अवतीभवतीचे पक्षी-२

Submitted by वावे on 16 March, 2019 - 03:33

याआधीचा भाग

अवतीभवतीचे पक्षी-१

https://www.maayboli.com/node/69293

हा आहे राखी धनेश ( Indian Grey Hornbill)

लांब चोचीचा हा पक्षी दिसायला बोजड दिसतो. त्याची लांब मान आणि लांब, बाकदार चोच यांचा उपयोग त्याला विणीच्या हंगामात होतो. हा खालचा फोटो गेल्या वर्षी पुण्यात काढलेला आहे. एरंडवणे भागात. तिथल्या एका झाडावर एका ढोलीत याचं घरटं होतं. आत मादी आणि पिल्लं होती. हा धनेश रोजच्या रोज अक्षरश: अनेक फेर्या मारून मादी आणि पिल्लांसाठी खाणं आणत होता. त्याच्या लांब मानेत तो लाल फळं ( वडाची असतात तशी), हिरवी छोटी फळं, छोटी पानं साठवून आणायचा आणि ढोलीजवळ बसून ओकारी काढल्यासारखी मानेची विशिष्ट हालचाल करत गळ्यातलं फळ चोचीत आणायचा. मग ते फळ हळूच चोच उघडून झेलत झेलत चोचीच्या टोकापर्यंत आणून मग ढोलीत बसलेल्या बायकोला आणि मुलांना द्यायचा Happy हा त्याचा रोजचा कार्यक्रम अनेक दिवस आम्ही पाहिला. अजून एक गंमत पाहिली, की एकदा तो हा खाऊ ठेवून गेल्यावर २-३ साळुंक्या आल्या आणि त्यांनी तो खाऊ चक्क चोरला!! पिल्लं थोडी मोठी झाली की मादीही बाहेर येते आणि मग आई-बाबा दोघे मिळून मुलांना भरवतात. हे मात्र आम्हाला पहायला मिळालं नाही. पिल्लांचा चिवचिवाट तेवढा ऐकला.

hornbill2.jpg

hornmbill1.jpg
२ ( हे प्रचि बंगळुरातलंच Happy )

ही कोकिळा ( Asian Koel)

kokila1.jpg

हे कोकिळेचं ( भांडणारं किंवा प्रियाराधन करणारं ) जोडपं

kokila2.jpg

हा थोरला धोबी ( White-browed Wagtail)

dhobi.jpg


dhobi1.jpg

बुलबुल

bulbul1.jpg
१ ( लालबुड्या बुलबुल- Red-vented Bulbul )

bulbul2.jpg
२ ( शिपाई किंवा शेंडीवाला बुलबुल-Red- whiskered Bulbul)

ही घार( black Kite)

kite2.jpg

जांभळा शिंजीर/ सूर्यपक्षी ( purple Sunbird)

sunbird.jpg


sunbird2.jpg

2
sunbird3.jpg

वेडा राघू ( Green Bee-eater)
vedaa_raaghoo.jpg

हा शिक्रा नावाचा शिकारी पक्षी आहे ( Shikra)

shikra.jpg

shikra2.jpg

पक्ष्यांची इंग्रजी नावं किरण पुरंदरे यांच्या ' पक्षी- आपले सख्खे शेजारी' या पुस्तकातून साभार Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम आलेत फोटो. अगदी सुरेख.
शिपाईची जोडी सुध्दा खुप सुंदर दिसतेय.
कोकीळ नर मादी वेगळे दिसतात हे माहित नव्हते.
मी दहावीपर्यंत भारद्वाजलाच कोकीळ समजायचो.

वा मस्त !.
फोटो आवडले .
घराच्या आसपास एवढे पक्षी ?
लकी आहात .

हो, प्रोफाइल फोटोत धोबीच आहे, मी दयाळ समजत होते त्याला. गंमत अशी झाली की गौरी देशपांडे यांच्या एका कादंबरीत एका पात्राचं नाव 'दयाल' आहे, कारण त्याला जन्मतः केसांची एक पांढरी बट होती. हे माझ्या डोक्यात असल्यामुळे मी पांढरी बट असलेल्या पक्ष्याला दयाळ समजत होते. Happy पण तो धोबीच आहे.
प्राचीन, उ.बो‌., बिपिनसांगळे, कंसराज, धन्यवाद प्रतिसाद दिल्याबद्दल!

सुरेख!!

पुण्यातल्या एनडिए भागात संरक्षण मिळते पक्षांना, त्यांचे माहेरच. ठाणे - बोरिवलीसाठी संजय गांधी उद्यान, एर फोर्सचा मामाभाचे डोंगर.

