मोहम्मद रफी...सूरांच्या या बादशहाला लौकिक शरीर सोडून आज एकोणचाळीस वर्षे झाली. बाकी तो आमच्यात आहेच. आणि त्याच्या सूरांच्या निरनिराळ्या छटांचा आनंद घेण्याचे माझे व्यसनही वर्षागणिक वाढतेच आहे. यावेळी उदास आणि दु:खी झालेला प्रियकर आणि त्याला पडद्यावर रफीने दिलेला स्वर यावर लिहायचे ठरवले. विषय ठरवताना फारसे काही वाटले नाही पण जेव्हा त्यानुसार गाण्यांचा विचार करु लागलो तेव्हा लक्षात आले की आपण एका अवघड विषयाला हात घातला आहे. सुखापेक्षा दु:ख जास्त गुंतागुंतीचे असते का? तसे असावे. कारण नुसत्या प्रेयसीने नकार दिलेला प्रियकर इतकंच या गाण्यांमध्ये दिसत नाही. काहीवेळा प्रेयसीने प्रतारणा केलेली असते. काहीवेळा सामाजिक बंधने असतात, अनेकदा "बेटीअमिर घर की" असते. अशावेळी काही जण उदास होतात. काहींच्या आवाजात हताशपण असते. काही नशीबाला दोष देतात. काही आपल्या दुर्दैवाचं खापर "बेदर्द" जमान्याच्या" डोक्यावर फोडून मोकळे होतात. काही प्रेयसीला माझे काही होवो तू सुखी रहा अशा शुभेच्छा देतात. तर काही शाप देतात. काही सूड घेण्याची भाषा करतात. अशा कितीतरी छटा या दु:खाला आहेत. आणि रफीसाहेबांचा आवाजही तसाच बदलत राहतो.
दु:ख यातनांचे गहीरे रंग सादर करताना ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार असेल तर रफीचा आवाज धारदार होताना पाहिला आहे. म्हणजे सर्वप्रथम पडद्यावर जो अभिनेता असेल त्याला साजेल असा आवाज लावायचा. त्यात दु:खाची जी छटा असेल ती गडद करायची. त्यातील शब्दांना न्याय द्यायचा आणि ते गाणं खुलवून परिपूर्ण करायचं हे शिवधनूष्य दरवेळी रफीने लिलया पेललं आहे. देव आनंदसाठी आपले हताशपण व्यक्त करताना रफीचा आवाज असा लागतो की समोर खांदे पाडून किंचित मान हलवणारा देव आनंद समोर आलाच पाहिजे. अर्थात हे सारे अतिशय प्रभावी करतात त्यात कविचा शब्दांचा आणि संगीतकाराचा मोठा वाटा असतो हे सांगणे नलगे. या तर्हेची गाणी निवडताना माझ्यासमोर मोठाच प्रश्न उभा राहिला. कुठल्याही गाण्याला प्राथमिकता देता येईना. सारीच एकाचढ एक सुंदर. त्यामुळे फक्त सात गाणी निवडली आहेत. आणि याहून कितीतरी जास्त रफीची तितकीच सुरेख गाणी दर्दभरी गाणी मला माहीत आहेत हेही आधीच सांगितलेले बरे. काही विशिष्ट भावनांबद्दल लिहायचे म्हणून मुद्दाम ही गाणी निवडलीत. यातील काही चित्रपट मी पाहिलेत. काही पाहिलेले नाहीत. पाहिलेल्यांपैकी काही आठवतात. काही आठवत नाहीत. पण रफीची गाणी पाहताना, त्यावर लिहिताना त्या संदर्भांची नेहेमी आवश्यकता वाटतेच असे नाही. कारण गाण्याबद्दल लिहिताना मला त्यावेळी जाणवलेला अर्थ सांगावासा वाटतो.
