चौकटींतील रत्ने

Submitted by कुमार१ on 17 December, 2019 - 10:16

लेखाचा पूर्वार्ध:

रोज आपण एखादे तरी छापील वृत्तपत्र चाळतो. त्यात बातम्या आणि जाहिरातींव्यतिरिक्त काही नियमित सदरे असतात. वृत्तपत्रानुसार सदरांचे स्वरूप वेगवेगळे असते. पण बहुतेकांत समान असणारी एक गोष्ट म्हणजे शब्दकोडे. शब्द्कोड्यांचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे काळ्यापांढऱ्या चौकटीयुक्त शोधसूत्रे दिलेले कोडे. त्यात उभ्या आणि आडव्या रांगेत शोधायच्या शब्दांचा सुरेख संगम होतो. ही कोडी नियमित सोडविताना सामान्यज्ञान, भाषा, इतिहास, भूगोल, विज्ञान, संस्कृती आणि समाज अशा अनेक क्षेत्रांत विहार करता येतो. शब्दकोडी सोडवणे हा माझा आवडता छंद असून तो आता माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालेला आहे. मात्र हे सहजासहजी घडलेले नाही. त्यासाठी विशिष्ट परिस्थिती कारणीभूत ठरली. त्यामुळे एके काळी ‘डोक्याला पीळ’ वाटणारी आणि न्यूनगंड निर्माण करणारी कोडी आता माझ्यासाठी आनंददायी आहेत. कुठल्याही छापील कागदावर कोडे नजरेस पडले की मी त्याकडे चुंबकाप्रमाणे आकर्षिला जातो. सुमारे २० वर्षांच्या माझ्या या शब्दप्रवासाचे हे अनुभवकथन.

महाविद्यालयीन जीवनात छापील वृत्तपत्र बारकाईने वाचत असे. तेव्हा आतल्या पानाच्या एका कोपऱ्यात खालच्या बाजूस शब्दकोडे दिसायचे. पण मुद्दामहून त्याच्या वाटे जावेसे कधी वाटले नाही. रविवारच्या अंकातील भले मोठे कोडे पाहून तर त्याची लांबूनच भीती वाटायची. पुढे संसारात पडल्यावर मन रिझवणाऱ्या अनेक गोष्टी मिळाल्या. त्यामुळे वृत्तपत्र बारकाईने वाचणे कमी झाले. आता वाचण्यापेक्षा चाळणेच अधिक असे. त्यामुळे कोड्याचे पान तर दुर्लक्षित होई.

1200px-CrosswordUSA.svg_.png

यथावकाश आयुष्याच्या मध्यमवयीन टप्प्यावर आलो. आता पूर्वीपेक्षा फुरसत मिळू लागली. पेपरातील ठराविक बातम्या वर्षानुवर्षे वाचून आता त्यातले नाविन्य संपले होते. म्हणून आता त्यातील सदरांकडे अधिक लक्ष जाऊ लागले. तरीसुद्धा कोड्याच्या भागावर फक्त नजर टाकत असे. फारतर त्यातले दोनचार शब्द तोंडीच जमतात का ते बघे. मग जरा अवघड वाटले की तो नाद सोडी. मग एकदा मनाचा हिय्या करून हातात पेन घेतले. म्हटलं, बघू तरी प्रयत्न करून. सुरवात अर्थातच मराठी वृत्तपत्रातील कोडयापासून केली. त्यातल्या शोधसूत्रांवर नजर टाकता असे दिसले, की शब्दांचा आवाका खूप मोठा आहे. भाषा व सामान्यज्ञानापासून ते क्रीडा व चित्रपटांपर्यंत अनेक विषय त्यात अंतर्भूत आहेत. प्रथम चित्रपटासंबंधीचे शब्द सोडवायला घेतले. त्यातले काही जमले. मग पुढची पायरी होती खेळ व खेळाडूंबद्दलचे शब्द. एकंदरीत त्यावर क्रिकेटचा वरचष्मा असतो. त्यामुळे ते शब्द तसे लवकर जमले. मात्र या व्यतिरिक्तच्या विषयांशी संबंधित शब्द सोडवणे हे आव्हान होते. ते पेलत नसे आणि मग मी कोडे सोडून देई. तीसेक शब्दांपैकी ५-६ सुटले तरी विरंगुळा होई. संपूर्ण कोडे सोडवणे हे काही येरा गबाळ्याचे काम नाही, एवढा बोध एव्हाना झाला होता.
अधूनमधून इंग्रजी पेपर चाळत असे. मात्र त्यातल्या इंग्रजी क्रॉसवर्डकडे कधी ढुंकूनही पाहिले नाही. “हे आपल्यासाठी नसतेच, ते फक्त फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या मंडळींसाठी असते”, असा पूर्वग्रह मनात होता. आता मराठी कोड्यात रोज डोकावू लागलो. अजून एक पाऊल पुढे टाकले. कोडे एकट्याने सोडवण्यापेक्षा थोडी कुटुंबाची मदत घेऊ लागलो. एखाद्या शोधसूत्राचे उत्तर अगदी तोंडावर येतंय असे वाटूनसुद्धा योग्य शब्द काही जमत नसे. पण काही शब्द आमच्या एकत्रित प्रयत्नातून सुटल्यावर झालेला आनंद काय वर्णावा?

