तब्बेत : ‘त्यांची’ आणि आपली !

Submitted by कुमार१ on 8 October, 2019 - 22:53

माणूस हा एक प्राणी आहे. जीवशास्त्रानुसार प्राण्यांचे प्रजाती आणि जाती ( Genus & Species) असे वर्गीकरण करतात. त्यानुसार माणूस होमो सेपिअन्स या कुळात येतो. ‘सेपिअन’ हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ‘शहाणा’ असा आहे. सुमारे २४ लाख वर्षांपूर्वी या कुळाची निर्मिती झाल्याचे मानतात. तिथून पुढे उत्क्रांती होत माणूस आजच्या अवस्थेला पोचला आहे. मानवजातीच्या या अनोख्या इतिहासाचा विस्तृत आढावा युव्हाल नोव्हा हरारी यांनी त्यांच्या बहुचर्चित ‘सेपिअन्स’ या पुस्तकात घेतला आहे. हे विद्वान जेरुसलेम इथल्या विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक आहेत. त्यांचे हे पुस्तक २०११मध्ये प्रकाशित झाल्यानंतर जगभरात खूप गाजले. एव्हाना त्याचा ३० हून अधिक भाषांत अनुवाद झालेला आहे, ज्यात मराठीचाही समावेश आहे. सध्या मी हे मराठी पुस्तक वाचत आहे.

एव्हाना जागतिक साहित्यविश्वात या पुस्तकावर अनेक लेख व परीक्षणे प्रसिद्ध झाली असून चर्चाही झडल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण पुस्तकाचा गोषवारा वगैरे लिहीण्याचा माझा इरादा नाही. लेखकाने या पुस्तकात मानवी आरोग्यासंबंधी बरीच मते व्यक्त केली आहेत. अश्मयुगातील मानव, भटके व शिकारी, शेतकरी आणि आजचा आधुनिक शहरी माणूस यांच्या एकंदरीत आरोग्याची तुलनाही केलेली आहे. तेव्हा फक्त आरोग्य हाच धागा पकडून मी या पुस्तकासंबंधी काही विवेचन करणार आहे.

......
तब्बेतीच्या दृष्टीने दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे आपला दैनंदिन आहार आणि शारीरिक हालचाली. अश्मयुगातील आपले पूर्वज आणि आपण यांची तुलना करता यासंदर्भात खूप फरक पडलेत हे उघड आहे. पुस्तकात या जीवनशैलीचे सविस्तर वर्णन आहे. त्यातील काही महत्वाचे मुद्दे असे:

• आहार: अश्मयुगात माणूस गवताळ प्रदेश आणि अरण्यात राहत असे. इथे अन्नाची कमतरता होती. कशीबशी कंदमुळे आणि फळे मिळत. पिकलेली गोड फळे हे तर तेव्हाचे मिष्टान्न होते. जर अन्जीरांनी लगडलेले झाड दिसले तर त्यावर तिथल्या सगळ्या प्राण्यांचा हक्क असे. ही फळे जर बबून-माकडांच्या कळपाच्या नजरेस पडली तर ते त्यावर झडप घालून वेगात फस्त करीत. हे पाहिल्यावर माणूस एक गोष्ट शिकला. जर त्याने ही फळे आधी पहिली तर प्राण्यांच्या नजरेस पडण्यापूर्वीच ती शक्य तितकी खाऊन घ्यायची. त्यामुळे हे खाणे अर्थातच बकाबका होई. असे वारंवार झाल्यावर ती सवय त्याच्या हाडामासात रुजली आणि कालांतराने ती थेट जनुकांत नोंदली गेली. त्यामुळे अन्न दिसले रे दिसले की गरजेपेक्षा जास्तच खायची सवय अंगी मुरली.

• आता शिकारी व भटके यांचे आयुष्य पाहू. ते साधारण ३ दिवसातून एकदाच शिकार करत. त्यामुळे दिवसाचे मोजकेच तास अन्न शोधण्यात जात. ते रोज जेवणाचे वेळेपूर्वी घरी येत. त्यांना कुटुंबाबरोबर बराच वेळ घालवता येई आणि गप्पाटप्पा, मुलांशी खेळणे याही गोष्टी ते निवांत करीत.

