(सिने टीव्ही श्रेत्रावर आधारित माझ्या "वलय" या कादंबरीचे दर सोमवारी आणि शुक्रवारी एक प्रकरण येथे क्रमशः प्रसिद्ध करण्यात येईल - निमिष सोनार)
कादंबरी वाचायला सुरुवात करण्याआधी –
जगात सर्वात जास्त चित्रपट निर्मिती करणाऱ्या वलयांकित अशा आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीत तसेच टीव्ही क्षेत्रात स्वत:चे वलय निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या काही जणांची ही कहाणी असून ही एक पूर्णपणे काल्पनिक कादंबरी आहे. काही अपरिहार्य अपवाद वगळता यात उल्लेख असलेली सिनेमांची नावे, सिनेमाशी संबंधित विविध ठिकाणे, कलाकार, चित्रपट, टीव्ही सिरियल्स, नाटके, थिएटर्स, पुस्तके, लेखक वगैरे यांची नावे काल्पनिक आहेत! तसेच गरजेनुसार योग्य तो परिणाम साधण्यासाठी मी काही ठिकाणी इंग्रजी आणि हिंदी शब्द आणि वाक्ये मुद्दाम वापरली आहेत. काही ठिकाणी सेक्सशी संबंधीत बोल्ड प्रसंग, माफक प्रमाणात शिव्या किंवा हिंसेचे वर्णन असल्याने एक सावधगिरीचा उपाय म्हणून पंधरा वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींनी ही कादंबरी वाचायची किंवा नाही हे पालकांच्या संमतीने ठरवावे किंवा स्वत:च्या जबाबदारीवर कादंबरी वाचावी. या कादंबरीचा हेतू फक्त वाचकांचे मनोरंजन करणे हा असून कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करणे तसेच कुणाचे समर्थन करणे, कुणावर टीका करणे किंवा वाचकांवर विशिष्ट प्रकारची विचारसरणी लादणे हा नाही. आजच्या इंटरनेटच्या जमान्यातील वाचक सूज्ञ आहेत त्यामुळे जास्त काही सांगण्याची गरज नाही! यातील काल्पनिक व्यक्ती, स्थळे, प्रसंग, संस्था यांचा खऱ्या जगातील गोष्टींशी संबंध किंवा साधर्म्य आढळल्यास तो एक योगायोग मानावा आणि कादंबरी वाचनाचा आनंद घ्यावा! - निमिष सोनार (लेखक)
प्रकरण - १
“टिंग टाँग” ... दरवाज्याची बेल वाजते. सून दार उघडते. सासूच्या हातातील बाजाराच्या पिशव्या घेते. सासू सोफ्यावर पंख्याखाली बसून पदराने घाम पुसते. सून स्वयंपाकघरात जाते.
“सूनबाई, झाला नाही का स्वयंपाक अजून?” सोफ्यावरून आवाज स्वयंपाकघराकडे जातो.
पेपर वाचणारे सासरे पेपरातून डोके बाहेर काढून सासूकडे बघतात. पुन्हा पेपरात बघतात.
“हो, सासूबाई. तयार होतोच आहे स्वयंपाक!” स्वयंपाकघरातून आवाज सोफ्याकडे जातो.
“किती वेळा सांगितलं की या वेळेपर्यंत स्वयंपाक झालाच पाहिजे, कळत नाही तुला?” सासू.
“एकदम टाइम टू टाइम सगळं करायला मी काही मशीन नाही सासूबाई!” मिरचीची फोडणी टाकत सून म्हणते. सगळ्यांना ठसका येतो.
“काय म्हणालीस? परत म्हण जरा! बघतेच तुला!”, सोफ्यावरून उठत ठसका देत सासू म्हणते.
“आज तुला धडाच शिकवते!” असे म्हणून सासू त्वेषाने स्वयंपाकघरात जाऊन सुनेला जोरात तीन वेळा थप्पड लगावते. सासूच्या हाताचा धक्का लागून कढई पुन्हा पुन्हा तीन वेळा खाली पडते आणि तेल हवेत येऊन स्थिर होते! थ्रीडी कोनातून हवेतले तेल दाखवत कॅमेरा फिरत जातो.
