युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३६

Submitted by मी मधुरा on 22 August, 2019 - 10:19

कुटीच्या दाराची हालचाल झाली. विदूरने आत प्रवेश केला तसे कृपाचार्य आणि द्रोणाचार्यांचे त्याच्याकडे लक्ष गेले.
"प्रणाम, आत येण्याची परवानगी आहे?"
"प्रणाम विदुर. आज तुम्ही या द्रोणाचार्याच्या कुटीत?" द्रोणांनी आश्चर्याने विचारले.
"मनात प्रश्न होते काही."
"तुम्हाला प्रश्न पडलेत, विदुर? खुद्द धर्मात्म्यास?"
"मनाला कश्याचे बंधन असते, गुरु द्रोण? एका निमिषात असंख्य प्रश्न पडतात त्याला. म्हणलं, निदान काही प्रश्नांची उत्तरे मिळतात का ते बघावं."
द्रोणाचार्यांनी स्मित केले.
"द्रोणाचार्य, विजयी योद्धा पराजित योद्ध्यांच्या संपूर्ण संपत्तीचा अधिपती असतो न?"
"हो."
"मग त्या न्यायाने अर्जुन आणि पर्यायी तुम्ही द्रुपदच्या संपूर्ण राज्याचे अधिकारी होतात."
"हो."
"मग.... प्रतिशोध घेण्याऐवजी अर्धे राज्य द्रुपदला परत का केलेत?"
"हे युद्ध, प्रतिशोध नव्हता, विदुर. असता तर द्रुपदाचे राज्यच काय पण त्याच्याकडे जीवही शिल्लक राहिला नसता त्याचा ." कृपाचार्य द्रोणांकडे पाहत म्हणले..... "हो ना, द्रोणाचार्य?"
द्रोणाचार्यांनी होकारार्थी मान हलवली.
"म्हणजे कृपाचार्य? मी समजलो नाही." विचार करत विदुर कुठल्याशा कारणापर्यंत पोचला. "तो आणि द्रोणाचार्य, दोघे बरोबरीचे वाटावेत द्रुपदला, आणि त्याने मित्रत्व स्विकारावे म्हणून अर्धे राज्य परत दिले?"
"नाही, विदुर. जर मित्र असल्याचे मान्य करून घेण्याकरता बरोबरी साधली, तर काय फरक राहिला आपल्यात आणि त्याच्यात?" द्रोणाचार्य म्हणाले.
"मग? हे युध्द कश्यासाठी?" विदुर पुरता गोंधळला होता.
"शब्दांचे मूल्य शिकवण्यासाठी! अपशब्द एका बाणासारखा असतो. एकदा सोडला की समोरच्याला असा जखमी करतो की ते कधी भरून येत नाहीत. त्याचप्रमाणे, दिलेले वचन एका भारासारखे असते. जे पूर्ण करेपर्यंत आपण त्याच्या ओझ्याखालीच वावरतो. विदुर, द्रुपदने अर्ध राज्य देण्याचा शब्द दिला होता मला लहानपणी."
"पण लहानपणी कुठे समज असते इतकी, कुलगुरु?"
"लहानपणी त्याला वचन देताना शब्दांचे मोल नसेलही विदुर.... पण मोठेपणी तरी द्रोणांचा अपमान करताना त्याने विचार करायला हवा होता. आपल्या वाचेवर आपला लगाम हवा, विदुर. नाहीतर उधाळलेल्या वारू सारखे असतात शब्द. हेच शिकवायचे होते द्रुपदला." बोलता बोलता कृपाचार्यांनी एक क्षण थांबून विदुरकडे पाहिले. "शब्द कसा पाळायचा, याचे उदाहरण होते हे अर्ध्या राज्याचे दान."
"अद्भुत!" विदुर प्रभावित झाल्यासारखा क्षणभर नुसताच बघत उभा राहिला. समाधानाने निरोप घेत तो कुटीतून बाहेर पडला.
"तुम्हाला माहिती आहे कुलगुरू, इथे येण्याआधी.... आमची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. पण आम्ही आहे त्यात सुखी होतो. एकदा अश्वत्थामा त्याच्या मित्रांच्या घरी गेला. तिथे त्याने दुध पिताना पाहिले त्यांना. हट्ट धरला. 'मलाही पाहिजे.' आपल्याकडे नाहीये.....कसे सांगणार त्याला? कसे समजावणार? क्रिपीने वेगळाच उपाय काढला. अश्वत्थामाला पिठात पाणी मिसळून दिले प्यायला. लहानच होता....त्यानेही दुध समजून प्यायले. चव आवडली नाही आणि हट्ट थांबला. आम्हाला हायसे वाटले. पण म्हणतात ना, सत्य लपवून ठेवले की तितक्याच ताकदीने समोर येते ते. एकदा त्याने मित्रांना विचारलं 'का आवडत तुम्हाला हे ? बेचव आहे अगदी.' आणि त्यांनी त्याला दुध प्यायला दिलं.... खरं दुध! 'बेचव कुठे आहे?' त्याला समजलं.... तो निराश होऊन बसला. मलाच बघवेना.
जर मी माझ्या पुत्राला साधं दुध देऊ शकत नाही, तर आयुष्यभराची माझी विद्या काय कामाची? सर्व गणिते शुन्यावर येऊन थांबली.
म्हणलं, निदान मैत्रीच्या पुंजीत काही शिल्लक असेल. अश्वत्थामाला दुध मिळावे, म्हणून एक दुभती गाय हवी होती, मित्राकडून. पण त्याच्याही पुंजीत केवळ अपमान होता. गोमाता गोधन म्हणून दान करायला तयार होता तो. भिक्षा द्यायला त्याच्याकडे सर्व काही होते. पण मैत्रीचा अधिकार म्हणून....? काही नाही. लहानपणी अर्ध राज्य देईन म्हणणारा..... मोठेपणी एक गायही नाही देऊ शकला. इतका बदलतो माणूस संपत्ती आणि पद मिळाल्यावर?"
"सगळे नाही बदलत, गुरु द्रोण. तुम्ही कुठे बदललात? तुमचा पुत्र आता नरेश आहे अर्ध्या पांचालनगरीचा. पण त्याचे पिता अजूनही इथेच आहेत. ना त्यांनी वेष बदलला, ना ते स्वतः बदलले."
द्रोणाचार्य काही वेळ कुठल्या तरी गोष्टीचा गहन विचार करत शांत होते.
"मला त्याला केवळ शब्दांचे महत्व समजवायचे होते, आचार्य. पण द्रुपदचा त्या दिवशीचा पडलेला चेहरा अजून मला आठवतो..... माझ्या शिष्यांपुढे पराजित झालेला माझा मित्र. अर्जुन खरचं उत्तम शिष्य आहे, कृपाचार्य. पण मी एक चांगला मित्र आहे?? द्रुपद माझा मित्र होता, कृपाचार्य. शेवटी, तो माझा मित्रच होता.... आणि मी....." द्रोणांच्या चेहऱ्यावर पसरू लागलेल्या आत्मक्लेशाच्या छटा कृपाचार्यांनी हेरल्या.

