उन्हाळी भटकंती - माथेरान (२),आंबेगाव ते वन ट्री हिल पॉइंट माथेरान.
(२०१९-०५-२९)
मे महिन्यातच एक तारखेला बोरगाव मार्गे रामबाग पॉइंटला इथे आलो होतो ((( उन्हाळी भटकंती - माथेरान, (१) कर्जत ( बोरगाव ) ते माथेरान ( रामबाग पॅाइंट. ) ))) तेव्हा इकडे एक बस सकाळी दहाला आंबेगावकडे येते हे कळल्याने उत्साह वाढला होता. तिकडून वन ट्री हिल पॉइंटकडे वाट आहे त्याने २००४ ला वर गेलो होतो. इकडे प्रत्येक वाटेचं वेगळेपण आहे. उन्हाळ्यात आकाश स्वच्छ असते आणि दूरवरचे दृष्य दिसते. थंडीमध्ये ट्रेक सोपा होतो पण करवंदं, जांभळे, आंबे नसतात. पक्षी गप्प राहतात.
कर्जतला पावणे दहाला बस येते आणि खोपोली ट्रेन जेमतेम पंधरा मिनिटे अगोदर पोहोचते. ट्रेनला उशीर झाल्यास बस जाईल या भितीने अगोदरच्या ट्रेनने जाऊन वाट पाहात बसलो. बस वेळेवर आली पण पाटी 'ताडवाडी'ची होती. खात्री करून बसलो. आत एक पुरुष अन एक बाई दोनच प्रवासी होते. "हीच बस माथेरान चौक पॉइंटखाली जाते."
शेवटचा स्टॉप तिकिट मागितल्यावर आंबेगावचेच तिकिट मिळाले. माणूस बोरगाव फाट्याला उतरला, बाई बोरगाव आरोग्य केंद्रापाशी उतरल्या. वाटेत कुणा प्रवाशाला न घेता बस मोरबे धरणाच्या मागच्या बाजूने वळणे घेत आंबेगाव उर्फ ताडवाडीला साडेदहाला पोहोचली. गाव एकच आहे. धरणामुळे स्थलांतर होऊन एका ठिकाणी वस्ती झालेली वाटतेय. शाळा आहे. मागच्या बाजूस धरण,इर्शाळगड,प्रबळगड,माथेरानचे दक्षिण टोक आणि इतर बुरुजवाडीचे डोंगर असा ३६५ अंशातला परिसर पावसाळ्यात खरोखरच रम्य दिसत असणार.
फोटो १
कर्जत ते आंबेगाव बस रूट.
आंबेगाव - ताडवाडी पन्नास साठ घरांची वस्ती आहे. बसची वाट पाहात असलेले काही गावकरी घेऊन लगेच परत कर्जतला गेली. एक ओम्नी शेअर taxi उभी होती शिटांची वाट पाहात.
" ही कुठे जाते?"
"चौक. धरणापूर्वी आमचा संबंध चौक गावाशीच होता. तिकडूनच या गाड्या येतात. "
२००४ मध्ये मी चौक नाका (स्टेशन झालं आहे.) - नानिवली - आंबेगाव असा आलो होतो तेव्हा डंपर्स माती टाकत/काढत होते.
बाजूलाच दोन विहिरी होत्या आणि त्यातून गावकरी पाणी घेत होते.
" आता मे महिन्यात ही पाणी दिसतंय!"
" नाही, पाणी केव्हाच आटलं. खालच्या धरणातलं पाणी पाइपाने सोडतात विहिरीत."
वर जाण्यासाठी तिथूनच पायवाट आहे. हे बरय, बसने उतरायचं आणि लगेच भटकंती सुरू. इथे दुकान,वडा टपरी अजिबात नाही. कर्जतलाच पोटोबा करायचा. चढायला सुरुवात केली तेव्हा साडे दहा वाजलेले. थोडा वारा होता. इकडचे दृष्य फारच भारी दिसते.
फोटो २
इर्शाळगड आणि मोरबे धरण
चढावरची झाडे बरीचशी सुकलेली होती. छत्रीमुळे सावली मिळत होती.
