भाग १
https://www.maayboli.com/node/69326
भाग २ चालू
पूर्वपीठिका
लेहला पोहोचल्यावर रिपोर्टींग करून झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आमचे ब्रिफींग करण्याकरता सगळ्यांना बाहेरच उणे बारा तपमानात एकत्र जमायला सांगितले होते. इतक्या थंडीत बाहेर एकाच जागी उभे रहायचे म्हणजे जरा त्रासच होता. वारा तर जाऊच दे पण नुसती झुळूक जरी आली तरी अजूनच गारठायला व्हायचं. आम्ही सगळे मिळून जवळपास तीस जण असू त्यामुळे इतके सगळे नीट मावतील अशी जागा तिथे नव्हती आणि आता असं 'बाहेर' राहण्याची सवय करणे गरजेचे होते.
तिथे पोचल्यावर ट्रेक लीडर ने स्वतःची ओळख करून दिली आणि आम्हाला आपापले नाव आणि 'चादर ट्रेक' च का निवडला ते सांगा अशी पृच्छा केली. हा प्रश्न विचारता क्षणीच मन लेहच्या हाडे गोठवणाऱ्या थंडीतून चिपळूणमधल्या ऐन वसंतातल्या त्या सुखद रात्रीत जाऊन पोचले.
'ऐन वसंतात मध्यरात्री' उशिरापर्यंत मी, अभिनव, अरुण, राजा असे काही मित्र चिपळूणला गप्पा मारत, रात्र जागवत बसलो होतो तेव्हाची गोष्ट. म्हणजे आजपासून मागे जवळपास वर्षापूर्वीची. जुनी हिंदी सिनेमातली गाणी ऐकत ऐकत नाना विषयांवर गप्पा मारत बसलो असता विषय भरकटत भरकटत गाडी हिमालयावर आली होती. मी एकदा का हिमालयाचे गुणगान करायाला लागलो की थकता थकत नाही. हिमालयानी माझ्यावर केलेले गारुड सगळ्यांना जाणवतेच. अर्थात एकदा हिमालयात जाऊन आल्यावर बहुतेक सगळ्यांनाच लागते तसे त्याचे व्यसन मलाही लागलेले आहेच. काशीस जावे नित्य वदावे च्या चालीवर मी हिमालयात जायचय असे नित्य वदत असतो. त्यामुळे आता पुढच्या खेपेस कुठे जाणार काही ठरवलंय का अशी विचारणा झाली. हिमालयात परत जायचे असल्यास कुठे जायचंय, खरेतर कुठेकुठे जायचेय त्याची यादीच माझ्याकडे तयार होती त्याची उजळणी चालू झाली. त्यात विषय निघाला लडाखचा मग परत एकदा तिथे जायचंय, स्टोक कांगरी ट्रेकच्या वेळी भेटलेल्या विवेकने हिवाळ्यातल्या लडाखचे केलेले वर्णन असं कायकाय ऐकवत होतो. विवेकने चादर ट्रेक केला होता त्यावेळी त्याला लेह किती वेगळे दिसले होते त्याबद्दल ऐकल्यावर एकदा थंडीत लेहला जायचे असे मनात होते ते सांगताना कोणत्या तरी एका चुकार क्षणी मी बोलून गेलो की चादर ट्रेक (म्हणजे तो करताना सामना करावे लागणारे बोचरे वारे आणि उणे तपमान हे) काही आपल्याला झेपणारे नाहीये, तरीपण मरायच्या आधी एकदा करायला हवं यार! झालं तेच वाक्य पकडून अरुणने मग आपण सगळेच करूया आम्ही पण येतो असे म्हटले भावनेच्या भरात मी ही म्हटले होहो जाऊ या.
झाले पुण्यात परत आल्यावरही अरण्याने माझा पिच्छा पुरवला. आपण ठरवलंय (एक तर ते ठरवलेले वगैरे काही नव्हते नुसते मोघम म्हटलेले होते करूया म्हणून) ते करायलाच हवं म्हणजे जसं काही माझं नाव हर्षद नसून हरिश्चंद्र आहे. पण अखेर आपण असे ठरवले होते आणि आपण हा ट्रेक करणार आहोत हे मला मान्य करावेच लागले. आमच्या रनिंग ग्रुपमधला शॅनन ने देखील हा ट्रेक केलेला आहे त्यानेही मी ही हा ट्रेक करावा अशी जोरदार शिफारस केली. अगदी भरीसच पाडले म्हणा ना. त्याने त्याच्याकडचे सामान ही देऊ केले.
तर अशा प्रकारे हा ट्रेक करायचा असे ठरले तर खरे पण हा ट्रेक होतो फक्त हिवाळ्यात. त्यातही जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या दोनच महिन्यात; आणि आमची मुंबई मॅरेथॉन असते जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी. त्यामुळे जाऊ दे रे पुढच्या वर्षी बघू वगैरे म्हणून मी हा ट्रेक रद्द करायचा माझा प्रयत्न अरुणने आपण मुंबई मॅरेथॉन नंतर फेब्रुवारीत हा ट्रेक करू असे सांगून हाणून पाडला. पुढचे पुढे बघू असे म्हणून मी ही मग काही महिने ह्या कडे लक्ष दिले नाही. बघता बघता नोव्हेंबर उजाडला, कोल्हापूर ट्रायथलॉन देखील करून झाली. मग मात्र म्हटले हा ट्रेक करायचा असेल तर आता नीट ठरवाठरवी करावी लागेल, मग मधेच एकदा कधीतरी नेटवर तपास केला असता दिसले की फेब्रुवारीत दोन किंवा तीनच बॅच असतात. मग चक्क एक मिटिंग घेतली कोणकोणत्या आयोजकांच्या कोणकोणत्या तारखा आहेत, तुला कोणती जमत्ये मला कोणती जमत्ये, किती पैसे भरावे लागतील , एकूण खर्च किती येईल ह्याचा आढावा घेण्यात आला. खर्चाचा आकडा ऐकून कोणी म्हणतील आता नको नंतर जाऊ अशी आशा होती ती देखील सरली. सर्वांच्या सोयीनुसार, महिना अखेर असणाऱ्या कार्यालयीन जबाबदाऱ्या, होणारा पगार ई. अनेक गोष्टींचा विचार आणि अगदी शेवटच्या बॅचला गेलो तर बर्फ वितळलेला तर नसेल ना अशा सर्व शक्याशक्यतांचा विचार करून शेवटी फेब्रुवारीतली पहिली बॅच निवडण्यात आली. पैसे आणि हवी असलेली तारीख ह्या मुळे Adventure Nation ह्या दिल्ली स्थित संस्थेतर्फे ३ तारखेला सुरु होणाऱ्या बॅचमधून जायचे हे ही नक्की झाले.
