दु:खी प्रियकर आणि रफीचा स्वर - रफी पुण्यस्मरण

Submitted by अतुल ठाकुर on 30 July, 2019 - 20:47

rafi_0.jpg

मोहम्मद रफी...सूरांच्या या बादशहाला लौकिक शरीर सोडून आज एकोणचाळीस वर्षे झाली. बाकी तो आमच्यात आहेच. आणि त्याच्या सूरांच्या निरनिराळ्या छटांचा आनंद घेण्याचे माझे व्यसनही वर्षागणिक वाढतेच आहे. यावेळी उदास आणि दु:खी झालेला प्रियकर आणि त्याला पडद्यावर रफीने दिलेला स्वर यावर लिहायचे ठरवले. विषय ठरवताना फारसे काही वाटले नाही पण जेव्हा त्यानुसार गाण्यांचा विचार करु लागलो तेव्हा लक्षात आले की आपण एका अवघड विषयाला हात घातला आहे. सुखापेक्षा दु:ख जास्त गुंतागुंतीचे असते का? तसे असावे. कारण नुसत्या प्रेयसीने नकार दिलेला प्रियकर इतकंच या गाण्यांमध्ये दिसत नाही. काहीवेळा प्रेयसीने प्रतारणा केलेली असते. काहीवेळा सामाजिक बंधने असतात, अनेकदा "बेटीअमिर घर की" असते. अशावेळी काही जण उदास होतात. काहींच्या आवाजात हताशपण असते. काही नशीबाला दोष देतात. काही आपल्या दुर्दैवाचं खापर "बेदर्द" जमान्याच्या" डोक्यावर फोडून मोकळे होतात. काही प्रेयसीला माझे काही होवो तू सुखी रहा अशा शुभेच्छा देतात. तर काही शाप देतात. काही सूड घेण्याची भाषा करतात. अशा कितीतरी छटा या दु:खाला आहेत. आणि रफीसाहेबांचा आवाजही तसाच बदलत राहतो.

दु:ख यातनांचे गहीरे रंग सादर करताना ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार असेल तर रफीचा आवाज धारदार होताना पाहिला आहे. म्हणजे सर्वप्रथम पडद्यावर जो अभिनेता असेल त्याला साजेल असा आवाज लावायचा. त्यात दु:खाची जी छटा असेल ती गडद करायची. त्यातील शब्दांना न्याय द्यायचा आणि ते गाणं खुलवून परिपूर्ण करायचं हे शिवधनूष्य दरवेळी रफीने लिलया पेललं आहे. देव आनंदसाठी आपले हताशपण व्यक्त करताना रफीचा आवाज असा लागतो की समोर खांदे पाडून किंचित मान हलवणारा देव आनंद समोर आलाच पाहिजे. अर्थात हे सारे अतिशय प्रभावी करतात त्यात कविचा शब्दांचा आणि संगीतकाराचा मोठा वाटा असतो हे सांगणे नलगे. या तर्‍हेची गाणी निवडताना माझ्यासमोर मोठाच प्रश्न उभा राहिला. कुठल्याही गाण्याला प्राथमिकता देता येईना. सारीच एकाचढ एक सुंदर. त्यामुळे फक्त सात गाणी निवडली आहेत. आणि याहून कितीतरी जास्त रफीची तितकीच सुरेख गाणी दर्दभरी गाणी मला माहीत आहेत हेही आधीच सांगितलेले बरे. काही विशिष्ट भावनांबद्दल लिहायचे म्हणून मुद्दाम ही गाणी निवडलीत. यातील काही चित्रपट मी पाहिलेत. काही पाहिलेले नाहीत. पाहिलेल्यांपैकी काही आठवतात. काही आठवत नाहीत. पण रफीची गाणी पाहताना, त्यावर लिहिताना त्या संदर्भांची नेहेमी आवश्यकता वाटतेच असे नाही. कारण गाण्याबद्दल लिहिताना मला त्यावेळी जाणवलेला अर्थ सांगावासा वाटतो.

पहिले गाणे "गुजरे है आज इश्कमें हम उस मकाम से..." आहे. १९६६ साली आलेल्या "दिल दिया दर्द लिया" चित्रपटातील हे गाणे बहुतेक वेळा दिलिपकुमारचा अर्धा चेहरा अंधारात ठेऊन चित्रित केला आहे. वाटले कदाचित हा चित्रपट कृष्णधवल रंगात असता तर या किमयेचा परिणाम आणखी वेगळा झाला असता. शकिल बदायुनिचे काव्य ऐकले तर कळेल हा प्रियकर नुसता दुखावलेलाच नाही तर सूडही उगवण्याची शक्यता आहे. तो म्हणतो

हम वो नहीं जो प्यार में रोकर गुज़ार दें
परछाईं भी हो तेरी तो ठोकर से मार दें
वाक़िफ़ हैं हम भी ख़ूब हर एक इंतक़ाम से

रफीने "ओ बेवफा तेरा भी यूही टूट जाये दिल" म्हणताना कमाल आवाज लावला आहे. दिलिपकुमारच्या चेहर्‍यावरील दर्द आणि रफीचा आक्रोश याने प्रियकराची वेदना आणखि गडद झाली आहे.

दिलिपकुमारनंतर अनिल धवन म्हटल्यावर अनेकजण नाक मुरडण्याची शक्यता आहे. पण उषा खन्नाचे हे गाणे मला नेहेमी वेगळ्या प्रकारचे वाटते. यातला प्रियकर धाय मोकलून रडत नाही. तो संयत आहे. ठाम आहे. यानंतर मी तुझ्या आसपास दिसणार नाही असे तो सांगतो. १९७४ साली आलेल्या सावनकुमार टाकच्या "हवस" सिनेमातील या गाण्यात नितू सिंग गोड दिसली आहे. त्या काळातल्याप्रमाणे कल्ले ठेवलेला, चेहर्‍यावर फारसे भाव न दाखवणारा अनिल धवन रफीच्या दमदार आवाजामुळे सुसह्य होतो. हा प्रियकर संयत असला तरी "घिरके आयेंगी घटाये फिरसे सावन की, तुमतो बाहोंमें रहोगी अपने साजन की...गले हम गमको लगायेंगे सनम आज के बाद" म्हणून आपले दु:ख व्यक्त करतो. यातील "लगायेंगे सनम" म्हणताना रफीच्या आवाजात आता सारे काही संपल्याची भावना स्पष्ञपणे दिसते. पण येथे सूड नाही. संयम आहे. रफीने आपल्या आवाजात या भावनेचा समतोल अचूक पकडला आहे. विशेषतः दिलिपकुमारचं "गुजरे है " ऐकल्यावर हे जास्त जाणवतं.

यानंतर मला धर्मेंद्रचं " मेरे दुश्मन तू मेरी दोस्ती को तरसे" हे गाणं घ्यावंसं वाटतं. यात प्रियकराचा नुसता आक्रोशच नाही तर त्याने आपल्या प्रेयसीला तळतळून दिलेले शाप आहेत. खरं तर हे संपूर्ण गाणं म्हणजेच एक शापवाणीच आहे. प्रत्येक ओळीत तळतळाट आहेत. आनंदबक्षीला साहीरसारख्या शायराच्या पंक्तीत बसवले जात नाही. पण त्याने अतिशय अर्थपूर्ण गाणी दिली आहेत. १९६६च्या "आये दिन बहार के" मध्ये लक्ष्मीकांत प्यारेलालच्या संगीतात आनंद बक्षीने लिहिलेले शब्द होते "तेरे गुलशन से ज़्यादा, वीरान कोई विराना ना हो, इस दुनिया में कोई तेरा अपना तो क्या, बेगाना ना हो, किसी का प्यार क्या तू बेरूख़ी को तरसे...". सुटातला तरणाबांड धर्मेंद्र आणि त्याच्या चेहर्‍यावरची दबलेली चीड, वेदना, प्रतारणेचं दु:ख, आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे कटुतेची भावना आणि याला चपखल बसेल असा रफीचा आवाज. या गाण्यात ज्या आवाजात थंडपणे तो तिच्यासाठी शाप उच्चारतो असं वाटतं जालिम अ‍ॅसिडने जाळण्याआधीचा थंड स्पर्श झाला आहे. आशा पारेखने तिला या विदीर्ण करणार्‍या शब्दांमुळे होणारा त्रास चेहर्‍यावर फार सुरेख दाखवला आहे. यापुढच्या गाण्याबद्दल मी स्वतंत्र लेख लिहिला असला तरी या यादीत ते मुद्दाम घ्यावसं वाटलं.

१९६५ सालच्या "भीगी रात" मधील प्रदिपकुमारने पडद्यावर गायिलेलं "दिल जो न कह सका" हे गाणं जर दु:खी प्रियकरांच्या यादीत घेतलं नाही तर ती यादी खात्रीने अपूर्ण राहील असं मला वाटतं. यात मजरूह सुलतानपुरीसाहेब लिहितात "पियो चाहे खून-ए-दिल हो, के पीते पिलाते ही रहने की रात आई". या प्रियकर दुखावलेला तर आहेच पण प्रेयसीने पैशासाठी आपल्याला सोडले असा गैरसमजही त्याला झालेला आहे. हे येथील वेदनेचे वेगळेपण. प्रदिपकुमार म्हणजे अनिल धवन नव्हे. शिवाय समोर अशोक कुमार आणि मीनाकुमारी आहेत. त्यामुळे गाणे श्रवणीय तर आहेच पण प्रेक्षणीयही झाले आहे. रोशनने दिलेल्या या गीताच्या चालीत भावनांची तीव्रता रसिकाच्या हृदया पर्यंत पोहोचविण्याची ताकद आहे. रफीने "आज दिल की किमत जामसे भी कम है..." म्हणताना सारी हताश भावना आवाजात व्यक्त केली आहे. कशालाच काही अर्थ नाही आणि जे झालं आहे ते बदलण्याची आपल्यात ताकद नाही. ही हतबलता त्या आवाजात ते शब्द उच्चारताना दिसते. कधी कधी वाटतं कवी आणि संगीतकार दोघांनाही धन्य धन्य वाटत असेल आपल्या कलेचे या आवाजामुळे सोने झालेले ऐकताना.

दर्दभर्‍या गाण्यांबद्दल बोलताना देवआनंद नसेल तर पुढे जाता येईल का? देवसाहेबांसाठी दोन गाणी निवडली होती एक "गाईड" मधील "क्या से क्या हो गया, बेवफा तेरे प्यार में" आणि दुसरे "हम दोनो" मधील "कभी खुदपे कभी हालात पे रोना आया". गाईडचे गाणे जास्त गुंतागुंतीचे वाटले. पण हम दोनो मधल्या गाण्यातील दु:खाची छटा फार वेगळी वाटली म्हणून ते निवडले. एक प्रकारे तत्त्वज्ञानाकडे झुकलेले साहीरचे गीत. साहीर लुधियानवी असल्यावर अनेकदा ते ओघानेच आले. आणि समोर दोन देव आनंद. एक सुखी, आपल्या बायकोच्या आठवणीत रमलेला. तर दुसरा आपली कैफीयत गाण्यात मांडणारा. पण तरीही दुखावलेली भावना लपत नाही. "हम तो समझे थे के हम भूल गये है उनको, क्या हुवा आज ये किस बात पे रोना आया" म्हणत देवाआनंद आपल्या दु:खाला वाट मोकळी करून देतो. एकुणच परिस्थिती आणि माणसाच्या प्रवृत्तीवर भाष्य करणार्‍या या गीताला साज चढवला होता अगदी वेगळ्या बाजाचे संगीत देणार्‍या जयदेवने. देव आनंदच्या व्यक्तीमत्वाला खुलवेल असा रफीचा मखमली स्वर आणि त्यात मिसळलेली उदासपणाची, काहीतरी संपल्याची भावना या दोन्ही मुळे गाणे अतीशय परिणामकारक झाले आहे.

जुन्या हिन्दी चित्रपटातील नायकाची वेदना आणि पियानो वेगळे करता येत नाहीत. अनेक सुरेख गाणी ही नायकांनी पियानोवर बसून गायिलीत. १९६६ साली आलेला मनोजकुमार आणि आशा पारेखचा "दो बदन". यात रफीची तीन ग्रेट म्हणता येईल अशी दर्दभरी गाणी आहेत. एक "भरी दुनियामें आखिर दिल को समझाने कहां जाये" , दुसरं "नसीबमें जिसके जो लिखा था" आणि तिसरं "रहा गर्दिशोंमे हरदम मेरे इश्क का सितारा". या तिन्हीतलं "भरी दुनियामें " निवडलं आहे ते पियानोसाठी. येथे तिढा आहे तो "अमिर बाप की बेटी " आणि "एक मामुली नौकर" चा. प्रेयसीने प्रतारणा केलेली नाही पण "दौलत के पिछे भागनेवाली दुनिया जालिम आहे" त्याने प्रियकर दुखावाला गेला आहे. तिचा श्रीमंत पिता नायकाची आपल्या उच्चभ्रू समाजातील लोकांशी ओळख करून देताना त्याचा कमाल अपमान करतो आणि त्यातून हे वेदनेचं पुष्प उमलतं. मनोजकुमारला वेदना दाखवताना कटु हास्य करण्याची सवय आहे ती या गाण्यात ठळकपणे दिसते. रफीच्या आवाजातून ओसंडून जाते ती फक्त हतबलता. श्रीमंतांपुढे आणि त्यांच्या श्रीमंतीपुढे नायकाला आलेली हतबलता आणि त्यातच प्रेयसीवरचे प्रेम ही द्विधा मनस्थिती रफीने आवाजातून चपखल व्यक्त केली आहे. "जिन्हे जलने की हसरत है वो परवाने कहां जायें" लिहिणारा शकील बदायुनि आणि त्याला साज चढवणारा संगीतकार रवी या सोन्याला सुगंध आणला आहे रफीच्या आवाजात स्पष्टपणे डोकावणार्‍या हतबलतेमुळे.

वेदनेच्या या इंद्रधनुष्यातील सातवा रंग भरला आहे १९६३ सालच्या "दिल एक मंदिर" मधल्या "याद न जाये बीते दिनों कि" या अजरामर गाण्याने. श्रीधर यांच्या झपाटून टाकणार्‍या चित्रपटाचे गीत लिहिले आहे कवी शैलेन्द्र यांनी तर संगीत आहे शंकर जयकिशन यांचे. आठवणींमुळे उसळलेल्या वेदना हेच या गाण्याचे स्वरुप. रफीने हा वेदनेचा सारा कल्लोळ आपल्या आवाजात पकडला आहे. प्रेयसीची आठवण विसरु म्हणता विसरता येत नाहीय. "मनमें बसी ये मूरत लेकीन मिटी न मिटायें..." रफीच्या आवाजाने एखाद्या हळुवारपणे येणार्‍या आणि मोठ्या होऊन फुटणार्‍या लाटेसारखी कमाल या गाण्यात केली आहे " दिल क्युं भुलाये उन्हे" हे हळुवारपणे म्हणत एकदम टिपेला जात "दिल क्युं भूलाये" म्हणून ही लाट फुटते. या गाण्याबद्दल लिहावे तितके थोडेच आहे. गाणी अनेक आहेत आणि दु:खाच्या तर्‍हा तर असंख्यच आहेत. या सार्‍यांना आपल्या आवाजात बांधणारा एकच स्वर आहे तो म्हणजे रफी.

रफीचे पुण्यस्मरण करताना वर्षागणिक या माणसाचे आपल्यावर किती उपकार आहेत याची जाणीव जास्त तीव्र होऊ लागली आहे. जीवनाच्या धकाधकीत आवाजातील वेदनेमुळे प्रत्यक्षातील वेदना विसरायला लावणारे हे स्वर. रोजच्या धडपडीत मनाला शांत करणारे स्वर. कॅलिडोस्कोपप्रमाणे गाणे बदलताच वेदनेचा नवा पैलू दाखवणारे स्वर. रफीसाहेब तुम्ही गात रहा. आम्ही ऐकत राहु. आणि शक्य झाल्यास आमच्या तोकड्या झोळीत जे सुवर्णदान तुम्ही भरभरून केले आहे त्याबद्दल लिहित राहु...

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम मुझे यूँ भुला ना पाओगे >>
लताचं जसं 'नाम गुम जाएगा', तसं रफीचं 'तुम मुझे यूँ भुला ना पाओगे'.....

इतर तिन्ही गाणीसुद्धा अप्रतिम आहेत.
रंग और नूर की बारात मध्ये 'किसे पेश करूँ' म्हणताना रफीचा आवाज कसला चढतो!!

बाय द वे.. न किसी के आंख का ना नुर हुं …हे दु:खी प्रियकराने गायलेले गाणे नाही पण त्या शब्दात व्यक्त होणारे दु:ख ( King’s Lament) रफीने त्याच्या स्वरात इतक्या परिणामकारक गाउन दाखवले आहे ( तेही अगदी मोजक्या— मिनिमलिस्ट म्युझिकल इंस्ट्रुमेंट्सच्या साथीने) की ऐकताना अंगावर काटा उभा राहतो व ते गाणे लिहीण्यार्‍याचे शल्य आपल्यालाही बोचत राहते! गायकासाठी यापेक्षा मोठी पोचपावती कोणती! हॅट्स ऑफ टु महम्मद रफी!

'मोहब्बत जिंदा रहती है मोहब्बत मर नही सकती' रफीने या गाण्यातून अंगावर काटा आणला आहे, विशेषतः शेवटी 'चली आ' म्हणताना त्याचा आवाज टिपेला पोचतो तेव्हा.

>>>>>>> न किसी की आँख का नूर हूँ
न किसी की आँख का नूर हूँ
न किसी के दिल का क़रार हूँ
जो किसी के काम न आ सके
मैं वो एक मुश्त-ए-गुबार हूँ
न किसी की आँख का नूर हूँ (

फार आवडते गाणे आहे हे मुकुंद.
----------------------------------------------

तुम मुझे युं भूला ना पाओगे - अ विशफुल थिंकिंग बाकी होपलेस रोमँटिक लोकच मनात प्रेम जपत रहातात. अजुन कोणी कुठे जपते?

>>>>>>की ऐकताना अंगावर काटा उभा राहतो व ते गाणे लिहीण्यार्‍याचे शल्य आपल्यालाही बोचत राहते! गायकासाठी यापेक्षा मोठी पोचपावती कोणती! हॅट्स ऑफ टु महम्मद रफी!

वाह!! फार फार आवडतं हे गाणं. रडू येते.

“ दिल के झरोके मे तुझको बिठाकर, यादों को अपनी दुल्हन बनाकर“ हे एक त्याचे अजुन एक जबरदस्त गाणे जे दु:खी प्रियकर गातो आहे या कॅटेगरीत मोडता येइल असे.

(निदान मला तरी ते गाणे दु:खी प्रियकराचे आहे असे वाटते कारण शम्मी कपुर हे गाणे म्हणत असतो तेव्हा राजश्री अश्रु गाळते व प्राण तिला “ ड्युली“ त्याचा हातरुमाल डोळे पुसायला देतो… म्हणजे गाणे रोमँटिक जरी असले तरी दु:खीच म्हटले पाहीजे! Happy . पण प्लिज हे गाणे द्रुष्य स्वरुपात बघण्याचे धाडस करु नका! काय एक एक कवायतीसारखे प्रकार केलेत त्या बॉल रुम डांसर्सनी बॅगग्राउंडला.. प्रतिकात्मक डान्स करताना!)

पण हेही गाणे गाताना रफीने नेहमीसारखी जान ओतली आहे स्वरात!

कल तेरे जलवे पराये होंगे.. लेकिन झलक मेरे खाबों मे होगी .. हे म्हणताना त्याचा सुर इतका वरच्या पट्टीत जातो की विचारु नका पण लगेच त्या नंतरच्या दुसर्‍याच ओळीत फुलोंकी की डोली मे होगी तु रुख्सत, लेकिन महक मेरे साँसों में होगी असे म्हणताना परत एकदम सुर इतक्या पटकन बेस लाइनवर येतो! हे जे चढ उतार आहेत ते तो किती लिलया करतो! हा त्याच्या पट्टीचा क्रिशेंडो व परत खाली येणे यामुळे गाण्याच्या शब्दातली उत्कटता व म्हणुनच ते गाणे गाण्यार्‍या नायकाच्या भावनांची/ दु:खाची/ प्रेमाची उत्कटता/ आर्तता एकदम ऐकणार्‍याच्या ह्रुदयाला स्पर्शुन जाते!

अश्या त्याच्या गाण्यांमधल्या आवाजातल्या चढ उताराच्या प्रचंड मोट्ठ्या रेंजमुळे कॅरीओकीवर त्याची गाणी गाताना फ्या फ्या उडते!

>>>फुलोंकी की डोली मे होगी तु रुख्सत, लेकिन महक मेरे साँसों में होगी असे म्हणताना परत एकदम सुर इतक्या पटकन बेस लाइनवर येतो!
होय हे नोटिस केलेले आहे.

https://www.youtube.com/watch?v=ahBcp9168Us
पांव पडु तोरे श्याम, ब्रिज मे लौट चलो
तुम बिन कदंबकी ठंडी छईया, खोजे धून बन्सी की

हे माझे आणखी एक आवडते गाणे. व्याकुळ करते Sad

वरच्या माझ्या पोस्टमधे म्हटले तसे त्याच्या आवाजाच्या चढ उताराचे उदाहरण असलेले ( दु:खी नायकाने गायलेले) अजुन एक सुंदर दु:खी गाणे म्हणजे

ओहो हो ओ ओओ
ओहो हो
आज पुरानी SS … राहों से
कोई मुझे आवाज़ न दे
आज पुरानी SS….राहों से
कोई मुझे आवाज़ न दे
दर्द में डूबे गीत न दे
गम का सिसकता साज़ न दे
दर्द में डूबे गीत न दे
गम का सिसकता साज़ न दे
ओहो हो ओ ओ
ओहो हो
बीते दिनों की याद थी जिनमें
मैं वो तराने भूल चुका
आज नई मंज़िल है मेरी
कल के ठिकाने भूल चुका
न वो दिल न सनम न वो दीन धरम
अब दूर हूँ सारे गुनाहों से
आज पुरानी राहों से
कोई मुझे आवाज़ न दे
टूट चुके सब प्यार के बंधन
आज कोई ज़ंजीर नहीं
शीशा ए दिल में अरमानों की
आज कोई तस्वीर नहीं
अब शाद हूँ मैं आज़ाद हूँ मैं
कुछ काम नहीं है आहों से
आज पुरानी राहों से
कोई मुझे आवाज़ न दे
दर्द में डूबे गीत न दे
गम का सिसकता साज़ न दे
ओहो हो ओ ओ
ओहो हो

“आज पुरानी राहो से” असे त्या पहिल्या ओळीत एकदम वरच्या पट्टीतच तो गाणे सुरु करतो व तो जेव्हा “दर्द मे डुबे गीत न दे” असे म्हणतो तेव्हा त्याचा आवाज मुलायम झालेला असतो व पट्टी खाली गेलेली असते . त्याच्या त्या स्वरांच्या पट्टीशी लिलया खेळण्याच्या हातोटीमुळे व सहजतेमुळे तो श्रोत्यांनासुद्धा तो त्याच्या स्वरांच्या हिंदोळ्यावर वर खाली झोके घ्यायला लावतो! मग त्या त्याच्या स्वरांच्या हिंदोळ्या बरोबर आपण श्रोते नायकाच्या दु:खाच्या इमोशन्सशी नकळत एकरुप होउन जातो! ही मोहम्मद रफीच्या आवाजाची खरी जादु आहे असे मला वाटते!

फुलोंकी की डोली मे होगी तु रुख्सत, लेकिन महक मेरे साँसों में होगी
>>>
हम्म
रफीची गाणी ऐकताना सिंपल वाटतात. आणि इतर कुणीही ती गायचा प्रयत्न केला की ती फ्लॅट होतात. तेव्हा कळतं रफी क्या चीज है.

अतुल ठाकुर, वर "हम दोनो"तल्या "कभी खुद पे.." गाणं आलं आहे, परंतु "अभी ना जाओ.." नाहि. या गाण्याला थोडि वैफल्याची झालर असुन देखील; अशी तक्रार इथे नोंदवतो.. Happy या गाण्याला योग्य न्याय देण्याकरता कदाचित एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल, तसं असल्यास त्या लेखाची वाट पहातो..

देवसाबचं चिरतरुण गाणं. गीत, संगीत, पार्श्वगायन, अभिनय, चित्रीकरण सगळ्यात अव्वल. रफिसाहेबांनी "नशे के घुंट.."ला घेतलेली हरकत, आणि आशाताईंनी "बस अब न मुझको टोकना"ला दिलेलं कंपन, सिंपली मार्वलस..

आपल्या नकळत तीने निघुन जाउ नये म्हणुन वेणीला बांधलेली रिबन सोडवत होणार्‍या सुरुवातीने गाण्याचं स्टेज सेट केलं आहे असं म्हणणं वावगं ठरु नये...

अभी ना जाओ मस्तच आहे. सुंदर गाणं, उत्तम व देखणे कलाकार, तेवढीच उत्कृष्ट गायकी असं रेअर कॉंबिनेशन आहे. पण सॅड कुठेय? लाडिक आर्जव आहे.

Pages