घर पाडायचेय सल्ला हवाय !

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 September, 2019 - 02:40

मुंबई ही ज्या सात बेटांची बनली होती. त्यातील एक बेट अर्धेअधिक माझ्या खापरपणजोबांचे होते. असे आमचे वडिलधारी सांगतात. खरे खोटे ठाऊक नाही. आजची पिढी जशी फारसे डोके न लावता व्हॉटसप मेसेजवर विश्वास ठेवते. तसे थोरामोठ्यांनी सांगितलेल्यावर विश्वास ठेवा. असे आमच्या घरचे संस्कार होते. तर ते एक असो. पुढे भारत स्वतंत्र झाला. संस्थाने विलीन झाली. त्यात आमचीही जायदाद गेली. जे थोडंथोडकं उरले ते पुढच्या पिढीत दहा भावंडांमध्ये वाटले गेले. जे माझ्या आजोबांच्या वाट्याला आले ते पुन्हा आठ भावंडांमध्ये वाटले गेले. तेव्हा ही कॅलेंडर छपाई नॉर्मल समजली जायची. लगेच मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येला आम्हाला जबाबदार ठरवायची गरज नाही. आम्ही ईथले भूमीपुत्र आहोत. परप्रांतीय नाही. हक्काच्या जमिनीवर पीक घेत आहोत.

तर ते ही एक असो. आजमितीला आमची मुंबईत तीन घरे आहेत. हे ही नसे थोडके. हम दो हमारे दो करत दोघांना एकेक घर द्यायचे आणि आपल्याला एक ठेवायचे असा माझा भविष्याचा प्लान होता. पण तो आता डळमळीत होताना दिसतोय. कारण मायबोलीवरची चर्चा.

मायबोलीवर आरे वाचवा म्हणणारया बेगडी(!) पर्यावरणभातप्रेमींवर जहरी टिका केली जात आहे. आधी आपली घरे तोडा, मग दुसरयांचा विकासात घाला खोडा. या टिकेने व्यथित होत आरे धागाकर्ता या नात्याने सुरुवात मी आमचेच घर पाडण्यापासून करायचा विचार करत आहे.

आता प्राब्लेम असा आहे. तीन घरांपैकी एक आहे बाबांच्या नावावर, एक आईच्या नावावर तर एक जे मी माझे म्हणू शकतो ते अजून लोन फिटून माझ्या ताब्यात आले नाहीये. त्यामुळे ते चर्चेतून बादच झाले.

तर आता घर पाडण्याआधी मला आईचे वा बाबांचे घर आपल्या नावावर करावे लागणार. कारण पर्यावरणप्रेमी मी आहे, माझे आईबाबा नाहीत.
आता बाबा काही मला त्यांच्या नावाचे घर देतील असे वाटत नाही. कारण अधूनमधून ते सेटमॅक्सवर बागबान बघताना आढळून येतात.

राहिली आई आणि तिचे घर. ते मात्र आईला भावनिक करत ताब्यात घेता येईल. तर आता याच घराला पाडायचा विचार चालू आहे.

तशी या घराचीही रोचक कहाणी आहे. आजोबांनी आपल्या लाडक्या सूनेला म्हणजे माझ्या आईला म्हटले, तुला एक घर बांधून द्यायची ईच्छा आहे. त्यासाठी दोन पर्याय दोन प्लॉट आहेत. एक स्मशानातून जातो. तर एक झाडाझुडुपातून. काय पाडायचे ते तू ठरव.
स्मशानाचे नाव घेताच आईच्या चेहरयावर स्मशानशांतता पसरली. आमच्याकडे देवापेक्षा भूतांवर विश्वास जास्त. तसेच त्यावेळी मी आईच्या पोटात होतो. तिने विचार केला. स्मशान पाडले आणि त्यातलेच एक आपल्या पोटी निपजले तर... तर.... पण शेवटी जे व्हायचे ते होतेच !

तर ते एक असो, आईने ठरवले समशानात राहण्यात काही शान नाही. आपण झाडंझुडपंच साफ करूया. आणि मग त्याजागी एक टुमदार बंगला उभा राहिला. अवघे पंधरावीस वर्षांचे आयुष्य. नंतर विकासाच्या नावावर तो देखील पाडला. आता त्या जागी पंधरा मजली टॉवर उभा आहे. आणि त्यातला दहावा मजला पुर्ण आमचा आहे.

आता प्राब्लेम असा आहे, तोच दहावा मजला पाडायचा आहे. पण अकरापासून वरच्या मजल्यावरचे रहिवाशी याला नकार देत आहेत. कारण त्यांना असे वाटते की आमचा माळा तोडला तर ते सुद्धा तुटतील.