पहिले गाणे "गुजरे है आज इश्कमें हम उस मकाम से..." आहे. १९६६ साली आलेल्या "दिल दिया दर्द लिया" चित्रपटातील हे गाणे बहुतेक वेळा दिलिपकुमारचा अर्धा चेहरा अंधारात ठेऊन चित्रित केला आहे. वाटले कदाचित हा चित्रपट कृष्णधवल रंगात असता तर या किमयेचा परिणाम आणखी वेगळा झाला असता. शकिल बदायुनिचे काव्य ऐकले तर कळेल हा प्रियकर नुसता दुखावलेलाच नाही तर सूडही उगवण्याची शक्यता आहे. तो म्हणतो
हम वो नहीं जो प्यार में रोकर गुज़ार दें
परछाईं भी हो तेरी तो ठोकर से मार दें
वाक़िफ़ हैं हम भी ख़ूब हर एक इंतक़ाम से
रफीने "ओ बेवफा तेरा भी यूही टूट जाये दिल" म्हणताना कमाल आवाज लावला आहे. दिलिपकुमारच्या चेहर्यावरील दर्द आणि रफीचा आक्रोश याने प्रियकराची वेदना आणखि गडद झाली आहे.
दिलिपकुमारनंतर अनिल धवन म्हटल्यावर अनेकजण नाक मुरडण्याची शक्यता आहे. पण उषा खन्नाचे हे गाणे मला नेहेमी वेगळ्या प्रकारचे वाटते. यातला प्रियकर धाय मोकलून रडत नाही. तो संयत आहे. ठाम आहे. यानंतर मी तुझ्या आसपास दिसणार नाही असे तो सांगतो. १९७४ साली आलेल्या सावनकुमार टाकच्या "हवस" सिनेमातील या गाण्यात नितू सिंग गोड दिसली आहे. त्या काळातल्याप्रमाणे कल्ले ठेवलेला, चेहर्यावर फारसे भाव न दाखवणारा अनिल धवन रफीच्या दमदार आवाजामुळे सुसह्य होतो. हा प्रियकर संयत असला तरी "घिरके आयेंगी घटाये फिरसे सावन की, तुमतो बाहोंमें रहोगी अपने साजन की...गले हम गमको लगायेंगे सनम आज के बाद" म्हणून आपले दु:ख व्यक्त करतो. यातील "लगायेंगे सनम" म्हणताना रफीच्या आवाजात आता सारे काही संपल्याची भावना स्पष्ञपणे दिसते. पण येथे सूड नाही. संयम आहे. रफीने आपल्या आवाजात या भावनेचा समतोल अचूक पकडला आहे. विशेषतः दिलिपकुमारचं "गुजरे है " ऐकल्यावर हे जास्त जाणवतं.
यानंतर मला धर्मेंद्रचं " मेरे दुश्मन तू मेरी दोस्ती को तरसे" हे गाणं घ्यावंसं वाटतं. यात प्रियकराचा नुसता आक्रोशच नाही तर त्याने आपल्या प्रेयसीला तळतळून दिलेले शाप आहेत. खरं तर हे संपूर्ण गाणं म्हणजेच एक शापवाणीच आहे. प्रत्येक ओळीत तळतळाट आहेत. आनंदबक्षीला साहीरसारख्या शायराच्या पंक्तीत बसवले जात नाही. पण त्याने अतिशय अर्थपूर्ण गाणी दिली आहेत. १९६६च्या "आये दिन बहार के" मध्ये लक्ष्मीकांत प्यारेलालच्या संगीतात आनंद बक्षीने लिहिलेले शब्द होते "तेरे गुलशन से ज़्यादा, वीरान कोई विराना ना हो, इस दुनिया में कोई तेरा अपना तो क्या, बेगाना ना हो, किसी का प्यार क्या तू बेरूख़ी को तरसे...". सुटातला तरणाबांड धर्मेंद्र आणि त्याच्या चेहर्यावरची दबलेली चीड, वेदना, प्रतारणेचं दु:ख, आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे कटुतेची भावना आणि याला चपखल बसेल असा रफीचा आवाज. या गाण्यात ज्या आवाजात थंडपणे तो तिच्यासाठी शाप उच्चारतो असं वाटतं जालिम अॅसिडने जाळण्याआधीचा थंड स्पर्श झाला आहे. आशा पारेखने तिला या विदीर्ण करणार्या शब्दांमुळे होणारा त्रास चेहर्यावर फार सुरेख दाखवला आहे. यापुढच्या गाण्याबद्दल मी स्वतंत्र लेख लिहिला असला तरी या यादीत ते मुद्दाम घ्यावसं वाटलं.
