पुस्तक परिचय :काळातील एक आवर्त - ब्रह्मावर्त
लेखक - माधव साठे
प्रकाशन – कॉन्टिनेन्टल
शालेय अभ्यासक्रमात १८५७ च्या उठावाबद्दल थोडक्यात वाचलं होतं. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे १८५७चे स्वातंत्रसमर हे पुस्तक वाचले आणि मनात खूणगाठ बांधली गेली की अयशस्वी ठरलेला असला तरी तो उठाव नव्हता तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तळमळीने केलेला एक प्रयत्न होता.
यानंतरही काही पुस्तके याच विषयावर वाचण्यात आली. त्यांपैकी नुकतंच वाचलेलं हे ब्रह्मावर्त.(ऐतिहासिक कादंबरी)
ब्रिटिशांनी दुसर्या बाजीराव पेशव्यांना सालाना तनखा मंजूर करून महाराष्ट्रापासून दूर अशा ब्रह्मावर्त क्षेत्रीं ठेवलं. प्रस्तुत पुस्तक हे बाजीरावांचे दत्तक पुत्र नानासाहेब पेशवे यांच्या जीवनावर आधारित आहे. कर्जत जवळ वेणगाव म्हणून एक गाव आहे. तेथील गरीब परंतु रक्ताच्या नात्यातील दांपत्याच्या मुलास, धोंडोपंत यास, बाजीरावांनी दत्तक घेतले. या घटनेनंतर त्याचं आयुष्य आमूलाग्र बदलून गेलं. बाजीरावाच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी वारसा हक्क व तनखा नाकारल्यामुळे नानासाहेब अस्वस्थ झाले. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लंडनला आपला वकील पाठवणे, सामोपचाराने सरकारकडे आपली बाजू सतत मांडणे, अशा प्रयत्नांना यश काही आलं नाही. अर्थातच, भारतात ब्रिटिशांनी जे राजकारण आरंभले होते, त्यामध्ये एतद्देशीय संस्थानिकांना राजकीय फायदा न व्हावा, आर्थिक व लष्करी नाड्या आपल्याच हातात असाव्यात, हेच धोरण होतं. आपल्या ह्या परवशतेची नानासाहेबांना चीड येत असे. अनेक वर्षे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांच्या मैत्रीची फळे चाखली असूनही राजकीय बाबतीत त्यांच्यावर अन्याय करणारेदेखील हे ब्रिटिशच होते. वरकरणी ब्रिटिशांना न दुखावता, अंतरंगात मात्र स्वातंत्र्य व हक्क मिळवण्यासाठी नानासाहेबांचे जे कसोशीचे प्रयत्न होते त्यांचं मोठं रोमांचकारी वर्णन पुस्तकात केलं आहे.
पेशव्यांना असलेल्या उपाधी, त्यांचं तत्कालीन राजकारणात स्थान, कौटुंबिक जीवन, दूरदृष्टी, तात्या टोपे यांची सक्रिय साथ अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मला नव्याने समजलेली माहिती म्हणजे नानासाहेबांचे ब्रिटिश तरुणी सह असलेले मैत्रीपूर्ण संबंध. अर्थात ही अत्यंत खाजगी बाब असून तिचे संयत वर्णन केले आहे.
देशभरात या स्वातंत्र्यसमराकरिता गुप्त आवाहन करूनही तत्कालीन काही संस्थानिकांना याचं गांभीर्य समजलं नाही. मात्र शिपाई व जनतेला पोळ्यांची खूण पटली व या चळवळीला जनतेची मोठी साथ मिळाली. त्या सर्व घडामोडींचा वेगवान आढावा येथे नानासाहेबांचे दृष्टीने वाचायला मिळतो.तसंच झांशीची राणी लक्ष्मीबाई हिची कारकीर्द व पेशव्यांना केलेले सहकार्य वगैरे गोष्टी वाचायला मिळतात.
या लढ्याला अपयश येण्याची जी कारणं आहेत, त्यांपैकी एक - शिपाई संघटितपणे व शिस्तीने न लढल्याने पुढे जे अवांछनीय स्वरूप या लढ्याला आलं, त्याची मोठी खंत नानासाहेबांना वाटते. "पळपुट्या बाजीरावाचा मुलगा सुद्धा पळपुटा" असं लांछन नको, म्हणून ते या संकटाचा धैर्याने सामना करतात. तरीही "बचेंगे तो और भी लडेंगे" या सूत्रानुसार, ते सुरक्षिततेसाठी कुटुंबासह सीमोल्लंघन करतात. हा प्रसंग अतिशय ह्रदयद्रावक आहे.
