स्थळ: मेडिसिन डिपार्टमेंट, ससून हॉस्पिटल, पुणे. साल १९७६.
प्रोफेसर सैनानी सरांच्या केबिनबाहेर एक तरुण बसलेला दिसत होता. त्याचा पेहराव व पायातील चपलांवर सांचलेल्या लाल मातीच्या थरावरून तो कोकणातून आल्याचा अंदाज लावणे कठीण नव्हते. हातामध्ये घट्ट धरलेल्या कागदांच्या मोठ्या भेंन्डोळ्यातील कागद काढून वाचण्याचा प्रयत्न चालू होता व त्याच वेळी सरांच्या केबिनचा दरवाजा कधी उघडतो याची उत्सुकतेने वाट पहात होता. मी नेमकी त्यांच वेळी सरांच्या केबिनमध्ये बसलो होतो. नुकताच एम् डी झाल्यामुळे सहांनी त्यांच्या वाॅर्डची जबाबदारी मला सोपवली होती.
"सुरेश, बाहर एक कोई डाॅक्टर बावसकर बैठे है. कोंकणके महाड प्राथमिक आरोग्य केंद्रमें वो मेडिकल आॅफिसर का काम कर रहे है. वहाॅपर स्काॅर्पियन बाईटके बहुत सारे केसेस उन्होने देखे है आैर उसीके बारेमे मेरे साथ चर्चा करनेके लिए वो आये है. आप उनके साथ बात करके फिर मेरे पास रे आना."
"अोके, सर!" संमतीदर्शक मान झुकऊन मी सरांच्या केबिनमधून बाहेर पडलो. बावसकर लगबगीने उभा राहिले.
"डाॅक्टर बावसकर? मी डाॅक्टर शिंदे. सरांनी मला आपल्याशी बोलण्यासाठी सांगितले आहे."
बावसकरांशी हस्तांदोलन करतांना त्याच्या हातांचा कंप मला जाणवला.
"मी डाॅक्टर बावसकर! महाडजवळील बिरवाडी गावाच्या पीएचसीमध्ये मी मेडिकल आॅफिसर म्हणून गेले वर्षभर काम करतो आहे. येथील आदिवासी जनता अगदीच मागासलेली, अशिक्षित आणि गरीब! अक्षरश: खायला कोंडा आणि उशाला धोंडा अशी परिस्थिती! येथील सर्वात मोठी आणि जीवघेणी आरोग्य समस्या म्हणजे, 'विंचूडंख'! या भागामध्ये एक वेगळाच विंचू सापडतो, तांबडा विंचू! हा विंचू डसलेली व्यक्ती हमखास दगावते. येथे शहरासारखे रस्ते, वाहतुकीच्या सोयी नसल्यामुळे रुग्ण दवाखान्यात येईपर्यंत दगावलेला असतो."
मला ही माहिती नवीनच होती. काळ्या विंचवाच्या दंशाने सहसा रुग्ण दगावत नाही. दंश झालेल्या जागी वेदना होतात व एखादे वेदनाशामक इंजेक्शन दिल्याने बरे वाटते.
बावसकर पुढे बोलतच होते,"या विंचूडंखाच्या मुळे होणारा त्रास मी या सर्व केसपेपर्समध्ये लिहून ठेवला आहे. बहुतेक डंख रात्री होतात आणि लहान मुलांना जास्त त्रास होतो. ह्दयक्रिया अतिशय वेगाने चालते, प्रचंड घाम येतो, तोंडाला फेंस येतो आणि मग शुद्ध हरपते. योग्य उपचार न मिळाल्यास थोड्याच वेळात रुग्ण दगावतो."
त्यांनी कागदांवर नोंदविलेली रुग्णांची टिपणे मी नजरेखालून घालत असतांना उत्साहित होउन ते बोलत होते," मी आणखीन एक नवीन निरीक्षण केले आहे. या विंचू चावलेल्या व्यक्तींमध्ये जे पुरुष होते त्यांच्या लिंगास आपोआप ताठरता आलेली दिसत होती. "
बावसकर यांची निरीक्षणशक्ती अफाटच होती. त्यांच्यातील हे गुण डॉ. सैनानींनी ओळखले आणि त्यांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी खास व्यवस्था केली. बावस्करांनी पुढे 'विंचूडंख' या विषयामध्ये संशोधन केले आणि महाड भागातील विंचवाच्या डंखामुळे होणार्या मृत्यूचे प्रमाण तीस टक्क्यांवरून अक्षरशः शून्य टक्क्यांवर आणले. विंचवाच्या विषामुळे हृदय व रक्तवाहिन्यांवर होणारा परिणाम 'अल्फा ब्लॉकर' या औषधामुळे पूर्ण निवारता येतो हे त्यांनी जगाला दाखवून दिले व याबद्दल त्यांच्या संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली.
