला करून हुसकावत असे.

उबवल्यामुळे अंड्यांचा रंग मळकट होतो तसेच घरटे तलावातीलच हिरव्या वनस्पतीच्या फांद्या-देठ-पानांपासून साकारलेलं असल्यामुळे दुरून अथवा उंचावरून बघणाऱ्यास ते सहज दृष्टीस पडत नसे. एखाद दुसरा दलदली हारिण (मार्श हॅरीयर) वरून उडत गेलाच तर कमळपक्षी धडपडत घरट्यावर येऊन अंडी पोटाशी घेऊन दबकून बसे. लांब काटकुळे पाय घडी करून अंड्यावर बसलेली त्याची आकृती मला मजेदार वाटत असे. खूप लांब असलेल्या बोटांमुळे त्याला पाणवनस्पतींवर अलगदपणे ढांगा टाकत चालता येते.

पिल्लं व पितृप्रेम:
दि.१४ ऑगस्ट २०१६ (अर्थात किमान २५ व्या दिवसी) रोजी सकाळीच मला मनीषनी आनंदाची बातमी सांगितली. रविवार असल्यामुळे मी लगेच तलावावर हजर झालो. कमळपक्ष्याच्या पोटाखाली बरीच हालचाल जाणवत होती. थोड्याच वेळात कमळपक्षी उभा झाला आणि घरट्यात असलेली तीन नवजात गोंडस पिल्लं मला दृष्टीस पडली. कमळपक्षी कोंबडीच्या गणात मोडत असल्यामुळे त्याची पिल्लंसुद्धा जन्माला आली की लागलीच आईच्या (इथे बाबाच्या) मागोमाग चाला-फिरायला लागतात. अशा पक्ष्यांच्या पिल्लांना इंग्रजीत “प्रीकॉशिअल” म्हणतात. म्हणजे जन्मताच पिल्लांचे डोळे उघडे असून, पिल्लांच्या अंगावर पिसांची लव असते व ती चालू-फिरू शकतात. हे पक्षी सर्व अंडी घालून झाल्यानंतरच अंडी उबवायला सुरुवात करतात, जेणेकरून सगळी पिल्लं एकाच दिवशी जन्माला यावीत. ह्या प्रकारात कोंबडी, बदक, हंस, टिटवी, धाविक, तणमोर, माळढोक, तित्तिर, लावा आदी पक्षी मोडतात.

या उलट “अल्ट्रिशिअल” प्रकारची पिल्लं असतात. जन्मवेळी त्यांची त्यामानाने कमी वाढ झालेली असते. त्यांचे डोळे बंद असतात. तसेच त्यांच्या अंगावर पंखांचे आच्छादन नसते व त्यांना माता-पित्याच्या शरीराच्या उबेची गरज असते. हे पक्षी पहिले अंडे घालताच अंडी उबवायला सुरुवात करतात. त्यामुळे ज्या क्रमाने अंडी घातली गेली त्या क्रमाने पिल्लांचा जन्म होतो. ह्या प्रकारात चिमणी, कावळा, पारवा, पोपट, धीवर, राघू, धनेश, सातभाई, घार इ. पक्षी मोडतात.

दहा वाजता माझा मुलगा चि. वेदांतला व आणखी एक कॅमेरा घेऊन तलावावर आलो. त्याला एका झुडूपामागे छायाचित्रण करण्यासाठी बसवून मी थोड्या मागील आडोशाला बसलो. चार अंड्यांपैकी तीनच अंड्यांमधूनच पिल्लं निघाल्यामुळे नर कमळपक्षी गोंधळून गेला असावा. धडपड्या पिल्लांना आणि उरलेल्या अंड्याला पोटाशी घेऊन उबवण्याचा त्याने दुपारी बारापर्यंत प्रयत्न केला. बाराच्या सुमारास त्याने पिल्लांना पंखांखाली काखेत उचलून घेतले आणि शिताफीने ढांगा टाकीत घरट्यापासून दूर घेऊन गेला. कमळपक्ष्याच्या जीवनातील हा प्रसंग अविस्मरणीय होता. चि. वेदांतनी तो नेमका छायाचित्रबद्ध केला (छायाचित्र बघा).
Bronze-winged Jacana with babies by Vedant (2).JPG
(पिल्लांना पंखाखाली काखेत लपवून उचलून घेऊन जाणारा मायाळू बाप. छाया: वेदांत कसंबे )
(व्हीडीओ बघा येथे: https://www.youtube.com/watch?v=DT0EoCFBWGs)

मी मात्र व्हिडीओ घेतले. पिल्लांना थोड्या उंच पाणवनस्पतींमध्ये सुरक्षितपणे लपवून घरट्यावर पुन्हा पुन्हा परतून चौथे अंडे उबवण्याचा त्याने सायंकाळच्या पाच वाजेपर्यंत प्रयत्न केला. पाच वाजता काहीतरी ठरवून आल्यासारखे त्याने घरट्यावर येऊन त्या चौथ्या अंड्यावर चोचीने टोचण्या मारायला सुरुवात केली. अंडे फुटताच त्यातील बलक खाण्याचा नराने प्रयत्न केला. पण अंडे घरट्यावरून पाण्यात पडले. काही क्षण ते तरंगले पण नराने परत चोच मारताच अंडे पाण्यात बुडाले.