फोटो ३
पावसाची वाट पाहणारी झाडं.
एक टप्पा खड्या चढणीचा संपल्यावर दाट आमराई आली. एक विहिरसुद्धा आहे आठदहा फुट खोल. पाणी होते,एक दोरी लावलेला डबाही ठेवला होता. या वाटेवर बरेच आंबे पडलेले होते पण आंबट ढस्स. शेवटी एका ओढ्यापाशी येतो तेव्हा वरती वन ट्रीचे टेकाड आणि पॉइंट दिसतो.
फोटो ४
आंबेगाव ते वन ट्री हिल पॉइंट चढण.
या ओढ्यातूनच दीडशे मिटर्स वर चढले की पोहोचलो वरती. दगड पायऱ्यांसारखे रचून गाववाल्यांनी वाट सोपी केली आहे.
फोटो ५
धबधबा चढण इथे सुरू होते. वरच दिसतोय माथा.
फोटो ६
एक वाजता सावली पायाखाली आली.
दोन दूधवाले वरच्या हॉटेल्सना दूध देऊन परत येताना भेटले. वन ट्री हिल पॉइंटला पोहोचलो तेव्हा दीड वाजला. आता डबा खाल्ला आणि विश्रांती घेतली. पर्यटक इतक्या दूर दुपारी येत नाहीत.
फोटो ७
वन ट्री रेलिंग.
फोटो ८
वन ट्री टेकाड, ते सुकलेले झाड पुन्हा वाढतय.
इथून चौक पॉइंटकडे न जाता बाजारकडे निघालो. दोन वाजले होते आणि भरपूर वेळ होता. वाटेत जांभळाची झाडे खूप आहेत त्यांचा बारक्या जांभळांचा लाल मातीच्या रस्त्यावर सडा पडलेला होता. पुढे एका ठिकाणी शार्लोट लेक कडे जाणाऱ्या मार्गाने तलाव गाठला.
फोटो ९
शार्लोट लेक, पार आटलेले.
पूर्वी याच तलावाचे पाणी माथेरानला वापरत असले तरी ते वाढत्या वस्तीला, हॉटेल्सना पुरे पडणार नव्हतेच. आता उल्हास नदीचे पाणी पंपाने वर येते. लेकच्या मागे असलेले ग्रामदैवत पिसरनाथ आणि हा परिसर मात्र पर्यटकांनी नेहमीच भरलेला असतो. पण आज तुरळकच लोक होते. लेकच्या भिंतीवरून वळसा घालून एको पॉइंट जवळच आहे. एकदा का वारा सुरू झाला की प्रतिध्वनी ऐकू येत नाही. अगदी सकाळी येतो. तरी प्रत्येकजण प्रयत्न करून जातोच.
इथून मलंगगड वगैरे चारपाच पॉइंटसना जाता येते, घोडेवाल्यांचे कमाईचे माथेरानमधले ठिकाण हेच. बाईक ,गुजरातभवन,रीगल हॉटेल्समार्गे मुख्य रस्त्याला आलो. स्टेशनात साडेचारची मिनी ट्रेन सुटायच्या तयारीत होती.
फोटो १०
वन ट्री हिल पॉइंट ते दस्तुरी.
फोटो ११
सटेलाइट फोटो रूट.
वन ट्री हिल पॉइंट youtube video , 01:26, size 22 MB, मराठीत
पाचला दस्तुरी नाका गाठला. चहा,वडा खाऊन बसची वाट पाहात पर्यटक, घोडेवाले,टैक्सीवाले यांची धावपळ, गंमत पाहताना एसटीची प्रियदर्शनी मिडी हिरवी बस बरोबर पावणेसहाला आली आणि म्हटले अरेच्चा ट्रेक किती लवकर संपला!
भटकत रहा, कळवत रहा वाचत राहू
भटकत रहा, कळवत रहा
वाचत राहू
भटकत रहा, कळवत रहा
भटकत रहा, कळवत रहा
वाचत राहू>>>>>+११११ फोटु बी टाकत रहा. इथले फोटु छान आलेत. पावसाळ्यात बहार असेल.
