शेवटचे फुलपाखरू
तेव्हा मी अकरा वर्षांचा असेन. भारतातील गजबजलेल्या मुंबई शहरातून आम्हाला मुक्काम हलवायचा होता. माझ्या आई बाबांना येथे येऊन अनेक वर्षे झाली होती आणि आता माझ्या वडिलांची पुन्हा बदली झाली होती. ते ब्रिटिश फौजेत आर्मी ऑफिसर होते तसेच फुलपाखरांचे गाढे अभ्यासक होते. माझा जन्मही येथेच झाला होता. येथून आम्हाला परत नंतर इंग्लंडला जायचे होते. माझ्या वडिलांनी मला सांगितले की भारत आता एक स्वतंत्र देश असून आम्ही आपल्या मायदेशी म्हणजे इंग्लंडला परत जायला हवे.
ह्या बदल्यांमुळे जी अनिश्चिततेची भावना निर्माण होते त्या विरुद्ध मी माझ्या मनात भक्कम भिंतच उभी केली होती. माझे निसर्गवेड माझ्या कुटुंबाची कुठेही बदली झाली तरी मला भरपूर करमणूक उपलब्ध करून देत असे. त्यामुळे बदली होण्याला समस्या न मानता मी एक आनंददायक घटना मानत आलोय.
मला आठवते तेव्हापासून मी पक्षीनिरीक्षण, जंगल भ्रमण, शंख शिंपले जमविणे आदि गोष्टी करीत आलोय. अरबी समुद्राच्या किनार्यावर वसलेल्या ह्या वेगाने पसरणार्या शहरात आल्यानंतर माझ्या लक्षात आले की येथील जंगलात स्तंभित करून सोडण्याइतपत वैविध्य रंग रूप आणि सवई असलेली फुलपाखरे आहेत. मी हळूहळू ती फुलपाखरे जमवू लागलो. मला ती जमविण्याचे जणू वेडच लागले.
आता माझ्याकडे कितीतरी प्रकारच्या फुलपाखरांचा छान संग्रह आहे. मी ती पद्धतशिरपणे फुलपाखरांसाठीच्या खास ट्रे मध्ये लेबल लावून पक्की रोवून ठेवली आहेत. त्यामध्ये मग सर्व आकाराची, सर्व रंगाची फुलपाखरे होती. गडद निळ्या रंगापासून, गडद पिवळा, नारिंगी, चमकदार पाचुसारखे आदि. पण सर्वच मोहित टाकणार्या रंगाची फुलपाखरे पकडणे सोपे नसल्यामुळे मला माझ्या ह्या वैविध्यपूर्ण संग्रहाचा अभिमान होता.
पण गेल्या चार वर्षात नेहेमी हुलकावणी देणारे एक सुंदर फुलपाखरू मला दिसायचे. ते म्हणजे राजस रुपडे लाभलेले जवळपास दहा सेंटीमीटरचा पंख विस्तार लाभलेले ग्रेट ऑरेंज टीप फुलपाखरू. मागील वर्षीच्या ख्रिसमसला माझ्या एका मित्राने मला फुलपाखरांबद्दलचे एक सुंदर रंगीत पुस्तक भेट दिले होते. ह्या पुस्तकात ग्रेट ऑरेंज टीप फुलपाखराबद्दल एक संपूर्ण पान भरून वैज्ञानिक माहिती दिलेली होती. सह्याद्रीच्या घाटातील पितश्वेत कुळातील ते एक मोठे फुलपाखरू होते. मी उल्हसित झालो. मनोमनी ठरवून टाकले की माझ्या संग्रही एक तरी हवेच. मी ते पकडणारच!
पण एक समस्या होती – अर्थात मी त्याला चॅलेंज म्हणेल – ती म्हणजे ग्रेट ऑरेंज टिपचा अधिवास. ते नेहेमी उंचावर राहते. जंगलातून वाहणार्या झुळुकेवर स्वार होऊन हळुवारपणे उडताना ते मला दिसे. कधी कधी शहराच्या मध्यभागी असलेल्या जंगलात उंच वृक्षांच्या पर्णसांभारावरुन अलगद विहरताना ते मला दिसे. मी कितीदा तरी आणि कितीही उंचावरच्या फांदीवर चढलो तरी ते माझ्या हातातील फुलपाखरे पकडायच्या जाळीत कधीही बंदिस्त झाले नाही.
उन्हाळा सुरू झाला तसे आमच्या घरच्या सामानाची आवराआवर सुरू झाली. माझे कोकण किनारपट्टीवर जमविलेलेल शंख, शिंपले, फुलपाखरे आदींचे डबे सुद्धा बांधबुंध होत होते. पण मी माझी फुलपाखरे पकडायची जाळी आणि फुलपाखरे मारण्याचा जार सामानासोबत गुंडाळल्या जाण्यापासून मी सांभाळून ठेवत होतो. आता माझा बहुतेक वेळ घराबाहेर जात होता. बहुदा मी शहराच्या मध्य भागातील गर्द वनात भटकत असे.