वावे, खूप छान छायाचित्रे!
थोडे डोळे उघडे ठेऊन बघितलं आणि थोडा वेळ दिला तर यातले बरेचसे पक्षी आपल्याला आपल्या आसपास बघायला मिळतात. याशिवाय नाचरा (fantail), चश्मेवाला (Oriental white-eye), ठिपकेवाला मुनिया (Scaly-breasted munia) हे आपल्या अवतीभवतीच असतात

वा वावे, मस्त आहेत सर्व छायाचित्रे .. यातील शिक्र्याला मी एवढे दिवस बहिरी ससाणाच समजत होतो. मोरघार म्हणून जो शिकारी पक्षी असतो त्याचं इंग्रजी नाव काय आहे ? आमच्या गावाला एक मोरघार(हे नाव गड्याने सांगितलं ) आलीय. तो रोज दुपारी येऊन आमची कोंबडीची पिल्लं उचलून नेतो. हि पिल्लं पण बऱ्यापैकी मोठी आहेत पण तो पक्षी भरपूर मोठा आहे . मला एकदाच दिसलाय आत्तापर्यंत लांबून . त्याने एक मोठा साप सुद्धा उचलून नेला आमच्या घासातून.

साक्षी, खरं आहे. माझेही पक्ष्यांकडे बघण्यासाठी हल्लीच डोळे उघडले आहेत Happy धन्यवाद प्रतिसाद दिल्याबद्दल! ठिपकेवाला मुनिया नाही, पण चष्मेवाला खूप वेळा दिसला आहे. फोटो काढणं मात्र कर्मकठीण.
जिद्दु, मोरघार नाही मला माहीत. फोटो काढायला जमलं तर काढा आणि इथे टाका. कुणी ना कुणी तरी ओळखेलच तो पक्षी. Happy

मस्त फोटो !आवडले सगळेच धनेश ने चांगलीच करमणूक केली म्हणायची तुमची . कोकिळेचा जोडपं , शिपाई , आणि वेडाराघू विशेष आवडले !
जिद्दू म्हणाले तसं मोरघार खरंच कोंबडीची पिल्लं पळवते . घार म्हणत असले तरी गरुड वर्गातील पक्षी असावा .
मी पण बघितलंय झप्पकन येऊन कोंबडीची पिल्लं उचलतो . अर्ध्या क्षणात गायब .. निवांत बसलेला नाही पहिला पण कधी .. उंच उंच उडतात हे .. घरटी पण असतात उंच झाडांवरच .. पण त्यांची नजर तीक्ष्ण असते.. म्हणून म्हणतात ना .. "घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी". खूप उंचावरून तिला बारीकशी हालचाल पण लगेच कळते .
आमच्याकडे (रत्नागिरी )एका उंच नारळाच्या झाडावर एकीने केलेलं घरटं .. त्यामुळे खूप महिने त्याचे नारळ पाडता येत नव्हते. Lol
साप उचलणाऱ्याला सर्पगरुड म्हणतात. इंग्लिश मध्ये (Crested Serpent Eagle)

धनेशची माहिती आणि सगळे प्रचि छान!

मोरघार खरंच कोंबडीची पिल्लं पळवते . घार म्हणत असले तरी गरुड वर्गातील पक्षी असावा .
मी पण बघितलंय झप्पकन येऊन कोंबडीची पिल्लं उचलतो . अर्ध्या क्षणात गायब . >> वरच्या प्रचि मधला शिक्राच असा डाव साधतो.

साक्षी, खरं आहे. माझेही पक्ष्यांकडे बघण्यासाठी हल्लीच डोळे उघडले आहेत
>> +१ सेम
ठिपकेवाला मुनिया नाही, पण चष्मेवाला खूप वेळा दिसला आहे. फोटो काढणं मात्र कर्मकठीण.
>> मुनिया ने टेरेस वर लिंबाच्या झाडावर घरटं केलं होतं त्यामुळे खूप फोटो काढलेत. आणि महत्प्रयासाने चष्मेवाला आणि नाचऱ्याचे चे पण काढलेत.. वेळ झाला की देईन इथे. फोटोग्राफी इतकी येत नाही त्यामुळे फोटो खूप छान नाहीत

मस्तच....

सुंदर!

धोबी, सूर्यपक्षी आणि वेडा राघू यांचे (काम धाम सोडून कोणाचीतरी वाट बघत बसल्यागत वाटणारे) फोटो आवडले.

सगळे फोटो झकास आहेत.शिक्रा एकदम खतरनाक दिसतो.

एक मोठा साप सुद्धा उचलून नेला आमच्या घासातून. एकदम अडखळले त्या घासात.म लक्षात आलं की गवतामधून.

जिद्दु यांनी वरती विचारलेल्या मोरघार या नावाचा उल्लेख मला आज किरण पुरंदऱ्यांच्या 'सखा नागझिरा' पुस्तकात सापडला.
Gray-headed Fish-Eagle म्हणजेच मराठीत मत्स्यगरुड किंवा कवस किंवा मछंगा या पक्ष्याला नागझिरा परिसरातील स्थानिक लोक 'मोरघार' म्हणतात असा उल्लेख त्यांनी केलाय. त्यांनी पुढे असंही लिहिलं आहे की काही ठिकाणी क्रेस्टेड हॉक ईगल या गरुडाला मोरघार असं नाव आहे. मत्स्यगरुडाचा मोराशी काहीही संबंध नाही. मात्र व्याध गरुड (क्रेस्टेड हॉक ईगल) मोराची लहान पिल्लं उचलतो.