'शोभते गुरु शिष्याची जोडी! अर्जुन आणि तुम्ही.... कधी आणि कोणासाठी हळवे व्हालं.... काही नेम नाही!'
"द्रोणाचार्य, 'ब्राह्मण आहेस, भिक्षा माग' असं म्हणत मैत्री नाकारली त्याने. मग त्याच्याप्रती मैत्री निभावण्याची जवाबदारी तुमच्यावर येतेच कुठे? ज्या मुखाने अपमान केला त्या मुखाने क्षमा याचना करायलाच हवी. निदान आता तरी तो बोलण्याआधी विचार करेल परिणामांचा. खरंतर तुम्ही त्याला अर्ध राज्य दिलेत हेच उपकार आहेत त्याच्यावर."
द्रोणाचार्यांच्या चेहऱ्यावर हलके स्मित होते. ते पाहून कृपाचार्य पुढे म्हणाले, "मला विश्वास आहे, द्रोणाचार्य. द्रुपदच्या अर्ध्या राज्याच्या राजगादीसाठी अश्वत्थामा अगदी योग्य आहे."
"दुर्योधनाचा मित्र असला तरीही?" द्रोणाचार्यांनी कृपाचार्यांना खोडसाळपणे विचारले.
"हो. दुर्योधनाचा मित्र असला तरीही."
"का बरं?"
"कारण शकुनी एकच आहेत, द्रोणाचार्य. आणि ते सद्ध्या दुर्योधनाच्या नशिबात ग्रहण लावण्याच्या कामात व्यस्त आहेत."
दोघेही असहय्यपणे हसले.
"काहीतरी करायला हवं, द्रोणाचार्य. नाहीतर हे ग्रहण एकदिवस समस्त हस्तिनापुरास झाकोळून टाकेल.... त्याआधी काहीतरी करायला हवं."
दोघेही विचारात मग्न झाले.
"कृपाचार्य, तुम्हाला वाटतं की लहानपणी दुर्योधनानेच भीमाला विष दिलं होतं?"
"अगदी खात्रीशीररित्या." ते क्षणभरही वेळ न लावता उत्तरले तसे द्रोणांनी त्यांच्याकडे नजर टाकली.
"गांधारनरेशने लहानपणापासून त्याला प्रतिशोधाच्या भावनेत जळतं ठेवलंय. मला चिंता वाटते, आचार्य. हे सगळं चांगल्या भविष्याचं द्योतक नाही वाटतं मला."
----------
"भावी राजाचे स्वागत असो."
"मामाश्री! जखमेवर मीठ चोळू नका." दुर्योधन चांगलाच चिडला.
"माझ्याच जन्मदात्यांनी माझ्या पदावर त्या युधिष्ठिराला बसवले.... माझ्यासमोर. माझा विचारही केला नाही. तिकडे स्वतःलाच राज्याभिषेक झाल्या सारखा आनंद झाला होता पितामहंना. त्यांनी स्वतःच्या हातांनी त्याच्या डोक्यावर तो मुकुट ठेवला जो माझ्या डोक्यावर विराजमान होईल, अशी स्वप्न दाखवलीत तुम्ही. वर आता तुम्हीच चेष्टा करता आहात?"
"चेष्टा? नाही दुर्योधना. माझ्या नजरेतून बघशील तर संधी आहे ही."
"कसली संधी? त्या युधिष्ठिराच्या पायाशी लोटांगण घालायची?"
"नाही.....स्वप्न पूर्ण करण्याची."
"कोणाचं? युधिष्ठिराचं?"
'कप्पाळ माझं.' शकुनीने डोक्याला हात लावला.
"मामाश्री!" दुर्योधनाचा आवाज वाढला, "तुम्हीही त्या पांडवांच्या बाजूने असालं तर....." त्याचा हाताची मुठ गदेवर पक्की झालेली पाहून शकुनी घाबरला.
"नाही.... नाही दुर्योधना. मी तुझ्याच बाजूने आहे कायम. तुझं आणि माझं स्वप्न एकच तर आहे. तुला हस्तिनापुरचा सम्राट झालेलं बघायचे आहे, मला. मला दिसतंय हस्तिनापुरचं भविष्य. तो बघ तो राजगादीवर बसलेला संपूर्ण हस्तिनापुराचा सम्राट.....माझा दुर्योधन!" कक्षातल्या आसनाकडे बोट दाखवतं शकुनी म्हणाला.