तर आता त्यांना कसे पटवायचे? त्यांचा कसा होकार मिळवायचा? न मिळाल्यास त्यांच्या घराला धक्का न लावता मी माझे घर कसे तोडायचे? आणि माझ्यावरचा बेगडी पर्यावरणभातप्रेमीचा शिक्का कसा खोडायचा?
कृपया मार्गदर्शन करा _./\._

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मध्यंतरी मी जरा विचारात होतो काय झालंय तुला म्हणून पण फाजीलपणा सुरु झाला म्हणजे सगळं व्यवस्थित आहे म्हणायचे Wink

भावा अगोदर वरचे किती मजले आहेत, त्या लोकांना याच्या हून महाग, भारी घरं पॉश वस्तीत घेऊन द्या. आणि मग खुशाल तुमचं घर पाडा.

हर्पेन, पण फाजीलपणा सुरू कोणी केला?..
आणि आता मी माझे घर पाडून घ्यायला तयार आहे तर बघूया त्यातले किती जणं कुदळ फावडे घेऊन या धाग्यावर येतात.

त्या लोकांना याच्या हून महाग, भारी घरं पॉश वस्तीत घेऊन द्या.
>>>
ऐपत असती तर झरूर हे केले असते.
ईथे वर्गणी गोळा करायला एक धागा काढू का?

कुणी घर पाडुन तिथे झाडं लावा म्हणलं तरी आपण शब्दश: अर्थ न घेता लॅटरल थिंकिंग करावं, मार्ग सापडतो.
घर न पडताही झाडं लावता येतील, ऑक्सिजन मिळाल्याशी, आर्द्रता हवेत सोडल्याशी आणि पक्षी येऊन घरटी बांधून बागडल्याशी मतलब.
तू सिव्हिल इंजिनअर नसशील आणि तुला ठाऊक नसेल तर इमारत ही कॉलम्स आणि बिम्स वर उभी रहाते, म्हणजे भिंती पाडल्या तरी वरच्या मजल्यांना काही इजा पोचणार नाही. पूर्ण दहाव्या मजल्यावरच्या भिंती पाडून टाक आणि खाली माती टाकून त्यात झाडं आणि वेली लाव. वरच्या छताला भीडणार नाही एवढी उंच होणारी झाडे निवडायची किंवा तेवढ्या उंचीचे बोन्साय करायचे, वेली लावायच्या. दहाव्या मजल्याच्या चहू बाजूला पन्हाळे करून पावसाचे पाणी आत पर्यंत जाईल अशी सोय करायची. आणि ऊन पडले असताना तर आत पसरावे म्हणून बहिर्वक्री थोडे आरसे बसवायचे, की बस्स!
एवढे केलेस की तुझ्या माथ्यावरला बेगडी पर्यावरणवादी हा कलंक पूर्णपणे पुसल्या जाईल.

मानवमामा छान प्रतिसाद
आणि होय !
अतिशय दुर्दैवाने मी सिविल ईंजिनीअरच आहे.
खरे तर ही पोस्ट लिहितानाच माझ्या मनात तो विचार आलेला की भिंती पाडून मोकळी जागा बनवून झाडे लाऊया का? सुदैवाने अख्खा मजला आमचाच असल्याने भिंत कोणाशी सामाईकही नाही. पण मूळ लेखात मी स्वत: हा पर्याय मांडला नाही कारण यात बरेच लूपहोलही आहेत. जसे की हीरा म्हणतात प्रश्न झाडांचा नाही तर त्या खालच्या जिमिनीचा आहे. मी वरच्या मजल्यावर लावलेली झाडे कुंड्या टांगल्यासारखेच झाले. जमिनीला त्या झाडांचा काही फायदा होणार नाही. तिथे झाडांची मूळे नाहीत तर काँक्रीटच्या पाईलच घुसलेल्या राहणार.
म्हणून आधी मला त्या बेगडी विकासप्रेमींचे यावर मत हवे आहे. अन्यथा भिंतीही जायल्या आणि शिक्काही राह्यला असे नको ना व्हायला..

निल्सन धन्यवाद.
नोटाबंदी, जीएसटी, घसरता रुपया, चढते पेट्रोलचे भाव, मंदी वगैरे मुळे घरच्यांना एक घर विकावे लागले. मग एक घर मी घेतले. नुकतेच ते लोन सुरु झाले.