या दरम्यान आयुष्यात एक महत्वाची घडामोड झाली. ध्यानीमनी नसताना एके दिवशी परदेशगमनाची संधी दार ठोठावत आली. कौटुंबिक कारणास्तव मला तिकडे एकटेच जावे लागणार होते आणि तशीच काही वर्षे एकट्याने काढायची होती. प्रथम जाताना थोडी वाचायची पुस्तके बरोबर नेली. तिकडे पोचल्यावर सुरवातीस नवे संगणकीय आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान शिकत असल्याने कार्यमग्न राहिलो. मात्र ६ महिन्यांनतर एकटेपणा जाणवू लागला. रोजची संध्याकाळ आणि साप्ताहिक सुटीचे २ दिवस अगदी भकास वाटू लागले. साहित्य वाचण्यात काही वेळ जाई. टीव्ही पाहायची विशेष आवड नव्हती आणि तेव्हा व्यक्तिगत जालसुविधाही नव्हती. नुसत्या वाचन-लेखनावर फावला वेळ काढायला एक मर्यादा असते. त्यामुळे आता एखादा छंद शोधणे भाग होते. तिथल्या ६ महिन्यांच्या वास्तव्यानंतर १५ दिवस सुटी मिळाली आणि भारतात आलो. एका दुपारी शांत बसलो असता खोलीतील पेपरांच्या रद्दीने माझे लक्ष वेधले. आता एक विचार सुचला. रोजच्या पेपरातील एक अशी २५-३० मराठी कोडी कापून बरोबर नेली तर? वाचनाला थोडा आधार आणि बुद्धीला चालना असे दोन्ही हेतू त्यात साध्य होणार होते. मग धडाधड ती कोडी कापून घेतली आणि ती ‘शिदोरी’ प्रवासाच्या बॅगेत ठेवली.

आता हा कोड्यांचा गठ्ठा घेऊन पुन्हा तिकडे परतलो. मग रोज संध्याकाळी एक छोटे आणि सुटीच्या दिवशी भलेमोठे कोडे सोडवायचे ठरवले. निव्वळ वाचनापेक्षा आता वेगळा अनुभव येऊ लागला. शब्द शोधताना मनाची एकाग्रता होते. अवघड शब्द शोधताना तर मेंदू अगदी तल्लख होतो. जेव्हा असा एखादा शब्द खूप प्रयत्नांती जमतो तेव्हा तर शरीरात आनंदजनकांची निर्मिती होते. अजून एक गंमत सांगतो. एखादा शब्द जाम सापडत नसला की तेव्हा आपण त्याचा नाद सोडतो. पण, त्या दिवसभर तो सापडेपर्यंत ते शोधसूत्र आपल्या डोक्यात असते. मग अगदी एकदम एखाद्या क्षणी डोक्यात वीज चमकावी तसे आपल्याला ते उत्तर मिळते. अशा प्रकारे कोडे सुटण्याची ठिकाणे बऱ्याचदा स्वच्छतागृह, रस्ता किंवा व्यायामशाळा असतात, हा स्वानुभव आहे. आपण जेव्हा या ठिकाणी असतो तेव्हा आपला मेंदू एक प्रकारे विश्रांतीच्या अवस्थेत असतो आणि त्यामुळे असे घडत असावे असा माझा अंदाज आहे. तेच जर आपण कोड्याचा कागद जवळ घेऊन खूप वेळ उत्तर शोधत बसलेलो असू, तर मेंदूच्या थकव्यामुळे उत्तर काही येत नाही. कधीकधी तर ही शोधप्रक्रिया स्वप्नात देखील चालू राहते आणि त्यात ‘युरेका’ चा क्षणही येतो. पण जागे झाल्यावर मात्र त्याबद्दल काहीही आठवत नाही !

