हातिम ताई

Submitted by पायस on 14 March, 2019 - 04:12

हातिम ताई हा एक चमत्कारिक चित्रपट आहे. त्यात चमत्कृतिपूर्ण गोष्टी घडतात म्हणून नव्हे तर त्याच्या शैलीस प्रतिकूल अशा वर्षी प्रदर्शित होऊनसुद्धा त्याने बर्‍यापैकी गल्ला जमवला म्हणून (वेगवेगळे सोर्सेस वेगवेगळे आकडे सांगत असले तरी १९९० साली याने किमान १ कोटींचा गल्ला जमवला यावर त्यांचे एकमत दिसते). असा हा विशेष सिनेमा अभ्यासायचा म्हणजे काही पूर्वाभ्यास गरजेचा आहे. तरी यावेळेस सेक्शन्सना सेक्शन ० पूर्वाभ्यास पासून सुरुवात होईल.

०) पूर्वाभ्यास

०.०) हातिम ताई : ओरिजिनल स्लमडॉग मिलिएनेअर

आधी तर हातिम ताई या थोर पुरुषाविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. मूळात हातिम ताई हा एक अरबी कवी होता, जो इस्लाम धर्म स्थापन होण्याच्याही आधी (सहावे शतक) होऊन गेला. त्याच्याविषयी अनेक किवदंती आहेत. यावर आधारित साहित्य निर्मिती अरबीत/फारसीत झाली. त्यामुळे त्याचे अल्ला का नेक बंदा, खुदा का फरिश्ता वगैरे वर्णन हे कथाकारांनी घेतलेली लिबर्टी असावी. त्याच्या दयाळु स्वभावाचे वर्णन करायचे तर काळाला साजेशी विशेषणे तर वापरावी लागणारच. हीच हुशारी या चित्रपटाच्या पटकथाकारानेही दाखवली आहे.
मूळ कथेमध्ये एक राजा हातिमचा मित्र असतो. या राजाचे हुस्न बानू नावाच्या सौंदर्यवतीवर प्रेम असते. बानूबाईला मात्र खंडोबाच हवा असल्याने तिने लग्नाचा पण म्हणून सात भलतेच अवघड प्रश्न काढलेले असतात. जसे स्लमडॉग मिलिएनेअर मधले प्रश्न कधीच केबीसीत विचारले जाणार नाहीत, तसेच हिचे व्हेग प्रश्न कोणत्याही स्वयंवरात विचारले जाणार नाहीत. आता राजा भित्रा असल्यामुळे त्याला या प्रश्नांच्या उत्तरांसाठी आपला जीव गमवायचा नसतो पण बानूही हवी असते. मग हातिम उदारपणे राजाच्या वतीने हे प्रश्न सोडवायची तयारी दर्शवतो. मग मूळ अरेबियन कथांमध्ये दर रात्री जेव्हा शहरजादे गोष्ट सांगते तेव्हा हातिम प्रश्नाचे उत्तर घेऊन बानूकडे परत आलेला असतो. तो आधी त्याची कर्मकहाणी, जमालच्या फ्लॅशबॅकप्रमाणे सांगतो. फ्लॅशबॅक संपल्यानंतर तो उत्तर देणार. ते उत्तर बरोबर आहे असे बानू सांगणार. अ‍ॅक्चुअली तिला यातले एकही उत्तर माहिती असता कामा नये. उदा. एका प्रश्नात तिने त्याला एका जागेची माहिती काढायला सांगितलेली असते आणि तिथून आजवर कोणीही मनुष्य जिवंत परत आलेला नसतो. मग हिला त्याचे उत्तर कसे माहित? कशावरून हातिमने खरे उत्तर सांगितले? तर मूळ कथानकात अशा बर्‍याच अडचणीच्या जागा आहेत. पूर्वाभ्यासासाठी इतके कळणे पुरेसे आहे की हातिम सर्व उत्तरे शोधतो आणि त्याच्या सांगण्यावरून बानू राजाशी लग्न करते.

०.१) कथेचे रुपांतर करताना काळजी घेणे आवश्यक
तर इथे सर्वात मोठा प्रॉब्लेम - हातिमला हिरोईन नाही. ९० चे दशक उजाडले असले तरी या नियमाचे मार्गदर्शक तत्वात रुपांतर झालेले नसल्याने हातिमला हिरोईन असणे अपरिहार्य आहे. त्यामुळे अतिशय हुशारीने कथेत आवश्यक ते बदल करून हातिमला हिरोईन मिळण्याची सोय केली आहे. तीसुद्धा अगदी विकोची हळद पिऊन गोरी झालेली!
दुसरा मुद्दा - या प्रश्नांची आन्सर की कुठून आणायची? इथे कादर खानने रुढ केलेला ८० च्या दशकातला नियम वापरावा लागतो. जादूच्या सिनेमात ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत नाही त्याचे उत्तर जादू! त्यामुळे मूळ कथेत नसलेला परीचा एलिमेंट इथे अ‍ॅड केला आहे. या दोन मूलभूत बदलांमुळे सिनेमाला मुख्य व्हिलन मिळण्याचीही सोय होते. तसेच रिडीम्ड व्हिलन, व्हिलनचे आद्य कर्तव्य सीन अशा कित्येक मौलिक संधी पटकथाकाराला उपलब्ध होतात. होतकरू लेखकांनी या अँगलने या सिनेमाचा कसून अभ्यास केला पाहिजे.

०.२) कादर खान नसेल तर जितेंद्रही काही करू शकत नाही
इथे एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. हा सिनेमा पद्मालय स्टुडिओज् चा नाही. हा सिनेमा बाबूभाई मेस्त्रींचा आहे. स्पेशल इफेक्ट्स डिपार्टमेंटमधून पुढे आलेल्या आणि साठच्या दशकातले बरेच पौराणिक सिनेमे दिग्दर्शित केलेल्या दिग्दर्शकाचा अनुभव दांडगा आहेच आणि त्याचा काही प्रमाणात सिनेमाला फायदाही होतो पण; पण हा सिनेमा ऑलमोस्ट सीन टू सीन मेस्त्रींच्याच १९७१ सालच्या सात सवालची कॉपी आहे. वाढलेल्या बजेटनुसार नवल कुमारच्या जागी जितेंद्र आणि चकाचक सेट वापरले गेले असले तरी एक घोळ झाला आहे. ८० च्या दशकात पौराणिक सिनेमांचा सॉर्ट ऑफ रिसर्जन्स झाला होता. याला कारणीभूत होता कादर खान. कादर खान काळाची पाऊले ओळखून डेव्हिड धवन लाटेचे प्रिकर्सर सिनेमे लिहित होता. या आऊटडेटेड टॉपिकला त्याने हात घातला नाही. पण या सिनेमाने १९७१ ला साजेशी पटकथा घेऊन त्याला कादर खान शैलीत बनवण्याचा प्रयत्न केला. ते तितकं काही जमलेलं नाही. हातिम ताई आणि पाताल भैरवी यांचा तौलनिक अभ्यास केल्यास कादर खानचा ग्रेटनेस समजून येतो. या धाग्याचा तो विषय नसल्याने केवळ उहापोह करून थांबतो आहे. परंतु त्यामुळे हा सिनेमा पाहून सतत "अजून भारी करता आला असता" हे वाटत राहते.

१) आटपाट नगर होते

१.१) तिथे एक अल्लाचा नेक बंदा राहत होता

लाल पडद्यावर श्रेयनामावली अक्षरे झळकतात आणि सिनेमा सुरु होतो. सिनेमा अरबस्तानात घडत असल्याचे कळण्यासाठी अरबी स्टाईलने आआआ आणि ओओओ होते. कट टू एक रँडम राजवाडा. मागून अजानची हाक ऐकू येत असल्याने वेळ पहाटेची असल्याचे कळते. कोणा शाह-ए-आलम नामक शहेनशाहला (याचं काम अमिताभने केलेले नाही, चिंता नसावी) येऊन दासी सांगते की तुला मुलगा झाला. खुश होऊन गळ्यातला हार तो तिला बक्षीस म्हणून देतो. यामुळे तो फार मोठा बादशहा आहे यावर शिक्कामोर्तब होते. फकीर-दरवेशी-नजूमी (भविष्यवेत्ते) यांना काही कामधंदा नसल्याने ते राजवाड्यातच पडीक असतात. ते या मुलाचे नाव हातिम ठेवा असे सांगतात आणि त्याचे रक्षण व्हावे म्हणून एक ताईतही देतात. असा हा हातिम ताईत क्षणार्धात मोठा होऊन जितेंद्र बनतो. जितेंद्राचे या सिनेमातले सर्व कपडे पुढील प्रकारात बसतात - अंगावर भडक रंगाचा शर्ट हवा, खाली काळ्या किंवा करड्या रंगाची पँट हवी आणि त्यावर घालायला भरजरी जाकिट. एक पांढरा शर्ट आहे त्यावरही घालायला गॉडी निळ्या रंगाचे जाकिट आहे. अनेकदा त्याच्यापेक्षा सतीश शाहचे कपडे दिसायला बरे दिसतात.

१.२) तो रोज दानधर्म करायचा

तर हातिम लाल शर्ट काळी पँट आणि डोईला पिवळसर नारिंगी रंगाचा रुमाल बांधून बसलेला असतो. त्याच्या दानधर्माची वेळ झालेली असते. सतीश शाह त्याचा मित्र नझरुल दाखवला आहे. नझरुलला हातिमची प्रशंसा करायच्या कामावर ठेवले असल्यामुळे तो लगेच हातिमची तोंडभरून स्तुती करतो. इथे आपल्याला कळते की हातिम यमन देशाचा शहजादा आहे. हातिम सद्गुणांचा पुतळा असल्यामुळे तोही जरा लाजतो वगैरे. लगेच दानधर्माचा कार्यक्रम सुरू होतो. यात हातिमच्या दरवाज्यावर सहा बायका हातात सोन्याच्या मोहोरांनी भरलेली थाळी घेऊन उभ्या असतात. घोळक्याने माणसे येतात, हातिम त्यांना मूठभर मोहोरा देतो आणि ते आपल्या वाटेने निघून जातात. या बायका आणि गरजूंचा जमाव अतिशय कंटाळलेले आहेत. एक बाई काही कारणाने जितूकडे "जवळून तितका हँडसम वाटत नाही" नजरेने बघते आहे.
अचानक एक तोंडावर फडकं बांधलेली तरुणी येते. फडकं बाजूला करताच ओळख पटते. अरे ही तर सौदागर बरजद की बेटी शहजादी मरियम! तिला त्याची मदत हवी असते. तो तिला वाड्यात बोलावतो आणि नझरुलला उरलेल्या मोहोरा वाटायला सांगतो. आता सतीश शाह अर्धी मूठ मोहोरा पर पर्सन वाटतो तरी ते लोक खुश होतात. पण हातिम त्याच्या दुप्पट (एक मूठ गच्च भरून) मोहोरा देत होता तेव्हा एकाच्या चेहर्‍यावर हसु फुटेल तर शप्पथ! अशा चमत्कारांनी हा सिनेमा भरलेला आहे.

१.३) तो प्रेमप्रकरणेही निस्तरायचा

तर मरियमची तक्रार अशी - तिचं आणि शहजादा मुनीर (विजयेंद्र घाटगे, फ्रेश फ्रॉम प्लेईंग ठाकूर प्रताप सिंग इन बंद दरवाजा) यांचे एकमेकांवर प्रेम असतं. त्यांना लग्नही करायचं असतं. पण मरियमच्या वडलांचा तिच्या लग्नालाच विरोध असतो. हा नकार ऐकून मुनीर वणवण भटकत असतो तर मरियम बाई हातिमच्या दारात मदतीची भीक मागत असतात. आता - एकतर ही बाई शहजादी कशी? मुलगी सौदागरची, शहजाद्याशी लग्नाचा पत्ता नाही तरी ही शहजादी मरियम. दुसरे हिच्या म्हणण्यानुसार घाटगे यांच्या भेटण्याच्या ठिकाणी एकटाच भटकत असतो. ते एका बागेत भेटताना दाखवले आहेत. मग पुढच्याच दृश्यात हा वाळवंटात खुरट्या दाढीने काय करत असतो? असो तर वाळवंटात जितेंद्र त्याला भेटायला तडक मरियमला घेऊन जातो. त्यांची लव्ह स्टोरी मार्गाला लावायचे तो त्यांना वचन देतो. इथे आपल्याला मरियमचे कपडे जवळपास लेटेक्स असल्याचे लक्षात येते.

