मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा

Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59

मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.

आता इथल्या दुसर्‍या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.

जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html

तर ती चर्चा इथे चालू ठेवू. Happy

इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झुबे कविता होती मला.

निवडुंगाच्या शीर्ण फुलांचे
झुबे लालसर ल्यावे कानी
जरा शिरावे पदर खोचुनी
करवंदीच्या जाळीमधुनी

शीळ खोल ये तळरानातुन
भणभण वारा चढणीवरचा
गालापाशी झिळमिळ लाडिक
स्वाद जिभेवर आंबट कच्चा
......
मधल्या ओळी आठवत नाहीत
शेवटी. पुन्हा कधी न का मिळायचे ते
ते माझेपण अपुले आपण
झुरते तनमन त्याच्या साठी
उरते पदरी तीच आठवण
निवडुंगाच्या लाल झुब्यांची
टपोर हिरव्या करवंदांची
नक्की आठवत नाही पण सुधारणा करून द्यावी सस्मित

मला पण असंच अधलं मधलं आठवतंय.
आणि एक चंदन कविता होती. माझी आवडती. आईला चंदनाची उपमा निव्वळ अप्रतिम.

माझ्या चंदनी खोडाचा मंत्र झिजणे झिजणे
उणे लिंपायला माझे घाली सुगंधाचे लेणे
झीज केशरी तयाची तप्त जीवा लावी उटी
आत उमले भावना शांत शीतल गोरटी

चंदन मधलंच शेवटचं कडवं / ओळी आठवल्या

झिजते ते जीव माझा होतो आत आत गोळा
अडखळे हात आणि पाणी तरारते डोळा

हं. अर्थपूर्ण

निवडुंगाच्या शिर्ण फुलांचे झुबे लालसर ल्यावे कानी
जरा शिरावे पदर खोचूनी करवंदीच्या जाळीमधुनी
इतकीच आठवतेय. Sad

माझी आवडती कविता ..आम्हाला दहावीला होती...

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढर्‍या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्‍या शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा

आणखी एक..

जरी तुझीया सामर्थ्याने
ढळतील दीशाही दाही
मी फुल तृणातील इवले
उमलणार तरीही नाही.

शक्तीने तुझीया दीपुनी
तुज करतील सारे मुजरे
पण सांग कसे उमलावे
ओठातील गाणे हसरे?

जिंकील मला दवबिंदू
जिंकील तृणाचे पाते
अन स्वत:ला वीसरून वारा
जोडील रेशमी नाते

कुरवाळीत येतील मजला
श्रावणातल्या जलधारा
सळसळून भिजली पाने
मज करतील सजल इशारे

रे तुझीया सामर्थ्याने
मी कसे मला विसरावे?
अन रंगांचे गंधांचे
मी गीत कसे गुंफावे?

येशील का संग पहाटे
किरणाच्या छेडीत तारा;
उधळीत स्वरातुनी भवती
हळू सोनेरी अभीसारा?

शोधीत धुक्यातुनी मजला
दवबिंदू होउनी ये तू
कधी भीजलेल्या मातीचा
मृदु सजल सुगंधीत हेतू!

तू तुलाच विसरुनी यावे
मी तुझ्यात मज विसरावे
तू हसत मला फुलवावे
मी नकळत आणि फुलावे

पण तुझीया सामर्थ्याने
ढळतील दीशा जरी दाही
मी फुल तृणातील इवले
उमलणार तरीही नाही.

'आईला कधी सुट्टी नसते. दिवसभर ती कामात असते.' दिवाळीची सुट्टी नाही. मग एक दिवस आम्ही मुलांनी ठरविले.... 'अशी काहीशी सुरुवात असलेला एक धडा होता. बहुदा पहिलीत. कुणाला आठवतोय का ? असेल तर लिंक मिळु शकेल का?

अच्छा. किशोर जुने अंक कुठतरी ऑनलाई न बघितलेले. त्यात बघते. मला तो धडा पाठ होता आणि त्याच रेकॉर्डींग केलेलं कॅसेट वर. ती कॅसेट हरवली . आईला त्याच खुप वाईट वाटत होत. त्यामुळ माझा विचार होता , रीक्रीएट करून आईला सरप्राईझ द्यायच. Happy
थँक्यु रायगड. Happy

सीमा, लेकीच्या आवाजात रेकॉर्ड करा म्हणजे त्या जुन्या रेकॉर्डींगच्या पुनर्निर्मिती सोबत तुमच्या आवाजाची पुनर्निर्मितीही (= लेकीचा आवाज) नोंद होईल. Happy

बालभारती ची जुनी पुस्तके balbharti archive मध्ये सापडली त्याबद्दल बालभारती चे धन्यवाद आठवी ते दहावी ची पुस्तके बालभारती च्या अभ्यासक्रमात येत नाहीत म्हणून ती वेबसाइट वर नाहीत

आठवी ते दहावी ची पुस्तके बालभारती च्या अभ्यासक्रमात येत नाहीत म्हणून ती वेबसाइट वर नाहीत >>>>>>> बालभारतीची साईट आवडली:) आठवी ते दहावी ची पुस्तके कुमारभारती या नावाने आहेत आणि बारावीपर्यन्तची पुस्तके युवाभारती. ह्यान्ची सुद्दा एक साईट असायला हवी होती.

आम्हाला एक धडा होता घराची दारे लहान मुलांना वाचवतात असा काहीतरी, फँटसी कथा होती. कोणाला धड्याचे आणि लेखकाचे नाव आठवत आहे का?

Pages