फुल्लारी
३
सचिन
अभिरामचा मॅसेज वाचून एक क्षण मी दचकलोच. थ्री इडियट्समध्ये सुरवातीला रॅन्चोबद्दल बातमी ऐकून जी अवस्था फरहान आणि राजूची झाली होती तीच सध्या माझी होती.
गंधाली, तिचा शोध घेऊन थकलो होतो, चक्क ती आज सापडली होती. गंधाली आमच्या आयुष्यातून अचानक निघून गेली, कुठे गेली, कशी गेली, का गेली, खूप शोधण्याचा प्रयत्न केला. काहीच तपास लागला नव्हता. आणि आज अचानक अभिचा हा मॅसेज. स्वप्नाला कळवायला हवे.
"हॅलो स्वप्ना ....गंधाली सापडली"
"कुणी सांगितले, कुठे आहे ती, कशी आहे, अवि आणि अभिला माहित आहे का?" स्वप्ना
"स्वप्ना, रॅपिड फायर थांबवशिल तर सांगतो तुला."
"अरे यार, मी अशी अवघडलेली, डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितला आहे, येतोस का घरी? मग बोलू आपण." स्वप्ना
"तुला अभिचा मॅसेज नाही आला का स्वप्ना?"
"नाही रे, माझा जुना फोन नंबर असेल त्याच्याकडे." स्वप्ना
"तू माहेरी आहेस न, आईकडे, वारजे ला, येतो दुपारी. बोर्डाच्या ऑफिसमध्ये काम आहे, उरकून येतो."
"तब्येत कशी ग स्वप्ना?" गाडीची किल्ली टेबलवर ठेवत मी विचारले.
"आणि अशावेळेस मोहन तुला सोडून कुठे गेला."
"मी बरी आहे रे, जर्मनीला गेला आहे तो. येईल पुढच्या आठवड्यात. तू आधी गंधालीबद्दल सांग" स्वप्ना
"स्वप्ना, गंधाली ऋतुजाच्या "आपलं घर" या संस्थेत आहे, आणि हो अभिचाच मॅसेज आला होता."
"काय सांगतोस" स्वप्ना
आम्ही दोघेही सुन्न झालो होतो. आज अचानक तिच्याबद्दल कळले. आनंद आणि राग या दोन्ही संमिश्र भावना आम्हाला व्यक्त करता येत नव्हत्या. जीवाभावाची मैत्रीण अशी अचानक आयुष्यात येते काय, अचानक निघून काय जाते आणि इतक्या वर्षांनी परत येते काय? त्या क्षणी काहीच सुचत नव्हते. एखद्या चित्रपटाप्रमाणे सगळे प्रसंग डोळ्यापुढून सरकत होते. अविसोबत भेटलेली अबोल गंधाली, भेदरलेल्या डोळ्यांनी आम्हा सर्वांकडे बघणारी, हळुहळु खुलणारी, नंतर जीवाभावाची मैत्रीण झालेली गंधाली......
"अविला ठाऊक आहे का रे?" स्वप्ना
"नाही ग, अभिरामने अविचा शोध घ्यायला सांगितला आहे."
"तुला माहिती आहे का त्याच्याबद्दल काही? तुझे मध्यंतरी बोलणे झाले का त्याच्याशी?"
"स्वप्ना ए स्वप्ना, कुठे हरवलीस? अग मी तुझ्याशी बोलतो आहे."
"ह्म्म... तेच. तेच तर आठवते आहे रे. आम्ही भेटलो तेव्हा तो कुठल्यातरी शुटिंगमध्ये बिझी होता. तो काय शुटिंगनिमित्त सतत फिरतीवर असायचा. आज इथे तर उद्या तिथे."
"हो, मनोहर मंगल कार्यालयात भेटला होता तो, सिद्धेशच्या लग्नाला आला होता. अरे, कित्येक वर्ष झालेत त्याला. माझा फोन हरवला. त्यात सगळेच फोननंबर गेलेत रे, म्हणून तर फोन नंबर बदलला न रे माझा." स्वप्ना
"सोशल मिडियावर शोधायचे का त्याला?" स्वप्ना
"हो अभिचे तेच म्हणणे आहे, "सणसवाडीला इंटरनेट खूप स्लो आहे, तुम्ही सोशल मिडियावर अविला शोधा, मी चिन्मय-तन्मयशी संपर्क करतो."