हा ट्रेक एकत्र करायचा असे जेव्हा चिपळूणला ठरवले (?) होते त्यावेळी हजर असलेल्यांपैकी अभिनव फेब्रुवारी मध्ये ट्रायथलॉन करता श्रीलंकेला जाणार असल्यामुळे गळला पण त्याच्या जागी दुसरा एक गडी संदीप तयार झाला. ह्यात गंमत अशी की आमच्या चौघांपैकी मी सोडता बाकी तिघेही अरुण राजा आणि संदीप हे हिमालयात पहिल्यांदाच येणार होते आणि ते ही माझ्या भरवश्यावर आणि मी स्वत: हिवाळ्यात पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळे मग सुरु झाली आयोजकांच्या मेल नुसार ट्रेक करता आवश्यक गोष्टींची खरेदी आणि पूर्व तयारी. त्यात देखील बराच वेळ आणि पैसा गेला.
दरम्यान माझ्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे मी मुंबई मॅरेथॉन साठी जी तयारी करता होतो त्या वेळी सर्वात मोठी लॉंग रन केवळ २७ किमी ची होऊ शकलेली. त्या दुखापतीमुळे मुंबईत आरामात धावायचं दुखापत वाढू द्यायची नाही पुढच्या दहा दिवसात चादर ट्रेक करायचाय हे लक्षात ठेवून, मग यावेळी (तरी) मुंबईत सब फोर का विचारणाऱ्या सगळ्यांना अजिबात नाही, मुंबई सहाव्या वेळी धावतोय; (सबफोरच्या) आधी लगीन चादरचेच असे जाहीर करून टाकले आणि त्याप्रमाणे मुंबई सावकाश सव्वापाच तास लावून धावलो. मुंबई माझी लाडकी पण हिमालयाला यथायोग्य मान दिलाच पाहिजे.
आयोजकांनी पाठवलेल्या मेल नुसार आमच्या प्रवासयोजनेची सर्वसाधारण रूपरेषा अशी होती.
दिवस पहिला - लेहला पोचणे आणि आल्याची वर्दी देणे
दिवस दुसरा - लेह मध्ये फेरफटका
दिवस तिसरा - वैद्यकीय तपासणी आणि विमा
दिवस चौथा - सकाळी लेहहून निघून ट्रेक जिथून चालू होतो त्या 'तिलाड डो' पाशी बसने पोहोचणे आणि नंतर लगेच अंदाजे ५ किमी चालत शिंगरा कोमा येथे पोहोचणे (प्रत्यक्ष ट्रेक चालू)
दिवस पाचवा - शिंगरा कोमा ते तिब्बच्या गुहेपाशी मुक्काम
दिवस सहावा - तिब्बच्या गुहेपासून ते नेरक गोठलेला धबधबा
दिवस सातवा नेरक ते परत तिब्ब गुहा
दिवस आठवा - तिब्ब गुहा ते शिंगरा कोमा
दिवस नववा शिंगरा कोमा ते तिलाड डो पर्यंत चालत गेल्यावर पुढचा प्रवास बसने लेह पर्यंत
दिवस दहावा - लेहहून प्रस्थान पुण्यास परत
अखेर लेहला जायचा दिवस उजाडलाच खरेतर रात्रच. (रात्रीत केलेल्या प्रवासामुळे रजेचा एक दिवस वाचतो)
आमचे पुण्याहून प्रस्थान होते शनिवारी रात्री. दिवसभर ऑफिसमध्ये, काम उरकून घरी जाऊन कधी एकदा निघतो असं झालेलं. पुणे ते दिल्ली विमान रात्री दिडच्या सुमारास होते आणि दिल्ली ते लेह सकाळी साडेसात वाजता जे लेहला नऊ च्या सुमारास पोहोचते. रिपोर्टींग पहिल्या दिवशी संध्याकाळ पर्यंत केले तरी चालते पण पुण्यामुंबईहून विमानाने जायचे असल्यास आपण सकाळी जास्तीत जास्त उशीरा म्हणजे दहा वाजेतोपर्यंत पोहोचतोच. विमानाच्या ये जा करण्याच्या दृष्टीने लेहचे हवामान केवळ सकाळच्या वेळातच सुऱक्षित मानले जाते. त्यामुळे कुठूनही येणारी सगळी विमाने साधारण दहा पर्यंत पोहोचतात आणि लगेच तासादोन तासात परतीच्या प्रवासाला निघतात.
विमानातून घेतलेला फोटो
हा ट्रेक सहसा सगळ्याच आयोजकांतर्फे एकूण ९ दिवसात आयोजित केला जातो. त्यातले पहिले तीन दिवस तर लेह मधेच घालवायचे असतात. लेहला कधीही विमानाने गेल्यास, अतिउंचावरील विरळ हवेची सवय व्हावी म्हणून पहिले दोन दिवस काहीच न करता घालवायचे असतात. पहिल्या दिवशी तर राहत्या जागेबाहेर पडूच नका आराम करा असा सल्ला दिला जातो. जे गरजेचे आहे. अचानक उठून समुद्र सपाटीपासून अंदाजे ३५००मी उंचीवरील ठिकाणी आपण गेलो असता तिथल्या वातावरणाची सवय होईपर्यंत ही काळजी घ्यायलाच हवी.
विमानातून घेतलेला फोटो - अजून एक
फेब्रुवारीतल्या ३ तारखेच्या रविवारी सकाळी आम्ही लेहच्या विमानतळावर उतरलो तेव्हा आमचे विमान काही काळ धावपट्टीवरच थांबवले होते. आमच्या पुढच्या विमानातून लडाख मधल्या पहिल्या विद्यापीठाचे उद्घाटन करण्याकरता म्हणून आपले पंतप्रधान मोदी आले होते. असे समजले की जम्मू आणि काश्मीर राज्यातले पण काश्मीर खोऱ्याबाहेरचे हे पहिलेच विद्यापीठ असणार आहे. जम्मू आणि काश्मीर ह्या राज्यातली सगळी (म्हणजे तीनही) विद्यापीठे काश्मीर खोऱ्यात आहेत.
