फिर्याद – १अ
( फिर्याद कथेचा शेवट केल्यावर विचार आला ही कथा अजून मोठी होऊ शकते आणि पुढील भाग लिहिता झालो. आधीचा भाग येथे आहे. https://www.maayboli.com/node/69037 )
म्या दगड्या. खरंतर शंक-याच आण माझं भांडाण लय जुनं अगदी लहानपणापसनं. शंकर-या समदीकडं मला वरचढ. मी पण काय कमी नाय. जिथं जिथं संधी मिळाली तिथं शंक-याचं खच्चीकरण करायला मागंपुढ पाहिलं नाय. लहानपणी भवरा रिंगणी खेळतानी शंक-यावर राज्य आलं की मी त्याचा भवरा घ्यायचो आन माझ्या भवऱ्याच्या आणीनी त्याच्या भव-याच डोकं पुरता जोर लावून ठेचायचो. भवरा ठेचताना शंक-यांच डोकं ठेचल्यागत वाटायचं . त्याचं रडकुंडं तोंड पाहून मला लय आनंद व्हायचा.
शंक-याचा ऊस म्या पेटवला. लय डोळ्यात खुपायचा शंक-याचा डोक्याच्या वर वाढलेला ऊस. त्याचं वाऱ्यावर डुलणारं तुरं काळजाव वार करायचं. म्हणून एक दिवस दिली आग लावून. म्हादयानी घोळ केला. नाही तर संमदा उस जळला असता. म्हाद्यचा जोंधळा बी मॅच खुडला. काय पण करू नाय शकला . पुरावाच नाय सोडला. शंक-याला आता चांगला धडा शिकवला. जगायचं तर आक्रमक व्हायलाच लागतं. बळी त्यो कानपिळी उगा का म्हणत्यात ? आपला काय सज्जनपणावर ईश्वास न्हाय बा. आवं संधी मिळत नाय तवर समदी साधू असत्यात. म्हून तर जो संधी साधतो त्याला संधीसाधू म्हणत्यात. दुनयेची रीतच हाय . जर सज्जन बनून चांगलं व्हतं तर सज्जनच दिसली आसती सगळीकड. आवं ते सरकारी बेनं तलाठी वर वर चांगली खादीची कापडं घालतं पण म्हणतयं खा आधी. पन्नास रुपयं घेतं तिच्या आयला सात बारा द्यायचं. आता सरकार दरमहा पगार देत की त्याला. आवं आमच्या गावातलं तलाठी गचाकलं . दहाव्याला पिंडाला कावळा शिवंना. तवा त्याचा तलाठी लेक उठला आन म्हणला आजवर सातबारा द्यायला ५० घ्यायचो आता तुमच्या वाट्याचं आजून ५० घील तवा कावळा लगीच शिवला. आता हाय का ख-याची दुनिया.
म्या आण माझी पोरं बायको रानात राबराब राबतो पण आम्हाला पुरं पडत नाही. हा तसं म्हणायला मलाबी चार पैसं येत्यात. पण बरच पैसं पोलीस पाटील घेतो , का तर ही केस मिटवायची ती केस मिटवायची, असं सारखं चालू असतं. पोलिस पाटील शिकला सवरलाय. लोकांच्यात उठनबसनं हाय. पोलिस ठाण्यात वट हाय. वकील वळीखत्यात. त्यामुळं आपुण त्याच्याशी दोस्ती ठेवलीय. आता पाटलाशी दोस्ती म्हंजी बाई, बाटली आलीच.
एकदा असाच तालुक्याला गेल्तो म्या आण पाटील कोर्टात केसीसाठी. केस आपल्या बाजूनी झाली. पाटील म्हणला चल हॉटेलात काहीतरी खाऊ. म्हणून वकील, पोलीस पाटील आन म्या हाटेलात गेलो . लय भारी हाटील पण नुसतं मिणमिणत्या लाईटी. पायाखाली गालीचा. आत लय गारवा व्हता. म्या पयल्यांदाच बघत व्हतो असं. गल्ल्यावरचा शेट म्हंजी काळोखात ठेवलेला काळा रांजण. अंधारात पांढ-या शर्टामुळ आणि गळ्यातल्या, हातातल्या जाडजूड सोनेरी चैन मुळं दिसत व्हता.
पुढं गेल्यावर काळजाचा ठोका चुकला. कसली तरी गाणी वाजत व्हती. त्यात लोकांचं जोरात बोलणं मला बाजार भरल्यागत वाटलं. आम्ही एक टेबल बघून बसलो. परतेक टेबलाव कसल्या तरी बाटल्या व्हत्या. प्रत्येकाच्या समोर गलास. अधनंमधनं गलासातलं रंगीत फेसाळतं पाणी माणसं पीत व्हती. काही वाटेल तसं बरळत व्हती तर काही बूड नसल्यासारखं बसल्या जागेवर डुलत व्हती. कुणाचं चालताना झोकांडं जात व्हतं. सगळीकडं वंगाळ वास येत व्हता. शिगरेटीचा धूरानी डोळं चुरचुरत व्हत. म्या पाटलाला म्हणलं
“ डोळं चुरचुरत्यात.”