• भटकंतीतून मिळणारे अन्न उत्तम पौष्टिक असे. हे अन्न विविधता असलेले होते, जसे की अळंबी, बेरी, फळे, गोगलगायी, कासव, ससा, रानटी कांदे.
• ते लोक सुपोषित होते आणि त्यांची उपासमार होत नव्हती हे त्यांच्या सांगाड्यांच्या अभ्यासावरून सिद्ध झालेले आहे. तसेच ते त्यानंतरच्या काळातील शेतकऱ्यांपेक्षा अधिक निरोगी व उंच असल्याचेही आढळले आहे.

ते एकाच प्रकारच्या अन्नावर अवलंबून नसल्याने वेळप्रसंगी त्यांची उपासमार झाली नाही, असे दिसते.
• ते लोक येताजाता झाडावरील फळे आणि मधाची पोळी यांचे निरीक्षण करत. ती शोधण्यासाठी दक्षपणे कसे बसावे, चालावे आणि धावावे याची त्यांना खूप सवय होत असे. अशा प्रकारे शरीराच्या सतत वेगळ्या हालचाली केल्याने त्यांचे शरीर काटक आणि लवचिक राही.

• कधी एखाद्या भागात दुष्काळ पडला तर ते स्थलांतर करीत आणि नवा अन्नयुक्त प्रदेश शोधत.
• तत्कालीन पर्यावरण खूप ‘शुद्ध’ असल्याचा त्यांना चांगलाच फायदा मिळाला. तेव्हा प्रदूषण काय ते माहित नव्हते. दाटीवाटीने राहण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे हल्लीचे संसर्गजन्य रोग नसायचे.

• मात्र बालमृत्यू खूप असायचे याचे काही पुरावे मिळाले आहेत. जी बालके प्रौढ वयात पोचत त्यांना चांगले आयुष्य लाभे.

तर असे होते हे भटक्यांचे जीवन. अगदी मोकळेढाकळे आणि स्व‍च्छंदी. एकदा का पुरेसे अन्न प्राप्त केले की इतर कुठले झक्कू त्यांच्यामागे नव्हते. काही प्रकारच्या अन्नासाठी मात्र त्यांना प्राण्यांशी स्पर्धा करावी लागली. त्यामुळे असे अन्न दृष्टीस पडताच ते ओरबाडून बकाबका खायची सवय त्यांच्यात मुरली. ही अन्नाची अशाश्वतता संपविण्यासाठी टिकाऊ अन्नाची निर्मिती ही गरज कालांतराने निर्माण झाली असावी. त्यातूनच शेतीचा शोध लागला.

आता हा कृषीक्रांतीचा टप्पा पाहू.
इ स पूर्व ९००० पासून शेतीची सुरवात झाली. सुरवातीस गहू, तांदूळ व बटाटा ही मुख्य पिके घेतली जात. त्यापैकी गव्हाची शेती हा विषय लेखकाने विस्ताराने हाताळला आहे. शेतीपूर्व काळात जमीन अगदी खडकाळ होती. आता गव्हाची लागवड करण्यासाठी ती शेतीयोग्य करणे आवश्यक होते. हे काम प्रचंड कष्टाचे होते. तसेच लागवड केल्यावर त्या रोपांची निगा राखण्यात माणसाचा संपूर्ण दिवस कामात जाऊ लागला. शेतातील तण काढणे हेही कष्टप्रद होते. त्यासाठी दिवसभर उन्हात राबावे लागले. आता गहू हे खूप पाणी खाणारे पीक असल्याने जलसिंचन वाढवावे लागले. पुन्हा या पिकावरील टोळधाडीपासून बचाव करण्यासाठी शेताला कुंपण घालणे असे अनेक कष्ट चढत्या क्रमाने वाढत गेले. भटक्याच्या जीवनशैलीतून हे संक्रमण होत असताना त्याचे तब्बेतीवर असे अनिष्ट परिणाम झाले:

१. पाठीच्या कण्याचे विकार
२. मान आणि गुडघे यांचे विकार
३. हर्निया

या कृषीक्रांतीने अन्न्साठ्यात लक्षणीय भर पडली. पण ही पिके कर्बोदकप्रधान असल्याने आपल्या सर्वांगीण पोषणाच्या बाबतीत तोटा झाला. अति भरपेट खाण्याची सवय आपल्या जनुकांत अश्म्युगातच नोंदवली गेली होती. त्यात आता हे कर्बोदकप्रधान अन्न आपण गरजेपेक्षा जास्तच खाऊ लागलो. त्यातून आरोग्यावरील दुष्परिणाम अगदी बाल्यावस्थेतच दिसू लागले. भटक्या अवस्थेत बालकांच्या स्तनपानाचा कालावधी बराच जास्त होता. परंतु, आता त्यांना मातेचे दूध लवकर थांबवून धान्यांच्या खिरी चालू झाल्या. त्यातून त्यांची प्रतिकारशक्ती दुबळी होत गेली.

अन्नाच्या या मुबलक उपलब्धता आणि साठ्यामुळे हळूहळू लोक लाडावत गेले. तसेच भटकेपणा संपून एका ठिकाणी (शेतीजवळ) स्थिरावणे वाढत गेले. त्यातून स्त्री-पुरुष संबंधांचे प्रमाण वाढले. परिणामी लोकसंख्या झपाट्याने वाढली आणि कालांतराने तिचा विस्फोट झाला.
या सुरवातीच्या शेतीचे अन्य काही परिणाम लक्षात घेण्याजोगे आहेत. तेव्हा आपली गुजराण ही मोजक्या पिकांवर अवलंबून होती. त्यामुळे जेव्हा मोठा दुष्काळ पडे किंवा जबरदस्त टोळधाड पिकांवर येई तेव्हा लोकांची खूप उपासमार होई. त्यातून खूप मृत्यू होत. कारण आता या नव्या जीवनशैलीत भटक्याप्रमाणे नैसर्गिक अन्न शोधण्याचे कष्ट झेपणार नव्हते; किंबहुना ते विस्मृतीत गेले होते.

माणूस आणि अन्नाची उपलब्धता या विषयाकडे आपण ऐतिहासिकदृष्ट्या क्रमाने पाहत गेलो तर असे टप्पे दिसतात:
मिळेल ते आणि मिळेल तेव्हाचे नैसर्गिक अन्न >> शेतीचा शोध >>> हरितक्रांती >>> मुबलक अन्नसाठे >> लाडावलेपणा >>> बहुसंख्यांची बैठी जीवनशैली आणि कर्बोदकप्रधान अन्नाचे बेसुमार सेवन >> विविध आजार.

हरितक्रांती ही शाप की वरदान हा नेहमीचा वादाचा विषय आहे. त्यावर दोन्ही बाजूंनी हिरीरीने चर्चा होतात. त्यातील कुठलीच बाजू पूर्ण बरोबर किंवा चूक असे म्हणता येत नाही. प्रस्तुत लेखकाने या शेतीविषयक प्रकरणाला तर ‘कृषीक्रांती : इतिहासातील सर्वात मोठी फसवेगिरी’ असे शीर्षक दिले आहे.
……………..

आता आपण अतिरिक्त खाणे आणि त्यातून निर्माण झालेल्या आजारांकडे आधुनिक वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहू. विसाव्या शतकात औद्योगीकरण झपाट्याने वाढले. त्यातून सामाजिक सुबत्ता वाढू लागली. ज्या देशांत अधिक संपत्ती निर्माण झाली तिथले लोक सुखासीन होऊ लागले. अन्नसाठे मुबलक झाले. विविध यंत्रांचा मानवी जीवनात शिरकाव झाला. त्यातून पूर्वीच्या सहज शारीरिक हालचालीही कमी झाल्या. उच्च उष्मांकयुक्त आहार आणि बैठी जीवनशैली यांच्या संयोगातून काही आजारांचा प्रादुर्भाव वाढला. यात मुख्यतः लठ्ठपणा आणि मधुमेह (प्रकार २) हे आजार येतात. या आजारांची कारणमीमांसा पाहताना जनुकीय पातळीवरील अभ्यास सुरु झाला.