१९६५ सालच्या "भीगी रात" मधील प्रदिपकुमारने पडद्यावर गायिलेलं "दिल जो न कह सका" हे गाणं जर दु:खी प्रियकरांच्या यादीत घेतलं नाही तर ती यादी खात्रीने अपूर्ण राहील असं मला वाटतं. यात मजरूह सुलतानपुरीसाहेब लिहितात "पियो चाहे खून-ए-दिल हो, के पीते पिलाते ही रहने की रात आई". या प्रियकर दुखावलेला तर आहेच पण प्रेयसीने पैशासाठी आपल्याला सोडले असा गैरसमजही त्याला झालेला आहे. हे येथील वेदनेचे वेगळेपण. प्रदिपकुमार म्हणजे अनिल धवन नव्हे. शिवाय समोर अशोक कुमार आणि मीनाकुमारी आहेत. त्यामुळे गाणे श्रवणीय तर आहेच पण प्रेक्षणीयही झाले आहे. रोशनने दिलेल्या या गीताच्या चालीत भावनांची तीव्रता रसिकाच्या हृदया पर्यंत पोहोचविण्याची ताकद आहे. रफीने "आज दिल की किमत जामसे भी कम है..." म्हणताना सारी हताश भावना आवाजात व्यक्त केली आहे. कशालाच काही अर्थ नाही आणि जे झालं आहे ते बदलण्याची आपल्यात ताकद नाही. ही हतबलता त्या आवाजात ते शब्द उच्चारताना दिसते. कधी कधी वाटतं कवी आणि संगीतकार दोघांनाही धन्य धन्य वाटत असेल आपल्या कलेचे या आवाजामुळे सोने झालेले ऐकताना.
दर्दभर्या गाण्यांबद्दल बोलताना देवआनंद नसेल तर पुढे जाता येईल का? देवसाहेबांसाठी दोन गाणी निवडली होती एक "गाईड" मधील "क्या से क्या हो गया, बेवफा तेरे प्यार में" आणि दुसरे "हम दोनो" मधील "कभी खुदपे कभी हालात पे रोना आया". गाईडचे गाणे जास्त गुंतागुंतीचे वाटले. पण हम दोनो मधल्या गाण्यातील दु:खाची छटा फार वेगळी वाटली म्हणून ते निवडले. एक प्रकारे तत्त्वज्ञानाकडे झुकलेले साहीरचे गीत. साहीर लुधियानवी असल्यावर अनेकदा ते ओघानेच आले. आणि समोर दोन देव आनंद. एक सुखी, आपल्या बायकोच्या आठवणीत रमलेला. तर दुसरा आपली कैफीयत गाण्यात मांडणारा. पण तरीही दुखावलेली भावना लपत नाही. "हम तो समझे थे के हम भूल गये है उनको, क्या हुवा आज ये किस बात पे रोना आया" म्हणत देवाआनंद आपल्या दु:खाला वाट मोकळी करून देतो. एकुणच परिस्थिती आणि माणसाच्या प्रवृत्तीवर भाष्य करणार्या या गीताला साज चढवला होता अगदी वेगळ्या बाजाचे संगीत देणार्या जयदेवने. देव आनंदच्या व्यक्तीमत्वाला खुलवेल असा रफीचा मखमली स्वर आणि त्यात मिसळलेली उदासपणाची, काहीतरी संपल्याची भावना या दोन्ही मुळे गाणे अतीशय परिणामकारक झाले आहे.