जसा मी या शब्दखेळात मुरु लागलो तशी कोड्यांची काही वैशिष्ट्ये लक्षात आली. त्यातले काही अवघड शब्द सामान्य शहरी जीवनात प्रचलित नसतात. ते केवळ कोडे अवघड करण्यासाठी योजलेले असतात. ठराविक दिवसांनंतर ते कोड्यात पुन्हा येत राहतात. अशा तऱ्हेने ते आपल्या ओळखीचे होतात. उदाहरणार्थ, हे काही शब्द पहा:

१. कापा, बरका आणि सकल्या या फणसाच्या जाती
२. माळवद व दारवंट हे घराशी संबंधित शब्द

३. वापी आणि बारव हे विहिरीचे प्रकार
४. बुरणूस, बुरखुड आणि बेंबारा हे विचित्र शब्द ! जर मी कोडी सोडविली नसती, तर हे आयुष्यात कधी ऐकलेही नसते.

अन्य काही शब्द प्राचीन किंवा ऐतिहासिक असतात. सध्याच्या व्यवहारभाषेसाठी त्यांचा काही उपयोग नसतो. पण एकदा का आपण कोड्यांच्या राज्यात विहार करू लागलो, की ते आपले मित्र होतात. अशा प्रकारे कोडी सोडवायचा माझा परिपाठ चालू होता. २-३ महिन्यांत त्याला गती आली. मग भारतातल्या घरी कळवून टाकले की रोजच्या पेपरातले कोडे कापून ठेवा. पुढे जेव्हा माझी सहामाही चक्कर होई, तेव्हा तो साठलेला गठ्ठा घेऊन येई. साधारण वर्षभर ही कोडी सोडवल्यावर आत्मविश्वास आला. तरीसुद्धा प्रत्येक कोडे १००% सुटले असे नसायचे. विशेषतः कोड्यातले पौराणिक, कालबाह्य, संस्कृत वा अरबी/फारसी मूळ असलेले शब्द येत नसत. तिथे सरळ शरणागती पत्करून त्याचे उत्तर पुढच्या अंकात पाहायला लागे. भाषाज्ञान हे अफाट आहे आणि आपले आयुष्य मात्र मर्यादित. त्यामुळे आजही वीसेक वर्षे कोडी सोडविल्यानंतरही मी एखादे कोडे (विशेषतः रविवारच्या अंकातले) पूर्ण सोडवेनच, असे छातीठोक सांगत नाही.
नुकताच घडलेला हा किस्सा. प्रवासासाठी म्हणून बॅगेत एक कापून ठेवलेले मोठे कोडे होते. ते ९९% सुटले. फक्त एक शब्द अडला. शोधसूत्र होते “मोठी पळी”. चार अक्षरी शब्द. त्यातल्या १,२ व ४ क्रमांकाची अक्षरेही जमली. पण तिसरे काही सुचेना. म्हणजेच शब्द असा होता: “कब *र”. मी होतो ८ तासांच्या प्रवासात. आजूबाजूच्या एकदोघांना विचारून पाहिले. पण उपयोग नाही. शेवटी माझ्या एका मित्रांना मोबाईलमधून संदेश पाठवला. त्यांनी थेट शब्दकोशात पाहून उत्तर कळवले. ते होते “कबगीर”. या शब्दाचे मूळ अरबी आहे. मग या कोडेनिर्मात्याला मनातल्या मनात दूषणे दिली, “कुठले कालबाह्य शब्द घालतात लेकाचे”. माझा तो प्रवास संपला. आता गम्मत पुढेच आहे. आमच्या एका परिचितांकडे एक उर्दूभाषिक बाई घरकामाला येतात. त्यांना सहज विचारले, की तुम्ही ‘कबगीर’ ऐकले आहे का. त्या ताडकन उत्तरल्या, “हो, माहित हाये की ! अवो, तो खोलगट झारा असतो ना त्यालाच आम्ही कबगीर म्हणतो. सातवीपर्यंत शालेय शिक्षण झालेल्या या बाईंचे ते सामान्यज्ञान पाहून मी अवाक झालो आणि त्यांना मनोमन वंदन केले !

