लेखाचा पूर्वार्ध:
रोज आपण एखादे तरी छापील वृत्तपत्र चाळतो. त्यात बातम्या आणि जाहिरातींव्यतिरिक्त काही नियमित सदरे असतात. वृत्तपत्रानुसार सदरांचे स्वरूप वेगवेगळे असते. पण बहुतेकांत समान असणारी एक गोष्ट म्हणजे शब्दकोडे. शब्द्कोड्यांचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे काळ्यापांढऱ्या चौकटीयुक्त शोधसूत्रे दिलेले कोडे. त्यात उभ्या आणि आडव्या रांगेत शोधायच्या शब्दांचा सुरेख संगम होतो. ही कोडी नियमित सोडविताना सामान्यज्ञान, भाषा, इतिहास, भूगोल, विज्ञान, संस्कृती आणि समाज अशा अनेक क्षेत्रांत विहार करता येतो. शब्दकोडी सोडवणे हा माझा आवडता छंद असून तो आता माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालेला आहे. मात्र हे सहजासहजी घडलेले नाही. त्यासाठी विशिष्ट परिस्थिती कारणीभूत ठरली. त्यामुळे एके काळी ‘डोक्याला पीळ’ वाटणारी आणि न्यूनगंड निर्माण करणारी कोडी आता माझ्यासाठी आनंददायी आहेत. कुठल्याही छापील कागदावर कोडे नजरेस पडले की मी त्याकडे चुंबकाप्रमाणे आकर्षिला जातो. सुमारे २० वर्षांच्या माझ्या या शब्दप्रवासाचे हे अनुभवकथन.
महाविद्यालयीन जीवनात छापील वृत्तपत्र बारकाईने वाचत असे. तेव्हा आतल्या पानाच्या एका कोपऱ्यात खालच्या बाजूस शब्दकोडे दिसायचे. पण मुद्दामहून त्याच्या वाटे जावेसे कधी वाटले नाही. रविवारच्या अंकातील भले मोठे कोडे पाहून तर त्याची लांबूनच भीती वाटायची. पुढे संसारात पडल्यावर मन रिझवणाऱ्या अनेक गोष्टी मिळाल्या. त्यामुळे वृत्तपत्र बारकाईने वाचणे कमी झाले. आता वाचण्यापेक्षा चाळणेच अधिक असे. त्यामुळे कोड्याचे पान तर दुर्लक्षित होई.
यथावकाश आयुष्याच्या मध्यमवयीन टप्प्यावर आलो. आता पूर्वीपेक्षा फुरसत मिळू लागली. पेपरातील ठराविक बातम्या वर्षानुवर्षे वाचून आता त्यातले नाविन्य संपले होते. म्हणून आता त्यातील सदरांकडे अधिक लक्ष जाऊ लागले. तरीसुद्धा कोड्याच्या भागावर फक्त नजर टाकत असे. फारतर त्यातले दोनचार शब्द तोंडीच जमतात का ते बघे. मग जरा अवघड वाटले की तो नाद सोडी. मग एकदा मनाचा हिय्या करून हातात पेन घेतले. म्हटलं, बघू तरी प्रयत्न करून. सुरवात अर्थातच मराठी वृत्तपत्रातील कोडयापासून केली. त्यातल्या शोधसूत्रांवर नजर टाकता असे दिसले, की शब्दांचा आवाका खूप मोठा आहे. भाषा व सामान्यज्ञानापासून ते क्रीडा व चित्रपटांपर्यंत अनेक विषय त्यात अंतर्भूत आहेत. प्रथम चित्रपटासंबंधीचे शब्द सोडवायला घेतले. त्यातले काही जमले. मग पुढची पायरी होती खेळ व खेळाडूंबद्दलचे शब्द. एकंदरीत त्यावर क्रिकेटचा वरचष्मा असतो. त्यामुळे ते शब्द तसे लवकर जमले. मात्र या व्यतिरिक्तच्या विषयांशी संबंधित शब्द सोडवणे हे आव्हान होते. ते पेलत नसे आणि मग मी कोडे सोडून देई. तीसेक शब्दांपैकी ५-६ सुटले तरी विरंगुळा होई. संपूर्ण कोडे सोडवणे हे काही येरा गबाळ्याचे काम नाही, एवढा बोध एव्हाना झाला होता.