तर अशा रीतीने आम्ही लेह येथे अवतरलो. चादर ट्रेकला आमच्या बरोबर येणारे अर्पित आणि रवनीत नावाचे दोघेजण आमच्याच विमानात असणार असे कळले होते त्यांची बाहेर पडतानाच गाठ पडली. आम्ही एकत्रच आमच्या राह्ण्याच्या ठिकाणाकडे रवाना झालो.
मुक्काम पोस्ट लेह
How is the josh , high Sir!
आमची राहण्याची सोय करण्यात आलेल्या ठिकाणाचे नाव होते हॉटेल गलवन पॅलेस जे शांती स्तूपाच्या पायथ्याजवळ होते. पहिल्या दिवशी फक्त आल्याची वर्दी द्यायची असल्या कारणाने आणि खोली १२ शिवाय मिळणार नसल्याने आम्ही सकाळीच पोचलेले सगळे जण जेवणाच्या खोलीतच जमा होतो. इतकी गर्दी होती की शंका आली हिमालयात आपण ज्या शांततेच्या शोधात येतो ती ह्या ट्रेक करतेवेळी मिळणार की नाही. अर्थात खोलीत गर्दी असण्याचे मुख्य कारण बाहेर असलेली थंडी आणि वारे आणि लवकरच अजून उलगडा झाला की त्यातले काही जण ट्रेक करून आले होते आणि परत चालले होते. सहज चौकशी करता असे आढळले की तिथे जमलेल्या सगळ्याच जणांनी आम्ही केलेल्या Adventure Nation कडून बुकिंग केले नव्हते तर इतरही कोणकोणत्या कंपनीतर्फे बुकिंग केलेली माणसेही तिथे आलेली होती. तसेच आम्हाला प्रत्यक्ष ट्रेकला नेणाऱ्या संस्थेचे नाव इंटरनॅशनल युथ क्लब होते.
हॉटेल गलवन पॅलेस
आमच्या Adventure Nation तर्फे केलेल्या बुकिंग नुसार लेह मधील मुक्कामात कराव्या लागणाऱ्या खाण्यापिण्याचा खर्च धरलेला नव्हता. अर्थात त्याची सोय ही आपली आपण बघणे अपेक्षित होते. रहायच्या जागेपासून खाण्याचे ठिकाणे किती दूर असेल हे माहीत नसल्यामुळे गेल्या दिवशी सकाळी खाण्यासाठी म्हणून आम्ही घरून पराठे बनवून आणले होते. पण हॉटेल गलवन पॅलेस मध्ये नाश्ता १५० रुपये आणि जेवलं २५० रुपये अशा किमतीला उपलब्ध होते. जेवण खूप भारी होते अशातला भाग नव्हता पण निदान जवळच्या जवळ अशी सोय होती हे महत्वाचे. तिथला मुलगा पहिले पैसे घेऊन मगच किचन मध्ये ऑर्डर देत होता. हिमालयात असे पहिल्यांदाच अनुभवायला मिळल्याने त्याची मजा वाटलेली.
खोली मिळेतोपर्यंत (आधीच ठरल्याप्रमाणे) सगळ्यांनी आपापल्या भरलेल्या फॉर्मसोबत विमा हप्ता, वैद्यकीय तपासणी फी, पर्यावरण फी आणि प्रवेश फी ह्या सगळ्यांचे मिळून प्रत्येकी रुपये ५१४०/- मात्र, आयोजकांकडे सुपूर्त केले. फॉर्मवर पेनाने लिहिताना हातमोजे काढायला लागत होते आणि तो एकपानी फॉर्म भरेतोवर हात पार गारठून जात होते. विशेषतः हाताच्या बोटांची टोके. तिथेच प्रत्येकाची ऑक्सिजन लेव्हलही तपासण्यात आली. ह्याची मजा सांगायची झाली तर हात थंड पडलेले असतील तर ऑक्सिजन कमी दाखवते आणि लगेचच हातावर हात चोळून गरम केले असता जास्त दाखवते.
आम्हाला मिळालेली राहायची खोली पहिल्या मजल्यावर होती आपापल्या पाठपिशव्या उचलून घेऊन तो एक मजला चढून जाताना देखील धाप लागली. विरळ हवेचा परिणाम. थोडी विश्रांती घेऊन मग फिरायला म्हणून लेहच्या बाजारात जायचे ठरले. चालतच गेलो. चालताना देखील थोडा दम लागत होता. बाजारात गेलो तर कसलासा उत्सव असल्यामुळे ही गर्दी म्हणजे अगदी तुफान गर्दी. विवेकने स्टोक च्या वेळेस हिवाळ्यातले लेहचे जे काही वर्णन केले होते ते अनुभवायला मिळालेच नाही.
बाजारात जाताना लागलेला अर्धा गोठलेला झरा
लेह बाजारातील गर्दी
बाजारात फेरफटका मारत असताना एका ठिकाणी सूप प्यायला थांबलो असता एक मुंबईकर जोडपे भेटले जे नुकतेच चादर ट्रेक वरून परतले होते. त्यांना खराब हवामानाचा फटका बसल्याने नेरक अर्थात गोठलेल्या धबधब्यापर्यंत जाता आले नव्हते. त्यांनी सांगितले की जितके नेता येतील तितके मोज्याचे जोड न्या. रात्री आणि दिवसाही दोन जोड एकावर एका चढवल्यामुळे थंडी कमी वाजते मात्र घामामुळे जोड बदलावे लागतात. मग लेह मधल्या लष्करी गणवेश मिळणाऱ्या दुकानातून मोजे जोड खरेदी केले. प्रचंड गर्दीमुळे जास्त न फिरता हॉटेल गलवन मध्ये परत आलो.
गर्दीच गर्दी
लेहचा राजवाडा
रिपोर्टींगच्या दिवसअखेरीस वेगवेगळ्या संस्थांतर्फे बुकिंग केलेले आम्ही जवळपास ३० जण तिथे जमा झालो होतो. नाही म्हटले तरी जरा इतके सगळे एकत्र कसे जाणार एक लीडर आम्हाला कसा पुरा पडणार / सांभाळणार याची चिंता वाटू लागली. पण जे होईल ते होईल असे म्हणून रात्री ९ च्या सुमारास जेवून खोलीत आलो. वातावरणाच्या सरावाचा एक भाग विरळ हवेचा सराव हा पण दुसरा महत्वाचा भाग म्हणजे थंडीचाही सराव व्हायला हवा म्हणून खोलीत हीटर वापरू नका असे सुचवण्यात आले होते. खोलीतल्या नळाला पाणी नव्हते म्हणजे गोठल्यामुळे येऊच शकत नव्हते. त्यामुळे हॉटेल तर्फे प्रत्येकी एक बादलीभर पाणी पुरवले जात होते ते खालून वर त्यांचीच माणसे आणून देत होती. आम्ही चौघेही एकाच खोलीत होतो मी अरुण राजा आम्ही तिघे क्वीन साईझचे दोन बेड जोडले होते त्यावर आणि संदीप एका वेगळ्या सिंगल बेडवर. त्या रात्री आधीच थंडीमुळे नीट झोप लागत नव्हती त्यात अरण्याने इतके पाणी प्यायले होते की रात्रीत कधीही न उठणारा तो तीन वेळा उठला मग काय झोपेचे खोबरे. पण तरी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तरतरीत वाटत होते.
