"टॉयलेट मध्ये गेलो, बघतो तर काय, कमोड शॉवर च्या नळावर सरडा!! थोडक्यात वाचलो."
या वाक्याला अपेक्षित 'हो का, अरे बापरे' न येता समोरचं नाक मुरडून समोरच्या कपाळावर आठी पडली.
"भलत्या शंका घेऊ नका.कमोड वर बसण्या आधीच दिसला सरडा, बाहेर आलो आणि दुसऱ्या खोलीच्या टॉयलेट मध्ये काम केले."
कपाळाच्या आठ्या विरून अपेक्षित 'अरे बापरे' आले.
"हे तर काहीच नै, त्या चीन का थायलंड मध्ये एकाच्या टॉयलेट मध्ये अजगर होता. चावला ना भलत्या जागी.टाके पडले."
सरड्या पासून बचावलेल्या वीराने मनात 'हिचं ऍनिमल प्लॅनेट बघणं कमी केलं पाहिजे.भलत्या वेळी भलत्या दचकवणार्या बातम्या बघत असते" अशी खूणगाठ बांधली.
तितक्यात आतून एक पॉंडस पावडरीचा वास पदर फलकारत आला.
"सांभाळून रे बाबांनो.परवा त्या ए5 मधल्या बाईंनी खाली पूजेची फुलं घेताना झाडावर काळं कुट्ट लांबडं पाहिलं.अगदी हातापासून वीतभर अंतरावर.हे असं मोठं होतं आणि फूस फूस करत उडी मारून दुसऱ्या झाडावर गेलं.आता खूपच झालीत सोसायटीत लांबडी."
"लांबडं?"
"म्हणजे जनावर रे.सरपटणारं."
"ओह, साप म्हणायचंय का तुला?"
"घेतलं का शेवटी ते अभद्र नाव?नाव घेतलं तर लांबडं आपल्या मागे घरात येतं.लांबड्या लांबड्या इथे तुझं नाव नाही घेतलं त्या कोपऱ्यावरच्या कडुनिंबाने घेतलं, त्याला जाऊन चाव."
"हे असं म्हणून सापाला कसं कळेल?तो मराठी आहे का?आणि त्याला माहित आहे का आपलं दुसरं नाव लांबडं आहे ते?"
"परत तेच.लांबड्या लांबड्या इथे तुझं नाव नाही घेतलं त्या कोपऱ्यावरच्या कडुनिंबाने घेतलं, त्याला जाऊन चाव."
"तू घाबरू नको गं.त्या काकूंना जाड चष्मा आहे.नंबर वाढला असेल.काळी साप सुरळी मोठी होऊन दिसली असेल."
"करा चेष्टा.हे असे अनुभव प्रत्यक्ष आल्याशिवाय कळायचं नाही तुम्हाला."
परत एकदा सापाचं नाव येण्याआधीच साडी पदर फलकारत आणि चप्पल वाजवत फूस फूस वाला मोठा भुजंग पाहिलेल्या काकूंबरोबर फिरायला गेली.
"काहीही फेकतात काकू.असा या झाडावरून त्या झाडावर उडी मारणारा सुपरमॅन साप इतका जवळ येईपर्यंत दिसला नाही होय त्यांना?"
"असेल खरं.आपल्याला काय माहित?मी डिस्कव्हरी वर पाहिलंय.काळे साप नेहमी विषारी असतात.न्यूरो टॉक्सिन सोडतात.आणि विषारी साप ओळखायचं मुख्य चिन्ह म्हणजे त्यांच्या डोक्याच्या बाहुल्या टोकदार असतात, आणि बिन विषारी सापांच्या गोल."
(स्वागत: अरे देवा!!काही काळ हे चॅनल दिसणं बंद करावं.कसलं म्हणून नव्या माहितीचं इम्प्रेशन मारता येत नाही हिच्यावर.)
"म्हणजे साप चावायला आला की आधी "सापा सापा थांब थांब चेहरा वळव, मला तुझ्या डोळ्यात बघूदे" म्हणून डोळ्यात बघून बाहुल्या गोल असल्या तरच चावायला गो द्यायचा का त्याला?"