शब्द्कोड्यांचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात:
१. शोधसूत्रानुसार त्याचा सरळ अर्थ घ्यायचा किंवा त्याचा समानार्थी/भावार्थी शब्द शोधायचा.
२. गूढ कोडी : यात शोधसूत्राच्या ‘अर्थाला’ फारसे महत्व नसते; पण त्यातील शा‍ब्दिक करामतीकडे विशेष लक्ष द्यायचे असते. हे सूत्र बरेचदा एकशब्दी नसून ते शब्दसमूह किंवा वाक्य असते. साधारणपणे मराठी नियतकालिकांतील कोडी ही पहिल्या प्रकारची असतात. वरील दुसरा प्रकार इंग्रजी कोड्यांत नियमित वापरला जातो. किंबहुना प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकांत रोज दोन्ही प्रकारची कोडी देतात. त्यांची शीर्षके ‘easy’ आणि ‘cryptic’ अशी असतात.

साधारण २००५च्या सुमारास माझा आंतरजालावरचा विहार हळूहळू वाढू लागला होता. काम करता करता मध्येच विरंगुळा म्हणून काही मराठीतले वाचायला मिळते का, याचा शोध घेऊ लागलो. माझ्या कार्यालयात तेव्हा कोणी मराठी भाषिक नसल्याने मी मराठी बोलण्यावाचण्यासाठी अगदी तडफडत होतो. असेच एके दिवशी अचानक जालावर ‘मायबोली’ संस्थळाचा शोध लागला. तिथे छान रमू लागलो. पुढे २००७मध्ये असाच अचानक ‘मनोगत’ संस्थळाचा शोध लागला. तिथल्या एका वैशिष्ट्यपूर्ण सदराने तर एकदम अलिबाबाचा खजिनाच सापडला ! ते सदर होते ‘गूढ शब्दकोडी’. मराठीतील अशी कोडी मी प्रथमच पाहिली. याहून एक अद्भूत गोष्ट म्हणजे ती चक्क जालावरच टिचकी मारून सोडवायची होती. हे अजब होते. अगदी हरखून गेलो. या कोड्यातली शब्द्सूत्रे विविध प्रकारची असतात. गमतीदार, गूढ, विचित्र आणि अजिबात अर्थबोध न होणारी, असे अनेक प्रकार त्यात असतात. एक उदाहरण देतो:

शोधसूत्र असे आहे: ‘तेजातून अंगावरच्या माराच्या खुणा’ !
आहे की नाही विचित्र? याचे उत्तर असते “प्रभावळ”.

असेच असंख्य नमुने त्यात असतात. अशा पहिल्याच कोड्यावर नजर टाकता मला जाणवले, की आपल्याला काही हा प्रकार जालावरच १०-१५ मिनिटांत सोडवायला जमणार नाही. हे म्हणजे डोक्याला जबरी भुंगा लावणारे आहे. मग एक युक्ती केली. साप्ताहिक सुटीच्या आदल्या दिवशी ते कोडे सरळ कागदावर छापून घेतले. मग सुटीच्या दिवशी ते शांतपणे घरी बसून सोडवू लागलो. सुरवातीस डोके पूर्ण बधीर होऊन जाई. सुमारे ६ महिने ही उमेदवारी केल्यावर ती कोडी उमगू लागली.

सुमारे १० वर्षे नियमित कोडी सोडवल्यानंतर आत्मविश्वास आला. मग त्यांची आवड निर्माण झाली आणि आता तर त्यांचे व्यसनच लागले आहे. काही दैनिकांत कोडी खूप विचारपूर्वक तयार केली जातात. निव्वळ एक शब्द शोधण्यापलीकडे त्यांची व्याप्ती असते. एखादी लांब म्हण अथवा वाक्प्रचार देखील ओळखायला दिला जातो. अन्य काही दैनिकांची गंमत सांगतो. ती साधारण ‘बस अथवा रेल्वे स्थानकावर खपणारी’ या प्रकारातील असतात. त्याच्या आतल्या पानात तर रोज महाशब्दकोडे असते. त्यातले जवळपास ८०% शब्द हे चित्रपट आणि क्रिकेटशी संबंधित असतात. चित्रपटातील नायक/नायिकेची नावे देऊन त्याचे नाव ओळखा, इतपत तो शब्दशोध असतो. ही दैनिके “कोड्यांसाठी खपणारे पेपर” म्हणून प्रसिद्ध असतात. माझ्यावर रेल्वे स्थानकावर उशीर झालेल्या गाडीची वाट पाहण्याचा प्रसंग बऱ्यापैकी येतो. त्या वेळात मी कधीकधी एखाद्या तथाकथित प्रतिष्ठित दैनिकाऐवजी असा ‘कोडेवाला पेपर’ घेणे पसंत करतो. उगाचच बातम्यांचा गदारोळ चघळत बसण्याऐवजी अशी मोठी मनोरंजक कोडी इकडेतिकडे बघत सोडविण्यात वेगळीच गम्मत असते ! त्यानिमित्ताने मोबाईलशी उगाचच चाळा करणेही थांबते. जेव्हा स्थानकावर येणारी एखादी गाडी चढत्या क्रमाने वेळेचा उशीर करू लागते तेव्हा आपली जाम चिडचिड होत असते. त्यावर उतारा म्हणून ही कोडी अगदीच उपयुक्त ठरतात.

मराठी कोड्यांच्या अशा (शब्दशः) तपश्चर्येनंतर माझा शब्दसंग्रह चांगलाच वाढला. चौकटींमधून शिकलेले नवे शब्द ही माझ्यासाठी भाषिक साठ्यातील मौल्यवान रत्ने आहेत. कोडी सोडविण्याच्या प्रक्रियेतून मेंदूला एक वेगळे प्रशिक्षण मिळाले. विचारक्षमता रुंदावली तसेच माझ्या लेखनासाठीही चांगलाच फायदा झाला. पण म्हणून निव्वळ तृप्तीचा ढेकर देऊन चालणार नव्हते. आता मला दुसरे काही खुणावू लागले होते. अनेक वर्षे मी इंग्रजी कोडी निव्वळ लांबूनच बघत असे. आता त्यांना हात घालावा असा मनाने कौल दिला. आयुष्यभर फक्त नियमित टेकडी चढण्याऐवजी आता एखादा गड चढण्यास सुरवात केली पाहिजे अशी जाणीव झाली.
इंग्रजी शब्द्कोड्यांची व्याप्ती मराठीच्या तुलनेत अधिक आहे. नेहमीच्या चौकटीयुक्त कोड्यांव्यतिरिक्त असणारे अन्य काही प्रकार तर स्तिमित करणारे आहेत. तेव्हा दमादमाने मी तो एकेक प्रकार हाताळायचा संकल्प केला. गेली १० वर्षे त्यांतही मुरलो आहे. ती सोडविण्याचा प्रवास हा अशक्य, अवघड, प्रयत्नांती जमणारे आणि काही प्रमाणात सोपे अशा खडतर टप्प्यांतून झालेला आहे. तो करीत असताना सुरवातीस ठेचकाळलो, मग पायावर नीट उभा राहिलो आणि अखेर चालण्याची गती वाढत गेली. त्याचा वृत्तांत पुढील भागात सादर करेन.
************************************************************************************
क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच रंजक लेख
बरेच नवीन शब्द कळले
क्रमशः वाचून बरं वाटलं
लिहीत रहा
पुलेशु

छान छंद आहे.
आमच्या ओफिसातला एक सहकारी कोडं सोडवत असे. कोकण, खानदेश, विदर्भ इकडचा एकेक जण असला की कोडे सुटायचे आणि नवे शब्द कळायचे.
कोकणातल्या खाड्या छोट्या होडक्याने पार करतात ती 'तर'. हा शब्द इतरांना माहीत नसतो.
कराड, सांगलीकडे भाकरीसाठी काही चटणी, भाजी, आमटी लागते त्यास भिकारी 'कोरड्यास' म्हणतात. 'कोरड्यास' वाढ गे माय अशी ओरड करत फिरतात.

जात्याचा दगड ( कुरुंद) चांगला असला की भराभर दळलं जातं आणि त्यास वारंवार 'टाकी' लावावी लागत नाही.

असे काही शब्द स्थानिक असतात ते एकट्याला सुटत नाहीत.

त्यांचं आवडतं कोडं जत्रा साप्ताहिकातलं लोखंडे यांचं. आठवडा मुदत असायची. एकदा एक शब्द ' काव्यातला दहीभात' ? होता. तो सुटला नाही. नंतर उत्तर आलं - 'दध्योदन'. उठी उठी गोपाळा गाण्यात आहे हा शब्द. लवकर उठ, दहीभात खा आणि धेनु चरायला घेऊन जा रे (कृष्णा).

वरील सर्वांना धन्यवाद !

* वेगळ्या अर्थानं 'कोडगा' >>>> Bw

* काही शब्द स्थानिक असतात ते एकट्याला सुटत नाहीत >>> + ११

लेख आवडला.

कोडे सोडवणे फार वर्षांपूर्वी आवडीचे काम होते.त्यातही घरातल्या कोणी अर्धवट कोडे सोडवले असेल तर चिडचिड व्हायची.मटा मध्ये फक्त रविवारी शब्दकोडे यायचे.(बऱ्याच वर्षांपूर्वी) तो पेपर हाती लागावा म्हणून मी आणि भाऊ यात मारामारी व्हायची.शेवटी 2 पेपर घेतले जायचे.

Sorry avantarababat

वरील सर्वांना धन्यवाद !

* घरातल्या कोणी अर्धवट कोडे सोडवले असेल तर चिडचिड व्हायची.
>>>
अगदी ! काही घरांत यावरून नवरा बायकोंची चांगलीच जुंपते !

@ कुमार१,

'चौकटीतील रत्ने' समर्पक शीर्षक आहे लेखाला. असे छंद भाषा समृद्ध करतात.

मराठी शब्दसंग्रह तोकडा असल्यामुळे एकट्याला शब्दकोडे क्वचितच सोडवता येते, पण 'एन्जॉय द प्रोसेस' म्हणतात तसे आहे. घरी येणाऱ्या तीनही वृत्तपत्रांमधली मराठी आणि इंग्रजी शब्दकोडी पिताश्री काही मिनिटातच सोडवतात, हेवा वाटतो.

दररोज टाईम्स ऑफ इंडियाची इंग्रजी शब्दकोडी लीलया सोडवणाऱ्या माझ्या धाकट्या काकांचेही असेच कौतुक वाटत राहते, स्वतःला कधी जमत नाही Happy

लेख आवडला.
मागे एका मभादि मधे मिळालेल्या प्रतिसादानंतर मला मायबोलीवर घालण्यासाठी कोडी बनवायची होती. पण वेळेअभावी / आळसामुळे जमले नाही.

नेहमीप्रमाणे छान लेखन! लेखाचे नावही मस्तच.

आमच्याकडे सगळ्यांनाच आवड होती / आहे त्यामुळे लहानपणापासून कोडी सोडवत गेलो. मामाकडेतर कायम हे शब्दकोडेवाले पेपर असत. मोठ्यांचे अनुकरण करता करता हा छंद लागला मलाही.