अधूनमधून इंग्रजी पेपर चाळत असे. मात्र त्यातल्या इंग्रजी क्रॉसवर्डकडे कधी ढुंकूनही पाहिले नाही. “हे आपल्यासाठी नसतेच, ते फक्त फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या मंडळींसाठी असते”, असा पूर्वग्रह मनात होता. आता मराठी कोड्यात रोज डोकावू लागलो. अजून एक पाऊल पुढे टाकले. कोडे एकट्याने सोडवण्यापेक्षा थोडी कुटुंबाची मदत घेऊ लागलो. एखाद्या शोधसूत्राचे उत्तर अगदी तोंडावर येतंय असे वाटूनसुद्धा योग्य शब्द काही जमत नसे. पण काही शब्द आमच्या एकत्रित प्रयत्नातून सुटल्यावर झालेला आनंद काय वर्णावा?
या दरम्यान आयुष्यात एक महत्वाची घडामोड झाली. ध्यानीमनी नसताना एके दिवशी परदेशगमनाची संधी दार ठोठावत आली. कौटुंबिक कारणास्तव मला तिकडे एकटेच जावे लागणार होते आणि तशीच काही वर्षे एकट्याने काढायची होती. प्रथम जाताना थोडी वाचायची पुस्तके बरोबर नेली. तिकडे पोचल्यावर सुरवातीस नवे संगणकीय आणि इतर आधुनिक तंत्रज्ञान शिकत असल्याने कार्यमग्न राहिलो. मात्र ६ महिन्यांनतर एकटेपणा जाणवू लागला. रोजची संध्याकाळ आणि साप्ताहिक सुटीचे २ दिवस अगदी भकास वाटू लागले. साहित्य वाचण्यात काही वेळ जाई. टीव्ही पाहायची विशेष आवड नव्हती आणि तेव्हा व्यक्तिगत जालसुविधाही नव्हती. नुसत्या वाचन-लेखनावर फावला वेळ काढायला एक मर्यादा असते. त्यामुळे आता एखादा छंद शोधणे भाग होते. तिथल्या ६ महिन्यांच्या वास्तव्यानंतर १५ दिवस सुटी मिळाली आणि भारतात आलो. एका दुपारी शांत बसलो असता खोलीतील पेपरांच्या रद्दीने माझे लक्ष वेधले. आता एक विचार सुचला. रोजच्या पेपरातील एक अशी २५-३० मराठी कोडी कापून बरोबर नेली तर? वाचनाला थोडा आधार आणि बुद्धीला चालना असे दोन्ही हेतू त्यात साध्य होणार होते. मग धडाधड ती कोडी कापून घेतली आणि ती ‘शिदोरी’ प्रवासाच्या बॅगेत ठेवली.
आता हा कोड्यांचा गठ्ठा घेऊन पुन्हा तिकडे परतलो. मग रोज संध्याकाळी एक छोटे आणि सुटीच्या दिवशी भलेमोठे कोडे सोडवायचे ठरवले. निव्वळ वाचनापेक्षा आता वेगळा अनुभव येऊ लागला. शब्द शोधताना मनाची एकाग्रता होते. अवघड शब्द शोधताना तर मेंदू अगदी तल्लख होतो. जेव्हा असा एखादा शब्द खूप प्रयत्नांती जमतो तेव्हा तर शरीरात आनंदजनकांची निर्मिती होते. अजून एक गंमत सांगतो. एखादा शब्द जाम सापडत नसला की तेव्हा आपण त्याचा नाद सोडतो. पण, त्या दिवसभर तो सापडेपर्यंत ते शोधसूत्र आपल्या डोक्यात असते. मग अगदी एकदम एखाद्या क्षणी डोक्यात वीज चमकावी तसे आपल्याला ते उत्तर मिळते. अशा प्रकारे कोडे सुटण्याची ठिकाणे बऱ्याचदा स्वच्छतागृह, रस्ता किंवा व्यायामशाळा असतात, हा स्वानुभव आहे. आपण जेव्हा या ठिकाणी असतो तेव्हा आपला मेंदू एक प्रकारे विश्रांतीच्या अवस्थेत असतो आणि त्यामुळे असे घडत असावे असा माझा अंदाज आहे. तेच जर आपण कोड्याचा कागद जवळ घेऊन खूप वेळ उत्तर शोधत बसलेलो असू, तर मेंदूच्या थकव्यामुळे उत्तर काही येत नाही. कधीकधी तर ही शोधप्रक्रिया स्वप्नात देखील चालू राहते आणि त्यात ‘युरेका’ चा क्षणही येतो. पण जागे झाल्यावर मात्र त्याबद्दल काहीही आठवत नाही !