१९६२मध्ये जेम्स नील या जनुकतज्ञाने यासंदर्भात एक गृहीतक मांडले. त्याचा सारांश असा आहे:
भटक्या अवस्थेत जेव्हा अन्न तुटवडा होता तेव्हा एकदम मिळालेले अन्न शरीरात ऊर्जारूपाने साठवणे आवश्यक होते. त्यामुळे खूप खाण्याची सवय काही जनुकांत बिंबली गेली (बचत-जनुके). अनुवंशिकतेने तो गुण पुढील पिढ्यात जात राहिला. किंबहुना अशी अतिरिक्त ऊर्जा साठवू शकणारी माणसेच जगू आणि टिकू शकली. म्हणजेच हा जनुकीय गुणधर्म तेव्हा गरजेचा आणि फायद्याचा ठरला. मात्र सध्याच्या युगात जेव्हा अन्न मुबलक झाले तेव्हा उत्क्रांतीदरम्यान मिळालेला हा पुरातन गुण आता तब्बेतीस त्रासदायक ठरत आहे.

हे गृहीतक बरीच वर्षे चर्चेत राहिले. त्यावर दोन्ही बाजूंनी वादविवाद झडले. पुरेशा पुराव्यांअभावी ते सिद्ध करता आले नाही. त्यातून काही पर्यायी गृहीतके मांडली गेली:

१. सुबत्तेतून आलेल्या आजारांचे निव्वळ अति खाणे हे कारण असत नाही. पर्यावरणातील अनिष्ट घटकांमुळे व्यक्तीच्या काही जनुकांवर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे असे आजार होण्याची शक्यता बळावते. त्याच्या बरोबरच जीवनशैलीचाही परिणाम निर्णायक ठरतो.

२. बदलत्या जनुकांचे गृहीतक : यानुसार अति खाऊन उर्जेची साठवणूक करणे याचा जगण्याचे (survival) दृष्टीने काही फायदा पूर्वीही नव्हता आणि आताही नाही. लठ्ठपणाचे स्पष्टीकरण असे आहे. शरीरात जास्तीत जास्त किती मेद साठवला जातो, हे काही जनुकांच्या नियंत्रणात असते. या जनुकांच्या बिघाडातून हे नियंत्रण जाते आणि मग मेदनिर्मिती बेसुमार होते.
लठ्ठपणा आणि मधुमेह हे गुंतागुंतीचे आजार आहेत. त्यांची कारणे देखील क्लिष्ट आहेत. कुठलाही एक घटक किंवा जनुक त्यासाठी जबाबदार नाही. अनेक पर्यावरणीय घटकांचा आपल्या जनुकांवर विपरीत परिणाम होतो.. त्यातून ग्लुकोज, इन्सुलिनचे कार्य आणि मेदनिर्मिती या त्रिकुटातील सुसंगती बिघडते. असे झालेल्या व्यक्तीस हे आजार होण्याचा धोका वाढतो. आता जर तिने गरजेपेक्षा जास्त खाण्याची सवय लावली आणि त्याच्या जोडीस व्यायामाचा अभाव असेल तर तो धोका अजूनच वाढतो. अनुवंशिकतेने हे गुणधर्म पुढील पिढीत जातात.