"एक मेली उपयोगी माहिती द्यायला गेले तर त्यात हजार खोड्या काढायच्या.सवयच आहे तुमच्या घराला आनुवंशिक."
(विषय घातक वळणावर जायला लागला.या वळणावर गेलेल्या गाडया उतारावर भरधाव वेगाने जाउन 'आज स्वयंपाक नाही' या दगडावर आपटतात याची कल्पना असल्याने सरड्यापासून वाचलेली पार्टी जीवाच्या आकांताने विषय बदलायचे चान्स शोधू लागली.)
"त्या मांजराने बाहेर शी करून ठेवलीय.आता ती अजून एका मांजराला घेऊन येते.हळूहळू आपल्या गॅलरीची सार्वजनिक मांजरहागणदारी होणार असं दिसतंय."
"मी काल दालचिनी आणि मिरी पावडर मिक्स करून ठेवली होती आणि पसरली होती.म्हणजे तिला एकदा शी ला बसल्यावर बुडाला जबरदस्त झोम्बलं की परत येणार नाही.उद्या मिरची पूड पण मिसळते."
"मांजर नेहमी जमिनीला बुड टेकूनच शी करेल हे बेसिक ऍझंप्शन चुकतंय असं वाटत नाही का?आणि पावडरीच्या लेयर कडे तोंड करून शी केली म्हणजे सगळंच गणित चुकलं."
"तू सोल्युशन दे.असलेल्या सोल्युशन मध्ये चुका काढू नकोस."
"ठीक आहे.तू पहाटे 4 पासून लक्ष ठेव. मांजर आली की चटकन गॅलरीचं कुलूप काढायचं, पटकन बाहेर जायचं आणि तिच्या कंबरेत मोठी कचकून लाथ घालायची."
"मी काय म्हणते, तुला गेले बरेच दिवस ब्राह्मप्रहरी उठून जॉगिंग ला जायचं होतं ना?तूच का नाही लक्ष ठेवुन पेकाटात लाथ घालत?"
"बरं ते जाऊदे.अजून एक आयडिया.मांजरीच्या नेहमीच्या शी ला उभं राहायच्या जागेवर थोडे लांब लांब 10 वेट सेन्सर लोडसेल लावायचे.त्यातल्या एखाद्यावर तिने पाय दिला की सेन्सर ऑपरेट होईल.मग एक स्विच ऑन होईल.मग वरती एक पाण्याची भरलेली बादली असेल ती तिच्या अंगावर रिकामी होईल."
"अरे महान माणसा, इतकी हाय फाय सेन्सर असेंम्बली आपण बनवून जागेवर लावेपर्यंत त्या मांजरीला 5 पिल्लं होऊन ती आईपार्जित शौचालयाचा वापर करायला लागतील.टॉम अँड जेरी बघणं कमी कर जरा."
"पेस्ट कंट्रोल करायलाच पाहीजेय."
"पेस्ट कंट्रोल ने शी करणारी मांजरं आणि साप कसे जातील?"
"परवा पाल होती बाथरूम मध्ये.मी मेले असते हार्ट ऍटॅक ने.त्या जवळच्या पेस्ट कंट्रोल वाल्याला फोन केला तर म्हणे आम्ही फक्त मुंग्या आणि झुरळं कव्हर करतो.पाली आणि कोळी आम्ही घेत नाही.मूर्ख माणूस.घरावर पाटी लावू का, पाली आणि कोळ्याना प्रवेश बंद म्हणून?"
"ती आता तुझ्या मागे भिंतीवर आहे ती तीच असेल.तशीच होती का दिसायला?"
(इथे एक मोठी किंकाळी आणि पळापळ होऊन एक पार्टी डायनिंग टेबल च्या खुर्चीवर चढते.)
"हाड, हाड.तिला पळव रे.हे बघ असं डिस्टर्ब न करता जायचं आणि हळूच मॉरटीन मारायचं.मग ती बेशुद्ध झाली की केर भरण्यात घेऊन अलगद बाहेर नेऊन टाकायचं."