दिवस दुसरा
झोपेचे खोबरे झाले तरी सकाळी उठल्यावर तरतरीत वाटत होते.
दुसऱ्या दिवशी आम्हाला ओळखपरेड आणि ब्रिफींग करता एकत्र जमवले गेले तेव्हा एक लीडर आम्हाला कसा पुरा पडणार याची जी चिंता वाटत होती तिचे निराकरण झाले. आमची विभागणी दोन बॅचेस मध्ये होणार होती. समनव्यक एकच असणार होता पण स्थानिक गाईड प्रत्येक बॅच सोबत दोन जण असणार होते. आम्ही बरेचजण कोणीना कोणी सोबत घेऊन आलेलो होतो. पण एक - दोन जण अगदी एकटे आले होते. जम्मू आणि काश्मीर ते केरळ, गुजराथ ते बंगाल, अगदी मध्यप्रदेशातलेही दोन जण असे भारतभरातून लोकं आली होती. एकजण तर ढाक्याहून आलेला बांगलादेशी होता. भारतीयच असले तरी कामानिमित्त दुबईला वास्तव्य करुवून असलेले तीन जण खास ह्या ट्रेक साठी म्हणून दुबईहून रजा काढून आले होते. तर अजून एक जण अमेरिकेतून अडीच वर्षांनंतर महिनाभराच्या रजेवर घरी आलेला असताना ह्या आठवडाभराच्या ट्रेक करता आपल्या बहिणीसोबत आला होता. रेस्टॉरंटचा मालक, डॉक्टर, सैन्यदलातील अधिकारी, वायुदलातील अधिकारी फिल्म लायनीतल्या प्रोड्युसर कुटुंबातला एक जण, पेट्रोल पंपाचा मालक, आरजे, आयटी इंजिनीयर अशी विविध क्षेत्रातील माणसे एकच स्वप्न उरी बाळगून तिकडे जमलो होतो. मला हिमालयातले ट्रेक ह्या ही करता खूप आवडतात. हुद्दे, आर्थिक स्थिती, धर्म, भाषा, देश, पंथ, जात, वय, लिंग ह्या सगळ्यामध्ये विभिन्नता असली तरी हिमालय सर्वाना सारखीच वागणूक देतो. आणि तिथे येणारी माणसेही हे सर्व काही बाजूला ठेवून एकमेकांसोबत एका अदृश्य अशा धाग्याने जोडली जातात. एकमेकांच्या कुटुंबाचा एक भाग बनतात. अगदी खूप काळ संपर्कात नसले तरी मनाच्या कोपऱ्यातली जागा अडवलेली असते आणि लक्षात राहतात. तर असो.
आमचे ओळख सत्र पार पडले आणि मग आम्हाला आमच्या समन्यवयका बद्दलही अधिक माहिती मिळाली. त्याचे नाव ईश्वर. त्याच्या नावावरून मग हमे डरने की जरुरत नहीं, ईश्वर हमारे साथ है वगैरे वाक्ये फेकली गेलीच. हा माणूस माणूस कसला मुलगाच खरेतर, हिमालयातल्या भटकंतीच्या प्रेमापोटी शिक्षण अर्धवट सोडून पूर्ण वेळ ट्रेक लीडरचे च काम करतो. मूळचा आंध्र प्रदेश चा पण आता मनालीत स्थायिक होऊ घातलेला. ह्याने स्वतः निदान सहा सात वेळा चादर ट्रेक केलेला होता. त्याला ह्या ट्रेकचा शेवटपर्यंत व्यवस्थित जाण्याचा, पाण्यात पडण्याचा, पाण्यात पडलेल्याला बाहेर काढण्याचा, शेवटपर्यंत न जाऊ शकण्याचा असा सर्व प्रकारचा अनुभव होता. ह्या माणसामुळे आमचा ट्रेक विना कटू अनुभवाचा आणि आनंददायी झाला. ओळखसत्रानंतर त्याने चादर ट्रेक करताना करावयाच्या आणि टाळायच्या गोष्टी सांगितल्या. सगळ्यात पहिल्यांदा त्याने विचारले पाण्यात डुबकी मारायचा व्हिडिओ कोणीकोणी पाहिला आहे आणि कोणाकोणाला तसे करायची इच्छा आहे. काही हात एकदम तर काही का कू करत वर आले. मी आणि अरुण, अभिनवने फेसबुकवर आम्हाला टॅग केलेले पाण्यात डुबकी मारायचे विडिओ पाहून जरा प्रेरित झालो होतो आणि जमल तर बघू मोड मध्ये होतो. ईश्वरने आम्हाला तशी डुबकी मारल्यानंतर काय काय होऊ शकते अशा डुबकी मारण्याचा परिणाम किती उशिरा जाणवू शकतो त्याबद्दल असे काही सांगितले की मनोमन मी तरी आपण डुबकी मारायची नाही ह्या निष्कर्षाप्रत आलो. तसेही हे व्हिडियो पुण्यात बसून बघितले तेव्हा इथल्या उणे तपमानाची काडीचीही कल्पना आलेली नव्हती. त्यामुळे आणि एकंदरीत स्वत:चा आवाका माहीत असल्यामुळे डुबकी नाही निर्णयाचे पालन करायचे ठरवूनच टाकले. ईश्वरने पुढे कपड्यांची तयारी कशी हवी ते सांगितले, ट्रेक करताना समोर येणारे संभाव्य धोके सूचित केले आणि त्याच बरोबर हे ही सांगितले की आपण नीट काळजी घेतले असता हा ट्रेक व्यवस्थित पूर्ण होउ शकतो अर्थात निसर्गाच्या लहरीपणापुढे कोणाचेही चालत नाही आणि एकदा ट्रेक चालू केल्यानंतर त्याने घेतलेला निर्णय सर्वांवर बंधनकारक राहील.