जसा मी या शब्दखेळात मुरु लागलो तशी कोड्यांची काही वैशिष्ट्ये लक्षात आली. त्यातले काही अवघड शब्द सामान्य शहरी जीवनात प्रचलित नसतात. ते केवळ कोडे अवघड करण्यासाठी योजलेले असतात. ठराविक दिवसांनंतर ते कोड्यात पुन्हा येत राहतात. अशा तऱ्हेने ते आपल्या ओळखीचे होतात. उदाहरणार्थ, हे काही शब्द पहा:
१. कापा, बरका आणि सकल्या या फणसाच्या जाती
२. माळवद व दारवंट हे घराशी संबंधित शब्द
३. वापी आणि बारव हे विहिरीचे प्रकार
४. बुरणूस, बुरखुड आणि बेंबारा हे विचित्र शब्द ! जर मी कोडी सोडविली नसती, तर हे आयुष्यात कधी ऐकलेही नसते.
अन्य काही शब्द प्राचीन किंवा ऐतिहासिक असतात. सध्याच्या व्यवहारभाषेसाठी त्यांचा काही उपयोग नसतो. पण एकदा का आपण कोड्यांच्या राज्यात विहार करू लागलो, की ते आपले मित्र होतात. अशा प्रकारे कोडी सोडवायचा माझा परिपाठ चालू होता. २-३ महिन्यांत त्याला गती आली. मग भारतातल्या घरी कळवून टाकले की रोजच्या पेपरातले कोडे कापून ठेवा. पुढे जेव्हा माझी सहामाही चक्कर होई, तेव्हा तो साठलेला गठ्ठा घेऊन येई. साधारण वर्षभर ही कोडी सोडवल्यावर आत्मविश्वास आला. तरीसुद्धा प्रत्येक कोडे १००% सुटले असे नसायचे. विशेषतः कोड्यातले पौराणिक, कालबाह्य, संस्कृत वा अरबी/फारसी मूळ असलेले शब्द येत नसत. तिथे सरळ शरणागती पत्करून त्याचे उत्तर पुढच्या अंकात पाहायला लागे. भाषाज्ञान हे अफाट आहे आणि आपले आयुष्य मात्र मर्यादित. त्यामुळे आजही वीसेक वर्षे कोडी सोडविल्यानंतरही मी एखादे कोडे (विशेषतः रविवारच्या अंकातले) पूर्ण सोडवेनच, असे छातीठोक सांगत नाही.
नुकताच घडलेला हा किस्सा. प्रवासासाठी म्हणून बॅगेत एक कापून ठेवलेले मोठे कोडे होते. ते ९९% सुटले. फक्त एक शब्द अडला. शोधसूत्र होते “मोठी पळी”. चार अक्षरी शब्द. त्यातल्या १,२ व ४ क्रमांकाची अक्षरेही जमली. पण तिसरे काही सुचेना. म्हणजेच शब्द असा होता: “कब *र”. मी होतो ८ तासांच्या प्रवासात. आजूबाजूच्या एकदोघांना विचारून पाहिले. पण उपयोग नाही. शेवटी माझ्या एका मित्रांना मोबाईलमधून संदेश पाठवला. त्यांनी थेट शब्दकोशात पाहून उत्तर कळवले. ते होते “कबगीर”. या शब्दाचे मूळ अरबी आहे. मग या कोडेनिर्मात्याला मनातल्या मनात दूषणे दिली, “कुठले कालबाह्य शब्द घालतात लेकाचे”. माझा तो प्रवास संपला. आता गम्मत पुढेच आहे. आमच्या एका परिचितांकडे एक उर्दूभाषिक बाई घरकामाला येतात. त्यांना सहज विचारले, की तुम्ही ‘कबगीर’ ऐकले आहे का. त्या ताडकन उत्तरल्या, “हो, माहित हाये की ! अवो, तो खोलगट झारा असतो ना त्यालाच आम्ही कबगीर म्हणतो. सातवीपर्यंत शालेय शिक्षण झालेल्या या बाईंचे ते सामान्यज्ञान पाहून मी अवाक झालो आणि त्यांना मनोमन वंदन केले !
