तान्हाजी - Based on True story निरीक्षण

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 January, 2020 - 15:20

मला परीक्षण लिहिता येत नाही म्हणून मोजकी निरीक्षणे लिहितो.

1) पहिल्याच क्रमांकात अंजलीबद्दल लिहिण्याचा मोह आवरत नाही. येस्स, काजोल अगदी तशीच वाटली आहे. अजय देवगणसोबत कौटुंबिक रोमान्स करताना आत्ता बॅकग्राऊंडला "कभी खुशीss कभी गम.." वाजू लागेल असे वाटत राहते. कदाचित तिच्या दृश्यांचे चित्रिकरण करायला पाहुणा दिग्दर्शक म्हणून करण जोहारला बोलावले असावे. अर्थात ते बोअर झाले अश्यातला भाग नाही, पण आजवर भन्साली स्टाईल ऐतिहासिक रोमान्स बघितल्याने हा फरक चटकन लक्षात आला ईतकेच. बहुधा काजोल प्रत्यक्ष आयुष्यात देखील सौं देवगण असल्याने तिला चित्रपटात तानाजीची बायको दाखवली असावी जेणेकरून श्री देवगण यांना अभिनय करताना तो फील येईल. पण आपल्याला मात्र तो येत नाही.

२) लेडीज फर्स्ट नंतर आता सिंघमची बारी. चित्रपट थ्रीडी नसून फोर डी असणार याचा अंदाज ट्रेलर बघूनच आलेला. हा चौथा डी देवगणचा. तो आपल्या अपेक्षा पुर्ण करतो. सिंघमस्टाईल ॲक्शन आणि त्याचा तो आंखो आंखोसे अभिनय करणारा ईन्टेन्स लूक ! या भुमिकेत त्याच्या या दोन्ही कलागुणांना पुरेपूर वाव होता. देवगणने देखील ही संधी वाया जाऊ दिली नाही. त्याला पाहून आपण वॉव म्हणतोच.

३) पद्मावत चित्रपटात रणवीर सिंगने साकारलेला व्हिलन खिलजी भाव खाणारा होता पण शाहीदने सुखद धक्का देत तोडीस तोड टक्कर दिलेली. ईथेही अजय देवगण तानाजी झाला असताना सैफला भाव खायचा फार वाव असेल असे वाटले नव्हते. पण तो तोडीस तोडच्याही एक पाऊल पुढे गेला. मला या चित्रपटातले सर्वात जास्त आवडलेले कॅरेक्टर म्हणजे सैफने साकारलेला उदयभान. हिडीसफिडीस अंगावर येणारा अभिनय न करता तो पुरेशी क्रूरता दाखवतो. वेळप्रसंगी विनोद आणि मनोरंजनही करतो. चित्रपटात ईतर मनोरंजक मसाला फार नसल्याने याची खरेच गरज होती. शिट्ट्या आणि टाळ्या खेचायचे काम मर्द मराठा मावळ्यांकडे असले तरी पब्लिकच्या चेहरयावर हास्य छोटे नवाब सैफ अली खानच उमलवतात.

(विनोदावरून पडलेला एक प्रश्न - त्या काळात "चुतिया" हा शब्द होता का? त्यावरून चित्रपटात विनोद दाखवले आहेत)

४) कथा छोटी आहे. पण पटकथा फुलवता आली असती ते टाळले आहे. संकलन दृष्टीने म्हणाल तर ते छान आहे. पण खटकले ते शिवकालीन काळ म्हणावा तसा उभाच राहिला नाही. तो फिलच आला नाही. तेव्हाची जीवनपद्धती, संस्कृती काहीच कुठेच जाणवत नाही. तानाजीच्या वडिलांचा लढाईत हात कापला जाणे, त्यांनी मृत्युपूर्वी आपल्या हातातले कडे लहान तानाजीच्या हातात सरकावणे, पुढे मोठे होत त्याने प्रतिशोध घेत ते कर्ज फेडणे, असा ऐंशीच्या दशकातील वैयक्तिक फिल्मी अ‍ॅंगल दाखवण्यापेक्षा रयतेवरचे जुलूम खोलात दाखवून ती लढाई स्वराज्याशी आणखी जोडता आली असती. तसेच तान्हाजीचे कोंढाणा व्यतीरीक्त त्या आधीचे काही पराक्रम दाखवता आले असते. पण चित्रपटाचा पुर्ण फोकस कोंढाण्यावरच राहिला आहे.

