बिरादरीची माणसं - पल्लो मामा

Submitted by लोकेश तमगीरे on 31 May, 2019 - 05:52

" बिरादरीची माणसं - पल्लो मामा "

"पल्लो मामा"....हो, बिरादरीत सारे याच नावाने हाक मारतात त्यांना. "दोगे पिरंगी पल्लो" हे पल्लो मामांचं पूर्ण नाव. गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगल असलेल्या एटापल्ली तालुक्यातील उडेरा गावामध्ये एका माडिया कुटुंबात त्यांचा जन्म झाला. संपूर्णतः निसर्गावर अवलंबून असणारे हे माडिया आदिवासी. ही गोष्ट साधारणतः ६०-६५ वर्षापूर्वीची असेल. आजच हा भाग एवढा घनदाट आहे तर ६० वर्षांपूर्वी कसा असेल याची कल्पनासुद्धा आपल्याला करता येणार नाही. जन्मतारीख त्यांना माहित नाही. कारण शिक्षण-शाळा हा प्रकार या भागात अस्तित्वात सुद्धा नव्हता. ते सोडाच, गडचिरोली जिल्ह्याच्या एका टोकावर एटापल्ली तालुक्यात उड़ेरा गाव आहे हे त्या काळात कुणाला माहितसुद्धा नसेल.
पल्लो मामांच बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेलं. पण पुढे किशोर वयाच्या उत्तरार्धात मामांना कुष्ठरोग झाला. बाहेरच्या जगात समाज कलंक मानल्या जाणाऱ्या कुष्ठरोगाला मात्र माडिया आदिवासींने कधीच अस्पृश्य मानलं नाही. आणि आता आपल्यावर ओढवलेल्या कुष्ठरोगाचा उपचार कुठे करायचा हा प्रश्न त्यांना भेडसावू लागला. लोक बिरादरी प्रकल्प सुरु होऊन आता ९-१० वर्षे झाली होती. आणि प्रकल्पाची महती आता लगतच्या आदिवासी भागामध्ये सर्वदूर पसरली होती. कुणीतरी सांगितलं कि लोक बिरादरी दवाखान्यातच या बिमारीचा इलाज होऊ शकतो म्हणून १९८३ मध्ये पल्लो मामा येथे आले आणि कायमचे इथेच राहिले. हाता-पायांची बोटं गळलेल्या महारोग्याला त्याकाळी कुणीच स्वीकारलंही नसतं. प्रकाश भाऊंनी फक्त त्यांच्या जखमेवरच इलाज केला नाही तर त्यांना कामे दिली, राहण्याची-खाण्याची व्यवस्था सुद्धा केली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिकरित्या पूर्णतः खचलेल्या पल्लो मामांमधे आत्मविश्वास जागवला. म्हणूनच प्रकाश भाऊ प्रमाणेच ही लोकं सुद्धा अविरतपणे अबोलतेने कामे करू लागली.

मामांना लोक बिरादरीला चिन्नीची साथ मिळाली. चिन्नी ही हेमलकसा हुन साधारणतः २५-३० किलोमीटर अंतरावरवर गोपनार गाव आहे तिथली. आज तरी पर्लकोटा, पामुलगौतमी यांसारख्या मोठ्या नद्यांवर पूल आहे पण त्या काळी तुडुंब भरलेल्या या नद्या आणि अनेक छोटे नाले पार करून पायी लोक बिरादरी दवाखान्यात यावं लागायचं. चिन्नीला सुद्धा त्या काळी असाध्य समजल्या जाणाऱ्या कुष्ट रोगाने ग्रासित होती. आणि म्हणूनच उपचाराच्या शोधात ती बिरादरीला पोहोचली. बिरादरी दवाखान्यात चिन्नीचा उपचार व्यवस्थित सुरु होता पण यकृताच्या आजाराने ग्रासल्यामुळे तिला प्राणाला मुकावे लागले. चिन्नीची अचानक सुटलेली भावनिक साथ आणि एकामागून एक आलेल्या असह्य दुःखांमुळे पल्लो मामा पूर्णतः खचून गेले.

प्रकाश भाऊंना, पल्लो मामांबद्दल विचारले असता ते म्हणतात कि "सतत हसरा चेहरा" आणि "सतत कामामध्ये रममाण" असे दोन मुख्य गुण त्यांना मामांमध्ये नेहमीच दिसतात. पल्लो ने आजपर्यंत कधीही कामाचा कंटाळा केला नाही असे प्रकाश भाऊ मात्र आवर्जून सांगतात.
"डॉ. प्रकाश बाबा आमटे" या भाऊंच्या जीवन चारित्र्यावर आधारित सिनेमामध्ये पल्लो मामाने कुष्ठरोग्याचीच भूमिका केली आहे. संस्थेमध्ये आपण कधीही आलात आणि प्रवेश करताच कुणी हातात झाडू घेऊन कॅम्पस स्वच्छ करतांना दिसले तर ते नक्कीच "पल्लो मामा" असतील. आजही कॉलनी मध्ये नळाला पाणी नसलं की सर्वजणांना पल्लो मामा आठवतात. बाहेरच्या जगात असेल निवृत्तीची वयोमर्यादा, आमच्या बिरदरीमधे असलं मुळीच नाही. “संस्थेचे समाजकार्य हेच ईश्वर कार्य” असे मानणाऱ्या पल्लो मामांची कामे सुरूच आहेत. आणि तेवढ्याच जिद्दीनं. स्वतःचे अनंत दुःख विसरून अविरतपणे काम करणाऱ्या "दोगे पिरंगी पल्लो" ... म्हणजेच आमच्या लाडक्या पल्लो मामाला लोक बिरादरीचा सलाम!

शब्दांकन:
डॉ. लोकेश व डॉ. सोनू,
सामुदायिक आरोग्य विभाग,
लोक बिरादरी प्रकल्प,
हेमलकसा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. बिरादरीच्या एकेक व्यक्तीबद्दल माहीती लेखमाला चालू करणार आहात का? नक्की करा. वाचायला आवडेल.

हेमलकसा आणि आनंदवनातल्या तुम्हा सगळ्या डॉक्टर्स आणि कायकर्त्यांचे आभार आणि तुमच्या कार्यासाठी सलाम :Thumbs up:

श्री प्रकाषजी आमटे कुटुंबीय आणि त्यांचे हेमलकसातले सहकारी हे जगताला स्फूर्ती देणारे विद्यापीठ आहे.
तुम्हा सगळ्यांपुढे कायमच नतमस्तक !

आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनपर शब्दांबद्दल मनस्वी धन्यवाद ...!!!

छान लेख.
बिरादरीच्या व्यक्तीबद्दल माहीती देणारी लेखमालीका सुरू केल्या बद्दल धन्यवाद. आणखी वाचायला नक्कीच आवडेल.
खरंच छान लिहिताय.

@मित : धन्यवाद ..!!
@ दीपु भाऊ: धन्यवाद ..!!
@ मीरा..: हो ...हो ... प्रयत्न त्याच दिशेने आहे ताई.
@ दासानु दास: धन्यवाद ..!!

@ पशुपत: अगदी बरोबर .... धन्यवाद ...!!
@ पलक: थँक्स ... प्रयत्न राहील.
@ अनघा: मनस्वी आभार.

@ पशुपत: अगदी बरोबर .... धन्यवाद ...!!
@ पलक: थँक्स ... प्रयत्न राहील.
@ अनघा: मनस्वी आभार.