तंदुरुस्त की नादुरुस्त : भाग ४

Submitted by कुमार१ on 19 March, 2018 - 02:07

(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)
भाग 3 : https://www.maayboli.com/node/65552
****************************
वयोगट १९-४९ : संसारामधी ऐस आपुला......

या भागात दोन उपविभाग पडतील – वय १९-२९ आणि ३०-४९. यांमध्ये सुचविलेली प्रत्येक चाचणी सर्वांसाठी करण्याची गरज नसते. गरजेनुसार अधिक जोखीम असलेल्या लोकांमध्ये संबंधित चाचणी केली जाते. प्रथम या दोन्ही उपविभागांना समान असणाऱ्या चाचण्यांची माहिती घेऊ.
खालील ४ आजारांसाठी चाचण्यांची शिफारस केली जाते. त्यापैकी पहिल्या २ अर्थातच स्त्रियांसाठी आहेत:

१. स्तनांचा कर्करोग
२. गर्भाशयाच्या cervix चा कर्करोग
३. उच्च कोलेस्टेरॉल पातळी आणि
४. HIV संसर्ग

स्तनांच्या कर्करोगाच्या चाचण्या:

१. स्त्रियांनी त्यांच्या विशीत असताना स्वतःच त्यांच्या स्तनांची तपासणी घरी नियमित करावी. त्यामध्ये पुढील गोष्टींकडे लक्ष द्यावे – तेथील त्वचेवर खळ व सुरकुती पडणे, फुगवटा येणे, एखादा भाग लाल होणे इ. काही संकेतस्थळांवर हा विषय सचित्र समजावून सांगितलेला आहे.
२. दर ३ वर्षांतून एकदा अशीच तपासणी योग्य त्या डॉक्टरकडून करून घ्यावी.

३. चाळीशीच्या पुढे वर्षातून एकदा mammography ही क्ष-किरणतंत्र चाचणी करावी. आता ही सर्वांसाठी का फक्त जोखीम असणाऱ्यांसाठी यावर तसे एकमत नाही.

४. आता या रोगाची अधिक जोखीम असणाऱ्या स्त्रिया अशा आहेत:

अ) आई किंवा बहिणींना स्तनांचा किंवा अंडाशयाचा कर्करोग असणे आणि त्यांच्यात संबंधित जनुकीय बिघाड असणे.
आ) लठ्ठपणा
इ) स्वतःची मासिक पाळी वयाच्या १३ व्या वर्षाआधी सुरु होणे
ई) स्तन दाट (dense) असणे
उ) अतिरिक्त मद्यपान
ऊ) १० ते ३० या वयात छातीची क्ष-किरण तपासणी बऱ्याचदा होणे.
ऋ) नेहमी रात्रपाळीत काम करणाऱ्या स्त्रिया

५. आता वरीलपैकी कोणताही मुद्दा लागू असल्यास डॉ च्या सल्ल्याने जनुकीय चाचण्यांची शिफारस केली जाते. ती चाचणी रक्त वा थुंकीवर करता येते. त्यात BRCA1 or BRCA2 या जनुकांमध्ये बिघाड (mutation) आहे की नाही ते पाहतात.

Cervix च्या कर्करोगाच्या चाचण्या:
या रोगाची वाढ खूप हळू असते. येथे चाळणी चाचण्यांचे महत्व खूप आहे. त्यामुळे कर्करोगाच्या पूर्वस्थितीतच त्याचे निदान शक्य होते. अशा स्थितीत त्यावर प्रभावी उपचार करता येतात. चाचणीच्या शिफारशी अशा आहेत:

१. २१-२९ या वयांत Pap Smear चाचणी दर ३ वर्षांतून एकदा करावी. यासाठी Cervix च्या भागात विशिष्ट ब्रशच्या सहाय्याने हलकेच स्त्राव घेतला जातो आणि मग त्यातील पेशींचे प्रयोगशाळेत निरीक्षण करतात.