शब्द्कोड्यांचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात:
१. शोधसूत्रानुसार त्याचा सरळ अर्थ घ्यायचा किंवा त्याचा समानार्थी/भावार्थी शब्द शोधायचा.
२. गूढ कोडी : यात शोधसूत्राच्या ‘अर्थाला’ फारसे महत्व नसते; पण त्यातील शाब्दिक करामतीकडे विशेष लक्ष द्यायचे असते. हे सूत्र बरेचदा एकशब्दी नसून ते शब्दसमूह किंवा वाक्य असते. साधारणपणे मराठी नियतकालिकांतील कोडी ही पहिल्या प्रकारची असतात. वरील दुसरा प्रकार इंग्रजी कोड्यांत नियमित वापरला जातो. किंबहुना प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकांत रोज दोन्ही प्रकारची कोडी देतात. त्यांची शीर्षके ‘easy’ आणि ‘cryptic’ अशी असतात.
साधारण २००५च्या सुमारास माझा आंतरजालावरचा विहार हळूहळू वाढू लागला होता. काम करता करता मध्येच विरंगुळा म्हणून काही मराठीतले वाचायला मिळते का, याचा शोध घेऊ लागलो. माझ्या कार्यालयात तेव्हा कोणी मराठी भाषिक नसल्याने मी मराठी बोलण्यावाचण्यासाठी अगदी तडफडत होतो. असेच एके दिवशी अचानक जालावर ‘मायबोली’ संस्थळाचा शोध लागला. तिथे छान रमू लागलो. पुढे २००७मध्ये असाच अचानक ‘मनोगत’ संस्थळाचा शोध लागला. तिथल्या एका वैशिष्ट्यपूर्ण सदराने तर एकदम अलिबाबाचा खजिनाच सापडला ! ते सदर होते ‘गूढ शब्दकोडी’. मराठीतील अशी कोडी मी प्रथमच पाहिली. याहून एक अद्भूत गोष्ट म्हणजे ती चक्क जालावरच टिचकी मारून सोडवायची होती. हे अजब होते. अगदी हरखून गेलो. या कोड्यातली शब्द्सूत्रे विविध प्रकारची असतात. गमतीदार, गूढ, विचित्र आणि अजिबात अर्थबोध न होणारी, असे अनेक प्रकार त्यात असतात. एक उदाहरण देतो:
शोधसूत्र असे आहे: ‘तेजातून अंगावरच्या माराच्या खुणा’ !
आहे की नाही विचित्र? याचे उत्तर असते “प्रभावळ”.
असेच असंख्य नमुने त्यात असतात. अशा पहिल्याच कोड्यावर नजर टाकता मला जाणवले, की आपल्याला काही हा प्रकार जालावरच १०-१५ मिनिटांत सोडवायला जमणार नाही. हे म्हणजे डोक्याला जबरी भुंगा लावणारे आहे. मग एक युक्ती केली. साप्ताहिक सुटीच्या आदल्या दिवशी ते कोडे सरळ कागदावर छापून घेतले. मग सुटीच्या दिवशी ते शांतपणे घरी बसून सोडवू लागलो. सुरवातीस डोके पूर्ण बधीर होऊन जाई. सुमारे ६ महिने ही उमेदवारी केल्यावर ती कोडी उमगू लागली.
