काल एका मुलीने माझा फोटो काढला.

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 May, 2019 - 16:54

उभा जन्म मुंबईत गेल्याने रिक्षा नामक तीन चाकी वाहनाशी दोन हात करायचा प्रसंग फारसा आला नाही. त्यातही शेअर रिक्षा या प्रकारापासून मी चार हात लांबच राहतो. कारण त्यात आपल्यासोबत आणखी चार-सहा हात बसवतात. ज्यांच्याशी आपली ओळख ना पाळख अश्यांसोबत एकाच रिक्षात खेटून प्रवास करायला नाही म्हटले तरी जरा संकोचच वाटतो. त्यातही जर दोन मुलींच्या मध्ये बसायची वेळ आली तर आणखी अवघड होते. तसे पाहता ईयत्ता पहिली ते चौथी दोन मुलींच्या मध्ये बसूनच मी माझे प्राथमिक शिक्षण पुर्ण केले आहे. पण तेव्हाचा काळ वेगळा होता. तेव्हाची लोकं भोळी होती. तेव्हाचे मन निरागस होते. पण आता मात्र....

असो, तर ईथे विस्तव तिथे शेकोटी. मधले लोणी पार विरघळून ताक झाल्यास नवल नाही. ज्यांना हे रोजच्या सवयीचे आहे त्यांचे ठिक असते, पण नसते एखाद्याला सवय तर नाही जमत. आज अशीच अग्नीपरीक्षा माझ्यातल्या रामाला द्यावी लागली. पण हे मोबाईलयुग असल्याने भलतेच रामायण घडले.

तर झाले असे,
मीटर रिक्षाची एक रांग होती आणि शेअर रिक्षाची एक रांग होती. मीटरची रांग मोठी होती आणि शेअरची रांग छोटी होती. मी जरा घाईत असल्याने शेअरने जायचे ठरवले. एका रिक्षात मागे तीन प्रवासी आणि पुढे ड्रायव्हर, आणि त्याच्या मांडीला मांडी लाऊन आणखी एक प्रवासी. असे एका रिक्षात टोटल पाच रहिवाशी. बहुधा रिक्षाचा पुढे होणारा निमुळता आकार लक्षात घेता, तिचा गुरुत्वमध्य आणि पॅसेंजरचा गुरुत्वमध्य यातील eccentricity कमीत कमी राखायला अशी पाच-तीन-दोन व्यूहरचना गरजेची असावी. तसेच सारे रिक्षावाले ईथून तिथून मिथुन किंवा गेला बाजार येण्णा रास्कला रजनीकांत असल्याने स्टेअरींगच्या उजव्या बाजूला बसून रिक्षा चालवणे त्यांच्या डाव्या हाताचे काम असावे. बहुधा रिक्षावाल्यांना लायसन देताना अश्या अवस्थेत रिक्षा चालवायची चाचणी मस्ट असावी.

असो. तर आम्हा पाच जणांचे लगेज भरताच लगेच ती रिक्षा भरघाव सुटली. जेवढ्या कमी वेळात एक फेरी पुर्ण तितका धंदा जास्त असे काळ काम वेगाचे साधेसोपे गणित असावे. रिक्षावाला ना सिग्नल पाळत होता. ना खड्डे टाळत होता. हातात दही घेऊन बसलो असतो तर ताक झाले असते, केळी घेऊन बसलो असतो तर शिकरण झाले असते, वांगी घेऊन बसलो असतो तर भरीत झाले असते. मी मुठीत जीव घेऊन बसलो होतो. त्याचे पाणी पाणी होत होते. रिक्षा वाशीची होती आता आम्हीही रिक्षावासी झालो होतो. बाजूने सानपाड्याचा रेल्वेट्रॅक दिसत होता. माझी स्मरणशक्ती मला दगा देत नसेल तर गुलाम चित्रपटातील आमीर खान आणि मंडळी दस दस ची दौड हा खेळ ईथेच खेळले होते. कदाचित रिक्षासोबत स्पर्धा करायची हिंमत नसल्याने त्यांनी ट्रेनचा सोपा पर्याय निवडला असावा. पण चक्राऊन तर मी तेव्हा गेलो जेव्हा वाशीहून सुटलेल्या ट्रेनला आमच्या समांतर चाललेल्या रिक्षाने केव्हाच मागे टाकले होते.