५) जे दाखवले आहे त्यात सगळ्या फ्रेम्स सुंदर आणि भव्यदिव्य करायच्या नादात कृत्रिमता आली आहे. स्वित्झर्लंड वा गेला बाजार सिमला मनालीला जाऊन बागडणे आणि मुंबईतल्याच एखाद्या मॉलच्या स्नो वर्ल्डमध्ये जाऊन सेल्फी काढणे यातल्या आनंदात नैसर्गिक विरुद्ध कृत्रिम अनुषंगाने जो फरक जाणवतो तोच अखंड चित्रपट मला जाणवत राहीला. कदाचित मलाच जे दिसतेय ते गोड मानून घेता आले नसेल हा माझा रसग्रहणदोषही असावा.

६) संवाद ठिकठाक आहेत. मी ऐकलेले की लोकं टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात. कुठे ते याची कल्पना नाही. आमच्या शो ला काही जणांनी ओढून ताणून तो प्रयत्न केला पण मग नंतर शांतच राहिले. एखादा मुळातच हौशी ग्रूप असेल तर ते त्यांचे क्रेडीट, मात्र चित्रपट बघताना आपण कुठे उत्स्फुर्तपणे एखादी आरोळी ठोकावी असे मला तरी वाटले नाही. कुठे अंगावर शहारा आला वा डोळे पाणावलेत असेही विशेष झाले नाही.

७) थ्रीडीने मात्र मजा आणली. दोनचार तीरकमान भाले वगैरे घुसले अगदी माझ्या छातीत. एकावेळी तर मी ईतके बेसावध असताना हे झाले की मी प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून डोळ्यावरचा गॉगलच काढून ऊलटा फेकून मारणार होतो. त्यामुळे हा चित्रपट बघावा तर थ्रीडीमध्येच. अन्यथा बघूच नका, पुर्ण पैसे वाचवा. मोबाईलवर बघणार असाल तर त्यातही मजा नाही. वेळही वाचवा. फार काही विशेष ईतिहासातही भर पाडणारा नाहीये. त्यापेक्षा चार पैसे खर्चून चित्रपटगृहातच एक थ्रीडी साहसपट म्हणूनच त्याचा लुफ्त घ्या.

८) गाणी सुपर ड्युपर हिट नसतील पण त्या त्या वेळेस स्फुरण चढवणारी आणि चित्रपटाचा मूड कायम ठेवणारी आहेत. व्यावसायिक चित्रपटाची डिमांड पुर्ण करायला तानाजीला नाचवलेय पण मुळातच अजय देवगणला नाचता येत नसल्याने तानाजी फार काही कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन नाचलाय असे झाले नाही. शंकरा रे शंकरा गाण्यात तर कोरेओग्राफीही मजेशीर होती. तानाजी मिशीला पीळ देत सलमानला शोभावी अशी स्टेप मारतो आणि सैफ अली खान त्याला आनंदाने कॉपी करतो. पण सगळ्यात भारी होते ते पार्श्वसंगीत. चित्रपटाला तेच तारून नेते. चित्रपट संपल्यावरही जर काही डोक्यात घोळत राहते, म्हणजे अगदी आता हे परीक्षण, ऊप्स निरीक्षण लिहितानाही माझ्या डोक्यात वाजत आहे, तर ते.. राराराss राराह रार राss राह रारा रा रा राहss...

९) शिवाजी महाराज - शरद केळकर. छान छोटी भुमिका. संयत अभिनय. शोभून दिसला. आणि हे फार महत्वाचे होते. कारण महाराजांची आपल्या मनात जी प्रतिमा असते तिला पुर्ण न्याय आदर मानसन्मान मिळणे फार गरजेचे वाटते मला. आणि दुसरे म्हणजे महाराजच दमदारपणे उभे करणे जमले नसते तर तानाजीचीही शोभा गेली असती.

१०) दस बात की एक बात. चित्रपट तांत्रिक अंगाने उत्तम आहे. चित्रपटांचे चाहते असल्यास जरूर बघा. पैसा वसूल वाटेल. पण आज मी काही भारी बघितले ही फिलिंग मला तरी आली नाही. तसेच मला यात रिपीट वॅल्यु देखील दिसत नाहीये. सामान्य जनतेमध्ये मात्र या चित्रपटाला घेऊन उत्सुकता आणि क्रेझ दिसून येते. याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या मातीतल्या वीराची कहाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांच्या एका मावळ्याची कहाणी आहे. पडद्यावर जेव्हा महाराज येतात तेव्हा लोकं त्या दृश्याला कॅमेरयात कैद करून व्हॉटसपला स्टेटस ठेवत आहेत. यामागे निव्वळ फॅड नसावे, तर ते कुठूनतरी आतूनच येते. तो मोह मलाही आवरला नाही Happy

-------------------------------------------------

अवांतर निरीक्षणे

अ) पॉपकॉर्न खूपच महाग झालेत. न घ्यावेत तर बायको नाराज, घ्यावेत तर खिसा साधू महाराज.