१.४) आता त्याला प्रश्न पडले तर कोण काय करणार?

कपडे बदलून, घाटगेला दाढी करायला लावून जितू आणि सतीश सौदागरला जाऊन भेटतात. सौदागर असतो रझा मुराद. रझा मुरादही फार आढेवेढे न घेता त्याची अडचण जितूला सांगतो. त्याच्या घरात एक प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेला परीचा पूर्णाकृती पुतळा असतो. हा पुतळा अजिबात संगीता बिजलानी सारखा दिसत नसल्याने या पुतळ्याची संगीता बनणार हे निष्णात प्रेक्षक सांगू शकतो. जितू उगाच त्या पुतळ्याला उत्कृष्ट कारागिरीचा नमुना वगैरे म्हणतो. रझा मुराद त्यावर "होल्ड माय बीअर" म्हणून हा पुतळा नसून गुलनार नामे परी असल्याचे सांगतो. तर झालं असं की एके रात्री रझा मुराद उकाड्याचं म्हणून वरच्या मजल्यावर एकटाच झोपलेला असतो. नेमकं त्याच रात्री गुलनार (संगीता बिजलानी) च्या नशीबात दुर्बुद्धी योग लिहिलेला असतो. त्यामुळे ती उडत उडत येते (मसक्कली स्टेपमध्ये हात हलवते) आणि त्याच घरात उतरते. हवेवर झुलणार्‍या झुंबराला प्रदक्षिणा घालण्याचा टाईमपास करण्याची हुक्की तिला येते आणि आवाजाने रझा मुरादची झोपमोड होते. झोपेतून उठल्या उठल्या इतर काही न सुचल्याने तो गुलनारवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो.

आधी हा सीन विशिष्ट अंगाने जाणार अशी शंका येऊ शकते पण चमत्कार होतो. अचानक संगीताच्या तोंडावर लाल पिवळा लाईट मारला जातो. अ‍ॅपरंटली रझा मुरादने तिला वाईट हेतुने स्पर्श केल्यामुळे तिचा दगड होतो. दगड व्यक्ती दगड बनण्याचे हे इतिहासातील एकमेव उदाहरण! याची शिक्षा म्हणून ती रझा मुरादला शाप देते की तुझ्या मुलीचे, मरियमचे लग्न झाले तर लग्नाच्या रात्री तिच्या नवर्‍याचा मृत्यु होईल आणि मरियमसुद्धा दगड बनेल. इथे क्लोजअपमध्ये चंदेरी कागदाचे पंख, जनरिक परी कॉस्ट्युम (अलिफ लैला श्ट्यांडर्ड) वगैरे बघायला मिळते. ही दगड बनण्याची प्रोसेस अर्थातच तिला व्यवस्थित पोज घेता यावी, उ:शाप देता यावा इतपत स्लो असते.

असला नॉनसेन्स शाप मुरादसाहेब ऐकून घेतील हे शक्यच नाही. ते रडून, भांडून तिच्याकडून उ:शाप मिळवतात. तो उ:शाप असतो की माझ्या सात सवालांचे जवाब आणा. रझा मुराद शापमुक्त होईल आणि ही पुन्हा जिवंत होईल. जितेंद्रच्या वाचनानुसार हे सात प्रश्न आहेत (रझा मुरादने एका फळ्यावर अरबीत लिहून ठेवले आहेत. पण जितेंद्र ते उर्दूत वाचतो.)

प्रश्न १) एक बार देखा हैं दुसरी बार देखने की हवस है
प्रश्न २) नेकी कर दरिया मे डाल
प्रश्न ३) सच को राहत है
प्रश्न ४) जैसा करेगा वैसा भरेगा
प्रश्न ५) कोहिनहिदा की तलाश
प्रश्न ६) मुर्गाबी के अंडे के बराबर का मोती
प्रश्न ७) हम्मामबादगर की खबर (ते मूळ कथेत हमाम-ए-बादगढ, म्हणजे बादगढचे न्हाणीघर आहे. पण जितूचे उर्दू माशाल्लाह! नशीब जितूजींनी ते हम्मामबादनगर नाही वाचलं)

रझा मुरादच्या म्हणण्यानुसार हे प्रश्न इतके अवघड आहेत की तो कोणीही सोडवू शकत नाही. जितेंद्र म्हणतो की खुदाची इच्छा असेल तर मला हे प्रश्न सुटतील. तरी मी प्रश्न सोडवतो आहे तोवर तुम्ही विजयेंद्र घाटगेला आपल्या घरी ठेवून घ्या नाहीतर पुन्हा उन्हातान्हाचा वाळवंटात भटकायला जायचा. रझा मुराद हे मान्य करतो. इथे सतीश शाह एक फालतू विनोद करून आपल्याला या सिनेमात का घेतले आहे हे प्रेक्षकांना कळवतो. अशा रीतिने सुरू होतात हातिम आणि नझरुलची साहसे.

२) प्रश्न पहिला : एक बार देखा है, दुसरी बार देखने की हवस हैं

आता इतक्या अवघड प्रश्नांची उत्तरे कोठे बरे मिळतील? आपले पूर्वज जंगलातून आले तर बहुधा या बाबा आदमच्या जमान्यातल्या प्रश्नांची उत्तरेही जंगलात मिळतील असा सारासार विचार करून हातिम आणि नझरुल एका जनरिक जंगलात पोहोचतात. अरबी द्वीपकल्पात कुठेही इतके घनदाट जंगल नसल्याने आपण परीकथेत असल्याची खात्री पटते. परीकथेचा हिरो हा शूर आणि स्वभावाने चांगला असावा लागतो. हातिम हा चांगला असल्याचे तर ठसले पण हा शूरवीर असल्याचे सिद्ध करण्याची संधी अद्याप त्यास मिळालेली नाही. त्यामुळे नझरुलच्या "आका शेर आ जाएगा" चा क्यू घेऊन एक बिबळ्या तिथे येतो. त्याआधी नझरुल हातिमला शंका विचारतो की अशाने तर आपण उत्तरे मिळण्याच्या आधीच मरु. यावर हातिम म्हणतो की मारनेवाले से बचानेवाला हमेशा बडा होता हैं. बरं मग? संपूर्ण सिनेमात जितेंद्राचे असे बरं मग छाप बरेच डायलॉग आहेत.

२.१) विंटर सोल्जर या समीक्षकांनी गौरवलेल्या चित्रपटाच्या फाईट्समध्ये सरासरी सेकंदाला दोन कट्स आहेत. सारांश : लपण्याची गरज फक्त जितेंद्रालाच नसते.

तर बिबळ्या तिथे येतो. जंगली जनावराने माणसे दिसताच त्यांच्यावर हल्ला केलाच पाहिजे या नियमाची त्याला जाण असते. त्यामुळे तो जितेंद्रावर झडप घालतो. इथून पुढे १ मिनिटाची फाईट आहे. या फाईटमध्ये काय होते, जितेंद्राला जखमा होतात का, बिबळ्या खरा आहे का खोटा, जितेंद्राचे नक्की किती बॉडी डबल वापरले गेले आहेत इ. प्रश्नांची उत्तरे देता येणे केवळ अशक्य आहे. १ मिनिटाच्या फाईटमध्ये ५७ कट्स आहेत. म्हणजे जवळ जवळ सेकंदाला एक कट! जितेंद्राला फाईटिंग येत नाही हे लपवण्यासाठी इतकी मेहनत इतर कोणत्याच चित्रपटात घेतली नसावी.

असो तर हातिम बिबळ्याला भोसकून ठार करतो. एवढ्या केऑटिक फाईटमधून इतर काहीही निष्कर्ष काढणे फार कठीण आहे पण ०.२५ स्पीडमध्ये बघितल्यावर लक्षात येऊ शकते की क्लोजअपमधला बिबळ्या आणि बॉडी डबल शॉट्समधला बिबळ्या हे दोन वेगवेगळे बिबळे आहेत (त्यांच्या ठिपक्यांच्या डिझाईनमध्ये सूक्ष्म फरक आहेत). सतीश शाहला शूरवीर दाखवायचे नसल्यामुळे तो झाडावर चढून आपला जीव वाचवतो. हातिम शूरवीर सिद्ध झाल्यामुळे सिनेमा पुढे सरकतो. परीकथेतले हिरो विशेष हुशार दाखवून चालत नाही. अन्यथा देव/खुदा/पर्‍या/जादू वगैरेंची त्यांना का गरज पडेल? त्यामुळे हातिम हुशार असल्याचे सिद्ध करण्याचे कष्ट दिग्दर्शक घेत नाही.

आता अशा ठोंब्यांना या प्रश्नांची उत्तरे कोठून मिळणार? मग सर्वशक्तिमान खुदाला त्यांची दया येते आणि त्याच जंगलात कुठेतरी एका झाडाला पाचजण उलटे टांगून ठेवलेले दिसतात. हे सर्व वारंवार "एक बार देखा हैं दुसरी बार देखने की हवस हैं" म्हणत असतात. हातिमला या "आदमजादांची" दया येते. उर्दू झाडण्याकरिता संपूर्ण सिनेमात हातिम व इतर अनेक पात्रे मनुष्य प्रजातीचा आदमजाद असा उल्लेख करतात. सतीश शाहला अक्कल असल्यामुळे तो या आदमजादांपासून दूर राहण्याचा सल्ला देतो. असे लॉजिकल सल्ले देत असल्यामुळेच तो या परीकथेचा हिरो होऊ शकलेला नाही. दुर्दैवाने हे नझरुलला कधीच समजू शकणार नाही. हातिम त्यांना आश्वस्त करून बंधमुक्त करू पाहतो. ते त्याला तसे करण्यास मनाई करतात. हातिम याचे कारण विचारणार एवढ्यात मागून कन्यकांचा हसण्याचा आवाज येतो. या लोकांच्या अगदी समोरच्या झाडावर सहा तरुणींची मुंडकी केसाने बांधून लटकवलेली आहेत. ही मुंडकी हातिमला बघून हसत असतात. हा प्रकार बघून हातिमला आपण एका तिलिस्ममध्ये अडकलो असल्याचे कळून चुकते.

२.२) तळ्यातले तिलिस्म

सतीश शाहलाही फार हुशार दाखवून चालणार नसल्याने तो "लडकियों के लटकते सर" बघून वेडापिसा होतो. इथे विनोदनिर्मितीचे बाष्कळ प्रयत्न होतात. त्या मुली यांना सांगतात कि आम्ही पाण्यात राहतो. हे बोलून नारळ पाण्यात पडावेत तशी ती मुंडकी अचानक अवतरलेल्या तळ्यात पडतात. हातिमची खात्री पटते की हे तिलिस्म तोडण्याचा मार्ग या तळ्यात आहे. त्यामुळे तो तळ्यात उडी घेतो. सतीश शाहला आपल्याला पाण्यात श्वास घेता येईल का याची खात्री नसल्याने तो बाहेरच थांबतो. इथे शॉटमधून असे दिसते की ते तळे फारसे खोल नाही आणि तळाशी एक गुहासदृश जागा आहे. तिथे या सहा मुली खिदळत जितेंद्राची वाटच बघत असतात. या एक्स्ट्रांपैकी एकही फारशी रुपवती नसल्यामुळे तिलिस्मची मालकीण यापैकी कोणी नसणार हे कोणीही सांगू शकतं. मग तिलिस्मची मालकीण कोण?

