फुल्लारी भाग- ४- स्वप्ना

Submitted by विनीता देशपांडे on 23 June, 2019 - 03:06

फुल्लारी

स्वप्ना
गंधाली सापडण्याचा आनंद झाला होता. मन मात्र खजील झाले होते. मी तिला त्या दिवशी एकटे सोडायला नको होते. नेमकी मोहनच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि मला तिला एकटीला सोडावे लागले. काही अंशी का असेना, तिच्या आजच्या परिस्थितीला मी कारणीभूत होते. आजही भेदरलेली ती गंधाली आठवली की अंगावर काटे येतात.

खर तर अभिला कळवले होते, मी रिमांड होममधून निघाल्यावर तो पाच-दहा मिनिटात पोहचायला हवा होता. अरे अभि, .....काय झाले होते रे नक्की.... नंतर भेटला नाही.... काही बोलला नाही.....अचानक निघून गेलास. माझा नाईलाज होता रे. मोहनचे वडिल सिरियस झाले, मला तिथून तडक निघावे लागले. नंतर तडकाफडकी लग्न काय आणि या सगळ्या धावपळीत नेमके माझे गंधालीकडे दुर्लक्ष झाले आणि तेव्हांच आमच्या मैत्रीचा घट्ट गोफ सैल झाला.
ती काही सांगू शकली नाही. निदान तू तरी बोलायच रे मला. विचार करुन डोकं फुटायची वेळ आली होती. आम्हा सर्वांच्या आयुष्यात वादळ होऊन आलेला तो दिवस........

गंधालीच्या होस्टेलवरुन अचानक आलेला तो फोन, मी व बाबा धावत पळत गेलो होतो. ते पोलीस, ओक्साबोक्शी रडणारी ....रक्ताने माखलेली गंधाली आणि निपचित पडलेली प्रणाली......सगळच सुन्न करणारे. वारंवार तीचे "मी नाही" खुणा करुन सांगणे, ती गर्दी, ती आरडा ओरड. पोलीसांनी घेतलेला गर्दीचा ताबा..... त्यात माझा तिचा हात सुटला.....पोलिसांनी ताब्यात घेतले होते तिला. तिचे केविलवाणी डोळे आठवले की मी आजही डोळे घट्ट मिटून घेते. आम्ही पोलिसांच्या मागोमाग ठाण्यावर गेलो. अवि नेहमीप्रमाणे शूटिंगला गेला होता, अभि पोहचायचा होता. सचिन लगेचच आला होता.
हॉस्टेलची वाडर्न रेखाताई परांजपेही पोलिसांना समजवून सांगत होत्या: गंधालीने काही नाही केले, खुनाचे हत्यार, तो चाकू गंधालीच्या हातात होता आणि ती पोलिसांच्या ताब्यात होती हेच काय त्या क्षणी सत्य होते.
संध्याकाळ झाली होती, महिला व बाल विकास कल्याण संस्थेचे अधिकारी ऑफिसमधून निघून गेले होते. सचिनने मित्रांसोबत आधी अंकूर संस्थेच्या अध्यक्षांची भेट घेतली. झालेला प्रकार त्यांना परांजपे मॅडमने कळवला होता. त्यांच्या प्रयत्नांनी बाल एवं महिला कल्याण संस्थेचा एक अधिकारी पोलिस स्टेशनवर आला. संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी गंधालीला कस्टडीमध्ये घेतले होते.

अभि आणि अवि दोघेही अजून पोहचले नव्हते. मी, बाबा व सचिन पोलिस ठाण्यात खूप वेळ त्यांची वाट बघत बसलो होतो. लवकरात लवकर वकीलांना गाठायला हवे होते. बर्‍याच लीगल फॉरमॅलिटीस होत्या. गंधाली आधीच मुकबधीर त्यात जेमतेम सतरा अठरा वर्षाची असेल. काय करावे ते सुचत नव्हते. सचिनने बराच वेळ वाट बघितली, शेवटी मित्राच्या ओळीखीने कदम वकिलांना ठाण्यावर बोलवले. चिन्मय बॅंगलोरला होता तर तन्मय मुंबईला, दोघांनाही कळवले. ते पोहचेपर्यंत हातावर हात बसून रहाणे शक्य नव्हते.

पोलिसांचा पंचनामा, चौकशीचे चक्र सुरु झाले होते.
मॅटर अपंग मुलीचा आणि त्यात माइनर असल्यामुळे तुरुंगात न ठेवता कस्टडी बाल व महिला विकास संस्थेकडे सोपविण्यासाठी वकिलांची धडपड सुरु होती. बेल मिळायला वेळ लागणार होता.
अख्खी रात्र आम्ही पोलिसठाण्यात जागून काढली. गंधालीचे हुंदके आठवले की आजही शहारे येतात. दुसर्‍या दिवशी चिन्मय आणि तन्मय आले. रांजणवाडीवरुन राधाक्का आणि रमाकांतकाका पोहचले होते. गंधालीची कस्टडी रिमांड होमला देण्यात आली होती. रोज आम्ही आळीपाळीने रिमांड होम कधी पोलिसठाण्याच्या चकरा टाकत होतो. केस कासवाच्या गतीने पुढे सरकत होती.