मानवी उत्क्रांती आणि आपले आरोग्य हा कुतूहलाचा विषय आहे. एकेकाळी स्नायूंवर भिस्त असलेला मानव आज मेंदूच्या शक्तीवर अधिक अवलंबून आहे. शेती, औद्योगीकरण, तंत्रज्ञान, आहार आणि जीवनशैली अशा अनेक घटकांचे एकत्रित परिणाम आपल्या तब्बेतीवर झालेले आहेत. एकेकाळचे तुफान बालमृत्यू आपण आटोक्यात आणले. पण त्याच जोडीला प्रौढपणीचे काही चयापचय-आजार एखाद्या साथीप्रमाणे समाजात फैलावले. त्यांचे मूळ शोधण्याचे प्रयत्न अनेक संशोधनांतून सतत चालू आहेत. ‘सेपिअन्स’च्या लेखनातून मानवी उत्क्रांती आणि आरोग्य या विषयावर चांगला प्रकाशझोत टाकलेला आहे.
*******************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आदीमानवात लोकसंख्या वाढ उलट जास्त झाली असती पण बालमृत्यूचे प्रमाण जास्त होते. अन्यथा त्यांना अन्न पिकवावे लागत नव्हते. फक्त शोधण्याचे कष्ट होते. अशा परिस्थितीत स्री पुरुष संबध जास्त येत असावा.

एकेकाळी स्रीया टोळी प्रमुख होत्या. टोळीला खाणे मिळविण्यात त्यांचा पुढाकार होता. टोळीप्रमुख स्रीला देवी सारखे पुजत.

आजही अमेझॉन खो-यातले आदीवासी फक्त जंगलावर निर्भर आहेत.

नाव आठवत नाही पण एक टापू असा आहे जिथले आदिवासी civilian जवळ फिरकूच देत नाहीत. Civilian माणसं त्यांना शत्रू वाटतात. असुरक्षित वाटल्याने त्यांच्या पासून दूर पळतात किंवा हत्या करतात. कपडे वगैरे माहीतच नाहीत. अशाच काही जमाती विनाश पावण्याचा धोका आहे.

जर एखाद्याने आता फक्त फला आहारच घेतला तर काय परिणाम होतो?

धन्यवाद...

नाव आठवत नाही पण एक टापू असा आहे जिथले आदिवासी civilian जवळ फिरकूच देत नाहीत. Civilian माणसं त्यांना शत्रू वाटतात. >> तुम्ही बहुतेक अंदमान वरील एका आदिवासी जमाती बद्द्ल बोलताय.

वरील सर्व नियमित वाचकांचे आभार !

@ दत्तात्रय,
जर एखाद्याने आता फक्त फला आहारच घेतला तर काय परिणाम होतो?
>>>>
चांगला प्रश्न.
१. फळांमधून जीवनसत्वे आणि खनिजे चांगली मिळतील.
२. आता उर्जेचा मुद्दा पाहू. फळांत ग्लुकोज, फ्रुकटोज आणि या दोघांचे संयुग (sucrose) या शर्करा असतात. त्या खाल्ल्यानंतर त्यांचे (पहिल्या २) वेगाने शोषण होते. शेवटी सगळ्यांचे शरीरात ग्लुकोजमध्येच रुपांतर होते.

३. जर आपण फक्त फळे खाल्ली तर ग्लुकोजची रक्तपातळी लवकर वाढेल. ते ग्लुकोज वेगाने पेशी वापरून टाकतील. जर फळे मर्यादित खाल्ली तर आपल्याला उर्जेसाठी ती वारंवार खात रहावी लागतील.
४. गोड फळे जर एकदम भरपूर खाल्ली तर ग्लुकोज पातळी झपकन वाढेल, जे चांगले नाही.

५. या उलट गहू/ तांदूळ यात स्टार्च असतो. त्याचे विघटन होऊन ग्लुकोज होणे ही संथ प्रक्रिया असते. त्यामुळे ग्लुकोज पातळी झपकन वाढत नाही.

लेख आवडला. कुमार १ आपण नेहमीच नुसते उपयुक्त नव्हे तर वेगळ्या विषयावर नि रोचक पद्धतीने लिहिता.. त्याबद्दल धन्यवाद.

लेख आवडला. कुमार १ आपण नेहमीच नुसते उपयुक्त नव्हे तर वेगळ्या विषयावर नि रोचक पद्धतीने लिहिता.. त्याबद्दल धन्यवाद.>>>>> + १

लेख छानच आहे!