सुमारे १० वर्षे नियमित कोडी सोडवल्यानंतर आत्मविश्वास आला. मग त्यांची आवड निर्माण झाली आणि आता तर त्यांचे व्यसनच लागले आहे. काही दैनिकांत कोडी खूप विचारपूर्वक तयार केली जातात. निव्वळ एक शब्द शोधण्यापलीकडे त्यांची व्याप्ती असते. एखादी लांब म्हण अथवा वाक्प्रचार देखील ओळखायला दिला जातो. अन्य काही दैनिकांची गंमत सांगतो. ती साधारण ‘बस अथवा रेल्वे स्थानकावर खपणारी’ या प्रकारातील असतात. त्याच्या आतल्या पानात तर रोज महाशब्दकोडे असते. त्यातले जवळपास ८०% शब्द हे चित्रपट आणि क्रिकेटशी संबंधित असतात. चित्रपटातील नायक/नायिकेची नावे देऊन त्याचे नाव ओळखा, इतपत तो शब्दशोध असतो. ही दैनिके “कोड्यांसाठी खपणारे पेपर” म्हणून प्रसिद्ध असतात. माझ्यावर रेल्वे स्थानकावर उशीर झालेल्या गाडीची वाट पाहण्याचा प्रसंग बऱ्यापैकी येतो. त्या वेळात मी कधीकधी एखाद्या तथाकथित प्रतिष्ठित दैनिकाऐवजी असा ‘कोडेवाला पेपर’ घेणे पसंत करतो. उगाचच बातम्यांचा गदारोळ चघळत बसण्याऐवजी अशी मोठी मनोरंजक कोडी इकडेतिकडे बघत सोडविण्यात वेगळीच गम्मत असते ! त्यानिमित्ताने मोबाईलशी उगाचच चाळा करणेही थांबते. जेव्हा स्थानकावर येणारी एखादी गाडी चढत्या क्रमाने वेळेचा उशीर करू लागते तेव्हा आपली जाम चिडचिड होत असते. त्यावर उतारा म्हणून ही कोडी अगदीच उपयुक्त ठरतात.
मराठी कोड्यांच्या अशा (शब्दशः) तपश्चर्येनंतर माझा शब्दसंग्रह चांगलाच वाढला. चौकटींमधून शिकलेले नवे शब्द ही माझ्यासाठी भाषिक साठ्यातील मौल्यवान रत्ने आहेत. कोडी सोडविण्याच्या प्रक्रियेतून मेंदूला एक वेगळे प्रशिक्षण मिळाले. विचारक्षमता रुंदावली तसेच माझ्या लेखनासाठीही चांगलाच फायदा झाला. पण म्हणून निव्वळ तृप्तीचा ढेकर देऊन चालणार नव्हते. आता मला दुसरे काही खुणावू लागले होते. अनेक वर्षे मी इंग्रजी कोडी निव्वळ लांबूनच बघत असे. आता त्यांना हात घालावा असा मनाने कौल दिला. आयुष्यभर फक्त नियमित टेकडी चढण्याऐवजी आता एखादा गड चढण्यास सुरवात केली पाहिजे अशी जाणीव झाली.
इंग्रजी शब्द्कोड्यांची व्याप्ती मराठीच्या तुलनेत अधिक आहे. नेहमीच्या चौकटीयुक्त कोड्यांव्यतिरिक्त असणारे अन्य काही प्रकार तर स्तिमित करणारे आहेत. तेव्हा दमादमाने मी तो एकेक प्रकार हाताळायचा संकल्प केला. गेली १० वर्षे त्यांतही मुरलो आहे. ती सोडविण्याचा प्रवास हा अशक्य, अवघड, प्रयत्नांती जमणारे आणि काही प्रमाणात सोपे अशा खडतर टप्प्यांतून झालेला आहे. तो करीत असताना सुरवातीस ठेचकाळलो, मग पायावर नीट उभा राहिलो आणि अखेर चालण्याची गती वाढत गेली. त्याचा वृत्तांत पुढील भागात सादर करेन.
************************************************************************************
क्रमशः
वरील सर्वांना धन्यवाद !
वरील सर्वांना धन्यवाद !
* शब्द अडला की सुडोकू.... वाईसवर्सा.. >>>> झक्कास ! तुम्ही दोन्हींत तरबेज होणार , शुभेच्छा.
* शब्दकोडे सोडवण्याचे प्रमाण आजीआजोबांच्या पिढीत जास्त असावे का? >>>> काहीसा सहमत. पण, त्यानंतरच्या पिढीत कोड्यांची मुबलकता वाढली हेही खरे. काही कार्यालयांत गटाने कोडी सोडवणारे मी अलीकडे पाहतोय.