गर्द झाडीत दिवसासुद्धा रातकीड्यांची किरकिर चालत असे. स्वच्छ सूर्यप्रकाशात एखादा रंग बदलणारा सरडा त्याचे नृत्य करताना दिसे. समुद्रावरची स्वच्छंद हवा नागला बंदराकडील जंगलातील वृक्षराजीत सळसळत असे. कितीतरी प्रकारची फुलपाखरे रानफुलांभोवती पिंगा घालीत असत. नाही तर उगाच हवेच्या झुळुकेवर स्वार होऊन अलगद तरंगत. पण ग्रेट ऑरेंज टीप मात्र नेहेमीप्रमाणेच झाडाच्या शेंड्यावर भिरभिरताना दिसे.
एके दिवशी सकाळी, मला शुभ्र पांढरा रंग जवळपास फडफडताना दिसला. बघतो तर काय एक सुंदर ग्रेट ऑरेंज टीप – ज्याचे पंख पांढरे शुभ्र आणि पंखाची टोके नारिंगी असतात – एका जास्वंदीच्या लालभडक फुलावर विसावले होते. त्याने फुलातील मधुरस शोषायला सुरुवात केली तसे त्याचे पंख थरथरले. मी जाग्यावरच थबकलो. फुलपाखरांना कुठलीही हालचाल चटकन जाणवते. काही क्षण मी तसेच जाऊ दिले आणि नंतर मी माझी जाळी हळूहळू उंचाऊ लागलो. माझे हृदय जोरात धडधडायला लागले. माझ्या माथ्यावरून घाम ओथंबून भुवयांवरून टपकू लागला.
अचानक त्या राजबिंडया फुलपाखराने उड्डाण भरले आणि ते दुसर्या फुलावर जाऊन विसावले. मी वेगात जाळी फिरविली आणि दुसर्या क्षणाला ते सुंदर बक्षीस माझ्या जाळीत फडफडत होते. माझा माझ्या तकदिरावर विश्वासच बसत नव्हता!
हळुवारपणे मी जाळीत हात टाकला आणि त्या फुलपाखराचा वक्षभाग हळूच चिमटीत पकडला. आता मी त्याला सोबतच्या जारमध्ये टाकणार होतो. त्यात असलेले विषारी फॉर्मल्डेहाईड बाकीचे काम करणार होते. त्याला चिरनिद्रेत घेऊन जाणार होते.
पण माझा हात थबकला. मीच माझ्या दुसर्या हातातल्या जारकडे बघू लागलो. माझ्या चिमटीत पकडलेला तो इवलासा जीव घाबरून गेला होता. जीवाच्या आकांताने पंख फडफडवत होता. त्याच्या पांढर्या शुभ्र पंखांची भडक नारिंगी टोके मला भुरळ घालीत होती.
अचानक मी ते सुंदर फुलपाखरू हात उंचाऊन स्वच्छ आसमंतात मुक्त केले. का कोण जाणे, पण माझ्या शरीरातून अत्यानंदाची अनुभूति मला झाली. मी त्या नभाच्या राजस राजाला हवेच्या झुळुकेवर स्वार होऊन विहरताना बघू लागलो. ते हळुवारपणे झाडाच्या शेंड्याकडे उडत गेले आणि माझ्या नजरेआड झाले.
दोन दिवसांनंतर मी सुद्धा आकाशात भरारी घेतली आणि हिरवा शालू परिधान केलेल्या मुंबई शहराला सोडून पुढील जीवनप्रवासासाठी निघालो. मला अज्ञात अशा एका घरी जाण्यासाठी – पण माझ्या आईबाबांच्या देश असलेल्या इंग्लंडला. मुंबई शहर आणि ते माझे आवडते जंगल माझ्या नजरेखालून जाईपर्यंत मी पापणीसुद्धा लवली नाही. नंतर मी डोळे घट्ट मिटून घेतले तरीही त्यातून अश्रु ओघळत राहिले. माझे सुंदर फुलपाखरू तेथे खाली कुठेतरी वृक्षांच्या पसार्यात स्वच्छंदपणे बागडत असेल! नाही का? कदाचित ह्यालाच प्रेम म्हणत असावे!
डॉ. राजू कसंबे,
सहाय्यक संचालक - शिक्षण, बीएनएचएस, मुंबई
छान आहे गोष्ट
छान आहे गोष्ट
आवडली ही गोष्ट
आवडली ही गोष्ट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लेख. तुम्ही इंग्लंडमध्ये
मस्त लेख. तुम्ही इंग्लंडमध्ये गेलात ते परत इकडे कधी आलात? आणि प्रॉपर इंग्लंडचे का तुम्ही?
@बोकलत जी : काल्पनिक कथा आहे.
@बोकलत जी : काल्पनिक कथा आहे. मी इंग्रज नाही. पूर्वी फुलपाखरे पकडायला मान्यता होती. आता नाही. म्हणून जुना कालावधी घातलाय. नाहीतर मी फुलपाखरे पकडतो म्हणून मलाच पकडायचे. असो. धन्यवाद!!
मस्त लेख. तुम्ही इंग्लंडमध्ये
मस्त लेख. तुम्ही इंग्लंडमध्ये गेलात ते परत इकडे कधी आलात? आणि प्रॉपर इंग्लंडचे का तुम्ही?>>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
कै च्या कैच.
कै च्या कैच.