“दोन घोट घशात पडलं की समदं ठिक व्हतयं.”
“ आरं बार मधी आलोय. इथं खायला आन प्यायला दोन्हीही मिळतं ”
“ पाटील बिल लय येईल “
“ मर्दा एवढी केस जिंकलास आन पार्टी द्याला घाबरतोय. आरं ते वकील साहेब किती कष्ट घेतलं त्यांनी तुला जिंकायला. त्यांचे आभार मानायला नको ? ”
“ आक्शी बरुबर पण वाईच अडचण होती.”
“ तू कशाला काळजी करतो म्या हाय ना. आज बिल म्या भरतो. आलं पैसं की दे .”
“ बरं, लय उपकार व्हत्याल.”
तेवढयात आर्डर घेणार आला. पाटलांनी वकील साहेबांना ईचारलं
“ काय घेणार ?”
“ हापीसर चोवीस”
म्या म्हणलं हे काय खाणं हाय चोवीस हापीसर. पण पाटील शाणसुरतं म्हून गप्प बसलो.
पाटलांनी त्या आर्डरवाल्याला मसाला शेंगदाणं, चणं, मुगडाळ, अंडी, मसाला पापड, हाफिसर चोवीस का काय ती आन सोडा आणायला सांगितला. थोड्या टायमानी आमच्या टेबलवर हे समदे जिन्नस आले. त्या माणसाने तीन गलास ठेवलं. त्यात बाटलीतून रंगीत पाणी तळाशी दोन-तीन बोटं वतलं. उरलेले रिकामं गलास सोड्यानी भरलं. बारीक थाळ्या, ग्लास, बाटल्यांची टेबलावर सभा भरली व्हती.
पाटलांनी आन वकील साहेबांनी गलास उचाललं. मलाही माझं गलास उचलायला सांगितलं . मी पाटलाला म्हणलं पाटील म्या कधी घेतली नाही. ते म्हणले हलकं वाटलं पेल्यावं . इंग्रजी दारु हे. म्या नाय म्हणलं. पाटील म्हणलं पिऊन बघ समदा शीण निघून जाईल. समद्या चिंता ईसरशील . डोक्याला शांत वाटलं. पुढं म्हणलं
“ माणूस म्हणलं की नाद असायचाच. कुणाला देवाचा असतो. कुणाला पैसं कमवायचा. कुणाला पैसं उडवायचा. आता तू सांग पैशाची शान तिजोरीत का बाहेर. तिजोरीत जीव मारुन कशाला पैसं ठेवायचं. कुणाची तरी फुकाटची धन व्हायला. मणुष्य जन्म चौ-याऐंशी लाख योनी फिरल्यावर मिळतो. मग फुकाचा जीव का मारायचा. हाय तवर मजा करावी. नुसतं आळणी सरळ जगणं म्हणजी काय जगणं झालं.”
तेवढयात वकील म्हणलं
“देवालाबी नशा चालती. शिवाला शिवरात्रीला भांग, गांजा चालतो. एवढा धर्मराज पण जुगाराचा नाद. आपण लय किरकोळ माणसं. म्हसोबाला कोंबडं दारु चालतया. शाक्तपंथात पण मटन , दारु चालते.”
नाहीतरी म्या माळकरी नव्हतो शंक-यागत. कोंबडी, अंडी, मटन खाल्लं होतं. फक्त दारू राहिली होती. वाटलं आज हे पण करुन बघू. नाहीतरी माणसाला समद्या वाटा माहीत पाहिजे. दारु प्याल्याव तोल जातो, बोबडी वळती हे सगळं नुसतं लांबून बघून कसं कळावं. पाण्यात मासा कसा झोपतो हे मास्याच्या जल्मा बिगर कसं कळणार. आपुन बी ठरवलं झिंगल्याव काय व्हतं बघायचं. क्वाण म्हणतं मेंदू ताब्यात रहात नाय. एरवी तरी मेंदू मनाच्याच ताब्यात असतोय. आन मन कुठं आपल्या ताब्यात असतं.