जुन्या हिन्दी चित्रपटातील नायकाची वेदना आणि पियानो वेगळे करता येत नाहीत. अनेक सुरेख गाणी ही नायकांनी पियानोवर बसून गायिलीत. १९६६ साली आलेला मनोजकुमार आणि आशा पारेखचा "दो बदन". यात रफीची तीन ग्रेट म्हणता येईल अशी दर्दभरी गाणी आहेत. एक "भरी दुनियामें आखिर दिल को समझाने कहां जाये" , दुसरं "नसीबमें जिसके जो लिखा था" आणि तिसरं "रहा गर्दिशोंमे हरदम मेरे इश्क का सितारा". या तिन्हीतलं "भरी दुनियामें " निवडलं आहे ते पियानोसाठी. येथे तिढा आहे तो "अमिर बाप की बेटी " आणि "एक मामुली नौकर" चा. प्रेयसीने प्रतारणा केलेली नाही पण "दौलत के पिछे भागनेवाली दुनिया जालिम आहे" त्याने प्रियकर दुखावाला गेला आहे. तिचा श्रीमंत पिता नायकाची आपल्या उच्चभ्रू समाजातील लोकांशी ओळख करून देताना त्याचा कमाल अपमान करतो आणि त्यातून हे वेदनेचं पुष्प उमलतं. मनोजकुमारला वेदना दाखवताना कटु हास्य करण्याची सवय आहे ती या गाण्यात ठळकपणे दिसते. रफीच्या आवाजातून ओसंडून जाते ती फक्त हतबलता. श्रीमंतांपुढे आणि त्यांच्या श्रीमंतीपुढे नायकाला आलेली हतबलता आणि त्यातच प्रेयसीवरचे प्रेम ही द्विधा मनस्थिती रफीने आवाजातून चपखल व्यक्त केली आहे. "जिन्हे जलने की हसरत है वो परवाने कहां जायें" लिहिणारा शकील बदायुनि आणि त्याला साज चढवणारा संगीतकार रवी या सोन्याला सुगंध आणला आहे रफीच्या आवाजात स्पष्टपणे डोकावणार्या हतबलतेमुळे.
वेदनेच्या या इंद्रधनुष्यातील सातवा रंग भरला आहे १९६३ सालच्या "दिल एक मंदिर" मधल्या "याद न जाये बीते दिनों कि" या अजरामर गाण्याने. श्रीधर यांच्या झपाटून टाकणार्या चित्रपटाचे गीत लिहिले आहे कवी शैलेन्द्र यांनी तर संगीत आहे शंकर जयकिशन यांचे. आठवणींमुळे उसळलेल्या वेदना हेच या गाण्याचे स्वरुप. रफीने हा वेदनेचा सारा कल्लोळ आपल्या आवाजात पकडला आहे. प्रेयसीची आठवण विसरु म्हणता विसरता येत नाहीय. "मनमें बसी ये मूरत लेकीन मिटी न मिटायें..." रफीच्या आवाजाने एखाद्या हळुवारपणे येणार्या आणि मोठ्या होऊन फुटणार्या लाटेसारखी कमाल या गाण्यात केली आहे " दिल क्युं भुलाये उन्हे" हे हळुवारपणे म्हणत एकदम टिपेला जात "दिल क्युं भूलाये" म्हणून ही लाट फुटते. या गाण्याबद्दल लिहावे तितके थोडेच आहे. गाणी अनेक आहेत आणि दु:खाच्या तर्हा तर असंख्यच आहेत. या सार्यांना आपल्या आवाजात बांधणारा एकच स्वर आहे तो म्हणजे रफी.