कसून चौकशी झाली. प्रणाली, सांगलीहून नोकरीसाठी पुण्यात आलेली एक हुशार आणि स्मार्ट मुलगी. एका पायाने अधु असलेली ती एका खासगी कंपनीत कामाला होती. गंधालीची रुममेट आणि छान मैत्रीण होती. तिचा खून होणे या गोष्टीवर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. मात्र सत्य नाकारता येत नव्हते.
चौकशी आणि तपास करतांना मोटो ऑफ मर्डरच्या दृष्टीने पोलिसांना लक्षात आले होते की गंधाली निर्दोष असावी. हॉस्टेलवरील सर्वांचे स्टेटमेंट्स, इतर चौकशी आणि तपास पूर्ण होऊन निकाल लागायला बराच वेळ लागणार होता. तिला किती दिवस रिमांड होममध्ये रहावे लागणार माहित नव्हते. झाल्या प्रकारामुळे गंधाली खूप खचली होती. ही घटना घडल्यानंतर जवळ जवळ दहा दिवसांनी अभि आला आणि पुढे दोन दिवसांनी अवि. गंधाली अजूनही संशयिय आरोपी होती. जुविनाईन कोर्टमध्ये ट्रायल सुरु होती. फौजदारी न्यायालयात केस जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. बेल मिळायला उशिर होत होता. कारण होते गंधालीचे बर्थ सर्टीफिकेट. जुविनाइन कोर्टसमोर ते सादर करणे अत्यंत गरजेचे होते.

जगताप परिवार काळजीत होता. तिचा शाळेचा दाखला, इतर सर्टीफिकेट सर्व सादर करण्यात आले, मात्र जन्माचा दाखला ते सादर करु शकले नाही.
मी आणि सचिन रांजणवाडीवरुन आणू का? मी राधाक्काला विचारले तर त्यांचे डोळे भरुन आले. मला त्या दिवशी कळले गंधाली चिन्मय आणि तन्मयची सख्खी बहिण नव्हती.
कालांतराने या केसच्या तपासात पोलिसांना लक्षात आले होते की प्रणालीच्या खुनामागे तिच्या कंपनीतील दोघेजण कारणीभूत होते. एकतर्फी प्रेमप्रकरणातून हा खून झाला होता. गंधालीची सुटका होण्याची आशा होती. तसेच जन्माचा दाखला न मिळाल्याने तिला जुविनाइन कोर्टाचा फायदा मिळणार नव्हता. या केसच्या ट्रायल दरम्यान आपल्या हिम्मतीवर उभी राहिलेली, आर्थिकरित्या स्वतंत्र झालेली ती धीट गंधाली हरवून गेली. नियतीचा हा खेळ तिच्या काय आमच्याही आकलनशक्तीच्या बाहेर होता. त्यात तिला तिच्या अस्तित्वाच्या खुणा कळल्या आणि ती आणखिनच हतबल झाली. राधाक्का, काका सगळेच तिला समजवून सांगत होते, या अनाहूत प्रसंगामुळे ती खचतच गेली.
बर्थ सर्टिफिकेट न मिळाल्याने केस जे एन एफ सीत ढकलण्यात आली. तपास- ट्रायल-कोर्टच्या सोपस्कारात खूप वेळ गेला. या काळात आम्ही सर्व मित्र-मैत्रीणी गंधालीसाठी खंबीरपणे उभे राहिलो. निकालाच्या दिवशी कोर्टात तिची साक्ष अत्यंत महत्वाची होती कारण तिने गुन्हेगारांना पाहिले होते. खुनाचे कुठलेच कारण गंधालीजवळ नसल्यामुळे पोलिसांना तिच्यावर आरोप सिद्ध करता आला नाही, शेवटी तिच्यावरचा आरोप मागे घेण्यात आला. सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. सर्वात आधी झाल्याप्रकाराने खचलेल्या गंधालीला सावरायला हवे होते. तो दिवस आजही आठवतो मला. रिमांडहोममधून तिला घरी आणायचे होते. राधाक्का आणि काका तिला बार्शीटाकळीला परत घेऊन जाणार होते. मी आणि अवि रिमांडहोमला पोहचलो होतो. अभि पोलिसांची परवानगी घेऊन येणार होता. अवि आत ऑफिसमधले सोपस्कार पूर्ण करत होता. मी व गंधाली पोर्चमध्ये बसलो होतो. रडून रडून ती दमली होती. तिच्या मनात काय काहूर माजला असेल याची आम्ही फक्त कल्पनाच करु शकत होतो. ती तिची घालमेल व्यक्त करु शकत नव्हती, मला काय सर्वांनाच तिची खूप काळजी वाटत होती.

नेमकी मोहनचा फोन आला, त्याचे वडिल सिरियस होते. मला ताबडतोब दवाखान्यात पोहचायचे होते. कसाबसा गंधालीच्या हातातला हात सोडवून मी आत जाऊन अविला कळवले, अभि पोलिसांची परवानगी घेऊन पाच-दहा मिनटात पोहचणार होता. नाइलाजाने मी तिला तिथेच बाकावर एकटीला सोडून निघाली. अवि आहे आत आणि अभि पोहचले या भरवश्यावर मी तडक निघाले. ती माझी आणि तिची शेवटची भेट.
रात्री घरी आले तर राधाक्का, काका, चिन्मय- तन्मय, सचिन सगळेच काळजीत होते. अभि- अवि आणि गंधाली तिघांचाही पत्ता नव्हता. तिघांची खूप वाट बघितली. नंतर शोधायचा खूप प्रयत्न केला. नक्की काय झाले माहित नाही?

तेव्हांपासून आज काय तिची बातमी कळली. अवि-अभि .... त्या दिवशी नेमके काय झाले ते त्यांनाच ठाऊक.

क्रमशः
विनीता श्रीकांत देशपांडे

फुल्लारी भाग १
https://www.maayboli.com/node/70330

फुल्लारी भाग २
https://www.maayboli.com/node/70335

फुल्लारी भाग ३
https://www.maayboli.com/node/70355

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे भाग आज वाचले.

प्रत्येक भाग पुढील भागाविषयी उत्कंठा वाढवतो आहे. >> +१