"हाड?ती कुत्रा नाहीये.मी अजिबात पळवणार नाही.तू 'पाल मारणारा नवरा पाहिजे' असं लग्नाच्या अपेक्षांमध्ये लिहिलं नव्हतं.स्पेक्स क्लिअर हवीत.रोल्स रिस्पॉन्सीबलिटी क्लिअर हव्यात."
"अरे ती बघ तुझ्या नव्या वूडलॅन्ड च्या खोक्याकडे चाललीय."
(आता सरड्यापासून वाचलेली पार्टी किंकाळी फोडून पळापळ करते.)
"मी मॉरटीन आणतो.तू तोवर काठी वाजवून तिला दाराच्या दिशेला ढकल.मध्ये मध्ये कांची नारद राजाचा जप कर.आई म्हणाली त्याने धीर येतो."
"मला जमणार नाही.ती माझ्या अंगावर येईल.तू काठी वाजव, मग मी मॉरटीन देते ते मार.मग ती मेलीय कन्फर्म केलं की मी प्रेत उचलून बाहेर टाकेन."
आपल्या बद्दल चाललेलं इतकं अफाट प्लॅनिंग बघून पाल स्वतःच गहिवरून खिडकीतून बाहेर गेली.
तितक्यात दार धडाधड वाजवून छोटे पाय आणि खरचटलेले हात घरात येतात.
"आई मला जिंजर ने पंज्याने स्क्रॅच केलं."
"बापरे, आधी डेटॉल लावू.केवढं खोल ओरबाडलंय.तू त्या जिंजर पाशी कडमडायला गेलीस कशाला?तुला मी कालच सांगीतलं होतं कुत्री मांजरं त्यांच्या खूप जवळ गेलं की चिडतात."
"अगं मला लक्षात होतं.मी आधी जिंजर चा चेहरा वळवून नीट पाहिला.तो चेहरा शांत दिसत होता म्हणून तिला उचललं तर तिने जोरात शांत फेसनेच पंजा मारला."
"तुझ्या नानाने केलं होतं मांजरीचं फेस रिडींग.चला आता रेबीज इंजेक्शन घ्यायला.आणि 5 डोस पूर्ण झाले की मग पाहिजे तितक्या मांजरी कुत्रे उचलत बस."
-आमच्या घरातल्या सर्व 0,2,4,6 पायवाल्या प्राण्यांना समर्पित.
(No subject)
हिचं ऍनिमल प्लॅनेट बघणं कमी
हिचं ऍनिमल प्लॅनेट बघणं कमी केलं पाहिजे>>> विषय आणि वाचण्याच्या ओघात हे 'ऍनिमा' प्लॅनेट वाचलं
लांबड्याचे अनुभव आमच्याकडेही
लांबड्याचे अनुभव आमच्याकडेही खूप येतात. घराच्या आसपास झाडी खूप आणि इतर घरे शून्य असल्याने 'सगळे' आमच्याच भेटीला येतात.
एकदा तर एक चांगलं पाच फुटी आदलं बांधाबाहेरच्या झाडावरून उतरताना दिसलं. कुठे गेलं असेल ते बघायला म्हणून बांधावरून वाकून पलिकडे बघत होते, तर ते आदलं अगदी वितभर अंतरावरून पलिकडून आतल्या बाजूला वाकून बघत होतं. पूर्ण बांधाला चिकटून अजून फूटभर शेपूट जमिनीवर शिल्लक होतं. एवढं मोठं जनावर पहिल्यांदाच इतक्या जवळून बघितल्याने रात्र तापाने फणफणून काढली हे वेगळं सांगायला नकोच.
बापरे डेंजर.
बापरे डेंजर.
अनू.. मस्तच गं.. परत वाचुन
अनू.. मस्तच गं.. परत वाचुन परत हसली..
निरू, तुमचा पिल्लु टारझन बहोतच क्युट दिसतोय.. सगळ्यांची लेकरं लहानपणीच साजरी असतात..जर्रा मोठी झाली कि द्वाड बनतात..