ब) काही लोकांना थ्रीडी चित्रपट बघून झाल्यावर त्या चष्म्याचा मोह का सुटत नाही? घरी नेऊन तो काय डोरेमॉन बघायला वापरणार आहात? काय फायदा मग एखाद्या वीर पुरुषाचा चित्रपट बघून जर तुम्हाला पुढच्याच मिनिटाला क्षुल्लक स्वार्थ सोडता येत नसेल...

क) पिक्चर थ्रीडी आहे, स्पेशल ईफेक्टचा मारा आणि दमदार अ‍ॅक्शन आहे, एकंदरीत दणादण साऊंड असणार आहे.. याची कल्पना असतानाही लोकं तान्ह्या बाळांना का रडवायला पिक्चरला घेऊन येतात?

ड) लोकं शनिवारी सकाळच्या शो ला सुद्धा मोबाईल का सायलेंट ठेऊ शकत नाही? त्यांना श्री नरेंद्र मोदींचा कॉल येणे अपेक्षित असते का?

असो,

मी चित्रपट खरेच पाहिला आहे का? ईथपासून.....
चित्रपटाला खरेच मीच गेलेलो का? ईथपर्यंत.....
या अश्या शंका काही लोकांना वारंवार पडतात. तर फक्त त्यांच्यासाठी म्हणून एक आवर्जून फोटो काढला आहे तो खाली डकवतो, ईतरांनी न पाहता स्क्रॉल केले तरी हरकत नाही Happy
धन्यवाद,
ऋन्मेष

IMG_20200118_193832.jpg(तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हापासूनच या फोटोसाठी खास दाढी वाढवायला घेतलेली)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पॉपकॉर्न खूपच महाग झालेत. न घ्यावेत तर बायको नाराज, घ्यावेत तर खिसा साधू महाराज.
>>>
किती वर्षानी गेला होतास थेटरात?

Submitted by BLACKCAT on 19 January, 2020 - 08:31 >>>
नाही वाटत आहे कॉपी.

छान लिहिलेय. आवडले.

अवांतर निरीक्षणातील प्रश्नांची उत्तरे विक्रम वेताळ फेम वेताळही देऊ शकणार नाही.

चित्रपटाच्या नावामध्ये तानाजी ऐवजी तान्हाजी का आहे? पद्मावतीच्या वेळी नावामुळे झालेला गोंधळ पुन्हा होऊ नये म्हणून की चित्रपटाचा डिरेक्टर/प्रोड्युसर/नाव सुचविणारा यांपॆकी कोणीतरी साऊथ इंडियन आहे म्हणून? निदान ऐतिहासिक विषयांच्या चित्रपटांमध्ये (खास करून चित्रपटांच्या नावामध्ये कारण तेच लोकांच्या जास्त चांगले लक्षात राहते) तरी नावे जशी आहेत तशी का नाही ठेऊ शकत?

तानाजीच्या हयात वंशजांनी त्याचे नाव तान्हाजी होते व तेच चित्रपटात वापरावे असे सांगितले असे वाचले आहे.

तान्हाजी आंबोलीजवळच्या चंदगडमधील पारगावचा. मायबोली दुर्गवीरांमुळे या गडावर स्वारी करायचा योग माझ्या नशिबी आला होता Happy Happy

साधना, बातमीत तर न्यूमरॉलॉजीसाठी तानाजी ठेवलेले चित्रपटाचे नाव तान्हाजी केले असे म्हटले आहे.
चित्रपट बघता निर्माते/दिग्दर्शक यांना इतिहास अबाधित ठेवण्यात विशेष रस जाणवत नाही.
तेव्हा त्यांचे नाव खरंच काय होते यावर आता इतिहास तज्ञांचेच मत जाणुन घ्यायला आवडेल.

हे खरे असेल तर तो न्यूमरॉलॉजीस्ट भाविक्क संग्घवी उगाच आपणच बदलले म्हणुन भाव खात असावा.