गंभीर मुद्द्यांवर बोलून झाल्यावर त्याने एकदम चला आता शांती स्तूप बघून येऊया असे सुचवले. आमचे हॉटेल शांती स्तूपाच्या पायथ्याशीच असल्याने वर जाणारा रस्ता लागूनच होता.
शांती स्तुपाच्या पायथ्या पाशी असलेले आमचे हॉटेल - आवारातून घेतलेला फोटो
हॉटेलच्या छतावरून घेतलेला फोटो
वर जाताना आमचे आपापसात बोलणे आणि अधिक ओळख करून घेणे चालू झाले. आमच्या बरोबर खांडवा मध्यप्रदेशातून आलेले दोघे अर्पित आणि रवनीत आणि पुण्याहून आलेला पण मूळचा सोलापुरी चिंतामणी ह्या आधी बाईकवर लडाख मध्ये येऊन गेले होते. इतरही कोणी फिरायला म्हणून लडाखला येऊन गेले होते. ते असे काय काय सांगत असताना अरण्याला आम्ही इथे याआधी मॅरेथॉन पळायला येऊन गेलो होतो असे सांगून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघायला फार मजा येत होती. अरुण आणि संदीप या आधी लडाख मॅरेथॉन करता लेह ला येऊन गेले होते त्यावर्षी काही घरगुती कारणाने मला श्रीनगर होऊन परत जावे लागलेले. त्यावेळी मॅरेथॉन ची सुरुवात आणि शेवट शांती स्तूपाच्या पायथ्याशी झाली होती त्यामुळे त्याच्या त्या सर्व आठवणी जाग्या झाल्या होत्या. त्यावेळी चढ चढून चालत जाताना देखील दम लागत होता त्यामुळे जिथे चालताना पण दम लागतोय तिथे तुम्ही मॅरेथॉन पळाले आहात? काय सांगता? कसले भारी आहात असे लोकांनी म्हणून झाले की मग पापा तो यहा ७२ किमी भाग चुके है हे सांगायचे आणि त्यांचे विस्फारलेले डोळे आणि वासलेला आ याची मजा घ्यायची त्याच्या ट्रेकमधल्या सगळ्या लोकांसोबत अशी मजा घेण्याची सुरुवात त्या दिवसापासूनच झाली. पापा म्हणजे मीच मला ढक्कन ऍथलिट मधे पापा म्हणतात. अरण्या हा तसा बहिर्मुख किंवा जास्त बोलघेवडा नाहीये पण त्याला असं हळूच पुड्या सोडून लोकांची मजा घ्यायला खूप आवडतं. अरुणला अरण्या अशी हाक मारली की चिंतामणीला फार मजा वाटायची तो म्हणायचा एकदम महाराष्ट्री असल्यागत वाटतंय.
हे सर्व असले तरी आमच्या ग्रुपमधले बरेच जण हिमालयातला पूर्वानुभव असलेले होते आणि आमचे भिडू नव्हते, मी स्वत: हिवाळ्यातील ट्रेक पहिल्यांदाच करत होतो. आणि तसंही हिमालयात बिलकुल विनम्रता के साथ जाना पडता है, तुमची आधीची कामगिरी / अनुभव पूढच्या खेपेस कामी येत नाही. प्रत्येकवेळी नव्याने कोऱ्या पाटीनिशी हिमालयाच्या पोटात शिरायला लागतं. त्यामुळे माझं म्हणणं मी यावं केलाय नी त्याव केलाय कशाला सांगायचे सहज बोलण्यात निघाले तर ठीके नाहीतर ट्रेक संपल्यावर सांगूया. पण मला कानकोंडे वाटतंय म्हटल्यावर त्याला अजून उल्हास वाटायचा. माझा खरा जिगरी दोस्त. अर्थात मी ही त्याला कमी त्रास नाही दिला. असो.
शांती स्तुपा च्या टेकडीवर (जो पहिल्या दिवशी डोंगरच भासतो) जाताना आम्ही गाडीरस्त्याने वर गेलो आणि पायऱ्यानी उतरलो. शांती स्तूपाभोवताली जी जागा आहे तिथून आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते. एका बाजूला सिंधू नदी, स्टोक गाव एका बाजूला, जरा बाजूला स्टोक कांगरी पर्वत रांग, आणि हो खारदूंग ला कडे जाणारा रस्ता असे सर्व काही इथून दिसते ते नवख्यालाही कळावे म्हणून त्या त्या दिशेला पाट्या लावल्या आहेत. खारदूंग ला च्या पाटीपाशी गेल्यावर परत एकदा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तो वळणावळणाचा रस्ता चढत चढत बराच लांबवर जाताना दिसतो. मग त्या पाटीसमोर उभे राहून फोटो काढून घेतला.
शांती स्तुप
प्रत्यक्ष स्तूप जिथे आहे तिथे जाण्याकरता पायातले जोडे काढायला लागणार असल्यामुळे आमच्यापैकी फक्त एक दोन जणच तिथे गेले. नव्या नव्या उत्साहात दोन चार फोटो सेशन पार पाडली आणि मग खाली उतरायला सुरुवात केली. मग परत एकदा लेह मार्केट मध्ये गेलो मुख्य म्हणजे गमबूट आणि ईश्वरच्या सांगण्यानुसार हवी वाटलेली अजून काही बाही खरेदी केली. वाजवान मध्ये जेवलो. आणि परत आलो.
रात्रीच्या जेवणा अगोदर डायनिंग हॉल मधे जमलेल्या लोकांसोबत गप्पा मारल्या. म्हणजे खरेतर मी तिकडे पोचलो तेव्हा त्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या त्यामुळे मी जास्त करून ऐकण्याचेच काम केले.त्यावेळी कळले की मुंबईहून आलेल्या तीन जणांनी लेहमधली थंडी पाहूनच परत जायचा निर्णय घेतला आहे. त्यातल्या एका मुलीला अगदी अजिबात परत जायचे नव्हते पण तिच्यासोबत आलेल्या लोकांपुढे काही न चालल्याने तिला परत जायला लागणार होते आणि अर्थातच तिला त्याचे फार वाईट वाटत होते. अशी वेळ कुणावरही ना येवो. उर्वरित वेळ फारशा काही घडामोडी न घडता पार पडला आणि मग आम्ही झोपायला गेलो.
दिवस तिसरा
How is the josh , मुझे घर जाना है|
आज आम्हाला वैद्यकीय तपासणी करता जायचे असल्याने उठल्यावर सगळ्यांनीच लवकर आवरून घेतले. आणि खाली येऊन नाश्ता करून तयार झालो.