चिन्मयी, माझ्या घरी आत्तापावेतो ११ निघलेय त्यामुळे काय नाय होत.. होतच असत.. जागूला विचार. ती तर आता दिसला कि कॅमेरा घेऊन पळत जाते फोटो काढायला.. अन अगदी क्लोजअप बीजअप काढते मस्त..
आम्ही कॅमेरा घ्यायचं राहिलं
आम्ही कॅमेरा घ्यायचं राहिलं बाजूला...पळायला जमीन कमी पडते.
जागूताईंनी काढलेले फोटो बघितलेत हो. तेव्हापण अंगावर काटा आलेला.
आज स्वयंपाक करत असताना बाथरूम
आज स्वयंपाक करत असताना बाथरूम मधून हाक आली.मी नेहमीप्रमाणे "काय्ये? मी कामात आहे." वाला खेकससूर लावला.
परत हाक आली."हिट चा स्प्रे घेऊन ये."
लगेच हा उदय चोप्रा समजला की अभिषेक बच्चन ने ड्युटी कॉल वर हाक दिली आहे आणि सर्व सोडून हिट घेऊन धावला.
ऐन वेळी हिट मारल्यास पाल पळेल म्हणून त्या निधड्या छातीच्या शूर वीराने एकटं आत थांबून बेडरूम चा दरवाजा लावून पाल मारली.मी मुदडयाची सोसायटी गार्डन मध्ये वासलात लावली.
नंतरचा संवाद:
"आंघोळ चालू केली होती मी.मला तितक्या साठी कपडे घालून बाहेर यावं लागलं.दर वेळी मीच करतो ही कामं.तुला इनिशिएटिव्ह घ्यायला हवा."
"कारे? जर 'तशीच' पाल मारली असतीस तर पालीने तुझा व्हिडीओ काढून फेसबुक ला टाकला असता का?"
पालीने तुझा व्हिडीओ काढून
पालीने तुझा व्हिडीओ काढून फेसबुक ला टाकला असता का?">>>>>
पालीविषयी घ्रुणा असते की भीती
पालीविषयी घ्रुणा असते की भीती?
माझ्या घरात आली नाही तर
माझ्या घरात आली नाही तर अपरंपार वात्सल्य माया आणि प्रेम.
Lol
Lol
मस्त लिहिलंय!!
मस्त लिहिलंय!!
माऊ टारझन क्यूट आहे!
अनु, वरचे दोन्ही प्रतिसाद lol
अनु, वरचे दोन्ही प्रतिसाद lol आहेत. माझं खुसखुस हसणं ऐकून नवऱ्याला पण उत्सुकता वाटली, मग त्यालाही वाचून दाखवलं.
आज स्वयंपाक करत असताना बाथरूम
आज स्वयंपाक करत असताना बाथरूम मधून हाक आली.मी नेहमीप्रमाणे "काय्ये? मी कामात आहे." वाला खेकससूर लावला.
परत हाक आली."हिट चा स्प्रे घेऊन ये."
लगेच हा उदय चोप्रा समजला की अभिषेक बच्चन ने ड्युटी कॉल वर हाक दिली आहे आणि सर्व सोडून हिट घेऊन धावला.
ऐन वेळी हिट मारल्यास पाल पळेल म्हणून त्या निधड्या छातीच्या शूर वीराने एकटं आत थांबून बेडरूम चा दरवाजा लावून पाल मारली.मी मुदडयाची सोसायटी गार्डन मध्ये वासलात लावली>>>>
पाल नक्की कुठे होती? बाथरुमात की बेडरुमात? की बाथरूमात मरणे आवडत नाही म्हणून टाइम प्लिज घेऊन पाल बेडरुमात पळाली? आणि ड्युटीवरचा धाडसी सैनिक जमतील तितकेच कपडे चढवून बेडरुमात जाईपर्यंत ती वाट पाहात भिंतीवर पोझिशन घेऊन उभी राहिली?
पालीचा दहावा तेरावा घाला आता.
पालीचा दहावा तेरावा घाला आता.
अनु
अनु
बेडरूम अटॅच्ड बाथरूममधे असेल पाल.
बरोबर ☺️☺️
बरोबर ☺️☺️
मजा आली परत वाचायला.
मजा आली परत वाचायला.
Pages