सासरे उठून उभे राहतात. त्यांच्या चेहेऱ्यावर आश्चर्याचे भाव! हे काय झाले? एकदम थप्पड? तीन वेळा ते खुर्ची वरून उठतात. मग त्यांचा चेहरा तीन वेळा ब्लॅक अँड व्हाईट होतो. तेही हवेत स्थिर होतात!!....
हा सीन मोठ्या पडद्यावर बघणारे निर्माते, कलाकार, लेखक, एडिटर वगैरे मंडळींनी टाळ्या वाजवल्या.
एडिटरने रिमोटने पॉज करून तो सीन तात्पुरता थांबवला.
एडिटर, “छान जमून आलाय हा सीन, नाही का?”
तेथे बसलेला एक कलाकार वैतागून म्हणाला, “एका क्रियेवरची प्रत्येकाची प्रतिक्रिया तीन तीन वेळा दाखवायची खरच गरज आहे का?”
डायरेक्टर म्हणाला, “अरे मग राजा! ते एकदम आवश्यक आहे! त्याशिवाय टाइमपास कसा होईल रे! ही काय दर आठवड्याला चालणारी सीरियल आहे का? पटापट कथा पुढे सरकायला? डेली सोप आहे हा! डेली सोप! अंगाला जसा डेली आपण सोप लावतो ना तसे. लोकांना रोज व्यसन लागलंय या डेली सोपचं! मग रोज रोज नवीन काय दाखवणार? थोडा टाईमपास हवा ना!”
निर्माता म्हणाला, “बरोबर आहे! चला एडिटर साहेब पुढे बघू द्या! करा पुढचा भाग प्ले!”
एडिटरने प्लेचे बटण दाबले.
“टिंग टाँग” ... पुन्हा बेल वाजते. थप्पड खाल्लेल्या सुनेचा पती ऑफिस मधून घरी येतो. घरात काय ड्रामा झालाय त्याचा अंदाज येऊन तो कुणाला काहीच न बोलता बेडरूम मध्ये निघून जातो. त्याची ब्रीफकेस ठेवतो, फ्रेश होतो, घरचे कपडे घालतो आणि मग बेडरूममध्ये जाऊन वाईन पीत बसतो. सीरियलचा एपिसोड संपतो. टाळ्या! टाळ्या!!
तेथे बसलेला तोच कलाकार पुन्हा दुपटीने वैतागून म्हणाला, “अरे अरे! टाळ्या काय वाजवताय? फॅमिली ड्रामा आहे हा आणि यात वाईन कसली दाखवताय? काय चाललंय काय तुमचं?”
डायरेक्टर म्हणाला, “वा वा! अगदी योग्य तेच दाखवतो आहे आपण! शेवटी पुरुषांना आवडणारं काहीतरी असलं पाहिजे ना यात? थोडेफार पुरुष प्रेक्षक लाभण्यासाठी असे करावे लागते! सासू सुनेच्या सिरीयल मध्ये पुरुष मंडळींचे नाहीतरी काही विशेष काम नसते. मग पुरुषांनी वाईन पीत बसायला काय हरकत आहे? आय मीन छोट्या पडद्यावर!”
तो कलाकार म्हणाला, “तुमचे लॉजिक चुकते आहे. पुरुषांना ऑफिसमधून घरी आल्यानंतर दारू पिण्याव्यतिरिक्त काही दुसरे काम नसते असे वाटले की काय तुम्हाला?”
डायरेक्टर म्हणाला, “ आरे! गप बस ना यार! सोड ना त्या वाईनचा नाद! या सीरियलमध्ये लवकरच तुझी एन्ट्री होणार आहे! त्या सुनेच्या प्रियकराचा रोल करायचा आहे तुला! माहित आहे ना? हा वाईन पिणारा पती लवकरच घरातून पळून जातो असे दाखवायचे आहे!”
“काय? मला तर हे आधी माहिती नव्हते!”, तो कलाकार आश्चर्यचकित होऊन म्हणाला.
“हो! डेली सोपच्या कथेमध्ये मध्ये डेली बदल होत असतात आजकाल! वाचकांच्या सोशल मिडीयावरील प्रतिसादांवरून आणि TRP च्या आधारे! काय समजलास? याला आम्ही म्हणतो डेली ‘सोप’ विथ ‘शांपू’ तडका! ही ही ही ही!”, डायरेक्टर स्वत:च्या जोकवर हसत म्हणाला.