शब्द सापडल्यावरचे समाधान केवळ शब्दातीत Happy

आता तुम्ही म्हणता तसं इंग्रजी कोड्यांकडे वळले पाहिजे.

मला इंग्रजी वृत्तपत्रतील कोडी पूर्णपणे सोडवणं जमत नाही . ५ ते ६ शब्द तसेच राहतात .
इतर कोणाला जमत का पूर्णपणे सोडवायला ?

छान लेख. हे काहितरी आरोग्य टाइप असेल म्हणून बरेच वेळ उघडले नाही. आत्ता सवड भेटली. मी पूर्वी मटा लोकसत्तातील कोडी सोड वत असे. हैद्रा बादला मटा डाक एडिशन यायचा तेव्हा तो वाचणे व कोडे सोडवणे हा एक आनंदाचा भाग होता. एकदा सुंदर असा क्लु असलेले उभा शब्द लिहीताना रारू असे आले. तेव्हा पासून एखादी गोश्ट एकदम छान आहे म्हणायला आम्ही रारू म्हणत असू. व हसू.

समर्पक शीर्षक.
' बॉम्बे टाईम्स ' मधील ' जम्बल ' शब्दकोडे सोडवणे हा माझा अनेक वर्ष छंद होता. त्यात इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग उलट सुलट केलेले असते. त्यातील अक्षरे जुळवून एकमेव इंग्रजी शब्द तयार होतो. अशा शब्दांची वर्तुळ केलेली अक्षरे जुळवून कोड्याच्या चित्रातील वाक्य पूर्ण करायचे. कधी तो वाक्प्रचार, म्हण, किंवा विनोदी फोनेटिक शब्द असू शकतो. उदा: चित्रात एक जोडपे नाच करत असताना पायात पाय अडकून अडखळले असे आहे, खाली वाक्य आहे , Two to "------". TANGLE . हे उत्तर आहे. मूळ इंग्लिश वाकप्रचार " Two to tango " आहे . हे कोडे सुटेपर्यंत चैन पडत नाही. हल्ली त्याच दिवशी कोड्याचे उत्तर बाजूला दिलेले असल्यामुळे मजा येत नाही. पूर्वी दुसऱ्या दिवशी उत्तर येत असे.

वरील सर्वांना धन्यवाद !
• असे छंद भाषा समृद्ध करतात.>>> +111

* मायबोलीवर घालण्यासाठी कोडी >>>> येत्या मभादिला आवडतील !

* शब्द सापडल्यावरचे समाधान केवळ शब्दातीत >>>> +१११

* इंग्लीश इतर कोणाला जमत का पूर्णपणे सोडवायला ?>>>>>>
कधीतरी ! यावर अधिक मी लेखाच्या भाग २ मध्ये लिहिणार आहे.

* आम्ही रारू म्हणत असू. व हसू.>>>>>> भारीच !

* हे कोडे सुटेपर्यंत चैन पडत नाही.>>>>>> ती अस्वस्थता भयंकर असते !

छान लेख. नेहमीप्रमाणेच.

माझ्या आईला डिमेन्शिआ आजाराची सुरुवात आहे असं निदान झालंय नुकतंच. तिला शब्दकोडं सोडवायला सांगितलंय डाॅक्टरांनी.

वरील सर्वांना धन्यवाद !

डिमेन्शिआ आजाराची सुरुवात
>>>>>
डिमेन्शीया/ अल्झायमर आणि कोडी सोडविणे” यावर अजून बऱ्याच संशोधनाची गरज आहे.

तूर्त असे म्हणता येईल:
१. काही तज्ञांचे मते विविध कोडी नियमित सोडविण्याने या आजाराचा धोका कमी होऊ शकतो.
२. अशी कोडी ही व्यक्तीनुसार ‘झेपेल’ इतक्याच कठीणतेची असावीत.

३. फक्त एकट्याने कोड्यात डोके घालून बसण्यापेक्षा दोघातिघांत मिळून काही बौद्धिक खेळ खेळल्यास अधिक फायदा होतो.
४. यासंबंधी अजून बरेच प्रयोग आणि त्यांचे प्रमाणीकरण होणे आवश्यक आहे.

