चांदणी रात्र - १

Submitted by निरंजन कुलकर्णी on 7 September, 2019 - 11:36

राजेशला सकाळी जाग आली तेव्हा त्याला फार आश्चर्य वाटलं. कारण तो त्याच्या घरी बेडवर नव्हता तर स्वारगेट बसस्थानकाच्या एका बाकावर होता. ‘यावेळी आपण इथे कसे आणि का झोपलो होतो?’ राजेशला प्रश्ण पडला. तो बाकावरून उठला. त्याने खिशाला हात लावला पण खिशात पाकिट नव्हतं. मोबाईल सुद्धा नव्हता. खिशात फक्त एक शंभराची नोट होती. राजेश बसने घरी पोहोचला. त्याच्याकडे घराची चावीसुद्धा नव्हती. पण दारात ठेवलेल्या झाडाच्या कुंडीखाली ठेवलेल्या जादाच्या चावीने राजेशने दरवाजा उघडला. राजेशचं डोकं फार दुखत होतं. त्यामुळे तो कॉलेजलाही गेला नाही. कीतीही विचार केला तरी कोडं सुटत नव्हतं. ‘आपल्याला कोणी किडनॅप तर केलं नसेल ना?’ राजेशच्या मनात विचार येऊन गेला. जेवढा जास्त विचार करेल तेवढा गुंता अजूनच वाढत होता. यावेळी रवी इथे असायला पाहिजे होता असं राजेशला वाटलं. रवीचे वडील आजरी असल्यामुळे तो नेमका एक महिन्यापासून गावी होता.
रात्री नेहमीच्या वेळी राजेश झोपला. सकाळी उठताच त्याने कॅलेंडर पाहिलं. आज रविवार होता, त्यामुळे कॉलेजला सुट्टी होती. राजेशने गावी जायचं ठरवलं. तो आवरून घराबाहेर पडला व स्वारगेटला पोहोचला. स्वारगेटला येताच त्याला कालचा विचित्र प्रसंग आठवला. पण त्याने फार विचार करायचा नाही असं ठरवलं. राजेश गाडीत बसला. गाडी निघाली. एक तासाचाच प्रवास होता. बसमध्ये बसताच राजेशच्या मनात गावाकडच्या आठवणी जाग्या झाल्या. आई-बाबा, संपत काका, गावातले मित्र, सर्वांना भेटून त्याला बरेच दिवस झाले होते. थोड्याच वेळात बस गावात पोहोचली. राजेश चालतच वाड्यापाशी आला. वाड्याबाहेरच्या अंगणात संपत झाडांना पाणी घालत होता. संपतने राजेशला पाहिलं व तो क्षणभर त्याच्याकडे पाहातच राहिला. राजेशला हे थोडं विचित्र वाटलं. राजेश पुढे गेला व संपतकडे पाहून म्हणाला, “बरे आहेत ना संपत काका? असे भूत पाहिल्यासारखे का पाहताय माझ्याकडे?” संपतने राजेशच्या प्रश्णाला काहीच उत्तर दिलं नाही व तो “मालकीण बाई, मालकीण बाई” असं ओरडत आत धावला. थोड्याच वेळात एक मध्यम वयीन स्त्री बाहेर आली. संपत देखील तिच्या मागून आला. ती स्त्री दारात उभं राहून बाहेर पाहू लागली व राजेश दिसताच “माझा राजू” असं ओरडून राजेश जवळ आली. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वहात होते. एखाद्याला अत्यंत प्रिय असलेली हरवलेली वस्तू परत मिळाल्यावर जसा आनंद होतो तसाच आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. ती नुसती राजेशकडे पहात होती. “आई, हे काय चाललंय? तू का रडतीयेस?” शेवटी राजेशनेच न राहवून विचारलं. आता राजेशची आई काही न बोलता त्याच्या चेहेऱ्यावरून हात फिरवू लागली. तिच्या डोळ्यातील आनंदाश्रू अजूनही थांबले नव्हते. राजेश मात्र पुरता गोंधळला होता. “हे काय चाललंय? मला कोणी सांगेल का?” राजेशने संपतकडे पाहुन विचारलं. “धाकलं धनी तुम्ही पयलं आत चला. सगळं सांगतो तुमास्नी.” असं बोलून संपत राजेशच्या आईला म्हणाला, “मालकीणबाई चला तुमिबी आत.” राजेश आत आला व त्याने पाठीवरची बॅग खाली ठेवली. राजेशची आई व संपत देखील आत आले. “संपतकाका, आता मला राहवत नाही. सांगा मला सगळं.” राजेश बोलला. “तुमास्नी आठवत असेल तुमी मागल्या आठवड्यात तुमच्या मित्रांसोबत कोकणात फिरायला गेलावता.” संपत म्हणाला. “कोकणात? पण मी तर कुठेच गेलो नाहीये मागच्या काही दिवसात.” राजेश म्हणाला. तो आता अजूनच गोंधळला होता. “संपत, राजुला थोडा वेळ विश्रांती घेऊ दे. आपण या विषयावर नंतर बोलूयात.” राजेशची आई म्हणाली. ती आता थोडी भानावर आली होती. “राजेश, आत जा आणि आवर. मी तुझ्यासाठी चहा ठेवते.” थोड्यावेळाने राजेश बाहेर आला. त्याला संपतला खूप काही विचारायचं होतं. संपत हॉलमध्ये नव्हता म्हणून राजेश बाहेर गेला. पण बाहेरही संपत दिसला नाही म्हणून राजेश परत हॉलमध्ये आला. राजेशने टीव्ही सुरू केला. पण काहिकेल्या त्याचं लक्ष लागेना.