आता रिक्षाने वळसा घेत मेन रोड पकडला होता. आजूबाजूच्या अवजड वाहनांशी स्पर्धा करत रिक्षा पळत होती. शेजारून त्यांचे मोठाले टायर छातीत धडकी भरवत जात होते. ते पाहून मी जरा बाजूला सरकलो तसे तिकडची मुलगी अंगावर खेकसली. मी पुन्हा सावधपणे मधोमध बसलो.
रिक्षावाल्याला म्हटलं, जराआतल्या रस्त्याने घे राजा.
त्यावर तो म्हणाला भाऊ तिथे ट्राफिक असतो. आणि ट्राफिक हवालदार सुद्धा असतो. चौथा पॅसेंजर पकडला जाईल.
मी म्हटलं हमम, मी यातला एक्स्पर्ट तर नाही. पण.....
जर ट्राफिक असेल तर त्याचा एक फायदा सुद्धा आहे, आपण ट्राफिक हवालदाराला दिसणार नाही.
तसे त्याने एकवार मागे पाहिले. माझी खिल्ली उडवली. आणि पुन्हा रिक्षा भरघाव सुटली.

पुढच्या सिग्नलला मात्र त्याने गाडी आतल्या गल्लीत घेतली. आधी माझी तो कसोटी घेत होता, आता गल्ली क्रिकेट सुरू झाले. तिथे क्रिकेटमध्ये एकच आफ्रिकेचा एबी डीविलिअर्स मिस्टर ३६० डिग्री म्हणून ओळखला जातो. ईथे दर दुसर्‍या गल्लीतील तिसरा रिक्षावाला त्यासाठी प्रसिद्ध असतो. जो जागच्या जागी पुढचे चाक ३६० अंशात वळवू शकतो. कमालीचे हातपाय अ‍ॅण्ड आय कोऑर्डीनेशन. आपल्याला देखील आपली आय आठवते. मलाही माझी आठवली. त्या रिक्षाच्या मागे "आईचा आशीर्वाद" असे कोणासाठी लिहिले होते त्याचा उलगडा झाला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. अचानक एका बेसावध क्षणी रिक्षा उसळली आणि मी डावीकडच्या मुलीवर हलकेच कोसळलो...

तिने एक तुसडा कटाक्ष टाकला तसे मी घाबरून उजव्या बाजूला सरकलो. एक कोपरखळी तिकडून पोटात बसली.
ठिक से बैठा करो, बीच के सीट पे क्यू बैठे हो, एक साईडमे नही बैठ सकते थे..
हायला! हे असे सुद्धा असते का? मी रांगेत जसा मान खाली घालून आय मीन मोबाईलमध्ये डोकं खुपसून उभा होतो तसाच आत चढलो होतो. पुढच्यामागच्या डावीउजवीकडच्या जगाची पर्वा करायची असते हे माझ्या ध्यानीमनीही नव्हते.
वाद घालण्यात अर्थ नव्हता. मी जितके अंग चोरून बसायचा प्रयत्न करत होतो तितके रिक्षा मला जास्त उसळवत होती. थोडा ओळखीचा भूभाग दिसताच मी रिक्षावाल्याला रिक्षा बाजूला घ्यायला लावली. शेअरचेही वीस रुपये झाले होते. कसली महागाई वाढली आहे. मीटररिक्षाने एकट्यादुकट्याने प्रवास करायलाच नको.