याचे उत्तर म्हणून मनजीत कुल्लर (शक्तिमानमधली कौशल्या उर्फ शक्तिमानची आई, अगेन फ्रेश फ्रॉम प्लेईंग सपना इन बंद दरवाजा) झुळझुळीत कपड्यांत अवतरते. ती स्वतःची ओळख "यहां की मलिका, मर्जिना" अशी करून देते. तिला जी वस्तु आवडत असते, त्या वस्तुला ती मिळवतेच. हिरोचे ऑब्जेक्टिफिकेशन होण्याचा रेअर डायलॉग झाल्यानंतर जितेंद्र तिला उपदेशाचा डोस पाजू बघतो. तिला असल्या गोष्टी प्राशन करण्यात इंटरेस्ट नसल्यामुळे ती त्याला घेऊन एका गुहेत शिरते. इथे सतीश शाहला एवढा वेळ झाला तरी जितेंद्र अजून परत न आल्यामुळे जरा चिंता वाटू लागते. मग तोही तळ्यात उडी घेतो. याच्या शॉटमध्ये मनजीतच्या घराला नीट बघता येते. तो एक शंख -शिंपले-कवड्या वगैरेंनी बनलेला महाल आहे. तिथे त्याला जितेंद्र तर नाही पण त्या सहा बायका भेटतात. त्या म्हणतात तुझा आका आता जिंदगी के मजे लुटत असेल तर तूही घे चान्स मारून. नझरुल मोठ्या आत्मविश्वासाने सांगतो की हातिम परस्त्रीला स्पर्शही करणार नाही. आता - यांच्या मलिकाविषयी नझरुलला शून्य माहिती आहे. हातिमचे अजून लग्न झालेले नाही. म्हणजे जर ही मर्जिना त्याला आवडली तर त्यांचे लग्न होण्यात काहीच अडचण नाही. ही परीकथा असल्यामुळे गांधर्वविवाह स्कोपमध्ये आहे. एकंदरीत जंप कट + सतीश शाहचे हावभाव बघता मध्ये बराच वेळ निघून गेला आहे. सो हातिमने लग्न करून जिंदगी के मजे घ्यायला सुरुवात केली असेल ही शक्यता अजूनही स्कोपमध्ये आहे. असे असतानाही मर्जिना हातिमची चॉईस असूच शकत नाही हा आत्मविश्वास नझरुलने कुठून पैदा केला असावा?

पण मर्जिनाला वाईट, चवचाल दाखवायचे असल्यामुळे नझरुलचे म्हणणे खरे ठरते. हातिमच्या उपदेशाचा डोस पिण्याऐवजी मर्जिना दारु ढोसते. क्लिअरली पन्नाशीच्या दिसणार्‍या जितेंद्राला विशीतली मनजीत "हुस्न-ए-ईजाद करनेवाले ने तुझे कुछ सोच के बनाया हैं" म्हणते ते आणि एकंदरीतच तिचं फ्लर्टिंग विनोदी आणि अतर्क्य आहे. हातिमला या बाईची भुरळ पडत नाही यात काहीही आश्चर्यकारक नाही. चमत्कार असला तर हाच की हिला परत परत पाहण्याची इच्छा धरून एक नाही दोन नाही चांगले पाचजण बसले आहेत. तिच्या फ्लर्टिंगचा उबग येऊन तो तिला ढकलून देतो. या सर्वांचा शीण आल्यामुळे वाईच जरा टेकावं म्हणून तो मर्जिनाच्या सिंहासनावर जाऊन बसतो. मर्जिनाला त्याच्यावर जादू करण्यासाठी तसेही त्याला सिंहासनावर बसवायचे असतेच, त्यामुळे तिचा हेतु साध्य होतो. हातिम तिच्या जादूने बांधला जातो आणि रोमान्स करायला सिद्ध होतो. अशावेळी गाणे सुरु झाले नाही तरच नवल!

२.३) जिंदगी के मजे

अनुराधाताई पौडवाल गात आहेत "सनमा ओये सनमा, ओये ओये ओये". निव्वळ गाणे म्हणून हे गाणे ओये ओये ओये ओये ओये आहे. पण त्यावर अचाटपणाचे काही खास थर चढवल्यामुळे या गाण्यात वाह्यातपणाचे गुण आले आहेत. तर ...
या गाण्यात जर हातिम जिंदगी के मजे लुटतो आहे असे समजणे अपेक्षित असेल तर हातिमबद्दल प्रेक्षकाच्या मनात कणव निर्माण झाल्याखेरीज राहत नाही. बारकाईने निरीक्षण करण्याची पहिली गोष्ट अशी - इतका वेळ मनजीतने सलवार विशिष्ट लेव्हलच्या खाली नेसली आहे. नेव्हल शॉट्स काढून झाल्यामुळे गाणे सुरु होताच ही सलवार वर सरकते. पण जितेंद्र तिच्यासोबत नाचू लागताच ती पुन्हा खाली घसरते. एखाद्या साईन वेव्हप्रमाणे तिची सलवार/परकर इ. (कडव्यासोबत हिचे कपडे बदलतात) पूर्ण गाण्यात वर खाली होत राहते. मिनिटभर थांबून सलवारची नाडी बदलून मग नाचगाणे केले असते तरी चालले असते. उगाच प्रेक्षकाच्या मनात धाकधूक!

मागे नाचायला म्हणून चौकटी-चौकटीच्या डिझाईनचे कपडे घातलेल्या ११ एक्स्ट्रा आणल्या आहेत. विशेष म्हणजे आधी दाखवलेल्या सहा बायकांमधली इथे एकही रिसायकल केलेली नाही. थोडक्यात खर्चा कियेला हैं. नाहीतर नाचे नागीन गली गली - बघावे तिथे एक्स्ट्रा रिसायकल. या अकराच्या अकराजणी मनजीतपेक्षा चांगल्या नाचतात. अगदी जितेंद्रही तिच्यापेक्षा चांगला नाचला असता. पण त्याला तिच्या जादूत मुग्ध झाल्याचे भाव घेऊन येरझार्‍या घालण्याचे काम दिले आहे. बापडा ते मन लावून करतोही पण ....
सेक्शन ०.२ मध्ये म्हटल्याप्रमाणे अनटॅप्ड पोटेन्शिअल असेच जाणवत राहते. इंटरेस्टिंगली याची कोरिओग्राफी पी. एल. राजने केली असली तरी या गाण्याचे अ‍ॅस्थेटिक १९९४ च्या मोहरामधल्या तू चीज बडी हैं मस्त मस्त सारखे आहेत. कदाचित इथे सरोज खान असती तर तिने जितेंद्रला नीट वापरला असता आणि मनजीतलाही जरा बर्‍या स्टेप्स दिल्या असत्या. बाकी सेट डिझाईनवर बरीच मेहनत घेतली आहे यात वाद नाही. त्यामुळे मनजीतचे ड्रेसेस अजूनच विजोड दिसतात. मध्ये तर तिला चक्क पिसांचा पोशाख (ऑफ कोर्स बिकिनी स्टाईल) दिला आहे. अंडरवॉटर राहणारी बाई असे कपडे का घालेल?

२.४) मैं आया हैं तो उपदेशामृत पाजकेही जाएगा - हातिम

सुदैवाने हा प्रकार फार काळ लांबवलेला नाही. एकदाचा हातिम तिच्या हुस्नच्या जाळ्यात अडकतो. आता तो जिंदगी के मजे लुटायला सुरुवात करणार इतक्यात त्याच्या गळ्यातला ताईत चमकू लागतो. पिशाचांना सूर्यप्रकाशाचा त्रास होतो तसा मर्जिनाला त्या ताईतातून येणार्‍या प्रकाशाचा त्रास होऊ लागतो. लहानपणी बांधलेला रक्षक ताईत कामी यायलाच हवा या नियमाचे पालन होते आणि हातिम भानावर येतो. अतिशय खराब स्पेशल शॉटमध्ये हातिम आणि नझरुल तळ्याच्या बाहेर फेकले जातात. तळ्याच्या बाहेर दिसलेली दोन्ही झाडे गायब झाली आहेत. पाठोपाठ मर्जिनाही धावत धावत तळ्याच्या बाहेर येते. तिला आता आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झालेला असतो. प्रत्यक्षात तिला हातिमचा राग यायला हवा. पण आले दिग्दर्शकाच्या मना तिथे कोणाचे चाले? हातिमही तिला उदार मनाने माफ करतो. आता ते उलटे टांगलेले पाचजण आणि त्यांचे झाड परत प्रकट झाले आहे. हातिमच्या विनंतीला मान देऊन ती या आदमजादांना मुक्त करते. हातिम त्यांना उपदेश करतो की कामाग्नि कधीच शमत नाही. त्यामुळेच तुम्ही म्हणत होतात की "एक बार देखा हैं, दुसरी बार देखने की हवस हैं". नझरुलच्या लक्षात येते की अनवधानानेच का होईना, हातिमने पहिला प्रश्न सोडवला आहे.

इकडे यमनमध्ये पहिल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर असल्याची लक्षणे दिसतात. पुतळ्याचा चेहरा बदलून तो संगीता बिजलानीसारखा दिसू लागतो. फळ्यावरचा पहिला प्रश्न पुसला जातो. हे बघून मरियम आणि गुलनार खुश होतात. इथे दोन चुका आहेत. आधी दाखवलेला पुतळा आणि या शॉटमधला पुतळा क्लिअरली वेगळा आहे. दुसरं म्हणजे मरियम तिला परी बानो संबोधते. ही कंटिन्यूटी मिस्टेक आहे जी या स्टेजला लक्षात येणे कठीण आहे कारण बानो हे ताई सारखे जनरिक फारसी अव्यय आहे. पण संगीता बिजलानीचा डबल रोल असून तिच्या दुसर्‍या भूमिकेचे नाव परी बानो आहे. त्यामुळे इथे मरियमने संगीताला गुलनारच संबोधले पाहिजे. क्लिअरली कंटिन्यूटी एरर. पण पहिला प्रश्न सुटल्याच्या आनंदात प्रेक्षक या किरकोळ चुकांकडे दुर्लक्ष करतो.

अशा रीतिने हातिमने एक प्रश्न सोडवला. उर्वरित सहा प्रश्नांची उत्तरे काय असतात? हातिम आणि नझरुलला आणखी कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो? हातिमला हिरोईन कोण? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन उर्वरित सहा रोमांचक सेक्शन लवकरच प्रतिसादांत!

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मी वाट बघत असतो की पायस किंवा फारएण्ड कुठला सिनेमा घेऊन येताहेत. त्या निमित्ताने हे सिनेमे बघणे हा एक कार्यक्रम होतो आणि त्याच्या एकेका सीनवर थांबून तुमचं खत्तर्र्नाक निरीक्षण आणि लॉजिक आठवून हास्यकल्लोळात बुडणे हे बोनस असते. आता हा सिनेमा बघून झाला असल्यामुळे उरलेल्या भागावर तुझं विवेचन काय असेल ह्या उत्कंठेत आहे.

किल्ली, लिंक बरोबरच आहे.कदाचित समूहापुरता मर्यादित लेख असेल म्हणून सर्वांना दिसत नसेल. ग्रुप चं सदस्यत्व घेतलंय का?

धरमवीर चा धागा बहुतेक चित्रपट विभागापुरता मर्यादित आहे. "चित्रपट गृपचे" सदस्यत्व घेतल्यावर लिंक ओपन होईल.

पायस, धम्माल लिहिलंय.
मी परत परत वाचून वेड्यासारखं हसतेय. Rofl

अनु एकदा लिन्क चेक करता का, पान उघडत नाहीये, धरम वीर च>>>> उघडल
चित्रपट विभागाच सदस्यत्व घ्याव लागल

धन्स अनु Happy

७) प्रश्न सहावा: मुर्गाबी के अंडे के बराबर का मोती

मुर्ग म्हणजे काय ते सगळ्यांनाच माहित आहे. आबी हा शब्द आब वरून आला आहे. आब म्हणजे पाणी. मुर्गाबी म्हणजे पाणकोंबडी. हा शब्द बदकांसाठी वापरला जातो. थोडक्यात हातिमला बदकाच्या अंड्याच्या आकाराचा मोती आणायला सांगितला आहे. हे समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. अन्यथा सिनेमातल्या मोत्याला बघून त्याच्याविषयी काहीही विचार होणार नाही.

७.१) मुख्य व्हिलन पॉवरबाज दाखवावा लागतो

हातिम आणि नझरुल आता पश्चिमेकडे सरकायचे थांबून उत्तरेकडे सरकू लागले आहेत. त्यामुळे ते आता डोंगराळ प्रदेशात आलेले दिसतात जे मोरोक्कोच्या भूगोलाशी काही प्रमाणात जुळते. एव्हाना दिग्दर्शकाला हे समजले आहे की प्रेक्षकाला या सिनेमाचा भूगोल शोधता येऊ लागला आहे. फँटसीला रिअ‍ॅलिटीची अशी झालर मिळालेली त्याला मंजूर नसल्याने आता तो भूगोल डिस्टर्ब करणार आहे. हातिम नझरुलला म्हणतो की बरेच दिवस झाले पण मुर्गाबी के अंडे के बराबर का मोती ची काहीच खबर मिळत नाही. हे बरेच दिवस झाले पटवून घ्यावेच लागते. स्त्रीवेष धरताना सतीश शाहने आपल्या दाढी मिशा काढलेल्या असतात. या सीनमध्ये त्याच्या मिशा वाढलेल्या दिसतात पण दाढी गायब आहे. किमान त्याच्या मिशा पूर्ववत होण्याइतका तरी कालावधी मध्ये व्यतित झालेला आहे.