२. या रोगाची अधिक जोखीम असणाऱ्या स्त्रिया अशा:
अ) HPV या विषाणूंचा संसर्ग होणे. हा संसर्ग लैंगिक संबंधातून होतो.
आ) लैंगिक संबंध लवकरच्या वयात चालू करणाऱ्या स्त्रिया
इ) अनेक जोडीदारांशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या
ई) एड्स-बाधित आणि
उ) धूम्रपान करणाऱ्या.

अशा स्त्रियांसाठी Pap चाचणी दरवर्षी सुचवण्यात येते.

३. जेव्हा Pap चाचणीचे निष्कर्ष ‘नॉर्मल’ पेक्षा वेगळे असतात तेव्हा HPV DNA test ही पुढची चाचणी करण्यात येते. या विषाणूच्या अनेक प्रजाती असून त्यातील काहींमुळे हा कर्करोग होतो.

• उच्च कोलेस्टेरॉल पातळी आणि HIV संसर्ग याबद्दलच्या चाचण्यांचे विवेचन या लेखमालेच्या तिसऱ्या भागात आलेले आहे. आता रक्तातील एकूण सर्व मेद-पदार्थांचा अंदाज घ्यावा. त्या चाचणीला Lipid Profile म्हणतात. त्यात एकूण कोलेस्टेरॉल व त्याचे LDL-c, व HDL-c हे दोन प्रकार आणि TG यांचा समावेश असतो.
या विषयाचे अधिक विवेचन माझ्या ‘कोलेस्टेरॉल’ वरील लेखात वाचता येईल :
(https://www.maayboli.com/node/64397)
• ३०-४९ या वयोगटासाठी लठ्ठपणाच्या चाचणीची शिफारस केलेली आहे. बऱ्याच लोकांचे बाबतीत तारुण्यात वजन योग्य असते पण चाळीशीच्या आसपास ते अतिरीक्त होऊ लागते. अशांनी आता नियमित वजन करून स्वतःच्या BMI वर लक्ष ठेवणे हितावह असते. याचबरोबर वर्षातून एकदा रक्तदाब बघणे हेही फायद्याचे असते.
लठ्ठपणा, उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह, उच्चरक्तदाब आणि करोनरी हृदयविकार हे सर्व एकत्र नांदणारे आजार आहेत याची दखल घेतली पाहिजे.

• चाळीशी ओलांडलेल्या स्त्रिया जर अनिश्चित(non-specific) स्वरूपाच्या तक्रारी घेऊन डॉक्टरकडे वारंवार जात असतील तर त्यांची थायरॉइडची TSH चाचणी करणे हितावह असते.
** ** **

पुढील वयोगटाकडे जाण्यापूर्वी मला दोन मूलभूत चाळणी चाचण्यांबद्द्ल लिहावे वाटते. या दोन्ही तशा ‘वयोगट-विरहीत’ आहेत. जेव्हा आपल्याला एखाद्या कारणास्तव शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र सादर करायचे असते तेव्हा या कराव्या लागतात. त्या अशा आहेत:

१. Hemogram: यामध्ये रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी, लाल व पांढऱ्या पेशींची संख्या आणि संबंधित माहिती मिळते.

२. लघवीची सामान्य (Routine) तपासणी: यात लघवीत ग्लुकोज, प्रथिन, स्फटिकासारखे पदार्थ आणि जंतूसंसर्ग दर्शवणारे दोष आहेत का ते पहिले जाते.

शारीरिक तपासणी बरोबर या दोन्हीचे रिपोर्ट्स व्यवस्थित असतील तर ‘साधारणपणे व्यक्ती तंदुरुस्त आहे’ असा शेरा देता येतो. पण त्यात काही दोष निघाल्यास पुढील चाचण्या करण्याची दिशा मिळते.

या चाचण्यांची गरज प्रामुख्याने खालील प्रसंगी असते:
१. एखाद्याला संस्थेत नोकरीत रुजू करून घेण्यापूर्वी
२. खेळाडू आणि गिर्यारोहक जेव्हा मोठ्या स्पर्धा/ मोहिमांवर निघतात तेव्हा
३. काही ‘जीवन विमापत्र’ (policy) इ. काढताना आणि
४. कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी.