थोड्यावेळाने राजेशची आई चहाचा कप घेऊन बाहेर आली. राजेश टीव्ही पाहत चहा पित होता. त्याच्या मनात मात्र विचारांचं काहूर माजलं होतं. राजेशची आई त्याच्याकडे कौतुकाने पहात होती. तिचं शरीर जरी अशक्त दिसत असलं तरी चेहऱ्यावर वेगळीच लकाकी आली होती. चहा पिऊन झाल्यावर राजेशने चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेवला. त्याने टीव्ही बंद केला व तो खिडकीतून बाहेर पाहू लागला. काहीवेळाने त्याला संपत घराच्या दिशेने चालत येताना दिसला. संपतबरोबर राजेशचे गावातले मित्र गणेश, राकेश, श्रीकांत व हणमंत येताना राजेशला दिसले. ते सर्वजण घरात पोहोचताच राजेशकडे आश्चर्याने व तितक्याच आनंदाने पहात होते. बराच वेळ कोणी काहीच बोललं नाही. न राहवून शेवटू राजेश म्हणाला, “आरे असे का पाहताय माझ्याकडे? कोणी काही बोलत का नाहीये?” “सांगतो, सगळं काही सांगतो. पण खरं सांग तुला काहीच आठवत नाही?” गणेश म्हणाला. “गणेश अरे मला खरच काही आठवत नाहीये. तूच काय ते सांग.” राजेश म्हणाला. गणेश सांगू लागला, “मागच्या वेळी तू पुण्याहून घरी आलास तेव्हा आपण कोकणात फिरायला जायचा प्लॅन केला व दुसऱ्याच दिवशी आपण अलिबागला जायला निघालो. अलिबागला पोहोचताच आपण जेवण वगैरे आटोपुन थोडावेळ आराम केला व संध्याकाळी पाण्यात खेळायला सगळे बीचवर गेलो. अंगावरचे कपडे काढून आपण पाण्यात उतरलो. तुला पोहायला किती आवडतं हे मला माहिती आहे व काकूंनी सुद्धा तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. बराच वेळ पाण्यात पोचल्यावर आम्ही सगळे बाहेर आलो पण तू काही बाहेर यायला तयार नव्हतास. सगळ्यांनाच खूप भूक लागली होती. राकेश, श्रीकांत आणि हणमंत कपडे चढवून जवळच्या हॉटेलात गेले. मी मात्र तुझी वाट पहात थांबलो होतो. मी तुला हाका मारत होतो पण तू समुद्रात खूप पुढे गेला होतास. त्यामुळे तुला ऐकू येत नसावं. थोड्या वेळाने तू किनाऱ्याकडे येताना मला दिसलास पण अचानक समुद्राने रौद्र रूप धारण केलं. अचानक लाटांचा आकार प्रचंड वाढला. काही वेळानंतर समुद्र शांत झाला पण तू मात्र कुठेच दिसत नव्हतास. आम्ही सर्वांनी तुला बोटीतून खूप शोधलं पण तू काही सापडला नाहीस. अंधार झाल्यामुळे आम्ही परत किनाऱ्यावर आलो व पोलिसांना कळवलं. पोलीस सलग पाच दिवस तुला शोधत होते पण तू काही मिळाला नाहीस. शेवटी आम्ही हताश मनाने गावी परतलो. आम्ही सगळेच फार काळजीत होतो. काकूंनी तर जेवण सोडलं होतं. ज्या काकांचा पाय कधी घरात राहत नाही ते सुद्धा घराबाहेर पडले नव्हते.” एवढं बोलून गणेश थांबला. “खरंतर गणेश तू जे काही सांगितलंस त्यातलं मला काहीसुद्धा आठवत नाही. आपलं बोलणं झाल्याचं मला आठवतंय पण आपण अलिबागला गेल्याचं मला नाही आठवत.” राजेश म्हणाला. राजेश जे सांगत होता त्यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता पण तो सहीसलामत परत आला यातच सर्वांना समाधान होतं. राजेश पुढे म्हणाला, “पण कालच एक विचित्र घटना घडली. मला सकाळी जाग आली तेव्हा आजूबाजूला माणसंच माणसं होती. समोर पाहिले तर बसेस उभ्या होत्या. मी स्वारगेटच्या बसस्टँडवर असल्याचं माझ्या लक्षात आलं. पण मी तिथे कसा पोहोचलो मला काहीच समजत नव्हतं. डोकं प्रचंड ठणकत होतं. ‘कोणी आपल्याला किडनॅप तर केले नाही ना?’ अशी शंका देखील मनात येऊन गेली. मग मी खिशाला हात लावला. खिशात पाकीट नव्हतं. फक्त शंभरची एक नोट होती. माझा मोबाईल देखील खिशात नव्हता. मला काहीच समजत नव्हतं. मी ऑटोने घरी आलो व ऑटोवाल्याला खिशातली शंभरची नोट दिली.” सगळेजण थक्क होऊन ऐकत होते. “तुझा मोबाईल आणि पाकीट तर माझ्याकडे आहे. तू ते किनाऱ्यावरच ठेवलं होतंस.” गणेश राजेशला म्हणाला. “आणि तुझे कपडे पण माझ्याकडे आहेत. मग तू जेव्हा स्वारगेटला झोपेतून उठलास तेव्हा तुझ्या अंगावर कोणते कपडे होते? आणि ती शंभराची नोट तुझ्या खिशात कशी अली?” गणेशने विचारलं. “मला काहीच कळत नाहीये. मला जेव्हा जग आली तेव्हा माझ्या अंगावर थोडे मळलेले कपडे होते. पण ते माझेच होते का हेही मला आठवत नाही.” राजेश म्हणाला.
बराच वेळ विचार करून देखील कोडं सुटत नव्हतं. शेवटी सर्वांनी तो विषय थांबवला व त्यांच्या नेहमीच्या गप्पा चालू झाल्या. गप्पा झाल्यावर सर्वांनी राजेशचा निरोप घेतला व ते जायला निघाले. राजेशच्या आईने त्यांना थांबवलं व ती म्हणाली, “पोरांनो आता जेवण करूनच जावा. थोड्याच वेळात स्वयंपाक तयार होईल. संपत जरा बाजारात जाऊन काहीतरी गोड घेऊन ये.” राजेशच्या आईने संपतच्या हातात पैसे दिले व ती स्वयंपाकघरात गेली. थोडयावेळाने संपत आम्रखंड घेऊन आला. स्वयंपाकही तयार झाला होता. राजेशचे मित्र मनसोक्त जेवले व राजेशचा व त्याच्या आईचा निरोप घेऊन आपआपल्या घरी जायला निघाले.
राजेशच्या आईला एवढा आनंद झाला होता की इतक्या दिवसात झालेला मानसिक व शारीरिक त्रास ती आता विसरली होती. तिने राजेश घरी येताच त्याच्या वडिलांना फोन वरून ही सुखद बातमी सांगितली होती. राजेशचे वडील पुण्यात एका कामासाठी गेले होते. ते संध्याकाळपर्यंत घरी पोहोचणार होते. त्यांना इतका आनंद झाला होता की त्यांनी आख्या गावाला जेवण द्यायचं ठरवलं होतं.
राजेशला आईची फार काळजी वाटत होती. ती खूपच अशक्त दिसत होती व जागरणामुळे तिचे डोळे निस्तेज दिसत होते. जेवण झाल्यावर राजेश आईपाशी गेला. राजेश आईला म्हणाला, “गणेशने मला सगळं सांगितलं. पण अजूनही माझा विश्वास नाही बसत. त्याने सांगितलेलं मला काहीच आठवत नाहीये. आणि तू स्वतःचे के हाल केले आहेस आई.” “आईचं मन काय असतं हे तुला नाही समजणार बाळा. तू परत आलास यातच मला समाधान आहे. काळजी करू नकोस आता माझी तब्येत सुधारेल.” राजेशची आई त्याला म्हणाली. दारावरची बेल वाजली. राजेशने दरवाजा उघडला. समोर राजेशचे वडील उभे होते. राजेश काही बोलायच्या आताच त्यांनी राजेशला मिठी मारली. मागे संपत उभा होता. तिघेही आत आले. राजेशला आपण एखादं स्वप्न पाहतोय असं वाटत होतं. तो घरात आल्यापासून त्याने जे काही ऐकलं होतं ते अकल्पनिय व स्वप्नवत वाटत होतं पण इथे तर त्याची स्वतःची माणसं होती मग याला स्वप्न तरी कसं म्हणणार.