नेहमीप्रमाणे नझरुल थकलेला आहे. तो म्हणतो की यार आपल्याकडे दोन दोन जादुई वस्तु आहेत पण आपण त्यांचा उपयोगच करत नाही. हातिम म्हणतो त्या कोणत्या - नझरुल म्हणतो की परीबानूची जादूची बासरी आणि जिन्नची जादूची अंगठी. हातिमला त्याचे म्हणणे पटते. तो लगेच अंगठी घासून जिन्नला बोलावून घेतो. जिन्नही विनाविलंब तिथे प्रकट होतो. इतके दिवस होऊनही जिन्न अजून त्याच कोह-ए-निदाच्या कपड्यात आहे. जिन्नगिरीचा धंदा मंदीत असावा, अन्यथा त्याने नवीन कपडे घेतले असते. हातिम त्याला अतिशय व्हेग आज्ञा देतो की हमें हमारी मंजिल तक पहुंचा दो. यांची मंजिल वेल डिफाईन्ड नाही. जर त्यांना त्यांची मंजिल माहित असेल तर त्यांना त्या मोत्याचाही ठावठिकाणा माहित आहे. तसे नसल्यामुळे आता सर्व ओनस जिन्नवर येतो. जिन्नही लगेच जो हुकुम मेरे आका करून त्यांना आपल्या तळहातावर स्वार होण्यास सांगतो. त्याच्या एकंदरीत हावभावांवरून असे वाटते की याला मोत्याबद्दल काहीतरी माहिती आहे.

तो या दोघांना घेऊन आकाशमार्गे प्रयाण करतो. जिन्न लोकांनी उडताना हसणे कंपल्सरी असल्याने तो संपूर्ण रस्ताभर गडगडाटी हसत असतो. हातिम आणि नझरुलला सीटबेल्ट न मिळाल्याने त्यांची तोल सांभाळण्याची कसरत करताना तारांबळ उडते. आता हा त्यांना घेऊन कुठल्या दिशेला गेला हे सांगणे अशक्य आहे. त्यामुळे सिनेमाच्या भूगोलाचे सर्व क्लू नष्ट होतात. तो किती वेळ उडतो हेही सांगता येत नाही. पण थोडा वेळ उडाल्यानंतर अखेर तो एका जंगलात उतरतो. नझरुल त्याला विचारतो की आम्हाला मुर्गाबी के अंडे के बराबर का मोती हवा आहे. कुठे मिळेल? जिन्न म्हणतो मला कोंबडी आणि अंडी याबद्दल काही माहिती नाही. (नोंद: जिन्न लोक कुक्कुटजन्य पदार्थ खात नाहीत.) च्यामारी मग मंजिलच्या नावाखाली यांना कुठे घेऊन उडत होता? तो म्हणतो की मी तुम्हाला याच्यापुढे घेऊन जाऊ शकत नाही. हा इलाका जादूगर कमलाखच्या अखत्यारीत येतो. कमलाखला बहुधा जिन्न आवडत नसल्याने त्याला कमलाखच्या एरियात जायची परवानगी नसते. असला बिनकामाचा गुलाम ठेवून काय उपयोग? त्यामुळे हातिम त्याला त्याची अंगठी परत देऊन स्वतंत्र करतो. अशा रीतिने स्वस्तात सुटलेला जिन्न निघून जातो, त्याचे या सिनेमातले कार्य संपले.

पण लक्षात घेण्याचा मुद्दा असा की कोणी एक कमलाख नावाचा जादूगार आहे. हा जादूगार इतका पॉवरबाज आहे की एवढा मोठा जिन्नही त्याला घाबरतो. असा तगडा इसमच आपला मेन व्हिलन बनू शकतो. इथे हातिम ताई सिनेमांचा एक नियम तोडतो. सिनेमाच्या मेन व्हिलनविषयक माहिती आपल्याला जवळ जवळ दोन तासांनी मिळते. जरी व्हिलन दाखवला नाही (त्याची आयडेंटिटी सीक्रेट ठेवायची असेल तर) तरी त्याचा उल्लेख पहिल्या अर्ध्या तासात व्हायलाच हवा. पटकथाकाराच्या कन्सेप्ट्स क्लिअर नसल्याने कथानक अशा प्रकारे कमकुवत झाले आहे. हरकत नाही. आता प्रवेश करू जादूगर कमलाखच्या इलाक्यात

७.२) कन्व्हिनिअंट कैद

हातिम आणि नझरुल चालत चालत एका खडकाळ प्रदेशात येतात. एका झाडाचा पत्ता नसतानाही तिथे वाळलेली पाने इतस्ततः पसरलेली असतात. त्या पानांचा काही उपयोग व्हावा म्हणून लगेच वारा सुटतो. वारा आणि उडती पाने याच्यात त्या दोघांना काय घडते आहे काही कळत नाही. त्या गोंधळात दोन मंतरलेल्या बेड्या येऊन त्यांच्या पायात अडकतात. लगेच वारा वाहणे बंद होते. त्या बेड्या ज्या दगडाखालून आल्या तो दगड हवेत उडतो. त्या खालचे अनेक दगड, माती, वाळकी पाने, कचरा असे सर्व हवेत उडते आणि गायब होते. आता तिथे एक पुरुष सहज जाऊ शकेल एवढे मोठे विवर तयार झालेले असते. जादुई बेड्या त्यांना त्या विवरात खेचतात. तेही निरुपायाने "अगं अगं बेडी मला कुठे खेची" म्हणत विवरात उतरतात. या विवरात कोण म्हैस त्यांची वाट पाहत आहे?

हे विवर एका गुहेत उघडते. तिथे एक दालन असते. त्या दालनातून हातिम आत शिरताच दालनाचे दार बंद होते आणि नझरुल बाहेर अडकतो. हातिम दालनाचे निरीक्षण करू लागतो. हे दालन थर्माकोलचे बनलेले असून रंगीबेरंगी आहे. दाराचा रंग वेगळा, भिंतींचा रंग वेगळा वगैरे वगैरे. सगळीकडे सढळ हस्ताने चमकी भुरभुरली आहे. हातिमला दिसते की दालनाच्या मध्ये एक स्टेज उभारले आहे. त्या स्टेजच्या कडेला निळसर आग आहे तर आगीच्या पलीकडे कोणीतरी व्यक्ती आसनस्थ आहे. पायातली बेडी हातिमला त्या दिशेने खेचते. तो पुरेसा जवळ येताच ती आग विझते आणि त्याच्या पायातली बेडी काढली जाते. लगेच उजेडही होतो. ती एक म्हातारी असते.

या म्हातारीने हातिमला मॅचिंग गुलाबी रंगाचे अंगवस्त्र घातले आहे. खाली काळ्या रंगाची सलवार आहे. दोन्ही चमकदार आणि झिरझिरीत आहेत. म्हातारी पार पिकलेली आहे. ती म्हणते की माझं तुझ्याकडे काम आहे. मी उठून तुला भेटायला येऊ शकत नाही म्हणून मी अशा रीतिने तुला इथे बोलावून घेतले. ती म्हणते की मला खात्री आहे की तू माझी सुटका करू शकतोस. हातिम विचारतो की कशापासून सुटका? तिची कथा अशी - तिचे नाव सायरा असते. सायरा या जागेची मलिका असते. तिच्याकडे एक खानदानी मोती असतो. कमलाखला तो मोती आणि सायरा दोन्ही हवे असतात. अ‍ॅपरंटली जर त्याला हे मिळाले तर तो जादूगरांचा बादशहा बनू शकत असतो. सायरा त्याचा बेत हाणून पाडते. मग कमलाख तिला इथे आपल्या "हवस के लिए कैद" करून ठेवतो. (हे माझे शब्द नाहीत, सिनेमातला डायलॉग आहे.)

हातिम जरा गोंधळतो की कमलाख नक्की काय प्रकारचा माणूस आहे? सायरा एक्स्प्लेन करते की ती अ‍ॅक्चुअली तरुण आणि सुंदर आहे. हा सर्व कमलाखच्या जादूचा प्रताप आहे. हातिम म्हणतो की बरं, आता मुद्द्याचं बोल. तिच्या उजव्या हाताला आणखी एक आगीचा लोळ आहे. त्याच्या मागे एक चबुतरा आहे. त्यावर एक मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या डोक्यावर एक मोती आहे. तो मोती तिला आणून द्यायचा की झाले. खुदाच्या नेक बंद्यांना भीति अलाऊड नसल्याने हातिम मागचा पुढचा विचार न करता तयार होतो. ती हात उंचावते आणि तिथली आग नाहीशी होते.

७.३) क्लायमॅक्सआधी एक प्रॉपर फाईट असायलाच हवी

हे नवे दालन नीट बघितले तर त्याच्या दोन्ही बाजूंना भिंतीच्या रंगाला मॅच न होणारे पॅचेस आहेत. अर्थातच तिथे चोरदरवाजे असलेच पाहिजेत. तिथून आता पुष्पवृष्टी तर होणार नाही. हे बघता हिरोने त्यांना ध्यानात ठेवून प्लॅन बनवला पाहिजे. पण परीकथांमध्ये डोके वापरणे भ्याडपणाचे लक्षण असल्याने हातिम थेट चालत त्या दालनात प्रवेश करतो. त्या चबुतर्‍यावर सढळ हस्ते हाडे आणि कवट्या पसरवल्या आहेत. प्रयत्न करणारा हातिम पहिलाच इसम नाही हे आपल्याला कळते. ती मूर्ती कोणा हिडीस प्राण्याची आहे. तिच्या रौद्र चेहर्‍याचा क्लोज अप बघून हातिम पायर्‍या चढू लागतो.

जेमतेम पहिली पायरी चढतो न चढतो तोवर त्या पॅचेस जवळ एक अस्वल भूत प्रकट होते. बजेट स्पेशल इफेक्ट्सवर मुक्तहस्ते उधळल्यामुळे नवीन मास्क घ्यायला पैसे उरले नसावेत. त्यामुळे दुसर्‍या प्रश्नातल्या खवीसांचे मास्क रिसायकल केले आहेत. आलोच आहोत तर काहीतरी तुफानी करूया म्हणून ते थेट हातिमच्या नरडीचा घोट घेऊ बघते. हातिम कसाबसा वाचतो. मग ते त्याला गरागरा फिरवून फेकून देते. इथे खरं तर हातिमचा मणका मोडायला हवा. पण तसे होत नाही. हातिम हाताला लागेल ते भूतावर फेकून मारतो. भूत सगळं काही तोडून फेकून देते. मग हातिमला पकडून ते दालनाच्या छताला आदळण्याचा कार्यक्रम सुरू करते. हातिमही पक्का असतो. तो भूताच्या डोळ्यात बोटे घालून डोळे फोडतो. मग त्याला खाली पाडून बेडीने फटकावू लागतो.

खरं तर इथे भूत डाऊन आहे हे बघून एखाद्याने पटकन मोती काढून आणला असता. पण पुन्हा हुशारी-भ्याडपणा ... त्यामुळे तो बडवण्यात मग्न असताना दुसर्‍या पॅचमधून सेम तसेच आणखी एक अस्वल भूत येते. मास्कमध्ये थोडासा फरक बाकी सेम. या भुताचा उलट्या हाताची देणे या कन्सेप्टवर विश्वास असतो. तशा तो हातिमला दोन ठेवून देतो. मग गरागरा फिरवून फेकणे हा कार्यक्रम होतो. आता हिरोने पुरेसा मार खाल्ला असल्याने फाईटचे रिझोल्युशन करावे लागते.