नंतरच्या काळात पेशव्यांना ज्या हालअपेष्टा सोसाव्या लागल्या, ब्रिटिश सरकारची सत्ता उलथून टाकण्यासाठी त्यांची कशी तगमग होत असे, त्यांचा शेवट कसा झाला इ. गोष्टी पुस्तकात वाचणेच योग्य, तरीही ते रुखरुख लावणारे आहे.
लेखकाने संदर्भ ग्रंथ नमूद केले नसले तरी बऱ्याच गोष्टी पडताळून मगच लिहिलेल्या आहेत असं वाटतं. अतिरंजित पणा कोठेही नाही.
या पुस्तकामुळे १८५७ च्या लढ्याकडे पाहण्याची वेगळी दृष्टी मिळाली व त्या संदर्भात शेवटच्या पेशव्यांची मनोभूमिका समजायला मदत झाली.
..............................
पुस्तक परिचय - ब्रह्मावर्त (नानासाहेब पेशवे चरित्रपट)
Submitted by प्राचीन on 27 June, 2019 - 09:19
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद प्राचीन. मला वाटते
धन्यवाद प्राचीन. मला वाटते माबोवरच दुसऱ्या बाजीरावाविषयी बरेच वाचनात आले आहे. ब्रह्मावर्त येथे त्याचा शेवट झाला. शहात्तर वर्ष आयुष्य लाभले. काहीही म्हटले तरी तो स्वाभिमानी होता. त्याला गादीवर बसवण्यामागे शिंद्यांचा पाठिंबा होता पण त्यांना ठरलेलं दिलं नाही म्हणून त्यांनी पुणे लुटलं होते. मंत्रावेगळा ही कादंबरी पुर्वी वाचलेली आहे.
इंग्रजांनी संस्थानिकांना फोडले व एकत्र येऊ दिले नाही. १८५७ चा उठाव फसला कारण अनेक संस्थानिक राजे यांनी भाग घेतला नव्हता. नानासाहेब शेवटी नेपाळमध्ये गेले होते ना. हेही पुस्तक वाचावे लागेल. पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद.
माझ्याकरता नवीन लेखक आणि विषय
माझ्याकरता नवीन लेखक आणि विषय
पुस्तक कादंबरी प्रकारात असावं असं दिसतंय
धन्यवाद
धन्यवाद सुंदर परिचय...
धन्यवाद सुंदर परिचय...
पण हे समजलं नाही---शिपाई व जनतेला पोळ्यांची खूण पटली.... पोळ्या ऐवजी गोळ्या हवे का?
अवांतर माफी असावी पेशवाईसाठी शेवटी इंग्रजां बरोबर लढणारे त्र्यंबकजी डेंगळे पाटील होते ना?
त्र्यंबकजी डेंगळे दुसऱ्या
त्र्यंबकजी डेंगळे दुसऱ्या बाजीरावाचे सेनापती होते बहुतेक.
सर्वच प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
सर्वच प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पोळ्या हाच शब्द आहे तिथे @ दत्तात्रेय जी. या आणि शेषराव मोरे यांच्या पुस्तकात वाचले आहे की काही महिने आधीपासून पोळी /पोळ्या एका गावातून दुसर्या गावाकडे पाठवल्या जात होत्या. परक्या सरकारने पोळी म्हणजे अन्न सुद्धा प्रजेला मिळू नये असे धोरण ठेवले आहे. तर पोळी/रोटीची आण घेऊन लढायला तयार व्हायला हवे असा काहीसा प्रचार सतत केला जात होता.
याचा संशय काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी देखील नोंदवला आहे.
@ JayantiP बरोबर
@ JayantiP बरोबर
@ प्राचीन धन्यवाद अधिक खुलाशासाठी.
मला गोळ्या वाटले कारण गाईची चरबी असलेली काडतुसे हिंदू सैनिकांना दिली होती. त्याविरोधात सैनिकांचा असंतोष होता.