> आता शिकारी व भटके यांचे आयुष्य पाहू. ते साधारण ३ दिवसातून एकदाच शिकार करत. त्यामुळे दिवसाचे मोजकेच तास अन्न शोधण्यात जात. ते रोज जेवणाचे वेळेपूर्वी घरी येत. त्यांना कुटुंबाबरोबर बराच वेळ घालवता येई आणि गप्पाटप्पा, मुलांशी खेळणे याही गोष्टी ते निवांत करीत. > कुटुंब या शब्दाऐवजी टोळी हा शब्द जास्त योग्य होईल का?

मंजूताई, अ‍ॅमी,
आभार !

कुटुंब या शब्दाऐवजी टोळी हा शब्द जास्त योग्य होईल का?
>>>
सूचना चांगली आहे . Bw

डॉ. कुमार,
वेगळ्याच विषयावरचा रोचक लेख. आवडला.
एक शंका आहे. आपल्या पोटातील appendix हे उत्क्रांती होताना राहिलेला शेपटीचा अवशेष आहे, हे खरे आहे का? की निव्वळ दंतकथा ?

वरील सर्व नियमित वाचकांचे प्रोत्साहनाबद्दल आभार !
. आपल्या पोटातील appendix हे उत्क्रांती होताना राहिलेला शेपटीचा अवशेष आहे, हे खरे आहे का? की निव्वळ दंतकथा ?
>>>>.

शेपटीचा अवशेष ही निव्वळ थापेबाजी आहे ! डार्विन-थिअरी नुसार प्राण्यांच्या पचनसंस्थेतील ‘सिकम’ या अवयवाचा अप्पेन्डीक्स हा अवशेष मानला जाई. तसेच तो बिनकामाचा समजला जाई.

नवीन संशोधनानुसार तसे नाही. मुळात तो निव्वळ अवशेष (vestige) नाही. त्याच्यात उपयुक्त जिवाणू वसतात.

छान लेख. होमो सपीएन्स पुस्तक वाचायला घेतले आहे, गाडी रेंगाळत जातेय Happy Happy

पुस्तक वाचतानाच कळत होते की शेतीची सुरवात करून मानवाने स्वतःच्या विनाशाच्या दिशेने पाऊल उचलले.

एकेकाळी स्रीया टोळी प्रमुख होत्या. टोळीला खाणे मिळविण्यात त्यांचा पुढाकार होता. टोळीप्रमुख स्रीला देवी सारखे पुजत

हे फारसे खरे नसावे. स्त्री पुरुष हा भेदभाव माणूस स्थायिक झाल्यावर सुरू झाला असावा. जेव्हा फक्त टोळ्या होत्या, तेव्हा जी व्यक्ती टोळीच्या गरजा पुरवू शकणार ती प्रमुख ठरत असणार.

@ साधना,
धन्यवाद.
पुस्तक वाचायला घेतले आहे, गाडी रेंगाळत जातेय
>>>
अगदी. माझीही गाडी तशीच जाते आहे ! पुस्तक संशोधनात्मक असल्याने फारसे आकर्षक नाही. ४४५ पैकी पहिली १२५ पाने वाचून झाल्यावर त्यातला आरोग्याचा भाग संपलेला आहे. त्यामुळे पुढे आता उड्या मारतच वाचेन असे वाटते.
Bw

ओळख आवडली. पण हंटर गॅदरर अशा प्रकारच्या काही गुगल सर्चेस दिल्या तर अशा माहीतीचे लेख सापडतात. मग या पुस्तकात असे विशेष काय आहे? थोडं अधिक क्लिष्ट किंवा सखोल लिहीलेत तर आवडेल.

@ साधना
एकेकाळी स्रीया टोळी प्रमुख होत्या. टोळीला खाणे मिळविण्यात त्यांचा पुढाकार होता. टोळीप्रमुख स्रीला देवी सारखे पुजत
> .
हे मी तर्कतीर्थ पंडित लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या भारतीय संस्कृती कोश या पुस्तकात वाचले होते. देवी आणि देवीपुजा कशी आली ते लिहीले आहे.