७.४) कथेत मुख्य व्हिलनशी बदला घेण्यास इच्छुक एकतरी कॅरेक्टर असावे

आता दोन्ही भूते एकत्र हल्ला करतात. हातिम त्यांना चकवतो आणि दुसर्‍याचे फटके पहिल्याला लागतात. हवेतून उडी मारून टेलिपोर्ट होणे या डॉनच्या क्लायमॅक्समध्ये प्रसिद्धीस पावलेल्या कलेत हातिम महारथी असतो. तसा तो उडी मारून सरळ चबुतर्‍याच्या दुसर्‍या का तिसर्‍या पायरीवर टेलिपोर्ट होतो. हे सर्व चालू असताना सायराचे घाबरण्याचे क्लोजअप मध्ये मध्ये. त्या भूतांखेरीज आणखी एक रक्षाव्यवस्था असते ती मूर्ती. एका लिमिटपलीकडे जवळ आल्यास ती मूर्ती शब्दशः आग ओकते. हातिम फ्लेमथ्रोअरला डॉज करतो. एक अटेंशन टू डिटेल वाखाणण्यासारखे आहे. इथे त्याच्या चेहर्‍याचा मेकअप झळ लागल्यासारखा करण्याचा प्रयत्न केला आहे.

मग तो उडी मारून मूर्तीच्या डोक्यावर टेलिपोर्ट होतो. तिथला मोती उचकटून हातात घेतो. लगेच फ्लेमथ्रोअर बंद होतो. हा मोती मुर्गाबी के अंडे के बराबर का मोती आहे हे कोणीही सांगू शकेल. पण मुर्गाबीच्या/बदकाच्या अंड्याएवढा मोती शहामृगाच्या अंड्याएवढा का दाखवला आहे? एनीवे, आता आपल्याला वाटते की कामगिरी फत्ते. आणखी एकदा टेलिपोर्ट आणि मुद्दा संपला. पण हे टेलिपोर्टेशन गोकूच्या इन्स्टंंट ट्रान्स्मिशन (शुनकान इदो, 瞬間移動) सारखे नसल्याने भूते त्याला हवेतल्या हवेत झेलतात. श्वास रोखून धरण्याची संधी देण्यात दिग्दर्शकाला इंटरेस्ट नसल्याने तो सायराला ओरडायला लावतो - हातिम, मोती तोड दो.

शकुनाचा नारळ फोडण्याच्या आवेशात हातिम मोती भिरकावतो. एवढा तिलिस्मी मोती मातीचे ढेकूळ फुटावे तसा फुटतो. फुटतो तो फुटतो, थेट जाळच काढतो. लगेच भूते गायब होतात. सायराला लाल ज्वाळा वेढतात. नझरुलची सुटका होते आणि त्याला दालनात प्रवेश मिळतो. लाल ज्वाळांचा इफेक्ट म्हणून की काय, पण गुलाबी/काळा ड्रेस घातलेली म्हातारी गायब होऊन तिथे लाल कपड्यातली सोनू वालिया प्रकट होते. तिची सलवारही लाल रंगाची होते. कपडे अरबस्तानातल्या दरबारी नर्तकीस शोभून दिसतील असे आहेत. त्यावर आणि तिच्या मुकुटावर जागोजागी चंद्रकोरी आहेत. एव्हाना चाणाक्ष प्रेक्षकांना समजले असेलच की सायरा म्हणजेच सोनू वालिया. ती सुटका झाल्याच्या आनंदात धावत जाते आणि बाबूजी पैरीपोना स्टाईलमध्ये हातिमच्या पाया पडते.

जितेंद्र आधीच नाचू न दिल्याने वैतागलेला, त्याला हा मूर्खपणा आता असह्य होतो. त्यामुळे तो तिच्या "देखो हातिम, सायरा का असली रुप देखो" कडे साफ दुर्लक्ष करतो. हे सगळं काय होतं विचारल्यावर ती सांगते की तो मोती या तिलिस्माची चावी होता. त्यामुळे तो एवढा महागडा, मुर्गाबी के अंडे के बराबर का मोती तिने हातिमकरवी तोडला. नझरुलने कधी मुर्गाबीचे अंडे बघितले नसल्याने तो चित्कारतो. चित्कारण्याचा ट्रिगर आणि प्रश्न सुटण्याची लक्षणे. फळ्यावरचा सहावा प्रश्न पुसला जातो. आता बे फार दूर नाही हे लक्षात येऊन विजयेंद्र घाटगे खुश होतो आणि मरियम गुलनारला मिठी मारते.

चूक उत्तर असतानाही (तो मोती बराच जास्त मोठा आहे, बदकाच्या अंड्याएवढा नाही) सतीश शाह चित्कारताच प्रश्न सुटत असलेला बघता याने एका जागी बसून नुसतं हसून सातवेळा "आका" म्हटलं तरी काम झालं असतं. पण आता फारच उशीर झाल्याने ते सातवा प्रश्नही सोडवायचे ठरवतात. शेवटचा सातवा प्रश्न लवकरच!

Lol सही आहे. एकदा पूर्ण स्कॅन केला लेख आणि आता एकेक सीन बघत पुन्हा वाचतोय

विकोची हळद पिऊन गोरी झालेली! >>>
एक बाई काही कारणाने जितूकडे "जवळून तितका हँडसम वाटत नाही" नजरेने बघते आहे. >>>
हा पुतळा अजिबात संगीता बिजलानी सारखा दिसत नसल्याने या पुतळ्याची संगीता बनणार >>>
एके रात्री रझा मुराद उकाड्याचं म्हणून वरच्या मजल्यावर एकटाच झोपलेला असतो >>>
दगड व्यक्ती दगड बनण्याचे हे इतिहासातील एकमेव उदाहरण! >>>
तरी मी प्रश्न सोडवतो आहे तोवर तुम्ही विजयेंद्र घाटगेला आपल्या घरी ठेवून घ्या नाहीतर पुन्हा उन्हातान्हाचा वाळवंटात भटकायला जायचा. >>>> Lol हे जबरी आहे

रझा मुरादने एका फळ्यावर अरबीत लिहून ठेवले आहेत. पण जितेंद्र ते उर्दूत वाचतो. >>> हे वाचून "चावटपणा कसला, गुजरातीतच आहे. तुम्हाला कळावा म्हणून इंग्रजीत वाचला" आठवले Happy

- हातिम यमन मधे राहून लोकांचे कल्याण करत असताना बाजूला जरा यमनकल्याण राग तरी वाजवायचा.
-ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा 'अरे तू इकडे कोठे' विचारताना "हे अमुकराव तमुक यांची ज्येष्ठ कन्या <नाव> तू इकडे कोणीकडे" असे विचारतो का? हातिम ला मरियम कोणाची बेटी आहे हे मधेच म्हणायची काय गरज?
- ती शहजादी पदर का जे काय आहे ते पसरून ती का आली सांगत असताना मागे उभे असणार्‍यांच्या चेहर्‍यावरचे भाग लोकल चे तिकीट काढायच्या लाइन मधे पुढचा एखादा नया है वह टाइपचा माणूस वेळ लावत असेल तर जसे होतात तसे झाले आहेत. "ओ चला, चला लौकर" वगैरे म्हणतात की काय असे वाटले मला.
- तिची त्या शहजाद्याशी अचानक झालेली मुलाकात म्हणजे चांगले बागेत स्लो मो मधे भेटतात.
- सत्ते पे सत्ता पासून हीरो लोकांनी विजयेन्द्र घाटगेचे न जमणारे लग्न जमवून देण्याची प्रथा इतकी वर्षे सुरू होती याची कल्पना नव्हती
- जितू त्या 'बुत' ची तारीफ सुरू करतो तेव्हा मला वाटले रझा मुराद म्हणतोय "थांब. पुढचे ऐक. इथे काय माझ्या पुतळ्यांचे प्रदर्शन बघायला तुला बोलावलेले नाही, क्रिटिक करायला"
- तो पुतळा टाळी वाजवताच वर जाणार्‍या झुंबरामधे का ठेवला होता? इतकी वर्षे त्या घरात कोणीच टाळी वाजवली नाही का? बरं, लपवायचा होता म्हंटले तर तो तसाही दिसतच होता. टेक्नॉलॉजी चा निरर्थक वापर
- इतका वेळ हातिमसकट सर्व पुरूष लोक पायघोळ अंगरखे घालत असताना रझा मुराद ला भेटायला येताना जितेन्द्र धरम वीर किंवा पाताल भैरवीच्या सेटमधून चुकून इथे आल्यासारखा का आलाय?
- संगीता बिजलानी च्या परीला फुल साइज पंख असूनही उडताना हात हलवत उडावे लागते हे ही एक आश्चर्यच.

फारेंड... Lol
सत्ते पे सत्ता पासून हीरो लोकांनी विजयेन्द्र घाटगेचे न जमणारे लग्न जमवून देण्याची प्रथा इतकी वर्षे सुरू होती याची कल्पना नव्हती-- हे वाचून खूप हसायला आले. हा विजेंद्र घाटगे असतो कुठे हल्ली? दिसत नाही! पूर्वी एक ही टी व्ही सिरियल ह्याच्या शिवाय पूर्ण व्हायची नाही!
तुम्ही लोक फार लक्षात ठेवता आणि तुम्हाला ते बरोब्बर योग्य वेळ आली की आठवतं!!
जितेंद्र चे कपडे तर बर्‍याच वेळेला रेग्युलर शर्ट पँट च दाखवले आहेत......अगदीच काल बाह्य!

जिन्न व्हायला काय करावे लागते? Happy
अजून एक म्हणजे - ज्या क्रमाने प्रश्न विचारलेले आहेत, नेमके त्याच सिक्वेंस ने कशी यांना सोल्युशन्स मिळत जातात? काहीच मागे पुढे नाही?
तसे तर ते प्रश्न काही सिक्वेंशिअल- इंटर डिपेंडंट नाहीत ना?

बाय द वे -- कमलाखचे काय होते पण? तो दाखविलेलाच नाही का? तो मुख्य व्हिलन ना? मग त्याची साधी झलक ही नाही.... फक्त नामोल्लेख?
खवीस, अस्वली भुते, शकुनाचा नारळ....... Biggrin
आणि एव्हढं करुनही तो मोती तिथे प्रेझेंट नसतोच का करायचा ? मग काय...नुस्तं सापडला म्हणून सांगून दिलं असतं तरी चाललं असतं की.....नाहीतरी फोडलाच ना?

खूपच स्ट्रेस बस्टर लेख. औषध घ्यायचे कामच नाही! Rofl

मस्त! मस्त!! मस्त!!!
च्यामारी मग मंजिलच्या नावाखाली यांना कुठे घेऊन उडत होता?>>>>> Rofl
चित्कारण्याचा ट्रिगर आणि प्रश्न सुटण्याची लक्षणे>>> Lol

- परीलोकातील दगड कन्व्हर्टर प्रोग्रॅम मधे काहीतरी मेजर गडबड दिसते. परी व तिला वाईट हेतूने हात लावणारा माणूस यात नक्की कोणाला दगड करायचे याचे लॉजिक चुकले असावे.
- मारने वाले से बचाने वाला महान होता है म्हणणारा हातिम पुढच्या ५ मिनीटांत बिबळ्याला मारतो.
- ५-१० मिनीटे बिबळ्याशी लढल्यावरसुद्धा हातिमचा लिटरली "बाल भी बांका" नही होता. तसेच पुन्हा लिटरली उभ्या उभ्या पाण्यात शिरल्यावरही ठक्क कोरडाच असतो तो.
- याने शेर मारल्यावर त्या मुंडक्यांनीही शेर मारावा असे स्क्रिप्ट मधे असावे व थोडे लॉस्ट इन ट्रान्स्लेशन झालेले दिसते, कारण ते मुंडके शेर मारते पण तो शायरी वाला.
- पाण्याखाली गुहा आहे ठीक आहे. पण पाण्याच्या तळाशी मधे काहीही नसताना अचानक कोरडा भाग कसा सुरू होतो माहीत नाही.
- सनमा ओये सनमा ओये ओये ओये ऐकल्यावर त्या मर्जिनाला विचारावेसे वाटले की तू अरबी आहेस की पंजाबी आधी ठरव
- मर्जिना हातिम ला जाळ्यात खेचू पाहात आहे पण तिला कल्पना नाही की हातिम तेथे वेगळेच "प्रोटेक्शन" घेउन आलेला आहे. हातिम कोणत्याही स्त्रीच्या खूप जवळ गेला की चमकणारा तो ताइतरूपी ब्लिंकर.
- हातिमने खुदा रहम कर म्हण्टल्यावर एकदम हातिम, नुझरूल आणि मर्जिना सगळेच बाहेर येतात. त्या दिवशी रहम वर एकावर दोन फ्री ऑफर असावी
- पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यावर त्या परीचा चेहरा पूर्ववत होतो. मात्र त्यामुळे कोणता प्रश्न कोणत्या अवयवाशी निगडित आहे असे कुतूहल निर्माण झाले आहे. एक जबाब देखा है. बाकी देखने की हवस है असे प्रेक्षक म्हंटले असतील.

