स्वभाव

Submitted by मिलिंद जोशी on 7 September, 2019 - 12:31

माझा आजचा स्वभाव आणि काही वर्षांपूर्वीचा स्वभाव यात बराच फरक पडलेला आहे. खास करून जे मला लहानपणापासून ओळखतात त्यांना तर माझ्यातील हा बदल खास करून जाणवतो. अगदी शुल्लक कारणही मला चिडचिड करण्यासाठी पुरेसं असायचं. हेच नाही तर मी कधी कुणाला चेष्टेत काय बोलून जाईल हे मलाही समजत नव्हतं. ज्यावेळेस लक्षात यायचं त्यावेळेस वेळ निघून गेलेली असायची. बरे त्यासाठी माफी मागायची म्हटली तर माझा इगो आड यायचा. या कारणावरून माझे आणि वडिलांचे तर जवळपास दिवसाआड खटके उडत. इतकेच काय तर यासाठी जवळपास ७/८ वेळेस माझी ‘ग्रहशांती’ही केली आहे. पण माझ्यात काहीच फरक पडत नव्हता. घरचेही काहीसे वैतागले होते. त्यात काही जणांनी माझ्या आईला सांगितले की, तो वृश्चिक राशीचा असल्यामुळे त्याच्यात बदल होणे खूप कठीण आहे. त्यामुळे तिनेही आधी त्यावर विश्वास ठेऊन मला सुधारण्याचा प्रयत्न काहीसा पुढे ढकलला.

माझे कॉलेज संपले आणि आम्ही नाशिकला आलो. इथेही माझ्या वागण्यात फारसा फरक पडला नव्हता. पण नोकरीला लागल्यामुळे माझे घरात थांबणे कमी झाले होते. त्यातच माझ्या हाती शरद उपाध्ये सरांचे ‘राशीचक्र’ नावाचे पुस्तक आले. जोपर्यंत इतर राशींची स्वभाववैशिष्ट्ये वाचत होतो, पुस्तक छान वाटत होते. पण वृश्चिक राशीची सुरुवात झाली आणि माझी अस्वस्थता वाढू लागली. त्याचा भडका उडाला तो त्या पुस्तकातील एक वाक्य वाचून. त्यात असे वाक्य होते की, ‘मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ हा खूप क्रूर ग्रह असल्यामुळे या राशीमध्ये जन्मणारे लोकं धाडसी वृत्तीचे असतात. त्यातील मेष राशीचा व्यक्ती पोलीस असेल तर वृश्चिक राशीचा व्यक्ती गुंड किंवा अतिरेकी असतो.’ माझे डोके फिरायला इतके कारणही पुरेसे होते. माझ्यात असा अचानक झालेला बदल आईच्या लक्षात आला.

“काय रे? पुस्तक वाचता वाचता इतका का चिडलास?” आईने विचारले.

“मी कशाला चिडू?” अर्थात हे शब्दही मी चिडूनच उच्चारले होते त्यामुळे आईला हसू आले.

“काय हसतेस?” माझा पुढील प्रश्न आणि तिचे हसणे वाढले.

“तू आधी सांग... काय झाले ते... मग मी तुझ्या प्रश्नांचे उत्तर देईन...” आईने सांगितले.

“अगं या पुस्तकात शरद उपाध्ये बघ काय म्हणताहेत... म्हणे वृश्चिक राशीचे लोकं अतिरेकी असतात. थांब आताच्या आता त्यांना पत्र लिहितो आणि देतो त्यांच्या पत्त्यावर पाठवून... ते असे कसे म्हणू शकतात?” माझा स्वर चिडकाच होता.

“आधी शांत हो... मला एक सांग, समजा तू त्यांना पत्र पाठवून जाब विचारलास आणि त्याचे उत्तर त्यांनी पाठवलेच नाही तर? तुझी चिडचिड अजूनच वाढणार ना? आणि समजा... त्यांनी तुझी अगदी माफी जरी मागितली तरी त्याचा तुला काय उपयोग? फक्त दोन मिनिटाचे समाधान... इतकेच?” आईने प्रश्नांचा भडीमारच केला.. अर्थात तीच्या कोणत्याच प्रश्नांचे उत्तर किमान त्यावेळेस तरी माझ्याकडे नव्हते.

“अगं पण... ते असे कसे म्हणू शकतात?”

“अरे ते त्यांचे मत आहे ना. त्यांना जसे अनुभव आले असतील; त्यावरून त्यांचे मत बनले असू शकतेच ना?”

“तू माझी आई आहेस की त्यांची?” मी जास्तच वैतागलो आणि तिच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. त्यामुळे तर मी जास्तच भडकलो. शेवटी तिनेच हसू आवरले.

“तुझीच आई आहे म्हणूनच तुला सांगते आहे. माझ्या काही प्रश्नांची उत्तरे देशील का?” तिने विषय बदलण्याचा प्रयत्न केला असे मला वाटले.

“हं...”

“मला सांग... शरद उपाध्ये देव आहेत की माणूस?”

“हा काय प्रश्न झाला? माझ्या दृष्टीने ते माणूस आहेत! अगदी सामान्य माणूस!! अतिसामान्य माणूस..!!!” मी काहीसे रागातच उत्तर दिले.

“बरं... कृष्ण देव आहे की माणूस?” तिचा पुढील प्रश्न.