"आई चहा कर ग आमच्या दोघांचा" स्वप्ना
"चल, लॅपटॉपवर ट्राय करु. लिंकडिन, फेसबुक, ट्विटर बघू कुठे सापडतो तो. खरं तर तो फेसबुकवर फ्रेंड आहे माझा. तो फारसा वापरत नसावा कारण त्याने कधीच कुठली पोस्ट टाकल्याचे मला आठवत नाही. तरी प्रोफाईल चेक करु, सापडेल आपल्याला" स्वप्ना
"अविचा एक मेल आयडी आहे प्रोफाईलवर, मेल पोस्ट करुन ठेवते आणि फोन नंबर देऊन ठेवते, वाचल्यावर कदाचित कॉल करेल तो आपल्याला." स्वप्ना
"तुला आठवत का स्वप्ना, पहिल्यांदा गंधाली आणि आपली भेट सिहंगडावर झाली होती. असाच वाफाळलेला चहा, गडावरचा सुसाट वारा, त्यात गंधालीची उडालेली धांदल."
"हो रे, ती तिच्या आयुष्यातली पहिली ट्रिप. अवि तिला जबरदस्ती घेऊन आला होता. आधी बावरली होती, नंतर छान मैत्री झाली आपली. आता कशी असेल रे ती? आपल्याला विसरली नसेल ना? स्वप्ना
"छे, विसरणे शक्य नाही, काय झाले असेल की कोणालाच काहीही न सांगता ती सागळ्यांच्या आयुष्यातून अचानक निघून गेली. हा घुम्या अवि काही बोलला नाही. तो कळत नकळत आपल्यापासून दूर निघून गेला."
"गंधालीने शिवलेले बाळंतविडे, पिशव्या, पर्सेस, आपण कित्येक प्रदर्शनात कित्ती स्टॉल लावले ना रे." स्वप्ना
"खरं तर छान चालले होते सगळे. तिची जिद्द, धडपड आजही आठवते यार. खरं काय ते ती भेटल्यावरच कळेल."
"तू काहीही म्हण पण अवि गुंतला होता तिच्यात." स्वप्ना
" ........ आणि ती अभित"
"तुला आठवत स्वप्ना ... अविचा एकदा शूटिंग करतांना ॲक्सिडेन्ट झाला होता. त्याच्या पायावर ट्रॉली पडली होती. तो ससूनमध्ये ॲडमिट होता.
त्याच्या पायाला चांगलाच मार लागला होता. वाटले नव्हते की त्याचा पाय वाचेल. केवढी घाबरली होती ती अविला दवाखान्यात बघून. गंधालीने खूप केले त्याच्यासाठी. तेव्हाच, हॉस्पिटलच्या त्या चकारा, तिला रोज आणणे-नेणे या सगळ्यात आपली आणि तिची मैत्री अधिक घट्ट झाली नाही का?
"खर सांगायच तर मला आधी तिची साइन लॅंग्वेज कळत नव्हती. नंतर हळुहळु कळायला लागली." स्वप्ना
"तिचा तो अबोल संवाद, डोळे खूप बोलके होते रे तिचे." स्वप्ना
"आज वाटते कदाचित तिला समजून घेण्यात आपण कुठे तरी चुकलो, स्वप्ना?."
"कदाचित तिची व्यक्त होण्याची पद्धत आपल्याला लक्षात आली नसावी"
"किंवा तिच्या मनात काय सुरु आहे हे आपल्याला कळले नाही." स्वप्ना
"अगदी सुरवातीला तिची अभिव्यक्ती आपल्याला कळत नव्हती. अधे मधे ती आपल्यात असून नसल्यासारखी वाटत होती."
"एक लक्षात घे स्वप्ना, आपला परिवार, नातेवाइक, मित्र-मैत्रीणी,आपल्याला इतर ही अनेक व्याप होते. आपण संपूर्ण लक्ष तिच्यावर कधीच केंद्रीत करु शकत नव्हतो. ते शक्य नव्हते आपल्याला."
"तिच्यासाठी तिचे विश्व म्हणजे अभि, अवि तू आणि मी. तिचे आई, बाबा, चिन्मय, तन्मय या सर्वांपासून ती दूर होती. अर्थात तिला आपल्याकडून अधिक अपेक्षा असाव्यात आणि आपण तिथेच कुठेतरी कमी पडलो."
“कमी पडलो असे नाही. आपण आपल्याला जमेल ते केले रे." स्वप्ना
"ही अपली बाजू, आपले स्पष्टीकरण, तिच्या मनात काय होते हे मात्र आपल्याला कळले नाही, हे ही खरेच ना."