रफीचे पुण्यस्मरण करताना वर्षागणिक या माणसाचे आपल्यावर किती उपकार आहेत याची जाणीव जास्त तीव्र होऊ लागली आहे. जीवनाच्या धकाधकीत आवाजातील वेदनेमुळे प्रत्यक्षातील वेदना विसरायला लावणारे हे स्वर. रोजच्या धडपडीत मनाला शांत करणारे स्वर. कॅलिडोस्कोपप्रमाणे गाणे बदलताच वेदनेचा नवा पैलू दाखवणारे स्वर. रफीसाहेब तुम्ही गात रहा. आम्ही ऐकत राहु. आणि शक्य झाल्यास आमच्या तोकड्या झोळीत जे सुवर्णदान तुम्ही भरभरून केले आहे त्याबद्दल लिहित राहु...
अतुल ठाकुर
"अरे आज रफींचा स्मृतिदिन नाही
"अरे आज रफींचा स्मृतिदिन नाही का" शीर्षक वाचल्यावर मनात पहिली प्रतिक्रिया हि होती. ३१ जुलै. वर्षांतून अनेकदा जेंव्हा केंव्हा रफींचे जाणे आठवते तेंव्हा हि तारीख मनात येतेच. खूप लहान असल्याने प्रत्यक्ष फार आठवत नाही. पण नंतरच्या काळात जसजसे त्याविषयी वाचत गेलो त्यावरून जाणवले, तो एक अत्यंत उदास दिवस होता. सकाळी रियाझ करता करता हृदयविकाराचा झटका येऊन ते अचानक गेले. वय अवघे पंचावन्न. कुणी कल्पनासुद्धा केली नव्हती. आपल्या लाडक्या कलाकाराला अखेरचा निरोप देण्यासाठी तमाम रफीप्रेमींनी भर पावसात विक्रमी गर्दी केली होती. एखाद्या कलाकाराच्या अंत्ययात्रेला झालेली सर्वाधिक गर्दी असे उल्लेख आहेत. दोनेक वर्षापूर्वी श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेपर्यंत ते रेकॉर्ड टिकून होते असे म्हणतात.
"एकेक चांगले कलाकार निघून चाललेत" माझ्या आईचे हताश उद्गार पुसटसे आठवतात. ते खरेच होते. "सुवर्णकाळा"तले अनेक दिग्गज ७० ते ८० ह्या दरम्यान निघून गेले होते. गायक मुकेशजी, रफीसाहेब, संगीतकार जयकिशन (शंकर-जयकिशन मधले), मदनमोहन, एसडी बर्मन, वसंत देसाई, अभिनेत्री मीनाकुमारी, मधुबाला, नर्गिस, मराठीतले आपले सर्वांचे लाडके गीतकार गदिमा इत्यादी. रसिकांच्या ह्रदयावर राज्य करणारे चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ घडवणारे असे अनेक दिग्गज कलाकार या काळात एकेक करत निघून गेले. राज-दिलीप-देव अस्तंगत होत होते. जणू एक पर्वच संपत आले होते. रफिसाहेबांच्या जाण्याने हि जाणीव अधिकच व्याकूळ करणारी ठरली.
पावसाळ्याचे कुंद वातावरण. उदासवाणे. आपल्या लेखातून रफींच्या अगदी अशाच व्याकूळ विरहगीतांची आठवण करून दिली आहे. अजून एक नितांतसुंदर लेख. मला स्वत:ला आठवते ते हे गाणे "आप के पहलू में आ कर रो दिए दास्तान-ए-ग़म सुनाकर रो दिए"
मस्त लेख .. यातली अनेक गाणी
मस्त लेख .. यातली अनेक गाणी खूपदा ऐकली आहेत. ३१ जुलै ८० चांगलीच लक्षात आहे, त्यावेळी माझे आजीआजोबा दक्षिण भारत सहलीला गेले होते. घरात आम्ही दोघी बहिणी अन आई. पावसाची झड लागलेली.. अंधारुन आलेले अन अश्यात ही बातमी आली.. त्यावेळी टीव्ही नसल्याने (गावात तरी) करमणुकीसाठी रेडियोवर अवलंबून असायचो.. असो..
