दहिसर नदीची आणि माझी भेट पहिल्यांदा २७ वर्षांपूर्वी झाली. तेव्हा माझ्या कॉलेजची मैत्रीण दहिसरला राहायची. एकदा आम्ही तिच्या घरी गेलेलो. दहिसर तेव्हा अगदीच गाव होते. तिचे घर रेल्वे स्टेशनसमोरच्या गल्लीमध्ये होते. २-३ दुमजली इमारतीमधील एक इमारत तिच्या बाबांनी बांधलेली. घराबद्दल सांगताना ती म्हणाली ह्या गल्लीतून पुढे गेले की नदी लागते. मला खरतर तेव्हा हसूच आलेले. २००५ पर्यन्त बऱ्याच मुंबईकरांना मुंबईत ३-४ नद्या आहेत हे माहीतच नव्हते. मीदेखील त्यातलीच.
२००० साली माझ्या बहिणीसाठी घर बघायला परत एकदा आम्ही दहिसरला आलो आणि पहिल्यांदाच नदीला बघितले. त्यावेळेस खरेतर पावसाळी दिवस नसल्याने पाणी बिलकुल नव्हते. साधारण २५-३० फुट रुंदीचा लांबलचक खोलगट पट्टा दिसला आणि बिल्डरच्या माणसाने नाला म्हणूनच तिची ओळख करून दिली. तरीही खिडकीसमोरच दुसऱ्या कुणाचा किचन बघायला लागू नये म्हणून आम्हाला नाल्याच्या बाजूची खोली आवडली. बहिणीने नाही पण आम्ही ते घर घेतले आणि गेली १८ वर्षे राहत आहोत. त्याकाळात कार्यालयीन घाईच्या दिवसांमध्ये नदीकडे तितके लक्ष नसे. तिचे अस्तित्व फक्त पावसाळ्यात जाणवे. पलीकडच्या तीरावर एक दोन झोपड्या होत्या. होळीला ते लोक त्यांची खासगी होळी तिये पेटवत. नदीच्या आमच्या बाजूला बिल्डरने रस्ता बांधलेला आणि रस्त्याच्या मजबूतीसाठी भिंत बांधली होती. पलीकडचा तट मोकळा होता. त्याकाळातल्या एवढ्याच आठवणी आहेत.
२००५ साली पहिल्यांदा तिचे खरे रौद्र रूप सगळ्यांनी बघितले. आमची इमारत थोड्या उंचावर असल्याने आमच्या आवारात पावले बुडतील इतकेच पाणी आलेले पण नदीच्या पुढच्या टप्प्यात बऱ्याच वसाहतींमध्ये पहिल्या मजल्यापर्यंत पाणी चढलेले असे समजले. झोपडीवजा घरांत राहणाऱ्या लोकांचे तर हालच होते. तेथून पुढे नदीचे नैसर्गिक रूप बदलण्यास सुरुवात झाली. शासकीय पातळीवर तसेच वर्तमानपत्रे, टीवीवर २००५च्या पुराची बरीच चर्चा झाली आणि कधीतरी नदीला दोहो बाजूनी बांधण्याचे ठरले. कातळ फोडणारी मोठी मोठी मशीन्स आणून नदीच्या बांधावर खोल चर खणून मजबूत भिंती दोन्ही बाजूला बांधल्या. पावसाळी महिने सोडता इतर दिवसात आता ती खरीच नाल्यासारखी वाटायला लागली.
२०११-१२ च्या सुमारास एका पक्षीनिरीक्षण सहलीला गेल्यानंतर निसर्गाचे माझे निरीक्षण वाढले. अचानक नदीमध्ये नवी जीवसृष्टी आहे हे जाणवले. पावसाळ्याच्या शेवटी आणि पूर्ण हिवाळाभर पाणपक्षी दिसतात. त्यावेळेस ते फारच नाविन्यपूर्ण वाटलेले पण मग जाणवले हे तर नेहेमीचे बगळेच आहेत. आणि बरोबरीला प्लोवर्स होते. मैना कावळे कबुतर देखील त्याच पाण्यात वावरताना दिसत. एके वर्षी सप्टेंबर अखेरी पर्यंत बर्यापैकी पाणी होते. तेव्हा कॉर्मोरंट (पाणकावळा?) आलेले. एका वर्षी चक्क एक पाणकोंबडी दिसली. तेव्हा मला खूप आनंद झालेला. तेव्हा पावसाळा सरल्यावर पाणी मधल्या चिंचोळ्या भागातून वाहत असे आणि बाकीच्या १०-१५ फुटाच्या भागात बरीच झुडपे वाढत. अश्याच झुडपात तिने आश्रय घेतलेला दिसला.