आवडलं परीक्षण
पॉपकॉर्न घेताना जीवाची फार चिडचिड होते.मल्टिप्लेक्स मध्ये स्टॉल टाकायला कमिशन/रेंट द्यावं लागतं ते वसूल करायला रेट ठेवतात मान्य.पण किमान भाराभर पैसे देऊन पोट भरीचं त्यातल्या त्यात हेल्दी काही मिळावं.70 रु मध्ये 2 सामोसे घेतात तसे लोक 80 रु मध्ये 2 इडल्या पण घेतील.अडला हरी.
पिक्चर चांगला चालू आहे.आज ऐन वेळी वरातीमागून घोडं म्हणून बुकिंग चरक केली तर सर्व शो ला फक्त पहिली रांग बाकी आहे ☺️☺️इतक्या जवळून छातीत बाण नको मारून घ्यायला.
पुढच्या रविवारी जरा आधी तिकीट काढून बघू.

साधना, ब्लॅककॅट, मी अनू धन्यवाद

ब्लॅककॅट, ती म्युजिक कुठूनही कॉपी वाटत नाही. म्हणूनच त्या युट्यूब विडिओलाही लाईकपेक्षा डिसलाईक जास्त आलेत.

@ राज हो, माझ्यात बरेच लोकं बरीच व्यक्तीमत्वे लपलेली आहेत. एकाच आयडीत सर्वांना न्याय देणे अवघड म्हणून मी अनेक काढतो असा जाणकारांचा अंदाज आहे Happy

मी अनु, सत्तरच्या समोश्यांनी आता शंभरी गाठलीय. जणू काही तो अख्खा कांद्यानेच भरलेला असतो.

ओके ओके,
म्हणजे दरवेळी पाॅपकाॅर्न घेत नसाल, म्हणून दरवाढ लक्षात आली नसेल.

एक मुद्दा वर राहिला निरीक्षणात -
कोणाला हिंदी संवाद खटकतात का? म्हणजे आपल्या मातीतील शिवाजी तान्हाजी मावळे जिजाऊ या सर्वांना एखादे वाक्य चवीपुरता मराठीत आणि बाकी सारे हिंदीत. ... कानाला वेगळे वाटते का? रिलेट करायला प्रॉब्लेम होतो का?

मीही हा सिनेमा बघितला काल.
मला फर्स्ट हाफ खूप बोर झाला.
अख्खा फर्स्ट हाफ मध्ये उदयभान कसा क्रूरकर्मा होता हेच दाखवण्यात घालवलाय.
आणि फर्स्ट सीन पासून लास्ट सीन पर्यंत सगळं VFX बघून बोर झालं फार.
महाराष्ट्रात एवढे गडकिल्ले आहेत कुठलाही गड राजगड किंवा सिंहगड म्हणून दाखवता आला असता. पण इथे सगळीकडे VFX बघून निरस झालं.
सेकंड हाफ थोडा इंटरेस्टिंग झाला आहे.
पण तान्हाजी मालुसरे सिंहगडवर फक्त उदयभानाला बघायला जातो आणि नाचतोही वगैरे गोष्टी पाहून अचंबा वाटला....
मी तर लेकासाठी गेले होते. मला बघण्याची इच्छा नव्हती.
त्याला आवडला. मला ठीक वाटला.
ऋन्मेष, आय ऍग्री विथ युअर पॉपकॉर्न पॉईंट दे आर वे टू कॉस्टली.
आणि Vfx पण खूप दाखवलाय.
रिअल लाइफ लोकेशन आणि सेट असं आवडलं असतं बघायला.

थ्री डी मध्ये सगळी पात्रे बहुल्यांएवढी लहान दिसतात आणि ते अरुंद दरीत उतरण्याचे सीन्स अशक्यप्रायच्याही वरचढ दिसतात. टू डी त बघितला असता तर बरे झाले असते असे मला बघताना वाटले.

टू डी त बघितला असता तर बरे झाले असते असे मला बघताना वाटले.
>>>>>
चष्मा काढायचा की मग अध्येमध्ये Happy

पण ते ग्डकिल्ले खरे हवे होते. अति वीएफएक्स बोअर करते. शाहरूखचे ते गाणे धूपसे निकलके.. अख्खा चित्रप्टच असा बनवाल तर कसे चालेल

टू डी त बघितला असता तर बरे झाले>>टू डी मला वाटत सिंगल स्क्रीन्स वर रिलीझ झालाय.
मल्टिप्लेक्स मध्ये 3 डिच आहे
मलाही 2 डी बघायला आवडलं असतं
पण इकडे जवळपास कुठे सिंगल स्क्रीन नाहीय.
मला मंगला ला जावं लागलं असतं

गुटखा बहाद्दर ,तिरप्या तोंडाचा फुकाड्या माणसाला
ताना जी ह्यांच्या भूमिकेत बघणे हीच एक मोठी शिक्षा आहे Sad