Din dhal jai hai raat na jaye
Din dhal jai hai raat na jaye from Guide?
रफी साहब...काही माणसे , जी
रफी साहब...काही माणसे , जी माझ्यासाठी अजून ही आहेत..त्यातलेच एक नांव!
अतुलजी, रफी साहेबांची गाणी सुरेख आहेतच, पण तितकाच सुरेख हा लेख आहे.
धन्यवाद !!
Thanks again Atul.
Thanks again Atul.
He was the greatest of all, will always be that. Period.
And you write beautifully about him and his work, every year on the 31st of July, thank you !!!
छानेय लेख.
छानेय लेख.
तेरी गलियों में या गाण्याला अंधाधूनमुळे परत प्रसिद्धी मिळाली.
वाह! रफी माझ्या पिढीचे गायक
वाह! रफी माझ्या पिढीचे गायक नाहीत पण आई मुळे गाणी ऐकली आहेत आणि खूप आवडतातही..लेख फारच सुरेख आहे.
अतुलजी सविस्तर प्रतिसादाबद्दल
अतुलजी सविस्तर प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार
Din dhal jai hai raat na jaye from Guide?
अमा ते ही एक सुरेख आणे आहेच.
बाकी सार्यांना धन्यवाद.
मस्त. लेखातली सगळी गाणी छान
मस्त. लेखातली सगळी गाणी छान निवडली आहेत. 'हम बेखूदीमे तूमको पुकारे...' हे माझं फेवरेट.
खरंतर देवानंद, रफी आणि दुखी
खरंतर देवानंद, रफी आणि दुखी गाणे म्हणलं की मला तेरी जुल्फोनसे जुदाई तो नही मांगी थी गाणं आठवतं. पण त्याचे चित्रीकरण फारसे नीट नाहीय.
लेखातली सगळीच गाणी ऐकायला
लेखातली सगळीच गाणी ऐकायला आवडतात.
राज़ (१९६७) सिनेमातले अकेले हैं चले आओ जहाँ हो - हे अजून एक. गीताचे शब्द आणि रफीचे आर्त स्वर मन पिळवटून टाकतात. विरहगीत म्हणून लेखात समविष्ट नसेल केले कदाचित.
सुंदर लेख!
सुंदर लेख!
सुंदर लेख ! तुम्ही छान लिहिता
सुंदर लेख ! तुम्ही छान लिहिता. लेखातली सगळी गाणी आवडतात. रादर रफिंची सगळ्या मुडमधली गाणी जबरदस्त आवडतात.
मात्र माझ्या दुःखी गाण्याच्या लिस्टमध्ये मला ही तीन गाणी नक्की घ्यावीशी वाटतील. त्याशिवाय लिस्ट अपूर्ण वाटेल.
महूआ मधलं 'दोनोने किया था प्यार मगर' हे गाणं वेदनेने इतकं ओतप्रोत भरलं आहे की रफी गाणं गाताना खरंच रडत असावेत असं वाटतं.
दुसरं गाईड मधलं ' दिन ढल जाये हाये रात न जाय' हे गाणं मला क्षणात डिप्रेस करतं. एवढं उदास गाणं आहे.
आणि अजून एक म्हणजे 'अकेले है चले आओ' यात पण आवाजत तुडुंब वेदना आहे.
तुमचे लेख मी आवर्जून वाचते. आईबाबा जी गाणी आवडीने ऐकायचे, ती नंतर मलाही आवडायला लागली. पण ती माझ्या पिढीची नसल्याने विसमरणात गेली होती. तुमच्या लेखांमुळे ती परत आठवतात आणि परत नव्याने ऐकायला वेगळा आंनद मिळतो. खूप खूप आभार.
तुमचे लेख मी आवर्जून वाचते.