सध्या बऱ्याच संस्थांमध्ये नोकरीत रुजू करून घेण्यापूर्वी वरील चाचण्यांव्यतिरिक्त ग्लुकोज-पातळीचाही आग्रह धरला जातो. ************************************
भाग ५ : https://www.maayboli.com/node/65663
(क्रमशः )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ साद:
नेहमी रात्रपाळीत काम करणाऱ्या स्त्रियांना स्तनांच्या कर्करोगाचा जास्त धोका का असतो ?>>>>

कारण त्यांच्या हॉर्मोनसचा नैसर्गिक ताल ( rhythm) बिघडतो. म्हणून हवाई सुंदरींना जोखीम खूप जास्त असते.

नोकरीत रुजू करून घेण्यापूर्वी ग्लुकोज-पातळीचाही आग्रह धरला जातो..........

जबाबदारीच्या मोठ्या पदांवर काम करणाऱ्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची भेट हमखास मिळते, न मागता Happy

३० - ४९या वयांत शरीराचे वजन योग्य प्रमाणात राखणे खूप महत्वाचे आहे. उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह, उच्चरक्तदाब आणि करोनरी हृदयविकार हे आजार लठ्ठपणाशी निगडित आहेत हे सर्वांना माहीत आहेच.

पण आता यांत कर्करोगाचीही भर पडली आहे. जर B M I बराच काळ 30 च्यावर राहिला तर पन्नाशी च्या आतच काही कर्करोग होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये मोठे आतडे, थायरॉइड, स्वादुपिंड, स्तन आणि गर्भाशय यांच्या कर्करोगाचा समावेश आहे. लठ्ठ व्यक्तींमध्ये या रोगांची वाढही झपाट्याने होते.

सध्या पुणे विविध भारतीवर सकाळी ७.१० ला एक सरकारी जाहिरात लागते. त्यात अशी माहिती आहे:

‘सर्व सरकारी रुग्णालयांत वय ३० चे पुढील लोकांची ग्लुकोज पातळी व रक्तदाब तपासणी मोफत.’

यातून शासन या आजारांबद्दल जनजागृती करीत आहे ही समाधानाची गोष्ट आहे.

कालच Lipid Profile टेस्ट केली. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. या लेखामुळे त्यातल्या शब्दांचा अर्थ नीट समजला.
पुन्हा एकदा धन्यवाद

चांगला सार्वजनिक उपक्रम

भारतात गर्भाशय-मुखाच्या कर्करोगाचा प्रादुर्भाव खूप आहे आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक आहे. त्या दृष्टीने ३५-४५ वयोगटातील स्त्रियांची चाळणी चाचणी करणे महत्वाचे आहे. HPV-DNA अशी ही चाचणी असते.

हे काम सार्वजनिक पातळीवर काही संस्था करीत आहेत. त्यापैकी ‘आय शेअर’ ही एक. त्यांच्या नव्या उपक्रमात पुणे जिल्ह्यातील १०,००० महिलांची ही चाचणी मोफत करण्यात येणार आहे. इच्छुकांना त्याचा लाभ घेता येईल. संबंधित लेख इथे वाचता येईल:

https://www.esakal.com/saptarang/saptarang-dr-nikhil-phadke-write-hpv-va...

दरवर्षी ऑक्टोबर महिना हा 'स्तन-कर्करोग जागरूकता' महिना म्हणून पाळला जातो. या रोगाचे प्रमाण समाजात लक्षणीय आहे.

ज्या स्त्रियांचे बाबतीत त्याचा कौटुंबिक इतिहास असतो, त्यांनी संबंधित चाळणी चाचण्या करून घेणे हितावह असते.

स्तन-कर्करोगाच्या उपचारांत क्रांतिकारक बदल घडवणारे सर्जन डॉ. बर्नार्ड फिशर यांचे नुकतेच अमेरिकेत निधन झाले. ती शस्त्रक्रिया सोपी करणे तसेच औषधांचा सुयोग्य पूरक वापर ही त्यांच्या पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत.