* शद्बकोडी सोडावा आणि मिक्सर अथवा कुकर जिंका >>> साधारण अशा जाहिराती दिल्ली, पंजाब किंवा उ.प्र. च्या पत्त्यावरून दिल्या जायच्या .... पुढे काय व्हायचे ते आपण जाणतोच !
वा,मस्तच !
वा,मस्तच !
आम्हाला कुठल्याही कोड्यात न टाकणारा सहजसुंदर लेख.
माझ्या वडिलांना याचा खूप नाद होता. एकदा त्यांना पेपरातल्या कोड्यातील एक शब्द अडला. दिवसभर विचार करूनही जाम नाही जमला. दुसऱ्या दिवशी ते त्या अंकाची पहाटेपासून वाट बघत होते. नेमके त्या दिवशी पेपर विक्रेत्यांचा संप जाहीर झाला.
मग काय, बाबा सरळ सायकल काढून पेपरच्या हापिसात गेले आणि तो अंक विकत घेऊन आले !
साद,
साद,
धन्यवाद. किस्सा भारीच !
......................
काही महिने माझ्या कोड्यांत ३ शोधसूत्रांनी अगदी धुमाकूळ घातला होता. या तिघांचे उत्तर एकच आहे. सूत्रे अशी:
१. लसणाची पाकळी
२. लिंबाची फोड
३. दह्याची कवडी.
यांचे उत्तर असलेला शब्द मी कधीच ऐकला नव्हता. कोड्यांमुळेच कळला.
बघताय प्रयत्न करून ?
किती अक्षरी शब्द आहे?
किती अक्षरी शब्द आहे?
दोन
दोन
फाक किंवा फाकी ?
फाक किंवा
फाकी ?
फाक आहे का,? पण दह्याच्या
फाक आहे का,? पण दह्याच्या कवडीला तो शब्द जुळत नाही.
फाक किंवा
फाक किंवा
फाकी ?>>>>>
दोन्हीही नाही !
कुमारजी मिळाला एकदाचा शब्द -
कुमारजी मिळाला एकदाचा शब्द - बोई. मी कधीच ऐकला नव्हता.. पण गुगल महाराज मदतीला धावून आल्याने मिळाला.
दली दळी ?
दली
दळी ?
निलाक्षी, बरोबर !बोई
निलाक्षी, बरोबर !
बोई
बोई >>> भारीच. नव्हता ऐकला.
बोई >>> भारीच. नव्हता ऐकला.
एकदा गावाकडच्या लग्नास गेलो असता एक भारी शब्द ऐकला व एकदम उडालो होतो.
सोयरे मंडळींच्या गप्पा चालल्या होत्या. एकजण दुसऱ्या माणसाबद्दल या लोकांना काही सांगत होते. एकानी विचारले ,”कोण, नाही ध्यानात येत बा”.
मग पहिले गृहस्थ म्हणाले, “अवो, तो न्हाई का तो रांडका” .
मी ऐकताना उडालोच. वाटले की यांनी त्याला शिवी दिली. मग हळूच विचारले की “तसला आहे का तो?”
ते हसून म्हणले, “ अवो नाय, त्येची बायकू वारली ना मागल्या वर्षी. म्हणून तो रांडका !”
रांडका = विधुर, हे तेव्हा कळाले.
साद
साद
तो शब्द रंडका आहे.
विधवा बाई असेल तर रंडकी/रांडाव म्हणतात.
द सा,
द सा,
रंडका व रांडका असे दोन्ही शब्दरत्नाकर मध्ये दिले आहे.
माझे वडील इंग्रजी शब्दकोडे
माझे वडील इंग्रजी शब्दकोडे सोडवायचे... इंग्रजांच्या काळात शिकलेले होते ना त्यांना मराठी,हिंदी,इंग्रजी,संस्कृत, कानडी, तेलगू व उर्दू (निजामाच्या कृपेने) अश्या सात भाषा यायच्या. इंग्रजी सोपी कोडी सोडवून बघायची आहेत.