....पण या विषामध्ये लिंग उद्दीपित करण्याचा गुणधर्म आहे हि गोष्ट मात्र दुर्लक्षितच राहिली.
सन १९७८
मी नुकतीच वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यावेळी पुण्याच्या आसपास वैद्यकीय सेवा फारशा उपलब्ध नव्हत्या. पुण्यातील एमडी डॉक्टर दर आठवड्यातून एकदा पुण्याच्या आसपासच्या गावांमध्ये जावून तेथील डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये पेशंट तपासून सल्ला देत असत. माझे आजोळ कोपरगाव येथे असल्याने तेथील अनेक डॉक्टर माझ्या परिचयाचे होते. दर गुरुवारी तेथील एक प्रथितयश डॉक्टर जाधव यांच्या हॉस्पिटलमध्ये मी पेशंट तपासण्यासाठी जात असे. अनेक प्रकारचे नवनवीन आजारग्रासित पेशंट तेथे पाहण्यास मिळत असत. असाच एक गुरुवार...
मी सकाळी आठ वाजता जाधव हॉस्पिटलमध्ये पोहोंचलो. दरवाज्यातच डॉक्टर जाधवांनी माझे स्वागत केले.
"नमस्कार, डॉक्टरसाहेब ! मी आज आपली मोठ्या उत्सुकतेने वात पहात होतो. एक थोडी विचित्र केस तुम्हाला दाखवायची होती." मला हॉस्पिटलच्या एका स्पेशल रूममध्ये घेवून जात असताना डॉक्टर मला पुढे सांगू लागले. "हा पेशंट पाहते चार वाजताच माझ्याकडे आला आहे." आम्ही तोपर्यंत पेशंटच्या कॉटजवळ पोहोंचलो. सुमारे पंचेचाळीस वर्षांचा एक रुग्ण शरीराचे कोंडाळे करून आणि अंगावर चादर ओढून झोपला होता. त्याच्या शरीरावरील चादर आपल्या हाताने दूर करीत डॉक्टर जाधव पुढे बोलू लागले. "रात्री दहा वाजल्यापासून याच्या लिंगाला ताठरता आली आहे व ती अजूनही कमी झालेली नाही. घरी अनेक गावठी उपाय करून उपयोग होईना तेंव्हा पुढील उपचारांसाठी माझ्याकडे घेवून आले आहेत. मी माझ्या पद्धतीने काही इंजेक्शने दिली व सलाईन सुरु केले आहे पण त्याचा काहीच उपयोग होतांना दिसत नाही. त्याला लिंगामध्ये खूपच वेदना होत आहेत. नातेवाईक देखील खूपच चिंतेमध्ये आहेत. अशी विचित्र केस मी तरी प्रथमच पाहत आहे." आता विचार करण्याची पाळी माझी होती.