आदरांजली !

स्तनाच्या कर्करोगास संदर्भात सन 2020 च्या अखेरीसचा भारतातील अहवाल वाचला. त्यातील ठळक मुद्दे :

१. दर 29 पैकी एक स्त्री या रोगाची शिकार होत आहे.
२. महानगरातील कर्करोगांत हा रोग पहिल्या स्थानावर आहे.

३. 30 ते 50 या वयोगटात या रोगाची सातत्याने वाढ होते आहे.
४. या कर्करोगींपैकी निम्म्याहून जास्त स्त्रिया रोगाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात आहेत. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण लक्षणीय.

प्रतिबंधात्मक उपाय :
1. प्रत्येक तरुण स्त्रीने स्तनांची स्व-परीक्षा नियमित करणे आवश्यक. ही मासिक पाळीच्या पाच दिवसानंतर करणे योग्य ठरते.

2. गरजेनुसार इतर चाळणी चाचण्यांची माहिती वर लेखात दिलेलीच आहे.

अंध मुलींची बोटे शोधणार स्तनांमधला कर्करोग
https://www.lokmat.com/editorial/now-blind-girl-fingers-will-detect-brea...

जर्मन डॉक्टर फ्रॅंक हॉफमन यांनी काही वर्षांपूर्वी या पद्धतीचा शोध लावला आणि वापर केला. त्यात त्यांना चांगले यश आले. आता हळूहळू या प्रकारचे अंध मुलींचे प्रशिक्षण अन्य देशांमध्ये होत आहे.

काही शास्त्रीय संदर्भ चाळले. (https://www.researchgate.net/publication/330719133_Diagnostic_Accuracy_o...)

अंध मुलींनी या प्रकारे केलेली तपासणी आणि डॉक्टरांनी केलेली तपासणी ही बऱ्यापैकी मिळतीजुळती आहे असे निष्कर्ष आहेत.
अर्थात ही चाळणी चाचणी आहे. त्यातून संशय बळावलेल्या रुग्णांची मॅमोग्राफी आणि अन्य तपासणी पुढे केली जाते.

प्रसिद्ध ऋदय रोग तज्ञ doctor मांडके आणि पाच दिवसांपूर्वी मृत्यू पावलेले heaet तज्ञ dr Gandhi.
ह्यांचं मृत्यू heart attack नीच झाला.
प्रचंड अनुभव,वेगवेगळ्या heart रोग विषयी रोगात लक्षण काय दिसतात त्याचा प्रॅक्टिकल अनुभव.

Heart कसे निरोगी ठेवावे ह्याचे पूर्ण ज्ञान असणाऱ्या ह्या व्यक्ती .
मरण मात्र अटॅक नीच.
कसा विश्वास ठेवणार शास्त्रीय दव्यांवर

मुलींसाठी महत्वाचे
https://www.loksatta.com/desh-videsh/vaccination-for-cervical-cancer-pre...

नवी दिल्ली : गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.एचपीव्ही लसीकरण मोहीम तीन वर्षांत तीन टप्प्यांत राबवण्यात येईल. ती येत्या जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

एचपीवी व्हॅक्सिनेशनसाठी ९ वर्षे हे फार लहान वय नाही का? ज्यावेळी लैंगिक संबंध सुरु होण्याची शक्यता असू शकते त्या वयापासून (साधारण लेट टीन्स धरूया) व्हॅक्सिनेशन सुरु का नाही करत? कि अमुक एका वयानंतर इम्युनिटी येत नाही असे काही आहे? गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग फक्त या व्हायरसने होतो की अजूनही काही करणे असू शकतात? हे लसीकरण वन टाइम असते की फ्लू शॉट सारखे वारंवार करावे लागते?

एचपीवी आणि त्याचे लसीकरण याबद्दल खूप शंका आहेत.

वर चांगले प्रश्न विचारले आहेत तुम्ही. सध्या खालील माहिती आपल्याला पाश्चात्य देशांच्या शिफारसीनुसारच उपलब्ध आहे. भारतात अद्याप लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरुवात व्हायची असल्यामुळे विदा किंवा अनुभवाची कमतरता भासेल.