तुमचे लेख मी आवर्जून वाचते. आईबाबा जी गाणी आवडीने ऐकायचे, ती नंतर मलाही आवडायला लागली. पण ती माझ्या पिढीची नसल्याने विसमरणात गेली होती. तुमच्या लेखांमुळे ती परत आठवतात आणि परत नव्याने ऐकायला वेगळा आंनद मिळतो. खूप खूप आभार.>>>>>>>> सहमत मीरा. Same here.
भाग्यश्री१२३ , स्वाती२ , मीरा
भाग्यश्री१२३ , स्वाती२ , मीरा.. खुप खुप आभार. अनेकदा मायबोलीवर चाललेला गोंधळ पाहून दु:ख होतं. येथे लिहावे की लिहू नये असे वाटते. पण अजूनही आपल्यासारखी अनेक संयतपणे लिहिणारी, टिका केली तरी योग्य भाषा वापरणारी मंडळी येथे आहेत हे पाहून लिहायला हुरुप येतो.
मुझे दर्द-ए-दिल का पता न था,
मुझे दर्द-ए-दिल का पता न था, मुझे आप किस लिये मिल गये
मैन अकेले युंही मजे में था, मुझे आप किस लिये मिल गये........
- आकाश दीप (१९६५)
मस्त लेख! दु:खी गाणी फार आवडत
मस्त लेख! दु:खी गाणी फार आवडत नाहीत पण ह्या लेखाच्या निमित्ताने अनेक गाणी आठवली.
पत्थर के सनम गाण्यामध्ये मनोजकुमार जास्त पत्थरमॅन वाटतो. तिथे पियानोवर भारतभूषण ते सुनीलशेट्टी कोण पण चालला असता. केवळ रफीचा आवाज आहे म्हणून वहिदा "पत्थर के सनम" टाईप्स "कोल्ड हार्टेड" वाटली.
इंतकाम मधले, जो उनकी तमन्ना
इंतकाम मधले, जो उनकी तमन्ना हैं बरबाद हो जा!
अप्रतिम शब्द, मोजके संगीत आणि त्याच्या दैवी तंद्रीत गाणारा रफी.
पडद्यावर नका बघू!!
१ . ये आंसु मेरे दिल की जुबान
१ . ये आंसु मेरे दिल की जुबान है
२. कर चले हम फिदा हे रुढार्थाने 'तसं' वेदनादायी गीत नाही. पण हे गाणं ऐकताना आणि पडद्यावर पाहताना काळजात एक वेदनेची कळ नक्कीच येऊन जाते.
छान लेख व सुंदर गाण्यांची
छान लेख व सुंदर गाण्यांची आठवण, प्रतिसादांमधुन देखील. काय जीव ओतुन गात असे रफी.... अहाहाहा.......
‘नीलकमल’ मधले नुसते ‘आ जा’ हे दोन शब्दपण काय गायलेत!!!! पाहिला तेव्हा लहान वयात काहीही कळला नव्हता पण ‘आ जा ... आ जा‘ चे सुर मात्र रुतुन बसले खोलवर.
ओह! मी हेच लिहायला आलो होतो.
ओह! मी हेच लिहायला आलो होतो. रफिंची विरहगीते हा विषय असताना तुझको पुकारे मेरा प्यार चा उल्लेख खरेतर सर्वात प्रथम यायला हवा. त्यातही त्यातले ते सुरवातीचे आऽऽऽऽजा... वाह! तर थेट स्वर्गातून आल्यासारखे सूर... असे वाटते कि हे ज्यांनी ऐकले नाही त्यांनी काय ऐकले.... इतके स्वच्छ अप्रतिम नितळ सूर.
सुंदर लेख...
सुंदर लेख...
"गुजरे है आज इश्कमें हम उस मकाम से..." फारसे आवडत नाही कारण यातला हिरो अहंमन्य वाटतो. दुःखी तर आहेच पण माझ्यासारख्याला दुखवले याचे दुःख त्याला जास्त झालेय असे वाटते
मेरे दुश्मन तू मेरी... मध्ये तळतळाट आवाजात जितका जाणवतो तितकाच तो धर्मेंद्रच्या चेहऱ्यावरची दिसतो.