हा लोकं म्हणत्यात दारु वाईट. पण मला एक समजत नाही माणसाला बरं नसल्यावर दवादारू केली का असं का ईचारत्यात. खोकला झाल्ता तवा आईनी वाईच ब्रांडी आणली आन पाजली राती झोपताना. दुसऱ्या दिशी खोकला गायब. म्या गाढ झोपलो असं आई म्हणली व्हती एकदा. आज बघू कशी झ्वाप लागती ती. नायतरी लय तुणतुणी असत्यात रोज जिवाला. हे आणा ते करा. नुस्ता जीव ईटून जातो. म्या बी माणूस हाय. कवातरी मला माझ्या मनापरमाणं वागू द्या.
म्या बघितलं एकदा वशाला वडाखालच्या भूतानी झपाटलं. त्याचं असं झालं. वशा बैल चारायला दिवाळीच्या दिसात कोंबडं आरवता चालला व्हता. थंडी मरणाची . वशानं घोंगंडं पांघरलं व्हत. त्याला वडाखाली आल्यावर एक बाप्या दिसला तशीच घोंगडी पांघारल्यला. त्यो वशा पसनं कासराभर लांब व्हता. त्यांनी वशाला तंबाखू मागितली. वशाला संप्यानी वडाखाली भूत बघितल्याचा सांगितलं होतं. वशाची चांगली टराकली. वशा बैलं घेऊन घरी आला. आण आजारी झाला. कायबाय बरळू लागला, त्याला ताप चढला. लय यड्यावाणी कराया लागला. एका बाबानी दारु आन अंड्याचा उतारा सांगितला. उतारा टाकल्यावर वश्याला फरक पडला. म्हंजी भूत दारुला वश झालं . बघू आपल्याला दुनिया वश व्हती का?
ही समदं आपुण अनुभवावं असं मला वाटाया लागलं.
पाटील आण वकील मला महान वाटाया लागलं. त्यांनी इतकं पटवून दिलं की शब्दनशब्द खरा वाटला. आम्ही सगळ्यांनी दारूचे गलास एकमेकांना भिडवलं. म्या बघत होतो पाटील आण वकील कसं पितात . ते एक एक घोट हळूहळू घेत व्हतं आणि पिलेटीतलं खात व्हतं . म्या पण तसंच केलं. पण पहिला घोट घेतला तर त्वांड लय कसनुसं झालं. डोक्यात झिनझिनलं. पाटील म्हणलं सावकाश व्हवदे. शेंगदाणं खा म्हंजी चव येईल. तेवढयात गाणं कानावं पडलं
कारभारी दमानं होऊ द्या धमाल
मला वाटलं आपल्यालाच कोण तरी सांगतोय दमा दमानं प्या म्हणून. समोरच्या टेबलावरचा एकजण उठला आण नाचाया लागला . चांगला थोराड माणूस वं. पण लाज सोडून नाचत व्हता. त्याला मॅनेजर ने खाली बसवला.
पाटील म्हणलं असं ईसरशील समदं. आता पाटील पण भसाडं गायला लागलं
मी सोडून सारी लाज, अशी बेभान नाचले आज
की घुंगरू तुटले रे, की घुंगरू तुटले रे
सगळीकडं नुस्ता गोंधळ. म्या हळूहळू दारु पीत होतो. अंडी शेंगदाणं खात व्हतो. पाटील आण वकील गप्पा मारत एक एक घोट घेत व्हतं.
इतक्यात दुसरं गाणं वाजलं
हे जवा बघतीस तू माझ्याकडं
मला आमदार झाल्यासारखं वाटतय
मलापण आमदार झाल्या सारखं वाटू लागलं. काय जादू केली या मंतरलेल्या पाण्यानं काय की. पाटील माझ्यापुढं मुजरा करतय असं वाटायला लागलं. म्या माझ्या गालावर चापट मारली आन सवताला सबूरी म्हणलं. माझं डोकं चढायला लागलं व्हतं. पाटलांनी ईचारलं ठिक सारं ना. म्या पाटलाला तिथल्या तिथं चालून दावलं. पुन्हा गलासाला भिडलो. आता तोंडाचा कडवटपणा जाणवत नव्हता. हलकं वाटाया लागलं.
पाटलांच्या आन वकीलाच्या गप्पा रंगात आल्या होत्या.
वकील – हे बाहत्तर रोगाचं जालीम औषध. रोग शारीरिक असो किंवा मानसिक.
पाटील – अगदी खरं बोल्ला. मेल्याव मुक्ती मिळती का नाय माहित नाही पण हे दोन घोट पोटात गेलं की इथंच मुक्ती मिळती सगळ्या चिंतां पासून.
वकील – मुक्ती आवं मुक्ती त्या लेडीज बार मधी आहे. पैमाना और साकी क्या बात है .
असं कायबाय बोलत व्हतं. नंतर माझ्या कानावर पष्ट ऐकायला येत नव्हतं.