इतर सगळे जबरदस्तीने हसले...
आज सर्वांनी त्या सिरीयलचे एकूण पुढचे सहा एपिसोड बघितले जे अजून टेलीकास्ट व्हायचे होते. गोरेगांवच्या फिल्मसिटी स्टुडिओमध्ये हे सर्व घडत होते आणि सीरियलचे नाव होते - “चार थापडा सासूच्या!”
त्या सिरीयलची कथा थोडक्यात अशी होती - सासू सुनेच्या कटकटीतून मुक्त होण्यासाठी नवरा घरातून पळून जातो खरं आणि एका बाबाच्या आश्रमात आश्रयाला जायचे ठरवून प्रवास करत असतांनाच सुनेच्या कॉलेज जीवनातील एक एकतर्फी प्रेमी त्याचे रस्त्यात अपहरण करतो आणि त्या घरात दूरचा नातेवाईक बनून येतो आणि राहतो. सुनेला नीट आठवत नसते म्हणून ती सुधा त्याला तो नातेवाईक समजते. मग तो सांगतो की मी त्याला शोधून आणतो पण मला सुनेची मदत लागेल. मग सुनेला संशय यायला लागतो वगैरे. मुलगा घरात नसल्याने सासू सुनेचे भांडणं बंद पडतात कारण दोघींनी भांडण करून करून ज्याला छळायचे तोच घरातून नाहीसा झाल्याने आता कुणासाठी भांडणार म्हणून सासू सुना गुण्या गोविंदाने राहायला लागलेल्या असतात. मग कथेत सूनेची बहिण अचानक प्रवेश करते आणि त्यामुळे आणखीन एक ट्वीस्ट येते आणि मग अनेक प्रसंगांनंतर गोड शेवट होतो...
(क्रमश:)
(माझ्या "वलय" कादंबरीची एक
(माझ्या "वलय" कादंबरीची एक जाहिरात)
सोनीचा असा कोणता सेल्फी होता ज्यामुळे ती वादात अडकली?
रागिणीला फिल्म इंडस्ट्रीबद्दल कोणते रहस्य कळले होते?
सुप्रियासोबत नेमके काय घडले की ज्यामुळे ती अंतर्बाह्य बदलली?
रीताशा तीव्र डिप्रेशनमध्ये कशामुळे गेली?
राजेशच्या पूर्वायुष्यात अशा कोणत्या दोन घटना घटना घडल्या ज्यामुळे फिल्म इंडस्ट्री त्याच्या आयुष्याचा भाग झाली?
मोहिनी आणि राजेश यांची "जवळीक" टाईप मैत्री सुनंदाला पचेल का?
सुपरस्टार अमित श्रीवास्तव यांच्या "मालामाल हो जाओ" या सामान्य ज्ञानाच्या कार्यक्रमात असे काय घडले की जे आजपर्यंत कधीही घडले नव्हते?
मायाने आपल्या डॉक्टर पतीपासून काय लपवले?
हॉलीवूडमध्ये असा कोणता अद्भुत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून चित्रपट बनणार होता ज्याचा अविभाज्य भाग भारतीय चित्रपटसृष्टी असणार होती?
ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि इतर बरेच काही मनोरंजक आणि काही खळबळजनक घटना वाचण्यासाठी "वलय" ही सिनेटिव्ही क्षेत्रावर आधारित "सिनेमा स्कोप" कादंबरी जरूर वाचा.
फिल्म आणि टिव्ही इंडस्ट्रीमध्ये आपापले "वलय" निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या काही जणांची ही कहाणी!!
लवकरच "डेलीहंट" ऍपवर ईबुक स्वरूपात प्रकाशित होणार!!
"वलय" वाचनासाठी वयोमर्यादा: (15+)
छान आहे सुरूवात...
छान आहे सुरूवात...
ठरवल्याप्रमाणे तुम्ही नियमितपणे भाग पोस्ट केले तर मजा येईल
नक्कीच ठरल्याप्रमाणे भाग
नक्कीच ठरल्याप्रमाणे भाग पोस्ट होतील.
सुरवात छान आहे.पुढील भाग कसे
सुरवात छान आहे.पुढील भाग कसे वाचायला मिळतील.
https://www.maayboli.com/user
https://www.maayboli.com/user/7890/created
पुढील भाग येथे सापडतील.