ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी

Submitted by योकु on 17 December, 2019 - 13:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साग्रसंगीत रेस्पी. तर साहित्य -
- दोन वाट्या ज्वारीचं ताजं पीठ
- दोन मध्यम मोठे कांदे जरा जाडसर चिरून
- दोन / तीन हिरव्या मिरच्या मध्यम आकारांत तुकडे करून
- थोडा कढिलिंब
- चार - पाच लसणीच्या कळ्या चकत्या करून
- मूठभर कोथिंबीर; बारीक चिरून
- अर्ध लिंबू (माहीताय, फोटोत एक पूर्ण आहे पण त्यातलं अर्धच वापरलं नंतर)
- शेंगदाणे मूठभर
- अर्धी- पाऊण वाटी तेल, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहोरी, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, मीठ, साखर चवीनुसार.
- तीन - साडेतीन वाट्या गरम पाणी

IMG_0043.jpg

क्रमवार पाककृती: 

लोखंडी कढई भरपूर तापू द्यावी, त्यात तेल तापत घालावं आणि मोहोरी, जिरं तडतडलं की लसूण घालून जरा लाल होउ द्यावा.
यात आता कांदा घालून जरा पाढंरटला की शेंगदाणे, मिरच्या घालाव्यात. कांदा शेंगदाणे नीट होऊ द्यावेत. नंतर कढीपत्ता घालून काही सेकंद परतावं.
यात आता पीठ घालून त्यावर हळद घालावी आणि परतायला सुरुवात करावी. पिठावर हळद घालून मग परतल्यांनी -

हळद जळत नाही
सगळ्या पिठाला नीट खालून वरपर्यंत हलवल्या जातंय की नाही हे हळदीच्या रंगापायी समजतं

मंद आचेवर पीठ चांगलं खमंग सुवास दरवळेपर्यंत भाजावं. हे जरा कष्टाचं काम आहे कारण पीठ भाजायला २० एक मिनिटं सहज लागतात.
यात आता थोडी कोथिंबीर, मीठ, साखर, लाल तिखट घालून नीट मिसळून घ्यावं आणि उकळीचं गरम पाणी थोडं थोडं घालत उकडपेंडी शिजू द्यावी.
शेवटी झाकण घालून दोन दणदणीत वाफा येऊ द्याव्यात. अगदी वाढतेवेळी वरून लिंबाचा रस घालावा, थोडी कोथिंबीर पेरावी आणि अगदी गरमगरमच खायला घ्यावी. सोबत काही कुरकुरीत असेल शेव वगैरे तर फारच उत्तम. सध्या आमचा बाळोबा खायला लागल्यानं लाल तिखटाचं प्रमाण बर्‍यापैकी कमी आहे.

त्याल पाहून घ्या, येवढं हवं ब्रका

IMG_0044.jpg

तयार झालीय. या... Happy

IMG_0045.jpg

वाढणी/प्रमाण: 
उपाहार.
अधिक टिपा: 

पोटभरीचा प्रकार आहे. प्रवासाला जातांना वगैरे किंवा काही बाहेरची काम उशिरापरंत करायची असतील किंवा जेवायला वेळ होणार असेल तर करायला मस्त प्रकार आहे. सोबत ताक वगैरे असेल तर ब्रंच; ब्रेफा फॉर डिनर ला उत्तम Happy
चिंचेचा कोळ असेल तर त्याच पातळ पाणी करून त्यात शिजवावी जास्त चांगली चव येते. अर्थांत नंतर लिंबू नाही वापरायचं .

माहितीचा स्रोत: 
पारंपरिक कृती आहे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकतर कढई सणसणीत तापली नाही आणि फोटो सुद्धा टाकलेत,
अडमीन plz इकडे लक्ष द्या,योकुंचा id 100 percnt हॅक झालाय बघा Lol
मस्तच रेसिपी

मस्त रेसिपी आणी फोटो, आम्ही कणकेची करतो आता ज्वारिच्या पिठाची करुन बघेन.

छान रेसिपी. माझ्या साबा गव्हाच्या पिठाची करतात ती पण टेस्टी होते, आता अशी करून बघेन. तुमचा बाळोबा ही खातो म्हटल्यावर आमच्या बाळालाही देऊन बघते Happy

फोटोमुळे प्रतिक्रिया द्याविशी वाटतेय Wink
रेसिपी नेहमीप्रमाणेच डिटेलवार. कदाचीत करून पाहिन. इथे काही ताजं पीठ मिळायचं नाही. पण प्रयत्न करायला हरकत नाही.
फोटोचं मनावर घ्याच (इतर रेर्सिपींसाठी)

छान!
अगणित वर्षांत उकडपेंडी खाल्लेली नाही.

उकडपेंडी हा प्रकार कधीच चाखला नाही. पण ही पाकृ भारीच दिसतेय. करुन पाहीन असं फक्त म्हणत नाही, तर खरच करुन पाहीन. नक्कीच भारी लागेल.

उकडपेंडी घाटाव करत नाहीत का? की आमच्याच जुन्नर भागात होत नाही फक्त?
एक शंका: उप्पीट रवाळ असते. हे पिठाचे केल्याने पिठूळ लागत नाही का?

झकास.

. हे पिठाचे केल्याने पिठूळ लागत नाही का?
>>
नाही लागत, नीट शिजली की मस्त लागते.

वा मस्त ! पाकृ. करणेत येईल!
मला उकड म्हटले की तांदळाचीच आठवते ! फारफार तर भाजणीची पण भाजणीच्या पीठाने अ‍ॅसिडीटी होते लगेच म्हणून करत नाही. आता ही करुन पहाते.

मस्त! फोटो व फोटोत लोखंडी कढई बघून जीव सुखावला. मी पण करते अशीच फक्त आयदर कांदा आॅर लसूण! लिंबाच्या ऐवजी दह्याची पण चांगली लागते.
अवांतर: माझ्या शेजारच्या काकूंनी ग्वाल्हेरहून लोखंडी ठोक्याची जाडजूड भक्कम कढई आणलीये.... फारच प्रेमात पडलेय त्या कढईच्या... काल स्वप्नातही तीच कढई दिसली .... ती मिळेपर्यंत काही चैन पडणार नाही.

मस्त रेसिपी आणि फोटो दिलेत ते बेस्ट. आमच्या इथे मिळणारे "दोन मध्यम मोठे कांदे जरा जाडसर चिरून" घेतले तर ताटात असलेल्या सर्व साहित्यापेक्षा थोडे जास्तच भरले असते Happy

फोटो एकदम तो. पा. सु..
मस्त रेसिपी.
मीही थोड्याफार फरकाने करत असते उकडपेंडी.

फोटो भारी, बघूनच पाकृ करायची इच्छा होते.

कढई काळी का पडली असावी? याआधीच्या एका चर्चेत योकूच्या गोऱ्यापान कढईने मानाचे स्थान पटकावले होते असे आठवतेय...नजर लागली की काय...

Pages