पुरुषाचे लिंग हा एक अतिशय चमत्कृतीकारक अवयव आहे. त्याचे अंडाशय व शिस्न असे दोन मुख्य भाग असतात. पुरुषाचे वीर्य हे अंदाशायात तयार होते. त्यातील शुक्रजंतूंची उत्पत्ती होण्यासाठी एक ठराविक तापमान असणे आवश्यक असते व ते शक्य व्हावे म्हणून अंडाशयामध्ये खास स्नायू असतात. थंडीमध्ये अंडाशय आकुंचन पावते व शरीराजवळ येते. तसेच शरीरामध्ये उष्णता वाढल्यास किंवा ताप आल्यास अंडाशय व त्यातील वृषण शरीरापासून दूर जातात. शिस्नाचे काम म्हणजे तयार झालेले वीर्य स्त्री-संबधाच्या वेळी योनीमार्गामध्ये संक्रमित करणे हे असते. त्या क्रियेसाठी शिस्नास थोडा वेळ ताठरता येते व वीर्य स्खलनाचे काम संपल्यानंतर ती ताठरता आपोआप कमी होते. हि ताठरता निर्माण होण्यासाठी निसर्गाने शिस्नामध्ये काही खास व्यवस्था केली आहे. शिस्नामध्ये आपल्या बोटाच्या आकाराच्या तीन नळ्या असतात. या नलिकांमध्ये रक्तवाहिन्यांचे जाळे असते. एखाद्या फुग्यामध्ये हवा भरून तो फुगवावा तसे या नलीकांमध्ये रक्त भरले जाते व त्यामुळे लिंगाला ताठरता येते. वीर्य स्खलनाचे काम संपल्यानंतर हे रक्त पुन्हा या नलिकांमधून बाहेर जाते व लिंग पुन्हा शिथिल होते. हि सर्व क्रिया मेंदू, नसा आणि संप्रेरके म्हणजे हार्मोन्स यांवर अवलंबून असते.
पुन्हा आपल्या विचित्र रुग्णाकडे वळू या. अशा विचित्र ताठरतेची, ज्याला वैद्यकीय परिभाषेमध्ये 'प्रायापिझम' अशी संज्ञा आहे, अनेक कारणे असू शकतात. तसे म्हनावे तर रुग्णाच्या दृष्टीने ही एक मेडिकल इमर्जन्सीच आहे. शिस्नामधून रक्त बाहेर घेवून जाणार्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येणे अथवा रक्त प्रमाणापेक्षा जास्त घट्ट होणे हि त्यातील मुख्य करणे असतात. या रक्त वाहिन्यांच्या आसपास कर्करोगाचा प्रादुर्भाव हेही एक कारण असते. चार तासांपेक्षा जास्त वेळ शिस्नामध्ये रक्त राहिल्यास ते गोठते व त्याच्या गाठी तयार होतात आणि या गाठी शस्त्रक्रिया करून त्या काढाव्या लागतात व त्यानंतरच हि ताठरता कमी होते. अर्थात या शस्त्रक्रियेनंतर अशा दुर्दैवी रुग्णाचे लिंग पुन्हा ताठ होवू शकत नाही.
आपल्या पेशंटला हा त्रास का झाला याविषयी दुसरी एक धक्कादायक माहिती डॉक्टर जाधव यांनी सांगितली.
"ह्या पेशंटला शीघ्र वीर्य पतनाची व्याधी होती. त्याने कोठून तरी एक रबराची अंगठीसदृश रिंग पैदा केली होती. काल रात्री लिंग उत्थापित झाल्यानंतर त्याने हि रिंग शिस्नाच्या मुळाच्या भागावर चढवली होती. बराच वेळ समागम झाल्यानंतर व स्खलन झाल्यानंतर जेंव्हा रिंग काढली तेंव्हापासून हि ताठरता तशीच आहे."
"अरे देवा, त्या रिंगमुळेच हा घोटाळा झालेला दिसतो आहे. जास्त वेळ रक्त लिंगामध्ये राहिल्यामुळे आणि कदाचित रक्त जास्त घट्ट असल्यामुळे याच्या शिस्नामध्ये रक्ताच्या गाठी झालेल्या असाव्यात व त्यामुळे आता शस्त्रक्रियेशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही." मी म्हणालो.
मी डॉक्टर जाधव आणि पेशंटचे नातेवाईक यांच्याशी हि सर्व चर्चा केली. एका कागदावर चित्र काढून नेमका काय दोष झाला आहे व काय करावे लागणार याची कल्पनाही दिली. त्यावेळी हि शस्त्रक्रिया फक्त पुण्यातच होत असे. शिवाय खर्चाचा प्रश्न होताच ! या पेशंटला देवाप्रमाणे मदत करू शकतील असे एकाच नाव माझ्या नजरेसमोर उभे होते आणि ते म्हणजे ससूनमधील मानद मूत्ररोग शल्यविशारद डॉक्टर शिवदेव बापट! आम्ही तातडीने फोनवरून सरांशी संपर्क साधला. सरांनीही ताबडतोब पेशंट पाठवा व मी लगेच शस्त्रक्रिया करतो अशी हमी दिली आणि आमचा हा विचित्र पेशंट पुढच्या एसटीने पुण्याला रवाना झाला आणि मी हि पुढच्या कामाला लागलो.
