अशोक
अशोक या वृक्षाबद्दल अनेकदा लोकांच्या मनात गोंधळ होतो.
खोटा अशोक
बहुतेक लोकांना माहित असलेला अशोक म्हणजे, खोटा अशोक किंवा आसुपालव / आसोपालव. घरासमोर, इमारतींच्या, शाळांच्या कुंपणाशेजारी ओळीने लावलेला दिसतो तो हा. जवळ जवळ ३० फुटापर्यंत उंच सरळसोट वाढतो. ह्याची रचना सूचिपर्णी वृक्षांप्रमाणे शंकूच्या आकाराची असते. परंतु ह्याच्या काही जाती इतर वृक्षांप्रमाने डेरेदार देखील वाढतात. पाने बरीचशी आंब्याच्या पानांसारखी, लांब पण पोपटी रंगाची, पानांच्या कडा नागमोडी (wavy margin).
फोटो आंतरजालावरून साभार
ह्याची फुले फिक्कट पोपटी रंगाची व चांदणीच्या आकाराची असतात.ती पटकन दिसून येत नाहीत. दिसायला आकर्षक नसल्यामुळे काही प्रकारचे पतंग व वटवाघुळाद्वारे याचे परागीभवन होते. परागीभवन झाल्यावर हिरव्या रंगाची फळे घोसाने येतात. झाडाखाली जांभळाच्या बियाच्या आकाराच्या, तपकिरी रंगाच्या बिया पडलेल्या दिसतात.
याच शास्त्रीय नाव: Polyalthia longifolia, Polyalthia म्हणजे अनेक औषधी उपयोग असणारा व longifolia म्हणजे लांब पाने असणारा
इंग्रजी नाव: False Ashok , Mast Tree (याचे खोड जहाजाचे शीड बनविण्यासाठी वापरतात)
उपयोग:
हा प्रामुख्याने बागेत, इमारतींच्या, शाळांच्या कुंपणालागत किंवा रस्त्याशेजारी लावतात. तसेच ह्याची पाने तोरणात, हारात आंब्याच्या पानांऐवजी वापरतात. ह्याचे लाकूड खूप मजबूत असते. कुंपणात रांगेने लावलेल्या आसोपालवामुळे एक नैसर्गिक भिंत तयार होऊन ध्वनी व वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होते. Tailed Jay व Common Jay या फुलपाखरांची आसोपालव ही खाद्य वनस्पती आहे.
अशोक, सीता अशोक
बराचसा दुर्लक्षित परंतु आयुर्वेदात, संस्कृत साहित्यात ज्याचं भरभरून वर्णन केलं आहे तो हा. खराअशोक.
हा अशोक अनेक नावांनी ओळखला जातो. अशोक (अ शोक), रक्ताशोक, वञ्जुल, नारीपाद्स्पर्श, रक्तपल्लव, ताम्रपल्लव, सुवर्णाशोक वगैरे. शास्त्रीय नाव Saraca asoca, Saraka indica . याची कोवळी पाने तपकिरी लाल रंगाची असतात. पाने संयुक्त, तीन ते सहा पर्णिकांच्या जोड्या. ग्रीष्म ऋतूत मार्च ते मे महिन्यात हा फुलतो. याला चार पाकळ्यांची , पिवळसर फुले गुच्छात येतात. हळूहळू ती केशरी आणि मग लालबुंद होतात.असा बहरलेला अशोक वृक्ष पाहणे हि एक पर्वणीच असते.
कालिदासाने या वृक्षाचे वर्णन आपल्या ऋतुसंहार काव्यात फार सुंदर केले आहे
आमूलतो विद्रुमरागताम्रं सपल्लवं पुष्पचयं दधानः
आरंभापासून पोवळ्यासारखा तांबडा रंग असणारे फुलांचे झुपके असणारा भरपूर पाने असलेला
अशोकनिर्भर्स्तितपद्मरागम्, आकृष्टहेमद्युतिकर्णिकारं
मुक्ताकलापीकृतसिन्धुवारं वसन्तपुष्पाभरणं वहन्ती I I
कुमारसंभवातील या श्लोकात पार्वतीने वसंतात फुलणाऱ्या फुलांची आभूषणे धारण केली होती याचे वर्णन आहे. त्यात अशोकाची फुले हि माणकांपेक्षाही शोभून दिसत होती असे वर्णन केले आहे.
ह्याच्या फुलण्याबाबत अशी एक कवीकल्पना आहे कि, सुंदर स्त्रीच्या लत्ताप्रहाराने हा फुलतो.
बौद्ध धर्मात देखील अशोकाला पवित्र मानतात.
उपयोग
अशोकाच्या सालीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. अशोकापासून बनविलेले अशोकारिष्ट स्रियांच्या अनेक तक्रारींवर गुणकारी औषध आहे.
बागेत हमखास असावा असा हा वृक्ष आहे परंतु खंत ही आहे कि हा आता दुर्मिळ झाला आहे.
सदर वृक्ष जिजामाता उद्यानातील आहे. ह्याच्या बाजूलाच आपली लाडकी उर्वशी फुललेली आहे.
आहे.
हे पाहून माझ्या मनात दोन गोष्टी आल्या
१. कदाचित उर्वशीने अशोकला लाथ मारली असेल आणि तो फुलला असेल (साक्षात अप्सराच ती!)
२.कालिदास इथे असता तर त्याला हे दोघे एकत्र पाहून अशोकोर्वशिय सुचले असते
पिवळा अशोक
मूळचा भारतीय नसलेला पण सीता अशोकाचा भाऊ म्हणजे पिवळा अशोक. भारतात तसा अभावानेच आढळणारा.
मलेशिया म्यानमार थायलंड येथील सुंदर स्थानिक वृक्ष. ह्याची पाने आणि फुले अगदी आपल्या सीता अशोकासारखी, फुलांचा रंग फक्त रंग पिवळाधम्मक.
या फुलांना एक मंद सुवास असतो. असाच फुललेला पिवळा अशोक पाहण्याचा योग् आला तो लालबाग वनस्पती उद्यान, बंगरूळ येथे.
पिवळा अशोक
.
.
.
.
.
सुंदर छायाचित्र आणि लेख
सुंदर छायाचित्र आणि लेख सुद्धा!
लेख माहितीपूर्ण आहे आणि तुमचा त्यामागचा अभ्यासही खूप आहे.
छान!!
मला हवा तो संदर्भ नाही भेटला
मला हवा तो संदर्भ नाही भेटला पण अशोक षष्टी नावाचा नवीन प्रकार कळाला
जिद्दू खूप खूप धन्यवाद. अशोक
जिद्दू खूप खूप धन्यवाद. अशोक षष्ठी बद्दल नवीन माहिती मिळाली. दुसरा फोटो दिसत नाहीये.
हि घ्या त्या पुस्तकाची लिंक.
हि घ्या त्या पुस्तकाची लिंक. ह्या लेखकाची आमच्या पूर्वजांना एका कामी मोलाची मदत झाल्याने त्यांचा उल्लेख घरच्या बाडात आहे. गूगल केल्यावर हे पुस्तक सापडलं त्यांचं.
https://archive.org/details/in.ernet.dli.2015.260540
जिद्दू, पुस्तकाच्या लिंकसाठी
जिद्दू, पुस्तकाच्या लिंकसाठी खूप खूप धन्यवाद.
छान माहिती. फोटो दिसत नाहियेत
छान माहिती. फोटो दिसत नाहियेत.
फोटो दिसत नाहियेत.>>>> माहीत
फोटो दिसत नाहियेत.>>>> माहीत नाही कसे दिसत नाहीयेत
.
Pages