एखादी ऐतिहासिक वास्तु आपल्या जवळ असून सुद्धा आपल्याला बघण्यासाठी वेळ भेटत नाही तसेच काहीसे प्रतापगड बाबतीत झाले.
एका निमित्ताने महाबळेश्वरला जाण्यात आले. आम्ही तेथून प्रतापगडला गेलो. त्यात वेळेमुळे काही मित्र नाराज झाले पण ठीक आहे होते असे कधी कधी.
मला लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात प्रतापगडाचा उल्लेख आहे हे आठवले आणि त्यात किल्ल्याच्या टेहळणी बुरूजाचा फोटो सुद्धा होता. प्रतापगड महाबळेश्वर पासून फक्त 22 किलोमीटर वर आहे. महाबळेश्वर पासून प्रतापगड जायचा रस्ता वळणा वळणाचा आहे. रस्ता घाटा घाटातून आणि डोंगरातून जातो. परंतु रस्त्यावर खुप खड्डे सुद्धा झालेत. त्यामुळे थोडी चिडचिड होते. पण मित्रामध्ये आठवणी सांगण्यात कधी वेळ गेला कळलेच नाही. संभाषणाचा वारू चौफेर उधळला होता. दोन कारमध्ये कुरघोडी करण्यातच किल्ला जवळ आला.
किल्याची संरचना वेगळी आहे. किल्ला एकदम सुस्थितीत आहे. गडाचे दोन भाग आहेत. किल्याचा दरवाजा जवळ गेल्या शिवाय दिसत नाही. जणु काही दरवाजा दोन बुरूजा मध्ये लपला आहे. शत्रू पासून दरवाजा सुरक्षित करण्या साठी सुरक्षा चोख आहे. त्या काळी जर शत्रू दरवाजा जवळ पोहोचलो तर त्यांना थोपवण्या साठी आतील बाजूस तोफ, किल्याच्या वरच्या बाजूने बाणांचा मारा आणि त्या सोबत बुरूजातून तेल सोडण्यासाठी चिरे सोडले आहेत. किल्ल्या वरचा बाजूला एक चौकट आहे. जर शत्रू दरवाजा जवळ आलाच तर तेथून अग्निबाणाचा मारा करता येतो. आजही दरवाजा मजबूत स्थितीत आहे. शिव कालीन परंपरेप्रमाणे आजही किल्ल्याचा दरवाजा रात्री आठ वाजता बंद होतो. दरवाजा वर दोन्ही साईडला सिंहाचा चित्र कोरलेल आहे. किल्ल्याचा सुप्रसिद्ध टेहळणी बुरूज लांबलचक पसरलेला आहे त्याचे शेवटचे टोक आकाशात घुसल्या सारखे वाटते. पावसाळ्यात पूर्ण गड धुक्यात नाहुन निघतो. त्यावर झेंडा मानाने फडकत आहे. त्यातच बुरूजा खाली आता गडाची पार्किंग आहे. हा सीन मी एका प्रसिद्ध मराठी चित्रपटात बघितला होता. त्यामुळे खुप उत्सुकता होती.
किल्ल्या वर मानवनिर्मित लहान तलाव आहे तेथूनच किल्ल्यात राहणार्या लोकांना पाणी पुरवठा होतो. किल्याला किती जरी महिने वेढा पडला तरी पाण्याचा किल्लत होणार नाही याची दूरदृष्टी महाराजांना होती. विमानातून पाहिल्यास किल्ल्याचा आकार फुलपाखरा सारखा दिसतो. किल्ला १४०० लांब आणि ४०० रुंद आहे. किल्ला समुद्र सपाटी पासुन ३४५४ फुट उंची वर आहे.
किल्ल्यात भवानी मातेचे स्वत: शिवाजी महाराजांनी बांधलेले मंदिर आहे. मुर्तीची शिळा नेपाळच्या नदी मधून आणून मातेची मूर्ती घडवलेली आहे. ही मूर्ती लांबून प्रतापगडावरती आणली आहे. तिथे स्फटिकाचे शिवलिंग आहे. हे शिवलिंग महाराज स्वत: पूजेसाठी नित्य पूजेसाठी वापरत अशी माहिती गाईड ने सांगितली. मुर्तीची स्थापना होऊन ३६५ वर्ष झाली आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने ३६५ मशालीने पुर्ण प्रतापगड रात्रीच्या वेळेस उजळून निघाला होता. त्यावेळेस इतिहास प्रेमींनी गर्दी केली होती असे गाईडने माहिती पुरवली. मंदिरात सेनापतीची तलवार आहे त्यावर सहा ठिपके आहेत. त्या तलवारीने सेनापतींनी युद्धात सहाशे लोकांचा खात्मा केला होता अशी आख्यायिका आहे. त्यावर मंदिराबाहेर शिव कालीन तोफा आहेत. त्यात वाहून नेता येणारी तोफ आहे. त्यात खडक फोडणारी कुदळ सुद्धा होती. मंदिराबाहेर आम्ही अस्सल गावरान पद्धतीने बनवलेले ताक पिले. त्याची चव मस्त होती. तिथे समोरच स्वामी समर्थ स्थापित हनुमान मंदिर आहे. किल्ल्याची तटबंदी साठी लागणारे दगड बाहेरून न आणता तेथील खडक फोडून बांधली आहे.
किल्यावर शिवाजी महाराजांनी स्वत: बांधलेले शिव मंदिर आहे. हे शिवलिंग खोदकाम करताना सापडले होते. महाराजांनी स्वत: इतिहासातील लढाई अगोदर मंदिर बांधून शिवलिंगाची स्थापना केली. शिव मंदिराच्या गर्भगृहात निरव शांतता होती.
मंदिरात जाण्या अगोदर कडेलोट बुरूज लागतो. त्या पलीकडे खुप खोल दरी आहे. महत्त्वाचे म्हणजे दरी संपल्या नंतर रत्नागिरी जिल्हा लागतो. त्या अलीकडे शिवाजी महाराजांचा घोड्यावर आरूढ पुतळा आहे. तिथल्या गाईड ने पुतळ्या बद्दल भरपूर माहिती सांगितली. शिवाजी महाराज आरूढ असलेल्या घोड्याचा एक पाय हवेत आहे. त्याचा अर्थ अश्वारुढ योद्धा आजारपणात मृत्यु पावला असा होतो. घोड्याचे दोन पाय वरती असतील तर शहीद आणि चारही पाय जमिनीला टेकले असतील तर वार्धक्या मुळे मृत्यु पावला असा होतो.
स्मारकाची देखरेख सातारा जिल्हा परिषद करते आणि बगीच्याची देखरेख वन विभाग करते. महाबळेश्वर मध्ये जी प्रवेश शुल्क घेतात त्यातील काही हिस्सा इथे वापरला जातो. किल्याची तटबंदी आजही शाबूत आणि मजबुत आहे. गडावरून आजूबाजूचा परिसराचे विहंगम दृश्य दिसते. ऐन पावसाळ्यात गड आणि अवती-भवती निसर्ग आणखी खूप सुंदर दिसतो. आजही गडावर जवळ पास १५०-२०० लोक राहतात. शिवकालीन मावळ्यांचे वंशज आहेत हि लोक. गडावर हॉटेलचे व्यवसायीकरण झाले आहे. पण त्यामुळे गडाच्या मुळ वास्तूला धक्का लागला नाही.
गडाच्या पायथ्याला अफजल खानाची कबर आहे. आधी तिथे जाता येत होते पण आत्ता तेथील जायला मनाई आहे. प्रतापगडाच्या पायथ्या लाच इतिहासातील प्रसिद्ध भेट झाली होती. त्यात शिवाजी महाराजांनी वाघ नखांनी अफजल खानाचा वध केला होता. आणि लढाईत गनीमीकावाने पराभव केला होता.
इथेच घुमली युद्धाची आरोळी
इथेच उलटले पेचावर डावपेच
इथेच झाली होती ऐतिहासिक लढाई
तोच गड खुणावतो, बोलावतो आहे
इतिहासा मधील मागोवा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम इ.स.१६५६ पार पडलेे.
इ.स.१६५६ ते इ.स १८१८ काही महिने सोडल्यास हा किल्ला शत्रु पासुन अभेद्य राहिला.
१७ फुटाचा ब्रॉन्झ चा शिवाजी महाराजाचा पुतळ्याचे उदघाटन इ.स १९५७ पंडित. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले.
कसे जाल
रस्त्याने
1) पुणे - महाबळेश्वर हे अंतर १२० किमी आहे.
महाबळेश्वर - प्रतापगड : 22 किमी आहे
2) मुंबई - पुणे - महाबळेश्वर हे अंतर २६० किमी आहे.
महाबळेश्वर - प्रतापगड : 22 किमी आहे
3) मुंबई - प्रतापगड ( मार्गे गोवा महामार्ग - पोलादपूर) २१८ किमी आहे.
रेल्वेने
सातारा हे महाबळेश्वरला जवळचे रेल्वेस्टेशन आहे. सातारा - महाबळेश्वर ५७ किमी आहे.
अतिशय सुंदर लेख आणि
अतिशय सुंदर लेख आणि फोटो.
प्रतापगड माझा अतिशय आवडता किल्ला आहे. प्रतापगडावरिल शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची कहाणी प्र.के. घाणेकरांनी त्यांच्या 'प्रतापगड' या पुस्तकामध्ये विस्ताराने लिहिली आहे व ती वाचनिय आहे.
आवांतर,
फोटो रिसाईज केलेत तर बरे होईल.
धन्यवाद प्रसाद!!! upload
धन्यवाद प्रसाद!!! upload करताना फोटो ची default साईज झाली आहे.
फोटो मस्त एकदम
फोटो मस्त एकदम
छान फोटो... प्रतापगडावर माझं
छान फोटो... प्रतापगडावर माझं आजोळ असल्यानं हा गड खुप जवळचा वाटतो.
अरे वा.. मला खानाची कबर
अरे वा.. मला खानाची कबर बघायला जायचे आहे.
धन्यवाद अमृता अमित,
धन्यवाद अमृता अमित, anilchembur !!!
प्रतापगडावर माझं आजोळ असल्यानं हा गड खुप जवळचा वाटतो >> +१
छान माहिती दिली आहे.
छान माहिती दिली आहे.
सुंदर फोटो...
सुंदर फोटो...
मस्त फोटो! चौथा आणि पाचवा
मस्त फोटो! चौथा आणि पाचवा बेस्ट!
प्रतापगडावर लहानपणी खूप वेळा गेले आहे. आता खूप वर्षांत जाणं झालं नाही. जायला हवं एकदा.
प्र. ची. अन लेख दोन्ही मस्तच
प्र. ची. अन लेख दोन्ही मस्तच !