पुढे:
- जोगिंदर चे लहानपणी जावळ केल्यावर ती हेअर स्टाइल आवडून त्याने कायम तशीच ठेवलेली दिसते.

श्रोडिंगर जाळ फेकणारी छडी: परीबानो दोघांना नवीन कपडे द्यायला तो जाळ फेकते त्याने हातिमचा लाल ड्रेस निळा होतो व नुझरूल चा निळा ड्रेस लाल. म्हणजे ते कपडे लिटमस चे असून त्या जाळात एकाच वेळी अ‍ॅसिडिक व अल्कलाइन गुणधर्म आहेत हे सिद्ध होते.

पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्यावर त्या परीचा चेहरा पूर्ववत होतो. मात्र त्यामुळे कोणता प्रश्न कोणत्या अवयवाशी निगडित आहे असे कुतूहल निर्माण झाले आहे. एक जबाब देखा है. बाकी देखने की हवस है असे प्रेक्षक म्हंटले असतील. - फार एंड - Biggrin Rofl

मात्र त्यामुळे कोणता प्रश्न कोणत्या अवयवाशी निगडित आहे असे कुतूहल निर्माण झाले आहे. एक जबाब देखा है. बाकी देखने की हवस है असे प्रेक्षक म्हंटले असतील.<<<<<<
Rofl

फारएण्डजी, तुमच्या विशेष टिप्पण्या लेखास चाराहून जास्त चाँद लावत आहेत. तेही पूर्ण गोल राखून असलेले. _/\_

वा!! पायस च्या जोडीला फारएण्ड - तोची दिवाळी दसरा! आता श्रद्धातैंनी भर घातली की त्या दसर-दिवाळी च्या जोडीला ईद-ए-मिलाद पण होऊन जाईल. Happy

"हातिम त्याला अतिशय व्हेग आज्ञा देतो की हमें हमारी मंजिल तक पहुंचा दो. यांची मंजिल वेल डिफाईन्ड नाही. जर त्यांना त्यांची मंजिल माहित असेल तर त्यांना त्या मोत्याचाही ठावठिकाणा माहित आहे. तसे नसल्यामुळे आता सर्व ओनस जिन्नवर येतो. " - इथे तर मॉडर्न डे मॅनेजमेंट चं प्रात्यक्षिक च दाखवलय. सहसा सिनियर मॅनेजमेंट कडून, 'स्ट्रॅटेजिक इनिशिएटीव्ह, कोलॅबोरशन' वगैरे संज्ञा वापरून आलेले डिरेक्टीव्ह्स असेच 'म्हणजे नेमकं काय करायचं'? असा प्रश्न पाडणारे असतात आणी त्यांच्या खालच्या मॅनेजमेंट च्या फळीला स्वतःच्या डोक्यानं त्याचा अर्थ लावत ते कोडं सोडवावं लागतं.

झकास लिहिलं आहे Happy
एक बेसिक प्रश्न. त्या दोन्ही परी बहिणींना पंख आहेत मग त्यांच्या त्या छोट्या भावाला पंख का नाहीत? तो तर परिस्तानचा शहजादा आहे ना? की वयात आल्यावरच पंख फुटतात? तसं असेल तर मग आलोकनाथला पंख का नाहीत?
आणि फक्त बायकांनाच पंख असतात तर मग परिस्तान मधल्या इतर बायका बिनपंखाच्या का? ती शहजाद्याला सांभाळायला ठेवली आहे तिला पंख दिसत नाहीत.

{{{ आणि फक्त बायकांनाच पंख असतात तर मग परिस्तान मधल्या इतर बायका बिनपंखाच्या का? ती शहजाद्याला सांभाळायला ठेवली आहे तिला पंख दिसत नाहीत. }}}

मधमाश्यांच्या पोळाप्रमाणे फॉर्म्युला दिसतोय. एखादीच राणी मधमाशी असते तसं काहीतरी.. एखादीच पंखवाली परी... बाकी काम करी पर्‍या आणि एकदोन नर.

फारएण्ड, जबरदस्तच! तो 'मारनेवालेसे बचानेवाला' प्रश्न मलाही पडला होता. शिवाय

- मर्जिना हातिम ला जाळ्यात खेचू पाहात आहे पण तिला कल्पना नाही की हातिम तेथे वेगळेच "प्रोटेक्शन" घेउन आलेला आहे. हातिम कोणत्याही स्त्रीच्या खूप जवळ गेला की चमकणारा तो ताइतरूपी ब्लिंकर.>> इथे मर्जिना ला माहित नाही की हातिम केवळ तिच्या 'मर्जिनं' जाळ्यात खेचला जाऊ शकत नाही. त्याच्या ताइतरूपी ब्लिंकरशी मुकाबला करण्याची शक्ती त्या ताईत नाही.

ह्या संपूर्ण सिनेमात इतक्या ताई-माई आहेत की सिनेमाला नावच हातिम-ताई दिले आहे. त्यात अजून 'ताइत' आहेच!

पंख यायला वेगळे जीन्स(डेनिम नाही) लागत असतील.
आपल्यात फ्यूज इयरलोब वाल्यांचे वेगळे जीन्स असतात तसे ☺️☺️
हा पूर्ण पिक्चरच भयंकर आहे.
मुलीला सुट्टीत दाखवेन म्हणते

वा फारएण्डा! जोगिंदरचे जावळ, पंजाबी मर्जिना, श्रोडिंजर जाळ अशा टिप्पण्या फारच कमाल! अजून येऊ देत. पुढच्या सेक्शन नंतर माझे विवेचन पूर्ण होत आहे.
एक जबाब देखा है. बाकी देखने की हवस है >> Lol

पर्‍यांचे पंख - ती परीस्तानची चिमणी उड, कावळा उड एडिशन आहे.
चिमणी उड, कावळा उड, गुलनार उड, हुस्ना उड, बादशहा उड - अरे बादशहा तर उडतच नाही.

८) प्रश्न सातवा: हमाम-ए-बादगढ की खबर

या प्रश्नाचा अर्थ असा - बादगढ नावाचे राज्य असते. त्या राज्यात एक तिलिस्मी हमाम (पक्षी: न्हाणीघर. तुमच्या घरातला साबण तिलिस्मी नाही, चिंता नसावी) असतो. या हमामात जो कोणी जातो तो जिवंत परत येत नसतो. ओरिजिनल कथेत हातिम बादगढच्या सुल्तानाचा विरोधाला न जुमानता आत जातो. त्या तिलिस्मात भटकता भटकता तो अखेरीस एका राजवाड्यात पोहोचतो. तिथे त्याला कळते की हे तिलिस्म जादूगारांच्या शहेनशाह, जादूगार काईउमरात (या उच्चाराविषयी मी थोडा साशंक आहे) ने बनवले. या तिलिस्माची चावी एक पोपट असून, त्याचा तीन बाण वापरून शिरच्छेद करू शकलात तर या तिलिस्माने रक्षिलेला एक अपूर्व असा हिरा तुम्हाला प्राप्त होईल. हातिम मोठ्या हिकमतीने आणि चलाखीने ते काम करतो. मग ते तिलिस्म तुटते, तिथून परत येणारा हातिम पहिला व्यक्ती बनतो आणि त्याला तो हिरा मिळतो. हातिम बादगढच्या सुल्तानाला तो हिरा भेट देतो आणि परत येऊन किस्सा संपवतो. मग हुस्ना हातिमच्या मित्राशी लग्न करते, हातिमचीही वाटेत पाच-सहा लग्ने झालेली असतात. त्यातून आंदण मिळालेली राज्ये आणि यमनमध्ये मग तो सुखाने राज्य करतो. जादूगार काईउमरात कथेच्या समयकाली मेलेला असतो. आता असा मृत जादूगार चित्रपटाच्या काही कामाचा नसल्याने पटकथा पूर्ण बदलली आहे. पण रामानंद सागरच्या अलिफ लैलामधल्या सिंदबादची मौत की वादी स्टोरीलाईन या प्रश्नावरून जवळपास ढापली आहे. इच्छा असल्यास अलिफ लैला बघून आपले कुतुहल शमवू शकता.

८.१) व्हिलनचा अड्डा

सायराला इतर काही कामधंदा नसल्याने ती हातिम आणि नझरुलसोबत हँगआऊट करत असते. हे लोक आता वाळवंटी प्रदेशात आले आहेत. कमलाखकडून आपला बदला घेतल्याशिवाय तिला चैन पडणार नसल्याचा ती पुनरोच्चार करते. मग ती सांगते की त्यासाठी तिला हम्मामबादगर जावे लागेल. हम्मामबादगर हा उच्चार पूर्ण चुकीचा असल्याची मला जाणीव आहे पण सिनेमात हाच उच्चार वापरला असल्याने तोच उद्धृत केला जाईल. हातिम आणि नझरुललाही तिथेच जायचे असल्याने ऑल फिट्स टूगेदर! एकंदरीत हम्मामबादगर हे कमलाखचे निवासस्थान असल्याने हिरो आणि व्हिलन एकमेकांसमोर येण्याची संधी निर्माण झाली आहे.

नझरुल थकल्याशिवाय यांचे प्रश्न सुटत नसल्याने तो पुन्हा एकदा थकतो. वाळवंटाच्या कटआऊटसमोर काही कागदी दगड आहेत. तो एका दगडाला जरा टेकतो. वालियातै पण थकलेल्या असतात. त्या सेटच्या मधोमध जमिनीवरच बसकण मारतात. त्याचा खटका बसून शब्दशः तिच्या पायाखालची जमिन सरकते. स्कूबी डू स्टाईल ट्रॅपडोरमध्ये ती गायब होते. काय घडते आहे हे समजेपर्यंत एक मोठा पाषाण या दोघांच्या दिशेने घरंगळत येऊ लागतो. त्या ठिकाणी जराही उतार नसताना देखील तो पाषाण फ्रिक्शनला इग्नोर करत अधिकच वेगाने त्यांच्या दिशेने येत राहतो. असा पाषाण मंतरलेला नसेल तरच नवल! ते दोघे पळ काढतात. दगड सरळ रस्त्याने चाललेला असताना आणि आजूबाजूला मोकळी जागा असतानासुद्धा त्यांना दगडाच्या रेषेतून बाजूला व्हायचे सुचत नाही. यांच्यातला नक्की दगड कोण? त्या दगडाला फारसे वाईट वाटू नये म्हणून मुद्दामच त्याला पाषाण असे संबोधले आहे. रस्त्यात एक खड्डा असतो. हे त्या खड्ड्यात उडी घेतात आणि खड्ड्याच्या तोंडावर तो पाषाण फिट्ट बसतो.

तो खड्डा एका भूमिगत महालात उघडत असतो. या महालात कमानींची दारे आहेत. प्रत्येक दाराच्या दोन्ही बाजूंना विशिष्ट प्रकारचे स्तंभ आहेत. हे स्तंभ डेकोरेशनचा भाग आहेत, ते छताला भिडलेले नाहीत. प्रत्येक स्तंभावर एक कवटी आहे. स्तंभांना प्रत्येकी एका नागाने वेटोळे घातले आहे. प्रत्येक नागाने आपापाल्या कवटीवर फण्याचे छत्र धरले आहे. असे खतरनाक इंटिरिअर डिझाईन फक्त व्हिलनच्या लेअरचेच असू शकते. थोडक्यात आपण कमलाखच्या अड्ड्यावर पोहोचलो आहोत.

८.२) मुख्य व्हिलन

आपण कुठे आलो आहोत हे अजून क्लिअर नसल्याने ते थोडे गोंधळतात. हातिम म्हणतो की जरा एक्स्प्लोअर तर करू म्हणून ते चार पावले चालतात न चालतात तोच त्यांच्या मागचे कमानीचे दार बंद होते. हे दार कमी आणि शटर जास्त वाटते. शटरवर दोन हाडे क्रॉस शेप्डमध्ये असे फ्रेंडली चित्र आहे. थोडे अजून पुढे जातात तर आणखी एक दरवाजा बंद होतो. यावर एका कवटीचे चित्र आहे. बेसिकली त्यांना एका विशिष्ट ठिकाणी फोर्सफुली नेव्हिगेट केले जात आहे. याने ते घाबरून जाऊ नयेत म्हणून अमरीश पुरीचा फ्रेंडली आवाज ऐकू येतो - "चले आओ हातिम, चले आओ."