मी रिक्षातून खाली उतरून पाकिटात हात घालून पैश्यांची जमवाजमव करत असताना सहज माझे लक्ष रिक्षात बसलेल्या मुलीकडे गेली. तिच्या मोबाईलचे तोंड माझ्या दिशेने वळलेले, मुद्दामच वळवलेले मला स्पष्ट दिसत होते. काय करत असावी? माझा फोटो? माझा फोटो काढत असावी? वीजेच्या वेगाने लखकन विचार डोक्यात चमकला आणि माझी स्थिती डोक्यात वीज कोसळल्यासारखीच झाली. आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी माझा फोटो काढत होते आणि मी ईस्माईल देत नव्हतो. पुरेसा प्रकाश, हल्लीच्या मोबाईल कॅमेर्‍यांची क्लॅरीटी, त्या मुलीचा सराईतपणा आणि तिच्या चेहर्‍यावरील तुसडेपणाच्या भावाच्या जागी आता दिसणारा खट्याळपणा हेच सांगत होते की उद्या माझे पोस्टर सोशलसाईटच्या भिंतीभिंतीवर छापले जाणार होते. सोबत एखादी पोस्ट.! काय असेल? रिक्षात खुलेआम छेडछाड करणार्‍या एका मवाल्याचा मुलीने चपळाईने प्रसंगावधान दाखून टिपला फोटो. मग तीच पोस्ट कसलीही शहानिशा न करता छोट्यामोठ्या वृत्तपत्रात बातमी म्हणून झळकणार. काही स्वयंघोषित हौशी पत्रकार माझ्या घरी टपकणार. त्या मुलीची जात निघणार, माझा धर्म निघणार, रिक्षावाल्यांचा प्रांत निघणार, खाया पिया कुछ नही पण ईज्जतीचे वाभाडे निघणार. प्रकरणाला राजकीय वळण लागले तर मायबोलीवरही धागे झळकायला वेळ लागणार नाही. ती वेळ यायच्या आधीच आपणच का नाही धागा काढून आपली बाजू क्लीअर करावी म्हणून हा लिखाणप्रपंच !

थॅंन्क्स अ‍ॅण्ड द रिगार्ड
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अलभ्य लाभ ऋ भौ
किती दिवसांनी लेखन वाचायला मिळाले... खुप सारे धन्यवाद Happy

आणि फोटो आला तर आला हाकानाका तसेही इकडे सगळ्यांच्या मनात असेच वाटेल की चला ह्यानिमित्ताने ऋ ला खरोखरचे पहायला तरी मिळेल Light 1
आणि फोटू छापुन आला तरी प्रत्यक्षात राव कोण बी तुम्हास्नि पकडणार हाय व्हय ( डॉन को पकड़ना मुश्किल ही नही नामुमन्किन है ... विसरला व्हय )

कैच्याकै आहे हा धागा.>>>+११११११११११

मजा नाही आली, अती फेकूगिरी वाटतेय

मुळात शेअर रिक्षात दोन मुलींमध्ये पुरुष बसूच देत नाहीत मुली. तिथेच हटकले असते अन साईडला टाकले असते

Welcome back ... मस्त लिहिलं आहेस... काही पंचेस भारी जमून आलेत

च्रप्स, नाही , आमच्याकडे शेअर रिक्षा आहेत, मध्ये बसायला कोणाला आवडायचा प्रश्न नाहीये, दोन पुरुष किंवा दोन स्त्रियां असतील तर ते एकत्र बसतात अन तिसरी व्यक्ती कोणत्याही एका साईडला, कारण असे दोघांत कोणी तिसरे बसले की सगळे अवघडतात अन म्हणूनच न लिहिलेला नियम आहे हा जो न कुरकुर करता पाळला जातो☺️

अन एखादा गेलाच शहाणपणा करत मधे बसायला तर त्याला हटकले जाते

दोघांत कोणी तिसरे बसले की सगळे अवघडतात अन म्हणूनच न लिहिलेला नियम आहे हा जो न कुरकुर करता पाळला जातो☺️>>>> +१.

