भावभक्ती लोणी
घर शोधूनी पहाती
कृष्ण गोप सखे सारे
नाही कुणीच घरात
शिरताती चोर सारे
शिंकाळ्यात ठेवलेले
लोणी नेमके शोधले
हात पुरेना कोणाचे
उंच होते टांगलेले
कान्हा सांगतसे युक्ती
करा कोंडाळे छोटेसे
चढूनिया त्यावरी मी
लोणी काढेन जरासे
सवंगडी लगोलग
धरताती एकमेका
कान्हा खांद्यावरी त्यांच्या
चढे अलगद देखा
हात घालिता मटकी
कडी वाजली दाराची
सवंगडी कान्हयाचे
पळ काढती त्वरेची
कान्हा उभा थारोळ्यात
तक्र लोणी भुईवरी
तुकडे ते खपरेली
विखुरले दूरवरी
रागे गोपिका धरीते
बाळ कान्ह्याचे बखोटे
बरा सापडला आज
यशोदेला मी सांगते
कान्हा रडतच बोले
मी न चोरीले ते लोणी
माझे सवंगडी सारे
गेले मला फसवोनी
कुठे हाताला लागले
लोणी दही सांग पाहू
गेले घेऊन ते सारे
मैतर ते लोणी खाऊ
देखे गोपिका चकित
कृष्ण कोरडा पुरता
नसे तक्र लवलेश
लोणी नसेच सर्वथा
बोले स्फुंदून कान्हया
फसविती सवंगडी
चोरी करती ते सारे
आळ माझ्या माथ्यावरी
हेलावूनी गोपिका ती
घेई कृष्णा कडेवरी
नको रडू सानुल्यारे
लोणीसाखर भरवी
बाळ सगुण गुणाचे
चाखे भावभक्ती लोणी
भक्ता सहजेचि लाभे
दैवी गुणांची ती लेणी
(दैवी गुण : शांती, क्षमा, अखंड समाधान)
मस्तच!! आवडली..
मस्तच!! आवडली..
सुंदर!
सुंदर!
अप्रतिम
अप्रतिम
सुरेखच!
सुरेखच!
वाह
वाह