चादर ट्रेक ला जाणाऱ्या लोकनाची वैद्यकीय तपासणी आणि विमा हा प्रकार ह्याच वर्षीपासून सुरु झालेला आहे. वाढीव पैसे गेले तरी मला तरी हा उपक्रम खूपच स्तुत्य वाटला. असे वाढीव पैसे द्यायला लागणार याची पूर्वकल्पना सगळ्यांच्या आपापल्या आयोजकांनी दिले होतीच तरीही काही मंडळी हे कसले अजून पैसे द्यायचे आपल्याला काय फायदा असे कुरकुरत होतेच. गोठलेल्या झंस्कार नदी सारख्या अत्यंत दुर्गम अशा भागात गेल्यावर काही वैद्यकीय आणीबाणीची परिस्थती उद्भवली तर जी काही धावपळ करावी लागू शकते त्या संदर्भात मुंबई स्थित घुमते रहो संस्थेच्या मुलाने लिहिलेली एक पोस्ट कायप्पा मार्फ़त वाचनात आली होतीच. ती पोस्ट आम्ही पुण्याहून निघायच्या सुमारासच अगदी व्हायरल झाली होती. अनेक हितचिंतकांनी आवर्जून वैयक्तिकरित्याही मला ती पोस्ट पाठवली होती आणि जपून जा, सांभाळून रहा सुखरूप परत या असे बजावले होते. (ती पोस्ट माझ्या आईच्या वाचनात येऊ नये अशी मी केलेली प्रार्थना अर्धीच ऐकली गेली. मी लेह ला निघून आल्यावर ती पोस्ट आईच्या वाचनात आल्यामुळे आई जरा काळजीत पडली होती.) त्या पोस्ट मध्ये मुख्यतः ऑक्सिजन कमी झाल्यामुळे उद्भवलेल्या आणिबाणीबाबत लिहिले होते परंतु ह्या ट्रेक मध्ये घसरून पडून हाडे मोडण्याचे प्रमाणही लक्षणीय असते. त्यामुळे असे प्रकार घडलेच तर चादर ट्रेक मार्गावर फिरते वैद्यकीय पथक उपलब्ध असणे हा खूप मोठा दिलासा होता. नाही म्हटले तरी माझ्या बरोबर आलेल्या सर्वानी माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळे त्यांची जबाबदारी माझ्यावरच होती म्हणजे नैतिक दृष्ट्या मी मानत होतो. ते सर्वच जण पहिल्यांदा हिमालयात चालले होते संदीप ने सुरुवातीला एकदा दुसरा ट्रेक करूया का असे विचारलेही होते. पण काही होत नाही चल असे बोलून आम्ही सगळेच इकडे निघून आलो होतो. त्यामुळे आता मनामधे जरा कातर भावना निर्माण झाली. थंडीचा कहर तर चालूच होता.
आमची वैद्यकीय तपासणी जिथे होणार होती ते ठिकाणही लेह मार्केट मधेच होते.
बराच काळ रांगेत उभे असताना आमची करमणूक करणारे पोस्टर
तिथे बराच काळ रांगेतराहिल्यावर आमच्या सगळ्यांची तपासणी पूर्ण झाली. ही तपासणी म्हणजे रक्तदाब, रक्तातले ऑक्सिजनचे प्रमाण, हार्ट रेट अशा तीन चार गोष्टी होत्या. इथेही काही जणांचे ऑक्सिजन चे प्रमाण कमी आढळले असता हातावर हात चोळून परत मोजता वाढलेले आढळले. इथे आम्हाला पहिल्या नावानुसार चार गटात विभागण्यात आले होते . माझ्या गटाची तपासणी सगळ्यात उशीरा झाली त्यामुळे अरुण राजा संदीप यांना माझ्याकरता थांबावे लागले. जरा कंटाळवाणे झाले पण आम्ही सगळेच पास झालो.
तरी आम्ही चौघे मॅराथॉन रनर असल्यामुळे आमच्या शारिरिक क्षमतेच्या बाबतीत मी बराच निश्चित होतो. पण एकंदरीत सर्वच लोकांची वैद्यकीय तपासणी करून जे फिट असतील त्यांनाच पुढे पाठवण्याचा निर्णय तिथल्या स्थानिक सरकारने, २-३ बिन सरकारी संघटनां च्या बरोबर एकत्रितपणे घेतला हे मला खूप भारी वाटले. सहसा खासगी संस्था त्यांचा धंदा कमी होऊ शकतो ह्या भीतीने अशा प्रकारच्या कठोर उपायांना विरोध करताना दिसतात त्यासमोर हे उदाहरण अनुकरणीय आहे. ह्याच ठिकाणी आमचे तपासणीकरता वाट पाहणे चालू असतानाच आम्हाला विमा कंपनीच्या प्रवक्त्याकडून ह्या विम्याअंतर्गत काय कव्हर केले आहे, कोणत्या परिस्थितीत अशी मदत मिळू शकेल आणि कधी नाही ह्याबाबत साद्यन्त माहिती देण्यात आली. तर अशा रीतीने आम्ही सर्वच जण पास झाल्यानंतर वाजवान मधे जेवायला गेलो.
जेवून झाल्यावर एका टपरी सदृष्य दुकानासमोर गरमागरम कॉफी पित समोरचे हिमाच्छादित पर्वत रांगांचे नजारे बघत बसलो असताना आम्हाला चिंतामणी आणि प्रथमेश हे सोलापुरी पुणेकर भेटले. त्यांना कॉफी प्यायला या असे म्हटल्यावर त्यांनी ते पुढे बरिस्ता मध्ये मित्रांना भेटायला चालले असल्याचे सांगेतले तसेच त्यानंतर ते दोघे लेह मधील वॉर मेमोरियल पहायला जाणार आहेत असेही सांगितले. त्यांनी आम्हालाही त्यांच्यासोबत येण्याचे सुचवले. एकीकडे सुस्ती अंगावर आली होती पण अशी संधी परत कधी मिळेल न मिळेल (मला तर असे काही म्युझियम आहे हेच माहीत नव्हते आणि मागच्या लेह भेटीतही मी हे बघितले नव्हते ) असे म्हणून आम्हीही जायचे ठरवले. आमची कॉफी संपवून चिंतामणीला बरिस्तामधे गाठले. तिथे त्याचे दोन मित्र भेटले आंगसुक आणि ताशी. चिंतामणी आणि अंगशुकची ओळख चिंतामणी जेव्हा बाईकवर लडाखमधे आला होता त्यावेळी झालेली आणि ताशी त्याचा मित्र. मी तर त्या दोघांनाही पहिल्यांदाच भेटत होतो. पण पहिल्याच भेटीत अशा काही गप्पा रंगल्या की बास रे बास. त्या दोघांनी आम्हाला कुठे टॅक्सी करून जाता असे म्हणून स्वतःच्या गाडीतून (आम्ही चौघे, चिंतामण आणि प्रथमेश सागर आणि ईश्वर) अशा सगळ्यांना वॉर मेमोरियल म्युझिअम पहायला नेले आणि परत आणले. अत्यंत दिलखुलास दिलदार आणि उमद्या व्यक्तिमत्वाची माणसे.