"का तिने कळू दिले नाही". स्वप्ना
"तू असे कसे म्हणू शकते स्वप्ना. तिला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. तिच्या संवादातील अडचणी तुला माहिती आहे. माझ्या मते तरी तिने अडचणींवर मात करुन आयुष्यात पाय रोवून उभे रहायचा प्रामाणिक प्रयत्न केला."
"धडपडी होती ती. मुख्य म्हणजे कष्ट करायची तिची तयारी होती. आपण बघितले आहे स्वप्ना"
"आयुष्यात काय करायला हवे, हे वयाच्या मनाने तिला लवकर कळले रे."
"तिचं ते टापटीप रहाणे, आपला व्यंग कुणाला कळू न देणे. तुला आठवत का सचिन, बोलता बोलता अवि एकदा बोलून गेला की ती पुण्यात आल्यावर धीट झाली नाही तर अगदी गोगलगाय होती." स्वप्ना
"आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा बावरलीच होती ती थोडी."
"काही काळाने रुळल्यावर ती तिची आवड निवड व्यक्त करायला लागली. नाही तर आपण जे म्हणू ते निमूटपणे ऐकायची.
"साधी भोळी होती रे ती. म्हणून जरा जास्त काळजी वाटत होती." स्वप्ना
"गुडलकमधला इराणी चहा....मस्का पाव तिचे फेवरेट होते."
"प्राजक्ताची फुलं खूप आवडायची तिला.." स्वप्ना
"तुला आठवत का सचिन, आपण एकदा इंजिनिअरिंग कॉलेजच्या ग्राउंडवर पुस्तकांच्या प्रदर्शनात जात असतांना मोहित्यांच्या बंगल्यातला प्राजक्त वेचणारी गंधाली. ओंजळभर फुलं दिवसभर हुंगत होती." स्वप्ना
"अंकुरच्या त्या परिसरात किती फुलझाडं लावली होती तिने. गंधाली...परफेक्ट नाव आपण नेहमी म्हणायचो."
"अभिचं खूप प्रेम होते रे तिच्यावर. तो चांगलाच गुंतला होता तिच्यात." स्वप्ना
"भेटल्यावरच कळेल की मैत्रीचा, प्रेमाचा हा गोफ कुठे आणि केव्हा आणि हो कसा निखळला."
"चल, अविचा काही मॅसेज आला तर कळव लगेच. ती सुखरुप आहे, यातच काय ते समाधान मानायचे. कळेल सगळं कळेल."
"आधी सारखे होईल सर्व?" स्वप्ना
"आशा तर करु शकतो. स्वप्ना, मैत्रीचं नातं हे अतूट असते....हे कधीच विसरु नकोस.
क्रमश:...........
फुल्लारी- भाग-१
https://www.maayboli.com/node/70330
फुल्लारी भाग- २
https://www.maayboli.com/node/70335
छानच!
छानच!
वाचतोय!
वाचतोय!
वाचतेय.
वाचतेय.
बरीच वाक्ये परत परत आलीत. तसेच एकाच व्यक्तिची सलग वाक्ये वेगवेगळी लिहीलीत. काही ठिकाणी कोण म्हणतेय हे कळत नाही.
जर तुम्ही प्रत्येक भागाचं
जर तुम्ही प्रत्येक भागाचं शिर्षक वाचलं तर लक्षात येईल की त्या व्यक्तीचं कथानकातील नायिकेबद्दल स्वगत आणि संवाद आहे. तुम्ही "सचिन" भाग वाचत असाल तर सहाजिकच त्याचे वाक्य सोडून ज्यांच्याशी त्याचा संवाद आहे त्याचं नाव पुढे दिलं आहे.
वारंवार येणाऱ्या वाक्यांबद्दल नक्की सुधारणा करते.
पहिल्या भागात सुरवातीला मी या कथेविषयी मनोगत व्यक्त केले आहे. नक्की वाचा.
धन्यवाद
"आज वाटते कदाचित तिला समजून
"आज वाटते कदाचित तिला समजून घेण्यात आपण कुठे तरी चुकलो, स्वप्ना?."
"कदाचित तिची व्यक्त होण्याची पद्धत आपल्याला लक्षात आली नसावी" >> ही दोन्ही वाक्ये जर सचिनची आहेत, तर वेगवेगळी, एका खाली एक लिहायचे कारण काय?
मनोगत सचिनचे आहे ते कळले, पण वरच्या लेखन फॉरमॅटमुळे गोंधळायला झाले. असो.
तुम्हांला ते योग्य वाटत असेल तर राहिल.