या लसीकरणाबाबत अधिकउणे बाजू अशा :
1. वय 9 ते 45 या वयोगटासाठी शिफारस. थोडी सुधारित शिफारस म्हणते की वयोगट 11 ते 12 निवडा. वय 9 वर्ष अशासाठी की काहींच्या बाबतीत बाललैंगिक शोषणाचा अनुभव आलेला असू शकतो.
2. ही लस विषाणूच्या नऊ उपप्रकारांविरुद्ध संरक्षण देते. ती मुलग्यांना सुद्धा देता येते (इतर आजार) .

3. एका डोसने मिळणारे अँटिबॉडी संरक्षण सुमारे चार वर्षे पुरते. काही देशांमध्ये दोन किंवा तीन डोसेसची शिफारस आहे त्यानुसार संरक्षण सहा ते आठ वर्षे टिकते.
4. या लसीमुळे मिळणारे संरक्षण संबंधित कर्करोगाच्या बाबतीत अंशतःच आहे. कारण hpv चे इतर असंख्य उपप्रकार असून त्यामुळे होणारे आजार सुमारे 30 टक्के लोकांमध्ये दिसून येतात.

5. लस सुरक्षितता प्रचंड वादग्रस्त आहे. काही दुष्परिणाम : चक्कर येणे, रक्त गुठळ्या होणे आणि दुर्मिळ घटनांमध्ये चेतातंतूंना गंभीर इजा होणे (Guillain-Barré syndrome) असे आहेत.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग फक्त या व्हायरसने होतो की अजूनही काही करणे असू शकतात? >>>

1. Long-lasting (persistent) infection with high-risk types of human papillomavirus (HPV) causes virtually all cervical cancers.
• अर्थात अशा एकूण जंतुसंसर्गापैकी फक्त पाच टक्के स्त्रियांना तो कर्करोग होतो. काही जनुकीय घटकांचा अप्रत्यक्ष संबंध आहे.
• एचपीव्ही संसर्ग झालेल्या व्यक्तीत दीर्घकालीन धूम्रपान आणि एचआयव्ही संसर्ग हे जर जोडीने असेल तर मग धोका अधिकच वाढतो.

2. एखाद्या स्त्रीच्या आईने तिच्या गरोदरपणात diethylstilbestrol हे औषध घेतले असल्यास त्या स्त्रीमध्ये भविष्यात हा कर्करोग होण्याचा धोका असतो. हाच काय तो एक अन्य स्वतंत्र धोकादायक घटक.

https://www.cancer.gov/types/cervical/causes-risk-prevention

४५ वयानंतर लस- शिफारस का नाही ?

1. लसीची सर्वाधिक उपयुक्तता आयुष्यात प्रथम लैंगिक संबंध येण्यापूर्वी ती दिली असता आहे.

2. 45 वरील वयोगटातील स्त्रियांना एचपीव्हीच्या कुठल्या तरी प्रकारांनी संसर्ग होऊन गेलेला असण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या वयानंतर लस देऊन त्याचा फारसा उपयोग होणार नाही.

3. एखाद्या स्त्रीने जर अनेक दशके फक्त एकाच पुरुषाबरोबर संबंध ठेवले असतील तर मग या वयानंतर नव्या एचपीव्हीने संसर्ग होण्याचा धोका नसतो (not likely).

https://www.cdc.gov/vaccines/vpd/hpv/hcp/recommendations.html#:~:text=HP....

>>>>>एखाद्या स्त्रीने जर अनेक दशके फक्त एकाच पुरुषाबरोबर संबंध ठेवले असतील तर मग या वयानंतर नव्या एचपीव्हीने संसर्ग होण्याचा धोका नसतो (not likely).
होय हे मला सी (सीमंतिनी) ने याच विषयाच्या एका धाग्यावरती, सांगितल्याचे स्मरते. धन्यवाद डॉक्टर.

Pages

Back to top