कधीतरी ! यावर अधिक मी लेखाच्या भाग २ मध्ये लिहिणार आहे >>ओके डॉक्टर

सुडोकू हा ही एक कोड्याचा प्रकार छान आहे

द सा, आभार !

छान दुवा. पण हा फक्त इंग्लिश साठी ना?
मराठीसाठी आहे कुठे ?

सुडोकू हा ही एक कोड्याचा प्रकार छान आहे........mazya आईला याचे अक्षरशः: याचे व्यसन आहे.प्रथम कुतूहल म्हणून सोडवी. हळूहळू सुडोकू सुटलेच पाहिजे अर आली आता तर 24 आकडयचे असेल तरच कधीतरी अडते.पण दुसऱ्या कागदावर मांडून सोडवते.वय 87 चालू आहे.त्यात तिच्या बहिणीला दिमेंशिया झाल्याने ती ghabarlee होती.कविता म्हणणे,दुसरी कोडी सोडवणे चलू केले होते.
मी सुडोकूचा प्रयत्न केला.फारसे जमत नाही.जेव्हा ते कोडे सुटते त्यावेळी मस्त वाटते. मध्ये आठवड्यातून 2 तरी सुटायची.नंतर सोडून दिले.

सुडोकू पाच मिनिटात सुटले की मजा येत नाही, आणि १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागल्यास अस्वस्थ व्हायला होते. सुडोकूचे उत्तर का छापतात हे कळत नाही.

वरील सुडोकू वाल्या मंडळींच्या बद्दल मला आदर आहे. मला तुमचा हेवा वाटतो.
मला जेवढे शब्दांचे प्रेम तितकीच अंकांची भीती वाटते.
एकदाच नादी लागलो होतो सुडोकू च्या .... नंतर छू !

मितवा : हिंदीतला आणि मराठीतला !

आज ‘मितवा’ हा मराठी चित्रपट पाहिला आणि या शब्दाची मजा त्यात ऐकून मग जालावर वाचली.
* मितवा चा हिंदी भाषेतला अर्थ आहे : अगदी जवळचा, आपला माणूस.

* मराठीत या शब्दाचा एक वेगळाच अर्थ शोधण्यात आलाय:
मित्र, त्त्वज्ञ व वाटाड्या या ३ शब्दांतील पहिले अक्षर घेऊन मितवा हा संयोग शब्द तयार केलाय !

म्हणजे इंग्रजीत आपण म्हणतो ना फ्रेंड, फिलॉसॉफर व गाईड. त्याचेच हे रुपांतर .

मलाही हा छंद आहे. लोकसत्तातलं शब्दकोड व सुडोकू एकदम सोडवते. शब्द अडला की सुडोकू.... वाईसवर्सा..
बाकी लेख नेहमीप्रमाणे छान!

खूप सुंदर विषय. खरंय शब्दकोडे सोडवण्याचे फायदे कळतात पण वळत नाही असे झालेय. शब्दकोडे सोडवण्याचे प्रमाण आजीआजोबांच्या पिढीत जास्त असावे का? मी आठवतेय तर शब्दकोडे सोडवण्यार्‍या व्यक्तींमध्ये माझी आजी आणि तिच्या समवयीन लोकच होते.

वेगळा आणि इंटरेस्टिंग विषय. लहानपणी माझ्या काकांना शब्दकोडे सोडवताना पहिले, ते संस्कृत भाषेचे शिक्षक असल्याने त्यांचे शब्दभांडार प्रचंड होते. त्यांच्यामुळे काही काळ शब्दकोडी सोडवण्याचा छंद जडला होता, पण फार काळ नाही टिकला.
पण त्यामुळे शब्द संग्रह वाढतो हे मात्र खरे.

अवांतर: पूर्वी काही मासिक/दैनिकात महिनाभर शद्बकोडी सोडावा आणि मिक्सर अथवा कुकर जिंका अश्या स्पर्धा पहिल्या होत्या, पण कुणाला ती बक्षिसं मिळाल्याचं ऐकलं नाही Happy कदाचीत इतका छांदिष्ट माणूस माझ्या आजूबाजूला नसावा...

Pages