"तुम्ही काय हे स्वप्न बघत इतके दिवस झोपला होतात? जागे व्हा, मामाश्री. इथे सत्यात त्या युधिष्ठिराचा राज्याभिषेक झालायं." आसनावर बसत दुर्योधनाने गदा कडेला टेकवली. "आता काय पूर्ण होणार तुमचं स्वप्न ?"

"का नाही दुर्योधना? हस्तिनापुराचाचं इतिहास बघं. चित्रांगद महाराजांचा राज्याभिषेक झाला होताच की.... पण विचित्रवीर्यांना राज्यपद मिळालंच ना?"
"मामाश्री, तेव्हा चित्रांगद महाराज युद्धात वीरगतीला प्राप्त झाले होते. इथे असे काही नाहीये. पितामह भीष्म असताना कोणी मनुष्य युधिष्ठिराला युद्धात हरवूही शकणार नाही. मारणं लांबची गोष्ट! आणि भीष्माचार्य गंधर्वयुद्ध परत होऊ देणार नाहीत."
"पण तुला राजगादी मिळावी म्हणून गंधर्व युद्धाची काय गरज आहे, दुर्योधन?" हातावर हात चोळत शकुनी म्हणला.
"युध्द न करता युधिष्ठिराला गंधर्व कसं मारणार?"
'बैलबुद्धी कुठला!' शकुनी लंगडत दुर्योधनाजवळ गेला. "दुर्योधना, गंधर्वच का हवेत युधिष्ठिराला चिरनिद्रा द्यायला?"
"मग?"
कक्ष रिकामा आहे याची खात्री करून घेत हळू आवाजत शकुनी म्हणाला, "आपण देऊ की!"
"म्हणजे आपणच युध्द करायच युधिष्ठिराशी?" सावरून बसत दुर्योधन म्हणाला, "परत पितामह मधे पडतील. अर्जुनाला इच्छामृत्यूची धमकी देऊन शांत बसवतील आणि मला शस्त्र हातात घेण्याची धमकी देऊन! आणि ते अजेय योद्धा आहेत, मामाश्री!"
एक क्रूर हास्य शकुनीच्या चेहऱ्यावर पसरले, "दुर्योधन, युद्ध सोडूनही काही कारणे असू शकतात युधिष्ठिर आणि पांडवांच्या अदृश्य होण्याची."
"जसे की?"
"जर महालात आग लागली अचानक तर?" एक भुवई उंचावत शकुनी ने दुर्योधनाच्या डोळ्यात बघितले. क्षणातच दुर्योधनाच्या डोळ्यांतही ती च क्रूरता झळकली!
एका मामाने भाच्यांच्या आयुष्यात विष कालवण्याची ही काही पहिली वेळ नव्हती.... पण प्रत्येक भाच्चा दुर्योधन नसतो!

©मधुरा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहिलंय .
मनाला विचार करायला भाग पाडते तुमचे लेखन .
keep writing पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत

छानच.
<<<पण प्रत्येक भाच्चा दुर्योधन नसतो!>>> प्रत्येक मामाही शकुनी नसतो