वॉर मेमोरियल म्युझियम बघताना डोळ्यात पाणी उभे राहतेच राहते. आपल्या सैनिकांना किती बिकट परिस्थितीत काम करावे लागते आणि अपेष्टाना काही सुमार नसतो हे आपल्याला इथे बसून नाहीच कळणार नाहीच कळत. असो.
परत हॉटेलवर आल्यानंतर मात्र आमची सामान विभागणी आणि पॅकिंग ची गडबड उडाली कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच चादर ट्रेक करता निघायचे होते. आणलेल्या सगळ्याच्या सगळ्या सामानाचे ओझे ट्रेकमध्ये अंगावर वागवत नेण्याची गरज नव्हती. जास्तीत जास्त १० ते १२ किलो वजनाचे सामान वागवत नेण्याच्या हिशोबाने योग्य मानले जाते. शिवाय अंगावरच चार चार थर असतातच. त्यामुळे जास्तीचे सर्व सामान, लेहमध्ये वापरलेले कपडे, असे सगळे एका छोट्या सॅक मध्ये टाकून लेह मधेच ठेवायची सॅक वेगळी आणि सोबत न्यायची वेगळी सॅक असे तयार करून झाले. हे लिहिताना दोन ओळीत आटोपलंय पण करताना बराच काथ्याकूट आणि कुटाणे केल्याशिवाय हे होत नाही असा दर ट्रेकवेळचा अनुभव आहे.
जाण्याअगोदर आम्हाला आमचा गट जरा मोठा म्हणजे १८ जणांचा आणि दुसरा गट १२ जणांचा असेल असे सांगण्यात आले. ईश्वर ने लोकल गाईड लोकांच्या अनुभवानुसार जास्त अनुभवी लोकांकडे जास्त माणसे आणि तुलनेने कामे अनुभवी लोकांबरोबर कमी माणसे अशी विभागणी केली. आता आमच्या गटात मी अरुण राजा आणि संदीप, चिंतामणी आणि प्रथमेश, रवनीत आणि अर्पित, अक्षय आणि अपराजिता, माशा आणि मोहनीश, आशिष मेघना आणि राकेश, राहुल हिमांशू आणि दिनेश आणि एकटा आलेला सागर असे सगळे असणार होते.
कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय असं वाटत असताना हुरहूर उत्कंठा अशा संमिश्र भावनेत झोपी गेलो.
पुढचा भाग
शुभ्र काही जीवघेणे - चादर ट्रेक ३
https://www.maayboli.com/node/69590
फोटो अपलोड करायला अडचण येते
फोटो अपलोड करायला अडचण येते आहे. लहान साईझचे करायला जमत नाहीयेत. पण जरा कळ काढा, फोटो टाकल्याशिवाय राहणार नाहीये
सुंदर लिहिलय. फोटो मस्तच. पण
सुंदर लिहिलय. फोटो मस्तच. पण नयनरम्य फोटोंचा आणि ट्रेकचा काही संबंध नाही हे वाचल्यावर लक्षात येते. एकुनच हे अवघड प्रकरण आहे तर.
कमाल आहे तुमची.
शुभ्र काही जीवघेणे - नाव अगदी साजेसे आहे लेखमालेला.
ते सारखं "मला हिमालयात जायचय, हिमालयात जायचय" असं म्हणू नका नाहीतर देव एखाद्या दिवशी तथास्तू म्हणेल आणि वैराग्य प्राप्त होऊन तुम्ही 'अल्लख' करत हिमालयाकडे चालू लागाल.
पुभाप्र
खल्लास फोटो आहेत, एकदम dreamy
खल्लास फोटो आहेत, एकदम dreamy

अनुभव रोमांचकारी आहे
मस्त मस्त..वाचतेय...
मस्त मस्त..वाचतेय...
पण हे काय ? २ च फोटो ?
अजुन टाका ना प्लीज.
मस्त! वाचते आहे. सॅक ची गणिते
मस्त! वाचते आहे. सॅक ची गणिते खरेच त्रासदायक असतात!
अगदी बैजवार लिही बरं.
धन्यवाद शाली. हिमालयात जाणार
धन्यवाद शाली. हिमालयात जाणार पण अवकाश आहे.
वानप्रस्थ कोकणात आणि सन्यासाश्रम हिमालयात असं ठरलंय सध्यातरी.
धन्यवाद किल्ली पण रोमांच अभी बाकी है
स्मिता श्रीपाद - फोटो हळूहळू टाकतोय, भरपूर टाकणार आहे.
शैलजा - सॅकची गणिते खरेच त्रासदायक असतात! अगदी गं कितीही वेळा जा प्रत्येक वेळचं गणीत अवघडच आणि इतकं करून लागतील राहू दे म्हणून नेलेल्यापैकी निम्म्या गोष्टी हव्या तेव्हा न सापडल्यामुळे / कंटाळा केल्यामुळे तशाच्या तशा परत येतात ट्रेकमधे मित्रांच्याच वापरल्या जातात.
ज ब द द स् त . . . . . . . .
ज ब र द स् त . . . . . . . . अं गा व र श हा रे !!!
खूप छान! मजा येतेय वाचायला!
खूप छान! मजा येतेय वाचायला! असेच सविस्तर भाग लिहा
मस्त लिहिलंय ! सविस्तर !
मस्त लिहिलंय ! सविस्तर ! आवडलं वर्णन . फोटो तर अप्रतिम !! भूल पडते असं पाहिलं कि !!
लिहिताना दोन ओळीत आटोपलंय पण करताना बराच काथ्याकूट आणि कुटाणे केल्याशिवाय हे होत नाही>> अगदी अगदी . काथ्याकूट , उलटसुलट शंका , पुन्हा पुन्हा तपासून बघणे ,सॅक रिकामी करून पुन्हा नीट चापून चोपून भरणे ,एवढं करून आयत्या वेळी हवं ते सापडत तरी नाही किंवा कुठे ठेवलंय ते आठवत हि नाही !!