सन १९८०
माझ्या खाजगी वैद्यकीय व्यवसायाचे सुरुवातीचे दिवस होते ते. अनेक डॉक्टर मित्रांनी या काळामध्ये मला मदत केली. अशा मित्रांपैकी एक डॉक्टर विजय हेमगुडे. पुण्यातील शुक्रवार पेठेमध्ये यांचे एक नर्सिंग होम होते. एके दिवशी सकाळीच त्यांचा फोन आला.
"सुरेशराव, माझ्याकडे एक सिरियस केस आली आहे. हा सुमारे पंचवीस वर्षाचा तरुण मुलगा आहे. काल रात्री जेवणापूर्वी दारू प्याला होता. तेन्हापासून पोटात दुखू लागले आणि उलट्या सुरु झाल्या म्हणून माझ्याकडे आणले होते. गेल्या तीन तासांमध्ये तीन सलाईन गेलेत पण बिपी अजूनही वर येत नाही. इसीजी काठाला आहे त्यात खूपच अनियमितता दिसते आहे. हृदयाचे ठोके खूपच अनियमित आहेत. मला जर काळजी वाटते आहे. मी गेले चार तास येथेच आहे. आपण प्लीज जर लवकर आलात तर बरे होईल."
पुढील काही मिनिटांतच मी हेमगुडे हॉस्पिटलमध्ये होतो.
पेशंटचा इसीजी फारच अबनॉर्मल होता. हृदयाचे ठोके खूपच चुकत होते. नेहेमी हृदयाचे स्पंदन सुरु होतांना हृदयातील एसए-नोड नावाच्या भागात एका विद्युतलहरीच्या स्वरुपात सुरु होते व हि लहर हृदयाच्या चारही कप्प्यांमध्ये पसरते व स्नायूंना चेतना देते व अशा प्रकारे एक नॉर्मल ठोका तयार होतो. या पेशंटच्या इसीजीचा अभ्यास केला असता त्याच्या हृदयाची संवेदन-क्षमता खूपच वाढल्यामुळे त्याच्या हृदयाच्या चारही कप्प्यांमध्ये विद्युत लहरी तयार होवून अनियमित ठोके तयार करताना दिसत होते. त्यामुळेच त्याच्या हृदयाचे काम कमी होवून बीपी कमी झाले होते. आपला रुग्ण तरुण असल्याने हृदयविकाराची शक्यता कमी होती. दारूमुळे असे होण्याची शक्यता नव्हती. ती जास्त विचार करण्याची वेळ नव्हती. आम्ही ताबडतोब हृदयाची क्रिया नियंत्रित करण्यासाठी झ्यालोकेन हे इंजेक्शन शिरेतून दिले आणि पुढील काही क्षणांतच त्याची हृदयक्रिया नॉर्मल झाली. अनादिकाळापासून सुरु असलेले हृदय-संगीत पुन्हा सुरु झाले. पुढील काही वेळातच त्याची तब्बेत पूर्ण सुधारली. हृदयावर असा परिणाम का व्हावा हे कोडे मात्र उलगडले जेंव्हा त्याने त्याची कहाणी सांगितली. कोठल्यातरी पिवळ्या पुस्तकामध्ये वाचल्याप्रमाणे आपण एका रात्रीमध्ये पाच सहा वेळा समागम करू शकत नाही व आपल्यामध्ये पुरुषत्व कमी आहे असे त्याला वाटत असे. त्याने कोठूनतरी एक 'पलंगतोड' गोळी पैदा केली होती व दारूमध्ये मिसळून ती रात्री घेतली होती. डॉक्टर मार्डीकर नावाचे औषधशास्त्रातील तज्ज्ञ माझ्या परिचयाचे होते. आम्ही लगेच त्यांना फोन लावून या गोळ्यांची व अशा दुष्परिणामांविषयी चौकशी केली. ते काय म्हणाले ते त्यांच्या शब्दांतच सांगतो.