दोन पुरुष किंवा दोन स्त्रियां असतील तर ते एकत्र बसतात अन तिसरी व्यक्ती कोणत्याही एका साईडला, कारण असे दोघांत कोणी तिसरे बसले की सगळे अवघडतात अन म्हणूनच न लिहिलेला नियम आहे हा जो न कुरकुर करता पाळला जातो >>++७८६

शेजारून त्यांचे मोठाले टायर छातीत धडकी भरवत जात होते. ते पाहून मी जरा बाजूला सरकलो >> याचा अर्थ हा कडेला बसला असणार. Proud

दोघांत कोणी तिसरे बसले की सगळे अवघडतात अन म्हणूनच न लिहिलेला नियम आहे हा जो न कुरकुर करता पाळला जातो>>> मी सांताक्रुझ ते विद्यापीठ अनेकदा शेअरिंगने प्रवास करतो, हा नियम कोणीच नाही पाळत. मलाही अंग चोरुन बसण्याची सवय झालीये. आणि घाईत by default जी जागा मिळते ती घेऊन आम्ही मोकळे होतो. साकी नाका मेट्रो ते बुमरँग सारखीच परिस्थिती. बाकी नवी मुंबईत माहिती नाही...

धागा वाचून ज्ञानात पडलेली मोलाची भर -

  • शेकोटीच्या उष्णतेने लोणी वितळून त्याचे तूप होत नाही तर विरघळून ताक होते.
  • रिक्षाच्या धक्क्यांनी हातातले दही - ताक बनते, केळी - शिकरण होतात, वांगी भरीत बनतात. मुठीतला जीव पाणी पाणी होतो. रिक्षा वाशीची होते.
  • मराठी लेखनाखाली मराठीत सही करताना मराठी थँक्स अँड द रिगार्ड लिहितात.

ऋन्मेषचा धागा असल्यामुळे कसलीही निराशा झाली नाही. नेहमीप्रमाणेच फेकमफाक.
मुंबई/ नवी मुंबई/ठाणे ईथे रीक्शावालाच सांगतो कि उतरुन साईडला बसा >>>> +१ इथेच सगळ लॉजिक गंडलय. Happy

दोन बायकांच्या मध्ये कधीच पुरुषांनी बसू नये आणि दोन पुरुषांच्या मध्ये कधीच ladies नी बसू नये .
सर्वांसाठी च त्रासदायक वाटत ..
काही मुली खूप बिंदास्त असतात पुरुष जरी बाजूची सीट share karat असेल तरी unconfart होत नाहीत .
आणि त्याच खऱ्या 21 शतकातील शोभतात आणि पुरुष सुधा अशा स्त्रियांनाच respect सुधा देतात
काही जास्तच स्मार्ट असतात पुरुष बाजूला बसला म्हणजे आता गैरफायदा च घेणार अशी भावना चेहर्या वर नेहमी असते अशा वेळेस आपणच मध्ये 6 इंच जागा ठेवायची . चेहऱ्यावर काय काय भावनेचं मिश्रण बघायला मिळेल

मुळात शेअर रिक्षात दोन मुलींमध्ये पुरुष बसूच देत नाहीत मुली. तिथेच हटकले असते अन साईडला टाकले असते
>>>>

रिक्षा आणि त्यातही शेअर रिक्षा या माझ्या आयुष्यात जॉबला लागल्यावरच आल्या. त्याआधीचे आयुष्य टॅक्सीने फिरण्यातच गेले. त्यामुळे ईथल्या कोणाचे रिक्षा अनुभव माझ्यापेक्षा जास्त असतील तर त्यांच्या अनुभवी मताचा आदर आहे.

पण ...

प्रत्येक भूभागाची शेअर रिक्षा संस्कृती वेगळी असते. आपण आपले अनुभव घेऊन त्यालाच प्रमाण मानून जाणे चूकच.

माझ्या अनुभवानुसार दोन महिलांमध्ये पुरुषाला बसायला काही हरकत नसेल तर ईथल्या महिलांची काही हरकत नसते. महिला स्वत: मात्र दोन पुरुषांच्या मध्ये बसायला टाळतात, पण अशी दोन पुरुषांच्या मध्ये बसलेली महिलाही पाहिली आहे.

माझ्या मित्राच्या सांगण्यानुसार त्यांच्याईथे (वेस्टर्न मुंबई) कॉलेजच्या पोरी रिक्षावाल्याच्या बाजूलाही चौथा पॅसेंजर म्हणून बिनधास्त बसतात. आता बोला Happy

मुंबई/ नवी मुंबई/ठाणे ईथे रीक्शावालाच सांगतो कि...
>>>>
तुम्हाला मुंबई ऊपनगर बोलायचे आहे का?
मुंबईत रिक्षा नसते. किंबहुना जिथे रिक्षा सुरू होते तिथे मुंबई संपते Happy

अजून लेख वाचला नाही,थोड्या वेळाने निवांत वाचेन,पण तुझा लेख म्हणून मुद्दाम प्रतिसाद द्यायला आले,लेख हलकफुलका असणारच,खूप दिवसांनी लिहिते झाल्याबद्दल धन्यवाद

धागा वाचून ज्ञानात पडलेली मोलाची भर -
शेकोटीच्या उष्णतेने लोणी वितळून त्याचे तूप होत नाही तर विरघळून ताक होते.
>>>>

ती उपमा होती.
तो आतिशयोक्ती अलंकार होता.
यात तुम्ही सूट घेऊ शकता.

मात्र किस्सा जसा घडला तसा दिला आहे. काही हलकेसे तपशील ईकडचे तिकडे केले आहेत ते गोपनीयता राखायला. पण त्याने घटनेच्या गाभ्याला धक्का लागत नाही.

धागा वाचून ज्ञानात पडलेली मोलाची भर -
मराठी लेखनाखाली मराठीत सही करताना मराठी थँक्स अँड द रिगार्ड लिहितात.
>>>>>>

आपल्या लिखाणात एकही ईंग्रजी शब्द न वापरणारा लेखक आजच्या जमान्यात विरळाच. मला आवडेल त्याचे दर्शन घ्यायला Happy

पद्म आणि राजेश
आपण आपले अनुभव शेअर करून ईथल्या काही लोकांचे गैरसमज दूर केलेत याबद्दल धन्यवाद.
हेच मी वर सांगत होतो. आपलेच अनुभव प्रमाण मानायची घाई करू नका. मायबोलीची हीच तर खासियत आहे की ईथे विविध स्तरांतून प्रांतातून लोकं आपापले अनुभवाचे गाठोडे ईथे रिकामे करतात आणि सर्वांच्याच सामान्यज्ञानात भर टाकतात.

शेजारून त्यांचे मोठाले टायर छातीत धडकी भरवत जात होते. ते पाहून मी जरा बाजूला सरकलो >> याचा अर्थ हा कडेला बसला असणार.

>>>>>

सूक्ष्म वाचन अचूक निरीक्षण! दद देतो. मायबोलीला अश्याच वाचकांची गरज आहे.
फक्त निष्कर्श काढण्यात थोडा उतावीळपणा झाला आहे.

समजा मी बसमध्ये बसलो आहे. खिडकीवर नाही तर बाजूला. अचानक बसच्या खिडकीवर एक पाल सळसळली तर खिडकीवरचाच माणूस दचकायला हवे असे नाही. शेजारचा पालीला घाबरणारा मी देखील ती जागा सोडून पळू शकतोच.
रिक्षावाल्याने ट्राफिक हवालदारापासून वाचायला रिक्षा हायवेला घेतली. माझ्यासाठी हे नवीन होते. त्या अवजड वाहनांचे मोठाले टायर रिक्षा बाहेर असे आय लेव्हलला बघून मी उत्स्फुर्तपणे विरुद्ध दिशेला सरकलो. जेणेकरून ते अवजड वाहन कलंडले तर मी दुसरीकडून उडी मारून पसार होईन. अर्थात प्रत्यक्षात तसे झाले तर पसार व्हायला वेळ मिळणे अशक्यच. पण ती त्यावेळची मनाची स्थिती असते. याला तुम्ही हेवी वेहिकल फोबिया सुद्धा म्हणू शकता.

मुंबईत रिक्षा नसते. किंबहुना जिथे रिक्षा सुरू होते तिथे मुंबई संपते>> बरोबर... रिक्षा फक्त सायन पर्यन्त असते मग मुंबई सुरु होते.. फक्त उपनगरांमध्ये रिक्षा चालतात.

Pages