तुम्ही गंबूट घेतले म्हणताय >> हे उंच असतात म्हणून बर्फ /पाणी आत जाऊन ओलं होत नाही पण त्यांचा फक्त सरळ चालताना उपयोग होतो ना ? संपूर्ण ट्रेक असा नाही ना करू शकत? हा ट्रेक चढ उतार असा पण होता कि जास्त सरळ आणि कमी चढ उताराचा होता/आहे?
कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय असं वाटत असताना हुरहूर उत्कंठा >> आम्हाला पण लागलीये पुढच्या भागाची उत्कंठा . पण निवांत वेळ घ्या आणि असच सविस्तर लिहा !
वाचिंग...
वाचिंग...
३५०० मी. १३५०० मीटर असावयास
बसल्या जागीच गारठलो वाचून. माझा मित्र दोन वर्षांपूर्वी या ट्रेकला गेला होता. हिमस्खलन झाल्याचं सांगत होता. हिमस्खलन होण्यासारखी परिस्थिती आहे का हा ट्रेक करताना?
मस्त! सविस्तर अगदी बारीकसारीक
मस्त! सविस्तर अगदी बारीकसारीक तपशीलांसह वर्णन फारच रोचक ! फारच चित्रदर्शी झालंय!
अंजलीशी सहमत ! पुभाप्र !
भारीच.
भारीच.
वाचुनच थंडीचे शहारे आलेत.
कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय असं वाटतंय
आवडले पुभाप्र......
आवडले पुभाप्र......
छानच आहे शैली तुमची. सहजपणे
छानच आहे शैली तुमची. सहजपणे लिहिलं आहे ते भावलं. आणि फोटो बघून हिमालयाच्या विराट रुपाचा किंचित अंदाज आला. तुम्हाला तर त्याचा याचि देही याचि डोळा अनुभव आला आहे..
रंजक आणि खिळवून ठेवणारी शैली
रंजक आणि खिळवून ठेवणारी शैली ...
खूप सुंदर लिहिता... आता या लिखाणा नंतरही सतत लिहा... आवडेल वाचायला...
मी लदाख ला गेले तेव्हापासून
मी लदाख ला गेले तेव्हापासून मनात आहे हा ट्रेक. पण जमेल्स वाटत नाही . म्हणजे ते थंडीच झेपायच्या पलिकडे होइल.
त्यामुळे उत्सुकतेनी वाचतेय . तु वेळ घे पण लिही(च) पूर्ण!
मस्त लिखाण, आवडतंय
मस्त लिखाण, आवडतंय
पुढचा भाग लौकर येऊ दे
मार्गी , वावे , anjali_kool ,
मार्गी , वावे , anjali_kool , हिम्या, शशिराम, मंजूताई, सस्मित, योगेश, प्राचीन, दत्तात्रय साळुंके, इन्ना, सिम्बा सर्वांचे मनापासून धन्यवाद.
तुम्ही गंबूट घेतले म्हणताय >> हे उंच असतात म्हणून बर्फ /पाणी आत जाऊन ओलं होत नाही पण त्यांचा फक्त सरळ चालताना उपयोग होतो ना ? संपूर्ण ट्रेक असा नाही ना करू शकत? हा ट्रेक चढ उतार असा पण होता कि जास्त सरळ आणि कमी चढ उताराचा होता/आहे?
अंजली, हा ट्रेक गोठलेल्या नदीपात्रातून असल्याकारणाने बहुतकरून जास्त चढ उताराचा नव्हता. चढ / उतार खूप कमी वेळा आणी अतिशय टप्प्याटप्प्याने (gradual) होते. पण काही वेळा पाणी अचानक खूप जास्त वाढते अशा वेळी पुढे जाण्याकरता काही भाग डोंगरावर चढून मार्गक्रमणा करावी लागते. त्यावेळी आणि एरवी मुक्कामी पोचल्यावर वापरायला म्हणून नेहेमीचे ट्रेकिंग चे बूटही बरोबर बाळगायला सांगीतले होते.
शशिराम, हो हिमस्खलन होऊ शकते, होत राहते. आम्ही गेलो असतानाही अगदी कमी प्रमाणावर का होईना पण झाले. अधिक तपशीलाकरता वाचत रहा शुभ्र काही जीवघेणे
खुपच छान पु ले शु
खुपच छान
पु ले शु
भारी एकदम
भारी एकदम
तुला पापा म्हणतात ही माहिती नव्याने कळली
लेह ची गर्दी बघून अगो बाबो असे झाले, जत्राच भरलीये की
जबर !! भारी आहे अनुभव. आणि
जबर !! भारी आहे अनुभव. आणि लेखन पण मस्त चालू आहे हर्पेन. पुलेशु
मस्त लिहितो आहेस. अगदी
मस्त लिहितो आहेस. अगदी चित्रदर्शी.
मी हिमालयात कधीच जाणार नाही
मी हिमालयात कधीच जाणार नाही कारण बर्फ आवडत नाही. पण लेख सावकाश पूर्ण वाचणार आहे. तिकडे गरीब लोक कसे राहतात याबद्दल जाणून घ्यायचे आहे.
फोटो मस्त!
फोटो मस्त!
लेहला एवढ्या गर्दीमुळे हवेतला ऑक्सिजन अजून कमी होत असेल, नाही?
आलिया भटचं पोस्टर भारी!
मस्त! पुभाप्र.
मस्त! पुभाप्र.
पोस्टर मस्त आहे.
फोटो आत्ता पाहीले. मस्तच आहे.
फोटो आत्ता पाहीले. मस्तच आहे.
बरेच दिवस वाट पाहत होतो,
बरेच दिवस वाट पाहत होतो, दुसरा भाग आलाय का शोधायचो,
वाचलं, खूप प्रवाही आणि सहज लिहिलंय. जणू काही आपण तिथे बाजूला उभे आहोत वाटलं.
मस्त लेख रे.
मस्त लेख रे.
मात्र लेहच्या बाजारपेठेचा फोटो पाहून पोटात गलबलले. वाढलेल्या पर्यटनाचा स्थानिकांना नक्कीच फायदा होतो, तेव्हा पुर्वी काय होते ते उगाळण्यात अर्थ नाही. मात्र तरी वाइट वाटले.
फोटो आता पाहिले. छान आहेत.
फोटो आता पाहिले. छान आहेत.
आलिया भट
Pages