प्रकाशचित्रांचा झब्बू १ - जुने ते सोने

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59

मायबोली गणेशोत्सव २०१९ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाश चित्रांचा झब्बू आणि पहिला विषय आहे - "जुने ते सोने"

माणसाला जितके नाविन्याचे आकर्षण असते तितकीच पुरातनाची ओढ असते. घरात कितीही आधुनिक आणि स्मार्ट टीव्ही आला तरी घराच्या एका कोपऱ्यात का होईना आजोबांचा व्हॉल्वचा रेडिओ सांभाळलेला असतो. आज्जी पणजीची सुती साडी पिढ्यानपिढ्या गोधडीच्या रुपाने ऊब देत असते. कितीही महागड्या आणि चकाचक गाड्या घेउन फिरा पण एखाद्या जुनाट फाटकामागे उभी असलेली जुनीपुराणी व्हिंटेज कार आपल्याला अकारण खुणावून जाते. एखाद्या जुन्या कृष्णधवल चित्रपटात मोकळी ढाकळी मुंबई बघितली की आत कुठेतरी काहीतरी नकळत हलते.
थोडक्यात काय आपल्यात आणि या जुन्या (पण मनामनात चिरतरुण होवून राहिलेल्या) वस्तुंमध्ये एक गूढ अनामिक असे काहीतरी बंध असतात.

या प्रकाश चित्रांच्या खेळातून अश्याच काही आठवणी जागवुया!
आपल्या संग्रही असलेल्या किंवा संग्रहालयातून पाहिलेल्या, देशोदेशीच्या प्रवासात आढळलेल्या अश्या जुन्या आणि जतन करून ठेवलेल्या वस्तूंची मेजवानी लुटुया प्रकाश चित्रांच्या रुपाने.

2015-09-19 15.25.19-1024x700_0.jpg

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

विमान कडक !

चला, मी पण तुम्हाला १८९० मधील एक अलंकार दाखवतो. फोटोतील मंगळसूत्रातील फक्त 'पोवळे' त्या शतकातले आहे.

powale.jpg

राईट बंधूंचे विमान >>> भारीच.

१८९० मधील पोवळे, फार छान. परंपरागत एका पिढीकडून दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या अशा पिढीकडे आलेले दिसतायेत पोवळी.

मस्तच सगळे फोटो☺️

माझ्या पप्पांना पण खुप हौस आहे जुनी नाणी जमवायची, फार नाही पण जुने तांब्या पितळीची नाणी , मोठे पाच रुपयांची नाणी, लक्ष्मी चा फोटो असलेली जुनी नाणी, काही शिवकालीन नाणी आहेत त्यांच्याकडे.

डॉक्टर, तुमचे HMT चे घड्याळ बघून विशेष आंनद झाला, कारण माझ्याकडे पण एक आहे, माझ्या मम्मीचे. चावीचे, किमान ३० वर्षे जुने, अन अजूनही व्यवस्थित काम करणारे☺️ माझी ४थी ची स्कॉलर्शीप ची परीक्षा होती, तेव्हा तिचे ते घड्याळ मी घेतले होते अन तेव्हापासून आजतागायत मी ते वापरतीये. आता माझ्याकडे ७ मनगटी घड्याळे आहेत, तरी हे घड्याळ टिकविण्यासाठी मी आठवड्यातून एकदा तरी हे घड्याळ घालतेच, कारण वापर थांबला तर ते बंद पडेल ही मनातील भीती.

हा त्याचा फोटो, अन हो मुख्य म्हणजे इतक्या वर्षात फक्त तीनदा सर्व्हिसिंग केलीये त्याची , बास.

Screenshot_2019-09-04-11-42-32-735_com.miui_.gallery.png

VB,

तुमचे hmt पण लैभारी, कारण किल्लीचे !
माझ्या hmt बद्दल थोडे. डॉक्टरीची परीक्षा पास होऊन इंटर्नशिप करू लागलो होतो. तेव्हा माझ्या पहिल्या विद्यावेतनातून मी ते घेतले आहे. त्यामुळे कायम जवळ राहणार. आता battery काढून ठेवली आहे. तसेच मनगटी घड्याळ फक्त प्रवासात वापरतो, बाकी नाहीच.
अनिन्द्य,
आवडला पिढ्यांचा प्रवास, मस्तच !

काय मस्त फोटो येतायत एकेक!

प्रवास तीन पिढ्यांचा आवडला.... लहानपणच्या प्रवासात ती मिल्टनची मोठ्ठी वॉटरबॅग किंवा कूलकेज हमखास असायचे!

व्हॉल्वचा रेडिओपण मस्त.... आमच्याकडेही असाच एक होता.... त्याची तार बाहेर काढून खिडकितुन बाहेर सोडायला लागायची ॲंटिना म्हणून!

स्वरुप,

बरोबर ! व्हाल्वच्या रेडीओच्या काळात ही असायची. पावसाळ्यात रेडीओ-प्रसारण नीट ऐकू येत नसे. मग रेडीओपासून एक धातूची तार जोडून पुढे ती गच्चीवर नेली जाई. तिथे त्याला जाळीसारखे काहीतरी जोडलेले असे. कधी वादळ व जोराच्या पावसात तेही तुटून जाई. मग ते दुरुस्त करत बसा.

पुढे ट्रांझिस्टर आल्यावर त्याचीच अंगभूत एरिअल आली आणि हे सगळे प्रकार संपले.