आता त्यांच्या समोर एक लालबुंद निखार्‍यांनी भरलेला खंदक असतो. तो पार करता यावा म्हणून दुसर्‍या बाजूने एक पूल (ड्रॉ-ब्रिज) उघडतो. पुन्हा अमरीश पुरीचा आवाज येतो - "कोई दीवार तुम्हारा रास्ता नही रोकेगी. चले आओ हातिम, चले आओ." आता एवढा अमरीश पुरी आश्वासन देतो आहे म्हटल्यावर जितेंद्र आणि सतीश शाह बेधडक पुढे सरकत राहतात. अखेर ते एका भव्य दालनात पोहोचतात. सेम कवटी-नाग डेकोरेशन इथेही दिसत असल्याने अजूनही आपण व्हिलनच्याच अड्ड्यात असल्याचे स्पष्ट होते. दालनाच्या एका बाजूला एक भव्य कवटी आ वासून भिंतीत बसवली आहे. तिचे तोंड चोरदरवाजा असल्याचे कोणीही सांगू शकते. मधोमध एक तळे आहे. त्या तळ्यात एक कवटी आहे आणि त्या कवटीच्या डोईचा प्लॅटफॉर्म केला आहे. त्या प्लॅटफॉर्मवर एक गरुड आपले पंख पसरवून उभा केला आहे. त्या पंखाच्या आडोशात एक कवटी-आसन (सिंहांऐवजी कवट्या) आहे. बाजूने जिना सुद्धा आहे. जिन्यावरून पाणी वाहते आहे. तळ्याच्या काठाने आणखी बर्‍याच कवट्या मांडून ठेवल्या आहेत. हा महाल बघितला तर शेषनागचा अघोरी हर्षवायू होऊन मरेल.

सालाझार स्लिदेरिनने आर्किटेक्चरची ढोबळ प्रेरणा कुठून घेतली लक्षात आल्यानंतर प्रेक्षक मुख्य व्हिलनला शोधू लागतो. पूर्ण महाल रिकामा असतो. हातिम आणि नझरुलही "चले आओ" ला शोधत असतात. अचानक त्या जिन्यांवर हातात तबक घेतलेल्या दासी प्रकट होतात. प्रत्येक दासीच्या हातातील तबकात एक मद्याचा पेला आहे. त्या प्लॅटफॉर्मवर स्फोट होतो आणि धूरातून अमरीश पुरी अवतरतो. हाच जादूगर कमलाख, सिनेमाचा मुख्य व्हिलन! कमलाखने अंगात पठाणी स्टाईलचा ड्रेस घातला आहे. शर्टवर कवटी-हाडे चित्र आहे. कमरबंद नागमुखी आहे. तसेच अंगावर झूल (केप) पांघरली आहे. हातात एका टोकाला एकशिंगी कवटी असलेला मंत्रदंड आहे. या कवटीला एक छानसा मुकुट घातला आहे. साधारण पीनजी/रांका/तत्सम सराफांकडे गणपतीचे दागिने मिळतात तशातला तो नाजूक दागिना आहे. कमलाखनेही जिन्नस्टाईल कोंबडा काढला आहे पण जिन्नप्रमाणे तो टकला नाही. दाढीची वेणी घालून तो किमान हातिमच्या प्रदेशातला नाही हे सिद्ध केले आहे.

तो हातिमची अगत्याने विचारपूस करतो की काही त्रास नाही ना झाला घर सापडण्यात? हातिम म्हणतो छे छे त्रास कसला, पण तुम्ही कोण? अरे मी दुनिया के तमाम जादूगरों का शहेनशाह जादूगर कमलाख! अशा खेळीमेळीच्या गप्पा झाल्यानंतर हातिम म्हणतो की मी पुलंचे मी व माझा शत्रुपक्ष वाचले आहे आणि घर दाखवणार्‍या घरमालकांपासून मी जरा दूरच राहतो. आता सांग तू मला इथे का बोलावून घेतलं आहे? कमलाख म्हणतो की तुला हम्मामबादगरला जायचे आहे ना? ते माझ्या अखत्यारीत आहे. मी तुला तिथे घेऊन जाईन. इतका वेळ एकही व्हिलन न दिसल्यामुळे नझरुल आणि हातिम थोडे बेसावध असतात. गप्पाटप्पा चालूच राहतात. कमलाख म्हणतो की आधी मी हातिमला बक्षीस देणार आहे. हातिम म्हणतो कसलं बक्षीस? मग कमलाख आपले खरे रंग दाखवतो. हातिमने आधीच्या प्रश्नात मोती फोडल्याचा त्याला राग आलेला असतो. कमलाखच्या म्हणण्यानुसार तो मोती मोठमोठे जादूगार पण तोडू शकत नव्हते, मग हातिमने तो मोती कसा काय तोडला? असो, चिडलेला कमलाख मंत्रदंड उंचावतो आणि म्हणतो - जिन जिन जिंदू जिंदारा

८.३) जिन जिन जिंदू जिंदारा

जिन जिन जिंदू जिंदारा हा कमलाखचा कॉमन मंत्र आहे. या मंत्राने सर्व काही होऊ शकते. मंत्र म्हणताच हातिम आणि नझरुलचे पाय एका तबकडीत अडकतात आणि त्यांचे हात जादूने पाठीमागे बांधले जाऊन जडवत होतात. थोडक्यात हातिम आणि नझरुल आता कसलीही चूं चपड करू शकत नाहीत, वायफळ बडबड करण्याव्यतिरिक्त. आपल्या उच्चासनावरून कमलाख खाली येतो आणि हातिमला सांगतो की आपल्या दोघांच्या मेहबूबा पण इथे आहेत. "गुलबदन हसीना को पेश किया जाए" असा हुकुम होताच संगीता बिजलानी धावत धावत येते. अ‍ॅक्चुअली इथे तिच्या कानातल्यांचे डिझाईन, ड्रेसचा गळा, पंखांचे मटेरिअल अशा बारीकसारीक गोष्टींच्या मदतीने ही परीबानू नसल्याचे सांगता येते. पण हातिम तेवढा हुशार नसल्याने त्याला हा संशय येत नाही. कमलाख तिचे पंख जाळण्याचा आदेश देतो.

कुठून तरी तिथे सोनू वालिया अर्थात सायरा टपकते. सायरा म्हणते - नको ना तिचे पंख जाळूस, कमलाख प्लीज. कमलाख प्लीज? अं हं कमलाख प्लीऽऽऽऽऽज. पण कमलाख दिल का दर्जी नसल्यामुळे तो काही ऐकत नाही. हातिमचे "खुदा से डर", "मेरी जंजीरे खोल फिर देख कैसे मैं तेरा सर कलम करता हूं" असे हलकेफुलके डायलॉग्ज असेच निसटतात. मग संगीता बिजलानीला उभे करतात. तिच्या मागे दहा फूटांवर जल्लाद आणि तिथून ते तिचे पंख जाळतात. क्लिअरली तिला कनेक्टेड नसलेले पंख जाळण्याचा ट्रिक शॉट टाकण्याची हिंमत केली आहे. त्याला अजिबात कन्व्हिन्सिंग नसलेली संगीता बिजलानीची तडपण्याची अ‍ॅक्टिंग. हा शॉट प्रेक्षक अ‍ॅक्सेप्ट करतील - कुठून येतो हा कॉन्फिडन्स?

मेणाचे पंख जळतात आणि परीबानू सहीसलामत असते. सगळे थोडा वेळ खुश होतात. सुखात मिठाचा खडा टाकला नाही तर तो मुख्य व्हिलन कसला? कमलाख तिला आपल्या महालात ठेवण्याचा इरादा बोलून दाखवतो. हे ऐकून सायरा चिडते. ती जाऊन म्हणते की तुला मी पाहिजे ना, ठीक आहे मी तुझ्याकडे यायला तयार आहे. पण हातिम आणि कंपनीला सोड. हे ऐकून अमरीश पुरीचा न भूतो न भविष्यति असा डायलॉग आहे. त्याची देहबोली बघण्यासारखी आहे (https://youtu.be/Gpr6hZHp0iw?t=7919). बेसिकली तो एक वाक्य बोलतो, घोटभर दारू पितो आणि एक पायरी खाली उतरतो. सारांश असा की हातिम फारच नशीबवान आहे कारण या सगळ्या हसीना त्याच्यावर लट्टू आहेत. मग तो म्हणतो की हे बघा मी काही शैतान नाही, मी एक जादूगार आहे. मी सुद्धा माणूसच आहे. जरा नाचगाणे होऊ द्यात, मग मी हातिम आणि परीबानूला सोडून देईन. हे नाचगाणे म्हणजे सिनेमातले गौरवशाली पान आहे.

८.४) आज बचना हैं मुश्किल तेरा

अमरीश पुरी मोठमोठ्याने हसतो. "झूम, आकू" असे ओरडताच संगीता आणि सोनू कपडे बदलून बॅकग्राऊंड डान्सर्सच्या जथ्यासमवेत प्रकट होतात. आधी अमरीश जितेंद्र आणि सतीशला उर्दूमध्ये काहीतरी असंबद्ध शिव्या घालतो. ते ऐकून दोघेही पूर्ण गोंधळले आहेत. लगेच गाणे सुरू होते - आज बचना हैं मुश्किल तेरा. अमरीश पुरीचा पार्ट अमरीश पुरीनेच गायला आहे तर गायिका आहेत अलका याज्ञिक आणि अनुपमा देशपांडे. हे जबराट गाणे आहे, अजिबात स्किप करू नका. अमरीश पुरी जितेंद्रला संपूर्ण गाण्यात घाबरवायचा प्रयत्न करत राहतो आणि जितेंद्र जो काही स्थितप्रज्ञ राहिला आहे की यंव रे यंव. मग संगीता आणि सोनू सुद्धा नाचायला लागतात. मागून देव आनंद ज्वेल थीफमध्ये जो ढोल वाजवतो तसले तीन ढोल आणले आहेत पण म्युझिक अरबी स्टाईलचे आहे. हा चमत्कार कसा काय झाला असेल - ए प्रेक्षक जास्तीचा विचार करतो आहे, जिन जिन जिंदू जिंदारा.

त्या दोघींनाही अजिबात नाचता येत नाही. त्यामुळे त्या फेंगाड्या पायांनी इकडे तिकडे हालतात. हे बघून अमरीश "आकू" ओरडत राहतो. एक्स्ट्रा तर जाऊच देत पण या दोघींच्या स्टेप्सही सिंकमध्ये नाहीत. मध्ये मध्ये सोनू वालिया संगीताच्या मागे लॅग करते असे दिसते. जितेंद्र नाहीतर प्रेक्षक तरी घाबरावेत म्हणून अमरीश पुरीचे अफाट क्लोजअप्स मारले आहेत. उरलेला वेळ तो या नाचावर लक्ष ठेवत गस्त घालतो आहे. दुसरे कडवे सुरू होते आणि दोघी आता इतक्या आनंदात नाचत आहेत की जितेंद्र कन्फ्युज होतो. या मला सोडवण्यासाठी नाचत आहेत की यांना इन जनरल नाचण्यात इंटरेस्ट आहे. त्यात त्याही जितेंद्र आणि सतीश शाहकडे अमरीश पुरी स्टाईलचे लुक्स देण्याचा प्रयत्न करतात. हे बघून ते दोघेही हरतात. अमरीश पुरी पुन्हा एकदा त्याला उर्दूतून शिव्या देतो. तो म्हणतो की "जो कुछ बचे बचा ले". म्हणजे काय? जितेंद्रच्या घरी इनकम टॅक्सची रेड पडणार आहे का? जेवढं वाचवता येईल तेवढं वाचव. ऑफकोर्स तेच करणार ना तो. फडतूस सल्ल्यांना सुद्धा एक लिमिट असते.