मानवमामा छान प्रतिसाद
आणि होय !
अतिशय दुर्दैवाने मी सिविल ईंजिनीअरच आहे.
खरे तर ही पोस्ट लिहितानाच माझ्या मनात तो विचार आलेला की भिंती पाडून मोकळी जागा बनवून झाडे लाऊया का? सुदैवाने अख्खा मजला आमचाच असल्याने भिंत कोणाशी सामाईकही नाही. पण मूळ लेखात मी स्वत: हा पर्याय मांडला नाही कारण यात बरेच लूपहोलही आहेत. जसे की हीरा म्हणतात प्रश्न झाडांचा नाही तर त्या खालच्या जिमिनीचा आहे. मी वरच्या मजल्यावर लावलेली झाडे कुंड्या टांगल्यासारखेच झाले. जमिनीला त्या झाडांचा काही फायदा होणार नाही. तिथे झाडांची मूळे नाहीत तर काँक्रीटच्या पाईलच घुसलेल्या राहणार.
म्हणून आधी मला त्या बेगडी विकासप्रेमींचे यावर मत हवे आहे. अन्यथा भिंतीही जायल्या आणि शिक्काही राह्यला असे नको ना व्हायला..

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 17 September, 2019 - 16:47

सही जवाब

भास्कर मान गये , अब बसकर ,
हजरजबाबीपणा ____/\____

हर्पेन Lol

मानव, बेस्ट एकदम.

हजरजबाबीपणा ____/\____ >>> अगदी अगदी.

बाकी तू पुन्हा लिहता झालास हे बघून छान वाटतयं पण अति करु नकोस हं >>> मम.

मानव, मस्त प्रतिसाद, अगदि टोल्याला प्रतिटोला. ऋन्म्याच्या फु(घा)ग्यातली हवाच काढुन टाकलीत... Lol

ऋन्म्याच्या फु(घा)ग्यातली हवाच काढुन टाकलीत..
>>>>

माफ करा राज, पण माझ्यामते हा आयुष्याकडे बघायचा नकारात्मक दृष्टीकोन झाला. मानव यांच्या प्रतिसादाने धाग्यात रंगत आणली. या पर्यायावर सारे सिरीअसली विचार करू शकता. बिल्डरला सांगून दर दोन मजल्यानंतर असा एक गार्डन मजला बांधू शकतो जेणेकरून प्रत्येक फ्लॅट धारकाला वरून नाहीतर खालून ऑक्सिजन उपलब्ध होईल.

This is Runmesh!! Happy Good one!!
I like you for your positive spirit... Though I agree sometime you go overboard in having last word. Just identify that thin line between being entertaining and irritating.

>>पण अकरापासून वरच्या मजल्यावरचे रहिवाशी याला नकार देत आहेत. कारण त्यांना असे वाटते की आमचा माळा तोडला तर ते सुद्धा तुटतील.>>
त्यांच्याकडे, दुर्लक्ष करा व पाडा दहावा मजला. हम मायबोलीकर तुम्हारे ७ है ;). जो होगा देखा जायेगा. निदान पर्‍या-वरणभाताचा (शत्रु) शिक्का तरी जाईल.

>>या पर्यायावर सारे सिरीअसली विचार करू शकता..<<
तुझ्या या धाग्यातल्या सार्कॅझमची वाट लागली - या अर्थी फुग्यातली हवा निघाली असं म्हणालो मी. आता तु सिरियसच असशील, तर कधी १०वा मजला पाडुन झाडं लावतोस ते सांग; मी येईन बघायला... Wink

Submitted by vt220 on 17 September, 2019 - 20:43
>>>>
धन्यवाद, लक्षात राहील Happy

..

व्हर्टिकल गार्डन करा सगलीकडे, हवा तरी शुद्ध होईल, माती आणि मुळांच पाहू नंतर काहीतरी
>>>

व्हर्टीकल म्हणजे मजल्यावरचे की व्हर्टीकल प्लेनमध्ये? त्या केसमध्ये झाडे कॅन्टीलीवर पोजिशनमध्ये वाढतील कशी? आईनेस्टाईनेच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार झुकून खाली दुमडतील ना? आणि पाणी सुद्धा सारे ओघळून वाहून जाईल ते वेगळेच..

यावरून एक विनोद आठवला. एके ठिकाणी भिंतीवर शेणाच्या गोवरया थापून चिकटवल्या असतात. तिथे चित्रगुप्त येतो आणि विचारात पडतो. यमराज त्याला विचरतोय काय झालं रे? तो म्हणतो, मी विचर करतोय गाईने भिंतीवर चढून गोबर केलेच कसे Happy

Pages