फोनचा एक काळ असा होता....
घरोघरी BSNLबी एस एन एल landline. नंबर लावून मिळवाया लागे . आणि मग फोन नंबर शोधायला हा भला मोठा ठोकळा :

direct (2).jpg

..... हा माझ्याकडचा शेवटला !

साद,
फोन बुक सही ! एके काळी त्याला डिरेक्टरी म्हणायचे. दर वर्षी ती प्रसिद्ध झाली की मग अशी बातमी यायची. यंदाच्या बुकात जोशी / पाटील / कुलकर्णी / शहा ..इ. सर्वात जास्त आहेत !
ती आणायला जुनी घेऊन फोन भवनात जायचे अन मग बदलून नवी घ्यायची.

....एखाद्याकडे डिरेक्टरी नसेल तर मग १९७ ला फोन करून नंबर विचारावा लागे. त्यासाठी “आपण रांगेत आहात”.... वगैरे .

किल्ली, धन्यवाद.
..........................
आता हे सांगा कोणाकडे आहे अजून !

walkman (2).jpgcassette (2).jpg

वॉकमन नाहीये आता पण कॅसेट्स खंडीभर आहेत माझ्याकडे!
पिक्चरच्या/इंडीपॉप अल्बम वगैरे आहेतच पण अगदी इनले कार्डवर सुबक अक्षरात गाण्याची नावे लिहलेल्या आणि रेकॉर्ड करुन आणलेल्या पण आहेत!

माझ्यापाशी वॉकमन आहे आणि खंडीभर कॅसेट देखिल आणि कधी इच्छा झाली की वापरतो देखिल! Happy
पण सध्या सगळा स्टॉक कॅसेटचा पुण्यात पडलायं!

वॉकमन नाहीये आता पण कॅसेट्स खंडीभर आहेत माझ्याकडे!
पिक्चरच्या/इंडीपॉप अल्बम वगैरे आहेतच पण अगदी इनले कार्डवर सुबक अक्षरात गाण्याची नावे लिहलेल्या आणि रेकॉर्ड करुन आणलेल्या पण आहेत! +१११
माझ्याकडे पण आहेत

माझ्याकडे पण वॉकमन नाहीये ; वर फोटोसाठी फक्त जुने खोके सापडले ! त्यात काही सीडीज कोंबून ठेवल्या आहेत !
क्यासेटी थोड्या आहेत, मधूनमधून काही टाकून देतो.

हा आमच्या कडचा दिवा साधारण शंभर हून अधिक वर्ष जुना असेल. विजेचे दिवे नव्हते तेव्हा रोजच वापर होत असे ह्याचा. आता मात्र रिटायर झालाय. एखाद दुसरा कंदील अजून ही सेवेत आहे.
Ditmar कम्पनी खूप प्रसिद्ध आहे. आता हे दिवे दुर्मिळ आणि विंटेज झाल्याने खूप च महाग झाले आहेत.

IMG_20170623_161444_1.jpg

PETI .jpg>

१०० वर्षे वयाची माझ्या आजीची पेटी .सध्या तिचा पेटारा झालाय. Proud Proud Proud

जुनी डेक्कन क्वीन! एका झटक्यात नॉस्टॅल्जिक करणारा हा फोटो. गाडी अजूनही आहे पण हे जुने इंजिन आता वापरत नाहीत. हे डीसी ट्रॅक्शन वाले होते व बरीच वर्षे वापरात होते. आता मुंबई-पुणे ट्रॅक सुद्धा एसी ट्रॅक्शन वाला झाल्याने ही वापरता येत नाहीत. ही बहुधा आता म्युझियम्स मधे आहेत.
830893-deccan-queen-twitter.jpg

या चित्रातले इंजिन हे भारतीय बनावटीचे होते व अत्यंत यशस्वी समजले गेले. डेक्कन करता जे वापरत त्याचे नाव "लोकमान्य" होते. "साधारण अशीच" दिसणारी अनेक इंजिने तेव्हा असत. त्यातली बाकी बरीचशी आणखी जुनी व इंग्लंडहून आयात केलेली होती. ढोबळ पणे बघितले तर सगळी सारखीच दिसतात पण नीट लक्ष दिले तर किमान ५ वेगवेगळी मॉडेल्स आहेत हे लक्षात येते. 'कभी हाँ कभी ना' मधल्या या गाण्यात यातली ४-५ वेगवेगळी इंजिने दिसतात. पावसाळ्यात कसारा घाटातील हिरव्यागार बॅकग्राउण्ड वर सुंदर सीन्स आहेत रेल्वेचे. अर्थात हे गाणे गोव्यात आहे आणि या क्लिप्सचा गोव्याशी काहीच संबंध नाही हा विनोद सोडला तर या क्लिप्स सुंदर आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या १५० वर्षपूर्ती निमित्त त्यांनी काढलेली विशेष आवृती : एक झलक

TOI 150.jpgtoi 2.jpg

(चित्रसौजन्य : श्री. सुधीर कांदळकर )

हा माझ्या सासऱ्यांनी घेतलेला आणि नवऱ्याने जपून ठेवलेला फिलिप्सचा रेकॉर्डप्लेअर!
IMG-20190904-WA0008.jpg

रेकॉर्ड्सच्या संग्रहातील काही-
IMG-20190904-WA0009.jpg

आणि ही जैत रे जैत ची रेकॉर्ड! जैत रे जैतच्याच निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात त्यावर हृदयनाथ मंगेशकर, जब्बार पटेल, चंद्रकांत काळे, ना. धों. महानोर, रवींद्र साठे आणि मोहन आगाशेंच्या सह्या मिळवता आल्या.

IMG-20190904-WA0010.jpg

Pages