"आपल्या समाजामध्ये लैंगिक ज्ञानाचा अभाव असल्यामुळे भोंदू लोक त्याचा नेमका फायदा घेतात. अशा गोळ्यांमध्ये काही झाडपाल्याचा अर्क असतो. या अर्कामध्ये नैसर्गिक अल्कलाॅयिड्स असतात ज्यांचा आपल्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. अर्थात त्याचे औषधशास्त्रानुसार प्रमाणीकरण झालेले नसते व त्यामुळे ओव्हरडोस होण्याची शक्यता असते जसा तुमच्या पेशंटला झालेला दिसतो. तुमच्यापर्यंत वेळीच पोहोन्चल्यामुळे तो वाचला हे मात्र खरे."
अशा प्रकारच्या गोळ्यांच्या जाहिराती तर वर्तमानपत्रांमध्ये अनेकदा आपण वाचत असतो पण त्याचे असेहि 'परिणाम' आपल्यापर्यंत पोहोन्चत नाहीत. आजपर्यंतच्या माझ्या वैद्यकीय प्रवासात असे अनेक प्रसंग मी अनुभवले जे केवळ लैंगिक शिक्षणाचा अभाव, अनावश्यक आणि अतिलज्जा, गरिबी व अंधश्रद्धा यामुळेच असेच म्हणावे लागेल.
लैंगिक औषधशास्त्रविश्वामध्ये क्रांती घडवलेल्या व्हायग्रा या बहुचर्चित औषधाविषयी काही मनोरंजक व उदबोधक माहिती घेवू या पुढील भागामध्ये ....क्रमशः
डॉ.साहेब, पुन्हा एकदा तुमच्या
डॉ.साहेब, पुन्हा एकदा तुमच्या अद्वितीय लेखनाची जादू अनुभवास आली - अनेकानेक धन्यवाद ...
डॉ. साती - तुम्हीदेखील तुमचे वैद्यकिय क्षेत्राशी निगडित अनुभव लिहावेत ही विनंती ...
लेख आवडला.
लेख आवडला.
नेहमीप्रमाणे माहितीपुर्ण आनि
नेहमीप्रमाणे माहितीपुर्ण आनि मस्त लेख
डॉ.साती च्य पोस्ट ही आवडल्या.
मस्त लेख
मस्त लेख
नेहमीप्रमाणेच छान किस्से
नेहमीप्रमाणेच छान किस्से !
साती तुमची पण चंची उघडा की .
सुंदर
सुंदर लेख.
डॉ.बाविस्करांबद्दलची माहितीही मस्त.
मस्त आहे लेख एकदम.
मस्त आहे लेख एकदम.
धन्यवाद डॉ. शिन्दे... तुमचा
धन्यवाद डॉ. शिन्दे... तुमचा प्रत्येक लेख मी आवर्जुन वाचतो, छान माहिती...
<<<<<<<उत्कृष्ट लेख. डॉक्टर,
<<<<<<<उत्कृष्ट लेख. डॉक्टर, आपण तज्ज्ञ तर आहातच पण सेवाव्रती आहात आणि उत्तम लेखकही आहात. आपले लेख बोर्डावर पाहिले की कधी चुकवत नाही. याही लेखात उत्कंठा आणि ओघ छान राखला आहे. किचकट माहितीसुद्धा कधीच बोजड वाटत नाही.
डॉ. साती, आपल्याकडेही अनुभवांची पोतडी आणि उत्कृष्ट लेखनशैली आहे. आपण या विषयावर लिहावेच. आपला जो लोकप्रबोधनाचा धर्म, तोही यातून साधेल.>>>>>>>>>>>>
हिरा यांना १००% अनुमोदन.
सुंदर लेख.
सुंदर लेख.
सुंदर लेख आणि डॉ. सातीचे
सुंदर लेख आणि डॉ. सातीचे प्रतिसादही.
डॉ. बावीस्करांबद्दल सविस्तर लेख वाचल्याचे आठवतेय.
छान लेख ,पुरुषस्वास्थ्यासाठी
छान लेख ,पुरुषस्वास्थ्यासाठी मोहेम्बर नावाचा उपक्रम जगभर चालवला जातो,मायबोलीवर त्यानावे ग्रुपही आहे ,तिथे हा लेख हलवल्यास चालेल.
सुंदर, अभ्यासपूर्ण लेख. अशा
सुंदर, अभ्यासपूर्ण लेख.