राजेशचं वडील आत गेले. त्यांच्यात आणि राजेशच्या आईमध्ये बराच वेळ बोलणं सुरू होतं. थोड्या वेळाने राजेशचे वडील बाहेर आले व राजेशच्या समोर बसले. ते बोलू लागले, “तू गेल्यापासून आम्ही एक एक दिवस नुस्ता पुढे ढकलत होतो. तुझ्या आईने तर जेवण देखील सोडलं होतं. खरं सांगायचं तर मी तू परत येण्याची आशाच सोडली होती. तुझी आई मात्र तू आता परत येणार नाहीस हे मानायलाच तयार नव्हती. तिने कोल्हापूरच्या आंबाबाईला नावस बोलला आहे. उद्या सकाळीच आपल्याला नवस फेडायला कोल्हापूरला जायचं आहे. तू परत आल्याच्या आनंदात मी परवा गावजेवण देणार आहे.” “बाबा, खरंतर मला काहीच आठवत नाहीये. मला जेवढं आठवतंय त्यानुसार मी अलिबागला गेलोच नव्हतो. मी इतके दिवस पुण्यातच होतो.” राजेश वडिलांना म्हणाला. “पोलिसांनी तुला पुण्यात देखील शोधला पण तू तुझ्या फ्लॅटवर देखील नव्हतास आणि कॉलेजात सुद्धा नव्हतास. पण खरंतर तू सुखरूप परत आलास यातच आम्हाला समाधान आहे. आता दोन दिवस घरी विश्रांती घे. असही तुझी आई तुला इतक्यात सोडणार नाही.” एवढं बोलून राजेशचे वडील थांबले. आपल्या आईवडिलांना खुश पाहून राजेशलाही आनंद झाला होता पण हा गुंता काहिकेल्या सुटत नव्हता.
सोमवारी सकाळी राजेश व त्याचे आईवडील कोल्हापूरला जायला निघाले. खूप वर्षांपूर्वी जेव्हा राजेश अगदी लहान होता तेव्हा तो आंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरला आला होता. त्यावेळचा एक प्रसंग राजेशला आठवला. राजेश तेव्हा जेमतेम सात आठ वर्षांचा होता. तो आई वडिलांबरोबर दर्शनाच्या रांगेत उभा होता. दर्शनासाठी भाविकांची फार गर्दी झाली होती. दर्शन छान झालं व देवीची आरतीसुद्धा मिळाली. लोक परत जायला निघाले. राजेशच्या वडिलांनी त्याचा हात धरला होता पण गर्दीमुळे त्यांचा हात सुटला व राजेश गर्दीत हरवला. आईवडील कुठे दिसत नाहीत हे पाहून राजेश कावराबावरा झाला. गर्दीमुळे तो पुढे ढकलला जात होता. आजूनही आईवडील दिसत नव्हते. राजेश रडू लागला तेवढ्यात कोणीतरी त्याचा हात पकडला. त्याने वर पाहिलं, आपल्या वडिलांचा चेहेरा पाहून राजेश रडायचा थांबला. वडिलांना पाहून राजेशला जो आनंद झाला होता तसाच आनंद आज तो त्याच्या आईवडिलांच्या चेहेऱ्यावर पहात होता.
गाडी कोल्हापुरात पोहोचली. राजेश व त्याचे आईवडील थेट मंदिरात आले. गर्दी तुरळक होती त्यामुळे दर्शन छान झालं. दुपारी जेवण आटोपून ते परत गावी यायला निघाले. रात्री ते घरी पोहोचले. पाटलांच्या पोराला भेटण्यासाठी गावातील लोक येत होते. गावातील सर्वांचाच राजेश खूप लाडका होता. प्रवासामुळे राजेशला खूप थकवा आला होता पण भेटायला येणाऱ्या लोकांचं प्रेम पाहून कोणालाच नाही म्हणत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळीच गावजेवणाची तयारी जोरदार चालू होती. गावात उत्साहाचं वातावरण होतं. गाव तसं छोटच असल्यामुळे प्रत्येकजण एकमेकाला ओळखत होता. पाटील यांच्या दानशूरपणासाठी गावात प्रसिद्ध होते. आता तर त्यांचा हरवलेला मुलगाच परत आल्यामुळे कसलीच हयगय नव्हती. गोडाधोडाचं जेवण जेवल्यावर गावातील लोक तृप्त झाली.
राजेशला मात्र आता पुण्याचे वेध लागले होते. पण आईवडिलांच्या आग्रहाखातर तो अजून दोन दिवस थांबणार होता. दोन दिवस मस्त आईच्या हातचं खाऊन एखाददुसरा किलो वजन वाढवूनच तो निघणारे होता. शेवटी परत जायचा दिवस उजाडला. राजेशने बॅग भरली. त्याच्या आईने त्येचे आवडते बेसनाचे लाडू बनवले होते. राजेशने लाडवाचा डबा बागेत टाकला व सर्वांचा निरोप घेऊन तो पुण्याला जायला निघाला.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users