मला आता सगळं हलल्यागत वाटत व्हतं. पाटलांनी कोंबडी, रोट्या, भात मागवल्या. म्या कसाबसा जेवलो. आता समदं हाटील माह्या भवती फिरत व्हतं. आम्ही बाहेर आलो. म्या आण पाटील एस्. टी. स्टॅंडाव आलो. एस्.टी. त बसायच्या आधी भडाभडा वकलो. पोटातलं समदं बाहेर आलं . पाटलांनी पाणी दिलं. चूळ भरली . एस्. टी. ला उशीर झालेला म्हून बाकड्यावर आडवा झालो.
जाग आली तं माझ्या घरात व्हतो. हौसी माझी बायकू मला कोरा चहा प्यायला देत व्हती. ती मला म्हणाली
“काय वं काय झालं असं म्हणायचं , तुम्हाला पार सुद नव्हती. पाटलांनी धरुन आणलं. तुमच्या तोंडाचा भपकन वास आला. पाटील म्हणलं कोरा चा द्या. अगदी चालायबी यत नव्हतं.”
“आगं, ती गुलब्याच्या मारामारीची केस जिंकलो म्हून पाटील म्हणलं नाष्टा करु. आन हाटेलात इंग्रजी दारु पाजली.”
हौसीची भुवई वर चढली. “ आत्ता ग बया, काय जनाची नाय मनाची तरी “
“ तुझ्या आयला तुझे लांडया लबाड्या करुन घर भरतो ते चालतं आन दारु चालना व्हय. लय हुशारी नाय पायजे. तुझी आकाल चुलीत घाल. म्या निर्दोष सुटलो त्याचं काय नाय तुला.”
माझा जमदाग्नीचा अवतार बघून हौसी नरामली लोण्यागत.
माणूस राडा केल्या बिगर गप नाय व्हत.
त्या दिशी पण असंच झालं माझ्या कांद्याला पाणी कमी पडलं म्हून म्या शंक-याचं पाणी उचाललं. आता तुम्हीच सांगा ईचारलं असतं त दिलं असतं का त्यानं पाणी. काढलं थोडं त कुठं बिघाडलं. पण नाय. म्हाद्याला काय म्हणत नाही. त्याला लागल तवा पाणी देतो. फकस्त मला म्हणतो तुझ्या बानं खनली का हिर ? म्हून रातचा गेलो मळ्यात उपासलं त्याच्या हिरीचं पाणी. भिजावलं कांदं.
दुस-या दिशी आला ईचारायला . चांगला तावडीत सापडला. मला लई दिसाचा वचपा काढायचा व्हता. पोरं पण घरी व्हती . मरस्तवर हाणला. पारुनी वाचावला नायतर मरायचाच त्या दिशी. शंक-याचा पार आ-याच केला.
म्या लगुलग पाटलांच्या घरी गेलो. आमचं खलबत चालू व्हतं. इतक्यात शंक-या येतोय असं रघ्या म्हणला. तसं म्या आन पाटील आतल्या खोलीत जाऊन बसलो. पाटलाचा पण खुन्नस व्हता शंक-यावं . पाटील म्हणलं लई झ्याक झालं गड्या तू चांगला बडावला त्याला. लय माजलाय. तू काय काळजी करु नको. मी हाय तूझ्या पाठी. आता एक करायचं पहिलं पोलिस चौकीत जायचं आण एन सी नोंदवायची शंक-यानी जिवंत गाडायची धमकी दिली, शिवीगाळ केली म्हणून. पाटील म्हणलं दोन हजार खर्च येईल.
“पाटील एवढं पैसं नाय.”
“मग शंक-यानी फिर्याद केली तर तुला आत टाकत्याल. तवा तुला जी काय करायचं ती आत्ताच करायला पाहिजे. म्या पाटलाला दोन हजार आणून दिलं आन त्याचं दीशी एन. सी. नोंदवली. पाटिल बरुबर व्हतं. झटपट काम झालं. आता शंक-या आपल्याला ब्वॉट बी लावणार नाय म्हून गेलो त्याच्या घरी राती. बघतो तं शंक-या अंगावं आला पण लगीच थंड झाला. मला वाटलं त्याला आता मेल्याहून मेलं झालयं. तोंड दावायला जागा नाही. माझा अंदाज खरा ठरला. शंक-यानी पोकाळ डोस दिला. दादाला बरं वाटूदे मग बघतो तुला.
क्रमशः
© दत्तात्रय साळुंके
सुरेख शैली. सुंदर कथा. आवडली.
सुरेख शैली. सुंदर कथा. आवडली.
पु.भा.प्र.
किती सहजपणे लिहिले आहे. छान
किती सहजपणे लिहिले आहे. छान शैली
झकास! पहिल्या भागासारखचं मस्त
झकास! पहिल्या भागासारखचं मस्त !
पटकन टाका पाहू पुढचा भाग.