या स्टेजला जितेंद्राने गिव्ह अप मारलेला दिसतो. त्याला एकतर संपूर्ण सिनेमात नाचू दिलेले नाही. त्यात मनोरंजनाच्या नावाखाली अनस्किल्ड डान्सर्स नाचवल्या आहेत. ते बघून त्याला अतीव दु:ख जाहले आहे. आता तर गाण्याच्या ओळींनी सुद्धा बंड पुकारलेले दिसते. "जिस आग में दिल जलता हैं, तुझको भी जला देंगे हम". मधले "उसी आग में" खाऊन टाकलेले दिसते. इकडे अमरीश पुरीचे जितेंद्रला घाबरवायचे प्रयत्न चालूच आहेत. आता तो लहान मुलांना हसवण्यासाठी जसे चेहरे करतात तसे चेहरे करतो आहे. हे बघून जितेंद्रच्या चेहर्‍यावर "प्लीज किल मी नाऊ" असे भाव आहेत. पुढच्या कडव्यात ढोल टाकून देऊन डफल्या आणल्या आहेत. रेड हॉट चिली पेपर्स स्टाईलमध्ये गिटार वाजवली जात आहे. असे केऑटिक संगीत कमी म्हणून संगीता बिजलानीच्या पोटाचा क्लोज अप घेतला आहे. बेंबीचे शॉट दाखवण्यात प्रॉब्लेम काहीच नाही. पण इथे हा क्लोज अप बेली डान्सिंगच्या दृष्टीकोणातून आहे. संगीता बिजलानीला नॉर्मल नाचता येत नाही, तिच्याच्याने बेली डान्स कसा काय होणार? दिग्दर्शकाने आपले ऑब्सेशन कंट्रोलमध्ये ठेवले नाही की अशा टाळत्या येण्याजोग्या चुका होतात.

एकदाचा अमरीश पुरी काय करणार आहे हे स्पष्ट करतो - "बकरा बना के, तुंबा बना के, छुरिया चला के मारू | कीमा बनाके, कच्चा चबा के, जिंदा जला के मारू ||" हे लोक काही जिवंत जाणार नाहीत हे आता कळते. इतका वेळ नाचल्यानंतरही या दोघींना चवड्यांवर उड्या मारणे याला नाच म्हणत नाहीत हे कळलेले नाही. एकापेक्षा एकच्या अप्सरा पर्वात यांना का बोलावले नाही याचे उत्तर इथे मिळते. काँट्रास्टला अमरीश पुरीचा शंभर रुपयास पात्र डान्स बघावा - इथून ते इथपर्यंत. गाणे संपवण्याची वेळ झाल्याने अमरीश पुरी भरपूर हसून घेतो. या दोघी शरीरात असतील नसतील ते सर्व स्नायू हलवून घेतात. बरेच ओ ओ ओ होते आणि गाणे संपते.

८.५) कहानी में ट्विस्ट

कमलाख सगळ्या एक्स्ट्रांना गायब करतो. सायरा जाऊन त्याला म्हणते की आता हातिमला सोडून दे. कमलाख म्हणतो की मी काही हातिमप्रमाणे वचनाचा पक्का नाही. "हम जो कहते हैं वो करते नही, और जो करते हैं वो कहते नही." राऊडी राठोडने कमलाखकडून प्रेरणा घेतली असल्याचे स्पष्ट आहे. कमलाख एका मोत्याच्या बदल्यात हातिमच्या दोन डोळ्यांचे दोन मोती फोडणार असतो. आधी एक किरकोळ मनुष्य हातात तापलेल्या सळया घेऊन येतो. परीबानू त्याला ढकलून देते. मग कमलाख म्हणतो की चल तूच तुझ्या लव्हरबॉयचे डोळे फोड. या सळया म्हणजे बेसिकली उदबत्त्या आहेत. मग परीबानू याचे डोळे फोडणार इतक्यात हातिमचा खुदा त्याच्या मदतीला धावून येतो. पंख सही सलामत असलेली परीबानू तिथे आलेली असते.

हा काय चमत्कार असा विचार करेपर्यंत परीबानू छडीने नकली परीबानूला जाळून टाकते. मग ती सायरालाही जाळून टाकते. इतकी हिंसक परी आजवर कोणत्या सिनेमात दाखवली नसेल. ती सांगते की ही सगळी कमलाखची माया आहे. इथे जे काही घडलं ते सर्व खोटं होतं. आपला प्लॅन फसल्याचे पाहून कमलाखला फारच राग येतो. जिन जिन जिंदू जिंदारा - बरेच सैनिक प्रकट होतात. परीबानूही छडीतून किरणे सोडते आणि परीलोकातले सैनिक तिथे प्रकट होतात. ती हातिम आणि नझरुलचीही सुटका करते. मग कमलाख एक कवटी पैदा करतो आणि नेम धरून तिच्या छडीवर फेकून मारतो. वास्तविक पाहता हा ऑलिंपिकलाच जायचा पण हातिममुळे मागे पडला. छडी हातातून खाली पडते आणि गायबते.

हातिम येऊन कमलाखला लाथ घालतो. त्याचाही मंत्रदंड खाली पडतो. नझरुल तो तत्परतेने आपल्या ताब्यात घेतो. परीबानूचे सैनिक विरुद्ध कमलाखचे सैनिक अशी फाईट सुरू होते. खुद्द कमलाख आणि हातिम तलवारींनी लढू लागतात. दोघेही तसे तुल्यबळ असतात पण हातिम थोडा उजवा असतो. हे सर्व चालू असताना नझरुल आणि परीबानू काही चिल्लर व्हिलन्सना मारतात. या गडबडीत कमलाखचा मंत्रदंड उडून त्याच्या कवटी आसनावर जाऊन पडतो. कमलाख तो परत ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो पण हातिमच्या उडी मारून टेलिपोर्ट होणे पुढे त्याचे काही एक चालत नाही. हातिम तो मंत्रदंड वाहत्या पाण्यात फेकून देतो. आता पारडे क्लिअरली हातिमच्या बाजूने फिरलेले आहे. हे बघून कमलाख परीबानूला पकडून कवटी-चोरदरवाज्यातून काढता पाय घेतो. हातिम त्याच्या मागे येऊ बघतो पण ती कवटी आग ओकते आणि कमलाखला पळून जाण्यास थोडा अवधी मिळतो.

८.६) व्हिलनचा जीव पोपटात असतो

हातिमही आगीचे लोळ चुकवून कमलाखच्या मागे मागे येतो. ते आता एका वेगळ्याच ठिकाणी असतात. सायरा तिथे कैद असते. थोडक्यात आधीची सायराही नकली होती. दोघांची फाईटिंग पुन्हा कंटिन्यू होते. आता ते दोघे एका प्लॅटफॉर्मवर फाईट करत असतात जिथे खांबाच्या मदतीने शामियाना उभारला आहे. प्लॅटफॉर्मच्या चोहीबाजूने आग आहे. मधोमध एक चांदीचा पिंजरा आहे. त्यात एक पोपट आहे. दोघांच्या तलवारी पडतात. मग ते हातापायांनी मारामारी सुरू ठेवतात. तिकडे परीबानू सायराला सोडवते. इकडे कमलाखकडे एक काटेरी सोटा असतो. तो त्या सोट्याने हातिमला मारण्याचा प्रयत्न करतो. मध्येच तो हातिमला सोटा देऊन त्याला वार करायला सांगतो. हातिमचे सर्व वार व्यर्थ जातात. कमलाख विकट हास्य करत तसाच उभा असतो. हे नक्की काय रहस्य आहे असा हातिमला प्रश्न पडतो.

हातिमची अडचण बघून सायरा ओरडते की कमलाखचे प्राण त्या पोपटात आहेत. आपले मृत्यु रहस्य असे उघड झालेले बघून कमलाखची तंतरते. तो त्वेषाने हातिमवर तुटून पडतो. मग तो एक चाकू फेकून मारतो. सायरा मध्ये तडमडून तो चाकू आपल्या पोटावर झेलते. तिच्या मृत्युचे दु:ख होऊन हातिम आणि परीबानूचे लक्ष विचलित होते. याचा फायदा घेऊन कमलाख त्या पोपटाला पिंजर्‍यातून मुक्त करून उडून जायला सांगतो. जिन जिन जिंदू जिंदारा - एक उडणारे कार्पेट किंवा कालीन येते आणि या जादुई कालीनवर स्वार होऊन कमलाख तिथून निसटू बघतो. हातिम त्या कालीनला लटकून त्याचा पाठलाग करत असतो. मरता मरता सायरा परीबानूला पोपटामागे जायला सांगते. परीबानू मग पोपटाचा पाठलाग करू लागते.

यानंतर पाल्हाळिक फाईट आहे. हातिम आणि कमलाख एकमेकांना खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. एका स्टेजला हातिम ऑलमोस्ट खाली पडतो सुद्धा. पण तो स्वतःला सावरतो आणि काऊंटर अ‍ॅटॅक करून कमलाखला उंचावरून खाली ढकलून देतो. आपल्याला काही होणार नाही हे ठाऊक असलेला कमलाख हातिमच्या विवशतेवर विकट हसत असतो आणि स्लो मोशनमध्ये खाली पडतो. पण ओव्हर कॉन्फिडन्स कधीही वाईटच. नेमकं त्याच वेळेला मसकल्ली, आपलं परीबानू पोपटाला पकडते. तो पोपटही सॉलिड फास्ट उडतो. एवढी मोठी परी पण तिचीही याला पकडताना दमछाक होते. एकदाची ती पोपटाची मान मुरगाळते. पण तिच्या नाजूक हातांना ते काही फारसे जमत नाही. ती मग पोपट हातिमकडे फेकते. हातिम मग पोपटाची मान मुरगाळतो. पोपट जळून भस्म होतो आणि गवतावर पडलेला कमलाख जिन जिन जिंदू म्हणून इहलोकाचा निरोप घेतो.

परीबानू हातिमला सांगते की आत्ता आपण उडत आहोत तो प्रदेश म्हणजे हम्मामबादगर. सातवा प्रश्न पूर्ण झाला. गुलनार पूर्णपणे बरी होते, फळ्यावरचा सातवा प्रश्नही पुसला जातो. हातिम आणि परीबानू कालीनवर उडत थेट रझा मुरादच्या घरी येतात. मरियम हातिमच्या पाया पडते. दोन दगड एकमेकांची गळाभेट घेतात. इथे संगीता बिजलानीची बॉडी डबल तिच्यापेक्षा किंचित बुटकी असल्याने तो शॉट फेल गेला आहे. पुन्हा एकदा हातिम वाकई खुदाचा नेक बंदा असल्याचे विजयेंद्र घाटगे सांगतो. रझा मुरादही आता उजळ माथ्याने वावरायला मोकळा असल्याने तोही तिथे येतो. परीस्तानमधून आलोकनाथ आणि मास्टर रिंकूही तिथे आलेले असतात. दोन संगीता बघून आलोकनाथला आपल्याला दोन मुली असल्याची आठवण येते. तो हातिमचे लग्न लावून द्यायची घोषणा करतो. पण त्याआधी हातिमचा फर्ज पूर्ण होणे गरजेचे असते. मग तो मरियम आणि विजयेंद्रचे हात एकमेकांच्या हातात देतो. या स्पीडने रझा मुराद म्हणेल कन्यादानही तूच कर, मी नवीन परी शोधतो. सतीश शाहही रेकॉर्ड स्पीडने हम्मामबादगरहून देवकुमारच्या घरी स्टॉप घेऊन आपली हिरवीण घेऊन आलेला असतो. हातिम त्याचेही लग्न होईल असे वचन देतो. आता फक्त संदेश देण्या इतपत वेळ उरला असल्यामुळे हातिम प्रेमाचा संदेश देतो आणि सिनेमा संपतो.

"उलफत के रास्ते में दीवार कोई न आये, जैसे मिलें हैं हम खुदा सब को यूं ही मिलाए"

| आमेन |

म्हणीवर आधारित कथा लिहा अशी स्पर्धा असावी आणि त्यात

हिंमत ए मर्दा तो मदद ए खुदा

या म्हणीवर आधारित कथा लिहावी पण नेमकं अमिताभ ऐवजी जितुभायने काम केल्यामुळे ती कथा

अल्ल्ला मेहरबान तो गधा पहेलवान

या म्हणीला सार्थ ठरावी असं झालंय.

कमलाख प्लीज. कमलाख प्लीज? अं हं कमलाख प्लीऽऽऽऽऽज. पण कमलाख दिल का दर्जी नसल्यामुळे तो काही ऐकत नाही.> __/\__ Lol

दोन संगीता बघून आलोकनाथला आपल्याला दोन मुली असल्याची आठवण येते. >>> Lol
क्लायमॅक्स अशक्य कहर लिहिलाय Rofl

Pages