अशा कुठल्या झाडपाल्यांमध्ये नैसर्गिक अल्कलाॅयिड्स असतात ज्यांचा आपल्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो हे सुद्धा सांगितल्यास बरे होईल. त्यांपासून लोक सावध रहातील.
फारच सुरेख लेखन... शैली पण
फारच सुरेख लेखन... शैली पण सुरेख.!!!
साती ... बाई तु पण लिहि ग !!!!
संशोधक.....
सद्ध्या मुलांनाही लैंगिक शिक्षणाचे वर्ग शाळां मधुन होतात. पण ते किती सीरीयसली घेतात ते माहित नाही. सध्याच माझ्या मुलीच्या शाळेत ८ वी आणि ९वी च्या मुला मुलींना वेगवेगळे लेक्चर्स अॅरेंज केले होते. मुलींच्या वेळी खुपच छान प्रश्न उत्तरे झाली. मुलींनी आपल्या पाळीच्या आणि इतर सामाजिक त्रासाच्या घटना मोकळे पणे मांडल्या. दिड तासाचे सेशन २.५ तास रंगले. पण दुसर्या दिवशी मुलांना लेक्चर होते. मुलांनी अजिबात सीरीयस्ली ऐकले नाही. शेवटी प्रिन्सीपल नी लेक्चर १ तासात गुंडाळुन टाकले. खुप ओरडल्या. मुले आपापल्या वर्गात गेली. माझ्या मुलीच्या शेजारच्या बेंच वरची मुले एकामेकात कुजबुजत होती.. " अरे त्या डॉक्टर ला शिकवला असता मी.... त्याला **** ला काय पण सांगता येत नव्हते... त्याला म्हणाव बडबडण्या पेक्षा पिक्चर दाखव!!!!!"
इकडे मी जजमेंटल होत नाहिये किंवा जनरलाईज पण करत नाहिये... तरीही एका मध्यम्वर्गीय शाळेतिल साधारण मुलांचे हे बिहेवीअर आहे. ज्याने लेक्चर दिले तो माझा मित्र आहे. त्याच्याशी नंतर बोलताना तो म्हणाला कि या पेक्षा मुलांचे भारी किस्से आहेत. एकाने तर त्याला " तुम्ही पेशंटला व्हायग्रा का नाही रेकमेंड करत?" असं विचारलं होतं. तर दुसर्याने "दिवसातुन कितीवेळा केल्यावर बाई खुश होते?" हे विचारलं होतं. आर्थात मुलीही कमी नाहित. लेकीच्या वर्गातल्या मुली सुद्धा त्या मुलांच्या चावट जोक वर हसत होत्या.....
स्वस्तातल्या करमणुकीचे बळी जागोजागी दिसतात.
जो पर्यंत आपलं पौरुष्य त्या एकाच अवयवाने सिध्ध होतं आणि आपल्या मर्जी प्रमाणे आपण तो अवयव वापरु शकतो हे जो पर्यंत डोक्यातुन जात नाही, तो पर्यंत हे असे किस्से होतच रहाणार.
सर गेल्या तीन वर्षात तुम्ही
सर गेल्या तीन वर्षात तुम्ही काहीही लिहिलेले नाहि. आम्हि अजुनही प्रतीक्शेत आहोत.
साती यांची प्रोफाइल ओपन का
साती यांची प्रोफाइल ओपन का होत नाही?
साती यांचे लेखन : https://www
साती यांचे लेखन : https://www.maayboli.com/user/6724/created
चांगले लिहिणारे ब्लॉक का होतात, कुणामुळे होतात? डुप्लिकेट आयडी घेऊन नाचणारे आपल्या विकृत मनोरंजनापोटी चांगल्या लिहित्या लोकांना त्रास देऊन देऊन अंत बघतात, प्रशासक मग डुप्लिकेट आयडी ऐवजी, लिहित्या लेखकांना हाकलून लावतात.. मायबोलीची शोकांतिका
मायबोलीची शोकांतिका... +100
मायबोलीची शोकांतिका... +100
खरे आहे.. साती, दिनेशदा, शाली, महाश्वेता, अशी कितीतरी नावे घेता येतील.
रानभुली पण छान लिहायची.
रानभुली पण छान लिहायची. च्रप्स आयडीने वात आणून त्रास दिला तिला.
Pages