सामो, अन्जू
: धन्यवाद.
मग या पुस्तकात असे विशेष काय आहे?
>>>>
ह्या पुस्तकात मानवजातीचा संपूर्ण इतिहास आहे. त्यात कुळाची उत्पत्ति, सामाजिक, राजकीय वाटचाल, आंतरराष्ट्रीय संबंध व महत्वाच्या घटना या गोष्टींचा आढावा आहे. आरोग्य हा त्यातील एक अल्प भाग आहे. मी लेखात म्हटल्याप्रमाणे फक्त या अल्प भागावरच मी लिहीले आहे.
लेखाचा पूर्वार्ध पुस्तकाबद्दल आहे. उत्तरार्धात मी आधुनिक विज्ञानाच्या अंगाने भर घातली आहे.

मी नेहमी लेख मध्यम आकाराचेच लिहितो. वाचकांच्या विशिष्ट प्रश्नांच्या अनुषंगाने अधिक माहिती प्रतिसादांतून देतो. मला ते बरे वाटते.

डॉक्टर, appendix च्या माहितीबद्दल धन्यवाद. या अवयवाचे उपयोग आणि आजार याबद्दल आपण सवडीने लिहावे ही विनन्ती.

कुमार१, सेपियन्स चा मराठी अनुवाद वाचनीय आहे का? मी इंग्रजीतून वाचले आहे. मला प्रचंड आवडलेले (निवडक दहात) पुस्तक आहे. पण भाषेच्या दृष्टीने इंग्रजी पुस्तक बऱ्यापैकी क्लिष्ट आणि बोजड आहे. आमच्या घरातल्या जे. ना. ना वाचायला द्यावे असे वाटते. त्या दृष्टीने मराठी अनुवाद कसा आहे? कितपत वाचनीय आहे?

विचार करायला लावणारा लेख. आवडलाच!

काही शंका:

१. अति खाऊन उर्जेची साठवणूक करणे याचा जगण्याचे (survival) दृष्टीने काही फायदा पूर्वीही नव्हता >>> या गृहितकाला काय आधार? उलट भटक्या जीवनशैलीमध्ये अन्न मिळेल याची शाश्वती नसल्याने उर्जेची साठवणूक करणे उपयुक्त होते त्यामुळे ते गृहितक जास्त सयुक्तीक वाटते.

२अ. मी पूर्वी वाचलेल्या एका लेखानुसार भटक्या जीवनशैलीमध्ये जे अन्न मिळायचे त्यात क्षार कमी असायचे त्यामुळे माणसाची पचनसंस्था अत्यंत कमी क्षार पचवणारी होती. मीठाच्या शोधानंतर क्षारांचे सेवन आधीच्या प्रमाणात खूप जास्त वाढले. त्याचे काही दुष्परीणाम झाले का?

२ब. त्या लेखानुसार आजही मानवी पचनसंस्था आपण सेवन करीत असलेल्या क्षारांचे प्रमाण पचवायला पुरेशी नाही. हे बरोबर आहे का? पण मग तसे असल्यास रुग्णांना सलाईन का देतात?

जिज्ञासा,
मराठी अनुवाद मला काहीसा रुक्ष वाटला. माझा हे पुस्तक अंशतःच वाचण्याचा हेतू होता. त्यातले ‘गव्हाच्या शेतीपासून आपल्या तब्बेतीची वाट लागली’ हे प्रकरण मी जालावर वाचले होते. तेवढ्या उत्सुकतेसाठी मी वाचायला घेतले.

माधव, धन्यवाद.
तुमच्या प्रश्नाची उत्तरे जरा वेळाने !

@ माधव,
२ टप्प्यात तुमचे प्रश्न घेतो.

१. त्यामुळे ते गृहितक जास्त सयुक्तीक वाटते.
>>>>
१९६२मध्ये मांडलेले ‘बचत-जनुकांचे’ गृहीतक हे या विषयातील पाया समजले जाते खरे. पण ते पुराव्यानिशी सिद्ध न करता आल्याने मागे पडले. याबाबतच्या अनेक गृहीतकांचा भरपूर वैज्ञानिक काथ्याकूट झालेला आहे. वाचू तेवढे कमी आहे !

Pages