कालच्या तरुण भारत मधली बातमी---> साधना माहितीबद्दल धन्यवाद. पण मग अश्या वेळी संपूर्ण चित्रपटात तानाजी चा उच्चार तान्हाजी असा केला आहे का? मी चित्रपट नाही पहिला अजून परंतु ट्रेलर पहिला तेंव्हा ओळख करून देताना अजय देवगण तानाजी मालुसरे म्हणतो तान्हाजी नाही. चित्रपटात उच्चर तानाजी असेल तर एवढे संशोधन करून योग्य वापर झालाच नाही असे म्हणावे लागेल.
ट्रेलर मध्ये पाहिले की उदयभान विचारतो 'मतलब तू पागल है?' आणि तेंव्हा बेड्यात बंदिस्त तानाजी म्हणतो 'हर मराठा पागल है'. चित्रपटात उदयभान ने तानाजी ला पकडून साखळीने बांधले खरेच दाखवले आहे का? असल्यास प्रत्यक्षात असे घडले असल्याची शक्यता खूप कमी आहे. जेवढे इतिहासात वाचले त्यावरून आठवते की तानाजी आणि उदयभान हे शेवटी एकमेकांशी लढता लढताच वीरगतीला प्राप्त झाले. उदयभान ने तानाजी ला बेड्या ठोकल्याचे वाचलेले काही आठवत नाही. आणि कदाचित ठोकल्या असत्या तर तो स्वत: कदाचित जिवंत राहिला असता.
बाकी उदयभानचे काम सैफ ने खूप चांगले केले आहे असे वाचले परंतु मला ट्रेलर मध्येतरी त्याचा लुक राठोड म्हणजे राजपुताच्या ऐवजी मुस्लिम सरदारासारखा वाटला. मुघलांकडे नोकरी करत असले तरी राजपूत लोक त्यांचा पेहराव आणि वागणूक त्यांच्या संस्कृतीला शोभेल असाच ठेवत होते. तसेच वर कोणीतरी म्हणल्याप्रमाणे त्याला क्रूर पण दाखवला आहे. लहानपणी इतिहासात वाचले होते की उदयभान शूर होता. क्रौर्याबद्दल आठवत नाही. खरेच तो चित्रपटात दाखवल्याप्रमाणे क्रूर होता का आणि चित्रपटातील त्याच्या क्रौर्याबद्दलच्या दाखवलेल्या घटना सत्य आहेत का?

निरीक्षणे आणि प्रतिसाद रोचक आहेत.

मधे कोर्टने असा निकाल दिला होता ना की बाहेरचे खाद्यपदार्थ चित्रपटगृहात घेऊन जाणे अलाऊ करावे.

निकालावर पुढच्या कोर्ट मध्ये अपील केलेय.
त्यामुळे फायनल निकाल लागत नाहीत तोवर ते अजूनही अडवतात.पदार्थ आणले असतील तर ठेवून घेऊन पिक्चर नंतर परत देतात.ड्रिंक वर जास्त लक्ष नसते.मी थर्मास मधून घरचा चहा नेते.काही ठिकाणी अजिबात चेक नाही काही ठिकाणी एकदम कडक चेक असतो.
मुळात प्रश्न ते खाद्यपदार्थ महाग विकतात हा नसून ऐन जेवण स्लॉट ला पिक्चर असला आणि बरोबर पथ्य किंवा ऍसिडिटी वाली माणसं असली तर धड बाहेर खाता येत नाही धड ते पॉपकॉर्न, कॉफी,सामोसे पोटाला झेपवत नाहीत.लोकांना खाद्य पदार्थाचा हेल्दी चॉईस हवा.

चित्रपट ठीकठीक वाटला. किल्ल्याची अंतर्गत माहीती काढण्यासाठी बहीर्जी नाईक गेले असे दाखवायला हवे होते. सावित्रीला खूप भारी पातळ दाखवले आहेत, महाराजांना कुबडी फेकून मारण्याचे दृश्य अतर्क्य आहे पण त्यापेक्षाही अतर्क्य हे की महाराज ज्यांना गुरू म्हणून नमस्कार करतात त्यांच रूप घेवून कुणीही कधीही येतो आणि कुणीच ओळखत नाही.

महाराज ज्यांना गुरू म्हणून नमस्कार करतात त्यांच रूप घेवून कुणीही कधीही येतो आणि कुणीच ओळखत नाही.>>हाहा हो ना काहीतरीच दाखवलंय.
आणि अजय देवगण किती horrible दिसतो त्या सीन मध्ये.

Pages