मागच्या पानावर कोणी म्हटलंय ना बक्षीसाविषयी ... मला मिळालेय एकदा .. चित्रलेखा की कुठल्या मासिकाचं
नेहमीची कोडी काळ्या पांढर्या
नेहमीची कोडी काळ्या पांढर्या चौकटीची असतात. मध्ये मी एका मासिकात त्या ऐवजी गोलाकार स्वरुपात लिहिलेली कोडी पहिली. एकावर एक अशी ४ वर्तुळे काढली होती. शब्दांचा शोध आणि योग्य जुळवणी असे ते कोडे असते.
पु भा प्र.
आवडलं.
आवडलं.
घरच्या शब्दकोडीप्रेमी ज्ये.ना.ना लिंक पाठवली.
मस्त लेख. मजा आली वाचायला.
मस्त लेख. मजा आली वाचायला.
मंजूताई,
मंजूताई,
सोपी इंग्लीश जरूर सोडवून पहा. त्याचे माझे अनुभव भाग २ मध्ये लिहीन.
साद,
गोलाकार कोडे रोचक असावे. पाहिले पाहिजे.
ललिता व रायगड
धन्यवाद !
मंजूताई,
कोडे शौकिनांसाठी :
नुकताच एक विचित्र शब्द कोड्यात आला.
सूत्र : लांबलचक कंटाळा आणणारे भाषण
४ अक्षरी : * प * *
बघा जमतोय का !
ला प नि का
ला प नि का
चर्पटपंजरी आठवत होतं. त्याला समानार्थी शब्द शोधले.
मला शब्दकोड्यांचा तितकासा नाद लागला नाही. पण एक काळ सुडोकू नियमितपणे सोडवायचो.
रोज तीन पेपरांतले.
शब्दकोडी सोडल्याने नवेनवे शब्द कळतात, याची पुन्हा एकदा प्रचीती आली.
भरत, बरोबर !
भरत, बरोबर !
ला प नि का / ला प णि का
दोन्हीही.
लापनिका >>> फारच विचित्र आहे.
लापनिका >>> फारच विचित्र आहे.
एकवेळ ‘लांबणिका’ समजण्या सारखा होता. ( लांबण लावणे )
छान चर्चेबद्दल आपणा सर्वांचे
छान चर्चेबद्दल आपणा सर्वांचे आभार !
लेखाचा उत्तरार्ध इथे:
https://www.maayboli.com/node/72788
जेफरी आर्चर ची 'ओल्ड लव्ह' ही
जेफरी आर्चर ची 'ओल्ड लव्ह' ही शॉर्ट स्टोरी आहे अश्या शब्दकोडे आधी सोडवण्यावरून भांडणाऱ्या नवरा-बायको ची, मस्त आहे.
लेख मस्त झालाय. कोणे एकेकाळी लोकल प्रवासात रोज शब्दकोडे सोडवायला पेपर घेतला जायचा, स्वतःचा सोडवून झाला की आजुबाजुच्या बायकांचा सोडवायचा. आता मराठी पेपर नाही त्यामुळे शब्दकोडे कोणत्या पानावर येतं ते पण माहीत नाही.
वरील सर्वांचे आभार !
वरील सर्वांचे आभार !
कोडे शौकिनांना आवाहन:
तुमच्या कोड्यांत जेव्हा फारसे न ऐकलेले / विचित्र शब्द येतील, तेव्हा या धाग्यावर जरूर लिहा.
मी असे २ लिहितो
गळू, बेंड = करट
संशयी = दिकतखोर
तुमच्या कोड्यांत जेव्हा फारसे
तुमच्या कोड्यांत जेव्हा फारसे न ऐकलेले / विचित्र शब्द येतील, तेव्हा या धाग्यावर जरूर लिहा.>>>>>>>>फारच उत्तम कल्पना
फारच उत्तम कल्पना>>> + १
फारच उत्तम कल्पना>>> + १
माझ्या वडिलांकडे अशा शब्दांचा बराच साठा आहे. त्यातले काही नक्की लिहीन .
माझेही दोन पैसे-
माझेही दोन पैसे-
ठोकण = झाडाचे वाळलेले जुनाट खुंट
तसलमात = हिशेबापूर्वी दिलेली आगाऊ रक्कम.
बाप रे इंग्रजी कोडी. माझा
बाप रे इंग्रजी कोडी. माझा धीरच होत नाही
_________
लेख फारच आवडला.
Pages