(व्हीडीओ बघा येथे: नर अंडे फोडताना: https://www.youtube.com/watch?v=aPW3Zxs3_LQ)

त्यानंतर दररोज नर पिल्लांना घेऊन पाणवनस्पतींमध्ये फिरताना दिसत होता. दर अर्ध्या तासाला तो पिल्लांना पंखांखाली घेऊन उब देत असे. परत तो उभा झाला की पिल्लांचे सहा पाय लटकताना दिसत असत. थोडे पंख किलकिले केले की एकेक पिल्लू पाणवनस्पतींवर अलगद उतरत असे. कमळपक्ष्याची तीन पिल्लं त्यांच्या बाबांच्या मागे फिरताना बघून वीण यशस्वी झाल्याचा आम्हाला आनंद होत असे.
कमळपक्ष्याच्या पिल्लांच्या अंगाची वरील बाजू नारिंगी-विटकरी असून त्यावर काळा पट्टा होता तर खालील बाजू पांढरी होती. ती जर पाणवनस्पतींमध्ये दबकून बसली तर त्यांना शोधून काढणे कठीण होते. नर खाद्य शोधायला निघून गेला तर ती निपचितपणे बसून असायची व ती आम्हाला दिसत नसत.
दोन दिवसानंतर दि. १५ ऑगस्ट रोजी ह्याच तलावावर दुसऱ्या एका कमळपक्ष्याच्या जोडीचे मिलन होताना दिसून आले. मात्र ह्या जोडप्यातील मादी वर उल्लेख केलेलीच मादी असेल असे खात्रीलायक म्हणता येणार नाही. पण तशी शक्यताही नाकारता येत नाही.

नराचा विलाप:
मादीने चार अंडी घातल्यानंतर ती घरट्यावर येणे बंद झाले होते. मादी नजरेच्या टप्प्यात येताच नर कर्कश आवाजात ‘विलाप’ करीत असे. तो उडून तिच्याकडे जात असे. पण मादी प्रतिसाद देत नसे. उलट ती उडून दूर जात असे. नर परत लगबगीने लांब ढांगा टाकीत घरट्याकडे परतत असे. प्रियाराधन करताना सुद्धा नर विशिष्ट असा कर्कश आवाज काढीत असे. असे मानले जाते की जो नर जास्त जोरात व अधिक वेळा ‘विलाप’ करतो मादी त्याच्यासोबत अधिकवेळा मिलन करते! अनेकदा दुसरा एक नर तलावाच्या मधल्या भागात उदरभरण करताना दिसायचा. अंडी उबवणारा नर आक्रमकपणे उडत जाऊन त्याच्यावर हल्ला करत असे. तो दुसरा नर लगेच माघार घेऊन पलीकडे निघून जात असे. मला असे वाटते की त्यांचे राखीव प्रदेश (टेरीटरी) असावेत आणि त्याचे ते अशाप्रकारे संरक्षण करीत असावेत.

कमळपक्ष्यांमधील बहुपतित्व व अंडी घालणारी मशीन:
कमळपक्ष्यांमध्ये नर व मादिंच्या भूमिकांची अदलाबदल (सेक्स रोल रिव्हर्सल सिस्टम) झालेली आढळते. सुगरण पक्ष्यांमध्ये एक नर एकाच हंगामात अनेक माद्यांसोबत प्रियाराधन करतो हे सर्वश्रुत आहे. कमळपक्ष्यांमध्ये अगदी ह्याच्या उलट असून, एक मादी एकाच हंगामात अनेक नरांसोबत प्रियाराधन करते व अनेक घरट्यात अंडी घालते. तिच्या ‘जनानखान्यातील’ एका नरासोबत मिलन झाले, अंडी घातली की ती दुसऱ्या नराकडे निघून जाते. ती एकाच वेळेस अनेक नरांसोबत मिलन करीत असली तरी ज्या नरासोबत जास्त वेळा मिलन झालेले असते त्याच नरावर अंड्यांची जबाबदारी टाकली जाते. ह्या वीणपद्धतीला बहुपतित्व (पॉलीअँड्री) म्हणतात.

पण कमळपक्ष्यांमध्ये ही वीण पद्धती का विकास पावली? पाण्यावर तरंगते घरटे असल्यामुळे अंडी घरंगळून पाण्यात पडतात. त्यामुळे खूप अंडी-पिल्लं मरतात. त्यावर उपाय म्हणून निसर्गाने खेळण्याच्या भोवऱ्यासारखी अंडी त्यांना दिली. ही अंडी सहज घरंगळत नाहीत. अंडे घरंगळून पाण्यात पडलेच तर ते पाण्यात तरंगते. कमळपक्षी ते अंडे चोचीत उचलून परत घरट्यात ठेऊ शकतो!
पाण्यात तरंगते आणि उघड्यावर असलेले घरटे म्हणजे अतिशय धोकादायक परिस्थितीत वीण करणे होय. त्यावर उपाय म्हणजे नराचा वरील बाजूस असलेला चकाकणारा रंग. तसेच अंड्यांच्या चकाकणारा रंग! वर घिरट्या घालणाऱ्या शिकारी पक्ष्याला पाणीच चमकत असल्याचा भास होत असणार!

