माझं गाव

Submitted by परत चक्रम माणूस on 19 July, 2019 - 06:04

माझं गाव .. माझं गाव एक छोटंसं खेडेगाव होतं माझ्या लहानपणी. ओढ्याच्या कडेला एका बाजूला वसलेलं. मोठे पटांगण. मोठमोठी साताठ वडाची झाडं उभी फेर धरून. जटा दाढी जणू जमिनीपर्यंत पोहोचलेले ऋषिमुनीच जणू. मोठं हनुमानाचं देऊळ, देवळाला छानसे जोते. त्यावर चुनेगच्चीचा मंडप. दिवस भर अनेक घडामोडी इथं घडत. ऐंशी वर्षांच्या म्हाताऱ्यांपासून ते कळू लागलेली पोरं यांचा रमीचा डाव चाले. एका बाजूला आबा न्हाई आपली हजामतीची पेटी घेऊन कोपरा आवतून दुकान मांडून बसलेला. आबा न्हायाच्या हातात कितीबी रडक्या पोराचं डोकं सापडलं की डाव्या हाताने जबरदस्त पकड करीत उजव्या हाताने वस्तऱ्याने रक्त निघस्तवर तासून काढीत असे. कुठून कधी आलेला गांधीबाबा मंदिरात आम्हाला थांबू देत नसे. कमालीचा स्वच्छताप्रेमी होता. मंदिर झाडून लख्ख करायचा, शेणानं सारवून अगदी प्रसन्न वाटायचं आत. खांबांना पकडापकडी खेळणं आम्हाला खूपच आवडायचं पण गांधी बाबाला अजिबात आवडायचं नाही. तो माधुकरी मागायला आमच्या आळीत आला की आम्ही लपून त्याला बोळक्या असे चिडवायचो पण तो एवढा चिडायचा नाही. मारवाडी होता , आजन्म अविवाहित राहून मारुतीची सेवा केली. गावानं गांधीबाबाला काही कमी पडू दिले नाही. शेजारीच महादेवाचं मंदिर होतं . मंदिरावर वाघ सिंह यांच्या मुर्ती होत्या त्यांचं खूप आकर्षण वाटायचे. महादेवाच्या मंदिराला भला थोरला दगडी पार बांधलेला होता. दगडी फरशी वर बसायला, झोपायला दुपारची वेळ मस्त. वर गार वडाची सावली. वडावर कावळ्यांची शाळा भरायची खाली आमची शाळा. बाजूला ओढ्याचं नितळ पाणी झुळझुळ वाहतंय इकडे गुरूजींच्या मागे मोठमोठ्या आवाजात पाढे म्हणणं चालू. सगळं वातावरण शांत भुल पाडणारं . मंदिराच्या समोर दूर बारव. पाणी भरणाऱ्या स्रियांचा आवाज चाललेला. लोखंडी चाकांचा पाणी ओढताना होणारा कु..कू आवाज.
वरच्या आळीला वसनचं हाटेल. चहाचे राऊंड चाललेले. एवढी लोकं सकाळी घरी चहा न पिता इथंच चहा प्यायला जमायची. गप्पांचा आवाज नुसता गलका, स्टोवचा आवाज गरम चहाचा वास. वेगळीच नशा यायची पण लहान पोरांना चहा माहितच नव्हता. शेजारीच वसनचंच किराणा दुकान. राकेलबी त्याच्याकडंच मिळायचं‌. राकेलचा वास. बाहेर मिठाची गोणी. आपणच आठव्यानं मोजून घ्यायचं. मला अगोदर दे. मला अगोदर दे . गिर्हाइकांची घाई.
तिथून पुढे तार कंपाऊंड केलेलं, दगडी खांबाला लोखंडी गेट बसवलेलं टुमदार कौलारू ग्रामपंचायत कार्यालय. तिथंच विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चं हापिस. कोणीही विचारायचे हापिस उघडं हाये का रे.
ग्रामपंचायतीला लागून आमची मराठी शाळा. सातवीपर्यंत. पुढे मोठं पटांगण. कडेने झाडं लावलेली. वर्ग झाडणं, सारवणं, झाडांना पाणी घालणं सगळं मनापासून आम्ही मुलंच करायचो. गुरुजी, बाई तालुक्याच्या गावावरून सायकलवर यायच्या, ते दिसले की सायकल, पिशवी घ्यायला पोरं पळत सुटायची आणि हेच गुरूजी,बाई वर्गात शिक्षा करताना फोडून काढीत. शाळा भरायच्या अगोदर घंटा बाहेर आणून अडकवायची आन् टाण..टाण अर्धा तास वाजवायची.पोरांना फार मजा वाटायची. एक दोन टोले मारायला मिळाले तर फार खूषी वाटायची. वर्ग कमी असल्याने प्रार्थना झाल्यावर काही वर्ग रांगेत मारूती मंदिरात, महादेवाच्या पारावर जात.

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

शशिकांत सातपुते
22 July, 2019 - 10:30
विनंती ला मान देत नाही म्हणजेच चिवट पणा.

शशिकांत सातपुते
22 July, 2019 - 06:31
चिवट कृपया माझ्या धाग्यावर न लिहाल तर मी आपला आभारी राहीन. धन्यवाद.

Comment by चिवट
मी मायबोलीवर प्रसिद्ध झालेल्या धाग्यावर लिहितो. आपली विनंती मला अमान्य आहे, क्षमस्व

छान वर्णन आहे.
गाव म्हणजे प्रत्येकाच्या मनातला एक ओला,हळवा कोपरा असतो.

भाऊ तुम्ही एक गाणं म्हणा चिवटा चिवटा लपलास का, दडून कुठे बसलास का? मायबोलीवर नाही बंदी, चुकवू नकोस संधी.

भारी आहे. वाट पाहतो उद्या पर्यंत. नाही तर वाट लावू. त्यात काय एवढं विचार करून डोक्याला ताप करून घ्यायचा.

हो. सिलेब्रेशन करू.
माझ्या गावाचा लेख कसा वाटला .‌कृपया सांगा.

सुंदर वर्णन
तुमच्या गावाचा हेवा वाटू लागलाय मला तर

वर्णन छान केले आहे आवडल
पण वर्णन केलेली गावची परिस्थिती 60 salachya आसपास ची वाटत आहे .
आता गाव वेगळी आहेत

नाही राजेश जी सत्तर ऐंशी सालापर्यंत असेच होते. आता पुर्वीचं दहा पंधरा टक्के राहिलं आहे. पुढील भागांमध्ये बदल कसे घडत गेले ते लिहिणार आहे.