छान परिचय. मला स्वतःला १८५७
छान परिचय. मला स्वतःला १८५७ चे बंड ही पेशवे, झाशीची रानी यांची चूक वाटते. त्यापेक्षा इतर संस्थानिकांप्रमाणे वेळीच इंग्रजांच्या गुड बुक्स मध्ये शिरायला हवं होतं. बाकी सर्व संस्थानिक आपापले राज्य टिकवू शकले आणि अगदी आजही राजकारणात ती घराणी टिकून आहेत. कारण सर्वांनी आपली निष्ठा ब्रिटिशांच्या चरणी वाहिली.
@दत्तात्रेय जी, तुमचेही बरोबर
@दत्तात्रय जी, तुमचेही बरोबर आहे. काडतुसे हे तात्कालिक कारण घडले. प्रस्तुत पुस्तक त्याचाही उल्लेख करतं.विशेष म्हणजे अशाच प्रकारे काडतुसांबदल 1857 पूर्वी देखील मद्रास पलटणीत नाराजी व बंड झाले होते असे येथे म्हटले आहे.
ब्रिटिशांच्या मुजोरी चे, एतद्देशीय लोकांवर अतिशय अन्याय व अत्याचार करण्याचे दाखले याही पुस्तकात आहेत, जे जनतेच्या असंतोषाचे (इतर कारणांपैकी) एक कारण होते. @सनव - याबाबतीत म्हणजे इतर संस्थानिकांचे बाबतीतचे तपशील या पुस्तकात आहेत
अर्थात नानासाहेब पेशवे यांच्या जीवनावर आधारित कादंबरी असल्याने इतर बाजू थोडक्यात मांडल्या आहेत.
१८५७ चा उठाव ,प्रयत्न, अपयश
१८५७ चा उठाव ,प्रयत्न, अपयश याबद्दल बरीच मते आहेत.
वारसा नसल्यास ,नाकारल्यास काय हा प्रश्न सर्वच अडलेल्या संस्थानिकांचा होता.
मोठ्या शत्रुशी कसं वागायचं हे आता काय सांगणार?
सनव इतर संस्थानिक राजे होते.
सनव इतर संस्थानिक राजे होते. पेशवे हे पंतप्रधान असल्याने इंग्रजांनी एवढे महत्त्व त्यांना दिले नाही. आणि दुसऱ्या बाजीरावाने तनखा स्विकारुन पुर्ण शरणागती स्विकारलीच होती.
छान पुस्तक परिचय!
छान पुस्तक परिचय!
चांगला लिहिला आहे परिचय...
चांगला लिहिला आहे परिचय... आणखी पुस्तकाबद्दल वाचायला आवडेल
अवांतर - मराठीत नारायण केशव
अवांतर - मराठीत नारायण केशव बेहेरे यांचे १८५७ नावाचं ५५० पानाचं पुस्तक सर्व मुद्यांचा समावेश असलेलं असं चांगलं आहे या विषयासाठी.
तसेच माझा प्रवास नावाचं विष्णूभट गोडसे वसईकर यांचं एक छोटेखानी पुस्तक "फर्स्ट हॅन्ड अकाऊंट" म्हणून भारी वाटलं.
तात्या टोपे यांना फाशी दिली
तात्या टोपे यांना फाशी दिली असं आपण शाळेत असताना शिकलो होतो. त्यामध्ये कितपत तथ्य आहे हेही यात आढळून येतं. विष्णुभट गोडसे यांनी फार छान टिपण केले आहे ह्या काळातील घडामोडींचं.
मनोहर मालगावकारांची पण आहे एक
मनोहर मालगावकारांची पण आहे एक कादंबरी नानासाहेबांवर
वादळवारा नाव होते बहुदा
खूप वर्षांपूर्वी वाचलेली, बराच स्फोटक आणि सेन्सॉर करता येईल असा मजकूर होता पण तो वगळता नानासाहेबांनी जगलेले विलासी जीवन, इंग्रजांशी मैत्री, मग पळून जाण्याचा प्रयत्न, नाने नबाब, तात्या टोपे, लक्ष्मीबाई आणि नंतर काशीबाई आणि एलिझाबेथ सोबत नेपाळ च्या राजाच्या आश्रयाला जाणे तराई च्या अरण्यात
अस बरंच काही आठवतंय
मंत्रावेगळा मला तुटक तुटक
मंत्रावेगळा मला तुटक तुटक आठवतेय. खूप छान कादंबरी आहे. पादुका? इथे नको. बाहेर. असे काही विनोद. तर अतिशय करुण वाटणारे प्रसंग आठवतात.