तरीही आपण माणसांनी आपला कचरा टाकून नदीत केलेली घाण डोळ्यांना खुपायची. मधेच कधीतरी दहिसर नदी बचाव चळवळ सुरु झाली. एके वर्षी रीवर मार्च आखला होता. नदीची जुजबी माहिती, जुने फोटो प्रदर्शनात मांडलेले. नदीच्या साफसफाईसाठी चळवळ पाठपुरावा करताना दिसत होती. मुख्यत: संजय गांधी उद्यानाबाहेरच्या तिच्या मार्गात असलेल्या गोठ्यातून केलेले प्रदूषण, काही छोट्यामोठ्या कारखान्यांनी केलेले प्रदूषण आणि झोपडपट्टीमधून टाकला जाणारा कचरा साफ व्हावा ह्यासाठी हालचाली होत असल्याच्या बातम्या येत होत्या. एक सर्वसामान्य कोणाच्या अध्यात मध्यात नसलेले, मुद्दामहून समाजसेवा न करणारे पण समाजाला आपल्याकडून कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने जीवन जगणारे आम्ही थोडे सुखावलो होतो. नदी सुंदर होईल म्हणून वाट पाहत होतो.
पण मग एके वर्षी उन्हाळी नालेसफाई मोहिमेत काही लोक मोठे बुलडोझर घेऊन आले. नदीचा तळ खरवडून साफ करायला घेतला. नदीच्या कडेने वाढलेली झुडपे बुलडोझर फिरवून होत्याची नव्हती केली. मेच्या रणरणत्या उन्हात खिडकीतून दिसणारी हिरवाई मनाला थोडा गारवा द्यायची. ते दृश्य इतके आघाती, हृदयाला पीळ पाडणारे होते. त्या झुडुपात किती छोट्या छोट्या पक्षांची घरटी होती असतील कोण जाणे. फक्त बगळे त्या बुलडोझरच्या आसपास बाहेर आलेले किडे टिपत पळत होते. खरतर खूप दु:ख वाटलेले. पण कदाचित पुरापासून वाचण्यासाठी अशी नालेसफाई आवश्यक असावी. चांगल्या मनाची माणसे चळवळीशी जोडली आहेत तेव्हा हे विचारपूर्वक घडले असावे असेच वाटले. पावसानंतर परत झुडपे उगवली. मनाने हुश्श केलं. पुढल्या वर्षी परत नालेसफाईची वेळ आली. परत तेच दु:खद दृश्य पाहायला लागले. ह्यावेळेस प्रशासनाने आणखी पुढचे पाउल उचलेले. नदीचा प्रवाह पावसाळी महिने सोडता इतर वेळेत मुख्यत: मधल्या ३-४ फुट रेषेत असे. बुलडोझर नुसतेच झाड काढत नव्हते तर कातळ फोडणाऱ्या मशीन्स परत आलेल्या. त्यांनी आजूबाजूचे दगड फोडून ३-४ फुटाचे पात्र जिथे तिथे रुंद केले. आता बऱ्याच मोठ्या परिसरात पाणी पसरायला लागले आणि त्यामुळे प्रवाह थोडा थंडावला. वर्षामागून वर्षे जात आहेत. रिवर मार्च होत आहेत. माणसांनी नदीत कचरा टाकणे काही थांबवले नाही पण नदी मात्र आता पूर्णपणे नाल्यात बदलली.
गेल्या वर्षी रीवर मार्चमधे माननीय मुख्यमंत्रीणबाई येणार असे जाहीर झालेले. आदल्या दिवशी मोठा पोलीस बंदोबस्त होता. पण दोनच दिवसापूर्वी मुख्यमंत्री कुटुंब एका पाणी आणि निसर्ग संवर्धन संबंधित चित्रफितीत दिसले आणि अचानक टीकेची राळ उठली. नक्की कारण आठवत नाही. पण बरीच चर्चा झाली. ऐन मार्चच्या दिवशी बाई आल्याच नाहीत. मार्च एकदम जोशात झाला. एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तींचे नदीकडे लक्ष गेले म्हणजे आता काही चांगले होईल असे वाटले. पण वर्षभरात फार काही झाले नाही. गेल्या वर्षी तर पाऊसच इतका कमी झाला की फक्त एकदाच नदीने आपले रूप दाखवले. ह्या वर्षी बहुतेक रिवर मार्च झाला नाही. नक्की माहित नाही. पण नेमेचि येते मग नालेसफाई ह्या नियमाने नालेसफाई सुरु झालीय. मोठे मोठे बुलडोझर आवाज करत नदीत फेऱ्या मारत आहेत. सकाळी त्यांचा आवाज ऐकला आणि मग अचानक मनाला जाणीव झाली अरे ह्या वर्षी झुडपे दिसलीच नाहीत... खरोखर नव्हती की मधल्या काही वर्षात लागलेली दिवसातून एकदातरी नदी कडे बघायची सवय परत एकदा मोडल्याने झुडपांकडे दुर्लक्ष झाले? खिडकीजवळ जाऊन खात्री केली. होती. थोडी झुडुपे होती. पण पूर्वीसारखी घनदाट नव्हती. गेले २-३ वर्षे मैनांचा वावर खुपच कमी झालाय. पोपटांचे थवे छोटे आणि कमी दिसायला लागले.
मागे कधीतरी माझी बहिण म्हणालेली. देव आनंदचे सुप्रसिद्ध गाणे खोया खोया चांद दहिसर नदीकिनारी चित्रित झालेले. विश्वास न बसून आम्ही ते गाणे परत बघितले. पण ५०-६० वर्षापूर्वीचा तो परिसर बिलकुलच ओळखीचा वाटला नाही. पण ते रूप आणि आताचे रूप. स्वर्ग आणि नरक ह्यांचे जिवंत दर्शन!
दहिसर नदी
Submitted by vt220 on 5 May, 2019 - 15:17
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बऱ्याच जणांच्या त्या
बऱ्याच जणांच्या त्या बुलडोझरने खरवडल्या सारख्या कित्येक आठवणी असतील अशा. नदीच्या कहाण्या सगळ्याच करुण असतात अशा काळाच्या संक्रमणात आहोत आपण. वाचून फार वाईट वाटलं.
जुने फोटो आहेत का?
जुने फोटो आहेत का?
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.
छान लिहिले आहे. दहिसरला आणि
छान लिहिले आहे. दहिसरला आणि दहिसर नावाची नदी होती हेच माहिती नव्हते.
आमच्या कॉलनी समोर काप्रा तलाव आहे. आमच्या घराच्या बाल्कनीतून दिसतो. म्हणजे अजूनही बऱ्यापैकी दिसतो. एकीकडे तलाव बचाओ मोहीम सुरू आहे तरी अतिक्रमण आणि कचरा टाकणे सुरूच आहे. केव्हा हे कचरा टाकणे आणि अतिक्रमण बंद होईल याची वाट बघत आहोत.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
जमल्यास लेखात थोडे फोटो पण चिकटवा..
छान लेख.
छान लेख.
छान लिहिलंत..!!
छान लिहिलंत..!!
छान लिहिलय... या नदीवर एक
छान लिहिलय... या नदीवर एक जुना पादचारी पूल होता, तो म्हणे पोर्तुगीजान्नी बान्धलेला. पुढे २००५ च्या पुरानन्तर तो पूल पाडून नवा पूल बान्धला.
गेल्या शतकाच्या उत्तरार्धातही
गेल्या शतकाच्या उत्तरार्धातही म्हणजे सुमारे साठ सत्तर वर्षांपूर्वी ही नदी निदान दहा महिने वाहाती असे. अनेक चित्रपटांची चित्रीकरणे येथे होत. उडनखटोलातली एक दोन गाणीही येथे चित्रित झाली आहेत. नदीवरच्या पुलांवरून भन्नाट वारा भणभणे. छोट्या नावादेखील चालत. थेट गोराईच्या खाडीत प्रवेश असे. मुखाशी मिरा रोडच्या पश्चिम भागात नदीचे पाणी पसरून कांदळवन माजलेले असे.थोडे पुढे मिठागरे होती. गोगटे मीठ कंपनीची ऑफिसवजा शेड तेव्हढी मिरा रोड् स्टेशननजीक होती. बाकी वस्ती अशी पुढे काशी मिर्ये, ओवळे, घोडबंदर या गावांत. मिरारोड पश्चिमेला एकही घर नव्हते. रेल्वे दुपदरी होती. दहीसर स्टेशन छोटेसे सिनेमातल्यासारखे इटुकले होते. सिनेमातल्यासारखाच एक कास्ट आयर्नचा सुंदर कमानदार पूल होता. त्यावर उभे राहिले की थेट भाइंदर वसईपर्यंतचा पाण्याचा विस्तार दिसे. या नदीविषयी इतिहासतज्ज्ञांचे अलीकडचे मत असे आहे की ही नदी मध्ययुगात व्यवस्थित नौकानयनयोग्य होती. (नॅविगेबल.) सोपारा-वसई-उत्तन बंदरांत आलेले प्रवासी होडीने कान्हेरीच्या पायथ्यापर्यंत येत. मंडपेश्वर आणि गावदेवीच्या टेकाडांवरून पलीकडची गोराई खाडी सुंदर दिसे. अलीकडेपर्यंत मुखाशी म्हात्रेवाडी, विट्ठलाचे देऊळ वगैरे अगदी गावात असावे तसे होते. पाणी वापरण्यायोग्य होते. म्हातारी माणसे सांगतात की १९४८ साली मुंबईत प्रचंड पाऊस पडला. ओशिवरा, मिठी, दहीसर वगैरे नद्यांना मोठमोठे पूर आले आणि ते पूर दोन तीन दिवस टिकले. पुढे डॉक्टर जिराड या नावाच्या त्या काळातल्या सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञांनी दहीसरला जुन्या पुलाशेजारच्या उंचवट्यावर छानसा बंगला बांधला. तो शुभ्र रंगातला झिराड्बाईंचा बंगला ही दहीसरची शान आणि मान असे. बोरिवली पूर्वेला नदीकाठावर बागायती आणि भातशेती होती. गेल्या शतकाच्या सुरुवातीला इथे आमराया उदयास आल्या. कोंकणातून आंब्यांची घाऊक आवक सुरू होण्यापूर्वी साधारण १९३०पर्यंत मालाड, उत्तन, बोरिवली येथले आंबे मुंबईत (म्हणजे कुलाबा बेट ते माहीम बेट या टापूत) उत्कृष्ट म्हणून प्रसिद्ध होते. (तसे चारपाचशे वर्षांपूर्वी माझगाव बेटावरचे आंबेही प्रसिद्ध होते आणि ते सिद्दीच्या लोकांतर्फे दिल्लीच्या बादशहाला नजर केले जात! तसे तर साष्टी बेटावर सध्याच्या पवई तलावाच्या जागेवर आणि आजूबाजूला असलेल्या तुंगे, पसपवली, पोवैं गावात कावसजी पटेल यांनी आमराया - आणि उसाची बागायतीदेखील- उठवून इथले आंबे विलायतेला राणीस भेट म्हणून पाठवले होते! आणि साखरेचा कारखानाही उभारला होता!) ) माहीमच्या उत्तरेचा साष्टीबेटाचा भाग तेव्हा अर्थात ठाणे जिल्ह्यात होता. या नदीमुळे इथल्या भागात विहिरींना बारोमास पाणी असे. त्यामुळेच बागायती बहरली होती. शिवाय ठाणे जिल्ह्यात दीडशे पावणेदोनशे वर्षांपूर्वी हिवाळी पाऊस पडे असे उल्लेख जुन्या ठाणे गॅझेटीअरमध्ये आहेत.
नदीचा उगम सध्याच्या नॅशनल पार्कमध्ये कान्हेरीच्या घळीत आहे. दोन डोंगरांच्या मध्ये दगडी चिर्यांचा बांध रचून अथवा भिंत बांधून हिचे पाणी अडवले होते. जगातल्या प्राचीन धरणांपैकी हे एक असावे. याचे अवशेष चिर्यांच्या अर्धवट भिंतीच्या रूपात अजूनही दिसतात. तिथेच जवळ एक जलनियंत्रणासाठीच्या उघडझाप होऊ शकणार्या झडपेचे अवशेष आहेत. कान्हेरीची बांधणी ही जलनियंत्रणाच्या खोदीव पन्हळांसाठी प्रसिद्ध आहे. (वॉटर सिस्टर्न्स). ह्याच नदीच्या काठच्या टेकाडांवर मंडपेश्वरच्या शैवगुंफा आणि कांदरपाड्यातले जुने गावदेवीचे देऊळ आहे. या नदीतून किती भिक्षु, यात्रेकरू, शैव भाविक येत जात असतील, 'धम्मं सरणं गच्छामि' आणि ओम् नमः शिवाय' चा जयघोष निनादला असेल, शिडे डोलत असतील,लाटा उचंबळल्या असतील, याची कल्पना करून मन प्रसन्न होते. (थोडे अवांतर झाले आहे, क्षमस्व.)
वा हीरा! छानच माहिती.
वा हीरा! छानच माहिती.
लेख वाचला, मनाला भिडला.
लेख वाचला, मनाला भिडला.
ह्या सगळ्या निसर्गाच्या र्हासाला कारणीभूत आपणच (म्हणजे मनुष्यप्राणी) आहोत. त्यावर उतारा म्हणून जिथे मिळेल तिथे सोसायटीच्या आवारात, रस्त्याच्या कडेला, बाल्कनीत, गच्चीत, खिडकीत झाडे लावणे, जगवणे, जंगल तयार करणे. पक्षी, फुलपाखरे, माशा ई. कीटक नांदतील असे अधिवास टिकवणे वाढवणे असं काहीबाही करायला हवे.
हीरा - असे अवांतर हजार वेळा चालेल.
मोबाईलवर वाचनमात्र असल्याने
मोबाईलवर वाचनमात्र असल्याने प्रतिसाद देण्यास उशीर झाला. प्रतिसाद देणार्या सगळ्यांना धन्यवाद.
हिरा अवांतरासाठी क्षमा मागून लाजवू नका हो. माझा धागा नुसताच त्रागा होता. तुम्ही त्यात इतकी सुंदर माहिती देऊन चारचांद लावलेत. खरतर तुम्हालाच त्याबद्दल अनेक धन्यवाद!
तुम्ही दिलेली सगळी माहिती खुपच रोचक आहे.
<सिनेमातल्यासारखाच एक कास्ट आयर्नचा सुंदर कमानदार पूल होता. त्यावर उभे राहिले की थेट भाइंदर वसईपर्यंतचा पाण्याचा विस्तार दिसे.>> हा पूल साधारण कुठेसा होता? गेल्या कित्येक वर्षांपासून दहिसर पूल बस थांबा आहे तो कास्ट आयर्नचा वाटत नाही. पुढल्या वेळेस निरीक्षण करीन. दहिसर रेल्वे स्थानकातून मंडपेश्वर गुंफा, सेंट फ्रान्सिस चर्च आणि शिक्षण संस्था कडे जाणारा एक जुनाट पादचारी पूल पूर्वी होता पण तो उंचीला फारच कमी आणि बहुतेक दगडी होता. २००५ च्या पुरात तो पूल बराचसा वाहून गेला आणि आता नवीन पूल बांधलाय. संजय गांधी उद्यानात असलेला पूल तुम्हाला आणि mayu4u ना म्हणायचा असावा.
<या नदीविषयी इतिहासतज्ज्ञांचे अलीकडचे मत असे आहे की ही नदी मध्ययुगात व्यवस्थित नौकानयनयोग्य होती. (नॅविगेबल.) सोपारा-वसई-उत्तन बंदरांत आलेले प्रवासी होडीने कान्हेरीच्या पायथ्यापर्यंत येत.>> ही माहिती वाचून छाती कौतुकाने अभिमानाने उगीच भरून आली. काहीसं असं (शिडे डोलत असतील,लाटा उचंबळल्या असतील, याची कल्पना करून मन प्रसन्न होते. )
कान्हेरी गुंफा मध्ये पाण्याच्या कालव्यांची बांधणी बघितली आहे. तिथून पुढे तुळशी तलावापर्यंत जाता येते असे ऐकले आहे. पावसाळ्यात सर्व परिसर अप्रतिम सुंदर असतो.
<तो शुभ्र रंगातला झिराड्बाईंचा बंगला ही दहीसरची शान आणि मान असे. >> हा अजून आहे किवा नाही ह्याबद्दल काही माहिती आहे का? परत त्या रस्त्याने जाताना विशेष लक्ष ठेवीन.
२००० साली आम्ही आलो तेव्हा ६ मजल्यावरून उत्तरेकडे बऱ्याच दूर अंतरावर डोंगर स्पष्ट दिसायचे आणि उन्चावर रात्रीच्या वेळेस दिवे लागलेले दिसायचे. आम्हाला कुतूहल + उगीचची खात्री होती बहुतेक ते विरारचे जीवदानी मंदिर असावे. आता मधल्या भागात बऱ्याच उंच इमारती झाल्यात आणि प्रदूषणामुळे दृश्यमानताही बरीच खालावल्यामुळे ते डोंगर दिसत नाहीत.
तुमचा प्रतिसाद वाचल्यावर फार फार इच्छा होतेय टाईम मशीन असावे आणि आपण त्या काळात फिरून यावे.
अॅमी, मित - माझ्याकडे त्या काळातले फोटो नाहीयेत. कदाचित असतील पण तो फिल्म कॅमेराचा काळ होता. जुने अल्बम शोधावे लागतील. आताच्या रुपातली नदी ह्या दुव्यावर मिळेल
https://www.google.com/search?q=dahisar+river&source=lnms&tbm=isch&sa=X&...
त्याच्यातले रम्य फोटो बहुतेक संजय गांधी उद्यानातील असावेत.
त्या लिंकमधे असलेल्या एका
त्या लिंकमधे असलेल्या एका फोटोसारखी कुठल्यातरी मुसळधार पावसाळ्यात तुडूंब भरलेली नि संजय गांधी उद्यानाजवळच्या पूलच्या टेकलेली नदी पाहिली आहे. पोलीसांनी तेंव्हा पूलावरून जाउ नये म्हणून वाहतूक बंद केली होती दिवसभर. तेंव्हा कातळी भिंती होत्या कि नाही ते आठवत नाही पण श्रीकृष्ण नगरात जाताना त्या पूलावरून जाताना 'नदी' म्हणून थांबून बघायचे लहान असताना तेव्हढे आठवतेय.
हे पहा, https://youtu.be/7-q
हे पहा, https://youtu.be/7-q_naWUUgs
दहीसरची आठवण माझ्यासाठी म्हणजे वडीलांची आत्या रहायची आणि ती वडीलांना. आंबे आणून द्यायची ह्या गप्पा एकल्यात.
हीरा: सुन्दर माहिती!
हीरा: सुन्दर माहिती!
आमचे घर नदीच्या उत्तरेस साधारण दोन-तीनशे मीटर वर आहे... माझ्या लहानपणी मध्ये फक्त बैठी घरे होती, तेव्हा पावसाळ्यात नदीला आलेले उधाण चौथ्या मजल्या वरच्या आमच्या घरातुन स्प्ष्ट दिसत असे.
मी उल्लेख केलेला पूल दहीसर
मी उल्लेख केलेला पूल दहीसर स्टेशन वर होता. कदाचित अजूनही असेल. बोरिवलीच्यापुढे रेल वे चौपदरी होण्यापूर्वी दोनच मार्ग असल्याने दहीसर, नायगाव, मिरा रोड ही स्टेशन्स छोटी होती. आत्ताआत्ता दहा-पंधरा वर्षांपूर्वी दोन अधिकचे मार्ग बांधले गेल्याने स्टेशने मोठी झाली. जुने लोक सांगतात की साठ सत्तर वर्षांपूर्वी नाला सोपार्याला तर एकच प्लॅट्फॉर्म होता. दोन्ही कडांना दोन रेलरेखा होत्या. नायगाव, मिरा रोड, सोपारा ही स्टेशने निर्मनुष्य असत. काशीमिरें हे छोटेसे गाव थोडी फार वसती राखून होते. हया लोकांचे मुंबईत रेल्वेने जाणे येणे फार कमी असे. मिरे गावातून मिरा रोड स्टेशनला येणे थोडे जिकिरीचे असे. त्यापेक्षा घोडबंदर रस्त्यावरून बसने बोरिवलीला पोचणे सोपे असे. ह्या रस्त्यावरून नियमित बोरिवली ठाणे वाहतूक असे. आणखी एक गंमतीशीर माहिती म्हणजे वेस्टर्न महामार्ग (मुंबई-अहमदाबाद महामार्ग) बांधला जाण्यापूर्वी म्हणजे सुमारे १९६५-७० सालापर्यंत मुंबईतून पश्चिम बाजूने मुंबईबाहेर पडण्याचा घोडबंदर रोड हा एकमेव मार्ग होता आणि तो वांद्र्यापासून सुरू होऊन बोरिवलीपर्यंत रेल वेच्या पश्चिमेने जाई आणि बोरिवली स्टेशनच्या उत्तरेला रेल्वे फाटकातून पूर्वेकडे वळून पुढें दहीसर, घोडबंदर, भिवंडीवरून ठाण्याला पोहोचे. नासिक आणि पुढे जाण्यासाठी माहीम,वांदरे इत्यादि पश्चिम उपनगरातील लोक घोडबंदर रस्त्याचा वापर करीत. आग्रा रस्त्याचा मार्गही भिवंडीवरून होता. पुढे आग्रा रस्त्याच्या मुंबईतल्या भागाचे नाव लाल बहादुर शास्त्री मार्ग झाले. आणि नवीन ईस्टर्न एक्स्प्रेस म्हणजे पूर्व द्रुतगतिमार्ग बांधला गेल्यावर त्याचे महत्त्वही कमी झाले. तसेच घोडबंदर रोडच्या वांदरे ते दहीसरपर्यंतच्या तुकड्याचे नाव स्वामी विवेकानंद म्हणजे एस वी रोड् झाले. बोरिवली ते भाइंदर पट्ट्यातली लांब पल्ल्याची वाहतूक नवीन पश्चिम द्रुतगतिमार्गावरून होऊ लागली.
असामी - २००५च्या पुरात
असामी - २००५च्या पुरात बोरीवली पूर्वेच्या दौलत नगर आणि SBI ऑफिसर्स वसाहतीमधील बंगल्यात पहिल्या मजल्यापर्यंत पाणी चढलेले. तिथले लोक घरी अडकून पडलेले असे ऐकले आहे. तेव्हा पाणी पश्चिम द्रुतगती मार्गावरून वाहत होते त्यामुळे वाहतूक थांबवलेली. तेव्हा बऱ्याच ठिकाणी गाड्या वाहण्याचे अपघात झाल्याने थोडाही मुसळधार पाऊस झाल्यावर रस्ते/पादचारी पूल बंद करण्याची पद्धत आली. २००५ साली मी ऑफिसमध्ये अडकलेले. दुसऱ्या दिवशी घरी जाताना कांदिवलीला महिंद्र कंपनीच्या गेटसमोर नाल्यामध्ये (बहुतेक पोयसर नदी) ३-४ गाड्या (१ मर्सिडीज) वाहून गेलेल्या दिसलेल्या. आरे रोडवर एका ठिकाणी भला मोठ्ठा खड्डा पडलेला त्यात एक अक्खी रिक्षा उभीच्या उभी आत गेलेली आणि तिचे छत आम्हाला बाजूने जाईपर्यंत दिसले नव्हते!
झंपी - तो विडीओ उद्यानाच्या आतला शिलोंडा ट्रेलचा असावा. तो परिसर खुपच रमणीय आहे. पण तिथे जाण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते.
mayu4u - तुम्ही दहिवली सोसायटीत राहता का? तुमचा अतीव हेवा! तुम्हाला माहित असेल उत्तरेच्या दिशेस विरारचे जीवदानी मंदिर दिसायचे का?
हिरा - तो पूल तितकासा आठवत नाही पण वाहून गेला तेव्हा तिथे दगडी अवशेष राहिलेले. आम्ही पूर्वी गोरेगावला राहात असू आणि SV रोड म्हणजे घोडबंदर रोड हेच तोंडी होते. बोरीवली ते ठाणे घोडबंदर रस्त्याचे स्वरूपसुद्धा गेल्या १५ वर्षात इतके पालटले आहे की कुठे नव्याच रस्त्यावरून जात आहोत असे वाटावे. आधीच्या प्रतिसादात तुम्ही म्हटलेले विठ्ठल मंदिर बाकी अजूनही त्याचे पूर्वीचे स्वरूप राखून आहे. लाकडी खांब आणि कौलारू छत आणि समोर भला मोठ्ठा वटवृक्ष.
हर्पेन - <ह्या सगळ्या निसर्गाच्या र्हासाला कारणीभूत आपणच (म्हणजे मनुष्यप्राणी) आहोत.> खरे आहे. आणि हे कळत असूनही वळत नाही. काही दिवसापूर्वी केरळ पुरासंदर्भात NGCवर एक कार्यक्रम दाखवलेला. आर्थिक सुबत्तेमुळे मस्त आधुनिक घरे बांधण्याची पद्धत रूढ होते आहे. त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात दगडी खाणी आणि वाळू उत्खनन चालू आहे आणि ह्यामुळे आधीच नाजूक असलेला पश्चिम घाट परिसर धोक्यात आलाय ते सांगितलेले. तेव्हा माझ्या कोकणातल्या प्रवासाची दृश्ये आठवली. कोकणात हल्ली जिथे तिथे चिऱ्याच्या खाणी दिसतात. पावसात तिथे पाणी साठते. ह्याचा भूगर्भीय परिणामाचा कुठेतरी कोणीतरी आढावा घेत आहेत का असा प्रश्न पडलेला.
<<< माझ्याकडे त्या काळातले
<<< माझ्याकडे त्या काळातले फोटो नाहीयेत. कदाचित असतील पण तो फिल्म कॅमेराचा काळ होता. जुने अल्बम शोधावे लागतील. >>>
काळजी नको. सध्याचे फोटो काढून ठेवा. २५ वर्षांनी जेव्हा केव्हा ते फोटो बघाल तेव्हा कळेल की पूर्वी परिस्थिती किती छान होती आणि आता किती बकाल आहे ते.
vt220 ,मी उल्लेख केलेला
vt220 ,मी उल्लेख केलेला लोखंडी पूल जुन्या दहीसर स्टेशनचे एक आणि दोन क्रमांकाचे दोन प्लॅट्फॉर्म जोडणारा फुट ओवरब्रिज होता. दोन रेल लाइन्सच्या चार लाइन्स होऊन स्टेशन विस्तारले त्यानंतर तो पूल आहे की पाडला ह्याविषयी माहिती नाही.
अछ्छा! शक्यतो बोरिवलीला ट्रेन
अछ्छा! शक्यतो बोरिवलीला ट्रेन साठी जाणे असल्याने दहिसर स्टेशन परीचयाचे नाही. पण असा काही वैशिष्ट्यपूर्ण पूल तिथे बघितलेला आठवत नाही. तिथे सबवे बनवले आहेत आणि २ जुने पूल आहेत. एक विना जिन्याचा लांब उतारावाला आहे. तो असेल कदाचित.
मस्त माहिती आहे.
मस्त माहिती आहे.
गुगलवरच्या फोटोत आणि झंपी
गुगलवरच्या फोटोत आणि झंपी च्या लिंकमधे केवढी तफावत आहे.दोन्ही रुपे एकाच नदीची आहेत,यावर माझा अजुनही विश्वास बसत नाही.
मुंबईत अजुनतरी येण्याचा योग आला नाही,पण दहीसर पाहुन मला आमच्या मुळा-मुठेची अवस्था काही दशकांनंतर अशी तर होणार नाहीना;अस वाटायला लागलंय.
vt220:
vt220:
दहिवली नाही, पण तिथुन जवळच...
>>मी उल्लेख केलेला लोखंडी पूल जुन्या दहीसर स्टेशनचे एक आणि दोन क्रमांकाचे दोन प्लॅट्फॉर्म जोडणारा फुट ओवरब्रिज होता. दोन रेल लाइन्सच्या चार लाइन्स होऊन स्टेशन विस्तारले त्यानंतर तो पूल आहे की पाडला ह्याविषयी माहिती नाही.
बहुतेक पाडला... दहिसर रेल्वे स्थानक माझ्या बघण्यातल्या गेल्या ३० वर्शात प्रचन्ड बदलले आहे
>>एक विना जिन्याचा लांब उतारावाला आहे. तो असेल कदाचित.
नाही, तो पूल अलिकडे (गेल्या १५ वर्शात) बनवलाय.
हिरा खूप सुन्दर माहिती
हिरा खूप सुन्दर माहिती
गेल्या आठवड्यात डॉ
गेल्या आठवड्यात डॉ कर्नाडांच्या निधनानंतर त्यांची फिल्मोग्राफी बघत होते. तेव्हा त्यांच्या स्वामी चित्रपटाच्या विकी साईटवर समजले की त्या चित्रपटाचे बरेचसे चित्रण दहिसर आणि दहिसर नदी परिसरात झालेले. म्हणून बघायला घेतला. मस्त हिरवाई आहे त्यामुळे बहुतेक राष्ट्रीय उद्यानातले चित्रण असावे असे वाटते पण आम्ही रहातो तिथे पूर्वी चिकूच्या बागा होत्या त्यामुळे कदाचित आमच्या भागातील असेलही कारण खालील लिंक मध्ये ३४:५४ वेळेला जो पूल मागे दिसतो तो २००५ च्या पूरात वाहून गेला.
https://youtu.be/kjiPEk6ORZo?t=2068
चित्रपट अजून पूर्ण पाहून झाला नाहीय. पण शबानाचे आता लग्न होऊन ती गिरीश कर्नाडच्या घरी आलीय. त्यामुळे बहुतेक ह्या पुढे काही नसावे.