धन्यवाद हर्पेन, रश्मी.
धन्यवाद हर्पेन, रश्मी.
हे फोटो नवीन मोटो ई ५ प्लस फोनचे आहेत. सात तास रूट ट्रेसिंग ( फोन bag मध्ये ठेवून) अधिक काही व्हिडिओ आणि फोटो. Battery test झाली. तीस टक्के च उतरली. पहिल्या लेखातले फोटो लुमिया ५४०चे होते.
बोरगाव, आंबेगाव, रामबाग
बोरगाव, आंबेगाव, रामबाग पॉइंट, वन ट्री हिल छानच.... आता पिसारनाथ शिडीची वाट करुन या.
पिसरनाथ देवळापाशी विचारलं
पिसरनाथ देवळापाशी विचारलं गाववाल्यास.
"देवळामागून वाट खाली वारशा ( असं काही नाव सांगितलं) गावात उतरते. लाकडी शिडी काढून लोखंडी लावली आहे."
" पण नंतर कुठे बाहेर पडायचं आंबेगाव का धोधाणी?"
"आंबेगावच."
एकूण माथेरानचे सर्वच ट्रेक आवाक्यातले आणि कधीही करता येण्यासारखे आहेत.
वारशा ( असं काही नाव सांगितलं
वारशा ( असं काही नाव सांगितलं) गावात उतरते >>> त्या वाडीचे नाव वरोसा हुम्बर्णे.
" पण नंतर कुठे बाहेर पडायचं आंबेगाव का धोधाणी?" >>> दोन्ही ठिकाणी जाऊ शकतात. आंबेगाव जवळ पडेल तर म्हातारीची खिन्ड पार करुन धोधाणीत जाता येते तिथुन पनवेलसाठी एस टी ची सोय आहे.
वेळ मिळेल तेव्हा हा लेख वाचुन घ्या. https://ahireyogesh.blogspot.com/2018/04/matheran-pisarnath-one-tree-hil...
पावसाळ्यात माथेरानला जाता
पावसाळ्यात माथेरानला जाता येते का नि मिनी ट्रेन सुरु राहते का.
@योगेश, बघतो.
@योगेश, बघतो.
--------
मिनि ट्रेन १५ जून ते १५ ओक्टोबर बंद राहते.
मार्च २०१२ पासून मिनी ट्रेन रेझर्वेशन ( रेल्वे साईट/काउंटरवर) बंद करवले यात फार नुकसान झाले.
पाऊस फार असतो का नि पर्यटक
पाऊस फार असतो का नि पर्यटक येतात का हे ही सांगा प्लीज.
पाऊस फार असतो का नि पर्यटक
पाऊस फार असतो का नि पर्यटक येतात का हे ही सांगा प्लीज.
पाऊस फार असतो परंतू इथला पाऊस वरून पडत नाही. आजुबाजूचा परिसर ढगांत वेढलेला असतो. पन्नास फुटांपलिकडे दिसत नाही. पावसाचे थेंब झाडांच्या पानांवर तयार होऊन खाली ओघळत राहतात. सुखद गारवा, पाय लाल मातीने तांबडे लाल करत भटकायचे. कपडे वाळत नाहीत. रुम स्वस्त.
वीस पंचवीस वर्षांपूर्वी फक्त भटके ट्रेकर येत असत. फक्त एमटिडीसी, खान हॉटेल ( आता पार्क व्ह्यु) ,गिरीविहार उघडे असे. ( महागड्यातील रग्बी.) बाकीचे मुंबईतील मालक खिडक्यांना झापं ठोकून बंद करून जात. संपर्क साधने बंद. चुकून हॉटेलवाल्याचा फोन चालू झाला तर घरी निरोप.
आता कारने/ट्याक्सीने पर्यटक येतात. हॉटेल्स उघडी असतात.
सकाळी ब्रुनपाव मस्का चा हवाच.
ठेंकू
ठेंकू