एवढे करूनही अनेक अंडी-पिल्लं मरतात. कधीकधी नराला मादीच्या ‘बेईमानीचा’ संशय आल्याने (ती दुसऱ्या नरासोबत मिलन करताना दिसल्यामुळे) तो सर्व अंडी फोडून टाकतो. अशावेळेस मादीचे संपूर्ण श्रम निरर्थक होतात. शेवटचा उपाय म्हणजे जास्तीत जास्त पिल्लांना जन्म देणे. अर्थात हे काम नर करू शकत नाही. हे काम मादीच करू शकते. पण त्यासाठी तीला संपूर्ण विणीचा हंगाम संपेपर्यंत केवळ अंडी घालत राहण्याचे काम करावे लागते. जणू अंडी घालणारे यंत्रच (एग लेयिंग मशीन)!! ही सगळी अंडी सांभाळायचे काम मात्र मग तीला वेगवेगळ्या लग्नाळू नरांना वाटून द्यावे लागते. तीला स्वतःला मात्र शारीरिक दृष्टीने प्रचंड तणावातून जावे लागते. मादीने स्वीकारलेले ‘बहुपतित्व’ हे स्वतःच्या आनंदासाठी वा मौज-मजेसाठी नसून कमळपक्ष्यांचा वंश अनादीकाळ टिकावा म्हणून स्वीकारलेली नैसर्गिक उपाययोजना आहे!

(अंबेजोगाई, जि. बीड येथे झालेल्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात दि. ८ जानेवारी २०१७ रोजी मी ह्या विषयावर सादरीकरण केले होते त्याचेच हे शब्दांकन).

डॉ. राजू कसंबे, पी.एचडी.
सहाय्यक संचालक - शिक्षण
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी,
मुंबई-४००००१
भ्रमणध्वनी- ९००४९२४७३१

Group content visibility: 
Use group defaults

सुरेख लेख!
फोटो टाकाल का या पक्षांचा?

लेख आवडला.
चोच, डोकं, मान रंग लय भारी आहेत!

> दरवेळी मिलनानंतर नर मादीला एक प्रदक्षिणा घालीत असे. मादी त्यावेळी मान खाली झुकवून वाकून शांत उभी राहत असे. नंतर परत उभयता घरटे बांधायला लागत. > Rofl Rofl

> ती एकाच वेळेस अनेक नरांसोबत मिलन करीत असली तरी ज्या नरासोबत जास्त वेळा मिलन झालेले असते त्याच नरावर अंड्यांची जबाबदारी टाकली जाते.

कधीकधी नराला मादीच्या ‘बेईमानीचा’ संशय आल्याने (ती दुसऱ्या नरासोबत मिलन करताना दिसल्यामुळे) तो सर्व अंडी फोडून टाकतो. अशावेळेस मादीचे संपूर्ण श्रम निरर्थक होतात. > रोचक आहे!

खूपच सुंदर माहिती! फोटो नक्की द्या तुम्ही/ तुमच्या मुलाने काढलेले.

phasent_tailed_jacana.jpg
हा मी काढलेला या पक्ष्याचा (नर) एक फोटो.
हा फेजंट-टेल्ड आहे.

फोटो आणि व्हिडिओ आता पाहिले. सुंदर आहेत.

सुंदर लेख. फोटो आणि विडीओ दोन्ही मस्त! तुमच्या लेखांमुळे अतिशय रोचक माहिती मिळते. धन्यवाद.

अप्रतिम लेख व फोटो.

माझ्या घराजवळ एक कमळतळे आहे तिथे कित्येक पक्षी असतात. माझे लक्ष कायम फुलांकडे राहिले, आता पक्षीही पाहीन.

डोंबिवली जवळपासचे निळजे तलाव, कोपर तलाव, खोणी तलाव,खिडकाळी तलाव हे सर्व भाग पक्ष्यांसाठी होते. आता काही उरलं नाही.
तलावांच्या सुशोभाकरणाचं खूळ कुठुन आलं माहिती नाही.
कल्याण - पडघा रस्त्यावरचे प्रसिद्ध लोनाड मंदिर आहे तलाव. त्याचेही बारा कोटींचे सुशोभिकरण!

आमच्या घराजवळ कुंभारखाण पाडा उल्ल्हास नदी ( जीला लोक खाडी बोलतात) च्या काठावर पण खुपसे पक्षी येतात.. पण हल्ली झाडीत लोक दारू पीत पार्टी करतात... जाता येत नाही तिथे...