“तो तर देवमाणूस आहे. काही देव मानतात, काही माणूस... माझ्या दृष्टीने तो देवच.”

“मग मला सांग, कोणी सांगितलेली गोष्ट जास्त महत्वपूर्ण?

“कुणाची म्हणजे? कृष्णाचीच गोष्ट जास्त महत्वपूर्ण आहे.”

“ऐक तर मग, शरद उपाध्ये त्यांच्या पुस्तकात लिहितात की, माणूस त्याच्या स्वभावाप्रमाणेच वागतो. पण गीतेत कृष्ण सांगतात की माणसाचे कर्म त्याच्या हातात आहे. जर प्रत्येक राशीचे व्यक्ती त्यांच्या राशीनुसार वागले असते तर त्यांना ओळखणे किती सोपे झाले असते? पण तसे घडते का? नाही ना? म्हणजेच स्वभाव बदलणे माणसाच्याच हाती आहे. ज्यावेळेस त्याला स्वतःला बदलायचे नसते; त्यावेळेस तो कोणते तरी कारण शोधत असतो. त्यातलेच एक प्रमुख कारण म्हणजे राशीस्वभाव. प्रत्येक राशींची काही ठळक वैशिष्ट्ये असतात असे राशीचक्र सांगते; पण ती पूर्णपणे बदलणे आपल्या हातात असते असे गीतेत सांगितले आहे. तुला जर इतकेच वाईट वाटत असेल तर तू ‘त्या पुस्तकाला’ खोटे ठरव की. त्या पुस्तकात जे लिहिले आहे त्याच्या अगदी विरुद्ध वर्तन करून. मला माहिती आहे. ही गोष्ट बोलायला सोपी असली तरी कृतीत उतरवणे अवघड आहे. पण हेच तर तुला करायचे आहे. लेखकाची माफी तुला क्षणाचे समाधान देईल. पण तुझे वागणे तुला कायम साथ देणारे मित्र मिळवून देईल. उद्या मी असेल, नसेल पण तुझे मित्र आणि तुझा स्वभाव कायम तुझ्यासोबत असेल.” आई सांगत होती आणि मी फक्त ऐकत होतो.

त्यानंतर काहीही झाले तरी चिडायचे नाही हे मी ठरवले. कितीही विरोध असला तरी शब्द वापरताना काळजीपूर्वक वापरायला लागलो. ज्या ज्या वेळेस मला राग यायचा, आई फक्त एकच शब्द उच्चारायची... ‘स्वभाव...’ त्यानंतर माझ्या वागण्यात बराच बदल होत गेला. याचे सगळे श्रेय आईलाच. माझा स्वभाव पूर्णतः बदलण्यासाठी जवळपास ३ ते ४ वर्ष लागले. या काळात ती मला कायम कधी गीतेतील, कधी भागवतातील, कधी शिवपुराणातील वेगवेगळ्या कथा सांगून रागाचा परिणाम कसा वाईट होतो आणि चांगले वर्तन कसे उपयोगी पडते हे सांगयची. अनेकदा आम्ही दिवसातून दोन दोन तास गप्पा मारायचो. लोकांना वाटत असेल हे मायलेक काय इतके बोलत असतात? पण आमचे विषय बरेचशे अशा गोष्टींवर असायचे.

आपले संत सांगून गेलेत, ‘वाट दाखवी तो परमगुरु’, आई माझ्यासाठी परमगुरु ठरली. कारण तिने मला माझ्या पुढील जीवनाची वाट दाखवली. मी जरी लोकांची वाट लावणारा असलो तरी माझी आई मात्र वाट दाखवणारी होती हे निर्विवाद सत्य आहे. एक दिवस तर मी तिला विचारलेही होते.

“आई... जर माणसाचा स्वभाव त्याच्या हाती असतो असे गीतेत सांगितले आहे, मग तुम्ही ‘मी लहान असताना’ माझ्या ग्रहांच्या शांती का केल्या होत्या?” खरे तर हा प्रश्न मी मुद्दाम तिला विचारला होता. मला तिला चिडवायचे होते. काय आहे ना... चोर चोरी से जाए पर हेराफेरीसे कैसे जाए?

“कारण त्यावेळेस मी गीता वाचलेली नव्हती. जेंव्हा वाचली तेंव्हा त्याचा सगळ्यात पहिला प्रयोग मी तुझ्यावरच केला. माझ्या मते तू गिनिपिग आहेस... हेहेहे...” तिने हसतच उत्तर दिले आणि मग मलाही हसू आले. काय आहे ना? माझीच आई ती, माझ्यापेक्षा २३ पावसाळे तिने जास्त पहिले आहेत. तिला हेही माहित होते... ‘आपलं पोरगं फार डँबीस आहे. आणि त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिल्याशिवाय ते काही गप्पं बसायचं नाही.’

आज आईचा वाढदिवस. २५ डिसेंबर. ती जरी शरीराने सोबत नसली तरी आठवणींच्या रुपात ती सदैव आमच्या सोबतच आहे;

-- मिलिंद जोशी, नाशिक...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनाला भिडणारा लेख.

विषयांतर - जुना एखादा जोक घ्यायचा. त्यात राशी घालायच्या . हे असे चालू आहे उपाध्ये

अतिशय सुंदर शिकवण ती ही त्या वयात तुम्हाला कळेल अशा उदाहरणांनी.
या देवी सर्भूतेषु मातृरुपेण संस्थिता,
नमस्तसै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः