तिवरे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील धरण दोन जुलैला रात्री साडेनऊ वाजता फुटले आणि धरणाच्या खालच्या बाजूला वसलेल्या गावांमध्ये हाहाकार उडाला. धरण बांधताना वापरलेल्या सिमेंट, लोखंड, दगड, माती इत्यादी दृश्य घटकांबरोबरच त्यामध्ये मिसळलेल्या शासकीय आणि प्रशासकीय अनास्था, निष्काळजीपणा आणि बेफिकिरी ह्या अदृश्य घटकांचे दर्शनदेखील सर्वांना झाले. पाठोपाठ तिवरे धरणाच्या पावलावर पाऊल टाकून आणखी किती धरणांची वाटचाल चालू आहे त्याची यादीदेखील प्रसिध्द झाली. काही प्रतिक्षिप्त घोषणादेखील ताबडतोब झाल्या. प्रसारमाध्यमांनी अमावस्या, खग्रास सूर्यग्रहण इत्यादी गूढ धाग्यांनी विणलेला पातळसर का होईना पण एक संरक्षित पडदा संबंधित दोषींच्या सभोवताली गुंडाळला आणि वाहून गेलेल्यांच्या मागे उरलेल्यांचे दुःख कमी करण्याचे पुण्यकर्म पार पाडले. जलसंधारण मंत्र्यांनीदेखील त्यांच्यापरीने त्याचा कार्यकारण भाव शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु लोकांना तो त्यांच्या ठायी असलेल्या काळ्या विनोदबुद्धीचा (ब्लॅक ह्युमर) आविष्कार वाटला. पण म्हणून धरणे बांधणे अयोग्य आहे, असे म्हणणे योग्य ठरेल काय ? तर निश्चितच नाही.
परंतु अशी छोटी छोटी धरणं म्हणजे - जमिनीची उपलब्धता, त्यांचा बांधकामाचा खर्च, त्यामध्ये राहणारे तांत्रिक दोष, बांधकाम पूर्ण झाल्यावर निकाली निघणारी सदोष धरणं, बांधकामासाठीचा कालावधी, त्यांची मर्यादित उपयुक्तता, त्यामधील पाणी वापरात आणण्यासाठी राबवावी लागणारी खर्चिक यंत्रणा आणि मोठ्या प्रमाणावर खर्च होणारी वीजऊर्जा, ती यंत्रणा आणि धरण यांच्या निगराणीसाठीचा खर्च, त्यासाठी पोसावी लागणारी यंत्रणा आणि होणारा प्रचंड निष्फळ खर्च, उध्वस्त झालेले विस्थापित, त्यांचे कथित पुनर्वसन आणि त्यासाठी होणारा खर्च आणि सर्वात शेवटी एव्हढे सर्व करूनही पदरात पडणारं तिवरे धरणासारखं एखादं अपयश आणि मनामध्ये भीती बसवणारी त्याच्यापुढेच रांगेत असणारी इतर गळकी आणि उपेक्षित धरणांची यादी, हे सगळं म्हणजे आंधळं दळतंय आणि ....... ह्या म्हणीचा प्रत्यय देणारी वस्तुस्थिती. पाण्याची उपलब्धता ह्या मानवी गरजेतून निर्माण झालेली. ह्या सर्व पार्श्वभूमीवर पाण्याची उपलब्धता कोणत्या मार्गाने व्हायला हवी याचा पुनर्विचार किंवा पुनरावलोकन होणे गरजेचे आहे. आपण सर्वांनीच त्यासाठी पर्यायी विचारांचा शोध घ्यायला हवा.
महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत असंख्य धरणे बांधली गेली आणि त्यावर प्रचंड पैसा खर्च केला गेला. काही धरणे मोठ्या प्रमाणावर खर्च होऊनही अर्धवटच राहिली, आणि काही पूर्ण होऊनही त्यांच्या संलग्न व्यवस्था (कालवे इ.) अपूर्ण किंवा सदोष राहिल्याने त्या धरणांची कार्यक्षमता कायमच प्रश्नांकित राहिली. ह्या धरणांनी राज्यात काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला असला तरी ती बांधण्याचा दुसरा मुख्य सिंचनाचा उद्देश आजच्या घडीला तरी बहुतांशी असफल झालेला दिसत आहे. ह्या धरणांमुळे सिंचनाखाली आलेल्या एकूण क्षेत्राची आकडेवारी देण्यास ह्या प्रश्नावर गोंधळ घालणाऱ्या आणि गोंधळात पडणाऱ्या अशा दोन्ही सरकारांना संधी मिळूनही पूर्णपणे अपयश आले आहे.
शेतीसिंचनासाठी आजच्या घडीला राज्यातला शेतकरी हा पूर्णपणे पावसावर आणि कुपनलिकांवर अवलंबून आहे हे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. शेतीसाठी अधिकाधिक खोल जाणाऱ्या कुपनलिकांमधून अमर्याद पाण्याचा उपसा होत आहे, हे आजचे चित्र आहे. त्याचाच परिणाम म्हणून एकूणच जमिनीतील पाण्याची पातळी चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. "चिंताजनक पातळी" असे म्हणणे म्हणजे अद्यापही स्वतःला फसवत राहण्यासारखेच आहे. पृथ्वीच्या पोटातले पाणी संपले आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी आपण ह्या हजार हजार फूट खोल जाऊन जमिनीच्या पोटातील पाणी अमर्याद उपसणाऱ्या कुपनलिकांना जबाबदार ठरवत आहोत. पाण्याच्या दुर्भिक्षाची जबाबदारी जेव्हा एकीकडे आपण ह्या कुपनलिकांवर टाकतो तेव्हा दुसरीकडे नकळतपणे आपण धरणांच्या अपयशावर शिक्कामोर्तब करत असतो. जर आपण आपल्या पिण्याच्या पाण्याच्या आणि सिंचनाच्या दोन्ही गरजा जर बहुतांशी जमिनीच्या पोटातील पाण्याने भागवत असू तर जमिनीच्या वर धरणे बांधण्याचा खर्चिक मार्ग सर्रासपणे अवलंबणे योग्य आहे का, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. पाणी वापरायचं जमिनीच्या पोटातलं आणि ते अनाठायी खर्च करून साठवायचं मात्र जमिनीच्या वर हा अव्यापारेशु व्यापार तर ठरत नाही ना, याचे पुनरावलोकन होणे गरजेचे आहे. 'जिथलं पाणी वापरायचं तिथंच साठवायचं ' ह्या पर्यायाचा विचार सामान्य माणसांसह सर्वांनीच गांभीर्याने करणे आवश्यक आहे. भूगर्भातील हे पाण्याचे साठे म्हणजे "जमिनीखालची धरणेच" आहेत, जी आपण वर्षानुवर्षे अमानुषपणे केवळ उपसतच आलो आहोत. ही "जमिनीखालची धरणे" निसर्गदत्त आहेत. आजतागायत एकही पैसा खर्च न होता त्यांनी आपल्याला सेवा दिली आहे आणि मानवी हस्तक्षेपविरहित सर्वोच्चतम दर्जाची कार्यक्षमता दाखवली आहे. शिवाय ह्या "जमिनीखालच्या धरणांनी" सर्वसामान्य लोकांसाठी नेहमीच एक सहजसाध्य, सर्वसमावेशक, सक्षम आणि स्वावलंबी मार्ग दाखवला आहे.
आता ही "जमिनीखालची धरणे" भरण्यासाठी प्राधान्यक्रम देण्याची वेळ आली आहे. आपण सर्वांनीच ही धरणे पुन्हा प्रयत्नपूर्वक भरण्यावर आपले लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे. ह्या जमिनीखालच्या धरणांनी आपल्याला हजारो वर्षे जगवलं आहे. परंतु काळाप्रमाणे बदलत गेलेल्या आपल्या "निसर्गपरास्त" (निसर्गविरोधी) जीवनशैलीने ती धरणं पुन्हा भरण्याची साधनं कमी कमी होत गेली आहेत आणि त्यांना ओरबडण्याचे प्रमाण मात्र प्रचंड वाढलं आहे. आपल्या ह्या स्वार्थी, अविचारी आणि अदूरदर्शी प्रवृत्तीचे परिणाम म्हणून आजच्या घडीला जमिनीवरची आणि जमिनीखालची अशी दोन्ही प्रकारची धरणं कोरडी पडल्याचे आपल्याला आढळतं. ती ह्या क्षणापासून प्रयत्नपूर्वक भरायला सुरवात केली पाहिजे. अन्यथा पाण्याशिवायच्या आपल्या भवितव्याचे चित्र आपल्या सगळ्यांनाच स्पष्ट आहे.
जमिनीच्या वर असलेल्या धरणांचा विषय आपल्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. परंतु वारसाहक्काने आपल्याला मिळालेली ही निसर्गदत्त जमिनीखालची धरणे पुन्हा एकदा पाण्याने समृद्ध करणे हे केवळ आणि केवळ आपल्यासारख्या सामान्य माणसांच्याच हातात आहे. तेसुद्धा कुणाचीही मदत न घेता आणि अगदीच अल्पशा खर्चात. छोट्या छोट्या गोष्टींमधून अविश्वसनीय अशा भव्य दिव्य गोष्टी निर्माण करणे हीच तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाची ताकद आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने जर एक छोटीशी, सहजसाध्य आणि अल्पखर्चीक अशी गोष्ट सजगपणे आणि जाणीवपूर्वक केली तर आपण सर्वजण ही रिकामी झालेली जमिनीखालची धरणं पूर्वीसारखीच पाण्याने समृध्द करू शकतो आणि आपले पाण्याचे दुर्भिक्ष कायमसाठी संपवू शकतो.
"पाण्याचे कारखाने"
ही जमिनीखालची धरणं जर आपल्याला पुन्हा पाण्याने समृद्ध करायची असतील तर त्यासाठी "जमिनीचे पुनर्भरण" हाच एक कुणालाही सहजपणे करता येईल असा सर्वोत्तम आणि सोपा मार्ग उपलब्ध आहे. शेती करण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे जमिनीमध्ये नैसर्गिकपणे जिरण्याचे पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बंद पडलेली शेती, जंगलतोड, होणारी विकासकामे इत्यादी गोष्टींमुळे पावसाळ्यात आकाशातून जमिनीवर पडलेल्या पाण्याचा वाहून जाण्याचा वेग खूपच वाढला आहे. पाण्याला आपण जीवन म्हणतो. पाण्याचे हे जीवनस्वरूप आकाशातील पाणी जमिनीवर पडून ते समुद्राला मिळेपर्यंतच्या कालावधीपूरतेच मर्यादित असते. हा कालावधी हेच "पाण्याचे आयुष्य" असते. सध्याच्या काळात ह्या कालावधीमध्ये पाण्याला अडवून ते जमिनीमध्ये जीरवणाऱ्या घटकांची (शेती, झाडं, जंगलं, पाळे, मूळे इत्यादी) संख्या कमी झाल्यामुळे जे पाणी थांबत थांबत ( जिरत जिरत ) वहायचे ते जलदगतीने वाहू लागले आहे. साहजिकच वाहत जाऊन समुद्राला मिळण्यापर्यंतचा त्याचा कालावधी कमी झाला आहे. पर्यायाने "पाण्याचे आयुष्य" कमी झाले आहे. ज्याला आपण जीवन म्हणतो त्या जीवनाचेच जीवनमान कमी झाले आहे. पाण्याचे आयुष्य जर आपल्याला वाढवायचे असेल तर पाण्याचा समुद्रापर्यंतचा हा प्रवास थांबवला पाहिजे किंवा किमान लांबवला पाहिजे. पावलापावलावर जमीन पुनर्भरणाची साधने उभी राहिली, आपण ती निश्चयपूर्वक निर्माण केली तर ते अजिबात अशक्य नाही.
आपल्यापैकी प्रत्येकाचे घर किंवा आजूबाजूची प्रत्येक इमारत म्हणजे लहान मोठ्या आकाराचा आणि कमी अधिक क्षमतेचा "पाण्याचा कारखाना" आहे याची जाणीव प्रत्येकाने स्वतःला करून द्यायला हवी. कोकणात वर्षभरात सरासरी ३५०० मिमी (३५० सें. मी) पाऊस पडतो. १००० चौ. फू. क्षेत्रामध्ये ३५० सें. मी. पाऊस पडला तर साडेतीन लाख लिटर पाणी जमिनीवर पडून वाहून जाते. १००० चौ. फू. च्या घरामध्ये राहणाऱ्या पाच माणसांच्या कुटुंबाला वर्षभरात सुमारे एक लाख लिटर पाणी लागते, जे निसर्गाकडून आपण घेतो. कोकणातले तेच घर वर्षभरात छपरावर पडणारे साडेतीन लाख लिटर पाणी जमिनीवर पडून वाहू देते. निसर्गाकडून घेतलेले पाणी ते घर अडीचपटीने निसर्गाला परत करू शकते. आपल्या घराची पागोळी वाचवून फक्त घराशेजारी तयार केलेल्या खड्ड्यात सोडण्याएव्हढी ही सोपी गोष्ट आहे. इतर कोणत्याही बाबतीत परतफेडीची अशी संधी निसर्ग आपल्याला देत नाही. तेव्हा निसर्गाचे अंशतःतरी उतराई होण्याची ही संधी आपण साधायला हवी.
नमुनादाखल माझ्या गिम्हवणे ( ता. दापोली, जि. रत्नागिरी ) गावाचे उदाहरण घेऊ. म्हणजे आपण नेमकं काय करतो आहोत ते लक्षात येईल.
गावाची लोकसंख्या ५०२५ इतकी आहे. दरवर्षी माणशी २०००० लिटर ह्या हिशोबाने गावाची पाण्याची गरज दहा कोटी पाच लाख लिटर आहे. गावाचे क्षेत्रफळ ८.०६ चौ. कि. मीटर म्हणजे ऐंशी लाख चौरस मीटर आहे. ३५० सें. मी. च्या हिशोबाने माझ्या गावावर निसर्ग वर्षभरात एकूण तीन हजार बारा कोटी ऐंशी लाख लिटर पाण्याचा वर्षाव करतो. गावात पडणाऱ्या पावसाच्या एकूण पाण्याच्या केवळ अर्धा टक्का पाणी ही माझ्या गावाची गरज आहे. तरीदेखील माझ्या गावात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. तुम्हीदेखील तुमच्या घराचे, आवाराचे आणि एकूणच गावाचे गणित मांडा आणि निसर्ग आपल्याला किती पाणी उपलब्ध करून देतो ते पहा, आणि तरीदेखील तुमच्या गावामध्ये जर पाण्याचे दुर्भिक्ष असेल तर त्याचे तुम्हाला मिळालेले उत्तर एकच असेल, "केवळ पाणी न जिरवल्यामुळे !"
सुनील प्रसादे.
दापोली.
8554883272.
दि. १० जुलै २०१९.
( चुकभुल द्यावी घ्यावी)
----------------------------------------
आम्ही सुरू केलेल्या "पागोळी वाचवा अभियानाला" राज्यभरातील वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. पाणी ह्या विषयाबाबत लोकांची मने आत्यंतिक संवेदनशील असल्याचीच ती ग्वाही आहे. अनेकांनी अशाप्रकारचे काम पूर्वीच केले असल्याचे सांगितले, तर अनेकांनी ते करण्याबाबत क्रियाशील उत्सुकता दाखवली. सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या अभियानाने लोकांच्या मनातील तळमळीला वाट दाखवली आणि कृती करण्यासाठी उद्युक्त केले. तुम्हीदेखील तुमच्या मनाची संवेदना हरवू देऊ नका. "पागोळी वाचवा अभियान" बद्दलची माहिती आणि व्हिडीओ कुणाला मिळाला नसेल किंवा अधिक माहिती कुणा इच्छुकाला हवी असल्यास ८५५४८८३२७२ ह्या व्हाट्सअप्प नंबरवर स्वतःचे संपूर्ण नाव, गाव, आणि जिल्हा ही माहिती पाठवली तर सदर माहिती निश्चितपणे पाठवली जाईल.
"आज जे पाणी पेराल ते पुढच्या उन्हाळ्यात निश्चितपणे उगवलेलं दिसेल."
सुनील प्रसादे.
८५५४८८३२७२
अधिक माहिती- https://www.facebook.com/profile.php?id=100001449118448
#RainwaterHarvesting
#PagoliWachawaAbhiyan
लेख आवडला.पुढच्या पावसाळ्यात
लेख आवडला.पुढच्या पावसाळ्यात हा प्रयत्न नक्की.
लेख आवडला, पाण्याचे पुनर्भरण
लेख आवडला, पाण्याचे पुनर्भरण खरोखरच गरजेचे आहे. सगळीकडे फरसबंदी केल्यामुळे शहर भागात जास्ती गरजेचे आहे
लेख आवडला. अजून माहिती
लेख आवडला. अजून माहिती घ्यायला आवडेल.
काही शंकां आहेत. त्यांचेही निरसन व्हावे ही अपेक्षा आहे.
माहितीपूर्ण लेख. छोट्या
माहितीपूर्ण लेख. छोट्या प्रमाणावर जिथे जिथे शक्य तिथे तुम्ही सुचवलेल्या ' पागोळ्यातून खड्ड्यात' या सुचनेच पालन करण्यात येईल.
हा लेख अजून वाचला का गेला नाहीए? यावर तर भरभरून प्रतिसाद यायला हवे होते. विषयच तसा अतिमहत्त्वाचा आहे.
लेख आवडला. अजून माहिती
लेख आवडला. अजून माहिती घ्यायला आवडेल.
काही शंकां आहेत. त्यांचेही निरसन व्हावे ही अपेक्षा आहे. >>> +999
लेख आवडला.
लेख आवडला.
प्रॉब्लेम देफिने जेलात आता
प्रॉब्लेम देफिने जेलात आता कशी भरायची कोणी भरायची खर्च कोण करणार हे पण सांगा नाहीतर बोलाचा कधी बोलाचाच भात जेविनिया तृप्त कोण झाला असे होईल
छान लेख!
छान लेख!
माझी आई रहाते त्या सोसायटीत पाण्याचे पुनर्भरण करतात. त्याशिवाय एक चौक फरशी न घालता नुसता मातीचा ठेवलाय. पावसाळ्यात या चौकातले पाणी ही वाहून न जाता जमिनीत जिरते. पावसाळ्याव्यतिरिक्त इतर वेळी चौकात मुलांना खेळता येते.
लेख आवडला, ज्वलंत विषय आहे
लेख आवडला, ज्वलंत विषय आहे आणि विचार करायला लावतो.
पाण्याचा उपसा दिवसें दिवस वाढत आहे, कमी झालेला पाण्याचा साठा त्या प्रमाणात replenish किंवा restore होत नाही आणि पाण्याची पातळी कमी होत आहे. जोडीला सिमेंट काँक्रिटच्या जंगलात ( बांधकाम, घरे, डांबरी रस्ते) जमिनीमधे पाणी जिरण्याचे क्षेत्रफळ कमी झाले.
पाणी शोषणारे रस्ते (permable roads/ pavement) थोडे वाचले होते. जर रस्त्यांनी "काही प्रमाणात" पाणी शोषले तर प्रश्न सुटणार नसला तरी थोडी मदत मिळेल.
आपल्याला आपल्या काही सवयी बदलाव्या लागतील. माझा सोबती दाढी किंवा ब्रश करतांना १० मिनीटे पाण्याची तोटी / नळ सतत सुरुच ठेवायचा. का ? २ -३ L मधे होणारे पाण्याचे कामासाठी 'सतत' नळ सुरु का हवा.
स्त्युत्य उपक्रम.
स्त्युत्य उपक्रम.
मला पडलेले काही प्रश्न:
जमीनीतील पाण्याचा साठा हा बरेचदा दुरवर पसलेल्या प्रवाहांच्या रुपात असतो. अनेकदा लहान मोठी गावे या जमिनीखालून वहाणाऱ्या प्रवाहाच्या वरच वसवलेली असतात. हे प्रवाह शक्यतो बदलत नाहीत. जमिनीत कोणत्या ना कोणत्या पध्दतिने पाणी मुरवले तर ते प्रवाहाने पुढे जाते किंवा गावातीलच विहिरी कुपनलिका यांमधे येते. समजा माझ्या गावातील जिरवलेल्या पाण्याने शेजारील गावाला जास्त फायदा होत असेल तर आम्ही का हे जलभरण करत रहायचे? शेजारील गावातले काहीही न करता पाण्याचा उपभोग घेणार आणि आम्ही त्यासाठी दर पावसाळ्यात पाणी जिरवायचे. यावर उपाय म्हणजे सगळ्यांनीच पाणी जिरवायला पाहीजे. पण तसे होताना दिसत नाही.
<< यावर उपाय म्हणजे
<< यावर उपाय म्हणजे सगळ्यांनीच पाणी जिरवायला पाहीजे. पण तसे होताना दिसत नाही.>>
-------- प्रयत्न सर्वांनीच करायला हवेत कारण परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार (लागत) आहेत.
समजा माझ्या गावातील
समजा माझ्या गावातील जिरवलेल्या पाण्याने शेजारील गावाला जास्त फायदा होत असेल तर आम्ही का हे जलभरण करत रहायचे?
>>> असा प्रश्न पडणे मानवी वृत्तीला अनुसरून आहे पण 'I am because we are' हे जेव्हा कळेल तेव्हा असे प्रश्न पडणे बंद होईल.
तो खरा सुदिन.
त्याची सुरुवात थोड्या प्रमाणावर का होईना झाली आहे. पाणी फाऊंडेशन च्या 'पाणी कप' स्पर्धेमधे भाग घेण्याकरता ग्रामस्थ एकत्र येत आहेत. त्यात अनेक शहरवासीय आपापला खारीचा वाटा उचलत आहेत, त्यांच्या प्रयत्नांना गावकरी दाद आणि प्रोत्साहन देत आहेत हे दृश्य नक्कीच आश्वस्त करणारे आणि सकारात्मकता पसरवणारे आहे.
नुसते प्रश्न आणि शंका उपस्थित करून काहीच होत नाही गांधीजी म्हणत त्या प्रमाणे करके देखो करून पहाय ची वेळ आलेली आहे. कदाचित एखादा मार्ग / कामाची पद्धत चुकेल पण त्यातूनही नवीन काहीतरी शिकायलाही नक्कीच मिळेल.
हर्पेन तुमचा काहीतरी गैरसमज
हर्पेन तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. पण जेंव्हा तुम्ही तुमच्या खिशाला, शरीराला तोशिस देवून असे एखादे काम करता, विषेश म्हणजे त्याचा तुम्हाला काहीही उपयोग नाही हे माहित असतानाही करता त्यावेळी दुसऱ्यानेही थोडा हातभार लावावा ही अपेक्षा करणारच.
आमच्या गावातून डोंगराजवळून एक ओढा जातो. त्याला पावसाळ्यातच चार महिने मुबलक पाणी असते. पुढे जावून तो ओढा एका लहान तळ्यात बदलतो. मधे छोटी टेकडी आहे. पलिकडच्या बाजुने दुसऱ्या गावचा एक ओढा U आकारात गेला आहे. त्या गावाची हद्दही वेगळी आहे. आम्ही गावकऱ्यांनी एकत्र येत वर्गणी काढून काही लाख जमवले व तळ्यातील पाणी पलिकडील ओढ्यात पडेल असे पंपींग स्टेशन उभारले. चार महिने हे पंप चालतात. त्यांच्या ओढ्याचे पाणी वाढल्याने शेतातल्या विहिरींना, कुपनलिकांना मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. पण ती लोक अजिबात सहकार्य करत नाहीत. पंपींग स्टेशनचा देखभालीचाही खर्च उचलत नाहीत. गेले कैक वर्ष आमची ग्रामपंचायत हा खर्च उचलत आहे. त्याचा आम्हाला काहीही फायदा होत नाही. अशा वेळेस काय करायला हवे?
शाली,आम्ही गावकऱ्यांनी एकत्र
शाली,
आम्ही गावकऱ्यांनी एकत्र येत वर्गणी काढून काही लाख जमवले व तळ्यातील पाणी पलिकडील ओढ्यात पडेल असे पंपींग स्टेशन उभारले.
हे मुळात कशाकरता केले हे कळू शकेल का?
तुमच्या वरच्या अंगाला असलेल्या लोकांनी अशी कामे केली तर तुमच्या गावाला त्याचा फायदा होईल ना! असे नसेल तर आणि असेल तरीही हा स्वतंत्र विषय होईल. आपण एखादी गोष्ट / मुद्दा तत्वतः म्हणून चर्चिला जात असताना बहुसंख्य वेळेस काय होते हेच पाहतो त्यावेळी अशी एखादी विरळा बाब / नियमाला अपवाद हा असायचाच.
तुम्ही दिलेल्या माहितीनुसार मी म्हणेन तुम्ही चांगले काम करताय करत रहा. चांगल्या कामाला पावती मिळाली तरच ते केले गेलेले असते असे नव्हे.
वरच्या अंगाला राहणारी माणसे जे काही जलप्रदुषण करतात त्याची भरपाई कशाने ही भरून न येणारी. त्यामुळे वरच्या अंगाच्या लोकांनी खालच्या अंगाच्या लोकांकरता पाणी जमीनीत जिरवणे हे खरेतर त्यांचे कर्तव्यच म्हणावे लागेल.
आता पुण्यासारख्या शहराचे उदाहरण घेऊन बोलायचे झाले तर पुण्याच्या वरच्या अंगाला भौगोलिक परिस्थिती अशी आहे की (डोंगराळ भाग वगैरे) पाऊस पडतोच पण पुण्याला पाणी पुरवणार्या धरणांमधून पाणी उसंडून वाहू लागले तरच ते नदी मार्गे पुढे जाते. पुण्यात पडलेला पाऊस न जिरवला गेला तर ते पाणी पावसाळ्यात नदीमार्गे वाहून उजनी वगैरे भरल्यावर तिकडूनही वाहूनच जाते. तेच पाणी जिरवले असता भुगर्भातील पाण्याची पातळी वाढते आणि ते पाणी पावसाळा संपल्यावरही वापरात येऊ शकते. जमीनीतल्या पाण्यातले प्रदुषणाचे प्रमाण ही नदीच्या पाण्यातल्या प्रदुषणाहून कमी असावे बहुतेक.
आमच्या आणि पलिकडील गावातल्या
आमच्या आणि पलिकडील गावातल्या भुजलपातळीत आश्चर्यकारक फरक आहे. आम्ही अलिकडील ओढ्याचे पाणी चार महिने पंपींग करुन त्यांच्या ओढ्यात सोडतो. त्यामुळे त्यांचे पाण्याचे दुर्भिक्ष कमी होते. हा उपाय पुण्यावरुन तज्ञाची टिम आली होती, त्यांनी सुचवला. आता त्या प्रोजेक्टची फारशी गरज राहीली नाही कारण मध्यंतरीच्या काळात मोठा कॅनॉल त्या भागातून गेला. उदाहरण यासाठी दिले की आपला तालूका, आपला जिल्हा असे म्हणून केले तरच हे काम होऊ शकेल. पण काही गावे सहकार्य करत नाही. माणसांप्रमाणे गावांचीही वृत्ती असते.
सहकार्यावरुन एक असाच आमच्या गावातील किस्सा आठवला. आमच्या गावी दोन शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत. दोन्हींमधे दोन किमी अंतर असेल. दोन्ही विहिरींना पाणी कमी आहे. दोघांचेही द्राक्षाचे मळे आहेत. पाण्यासाठी एका शेतकऱ्याने लाखो खर्चून दुरहून पाईपलाईन करुन विहिरीत पाणी सोडले. पण लवकरच लक्षात आले की त्याने विहिरीत पाणी सोडले की अगोदर दुसऱ्या शेतकऱ्याची विहिर अर्धी भरते मग त्याची भरायला सुरवात होते. म्हणजे एकच धार दोन्ही विहिरींना जोडत होती. यावर उपाय म्हणून दोघांनी चर्चा केली. आता दोघेही होणारा खर्च अर्धा अर्धा वाटून घेतात.