रफीच्या दर्दभऱ्या गाण्यांमध्ये 'मैं ये सोचकर उसके घर से उठा था' हे गाणे टॉप टेनमध्ये घ्यावेसे वाटते. यातल्या सारंगीत जास्त दर्द आहे की रफीच्या आवाजात हे कळेनासे होते.
दोनोने किया था प्यार मगर, मुझे याद रहा तू भूल गयी.. मधले अंतऱ्यातले आलाप खूप व्याकुळ करणारे आहेत.
'गम उठानेके लिये मैं तो जिये जाऊंगा' मध्ये रफी प्रियकराची दुःखी मनस्थिती जितकी दाखवतो तेवढाच त्याला होत असलेला पश्चातापही तो दाखवतो. 'मेरे दुश्मन तू मेरी' मधला प्रेयसीला दूषणे देणारा तळतळाटी स्वर इथे स्वतःवरच आसूड ओढतोय असे वाटत राहते.
'स्वप्न झरे फुल से, मित चुभे शूल से' हेही खूप आवडते, पण विषयाशी सुसंगत नाही.
एका प्रोजेक्ट वर असतानाची
एका प्रोजेक्ट वर असतानाची गोष्ट आहे. परदेशात होतो. कामाच्या ठिकाणी एका व्यक्तीची आणि माझी वेव्हलेंग्थ खास जुळत नव्हती. पण प्रोजेक्ट मध्ये तर एकत्र काम करावे लागणार होतेच. पण जिथे तिथे हा आपली एटीट्युड दाखवत होता. मला काळजीच वाटत होती. ह्याने सहकार्य केले नाही तर अवघडच होते. पण इलाज सापडत नव्हता. काही दिवसांनी एकदा मी रफींच्या गाण्यातल्या ओळी सहज गुणगुणल्या. त्याने ऐकल्या अन म्हणाला. "क्या गा रहे थे आप अभी?" थोडेसे आश्चर्य वाटुन मी रफिंचे त्या गाण्याचे शब्द सांगितले. "क्या बात है? तो आप भी रफ़ीसाहब के फ़ॅन हो?" मी हो म्हणालो. तेंव्हापासून आम्ही केवळ कामाच्या ठिकाणचे सहकारीच नव्हे तर चांगले मित्र सुद्धा झालो. रफींच्या गाण्यावर अनेकदा बोलू लागलो. तेवढा एका धाग्याने आमचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. ह्या मनुष्याने मला प्रोजेक्ट मध्ये नंतर मला अमाप सहकार्य केले. रफी साहेबांचे असेही उपकार आहेत
अरे वा अतुलपाटील, काय मस्त
अरे वा अतुलपाटील, काय मस्त आठवण लिहीलीत....
ह्या मनुष्याने मला प्रोजेक्ट
ह्या मनुष्याने मला प्रोजेक्ट मध्ये नंतर मला अमाप सहकार्य केले. रफी साहेबांचे असेही उपकार आहेत
क्या बात है अतुलजी!!! रफीसाहेबांच्या चांगुलपणाचे माणुसकीचे अनेक किस्से सांगितले जातात. पण निव्वळ त्यांचे गाणे गुणगुणल्याने झालेल्या फायद्याचा हा किस्सा अगदी वेगळाच आहे.
सर्वांचे मनापासून आभार.
रफीच्या दर्दभर्या गीतांमध्ये मला "जाने क्या ढूंढती रहती है ये आंखे मुझमें" हे शोला और शबनम " मधले गाणे घ्यावेसे वाटते. बहुधा संगीत खय्यामचे आहे. या गाण्यावर कधीतरी स्वतंत्रपणे लिहायचे आहे. इथेही धर्मेंद्रच आहे.